* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सिसीचा साधू फ्रेंन्सिस / Francis of Assisi

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

५/१०/२५

सिसीचा साधू फ्रेंन्सिस / Francis of Assisi

फ्रेंन्सिसने अंगावरचे कपडे काढून त्यांच्यासमोर फेकले व त्यानंतर दुसऱ्याच्या दयेवर अवलंबून न राहण्याचे ठरविले.लोक जर पदोपदी केलेल्या उपकाराची आठवण करून देणार असतील,तर त्यांचे उपकार शक्यतो न घ्यावे असे त्याने ठरविले. एक फाटका झगा अंगावर घालून तो घरातून बाहेर पडला. त्या वेळी हिवाळा होता.बाहेर सर्वत्र थंडगार धुके पसरले होते.तो त्या कडक थंडीतून गाणे म्हणत जात होता.मालमत्तेच्या बंधनातून तो कायमचा मोकळा झाला होता.सर्व चीजवस्तू सोडून बाहेर पडल्यामुळे त्याला जणू मुक्तपणा वाटत होता,अपार आनंद होत होता,जवळच्या किडुकमिडुकानेही जो संतुष्ट असतो,तोच खरोखर श्रीमंत होय;ही गोष्ट जर सत्य असेल तर फॅन्सिस बर्नार्डो जगातील सर्वांत श्रीमंत मनुष्य होता. त्याच्यापाशी काहीच नव्हते; तरीही तो अतीव सुखी होता. 

त्याने सुखी असण्याचे केवळ सोंग केले नाही. त्याला आपले हौतात्म्य दाखविण्याची असोशीही नव्हती;
किंवा आपण मोठे त्यागवीर आहोत अशी दवंडी पिटण्याचीही इच्छा नव्हती.सेंट फ्रेंन्सिस हा फकीर होता;पण तो स्वतःची टिमकी वाजविणारा नव्हता.तो ईश्वरासाठी तर फकीर झालाच होता, पण त्याहीपेक्षा अधिक मानवबंधूंसाठी झाला होता. आपले लाखो बंधू असुखी असताना आपण सुखात राहावे याची त्याला लाज वाटे.लाखो उपाशीही असता आपण गोडधोड,पक्वात्रे खात बसावे हे त्याला कसेसेच वाटे.पण म्हणून जगाला कंटाळलेल्या एखाद्या माणसाप्रमाणे तो रानावनात मात्र गेला नाही,तर दरिद्री,परित्यकक्त,निराधार, रोगी अशा लोकांत मिसळला.तो त्यांची क्षुधा शांत करी;त्यांची सेवाशुश्रूषा करी त्यांना त्यांचा स्वाभिमान देई,तो स्वतःचा फार कमी विचार करी, म्हणून तो अतिशय सुखी होता.तो दुसऱ्यांचा अधिक विचार करी;त्याला मिळणाऱ्या अन्नातला जाडाभरडा तुकडा तो स्वतःसाठी ठेवून गोडधोड दुसऱ्यांना देऊन टाकी.हिवाळा असो,उन्हाळा असो, तो त्याच फाटक्यातुटक्या झग्यात आपला देह गुंडाळी;व तो झगा कमरेभोवती एका दोरीने बांधी, पुढे हाच फ्रेंन्सिस्कन साधूंचा सांप्रदायिक गणवेश झाला.हे फ्रेंन्सिस्कन साधू म्हणजे ख्रिस्ताची सेवापरायण शांतिसेना! अशी सेना कधी कोणी उभारली होती का? ही अपूर्व सेना युरोपभर दया दाखवीत,रोग्यांची शुश्रूषा करीत,अनाथांस प्रेम व आधार देत फिरत असे.

फ्रेंन्सिसने सुरू केलेल्या या नव्या सेवापंथासाठी त्याला प्रथम फक्त दोनच अनुयायी मिळाले.त्यांनी महारोग्यांच्या एका वसाहतीजवळ एक झोपडी बांधली व जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या त्या दीनवाण्या रोग्यांच्या सेवेला त्यांनी आपणास वाहून घेतले.तीन वर्षांत या सेवासंघातल्या दोघांचे बाराजण झाले.सेंट फ्रेंन्सिसचे हे जणू लहान भाऊच होते.हे बारा जण फ्रेंन्सिसच्या पुढारीपणाखाली पोपकडे जावयास निघाले.पोपच्या अंगचा खरा ख्रिश्चनभाव त्यांच्या येण्यामुळे प्रकट झाला.तो विरघळला व त्यांना म्हणाला,"ख्रिस्ताला आवडणारे हे तुमचे सेवेचे कार्य असेच चालू ठेवा.फक्त संघटित अशा चर्चच्या व्यवस्थेआड येऊ नका म्हणजे झाले. चर्चविरुद्ध बंड नका करू." फॅन्सिस म्हणाला, "आम्हाला मुळी राजकारणात ढवळाढवळ करायचीच नाही.तुम्ही आमच्या मार्गात येऊ नका. आम्हीही तुमच्या मार्गात येणार नाही."

