* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

७/१०/२५

गणित : जीवनाचा सोबती गणित/Mathematics: Life's companion

'गणित — जीवनाचा सोबती ते एआय पर्यंत' हा डॉ. दीपक शेटे (गणित शिक्षक,नागांव) यांचा विचारप्रवर्तक लेख दैनिक लोकमतच्या "सारांश" सदरामध्ये ०५. ऑक्टोबर २०२५ सारांश स्वरूपात प्रकाशित झाला आहे.तो गणिताच्या प्रवासाचे आणि त्याच्या जिवंत महत्त्वाचे सुंदर दर्शन घडवतो.हा तोच लेख विस्ताराने….!! हा लेख वाचताना वाचकाला जाणवते की गणित हे फक्त विषय नसून,विचार करण्याची कला,तर्काची दिशा आणि बुद्धीला देणारे सौंदर्य आहे.डॉ.शेटे यांनी जीवनातील साध्या अनुभवांपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गुंतागुंतीपर्यंत गणिताचा धागा इतक्या भावपूर्ण आणि समजण्यास सोप्या भाषेत जोडला आहे की प्रत्येक विद्यार्थी,पालक,शिक्षक आणि तंत्रज्ञानप्रेमी यांनी हा लेख नक्कीच वाचावा.मा.उपसंपादक भरत बुटाले सो यांचे आभार ...डॉ. दिपक शेटे,गणितायन लॅबचे निर्माते,महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानि (2021-22)


टिक टिक वाजते डोक्यात

धड धड वाढते ठोक्यात


टिक टिक वाजते डोक्यात

धड धड वाढते ठोक्यात

कधी जुनी कधी नवी संपते अंतर झोक्यात…!


हे अलीकडील गाणं आपल्याला डोक्यातील टिकटिक आणि हृदयातील धडधड यांची प्रामुख्याने आठवण करून देते.पण ही धडधड,टिकटिक गणिताच्या रूपात पृथ्वीच्या अगोदरपासून,आपल्या जन्माच्या अगोदर पृथ्वीवर वावरत आहे.सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपलं सुरू असतं गणित…


गणिताची भीती नको,ज्ञानाचा तो खजिना,  

दैनंदिन जीवनापासून, विज्ञानाचा तोच वज्रिना ।  

मैत्री गणिताशी करा,खुला होईल मार्ग,  

AI च्या युगातही,गणितच आहे सार्थक मार्ग ॥


यथा शिखा मयूराणाम् नागानाम् मणयो यथा तद्वत वेदांग शास्त्राणाम् गणितं मूर्धनि स्थितम्


(याजुष ज्यौतिषं 4)


जसा मोराच्या मस्तकावरील तुरा,नागाच्या फण्यावरील लखलखता मणी,तसंच गणित हे सर्व वेदांग शास्त्रांत सर्वोच्च स्थानी आहे.


एक मस्त उदाहरण आहे घडाळ्यातील असणाऱ्या सेकंदाच्या काट्याचा आवाज आपल्याला ऐकायला येत नाही.कारण तुम्हाला तो आवाज ऐकायचा असेल तर त्या सेकंदाच्या काट्याशी तुम्हाला जोडून घ्यावा लागतं,व तो हृदयाच्या धडधड त्याची जोडला जातो.


यत्र यत्र दृश्यन्ते कार्याणि मानुषाणाम् ।

तत्र तत्र प्रतिष्ठां गणितस्य द्रष्टुमर्हसि ॥"

(जिथे जिथे मानवी काम आहे,तिथे गणित आहे.)


किराणा घेताना पैशांची देवाणघेवाण,स्वयंपाकात मोजमाप,शेतीत खताचे प्रमाण,प्रवासातील अंतर, मोबाईलवरील डेटा – प्रत्येक क्षणी गणित आपल्या हातात हात धरुन आपणास सोबत घेऊन चालत असते.


नॉन-युक्लिडियन जॉमेट्रीचा पाया घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निकोलस व्लोबचेव्हस्कीकडे चांगली गुणग्राहकता होती.एकदा एका दुकानात काम करणारा माणूस गणिताचं पुस्तक वाचताना त्यानं बघितला.गणितावर प्रेम करणाऱ्या माणसाचं आयुष्य अस दुकानात काम करून फुकट जाऊ नये म्हणून त्यानं लगेच त्याला विद्यापीठात घेतलं.पुढे शिकून हा मुलगा भौतिकशास्त्राचा प्राध्यापक झाला. 


मजुरांसाठी गणिताचे वर्ग घेण्याची कल्पना लोबॅचेव्हस्कीच्याच डोक्यातून आली.


हिवाळ्यात सैबेरियात खूप थंडी पडते.तिथे बर्फ पडू लागतो.

जलाशयं गोठून जातात.या पक्ष्यांना अन्न मिळेनासं होतं.अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतासारख्या समशीतोष्ण प्रदेशात हे पक्षी स्थलांतर करून येऊ लागतात.स्थलांतर करणारे हे पक्षी रोजी पाचशे किलोमीटर अंतर सहज ओलांडून जातात.ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर वेगानं ते उडतात.स्थलांतर करणारे हे पक्षी प्रामुख्यानं थव्यांतून राहणारे असतात. 


आकाशातून उडताना ते बाणाच्या टोकासारखी रचना करतात,टोकावर सर्वांत अनुभवी पक्षी असतो.तो इतरांना मार्ग दाखवितो.त्यांच्या शरीररचनेत लोहचुंबकाचं अस्तित्व असतं.त्यामुळे त्यांना उत्तर-दक्षिण दिशेचं ज्ञान होतं.शत्रुपक्ष्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून हे पक्षी रात्री प्रवास करतात.त्यावेळी आकाशातील ग्रहताऱ्यांच्या साह्यानं ते उडण्याची दिशा निश्चित करतात.त्याच मार्गानं वर्षानुवर्षे प्रवास करीत असल्यानं भूगोलावरील पर्वतशिखरं,नदींचा प्रवाह आणि इतर ठळक गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात.मार्ग अचूक शोधण्यासाठी ते या गोष्टींचा देखील उपयोग करतात.उन्हाळ्याच्या सुरवातीला हे सर्व पक्षी पुन्हा आपल्या मुलुखात परतू लागतात.तोपर्यंत तेथील हिवाळा संपलेला असतो.स्थलांतराच्या वेळी पक्ष्यांच्या पिलांचं आचरण फारच आश्चर्यकारक असतं.त्या काळात ही पिलं उडण्यास थोडीफार समर्थ झाली असल्यास,ती नैसर्गिक प्रेरणेनं मातापित्यांबरोबर उड्डाण करून जातात.त्यांच्या अंगी इतका धीटपणा असतो की,हजारो किलोमीटरचं अंतर ती सहज उडून जातात.आर्क्टिक टर्न हा कुररी जातीचा पक्षी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाचा प्रवास करतो आणि पुन्हा उत्तर ध्रुवाकडे परततो.त्याचा एकूण प्रवास पस्तीस हजार किलोमीटर लांबीचा होतो.कित्येक जण मला विचारतात की, ह्या पक्ष्यांचा आपणास उपयोग काय?पक्षी आपला परिसर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.आर्थिक दृष्ट्यादेखील त्यांचं महत्त्व कमी लेखता येणार नाही.शेतातील पिकांवर पडणाऱ्या किडींवर ते नियंत्रण ठेवतात. उपद्रवी अशा उंदीरघुशींवर काही पक्षी उपजीविका करीत असल्यानं शेतीसाठी ते उपकारकच ठरतात.घुबडांची एक जोडी एक हेक्टर शेतजमिनीचं कीटक आणि उंदीर यापासून रक्षण करते.याशिवाय ते फुलांचं परागीकरण आणि बियांचं स्थलांतर करतात.(निळावंती,मारुती चितमपल्ली)


पक्ष्यांच्या शरीरात दोन जैविक घड्याळ असतात. त्यांना बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात त्यानुसार ते स्थलांतराची अचूक वेळ निवडतात.अलीकडच्या संशोधनात पक्ष्यांच्या शरीरातील सुपर ऑक्साईडमुळे त्यांना पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र दिसते असे कळले आहे. त्यांच्या डोळ्यात प्रकाशग्राही क्रिप्टोक्रोम नावाचे द्रव्य असते. ते जैविक होकायंत्राचे काम करते.सुपर ऑक्साईड त्याच्याशी अभिक्रिया घडवते.सुपर ऑक्साईड विषारी असते.शरीरातील त्याचे प्रमाण अल्प असते.पण तेवढे जैव होकायंत्राचे काम करून घेण्यासाठी पुरेशी असते.


गेली अनेक वर्षे रुपेरी पडदा गाजवणारा गुप्तहेर ००७ जेम्स बॉंड आपल्याला माहित आहे.इयान फ्लेमिंग या लेखकाचा तो मानसपुत्र.इयान फ्लेमिंग एकदा वेस्ट इंडिज बेटातील जमैका येथे गेले असता त्यांचे शेजारी 'जेम्स बाँड हे पक्षी शास्त्रज्ञ' होते त्यांनी 'फिल्ड गाईड ऑफ बर्ड्स ऑफ द वेस्ट इंडीज' हे पुस्तक लिहिले होते.इयान फ्लेमिंगच्या हातात ते पुस्तक पडल्यावर त्यातील पक्ष्यांकडे नाही तर त्या लेखकाच्या नावाने ते प्रभावित झाले व त्यांनी आपल्या माणसपुत्राचे नाव ठेवले.- "जेम्स बाँड"


जपानमधील बुलेट ट्रेनचा इंजिनियर राजी नकात्सु आहे.तो पक्षिनिरीक्षक आहे‌‌.त्या ज्ञानाचा उपयोग त्याने बुलेट ट्रेनचे डिझाइन बनवताना केला.खंड्या हवेतून म्हणजे कमी प्रतिकाराच्या माध्यमातून पाण्यात म्हणजे अधिक प्रतिकाराच्या माध्यमात प्रवेश करतो त्या वेळी ना पाणी उसळते ना आवाज. त्यासाठी त्याच्या चोचीला श्रेय द्यावे लागते. बुलेट ट्रेनला अशा तऱ्हेच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. नकात्सूने ट्रैनची रचना करताना तिची रचना खंड्यांच्या चोचीसारखी केली. ही ट्रेन कमी प्रतिकाराच्या उघड्या हवेतून अधिक प्रतिकाराच्या बोगद्यात प्रवेश करताना जो आवाज करण्याची शक्यता होती ती त्याने गाडीच्या नाकाची रचना खंड्यांच्या चोचीसारखी करून खूपच कमी केली.गाडीने वीज ग्रहण करण्यासाठी काही डब्यांवर पेंटाग्राफ बसवावे लागतात.ते पेंटाग्राफसुध्दा खुप आवाज करत.तो कमी करण्यासाठी घुबडाच्या शरीररचनेचा अभ्यास उपयोगी पडला.घुबल आपल्या शेजारून उडत गेले तरी त्याच्या पंखांचा आवाज होत नाही.हे साध्य होते त्याच्या प्राथमिक पिसांच्या रचनेमुळे.त्यामुळे एकच मोठा हवेचा भोवरा तयार न होता असंख्य छोटे भोवरे तयार होऊन आवाज कमी होतो.त्याने पेंटोग्राफची रचना त्या धर्तीवर केल्याने त्यांचा भणभणाट कमी झाला.निसर्गात दडलेले विज्ञान उपयोगी पडते ते असे.(पक्षीगाथा,दिगंबर गाडगीळ)


मानवी जीवन हे अमूल्य आहे आणि काहीही झालं तरी माणसाने स्वतःला जिवंत ठेवलं पाहिजे.जोपर्यंत नैसर्गिक मृत्यू येत नाही तोपर्यंत…हे स्पष्ट करण्यासाठी पुढील उदाहरण महत्वाचे आहे.


