एप्रिल चा पहिला आठवडा ! 
रस्त्यांवर लाॕकडाउन मुळे भयाण शांतता.नाही म्हणायला पोलीस जागोजागी... ! 
मी भिक्षेक-यांचा डाॕक्टर ... माझं काम रस्त्यावरच !
लाॕकडाउन च्या काळात ज्यांना घरं होती, ्मग भले ती झोपडपट्टीत का असेनात,त्यांना घरी रहायला बजावुन सांगितलं...! 
ज्यांना घरं नाहीत अशांना काॕर्पोरेशनने निर्माण केलेल्या निवारा केंद्रात पाठवुन दिलं.आता माझ्या भिक्षेकरी वर्गापैकी रस्त्यांवर कुणी नव्हतं.तरीही चुकुन कुणी सापडतंय का हे बघत मी रस्त्यांवरुन फिरत होतो. फिरता फिरता एका मंदिरापाशी आलो.
मंदिराबाहेर शुकशुकाट. मंदिराची दारं बंद...ना भिक्षेकरी...ना भक्त !
मी तिथुन निघणार तेव्हढ्यात भिक्षेकरी बसतात त्या ठिकाणी एक आजी बसलेली मला दुरुन दिसली.हि माझ्या ओळखीची नव्हती.कपडे ब-यापैकी नीटनेटके..! 
भिक्षेकरी वाटत नव्हती...! 
मग हि इथं का बसली असेल ? माझी उत्सुकता वाढली.मी जवळ गेलो... 
हा आता आपल्याला काहीतरी देणार या आशेनं तीनं आपसुक हात पुढे केला. 
मला आश्चर्य वाटलं... भिक्षेकरी तर वाटत नाही...मग हात का पुढे करावा हिने ? 
वय असेल साधारण 70-75 वर्षे.डोईवरचे सर्व केस पांढरे,डोळे खोल गेलेले,चेह-यावर सुरकुत्यांचं जाळं... हाताच्या बोटापर्यंत पसरलेलं... ! 
या जाळ्यात मध्येच लुकलुकणारे दोन डोळे,चेह-यावर अजीजी,करुण भाव ... !
'आजी इथं का बसलाय ?' मी विचारलं. 
'काही नाही,बसल्येय हो देवळाच्या दारात,आपण पोलीस आहात का? बोलणं मृदु आणि स्वच्छ !
माझी खात्री झाली,आजी भिक्षेकरी नाही. 
तरीही तीला म्हटलं,'देवळाच्या दारात बसलाय म्हणता, आणि इथं बसुन मागता.बरोबर ना ? मघाशी हात पुढं केलात,बघितलं ना मी...तीनं चमकुन माझ्याकडं पाहिलं,डोळ्यात पाणी तरारलं... पण बोलली काहीच नाही. 
'उठा आजी असं उघड्यावर बसु नका,सध्या काय चालु आहे माहित आहे ना ? जा घरी...कुणी येणार नाही काही द्यायला'.मी पुन्हा बोललो. 
ती ओशाळली, म्हणाली,'तसं नव्हे हो ! जाते मी इथुन .... कुणी येणार नाही काही द्यायला...काय करणार नशीबच फुटकं...! 
मला या वाक्याचा अर्थ कळला नाही. 
ती उठली... जायला निघाली. 
मनात नसतांनाही ती जायला उठली,पण तीला थांबायचं होतं अजुन...माझ्याकडं तीनं ज्या केविलवाण्या नजरेनं पाहिलं त्यात मला ते स्पष्ट जाणवलं. मलाच वाईट वाटलं.म्हटलं, 'आजी,मी डाॕक्टर आहे,काही औषधं लागत असतील तर सांगा,दुसरी काही मदत हवी असेल तर सांगा...! 
पण कुणाला भीक मागायला लागु नये यासाठी मी काम करतोय,शिवाय तुम्ही चांगल्या घरातल्या वाटताहात...आणि ...
ती चालता चालता थबकली, वळुन हसत म्हणाली... चांगलं घर,वाईट घर असं पण असतं का ?
'नाही तसं नव्हतं म्हणायचं मला...' मी काहीतरी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 
ती हसली;काहीतरी विचार करुन म्हणाली,'केळी आहेत का तुमच्याकडे ?' 
मला काही कळेचना, ब-यापैकी परिस्थिती वाटते, भिक्षेकरी तर वाटत नाही,तरी इथं मंदिरात काही मिळेल या आशेनं ती इथं बसली होती,हटकल्यावर निघाली, आता जातांना केळी मागते...! 
मानसिक रुग्ण असावी का ? 
उलगडा होईना. 
उत्सुकता अजुन चाळवली. 
मी तीच्या मागं गेलो,'म्हणालो आजी... काय झालं... इकडे कुणाची वाट पहात होता का ? काही हवं होतं का... ?'
'मला केळी द्याल...?' पुन्हा तीनं भाबडेपणानं विचारलं.
मी डायरेक्ट मुद्द्यावर आलो, 'आजी झालंय काय ? नीट सांगाल, तर मी नक्की काहितरी मदत करेन...!' 
हो- ना करता,कळलं ते असं...
