आपल्या पिलांना भरवत पक्षी दिवसादिवसांनी त्यांना वाढवत असतात.परंतु मौज कशी ते पहा.चातक व पावशा हे कोकिळ कुळातील पक्षी मात्र आपली अंडी कसाई-खाटिक-पक्षी व सात बहिणीच्या घरट्यात घालतात.ते मोठे चतुर असतात. एका घरट्यात एकच अंडे ठेवतात.
कसाई पक्षी केवढे क्रूर- पण देवाची करणी पहा.हा खाटिक पक्षी पावशा पक्ष्याच्या पिलाच्या रूपाने जगत असतो.सात बहिणी चातकाच्या पिलावर मायेची पाखर घालतात.कटुकर्कश कोल्हाळ माजविणाऱ्या पक्ष्यांत ह्या सुस्वर गाणाऱ्या,अरण्यातील भाटाचा जन्म व्हावा हा केवढा चमत्कार.
हा सृष्टीतील चमत्कार घडताना स्वयंभू जलाशयाचा प्रकाश आसमंतात पडलेला असतो.वरून धो-धो पाणी वर्षत असते.इतर वेळी सारी झाडेझुडपे मेघांच्या प्रावरणात लपलेली असतात.या पक्ष्यांच्या घरट्यांवर हिरव्या-निळ्या दाट पानांचे छत्र उभे असते.टिटवी क्षणाक्षणाला धोक्याची सूचना देत असते.कोतवाल पक्ष्यांचा जागता पहारा असतो.
पळसाची सारी झाडे-झुडपे सातसाईंच्या रूपाने बोलू लागतात.एक-दोन-तीन अशी एकामागून एक सहा-सात उदी-भुऱ्या रंगाची,मैनेच्या आकाराची,लांब शेपटीची ही पाखरं झाडाखाली उतरू लागत,चक्-चक् करीत,किलबिल करीत आणि एकाएकी कोल्हाळाने सारे रान उठून जाई.जमिनीवरून पुन्हा जडपणे उडत,दुसऱ्या झुडपात शिरून दिसेनासे होत.
एकदा एक जोडी एकमेकांना बिलगून फांदीवर बसली होती.ओली पिसे फुलवून,पिसातून चोची फिरवत,एका तालात शेपटी वरखाली हलवत,एकमेकांच्या पंखांत-चोचीत हळुवार चोच घालीत चक् चक् आवाज करीत. गोंडी भाषेत त्यांना खेवा म्हणतात.खेव म्हणजे आलिंगन.
फार वर्षांपूर्वी त्या एकत्र राहणाऱ्या सात पाखरांचे मोठे गूढ वाटे.सातच का ?.सहा का नाही? मग सातवा कोण? नंतर कळले की,त्यात चारपाच त्यांची पिले असतात.एकूण ती क्वचितच सात असतात.परंतु सात ही संख्या भारतीयांना फार प्रिय.परंतु इंग्रजांनीदेखील आपलेच अनुकरण केले.तेही ह्या पक्ष्यांना 'सेव्हन सिस्टर्स' म्हणतात.ती सारी पिले विलक्षण स्वरात केकाटायची.कोकणात तर त्यांना कोकाट्या-जंगल बँबलर म्हणतात.
परंतु त्या दिवशी त्यांच्या केकाटण्याला चातकाचे एक शावकही साथ देत होते.डोक्यावर नुकतीच फुटू लागणारी शेंडी-पंखावर पांढरा शुभ्र ठिपका.किंचित लांब शेपटी,शेपटीवरचे पांढरे ठिपके मात्र दिसत नव्हते. नंतर क्षीण स्वरात पी-पीचा आवाज करीत त्या व्रात्य पिलांपासून दूर एका फांदीवर जाऊन बसले.