पॉल वोल्फस्केल या जर्मन उद्योगपतीला थोडाफार गणिताचा छंद होता प्रेमात अपयश आल्यामुळे म्हणा,किंवा स्क्लेरॉसिस या आजाराची सुरुवात झाल्यामुळे म्हणा,पॉलला आत्महत्या करावी असं वाटू लागलं.त्याने आत्महत्येसाठी एक दिवस आणि वेळही निश्चित केली आणि त्या वेळेला डोक्यात गोळी घालून आपलं आयुष्य संपवायचं असं त्यानं ठरवलं. आत्महत्येच्या त्या ठरवलेल्या दिवसाची वेळ येईपर्यंत काहीतरी करायचं म्हणून पॉल लायब्ररीत गेला आणि नेमकं त्याच्या ह तात फर्माच्या लास्ट थिअरमविषयीचं पुस्तक पडलं. हा लास्ट थिअरम वाचता वाचता तो सिध्द करण्याचे अनेक मार्ग त्याच्या डोळ्यासमोर नाचायला लागले.लगेच त्यानं भराभर कागदावर गणितं करायला सुरुवात केली.बऱ्याच वेळानंतर आपण एका डेड-एण्ड पाशी आला आहोत आणि आता हा थिअरम आपल्याला सिद्ध करता येणार नाही हे त्याच्या लक्षात आलं.पण या वेळेपर्यंत त्यानं ठरवलेली आत्महत्येची वेळ निघून गेली होती.फर्माच्या या लास्ट थिअरममधलं आव्हान त्याला एवढं भावलं की आत्महत्येचा विचारही त्याच्या डोक्यातून निघून गेला.इतकंच नाही तर १९०८ साली पॉल वोल्फस्केलनं 'गॉर्टिजेन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस'ला १ लाख मार्क्स देऊ केले आणि फर्माचा थिअरम पूर्णपणे जो कोणी सिद्ध करेल त्याला हे पैसे द्यावेत असंही सांगून ठेवलं


अंधाऱ्या खोलीत अस्तित्वात नसणाऱ्या काळ्या मांजराला शोधत बसणारा म्हणजे गणितज्ज्ञ- चार्ल्स डार्विन…म्हणूनच गॅलिलिओ म्हणतात –"गणित हीच ती भाषा आहे ज्यात देवाने हे विश्व लिहिले आहे."


१९५० साली मांडलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आज प्रत्यक्षात आलेली दिसते. आपल्या हातातल्या भ्रमणध्वनीपासून ते मंगळावर जाणाऱ्या यानांपर्यंत आणि खेळ खेळणाऱ्या संगणकांपासून ते विनाचालक वाहनांपर्यंत आज सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता आपली अनिवार्यता पटवून देत आहे. 


कृत्रिम बुद्धिमत्ता,आर्टिफिशियल इंटेलिजन्स 'एआय'चा उल्लेख आजच्या काळात सहजपणे होऊ लागला आहे.ह्या संज्ञा जनमानसात प्रचलित होत आहेत.अमेझॉनची 'अलेक्सा', ॲपलचे सिरी सारखे मदतनीस,आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तत्पर आहेत,तर आंतरजालावर आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायला आवडतील याचा अंदाज लावण्यापर्यंत,आधुनिक जगात आपल्या अवतीभोवती कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वत्र आढळत आहे..


मानवनिर्मित प्रज्ञ- यंत्रमानवाच्या अस्तित्वाचा उल्लेख ग्रीक पौराणिक कथांमध्येही आल्याचे आढळते.ग्रीक तत्त्वज्ञ ऑरिस्टॉटलने तर्कशुद्ध विचार करण्याचा युक्तिवाद (सिलॉजिजम) सर्वप्रथम केला.त्यात दोन किंवा अधिक स्वीकृत विधानांवरून,

तर्कशुद्ध निष्कर्ष पद्धतशीरपणे काढला जातो आणि त्या आधारे तिसरे किंवा नवीन तार्किक विधान मांडले जाते. मनुष्याला जन्मजात मिळणाऱ्या बुद्धिमतेच्या क्षमतेचा स्वतःला दाखला देणारा तो महत्त्वपूर्ण क्षण होता.


ॲरिस्टॉटलने प्रस्तुत केलेल्या संकल्पनेपासून सुरुवात झाली असली,तरी ज्या स्तरावरील कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्या काळात विचारात घेतली जाते आणि विकसित होत आहे.त्याचा इतिहास केवळ गेल्या शतकातला आहे.१९५०च्या दशकात शास्त्रज्ञ,

गणितज्ञ आणि तत्त्वज्ञांच्या समुदायाने कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना केली.त्यात ब्रिटिश तरुण बहुज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग होते,ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची गणितीय शक्यता शोधली.त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की,


'समस्या सोडवण्यासाठी आणि निर्णय घेताना मनुष्य उपलब्ध माहिती तसेच,कारणांचा आधार घेतात,तर यंत्रे तसे का करू शकणार नाहीत?' 


१९५० साली 'कम्प्यूटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स' ह्या शोधनिबंधात त्यांनी बुद्धिमान यंत्रे कशी तयार करत येतील आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी कशी करावी,ह्यांची तार्किक चर्चा केली.ट्युरिंगची संकल्पना तात्त्विकरीत्या योग्य असली,तरी कार्य सुरु करताना अनेक अडथळे आले.संगणकांना मूलभूतपणे बदलण्याची सर्वप्रथम आवश्यकता होती; कारण १९४९ पर्यंत वापरात असलेले संगणक, 


आज्ञावली कार्यान्वित करू शकत होते,परंतु ते साठवण्याची तरतूद त्यांच्यात नव्हती.थोडक्यात सांगितलेले कार्य संगणक करू शकत होते परंतु काय केले ते स्मृतीत ठेवण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे,संगणक अत्यंत खर्चिक होते.केवळ प्रतिष्ठित विद्यापीठे आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनाच ह्या अनोख्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे धारिष्ट करणे शक्य होते.तसेच,प्रज्ञ यंत्रनिर्मितीची संकल्पना निधी स्रोतांना पटवून देणाऱ्या समर्थकांची आवश्यकता होती.


संज्ञा बोध आणि आकलन (कॉग्निटिव्ह) विज्ञानावर संशोधन करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रवर्तक,जॉन मॅक् कार्थी आणि मार्विन मिन्स्की कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जातात.त्यांनी दिलेली व्याख्या अशी आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्रांची विशिष्ट कार्य करण्याची क्षमता आहे,ज्यासाठी मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते.(मराठी विज्ञान परिषद पत्रिका,.नोव्हेंबर २०२२,वैशाली फाटक-काटकर,


गणित व AI – भविष्याची जोडी


आजचे जग कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) आहे. पण या बुद्धिमत्तेचा पाया कुठे आहे? – गणितात!


चेहरा ओळख (Face Recognition) – भूमिती


Google Maps – त्रिकोणमिती


ऑनलाईन शॉपिंगची शिफारस – सांख्यिकी


भाषेचे चॅटबॉट्स – बीजगणित व कलन


गणिताची भीती नाहीशी करूया


बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित अवघड वाटते.कारण ते फक्त सूत्रे पाठ करून शिकवले जाते. पण खरेतर गणित म्हणजे कोडी सोडवण्याचा आनंद,समस्या सोडवण्याची कला,जग समजून घेण्याची किल्ली.


 "संशयः शत्रुरस्त्येव,गणिते नैव कश्चन ।

विचारः मित्रमस्त्येव, गणिते सर्वदा सदा ॥"


गणित शत्रू नाही, तो तर विचारांचा खरा मित्र आहे.


जाता जाता जाणून घेऊ…


तज्ञांचे विचार


रामानुजन : "एक समीकरण मला काहीच अर्थ देत नाही, जोपर्यंत त्यात देवाचा विचार दिसत नाही."


अब्दुल कलाम : "विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास गणिताशिवाय शक्य नाही."


न्यूटन : त्यांचा प्रत्येक शोध गणिती सूत्रांवर आधारलेला होता.


भीती नाही गणिताची, तो तर आहे मित्र,  

ज्ञानरूपी दीप, उजळतो नवा चित्र ।  

मैत्री गणिताशी केली, तर भीती जाई दूर,  

प्रगतीच्या मार्गावर उभा राहील दृढ पूर ॥





५/१०/२५

सिसीचा साधू फ्रेंन्सिस / Francis of Assisi

फ्रेंन्सिसने अंगावरचे कपडे काढून त्यांच्यासमोर फेकले व त्यानंतर दुसऱ्याच्या दयेवर अवलंबून न राहण्याचे ठरविले.लोक जर पदोपदी केलेल्या उपकाराची आठवण करून देणार असतील,तर त्यांचे उपकार शक्यतो न घ्यावे असे त्याने ठरविले. एक फाटका झगा अंगावर घालून तो घरातून बाहेर पडला. त्या वेळी हिवाळा होता.बाहेर सर्वत्र थंडगार धुके पसरले होते.तो त्या कडक थंडीतून गाणे म्हणत जात होता.मालमत्तेच्या बंधनातून तो कायमचा मोकळा झाला होता.सर्व चीजवस्तू सोडून बाहेर पडल्यामुळे त्याला जणू मुक्तपणा वाटत होता,अपार आनंद होत होता,जवळच्या किडुकमिडुकानेही जो संतुष्ट असतो,तोच खरोखर श्रीमंत होय;ही गोष्ट जर सत्य असेल तर फॅन्सिस बर्नार्डो जगातील सर्वांत श्रीमंत मनुष्य होता. त्याच्यापाशी काहीच नव्हते; तरीही तो अतीव सुखी होता. 