... हि आजी आपल्या यजमानांसह रहात होती. यजमान नोकरीला...ही गृहिणी ! 
मुलबाळ होत नव्हतं.खुप वर्षांनंतर तीच्या वयाच्या चाळिसाव्या वर्षी मुल झालं...! 
या वयात झालेल्या मुलाला जन्मजात व्यंग होतं... कमरेखाली त्या बाळाला संवेदनाच नव्हत्या.. हा धक्का तीनं पचवला. पुढे कळलं बाळाच्या हृदयाला छिद्र आहे... तो ही धक्का तीने पचवला... आणखी काही काळानं कळलं... मुल मतिमंद आहे... ! 
आता ती ढासळली ! 
गाडी कशीबशी सुरु होती. 
पुढे हार्ट अॕटेकने यजमान गेले... एक मोठा आधार गेला. 
मतिमंद मुलाचं करता करता दिवस सरत होते,पेन्शन पुरत नव्हती.मुलाचं दुःखं पहावत नव्हतं... तरीही मनोभावे त्याचं सर्व ती करत होती. ...अशातच अचानक मुलगाही गेला तीला सोडुन ...!
सगळीकडेच अंधार... ! 
ती एकटी ...!
आजीची बहिण टिबी ने आजारी होती,तीच्या शेवटच्या काळात ती आजीला म्हणाली... बिनबापाचं माझं पोरगं पदरात घे... मी जास्त दिवस राहणार नाही...
तो शब्दही खरा झाला.बहिण गेली...बाप नसलेल्या तीच्या एकुलत्या एक मुलाची जबाबदारी आता आजीने घेतली त्यावेळी... ! 
बहिण गेल्याचं दुःखं होतंच...पण तीच्या मुलाच्या रुपानं पुन्हा आजीला मातृत्व मिळालं... 
बहिणीमाघारी तीनं त्या मुलाचं सर्व काही केलं.त्याच्या शिक्षणासाठी दागदागिने मोडले,राहतं घर विकलं, स्वतः भाड्याच्या घरात राहुन मुलाला बाहेरगावी होस्टेलला ठेवलं.त्या वयातही चार घरची कामं करुन मुलाचं संपुर्ण शिक्षण पुर्ण झालं.शिक्षण झाल्यावर मुलानं परस्पर तिकडेच नोकरी पाहिली,घरोबाही केला.तो हिच्याकडे परत आलाच नाही.म्हणायचा, 'तु काय खरी आई आहेस का माझी... ? 
आजीनं इतके मृत्यु पाहिले होते,इतकं दुःखं पचवलं होतं... या सा-या धक्क्यांतुनही ती सावरली ... 
पण या वाक्याचा आघात सहन झाला नाही... "तु काय खरी आई आहेस का माझी... ?"
मी खरी आई नव्हते तर कोण होते रे बाळा तुझी ? 
ती प्रश्न विचारायची... पण उत्तर द्यायला कुणीच नसायचं...!
आई होण्याचं भाग्य दोन्ही वेळा लाभलंच नाही... !
दिवस सरत होते, ्मृत्यु नेत नव्हता आणि आयुष्यं जगु देत नव्हतं... ! 
बहिणीच्या मुलाला स्वतःचाच समजुन,त्याच्यासाठी होतं नव्हतं ते सर्व आजीनं घालवलं होतं... नंतर मुलानं नातं नाकारलं. आजी आता राहते कुठल्याशा चाळीतल्या एका खोलीत...
पंधरा दिवसांपुर्वी हिला खोकतांना चाळीत कुणीतरी पाहिलं,यंत्रणेला कळवलं... सरकारी कर्मचाऱ्यांनी आजीला दवाखान्यात नेलं,कोरोनाची तपासणी केली, दोन दिवस दवाखान्यात ठेवलं... हिला घरी सोडलं... !
हिला खुप आशा होती,आपल्याला कोरोनाचा आजार व्हावा,त्यातच आपला अंत व्हावा... पण इथंही निराशाच पदरी आली... टेस्ट निगेटिव्ह ! 
हिला घरी सोडलं... ! 
जगण्याने छळलं होतं... !!! 
ती परत चाळीत आली होती... ! 
'आजी,वाईट वाटलं ऐकुन...' पाणावलेल्या डोळ्यांनी मी तीला म्हणालो. 
'वाईट काय वाटायचं डाॕक्टर ? भोग असतात,ते भोगावेच लागतात.'
'पण तुम्ही सांभाळलेल्या मुलानं योग्य नाही केलं हे...'
'असु द्या हो,आपण आपलं कर्तव्य करायचं... गीतेत सांगितलं आहे... मोह नको... कर्म करत रहा... फळाची अपेक्षा नको...' 
'म्हणजे तुम्ही त्याला माफ केलंत !' 
'माफ करणारी मी कोण ? कुणाचा तरी सांभाळ कर अशी माझ्यावर कुणीतरी जबाबदारी टाकली होती,आई म्हणुन मी ते कर्तव्य केलं... आता त्याने माझा सांभाळ करावा असा हट्ट मी का धरु ? 