पोपशी असा समझोता करून फ्रेंन्सिस दरिद्री जनतेच्या दर्शनाच्या व सेवेच्या यात्रेला निघाला.तो सॅरासीन लोकांच्या पुढाऱ्याकडे गेला. या वेळी पाचवे क्रूसेड सुरू होते.तरीही फ्रेंन्सिस निर्भयपणे निःशस्त्र स्थितीत सुलतानास भेटण्यास गेला.त्याने पोपला खरा ख्रिश्चन करण्याची खटपट केली, तशीच सुलतानालाही ख्रिश्चन करण्यासाठी खटपट केली.सुलतानाने त्याचे प्रेमाने स्वागत केले.शेवटी तोम्हणाला,
"साधुमहाराज,तुम्ही आपले काम करीत राहा." फ्रेंन्सिस इटलीत परत आला;पोप व सुलतान धर्मयुद्ध लढत राहिले.सेंट फ्रेंन्सिसला फारसे शिक्षण मिळालेले नव्हते. त्यांच्या ठायी लहान मुलाची श्रद्धा होती.तशीच निर्मळ व खरीखुरी भक्तीही होती.तो मान्य करो,वा न करो,प्राचीन काळच्या सर्वांभूती परमेश्वर मानणाऱ्या तत्त्वज्ञान्यांप्रमाणेच तोही जणू सर्वत्र प्रभू पाही.त्याला सर्वत्र चैतन्य दिसे. सर्व परस्परसंबद्ध वाटे. हे सारे एकजीव आहे,जणू एकाच दोऱ्यात ओवलेले आहे,हे एकाच विराट देहाचे जणू भिन्न भिन्न भाग आहेत असे त्याला वाटे.

तो एखाद्या मुलाप्रमाणे पाखरांना आपली भावंडे मानी,वारा व सूर्य त्याला जणू भाऊ वाटत व पृथ्वी म्हणजे जणू सर्वांची प्रेमळ प्राणमय माताच वाटे.
होमरकालीन प्राचीन लेखकांत हीच भावना सर्वत्र आढळते; प्राचीन कवी सर्वत्र चैतन्य व पुरुषत्व पाहत.प्राचीन ऋषी पृथ्वीला मानवांची माता व अनंत आकाशाची पत्नी मानून प्रणाम करीत. दुसऱ्याही एका प्राचीन देशात आपणास हाच विचार आढळतो अमेरिकेतील इंडियन सूर्याला पिता मानीत,पृथ्वीला या सस्यश्यामल पृथ्वीला - माता मानीत,सूर्याचे व वसुंधरेचे संगीत ऐकत.ते इंडियन,तू होमरप्रभृती कवी,ते सेंट फ्रेंन्सिस वगैरे संत,सारे सजीव व निर्जीव सृष्टीत प्राणमय संबंध पाहत.ते केवळ काव्य म्हणून असे मानीत असे नव्हे;तर त्यांना तसा आंतरिक अनुभवच येत असे. ते सारी सृष्टी जणू मानवाच्या कुटुंबात आणीत.

हे करणे कोणाला बालिश वाटेल तर वाटो;पण त्यांत अनुपम माधुर्य तद्वतच सौंदर्य आहे यात मुळीच संशय नाही.सेंट फ्रेंन्सिस पाखरांविषयी बोलतो असे नव्हे,तर तो पाखरांबरोबरही बोलतो. ज्या सॅरासिनांना खिश्चन करण्यासाठी तो गेला होता,त्यांना भेटून परत येत असता त्याला वाटेत पक्ष्यांचा थवा भेटला.तेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे तो त्या पाखरांस म्हणाला, "तुम्ही येता माझ्या धर्मात ? तुम्ही ख्रिस्ताचे व्हा,परस्परांस प्रेम द्या.भांडू नका." ती पाखरे गोड किलबिल करीत होती नव्हे,जणू त्याचे अंत:करणपूर्वक प्रेमळ स्वागतच करीत होती। तो आनंदला वेडा झाला. आपणातही पाखराच्या संगीतापेक्षा अधिक दिव्य व मधुर संगीत आहे असे त्याला वाटे.'

माझ्यातल्या संगीताने मलाही नाही का या पाखरांचे स्वागत करता येणार? असे मनात येऊन तो प्रेमळ व गोड शब्दांत त्या पाखरांस म्हणाला,"लहान भावंडांनो,प्रेमळ बहिणींनो,आतापर्यंत मी तुमची किलबिल ऐकली,आता तुम्ही माझी गीते ऐका." आणि त्याने त्या पंखवाल्या श्रोतृवृंदास आपले प्रवचन ऐकविले.त्यांनी आपले आत्मे वाचवावेत, स्वतःचा उद्धार करून घ्यावा,असा उपदेश त्याने त्यांना केला.चिकित्सक वाचकांस जरी हे सारे हास्यास्पद वाटले,तरी सेंट फ्रेंन्सिसने आपल्या अग्निनारायण बंधूला केलेले आवाहन अत्यंत - उदात्त आहे,यात शंकाच नाही.फ्रेंन्सिसची दृष्टी कमी होत होती.
अजिबात आंधळे व्हावयास नको असेल तर,एक डोळा लाल सांडसाने जाळून घ्या असे डॉक्टरांनी सांगितले व भट्टीतून लाल सांडस बाहेर काढला.
फॅन्सिस प्रेमळपणे उठला,एखाद्या प्रेमळ सजीव मित्राला बोलावे तसे तो त्या लाल सांडसाला म्हणाला,"अग्ने, हे बंधो,ईश्वराने तुला बलवान, सुंदर,उपयोगी बनविले आहे; मजशी नीट वाग; मला फार दुखवू नको हो!"