त्याने सुखी असण्याचे केवळ सोंग केले नाही. त्याला आपले हौतात्म्य दाखविण्याची असोशीही नव्हती;
किंवा आपण मोठे त्यागवीर आहोत अशी दवंडी पिटण्याचीही इच्छा नव्हती.सेंट फ्रेंन्सिस हा फकीर होता;पण तो स्वतःची टिमकी वाजविणारा नव्हता.तो ईश्वरासाठी तर फकीर झालाच होता, पण त्याहीपेक्षा अधिक मानवबंधूंसाठी झाला होता. आपले लाखो बंधू असुखी असताना आपण सुखात राहावे याची त्याला लाज वाटे.लाखो उपाशीही असता आपण गोडधोड,पक्वात्रे खात बसावे हे त्याला कसेसेच वाटे.पण म्हणून जगाला कंटाळलेल्या एखाद्या माणसाप्रमाणे तो रानावनात मात्र गेला नाही,तर दरिद्री,परित्यकक्त,निराधार, रोगी अशा लोकांत मिसळला.तो त्यांची क्षुधा शांत करी;त्यांची सेवाशुश्रूषा करी त्यांना त्यांचा स्वाभिमान देई,तो स्वतःचा फार कमी विचार करी, म्हणून तो अतिशय सुखी होता.तो दुसऱ्यांचा अधिक विचार करी;त्याला मिळणाऱ्या अन्नातला जाडाभरडा तुकडा तो स्वतःसाठी ठेवून गोडधोड दुसऱ्यांना देऊन टाकी.हिवाळा असो,उन्हाळा असो, तो त्याच फाटक्यातुटक्या झग्यात आपला देह गुंडाळी;व तो झगा कमरेभोवती एका दोरीने बांधी, पुढे हाच फ्रेंन्सिस्कन साधूंचा सांप्रदायिक गणवेश झाला.हे फ्रेंन्सिस्कन साधू म्हणजे ख्रिस्ताची सेवापरायण शांतिसेना! अशी सेना कधी कोणी उभारली होती का? ही अपूर्व सेना युरोपभर दया दाखवीत,रोग्यांची शुश्रूषा करीत,अनाथांस प्रेम व आधार देत फिरत असे.

फ्रेंन्सिसने सुरू केलेल्या या नव्या सेवापंथासाठी त्याला प्रथम फक्त दोनच अनुयायी मिळाले.त्यांनी महारोग्यांच्या एका वसाहतीजवळ एक झोपडी बांधली व जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या त्या दीनवाण्या रोग्यांच्या सेवेला त्यांनी आपणास वाहून घेतले.तीन वर्षांत या सेवासंघातल्या दोघांचे बाराजण झाले.सेंट फ्रेंन्सिसचे हे जणू लहान भाऊच होते.हे बारा जण फ्रेंन्सिसच्या पुढारीपणाखाली पोपकडे जावयास निघाले.पोपच्या अंगचा खरा ख्रिश्चनभाव त्यांच्या येण्यामुळे प्रकट झाला.तो विरघळला व त्यांना म्हणाला,"ख्रिस्ताला आवडणारे हे तुमचे सेवेचे कार्य असेच चालू ठेवा.फक्त संघटित अशा चर्चच्या व्यवस्थेआड येऊ नका म्हणजे झाले. चर्चविरुद्ध बंड नका करू." फॅन्सिस म्हणाला, "आम्हाला मुळी राजकारणात ढवळाढवळ करायचीच नाही.तुम्ही आमच्या मार्गात येऊ नका. आम्हीही तुमच्या मार्गात येणार नाही."

पोपशी असा समझोता करून फ्रेंन्सिस दरिद्री जनतेच्या दर्शनाच्या व सेवेच्या यात्रेला निघाला.तो सॅरासीन लोकांच्या पुढाऱ्याकडे गेला. या वेळी पाचवे क्रूसेड सुरू होते.तरीही फ्रेंन्सिस निर्भयपणे निःशस्त्र स्थितीत सुलतानास भेटण्यास गेला.त्याने पोपला खरा ख्रिश्चन करण्याची खटपट केली, तशीच सुलतानालाही ख्रिश्चन करण्यासाठी खटपट केली.सुलतानाने त्याचे प्रेमाने स्वागत केले.शेवटी तोम्हणाला,
"साधुमहाराज,तुम्ही आपले काम करीत राहा." फ्रेंन्सिस इटलीत परत आला;पोप व सुलतान धर्मयुद्ध लढत राहिले.सेंट फ्रेंन्सिसला फारसे शिक्षण मिळालेले नव्हते. त्यांच्या ठायी लहान मुलाची श्रद्धा होती.तशीच निर्मळ व खरीखुरी भक्तीही होती.तो मान्य करो,वा न करो,प्राचीन काळच्या सर्वांभूती परमेश्वर मानणाऱ्या तत्त्वज्ञान्यांप्रमाणेच तोही जणू सर्वत्र प्रभू पाही.त्याला सर्वत्र चैतन्य दिसे. सर्व परस्परसंबद्ध वाटे. हे सारे एकजीव आहे,जणू एकाच दोऱ्यात ओवलेले आहे,हे एकाच विराट देहाचे जणू भिन्न भिन्न भाग आहेत असे त्याला वाटे.

तो एखाद्या मुलाप्रमाणे पाखरांना आपली भावंडे मानी,वारा व सूर्य त्याला जणू भाऊ वाटत व पृथ्वी म्हणजे जणू सर्वांची प्रेमळ प्राणमय माताच वाटे.
होमरकालीन प्राचीन लेखकांत हीच भावना सर्वत्र आढळते; प्राचीन कवी सर्वत्र चैतन्य व पुरुषत्व पाहत.प्राचीन ऋषी पृथ्वीला मानवांची माता व अनंत आकाशाची पत्नी मानून प्रणाम करीत. दुसऱ्याही एका प्राचीन देशात आपणास हाच विचार आढळतो अमेरिकेतील इंडियन सूर्याला पिता मानीत,पृथ्वीला या सस्यश्यामल पृथ्वीला - माता मानीत,सूर्याचे व वसुंधरेचे संगीत ऐकत.ते इंडियन,तू होमरप्रभृती कवी,ते सेंट फ्रेंन्सिस वगैरे संत,सारे सजीव व निर्जीव सृष्टीत प्राणमय संबंध पाहत.ते केवळ काव्य म्हणून असे मानीत असे नव्हे;तर त्यांना तसा आंतरिक अनुभवच येत असे. ते सारी सृष्टी जणू मानवाच्या कुटुंबात आणीत.

हे करणे कोणाला बालिश वाटेल तर वाटो;पण त्यांत अनुपम माधुर्य तद्वतच सौंदर्य आहे यात मुळीच संशय नाही.सेंट फ्रेंन्सिस पाखरांविषयी बोलतो असे नव्हे,तर तो पाखरांबरोबरही बोलतो. ज्या सॅरासिनांना खिश्चन करण्यासाठी तो गेला होता,त्यांना भेटून परत येत असता त्याला वाटेत पक्ष्यांचा थवा भेटला.तेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे तो त्या पाखरांस म्हणाला, "तुम्ही येता माझ्या धर्मात ? तुम्ही ख्रिस्ताचे व्हा,परस्परांस प्रेम द्या.भांडू नका." ती पाखरे गोड किलबिल करीत होती नव्हे,जणू त्याचे अंत:करणपूर्वक प्रेमळ स्वागतच करीत होती। तो आनंदला वेडा झाला. आपणातही पाखराच्या संगीतापेक्षा अधिक दिव्य व मधुर संगीत आहे असे त्याला वाटे.'

माझ्यातल्या संगीताने मलाही नाही का या पाखरांचे स्वागत करता येणार? असे मनात येऊन तो प्रेमळ व गोड शब्दांत त्या पाखरांस म्हणाला,"लहान भावंडांनो,प्रेमळ बहिणींनो,आतापर्यंत मी तुमची किलबिल ऐकली,आता तुम्ही माझी गीते ऐका." आणि त्याने त्या पंखवाल्या श्रोतृवृंदास आपले प्रवचन ऐकविले.त्यांनी आपले आत्मे वाचवावेत, स्वतःचा उद्धार करून घ्यावा,असा उपदेश त्याने त्यांना केला.चिकित्सक वाचकांस जरी हे सारे हास्यास्पद वाटले,तरी सेंट फ्रेंन्सिसने आपल्या अग्निनारायण बंधूला केलेले आवाहन अत्यंत - उदात्त आहे,यात शंकाच नाही.फ्रेंन्सिसची दृष्टी कमी होत होती.
अजिबात आंधळे व्हावयास नको असेल तर,एक डोळा लाल सांडसाने जाळून घ्या असे डॉक्टरांनी सांगितले व भट्टीतून लाल सांडस बाहेर काढला.
फॅन्सिस प्रेमळपणे उठला,एखाद्या प्रेमळ सजीव मित्राला बोलावे तसे तो त्या लाल सांडसाला म्हणाला,"अग्ने, हे बंधो,ईश्वराने तुला बलवान, सुंदर,उपयोगी बनविले आहे; मजशी नीट वाग; मला फार दुखवू नको हो!"

सेंट फ्रेंन्सिसच्या स्वभावातील मुख्य गोष्ट म्हणजे अपरंपार सहानुभूती,त्याच्या मनात सर्वांविषयी प्रेम तद्वतच आदर असे.या बाबतीत तो बुद्धाप्रमाणे होता.तो जसा मोठ्यातल्या मोठ्या माणसाशी वागे, तसाच अत्यंत क्षुद्र माणसाशीही वागे.एखाद्या सम्राटाला प्रणाम करण्यापेक्षा एखाद्या भिकाऱ्याची क्षमा मागणे त्याला अधिक आवडे.वृक्षवेलींची वा फुलाफळांचीही झोप मोडू नये म्हणून तो अगदी हळू बोले.त्याची नम्रता स्वतःला उगीचच क्षुद्र मानणारी नसून स्वतःचा विसर पाडणारी होती.ती खोटी व नीच निरहंकारिता नव्हती,तर स्वतःला शून्य करणारी,
खरी,श्रेष्ठ निरहंकारिता होती.त्याला स्वतःचा विचार करण्यास वेळच नसे.दुसऱ्यांना साह्य करण्यात व सुख देण्यातच तो सदैव रंगलेला असे.त्याला या जगातील साऱ्या व्यक्ती जणू राजाप्रमाणे वाटत व तो त्या सर्वांची जणू आज्ञाधारक प्रजा असल्याप्रमाणे त्यांच्याशी वागे.

जगाचे भले करीत भरपूर हिंडल्यावर तो घरी परत आला,तेव्हा त्याचे वय चव्वेचाळीस वर्षांचेच असेल. पण तो वृद्ध झाला होता ध्येयासाठी चाललेली अविश्रांत धडपड व तदर्थ भोगावे लागलेले कष्ट यांमुळे तो खूप वृद्ध झाला होता जणू अनेक शतकांनी वृद्ध झाला होता! डोळे अधू होत होते; तरीही हा प्रेमळ देवदूत लोकांना सुख देत हिंडत होता,आशेची मधुर गाणी गात सर्वत्र जात होता. पण त्याची शक्ती संपत आली.तो अ‍ॅसिसी येथील आपल्या घरी आला."तुम्ही कुठेही दूर यात्रा करायला गेलात,तरी शेवटी घरी या.तुमचे घर म्हणजे ईश्वराची पवित्र जागा होय."

आणि ती अखेरची वेळ होती.त्यांच्याभोवती प्रेमळ मित्र होते.तो भूमातेच्या मांडीवर निजला तो निजलाच.इ.स. १२२६मध्ये तो देवाकडे गेला.