बराच वेळ त्याचे पी-पी-पी चालले होते.शेवटी त्या पिलांच्या आईला दूर बसलेल्या त्या अजाण पक्ष्याची कीव येऊन तिने त्याच्या चोचीत चारा भरला.पंख थरथरवत पी-पी-पी करीत चोच वासून त्याने तो चाराघेतला. बाकीच्या पोरांनी पुन्हा एकदा केकाटत तिच्याभोवती गदारोळ घातला.ती कावून जी उडाली तशी ती पिले तिच्या मागोमाग पळसाच्या झुडपात दिसेनाशी झाली.चातकाचा परिचय झाला तो कालिदासाच्या काव्यातील चातक व्रताने.त्याच्या दर्शनाला मी उत्सुक असूनही तो कधी फारसा दिसायचा नाही.समोर नवेगावचे विस्तीर्ण जलाशय त्याच्या काठची सुंदर वनराजी.त्या बांधावरून फिरत असताना एकमेकांचा पाठलाग करीत असलेले चातक दिसले.केवढे देखणे रूप त्यांना लाभले होते.लांब काळ्याशार शेपटीवरचे पांढरे शुभ्र ठिपके.ते उडताना मोठे अलौकिक वाटायचे. या त्यांच्या वैशिष्ट्यांवरूनच त्यांची ओळख पटावयाची. इतर वेळी ते बांधावरच्या मोहावर बसलेले असायचे तर कधी आंब्यातून मधुर आवाजात गायचे.पिंपळाच्या मंद सळसळणाऱ्या पानांना संथ गतीत साथ द्यायचे. जलाशयावरील लाटा किनाऱ्यावर आंदुळायच्या.त्या आनंदकल्लोळात पियु-पियु-पी-पी-पियु-पी-पी-पियु मोठे अद्भुत वाटायचे.
आकाशातील मेघांची छाया जलाशयात पडून तो जलाशय अधिकच गहिरा-खोल-निळा विस्मयजनक दिसायचा.वर पाण्याने भरलेले ढग आहेत.खाली विस्तीर्ण जलाशय आहे.तरी चातक तहानेलाच आहे.
त्यांचा पियु-पियूचा नाद अरण्यात भरला आहे.
देवाने त्यांची प्रार्थना ऐकली वाटते.नंतरच्या काही दिवसांत सतत वर्षाव होत होता. तुडुंब भरलेल्या जलाशयाचे पाणी बांधावरून वाहू लागले.रामटेकवर आले ते आफ्रिकेतून.तेथून मेघदूताबरोबर येणाऱ्या या पक्ष्यांची वीण इथे नवेगाव बांधावर होते.
सात बहिणीचे घरटे हेरून चातकाची मादी त्यात एखादे अंडे ठेवते.कदाचित सात बहिणीचे एखादे अंडे बाहेरही टाकून देत असावी.भारतीय साहित्यात अलौकिकत्व पावलेल्या ह्या पक्ष्यांची प्रजनन भूमी इथं या बांधावरच आहे.
कसाई पक्ष्यांची श्रीक्-श्रीक् तर कधी चीर्-चीर् चाललेली असावयाची.बुलबुलाएवढे लांब शेपटीचे, माथ्यावर काळी पट्टी असलेले हे पक्षी एखाद्या पापाचे ओझे वाहून न्यावे तसे जडपणे इकडून तिकडे झाडांच्या शेंड्यावरून उडताना दिसत.तरुशिखरावर बसून त्यांची श्रीक्-श्रीक् चाले.त्यांची पिलेही आता जाणती झाली होती.चिमणीएवढी-करड्या,उदी रंगाची,कुशीत किंचित ठिपके असलेली ही पिले कित्येकदा स्वतंत्रपणे चरताना दिसत.सारा परिवार एकत्र आला की कसला विलक्षण कोल्हाळ करायची.पंख थरारून,अंगाचा कंप करीत 
आपल्या मातापित्यांकडून चारा मागावयाची.परंतु त्यांना पोटच्या पिलाकडे पाह्यला कुठला वेळ ! त्यांचा सारा वेळ पावश्याच्या पिलाला भरविण्यात जाई.पावश्याची मादी मोठी चतुर.प्रत्येक घरट्यात ती एकच अंडे घाली.तिची इतर सारी पिले बांधावरच मोठी होत होती.इतर साऱ्या पिलांची भूक घेऊन तिप्पट आकाराचे पावश्याचे हे पिलू तिच्या कुशीत जन्माला आले होते.दिवसभराचा सारा वेळ ह्या खादाड पिलाला भरविण्यात जाई.एरवी दुसऱ्या पक्ष्यांची अंडी,पिले निर्दयपणे खाणाऱ्या या खाटकाला ही कुठून दया आली ?
