* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ‘जावा मॅन'चा शोधकर्ता’-’Inventor of Java Man’

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२९/७/२५

‘जावा मॅन'चा शोधकर्ता’-’Inventor of Java Man’

पाडांगच्या आजूबाजूच्या भूप्रदेशात फारसे पुराजीव मिळण्याची शक्यता नाही हे कळल्यावर युजीनने सुमात्राच्या राज्यपालांना आर.सी.जोएसनना निखळलेल्या मानवी दुव्याचं महत्त्व सांगणारं एक पत्र पाठवलं.त्यांनी त्याला मदत करायचं आश्वासन दिलं. त्याचबरोबर,युजीनची बदली पाजाकोंबोच्या पठारी प्रदेशात करावी,असं त्याच्या वरिष्ठांना कळवलं. पाजाकोंबो ही एक छोटी छावणी होती.त्यामुळे युजीनला पुराजीव शोधायला भरपूर वेळ उपलब्ध होता. इथेच त्यांच्या मुलाचा जन्म झाला.अ‍ॅना मात्र तिथे कंटाळली.कारण तिथे इतर कुठलीही युरोपीय स्त्री नव्हती.युजीन मात्र खुषीत होता.कारण लिडाअडयेर इथे त्याला बरेच पुराजीव सापडू लागले होते.त्यात बरेचसे कपींचेही होते.


त्यामुळे लवकरच मानवी अवशेषही सापडणारच याबद्दल युजीनला खात्री वाटू लागली होती.दरम्यान,युजीनचा एके काळचा सहकारी आणि मित्र मॅक्स वेबर एका शास्त्रीय मोहिमेवर पूर्वेकडील डच वसाहतींमध्ये येऊन गेला होता.त्याने डच प्रशासनाला युजीनच्या संशोधनाचं महत्त्व पटवून दिलं.त्यामुळे हॉलंड सरकारने आदेश काढला, की डच वसाहतींच्या प्रशासनाने युजीनला संशोधनासाठी त्याच्या पगाराव्यतिरिक्त दरमहा २५० गिल्डर द्यावे.दुसरीकडे,द्युबुआ कुटुंबीय अधूनमधून हिवतापाने आजारी पडायला लागले होते.युजीन तर सतत रानावनात फिरत असल्याने एकदा मृत्यूचं दार ठोठावून परतला होता.पाडांग पठारावरचे आदिवासीजन त्याच्या मोहिमांकडे संशयाने पाहू लागले होते.आपल्याला सुमात्रा बेटावर आता नवं यश मिळणं शक्य नाही असं युजीनला वाटू लागल्याने त्याने राज्यपालांना विनंती करून जावा बेटावर बदली करून घेतली होती.२४ नोव्हेंबर १८९० या दिवशी युजीनला बेडोइंग ब्रोयबस इथे मानवी जबड्याच्या खालच्या बाजूचा काही अंश मिळाला.मे १८९२मधे ट्रिनिल नावाच्या खेड्याजवळ युजीनने उत्खनन सुरू केलं.तिथे खणता खणता एका मजुराची कुदळ एका झाडावर आदळली. प्रत्यक्षात ते आदिमानवाच्या मांडीचं हाड असावं असं युजीनला खात्रीपूर्वक वाटत होतं.त्याला जावा बेटावर आदिमानवी स्त्रीचे तीन मानवी जीवाश्म मिळाले होते.