तो निराश होऊन मेला.जी. के.चेस्टरटन लिहितो, "सर्व मानवांनी सहकार्यानि वागावे असे आमरण शिकविणाऱ्या फ्रॉन्सिसला सभोवती झगडे व विरोध वाढत असता मरण यावे हे दुर्दैव होय! त्याने आत्यंतिक दारिद्र्याचा वसा घेतला होता.तो युद्धविरोधक होता.अराजकवादी होता,तो आपल्या पंथातील बंधूंना खासगी मालमत्तेपासून दूर राहण्यास सदैव सांगे.तो म्हणे,"तुम्ही मालमत्ता केली की तिच्या रक्षणार्थ तुम्हाला शस्त्रास्त्रे लागतील व मग तुम्हाला कायदेही करावे लागतील." ईश्वराच्या गायकाला हातात एक बासरी,एक वीणा पुरे,असे तो नेहमी म्हणे! पण त्याला आपल्याच नावाने मोठमोठे व संपन्न मठ स्थापन झालेले पाहावे लागले! काही फ्रॉन्सिस्कन बंधू घेतलेले दारिद्र्याचे व्रत विसरून चर्चच्या मालमत्तेचे हक्क मिळावे म्हणून भांडत असल्याचे पाहण्याची पाळी त्याच्यावर आली.तथापि, पुष्कळसे फ्रॉन्सिस्कन घेतलेल्या पंथीय व्रतांना चिकटून राहिले व सेंट फ्रान्सिसच्या शिकवणीशी प्रामाणिक राहिले.त्यांचा छळ झाला.सर्व जण जणू त्यांचा तिरस्कार तसाच द्वेष करीत.सेंट फ्रान्सिसच्या मरणानंतर थोड्याच वर्षांत शंभराहून अधिक फॅन्सिस्कन पंथीय जिवंत जाळले गेले….समाप्त...

३/१०/२५

सिसीचा साधू फ्रेंन्सिस / Francis of Assisi

नऊ रक्ताळ क्रूसेडस् झाली.त्यांत भर म्हणून सेंट फॅन्सिसचे रक्तहीन दहावे क्रूसेडही झाले. मुसलमानांनाच नव्हे तर ख्रिश्चनांनाही खऱ्या ख्रिस्ती धर्माकडे वळविण्यासाठी सेंट फ्रेंन्सिस जीवनभर धडपडला.तो प्रभूचा खरा भक्त,प्रभुसंदेश गाणारा सौम्यमूर्ती संत होता.त्याने सारे जीवन प्रेमाने धर्मप्रसार करण्यात घालविले;पण त्या प्रयत्नांत त्याला फारसे यश आले नाही.

सेंट फ्रेंन्सिसचे पूर्ण नाव फॅन्सिस्को बर्नार्डोनो.तो इटॅलियन होता.ख्रिस्ताच्या जीवनाचे अनुकरण करावे,अशी त्याला इच्छा होती.पण खरोखर तो बुद्धाच्या (कॅथॉलिक पंथी बंडखोर : सिसीचा साधू फ्रेंन्सिस, मानव जातीची कथा हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी) जीवनाप्रमाणे जगला.बुद्धाचे नावही त्याने कधी ऐकले नसेल.पण बुद्धाचेच जीवन न कळत का होईना,त्याच्या डोळ्यांसमोर होते. बुद्धाच्या जीवनातील प्रसंगांशी सेंट फ्रेंन्सिसच्या जीवनातील प्रसंगांचे आश्चर्यकारक साम्य आहे. दारिद्र्याशी समरस होण्यासाठी दोघांनीही आपापले वैभव झुगारून दिले ! दोघेही खासगी मालमत्ता म्हणजे पाप - पापांचे मूळ असे समजतात.मानवांच्या कपाळावरील दुःखांच्या रेषा पुसून टाकण्यासाठी दोघेही आमरण परिव्राजक होऊन भटकत राहिले.दोघांनीही जीवनातील सौंदर्य व करुणा ही नीट जाणली होती.

अखिल मानवजातीच्या चालू असलेल्या अफाट सहानुभूतीच्या संगीतातला आपण केवळ एक सूर आहोत,फक्त एक अंश आहोत असे त्या दोघांसही वाटे.दोघेही मरणप्रसंगी आपल्या मित्रांस म्हणाले, "आम्हांला जमिनीवर निजवा." संसारातील वस्तूंचे ओझे त्यांना नको होते.त्यांचा स्पर्श त्यांना पापमय वाटे." नको हा संग्रह,नकोत या भौतिक चिजा!" असे ते म्हणत.फॅन्सिस हा पिएट्रो बनोर्डोचा मुलगा.पिएट्रो हा कापडाचा सुखवस्तू व्यापारी होता.फ्रेंन्सिस उधळ्या,बंडखोर व भावनाप्रधान होता.तो एकदम उसळे,उफाळे.तथापि तो अत्यंत उदार होता.त्याला पैशाची किंमत कळत नसे.पैसा देण्यासाठी असतो, असेच जणू त्याला वाटे.डाव्याउजव्या हातांनी तो बेसुमार पैसे खर्ची,पण स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यांच्या सुखासाठी.पित्याच्या पेटीत पैसा उगाच पडून राहण्यापेक्षा मित्रांना आनंद देण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा,हे त्याला पसंत पडे.त्याचा बाप काटकसरी होता,आईही जपून खर्च करणारी होती. ती म्हणे,"फ्रेंन्सिस जसा काही राजाच्या मुलासारखा वागतो ! आपण एका इटॅलियन दुकानदाराचा मुलगा आहोत हे जणू त्याच्या ध्यानीही नसते!" आई फ्रेंन्सिसबाबत थोडे प्रेमाने बोले;पण बापाने त्याच्याविषयी आशाच सोडली होती. फ्रेंन्सिस कधी काळी सुधारेल याची त्याला मुळीच शक्यता वाटत नसे.

आई-बाप फ्रेंन्सिसवर नाराज असले,तरी अ‍ॅसिसीचे सारे तरुण मात्र त्याला जीव की प्राण करीत.तो पैशाची किंवा स्वतःच्या प्राणाचीही पर्वा करीत नसे. तो हडकुळा होता,त्याचे डोळे काळेभोर व तेजस्वी होते.तो नेहमी आनंदी व उल्हासी असे.तो तरुणांचा खेळातला नेता म्होरक्या असे.तरुणांच्या फॅशन्स, त्यांच्या खोड्या,त्यांचे प्रेम-प्रकार या सर्वांत तो पुढे असे.तरुण टॉलस्टॉयप्रमाणे,यौवनारूढ बुद्धाप्रमाणे त्यालाही त्याचे मित्र 'खरा सवंगडी, जानी दोस्त' असे म्हणत.फॅन्सिस तारुण्य ओलांडून पलीकडे जात होता.त्या वेळी त्याचे शहर इटलीतील दुसऱ्या एका शहराशी युद्ध करण्यात गुंतले होते.त्या काळात अशी युद्धे नेहमीच चालत.पूर्वीचे रोमन साम्राज्य जाऊन त्याची अनेक लहानलहान स्वतंत्र संस्थाने प्रदेशांवर राज्य करीत.शेजारच्या राजांशी अखंड युद्ध सुरू असत.जगाचे एकीकरण तलवारीने करणाऱ्या रोमनांनी स्वतःच्या राष्ट्राचे मात्र शत खंड केले ! त्यांच्या त्या मूर्खपणामुळे उद्भवलेल्या मोठमोठ्या युद्धांतून छोटी-छोटी युद्धे पैदा झाली.पूर्वी एकजात घाऊक कत्तली होत आता किरकोळ कत्तली होऊ लागल्या.प्रत्येक शहर दुसऱ्या कोणत्यातरी शहराविरुद्ध लढत होते. व्हेनिस फ्लॉरेन्सविरुद्ध,फ्लॉरेन्स सिसीविरुद्ध,होती.
अ‍ॅसिसी पेरुगियाविरुद्ध,पेरुगिया व्हेनिसविरुद्ध अशी अखंड युद्धमालिका इटलीभर चालू होती.सर्व युरोपभरच हा मारणमरणाचा प्रकार बोकाळला होता म्हणा ना ! पहिल्या सीझरची महत्त्वाकांक्षा हजारो छोट्या सीझरांनी उचलली;पण एकाजवळही त्याची प्रतिभा नव्हती.लहानलहान शहरांमधील कधी न संपणाऱ्या या यादवीत मध्ययुगातील संस्कृती नष्टप्राय होत होती.

पेरुगिया व सिसी यांमध्ये जेव्हा हे मूर्खपणाचे द्वंद्वयुद्ध सुरू झाले,तेव्हा हा तरुण सिसी भावनांनी पेटून आपल्या शहरातर्फे स्वयंसेवक म्हणून नाव नोंदविता झाला.त्याने आतापर्यंत अनेक साहसाच्या व शांततामय गोष्टी केल्या होत्या.त्याला आता जरा बदल हवा होता.तो युद्धातील चैतन्यमय अशी तेजस्वी साहसे करायला,त्यांची चव घ्यायला उत्सुक झाला होता.पण युद्धातील ही साहसे त्याला फार पसंत पडली नाहीत.

तो एका युद्धात पकडला गेला; व मध्यकाळातल्या तुरुंगाचाही अनुभव त्याला चाखायला मिळाला.
युद्धाइतका तेजोमय तो नसला तरी रानवट तर होताच.तुरुंगवासामुळे त्याची युद्धोत्सुकता कायमची नष्ट झाली.

तुरुंगातून घरी आल्यावर तो फार आजारी पडला. क्षणभर तर तो मरणारसेदेखील भासले;पण शेवटी तो वाचला.तथापि तो अशक्त असल्यामुळे अंथरुणात पडून राही.पडल्या पडल्या तो जीवनाकडे एका नवीन दृष्टीने पाहू लागला.या जगात वायफळ बडबडच फार;करणे थोडे,मचमच फार! हे जग निरुपयोगी वस्तूंच्या पाठीमागे उगीचच धावत असते.हे लोक क्षुद्र गोष्टींसाठी उगीचच भांडत वा लढत असतात.असले क्षुद्र जीवन अतः पर जगायचे नाही,असा त्याने निश्चय केला; व मानवाला शोभेसे वैचारिक जीवन जगण्याचे ठरविले.बरा झाल्यावर त्याने पुन्हा सैनिक होण्याचे नाकारले.त्याचे पूर्वीचे सारे मित्र एकामागून एक त्याला सोडून गेले.ते त्याला भित्तुरडा,मागे मागे राहणारा,
नेभळट म्हणून निदीत;पण त्यांची निंदा ऐकून तो शांतपणे स्मित करी.त्याला ती निंदा जणू मुकुटाप्रमाणे वाटे,दूषणे भूषणे वाटत. तो दुसऱ्यांना पीडा देण्यास तयार नव्हता व म्हणून स्वतः कष्ट सोसण्यास सिद्ध झाला.हे एक नवीनच साहस होते. कष्ट सोसण्याचा हा नवीनच आनंद नवाच अनुभव होता.आजपर्यंतच्या सर्व साहसांपेक्षा दुसऱ्यास त्रास न देता स्वतः
हालअपेष्टा भोगण्याचे साहस त्याला अधिक रोमांचकारी वाटले.