सेंट फ्रेंन्सिसच्या स्वभावातील मुख्य गोष्ट म्हणजे अपरंपार सहानुभूती,त्याच्या मनात सर्वांविषयी प्रेम तद्वतच आदर असे.या बाबतीत तो बुद्धाप्रमाणे होता.तो जसा मोठ्यातल्या मोठ्या माणसाशी वागे, तसाच अत्यंत क्षुद्र माणसाशीही वागे.एखाद्या सम्राटाला प्रणाम करण्यापेक्षा एखाद्या भिकाऱ्याची क्षमा मागणे त्याला अधिक आवडे.वृक्षवेलींची वा फुलाफळांचीही झोप मोडू नये म्हणून तो अगदी हळू बोले.त्याची नम्रता स्वतःला उगीचच क्षुद्र मानणारी नसून स्वतःचा विसर पाडणारी होती.ती खोटी व नीच निरहंकारिता नव्हती,तर स्वतःला शून्य करणारी,
खरी,श्रेष्ठ निरहंकारिता होती.त्याला स्वतःचा विचार करण्यास वेळच नसे.दुसऱ्यांना साह्य करण्यात व सुख देण्यातच तो सदैव रंगलेला असे.त्याला या जगातील साऱ्या व्यक्ती जणू राजाप्रमाणे वाटत व तो त्या सर्वांची जणू आज्ञाधारक प्रजा असल्याप्रमाणे त्यांच्याशी वागे.

जगाचे भले करीत भरपूर हिंडल्यावर तो घरी परत आला,तेव्हा त्याचे वय चव्वेचाळीस वर्षांचेच असेल. पण तो वृद्ध झाला होता ध्येयासाठी चाललेली अविश्रांत धडपड व तदर्थ भोगावे लागलेले कष्ट यांमुळे तो खूप वृद्ध झाला होता जणू अनेक शतकांनी वृद्ध झाला होता! डोळे अधू होत होते; तरीही हा प्रेमळ देवदूत लोकांना सुख देत हिंडत होता,आशेची मधुर गाणी गात सर्वत्र जात होता. पण त्याची शक्ती संपत आली.तो अ‍ॅसिसी येथील आपल्या घरी आला."तुम्ही कुठेही दूर यात्रा करायला गेलात,तरी शेवटी घरी या.तुमचे घर म्हणजे ईश्वराची पवित्र जागा होय."

आणि ती अखेरची वेळ होती.त्यांच्याभोवती प्रेमळ मित्र होते.तो भूमातेच्या मांडीवर निजला तो निजलाच.इ.स. १२२६मध्ये तो देवाकडे गेला.

तो निराश होऊन मेला.जी. के.चेस्टरटन लिहितो, "सर्व मानवांनी सहकार्यानि वागावे असे आमरण शिकविणाऱ्या फ्रॉन्सिसला सभोवती झगडे व विरोध वाढत असता मरण यावे हे दुर्दैव होय! त्याने आत्यंतिक दारिद्र्याचा वसा घेतला होता.तो युद्धविरोधक होता.अराजकवादी होता,तो आपल्या पंथातील बंधूंना खासगी मालमत्तेपासून दूर राहण्यास सदैव सांगे.तो म्हणे,"तुम्ही मालमत्ता केली की तिच्या रक्षणार्थ तुम्हाला शस्त्रास्त्रे लागतील व मग तुम्हाला कायदेही करावे लागतील." ईश्वराच्या गायकाला हातात एक बासरी,एक वीणा पुरे,असे तो नेहमी म्हणे! पण त्याला आपल्याच नावाने मोठमोठे व संपन्न मठ स्थापन झालेले पाहावे लागले! काही फ्रॉन्सिस्कन बंधू घेतलेले दारिद्र्याचे व्रत विसरून चर्चच्या मालमत्तेचे हक्क मिळावे म्हणून भांडत असल्याचे पाहण्याची पाळी त्याच्यावर आली.तथापि, पुष्कळसे फ्रॉन्सिस्कन घेतलेल्या पंथीय व्रतांना चिकटून राहिले व सेंट फ्रान्सिसच्या शिकवणीशी प्रामाणिक राहिले.त्यांचा छळ झाला.सर्व जण जणू त्यांचा तिरस्कार तसाच द्वेष करीत.सेंट फ्रान्सिसच्या मरणानंतर थोड्याच वर्षांत शंभराहून अधिक फॅन्सिस्कन पंथीय जिवंत जाळले गेले….समाप्त...