संशोधनाच्या कामात हळूहळू अपेक्षित गोष्टी हाती लागत असताना एकीकडे युजीनच्या संसाराची मात्र वाताहत व्हायला सुरुवात झाली होती.३० ऑगस्ट १८९३ ला अ‍ॅना तिसऱ्यांदा बाळंत झाली,पण ती मुलगी मृतावस्थेत जन्मली.अ‍ॅना तो मृतदेह कवटाळून बसली. ती मुलगी जिवंत आहे,असं ती सर्वांना सांगत होती.तो मृतदेह पुरल्यानंतर ती भ्रमिष्ट बनली. रात्री जंगलातून वाऱ्याचा आवाज येऊ लागला की 'माझी मुलगी मला बोलावते आहे' असं म्हणत ती बंगल्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असे.तिला त्यामुळे कोंडून ठेवणं भाग पडू लागलं. यूजीन आणि त्याच्या दोन मुलांवरही यामुळे एक विचित्र सावट पसरलं.या सावटाची छाया दूर करण्यासाठी मग एका स्थानिक मांत्रिकाची मदत घेण्यात आली.युजीन आणि अ‍ॅना हे आता आपापल्या वेगळ्याच विश्वात वावरू लागले.त्यांच्यातलं पती-पत्नीचं नातं संपलं होतं.युजीनने 'पिथेकैथ्रॉपस इरेक्टस' ऊर्फ हरवलेल्या दुव्यासंबंधीचा आपला प्रबंध लिहून पूर्ण केला.प्रबंधाच्या प्रती त्याने तत्कालीन प्रमुख पुराजीव शास्त्रज्ञांकडे पाठवून दिल्या. जगभरातून त्याच्यावर स्तुतीचा वर्षाव झाला. १८९४ अखेर त्याला भारतास भेट देण्याचं आमंत्रण मिळालं.


भेटीदरम्यान कलकत्त्याच्या वस्तुसंग्रहालयातील भारतीय जीवाश्मांचा साठा बघण्याची परवानगीही मिळाली.अ‍ॅना व मुलांना जावामधेच ठेवून युजीन भारत भेटीवर निघाला.

जानेवारीच्या मध्यास तो कलकत्त्याला पोहोचला.फ्रँक फिन आणि अ‍ॅलन अल्कॉक या संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याचं स्वागत केलं.


या संग्रहालयात तेव्हा थॉमस हॉलंड,मॉल यांच्यासारखे भूशास्त्रज्ञही काम करत होते.त्यांना युजीन भेटल्यामुळे आनंद झाला.आपल्या संशोधनाची कीर्ती भारतात आणि युरोपात पसरली आहे हे युजीनला प्रथमच कळत होतं.तो जवळजवळ सहा महिने भारतात राहिला.त्यादरम्यान तो शिवालिक टेकड्यांमध्ये पोहोचला.भारतातच त्याला 'नेचर' या वैज्ञानिक नियतकालिकाने त्याच्या प्रबंधाचं केलेलं परीक्षण वाचायला मिळालं.त्या वेळी अंदमान बेटावरच्या काही आदिवासींना कलकत्त्यात आणण्यात आलं होतं,तेही त्याला पाहायला मिळालं.युजीन भारतात असताना त्याचा मित्र आणि उत्खननातील सहकारी अ‍ॅनडाम प्रेंटीस याचे आणि अ‍ॅनाचे संबंध असल्याची कुणकुण त्याच्या कानावर आली होती.तो डच ईस्ट इंडियात परतला तेव्हा संशयाचं धुकं दाट झालेलं होतं;पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं.तरीही युजीन परत हॉलंडला जायला निघाला तेव्हा प्रेंटीसने त्याला प्रत्यक्ष भेटून निरोप घेण्याचं टाळलं.आपल्या एखाद्या शब्दाचा नाही तर वाक्याचाही युजीनकडून गैरअर्थ लावला जाईल अशी त्याला भीती वाटत होती.त्याने युजीनला एक पत्र लिहून तो मुद्दा स्पष्ट केला आणि पत्रातूनच त्याचा निरोप घेतला.