एकदा उंब्रिया गावच्या शेतातून घोड्यावर बसून जात असताना त्याला वाटेत एक महारोगी भेटला. पूर्वी या जिवंत मढ्यांना पाहून त्याला शिसारी वाटत असे,तो डोळे मिटीत असे.त्याला जी जी कुरूप वस्तू दिसे,त्या त्या वस्तूपासून तो भिऊन व विटून दूर सरे.तो जणू कवी होता.शारीरिक दुःख म्हणजे काय,कशामुळे कुरूपता येते,याचा अनुभव त्याने घेतला होता.त्यामुळे त्याला लोकांच्या कष्टांची,हालअपेष्टांची व रोगांची करुणा वाटू लागली.जेव्हा त्याच्याकडे येणारा महारोगी त्याला दिसला,तेव्हा तो एकदम प्रेमाने व करुणेने घोड्यावरून उतरला.त्याने त्या दुःखीकष्टी रोग्याला जवळचे पैसे दिले,एवढेच नव्हे,तर स्वतःलाही त्याला देऊन टाकले.त्याने त्याला आपल्या बाहुंनी कवटाळले व प्रेमाने त्याच्या सुखदुःखांची चौकशी केली.आतापर्यंत त्याने पांढरपेशा,सुखी मंडळींतील आदळआपटीचे,खाण्यापिण्याचे सुख अनुभवले होते;पण आता त्याला निराळेच शांत व दान्त असे सुख अनुभवावयास मिळू लागले.परित्यक्तांवर प्रेम करण्यात व दुःखी कष्टी लोकांच्या संगतीत राहण्यात तर अधिकच खोल,गंभीर व अत्यंत शांत असा आनंद असतो,हे त्याच्या अनुभवास आले. त्याने वरिष्ठ वर्गाचा त्याग केला व गरिबांच्या अनाथांच्या कार्यास आपणास वाहून घेतले.ज्यांना जीवनात अपयश आलेले आहे असे,जे कुठेच नीट बसू शकत नसत,ज्यांना पुढे जाता येत नसे,ज्यांना अशक्तपणामुळे कामकाज करता येत नसे,दरिद्री व दुबळे असल्यामुळे ज्यांच्याकडे कोणी कधी लक्ष देत नसे,अशांकडे तो आपली सारी सहानुभूती घेऊन जाई.कोणी तरी लिहिले आहे,"ईश्वरही ज्यांची हाक ऐकणार नाही,अशांचेही तो ऐके." इतकेच नव्हे; तर तो याहीपलीकडे जाई.जरी तो निष्ठावंत कॅथॉलिक होता,तरी देवाने दुःखी कष्टी केलेल्यांना सुखी करून देवाची चूकही दुरुस्त करण्याचे धाडस तो करी.

तो निष्ठावंत कॅथॉलिक असला,तरी चर्चचा एवढेच नव्हे;तर आपल्या पित्याचाही,आज्ञाधारक पुत्र नव्हता.तो आपल्या मनोदेवतेचा हृदयातील सूर ऐकायला उत्सुक असे.वरिष्ठांपेक्षा त्याचे हृदयच बहुधा अधिक बरोबर असे.एकदा त्याला कोणालातरी मदत करण्यासाठी पैसे हवे होते.त्याने आपला घोडा विकला,तद्वतच पित्याच्या दुकानातील कापडाचा एक गठ्ठाही विकला.बापाने त्याला चोर म्हटले व उपदेशाचे लोटे पाजले. आई-बाप किती कष्ट करतात,मुलांना किती प्रेमाने वागवतात,परंतु मुले कशी कृतघ्न निपजतात हे बापाने जळजळीत वाणीने सांगितले.तो फॅन्सिसला म्हणाला, "अरे, तुझे सारे, तुझ्या अंगावरचे हे कपडेही तुझ्या आई-बापांच्या कृपेमुळे आहेत, समजलास?" पित्याचे शब्द ऐकूण….अपुर्ण 
राहिलेला उर्वरित शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…?

१/१०/२५

विस्कळीत एकत्रित/Disruptive aggregates

झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं. 


मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, "काही त्रास नाही ना झाला ?"


सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा यत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं. 


काही क्षण असेच गेले...


आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, "झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ?"


म्लान पाकळ्यावर मंद स्मित झळकलं. फुल म्हणालं, "निमिषार्धासाठी वाईट वाटलं.. कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं. पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेंव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा. कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं. 


पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो... "


"तू आता स्वतंत्र झालास खरा पण आता तू क्षणा क्षणाला कोमेजत चाललायस .... आता काय करणार ?" - मातीचा प्रश्न.

 

दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, "आता हवा जिकडे नेईल तिकडे मी जाईन... वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असे तोवर जमेल तितके जग पाहून घेईन... मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन. 


पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन.त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईन, त्या बीजातून अंकुरलेल्या झाडावर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल,माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेन !"


फुलाचं उत्तर ऐकून सद् गदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेतले. 


काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली... 


आपलं आयुष्यही असंच आहे.


संसार कुटुंब आप्तेष्ट मित्र ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे.आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं. 


मग सुरु होतो एका जीवाचा एकाकी सफर... जो आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देतो. 


आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं.


नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्पगुच्छात पुन्हा अवतिर्ण होतो !


जीवन सुंदर तर आहेच...

पण ते अर्थपूर्णही आहे !


भूकंप म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याआधी आपल्याला ( प्लेट टेटॉनिक्स ) भुकवच आणि त्याच्या हालचालींची माहिती करून घ्यावी लागेल. यासोबतच शतकभरापूर्वी,आल्फ्रेड वेगेनेर ह्या जर्मन शास्त्रज्ञाने, खंड सरकतात अशी एक बंडखोर कल्पना मांडली. बऱ्याच जणांनी त्याला वेड्यात काढलं प्रचंड गलबतासारखे खंड हलत असतात असे त्याने सुचवले. वेगनरच्या मते आफ्रिका,दक्षिण अमेरिका,ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे सारे खंड आधी एकत्र होते.पुढे ते सरकत सरकत लांब लांब गेले. वेगेनेरची भरपूर चेष्टा झाली. पण अखेर त्यांचं म्हणणं खरं ठरलं. व जे हसले त्यांचे दात दिसले. हा नवीन सिद्धांत मला बदलाची व समजून घेण्याची जाणीव देऊन गेला.


"तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान,प्रगल्भ,परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही.बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता,तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही.असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही. काय सामर्थ्य होते पाहा. जुलमी ब्राह्मणांच्या सत्तेसमोरही हा माणूस वाकला नाही.उभा राहिला. तेवत राहिला…"


हे कोण म्हणतंय? 


साक्षात स्वामी विवेकानंद. हिंदुत्वाचा ध्वज जगभर घेऊन जाणारे विवेकानंद १९०० मध्ये तथागत गौतम बुद्धांविषयी कॅलिफोर्नियात बोलत होते. 


भारताची जगभरातली खरी ओळख आजही 'बुद्धांचा देश' हीच आहे.भलेही त्यांचे जन्मगाव असणारे लुंबिनी आता नेपाळमध्ये असेल,पण बुद्ध आपले आणि आपण सारे बुद्धांचे. 


'बुद्धांशी तुलना होईल,असा एकही माणूस नंतर जन्मलाच नाही',असे आचार्य रजनीशांनी म्हणावे! 


बुद्ध थोर होतेच,पण बुद्धांची खरी थोरवी अशी की, आपण प्रेषित असल्याचा दावा त्यांनी कधी केला नाही. येशू,पैगंबर,कृष्ण यांच्याविषयी आदर स्वाभाविक आहे. पण,बुद्ध हे या इतरांप्रमाणे प्रेषित नव्हते.स्वतःला परमेश्वर मानत नव्हते.मला सगळं जगणं समजलंय, असा त्यांचा दावा नव्हता.मीच अंतिम आहे,असे बुद्ध कधीच म्हणाले नाहीत.डॉ.आ.ह.साळुंखे म्हणतात त्याप्रमाणे,

"अन्य धर्मसंस्थापकांनी लोकांना कर्मकांडाची चाकोरी दिली.त्या चाकोरीने बांधून टाकले. तथागतांचा धम्म ही विचारांची चाकोरीबद्ध मांडणी नव्हती.चाकोरी तोडून मुक्त करणारा धर्म बुद्धांनी सांगितला."


'प्रत्येकामध्ये पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णत्व दडलेले आहेच,

असे विवेकानंद म्हणाले,तो प्रभाव बुद्धांचाच तर होता.तुम्ही सगळं जग ओळखलं,पण स्वतःला ओळखलं नाही.म्हणून तर स्वतःला शरण जा,असे तथागत म्हणाले 'बुद्धं सरणं गच्छामि' म्हणजे अन्य काही नाही. स्वतःला शरण जा,हाच त्याचा अर्थ."कोणी काही सांगेल,म्हणून विश्वास ठेऊ नका.

उद्या मीही काही सांगेल.म्हणून ते अंतिम मानू नका.पिटकात एखादी गोष्ट आली आहे,म्हणून विश्वास ठेऊ नका",असं म्हणाले बुद्ध. 


जगातला एक धर्म सांगा,एक धर्मसंस्थापक सांगा,की जो स्वतःची अशी स्वतःच चिरफाड करतो! चिकित्सेची तयारी दाखवतो! 'भक्त' वाढत चाललेले असताना, विखार ही मातृभाषा होत असताना आणि 'व्हाट्सॲप फॉरवर्ड' हेच ज्ञान झालेलं असताना बुद्धांचा हा दृष्टिकोन आणखी समकालीन महत्त्वाचा वाटू लागतो. माणूस बदलतो,यावर बुद्ध विश्वास ठेवतात.


कोणीही मानव बुद्ध होऊ शकतो,याची हमी देतात.

मात्र,स्वतःला शरण जा,हीच पूर्वअट सांगतात. 


ज्याला बुद्ध समजला,त्याला 'सो कॉल्ड सक्सेस'वरची गल्लाभरू पुस्तकं वाचण्याची काही गरज नाही.'अत्त दीप भव' म्हणणारे बुद्ध तुमच्या आत असलेला दिवा प्रकाशमान करत असतात.दिवा असतोच आत,पण काजळी एवढी चढते की,आपण आपल्यालाच अंधारकोठडीत ढकलून देतो. 


बुद्ध जगात दुःख आहे, हे मान्य करतात.पण दुःखावर मात करण्याचं बळ देतात.दुःख आहे,हे समजायला तर हवंच.मग त्याचं स्वरूप शोधायला हवं,अशा वाटेनं जात तुमच्या आयुष्यात बुद्ध आनंदाची उधळण करतात. जन्मापूर्वी काय आणि मृत्यूनंतर काय,अशा कोणत्याही हुबासक्या न मारता,बुद्ध जीवनाविषयी बोलतात. जगण्याविषयी बोलतात.त्यातला प्रत्येक पदर उलगडून दाखवतात.अगदी झोपेवर बोलतात आणि आहारावरही. मैत्रीवर बोलतात आणि संसारावरही.आधुनिक मानसशास्त्रज्ञांनाही बुद्ध थक्क करतात.मनाची गुपितं उघड करतात आणि मानवी मनाचं विश्वरूपदर्शन घडवतात. बुद्ध माझ्या आयुष्यात आले ते डॉ.प्रदीप आवटे यांच्या 'धम्मधारा' या पुस्तकामुळे.बुद्ध एवढा रसाळ,सोपा आहे;तो कोणी परका नाही.