आकाशात ढग आले आहेत अधूनमधून रिमझिम पाऊस येतो.बांबूची वने आता सुस्नात होऊन त्यांना वैडूर्य मण्यांचे सौंदर्य प्राप्त झाले आहे.आकाशाला भिडणाऱ्या उंचच उंच सुसरीच्या पाठीसारखी साल असलेले ऐन वृक्षात लपलेले पपिया-पावशा-गात आहेत.दिव्याने दिवा लावावा तसा त्यांच्या आवाजाने सर्वत्र आवाज लागत होता.गव्याचा मागोवा घेत भटकत असताना त्या खोऱ्यात पपियाचा आवाज भरून राहिला होता.चंद्राच्या आड दाट व पाण्याने भरलेले ढग आल्यावर धड अंधार ना प्रकाश असे झावळे झावळे झाले आहे.अशा या रात्रीच्या वेळी पपिया पिया कहा है, पिया कहा है अशा स्वरात गाऊ लागतो.एखाद्या दर्दभरी रागासारखे ते गाणे मनाची बेचैनी वाढविणारे-मनाला अनामिक हुरहूर लावणारे असते.(जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,प्रकाशक मकरंद भास्कर कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र, सिताबर्डी)
लहानपणी नंदीवाला घरापुढे येऊन गुबू गुबू गुबू वाजवत उभा राही.तोच तो आवाज.आता सूर्योदयापूर्वी भारद्वाज पक्षी करीत असलेल्या आवाजाने मी जागा होई. अनेकदा मी लपतछपत हा विलक्षण आवाज तो काढतो कसा हे पाहण्याचा प्रयत्न करीत असता मान खाली वर हलवून चोचीचा जवळच्या फांदीवर स्पर्श करीत त्या अद्भुत ध्वनिलहरी बाहेर येत.चोच कधी उघडलेली मी पाहिली नाही.बंद चोचीतून तो कसा आवाज काढत असावा,याचे आश्चर्य वाटे.ते अद्भुत स्वर कंठातून कसे बाहेर येत,हे समजत नसे.कधी कधी तो वानरासारखा हुप्प-हुप्प-हुप्प आवाज काढी.त्या दूर खोल दरीत त्याचा आवाज भरून राही.
पण आज आणखी वेगळ्याच आवाजाची किमया त्याने दाखविली.खकु-खकु चक्-चक् असा पळसाच्या दाट पानातून आवाज येत होता.येणारा आवाज आगळा वाटल्याने मी त्या आवाजाचा मागोवा घेतघेत जवळ जाताच तो अकस्मात पंख फडफडवत वेगाने उंच सागाच्या सुकलेल्या डहाळीवर जाऊन बसला.
दुसरे बसले खालच्या फांदीवर.मधूनच ती चीर-चीरचा आवाज करी तर नर खकु खकुचा स्वर काढी.त्याने जीवजीवक पक्ष्याच्या शेपटीप्रमाणे असलेल्या पुच्छाची पिसे एखाद्या सुंदर जपानी युवतीच्या हातातील नाजूक-मुलायम पंख्यासारखी पसरली होती.पंखांची तपकिरी वर्णाची पिसे हळुवारपणे उन्हात पसरून तो त्या पिसांत चोच घालत होता.त्याच वेळी त्याच्या आवाजाची किमया ऐकू येत होती.तो मादीचा अनुनय करीत होता.इतक्यात त्यांचे सागाच्या रुंद पानात ते बांधत असलेले घरटे दिसले.
गूढ आणि अद्भुत असे. सौराष्ट्र व कर्नाटक देशात ह्या पक्ष्यांच्या घरट्याविषयी गूढ लोककथा आहेत.ह्या पक्ष्यांच्या घरट्यातील मुलायम अस्तर संजीवनी काड्यांनी केलेले असते.त्या खोप्यातील काड्या जलप्रवाहात फेकल्या की इतर काड्या प्रवाहाबरोबर वाहून जातात.मात्र संजीवनी काड्या प्रवाहाविरुद्ध वाहू लागतात.ह्या अलौकिक कथेचा उगम कसा झाला हे माहीत नाही.विष्णुपुराणात भारद्वाज मुनींच्या जन्मकथेत ह्या पक्ष्यांचा संबंध असल्याने त्याच्या घरट्याबद्दलही हा प्रवाद असावा असे वाटते.ह्या पक्ष्याचे दर्शनही चास पक्ष्याप्रमाणे शुभ मानले जाते.