अ‍ॅनाला नवऱ्याने आपल्यावर अनाठायी संशय घेतल्याचा जो राग आला होता तो पुढे कधीच कमी झाला नाही.त्यातून त्यांच्यातला दुरावा आणखी वाढला. त्यांच्या परतीच्या प्रवासातल्या एका घटनेमुळे या दुराव्यात भरच पडली.त्यात ना युजीनची चूक होती ना अ‍ॅनाची.झालं असं,की परतीच्या प्रवासात युजीनने गोळा केलेले सर्व महत्त्वाचे जीवाश्म त्यांच्या केबिनमध्ये इतर सामानासोबतच ठेवण्यात आलेले होते.जहाज हिंदी महासागरातून सुवेझच्या दिशेने निघालेलं असताना एका जबरदस्त सागरी तुफानात सापडलं.प्रचंड पाऊस पडत होता.वादळाचा जोर,लाटांची उंची आणि जहाजाचे हेलकावे वाढत होते.अखेरीस प्रवाशांनी जीवरक्षक नौकामध्ये जाऊन बसावं,असं कप्तानाने फर्मान काढलं.अजून या नौका सागरात उतरवायचा निर्णय झाला नव्हता;तरी असं केल्याने उतारूंना तयारी करायला वेळ मिळाला असता.हळूहळू सर्व उतारू आवश्यक तेवढं सामान घेऊन त्या नौकांमध्ये येऊन बसले.

त्यात द्युबुआ कुटुंबाचाही समावेश होता.अचानक युजीन त्या जीवरक्षक नौकेतून उडी मारून जहाजावरच्या आपल्या केबिनकडे पळाला.निदान पिथेकँथ्रॉपसचे अवशेष त्याला वाचवणं आवश्यक वाटत होतं.त्याच्या आयुष्याच्या धडपडीचं ते सार होतं.ते या जहाजाबरोबर सागरतळी गेलं असतं तर त्याचे सर्व परिश्रम खरोखरच पाण्यात जाणार होते.तो का पळाला ते अ‍ॅनाच्या लक्षात आलं.बायको-मुलांपेक्षाही युजीनला 'जावा मॅन'चे जीवाश्म महत्त्वाचे वाटत होते.अ‍ॅनाने त्या अनोख्या बेटांवर कसे दिवस काढले याच्याशी त्याला काहीही देणंघेणं नव्हतं.तो उत्खननाला गेला असताना स्थानिकांच्या साहाय्याने तिने काढलेल्या खस्तांना त्याच्या लेखी किंमत नव्हती.त्याच्या दृष्टीने काही लाख वर्षांपूर्वी मेलेल्या त्या स्त्रीची हाडं त्याला फार महत्त्वाची वाटत होती.

थोड्याच वेळात ते जीवाश्म असलेली पेटी छातीशी कवटाळून युजीन परतला आणि अ‍ॅनाला म्हणाला,"अ‍ॅना मला काही झालं तर तू मुलांची काळजी घे.मला या जीवाश्मांची चिंता आहे." तो पट्टीचा पोहणारा होता.जीवरक्षक नौकेला काही झालं असतं तर तो आपले ते लाडके जीवाश्म वाचवायचा प्रयत्न करणारा होता.अ‍ॅना मुलांना जवळ घेऊन निमूट बसून राहिली.तिच्या डोळ्यांत अश्रू होते.युजीनला ते लक्षात येतीलच याची तिला खात्री नव्हती.हे सागरी वादळ शमलं;कप्तानाने सर्व उतारूंना केबिनमध्ये जायचा आदेश दिला.युजीनने ते जीवाश्म परत सुखरूप केबिनमध्ये ठेवले.सागरी वादळ शमलं,पण एक प्रचंड विध्वंसक वादळ अ‍ॅनाच्या मनात थैमान घालू लागलं. युजीनला त्याचा पत्ताच नव्हता.द्युबुआ कुटुंब 'द नेदरलँड्स'ची राजधानी 'द हेग' इथे राहू लागलं.इथेही त्यांना शांतता लाभली नाही. त्यालाही 'जावा मॅन'ची हाडंच कारणीभूत होती.युजीनने आणलेले जीवाश्म अत्यल्प आहेत,त्यावरून 'हरवलेला दुवा' सापडला असं म्हणणं योग्य होणार नाही,असं काही विरोधक म्हणत होते;तर रुडॉल्फ व्हर्चेसारखे काही संशोधक ही हाडं माणसाचीच आहेत हेच मान्य करायला तयार नव्हते.सुदैवाने लेआँस-पीएर मॅनुव्रिएसारखे काही शास्त्रज्ञ युजीनच्या बाजूचे होते. या वादात घर लावणं, घरखर्च भागवणं, मुलांच्या शिक्षणाची सोय करणं या बाबींकडे लक्ष द्यायला युजीनला वेळच नव्हता.