तो तर 'मित्र' आहे,असे वाटले 'धम्मधारा' हा कवितासंग्रह वाचताना. डॉ.आवटे म्हणजे तेच जे आज 'कोरोना'विषयी अखंड बोलताहेत आणि अथक लढताहेत.त्यांच्या शब्दातून मी बुद्धाची 'करूणा'ही वाचलीय! विनोबांनी जे 'गीताई'त केलं,गदिमांनी 'गीतरामायणा'त केलं,त्यापेक्षाही महत्त्वाचं काम बुद्धांच्या संदर्भानं 'धम्मधारा'नं केलं. मलाच काय,अनेक साध्यासुध्या मराठी माणसांना बुद्ध त्यामुळं समजला. 


बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचं संस्कृत भाषांतर करावं,अशी इच्छा काही शिष्यांनी व्यक्त केली होती.त्यावर बुद्ध भडकले होते.संस्कृतला त्यांचा विरोध नव्हता.पण,जी कोणाचीच मातृभाषा नाही,त्या भाषेत माझे तत्त्वज्ञान कशाला? मूठभरांना मिरवण्यासाठी हे तत्त्वज्ञान नव्हतेच.सर्वसामान्य माणसासाठी बुद्ध मांडत होते. त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवू पाहात होते. भाषेवरून आठवलेःसंवादाची आवश्यकताही बुद्ध एके ठिकाणी सांगतात.

आणि,मतभेद असले तरीही भाषेचा स्तर घसरता कामा नये,हेही स्पष्ट करतात. 


बुद्धांनी सगळ्यात महत्त्वाचे काय केले? 


एक प्रसंग आहे.बुद्ध कोसल देशात विहार करत होते. झाडाखाली झोपले होते.तेव्हा एक ब्राह्मण तिकडे अग्निहोत्र करत होता.तो ब्राह्मण बुद्धांना प्रसाद देण्यासाठी गेला.

पण,आधी त्याने बुद्धांना जात विचारली.तेव्हा,बुद्ध म्हणाले, "जात नको विचारूस. आचरण विचार." पुढे बुद्ध त्याला म्हणाले, "हे ब्राह्मणा, यज्ञात लाकूड जाळून शुद्धी मिळत नाही.मी लाकूड जाळत नाही.आंतरिक ज्योती उजळवतो.

माझा हा अग्नी नित्य प्रज्वलित असतो!" त्यांचे हे विचार ऐकून ब्राह्मण प्रभावित होतो आणि त्यांना भोजनाचा आग्रह करू लागतो.तेव्हा,बुद्ध म्हणतातः "जेथे मी धम्माचा उपदेश करतो,तेथे भोजन करत नाही." 


बुद्ध तपस्वी खरेच,पण तसेच जिप्सीही.ते विलक्षण संघटकही होते.अमोघ वक्ते होते.अभिव्यक्तीची अनेक माध्यमे त्यांनी प्रातिभ शैलीने हाताळलेली दिसतात. तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे,हातात तलवार न घेता बुद्धांनी जगावर राज्य केले.

अशोकासारखे जगज्जेते सम्राटही बुद्धाच्या वाटेने चालू लागले.

तेही त्या काळात. (इ.स.पू ६२३ - ५४३ हा बुद्धांचा काळ मानला जातो. ८० वर्षांचे आयुष्य बुद्ध जगले.) बुद्धांनी संघ स्थापन केला.संघामुळेच धम्म जगभर पोहोचला.बुद्धांचे अपहरण करणा-यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार तर केलेच,पण पुढे 'संघ' हा शब्दही चोरला.बुद्धांना 'भगवान' म्हणतात,ते 'भगवा' यावरून आले आहे.पण, या भगव्या रंगाचेही अपहरण झाले.माणूस मोठा झाला की त्याचे अपहरण करायचे,पण त्याच्या विचारांच्या विपरित वागायचे! हा डाव कळला नाही,म्हणून बुद्धाचेही बोट आपण सोडले.बुद्धांच्या निधनानंतर चारशे वर्षांनी 'मनुस्मृती' येते, याची आणखी कारणपरंपरा कोणती सांगणार? 


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला पुन्हा ख-याखु-या बुद्धाची वाट दाखवली.प्रज्ञा,शील,करूणा आणि स्वातंत्र्य,समता,बंधुता सांगणारा- 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' सांगणारा बुद्ध बाबासाहेबांना प्रकाशमान करणे अगदीच स्वाभाविक होते.बुद्ध म्हणजे असा प्रकाश आहे,जो अनुभवता येतो.भरून घेता येतो, असे बाबासाहेब सांगतात.  


रजनीश म्हणतात त्याप्रमाणे,बुद्धाचे खरे वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो.बाकी सगळे धर्म धमकावत असताना,हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो.आणि,मुख्य म्हणजे,त्याला शोधायला कुठे हिमालयात जावे लागत नाही.अगदी बाहेरच्या चौकात बुद्ध भेटतो. 


बुद्ध बाहेर भेटत असला,तरी तो असतो तुझ्या-माझ्या मनात. 


गोंधळलेल्या अर्जुनाला साक्षात परमेश्वर विश्वरूपदर्शन देतात.परमेश्वराला शरण ये,असे सांगत स्वतःच्या दैवी प्रकाशाने थक्क करतात.मग,युद्धाचा मार्ग सांगतात.इथे मात्र गोंधळलेल्या अर्जुनांना 'तू स्वतःलाच शरण जा. तुझ्यातला प्रकाश तुला सापडेल', असे समजावत बुद्ध युद्धाची नव्हे, तर शांतीची- प्रेमाची दिशा दाखवतात. 


बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे,संपन्न शेतकरी कुटुंबातला हा सिद्धार्थ.आपल्यासारखाच गोंधळलेला सिद्धार्थ 'बुद्ध' होऊ शकतो.तर, तू का नाही? मी का नाही?


व्यवस्थेला शरण जाणारे तू नि मी स्वतःला शरण का जात नाही?गृहत्यागानंतर सिद्धार्थला समजले,ते बुद्ध सोबत असताना गृहवासात आपल्याला का समजणार नाही? आजचा दिवस आहे, हाच प्रश्न या गृहवासात स्वतःला विचारण्याचा. 'अत्त दीप भव' हाच तर 'पासवर्ड' आहे 'बुद्ध' होण्याचा! 


- संजय आवटे 


(संदर्भः १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरः बुद्ध आणि त्यांचा धम्म,२. डॉ. आ. ह. साळुंखेः सर्वोत्तम भूमिपुत्रः गोतम बुद्ध,३. डॉ. प्रदीप आवटेः धम्मधारा)


गरज ही शोधाची जननी बनण्यापेक्षा शोध हाच गरजेचा पिता ठरतो..!


जेम्स वॅटने १७६९ साली वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, कारण ब्रिटिश कोळसा खाणीत भरलेले पाणी बाहेर काढण्याची समस्या त्याला सोडवायची होती. जेम्स वॅटन खाणीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला खरा, परंतु लवकरच त्याचा वापर कापड गिरण्यांना ऊर्जा देण्यासाठी होऊ लागला. नंतर रेल्वे इंजिन आणि बोटीच्या इंजिनासाठी अधिक नफ्यावर त्याचा वापर होऊ लागला.


जेम्स वॅटने १७६९ साली वाफेच्या इंजिनाचा शोध तेव्हा चहाच्या किटलीच्या तोंडातून बाहेर येणारी वाफ पाहून त्याला प्रेरणा मिळाली होती.या तथाकथितदंतकथेमागचं सत्य हे आहे की वॅटला आपल्या वाफेच्या इंजिनाची कल्पना थॉमस न्यूकॉमेननं बनवलेल्या वाफेच्या इंजिनाच्या मॉडेलमध्ये दुरुस्ती करताना मिळाली होती. ते इंजिन न्यूकॉमेनने ५७ वर्षापूर्वी शोधलं होतं आणि वॅटचं दुरुस्ती काम अवतरेपर्यंत तशी शंभराहून अधिक इंजिनं इंग्लंडमध्ये बनलीसुद्धा होती.न्यूकॉमेननंही थॉमस सॅव्हरी या इंग्रज व्यक्तीने १६९८ साली स्वामित्वहक्क घेतलेल्या वाफेच्या इंजिनाच्या आधारे आपलं इंजिन बनवलं होतं, तर सॅव्हरीने आपलं इंजिन डेनिस पॅपिन या फ्रेंच माणसानं १६८० साली डिझाईन केलेल्या परंतु प्रत्यक्षात न बनलेल्या वाफेच्या इंजिनाच्या आधारे बनवलं होतं. त्या फ्रेंच माणसानंही डच शास्त्रज्ञ ख्रिस्टियन हायगेन्स आणि अन्य लोकांच्या मूळ कल्पनेवरून डिझाइन केलं होतं.वॅटनं न्यूकॉमेनच्या इंजिनात ( स्वतंत्र स्टिम कंडेन्सर आणि डबल ॲक्टिंग सिलिंडर बसवून ) भरीव सुधारणा केली.(गन्स,जर्म्स अँड स्टील) आपल्या डाव्या आणि उजव्या भागात कोऑर्डिनेशन नसेल तर काय होऊ शकतं याविषयी ईस्ट सक्सेसमधल्या प्रायोगिक मानसशास्त्राचे प्राध्यापक ॲलन जे.पार्किन ( Parkin ) यांनी सांगताना एका केसविषयी लिहून ठेवलयं. यामध्ये त्या पेशंटचा डावा हात ज्या वेगानं कपडे काढत असे त्याच वेगानं उजवा हात ते घालत असे आणि हे तासन् तास चालायचं. कितीही तास प्रयत्न केला तरी कपडेच घालून होत नाहीयेत अशी तक्रार घेऊन तो पेशंट डॉक्टरकडे आला होता ! या आजाराला ' एलियन हंँड सिंड्रोम ( Alien Hand Syndrome )' असं म्हणतात. आपल्या शरीराच्या डाव्या भागाशी उजव्या मेंदूचा, तर उजव्या भागाशी डाव्या मेंदूचा भाग जोडलेला असतो. त्यांच्यातच एकसूत्रता आणि एकवाक्यता नसेल तर असं होतं.अल्बर्ट आइन्स्टाइन मेडिकल कॉलेजच्या 'डॉ.फाईनबर्ग (Dr.Feinberg) यानंही अशीच एक केस त्याच्या टेलिव्हिजनच्या मुलाखतीत सांगितली होती.एका बाईला म्हणे रात्री झोपच यायची नाही.सारखं तिला,कुणी तरी आपला गळा दाबतयं असा भास व्हायचा.उजव्या हातानं,पूर्ण शक्ती लावून ती तो हात बाजूला करायचा प्रयत्न करायची,पण ते तिला शक्य व्हायचं नाही. शेवटी तो गळा दाबणारा हात दुसरा-तिसरा कोणी नसून तिचा डावा हात होता हे तिच्या लक्षात आलं;पण तरीही तिनं पुढची अनेक महिने,वर्ष अर्धवट झोपेतच काढले !