दुसरीकडे,घरी त्याच्या कार्याचं महत्त्व समजेल अशी कुणीही व्यक्ती नव्हती.आठ वर्षांपूर्वी निघताना त्याचं वडिलांशी भांडण झालं होतं.वडिलांना अभिमान वाटेल असा शोध आपण लावल्याने परतल्यावर ते मागचा राग विसरतील असं त्याला वाटत होतं;पण त्याचे वडील आता हयात नव्हते.युजीनने आपल्यामुलाचा,जाँचा प्रतिरूप म्हणून वापर करून एक पुतळा तयार केला होता.

त्याच्या चेहरेपट्टीत आणि शरीरयष्टीत हवा तसा बदल करून हा पिथेकैथ्रॉपॉसचा पुतळा त्याने इ.स. १९०० मधल्या पॅरिस इथल्या प्रदर्शनात पाठवला.जाँला तो पुतळा यूजीनचाच आहे असं वाटायचं.तसं तो इतरांना सांगतही असे.


शालेय शिक्षण संपताच युजीनच्या मुलांनी उच्च वसाहतींमध्ये जायचं ठरवलं.त्यांना लगेच नोकऱ्याही मिळाल्या.त्यांना निरोप देताना युजीन म्हणाला,"तुम्ही ज्या भागात जाताय त्या भागातल्या प्राण्यांच्या कवट्या मला पाठवा.सध्या मी कवट्यांच्या आकारावर संशोधन करतोय." मुलांनीही पुढच्या काळात वडिलांची आज्ञा शिरोधार्ह मानली.युजीन द्युबुआ विसाव्या शतकात ४० वर्षं जगला.या काळात त्याने बरंच संशोधन केलं. त्याच्या संशोधनाशी खेळ करणाऱ्यांशी आणि त्याचं संशोधन खोटं ठरवणाऱ्यांशी झगडण्यातच त्याला बहुतेक काळ खर्च करावा लागला.अनेकांनी त्याच्या संशोधनाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.पहिल्या महायुद्धकाळात भूशास्त्र आणि मानवशास्त्राकडे कुणीच फारसं लक्ष दिलं नाही.नंतरच्या काळात वयोमानामुळे युजीनची वाद घालण्याची क्षमता ओहोटीस लागली. नवी पोरं लबाड्या करतात,हे त्याने दाखवूनही उपयोग नव्हता.तो एकटा एकटा राहू लागला.दुसरीकडे फॉन कोएनिग्जवाल्ड, वायडेनरिख आणि बोनर्ट हे मानसशास्त्रज्ञ म्हणतील तेच सत्य,असं युरोपात म्हटलं जाऊ लागलं.नोव्हेंबर १९४० मध्ये युजीनने या तिघांमुळे मानवशास्त्राचं नुकसान होतंय,असं लिहिलं खरं;पण युद्धाच्या धामधुमीत त्याच्याकडे कुणाचं लक्ष जाणार ?


१६ डिसेंबर १९४० या दिवशी डॉयुजीन द्युबुआचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आणि मानवी वंशाचा दुवा शोधणारा हा अवलिया शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला.


२७.०७.२५ या लेखातील दुसरा शेवटचा भाग..