या बहुतेक ए.एच.एस.च्या पेशंट्सना पूर्वी फीट्स येत असल्यानं त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. कित्येकदा त्यांचा 'कॉर्पस कॅलॉसम' हा मेंदूचा डाव्या आणि उजव्या भागांना जोडणारा भाग काढून टाकण्यात आला होता.त्यामुळे या दोन भागांतली एकवाच्यता गेली होती.("मेंदू आणि मज्जा संस्था (शरीर)" पुस्तकातून)






२९/९/२५

अशी ही आई / Such a mother

एप्रिल चा पहिला आठवडा ! 

रस्त्यांवर लाॕकडाउन मुळे भयाण शांतता.नाही म्हणायला पोलीस जागोजागी... ! 

मी भिक्षेक-यांचा डाॕक्टर ... माझं काम रस्त्यावरच !

लाॕकडाउन च्या काळात ज्यांना घरं होती, ्मग भले ती झोपडपट्टीत का असेनात,त्यांना घरी रहायला बजावुन सांगितलं...! 

ज्यांना घरं नाहीत अशांना काॕर्पोरेशनने निर्माण केलेल्या निवारा केंद्रात पाठवुन दिलं.आता माझ्या भिक्षेकरी वर्गापैकी रस्त्यांवर कुणी नव्हतं.तरीही चुकुन कुणी सापडतंय का हे बघत मी रस्त्यांवरुन फिरत होतो. फिरता फिरता एका मंदिरापाशी आलो.
मंदिराबाहेर शुकशुकाट. मंदिराची दारं बंद...ना भिक्षेकरी...ना भक्त !

मी तिथुन निघणार तेव्हढ्यात भिक्षेकरी बसतात त्या ठिकाणी एक आजी बसलेली मला दुरुन दिसली.हि माझ्या ओळखीची नव्हती.कपडे ब-यापैकी नीटनेटके..! 

भिक्षेकरी वाटत नव्हती...! 

मग हि इथं का बसली असेल ? माझी उत्सुकता वाढली.मी जवळ गेलो... 

हा आता आपल्याला काहीतरी देणार या आशेनं तीनं आपसुक हात पुढे केला. 

मला आश्चर्य वाटलं... भिक्षेकरी तर वाटत नाही...मग हात का पुढे करावा हिने ? 

वय असेल साधारण 70-75 वर्षे.डोईवरचे सर्व केस पांढरे,डोळे खोल गेलेले,चेह-यावर सुरकुत्यांचं जाळं... हाताच्या बोटापर्यंत पसरलेलं... ! 

या जाळ्यात मध्येच लुकलुकणारे दोन डोळे,चेह-यावर अजीजी,करुण भाव ... !

'आजी इथं का बसलाय ?' मी विचारलं. 

'काही नाही,बसल्येय हो देवळाच्या दारात,आपण पोलीस आहात का? बोलणं मृदु आणि स्वच्छ !

माझी खात्री झाली,आजी भिक्षेकरी नाही. 

तरीही तीला म्हटलं,'देवळाच्या दारात बसलाय म्हणता, आणि इथं बसुन मागता.बरोबर ना ? मघाशी हात पुढं केलात,बघितलं ना मी...तीनं चमकुन माझ्याकडं पाहिलं,डोळ्यात पाणी तरारलं... पण बोलली काहीच नाही. 

'उठा आजी असं उघड्यावर बसु नका,सध्या काय चालु आहे माहित आहे ना ? जा घरी...कुणी येणार नाही काही द्यायला'.मी पुन्हा बोललो. 

ती ओशाळली, म्हणाली,'तसं नव्हे हो ! जाते मी इथुन .... कुणी येणार नाही काही द्यायला...काय करणार नशीबच फुटकं...! 

मला या वाक्याचा अर्थ कळला नाही. 

ती उठली... जायला निघाली. 

मनात नसतांनाही ती जायला उठली,पण तीला थांबायचं होतं अजुन...माझ्याकडं तीनं ज्या केविलवाण्या नजरेनं पाहिलं त्यात मला ते स्पष्ट जाणवलं. मलाच वाईट वाटलं.म्हटलं, 'आजी,मी डाॕक्टर आहे,काही औषधं लागत असतील तर सांगा,दुसरी काही मदत हवी असेल तर सांगा...! 

पण कुणाला भीक मागायला लागु नये यासाठी मी काम करतोय,शिवाय तुम्ही चांगल्या घरातल्या वाटताहात...आणि ...

ती चालता चालता थबकली, वळुन हसत म्हणाली... चांगलं घर,वाईट घर असं पण असतं का ?

'नाही तसं नव्हतं म्हणायचं मला...' मी काहीतरी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

ती हसली;काहीतरी विचार करुन म्हणाली,'केळी आहेत का तुमच्याकडे ?' 

मला काही कळेचना, ब-यापैकी परिस्थिती वाटते, भिक्षेकरी तर वाटत नाही,तरी इथं मंदिरात काही मिळेल या आशेनं ती इथं बसली होती,हटकल्यावर निघाली, आता जातांना केळी मागते...! 

मानसिक रुग्ण असावी का ? 

उलगडा होईना. 

उत्सुकता अजुन चाळवली. 

मी तीच्या मागं गेलो,'म्हणालो आजी... काय झालं... इकडे कुणाची वाट पहात होता का ? काही हवं होतं का... ?'

'मला केळी द्याल...?' पुन्हा तीनं भाबडेपणानं विचारलं.

मी डायरेक्ट मुद्द्यावर आलो, 'आजी झालंय काय ? नीट सांगाल, तर मी नक्की काहितरी मदत करेन...!' 

हो- ना करता,कळलं ते असं...

... हि आजी आपल्या यजमानांसह रहात होती. यजमान नोकरीला...ही गृहिणी ! 

मुलबाळ होत नव्हतं.खुप वर्षांनंतर तीच्या वयाच्या चाळिसाव्या वर्षी मुल झालं...! 

या वयात झालेल्या मुलाला जन्मजात व्यंग होतं... कमरेखाली त्या बाळाला संवेदनाच नव्हत्या.. हा धक्का तीनं पचवला. पुढे कळलं बाळाच्या हृदयाला छिद्र आहे... तो ही धक्का तीने पचवला... आणखी काही काळानं कळलं... मुल मतिमंद आहे... ! 

आता ती ढासळली ! 

गाडी कशीबशी सुरु होती. 

पुढे हार्ट अॕटेकने यजमान गेले... एक मोठा आधार गेला. 

मतिमंद मुलाचं करता करता दिवस सरत होते,पेन्शन पुरत नव्हती.मुलाचं दुःखं पहावत नव्हतं... तरीही मनोभावे त्याचं सर्व ती करत होती. ...अशातच अचानक मुलगाही गेला तीला सोडुन ...!

सगळीकडेच अंधार... ! 

ती एकटी ...!

आजीची बहिण टिबी ने आजारी होती,तीच्या शेवटच्या काळात ती आजीला म्हणाली... बिनबापाचं माझं पोरगं पदरात घे... मी जास्त दिवस राहणार नाही...

तो शब्दही खरा झाला.बहिण गेली...बाप नसलेल्या तीच्या एकुलत्या एक मुलाची जबाबदारी आता आजीने घेतली त्यावेळी... ! 

बहिण गेल्याचं दुःखं होतंच...पण तीच्या मुलाच्या रुपानं पुन्हा आजीला मातृत्व मिळालं... 

बहिणीमाघारी तीनं त्या मुलाचं सर्व काही केलं.त्याच्या शिक्षणासाठी दागदागिने मोडले,राहतं घर विकलं, स्वतः भाड्याच्या घरात राहुन मुलाला बाहेरगावी होस्टेलला ठेवलं.त्या वयातही चार घरची कामं करुन मुलाचं संपुर्ण शिक्षण पुर्ण झालं.शिक्षण झाल्यावर मुलानं परस्पर तिकडेच नोकरी पाहिली,घरोबाही केला.तो हिच्याकडे परत आलाच नाही.म्हणायचा, 'तु काय खरी आई आहेस का माझी... ? 

आजीनं इतके मृत्यु पाहिले होते,इतकं दुःखं पचवलं होतं... या सा-या धक्क्यांतुनही ती सावरली ... 

पण या वाक्याचा आघात सहन झाला नाही... "तु काय खरी आई आहेस का माझी... ?"

मी खरी आई नव्हते तर कोण होते रे बाळा तुझी ? 

ती प्रश्न विचारायची... पण उत्तर द्यायला कुणीच नसायचं...!

आई होण्याचं भाग्य दोन्ही वेळा लाभलंच नाही... !

दिवस सरत होते, ्मृत्यु नेत नव्हता आणि आयुष्यं जगु देत नव्हतं... ! 

बहिणीच्या मुलाला स्वतःचाच समजुन,त्याच्यासाठी होतं नव्हतं ते सर्व आजीनं घालवलं होतं... नंतर मुलानं नातं नाकारलं. आजी आता राहते कुठल्याशा चाळीतल्या एका खोलीत...

पंधरा दिवसांपुर्वी हिला खोकतांना चाळीत कुणीतरी पाहिलं,यंत्रणेला कळवलं... सरकारी कर्मचाऱ्यांनी आजीला दवाखान्यात नेलं,कोरोनाची तपासणी केली, दोन दिवस दवाखान्यात ठेवलं... हिला घरी सोडलं... !

हिला खुप आशा होती,आपल्याला कोरोनाचा आजार व्हावा,त्यातच आपला अंत व्हावा... पण इथंही निराशाच पदरी आली... टेस्ट निगेटिव्ह ! 

हिला घरी सोडलं... ! 

जगण्याने छळलं होतं... !!! 

ती परत चाळीत आली होती... ! 

'आजी,वाईट वाटलं ऐकुन...' पाणावलेल्या डोळ्यांनी मी तीला म्हणालो. 

'वाईट काय वाटायचं डाॕक्टर ? भोग असतात,ते भोगावेच लागतात.'

'पण तुम्ही सांभाळलेल्या मुलानं योग्य नाही केलं हे...'

'असु द्या हो,आपण आपलं कर्तव्य करायचं... गीतेत सांगितलं आहे... मोह नको... कर्म करत रहा... फळाची अपेक्षा नको...' 

'म्हणजे तुम्ही त्याला माफ केलंत !' 

'माफ करणारी मी कोण ? कुणाचा तरी सांभाळ कर अशी माझ्यावर कुणीतरी जबाबदारी टाकली होती,आई म्हणुन मी ते कर्तव्य केलं... आता त्याने माझा सांभाळ करावा असा हट्ट मी का धरु ? 

मुलानं माझी परतफेड करावी असं वाटणं...तिथंच आईपण संपतं... !' 

'हो ना पण,मुलाला त्याचं कर्तव्य कळु नये ?' 

'डाॕक्टर,रस्त्यांत खडे टोचतात म्हणुन रस्त्यांवर कुणी गालिचा अंथरत नाही,आपण आपल्या पायात चप्पल घालावी. त्याला त्याचं कर्तव्य कळेल न कळेल... आपण कशाला कुणाला शिकवायला जायचं ? आपलं काम करत रहायचं,फळाची अपेक्षा न धरता... !' 

गीतेच्या ग्रंथाला हातही न लावता,गीतेतला एक अध्याय मला आज्जीकडुन समजला होता. 

'चला डाॕक्टर,निघते मी... माझं पोरगं घरी एकटंच असेल... मला जायला हवं आता...!' 

'क्काय...???' मी जवळपास किंचाळलो असेन... कारण या वाक्यावर ती दचकली होती. 

'अहो आज्जी,आत्ताच तर म्हणालात ना... एक मुल लहानपणीच वारलं, बहिणीचा सांभाळलेला मुलगा सोडुन गेला... आता हे काय... ?

ती मंद हसली. म्हणाली, 'सांगेन पुन्हा कधी भेट झाली तर... आधी मला केळी घ्यायला पाहिजेत कुठुनतरी...' 

'नाही आज्जी,आत्ताच सांगा... प्लिज... माझ्या मनातनं हे जाणार नाही...' 

ती शांतपणे म्हणाली, 'अहो डाॕक्टर,कोरोनाच्या तपासणीसाठी दवाखान्यात गेले होते,तेव्हा ठरवलं होतं, चाचणी पाॕझिटीव्ह असेल तर उत्तमच नाहीतर येतांना सरळ एखाद्या गाडीखाली झोकुन द्यायचं.' 

'मग...?' आवंढा गिळत मी म्हटलं. 

'मग काय ? जगायचं कसं आणि मरायचं कुठं हा विचार करत पडले असतांना माझं लक्ष शेजारच्या खाटेवर गेलं...साधारण चाळीशीचा एक मुलगा त्या खाटेवर होता. कमरेखाली अधु ! 

मी त्याच्याकडे पाहिलं... ! 

डोळे मिचकावत मला म्हणाला... "काय होनार नाय मावशी तुला,काळजी करु नको... अगं आजुन लय आयुष्यं हाय तुला"...! हा कोण कुठला ? स्वतःच्या जगण्याची खात्री नाही आणि मला जगण्याचं बळ देतो... ? मावशी म्हणतो... ? 

हा निराधार अपंग... रस्त्यांवर राहतो... माझ्यासारखाच तपासणीसाठी आणलेला...! 

मरण्याचे विचार घेवुन वावरत असतांना वाटलं... आज माझं मुल जिवंत असतं तर याच्याच एव्हढं नक्की असतं. ज्या काळात तो गेला... त्याचकाळात त्याच्याऐवजी समजा मीच गेले असते तर त्याचीही अवस्था आज अशीच अपंग आणि निराधार झाली असती... तो ही आज रस्त्यावरच असता...! 

डाॕक्टर ,त्या अपंग मुलात,मला माझं मुल दिसलं. 

आमच्या दोघांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यावर मी त्याला माझ्याकडे घेवुन आले.

त्या दिवशी मी परत आई झाले हो... मरायचं म्हणुन ठरवुन गेलेली मी... येताना आई होवुन, लेकरु घेवुन आले.'मला काय बोलावं सुचेना. डोळ्यांतुन माझ्या झरझर पाणी वाहु लागलं. 

'आज्जी,आधीच तुमची कमाई काही नाही, पेन्शन पुरत नाही... त्यात अजुन एका व्यक्तीला घेवुन आलात सांभाळायला...?' मी आश्चर्याने विचारलं. 

'डाॕक्टर,आईला आपलं मुल सांभाळायला पैसे लागत नाहीत.आईला व्यवहार कधीच कळत नाही... !

शिवाय पैसा जगायला लागतो...जगवायला नाही...!' 

'म्हणजे ... ?' मी आ वासुन विचारलं. 

'म्हणजे,जो स्वतःचा विचार करत स्वतःपुरता जगतो त्याला पैसे लागतात...पण आपण जेव्हा "स्व" सोडुन दुस-याला जगवायचा विचार करायला लागतो... त्यावेळी त्या दोघांची काळजी कुणी तिसराच करत असतो...्आपण फक्त त्या तिस-यावर विश्वास ठेवायचा !' 

मी हे तत्वज्ञान ऐकत मुकपणे उभा होतो. 

'मोठी झालेली मुलं,आपल्या आईला त्यांच्या घरात राहण्याचं भाडं मागतीलही कदाचित् ... पण नऊ महिने गर्भाशयात राहण्याचं भाडं आईनं कधी मागितल्याचं माहित आहे का ?' 

आईला व्यवहार कधीच कळत नाही डाॕक्टर !

मी शहारलो हे ऐकुन... ! 

'आज्जी, धीचे दोन वाईट अनुभव बघता, हा पण गेला सोडुन तर ? पुढं तुमचं काय ?' मी चाचरत बोललो. 

'डाॕक्टर हा सोडुन गेला तरी,तो माझं आईपण घेवुन जावु शकणार नाही ना ?

एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देतो... त्यावेळी नुसतं बाळच जन्माला आलेलं नसतं... एक आई पण जन्म घेते त्याचवेळी... !

दोन जीव जन्मतात त्यावेळी... एक मुल आणि एक आई ! 

जन्माला आलेल्या त्या बाळाने आईला, 
आईपण हे त्याच्या जन्मावेळीच बहाल केलेलं असतं... हे लाभलेलं आईपण कोण कसं काढुन घेईल ?

मी काय बोलणार यावर... ? 

मी स्तब्ध झालो...!

स्वतःच्या जगण्याची भ्रांत असतांना,कटु अनुभव गाठीशी असतांना,पुन्हा ती कुणाचीतरी आई होण्याचा प्रयत्न करते...! हे वेडेपण आहे कि आई व्हायला आसुसलेल्या मातेची गाथा... ?

'चला निघु मी डाॕक्टर ? 
केळी घ्यायचीत मला...' आजीच्या वाक्यानं मी भानावर आलो. 

'आता केळी कशाला...? नाही म्हणजे कुणाला... ?' 
मी अजुनही धक्क्यांतुन सावरलो नव्हतो. 

'अहो, तो काल मला म्हणाला,केळ्याचं शिकरण खाऊशी वाटतंय.मग मी सकाळी पैसे घेवुन निघाले केळी आणायला... पण लाॕकडाउन मुळे सगळंच बंद, केळी कुठंच मिळेनात.आता घरी जावुन त्याला कुठल्या तोंडानं सांगु,केळी मिळाली नाहीत म्हणुन...! 

मग आठवलं... मंदिरात येतांना लोकं केळी सफरचंद वैगेरे फळं घेवुन येतात देवाला वाहण्यासाठी... जातांना यातलंच एखादं फळ भिका-यांना देवुन जातात... ! 

म्हटलं बघु,पैशानं नाही तर भीक मागुन तरी मिळेल एखादं केळ...! शिकरण करुन देईन हो,पोराचं मन तरी मोडणार नाही...!' 

भरलेल्या डोळ्यांनी मला आता मंदिर दिसेना,देव दिसेना... दिसत होती फक्त एक आई... ! 

रस्त्यावरल्या अपंग पोरामध्ये आपलं पोर पाहणारी ही बाई...!निराधाराला पदराखाली घेणारी ही बाई...!

हातात पैसे असुनही कुणाच्यातरी आनंदासाठी भीक मागायलाही तयार झालेली ही बाई...!

याच बाईत मला दिसली आई !!!

भरल्या डोळ्यांनी मी तीचे पाय धरायला वाकलो,तीने पाया पडु दिलं नाही... ! 

'आज्जी, म तुमची एखाद्या वृद्धाश्रमात सोय करु...? दाटल्या गळ्यानं मी विचारलं. 

यावर डोळे बारीक करत तीनं विचारलं होतं,'पण वृद्धाश्रमात दोघांची एकत्र सोय होईल आमची... ?' 

'नाही आज्जी,वृद्धाश्रमात तुमची सोय होईल,मुलाचं मग बघु काहीतरी... !' 

माझं बोलणं उडवुन लावत, माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाली... ,'काय डाॕक्टर,मग काय फायदा...? माझ्यावाचुन तो कसा राहील ? बरं निघते मी... अजुन केळ्याची सोय करायचीय मला...' 

असं म्हणत, ती निघाली केळी शोधायला...! 

मी इकडं तिकडं आसपास पाहिलं... सर्व बंद. 

आज कुणाच्या हातात मला केळी दिसली असती तर मीच जावुन मागुन आणली असती...

मला दोघांचं भविष्य दिसत होतं... आजी कुठवर त्या मुलाचं करेल किंवा तो अपंग मुलगा तरी आजीला किती आणि कशी साथ देणार...या विचारानं आज्जीला शेवटचं विचारलं, 'आज्जी वृद्धाश्रमाचं काय करु...?'

यावर ती हसत म्हणाली होती, 'अहो या वयात मोठ्या मुश्किलीने पुन्हा आई झाल्येय मी ... आता कशाला मायलेकरांची ताटातुट करता... ? 

या आधी दोन ल्येकरं गमावलीत मी.... आता तिसऱ्याला तरी माझ्याबरोबर राहु दे...त्याच्या अंतापर्यंत किंवा माझ्या अंतापर्यंत ...!

ती झराझरा चालत माझ्यासमोरुन निघुन गेली...!

नव्यानंच पुन्हा आई झालेल्या,म्हातारपणानं वाकलेल्या त्या माऊलीच्या पायात इतकं बळ आलं कुठुन ... ? 

आईला वय कुठं असतं...?
ती कधीच म्हातारी होत नाही, हेच खरं ! 

गरीब असण्याचा श्रीमंत असण्याचा,तरुण असण्याचा, वृद्ध असण्याचा,पैसे असण्याचा,पैसे नसण्याचा कशाचाही संबंध नसतो आई होण्याशी... ! 

ती फक्त आई असते !

पोराची एक इच्छा भागवण्यासाठी ती भीकही मागु शकते... ! 

पोरासाठी मागितलेली एक भीक एका पारड्यात आणि सढळ हातानं केलेली हजारो दानं दुस-या पारड्यात ! 

दोन्हीचं वजन सारखंच...!!! 

यानंतर मी त्या जागेवर,केळी घेवुन ब-याचदा गेलो... पण ती दिसत नाही !

हातात केळी घेवुन माझी नजर तीला शोधत असते...

का कोण जाणे...तीला शोधतांना मंदिराचा कळस झुकलाय असा मला भास होतो...! 

का कोण जाणे...तीला शोधतांना दारातली ती तुळस मोहरली आहे असा मला भास होतो...!

का कोण जाणे...तीला शोधतांना तीने उच्चारलेला शब्द न् शब्द आज अभंग झाला आहे असा मला भास होतो...!का कोण जाणे...तीला शोधतांना मी पुन्हा बाळ झालो आहे असा मला भास होतो...!

का कोण जाणे...!!!

डाॕ.अभिजीत सोनवणे,डाॕक्टर फाॕर बेगर्स…