मुलानं माझी परतफेड करावी असं वाटणं...तिथंच आईपण संपतं... !' 
'हो ना पण,मुलाला त्याचं कर्तव्य कळु नये ?' 
'डाॕक्टर,रस्त्यांत खडे टोचतात म्हणुन रस्त्यांवर कुणी गालिचा अंथरत नाही,आपण आपल्या पायात चप्पल घालावी. त्याला त्याचं कर्तव्य कळेल न कळेल... आपण कशाला कुणाला शिकवायला जायचं ? आपलं  काम करत रहायचं,फळाची अपेक्षा न धरता... !' 
गीतेच्या ग्रंथाला हातही न लावता,गीतेतला एक अध्याय मला आज्जीकडुन समजला होता. 
'चला डाॕक्टर,निघते मी... माझं पोरगं घरी एकटंच असेल... मला जायला हवं आता...!' 
'क्काय...???' मी जवळपास किंचाळलो असेन... कारण या वाक्यावर ती दचकली होती. 
'अहो आज्जी,आत्ताच तर म्हणालात ना... एक मुल लहानपणीच वारलं, बहिणीचा सांभाळलेला मुलगा सोडुन गेला... आता हे काय... ?
ती मंद हसली. म्हणाली, 'सांगेन पुन्हा कधी भेट झाली तर... आधी मला केळी घ्यायला पाहिजेत कुठुनतरी...' 
'नाही आज्जी,आत्ताच सांगा... प्लिज... माझ्या मनातनं हे जाणार नाही...' 
ती शांतपणे म्हणाली, 'अहो डाॕक्टर,कोरोनाच्या तपासणीसाठी दवाखान्यात गेले होते,तेव्हा ठरवलं होतं, चाचणी पाॕझिटीव्ह असेल तर उत्तमच नाहीतर येतांना सरळ एखाद्या गाडीखाली झोकुन द्यायचं.' 
'मग...?' आवंढा गिळत मी म्हटलं. 
'मग काय ? जगायचं कसं आणि मरायचं कुठं हा विचार करत पडले असतांना माझं लक्ष शेजारच्या खाटेवर गेलं...साधारण चाळीशीचा एक मुलगा त्या खाटेवर होता. कमरेखाली अधु ! 
मी त्याच्याकडे पाहिलं... ! 
डोळे मिचकावत मला म्हणाला... "काय होनार नाय मावशी तुला,काळजी करु नको... अगं आजुन लय आयुष्यं हाय तुला"...! हा कोण कुठला ? स्वतःच्या जगण्याची खात्री नाही आणि मला जगण्याचं बळ देतो... ? मावशी म्हणतो... ? 
हा निराधार अपंग... रस्त्यांवर राहतो... माझ्यासारखाच तपासणीसाठी आणलेला...! 
मरण्याचे विचार घेवुन वावरत असतांना वाटलं... आज माझं मुल जिवंत असतं तर याच्याच एव्हढं नक्की असतं. ज्या काळात तो गेला... त्याचकाळात त्याच्याऐवजी समजा मीच गेले असते तर त्याचीही अवस्था आज अशीच अपंग आणि निराधार झाली असती... तो ही आज रस्त्यावरच असता...! 
डाॕक्टर ,त्या अपंग मुलात,मला माझं मुल दिसलं. 
आमच्या दोघांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यावर मी त्याला माझ्याकडे घेवुन आले.
त्या दिवशी मी परत आई झाले हो... मरायचं म्हणुन ठरवुन गेलेली मी... येताना आई होवुन, लेकरु घेवुन आले.'मला काय बोलावं सुचेना. डोळ्यांतुन माझ्या झरझर पाणी वाहु लागलं. 
'आज्जी,आधीच तुमची कमाई काही नाही, पेन्शन पुरत नाही... त्यात अजुन एका व्यक्तीला घेवुन आलात सांभाळायला...?'  मी आश्चर्याने विचारलं. 
'डाॕक्टर,आईला आपलं मुल सांभाळायला पैसे लागत नाहीत.आईला व्यवहार कधीच कळत नाही... !
शिवाय पैसा जगायला लागतो...जगवायला नाही...!' 
'म्हणजे ... ?' मी आ वासुन विचारलं. 
'म्हणजे,जो स्वतःचा विचार करत स्वतःपुरता जगतो त्याला पैसे लागतात...पण आपण जेव्हा "स्व" सोडुन दुस-याला जगवायचा विचार करायला लागतो... त्यावेळी त्या दोघांची काळजी कुणी तिसराच करत असतो...्आपण फक्त त्या तिस-यावर विश्वास ठेवायचा !' 
मी हे तत्वज्ञान ऐकत मुकपणे उभा होतो. 
'मोठी झालेली मुलं,आपल्या आईला त्यांच्या घरात  राहण्याचं भाडं मागतीलही कदाचित् ... पण नऊ महिने गर्भाशयात राहण्याचं भाडं आईनं कधी मागितल्याचं माहित आहे का ?' 
आईला व्यवहार कधीच कळत नाही डाॕक्टर  !
मी शहारलो हे ऐकुन... ! 
'आज्जी, धीचे दोन वाईट अनुभव बघता, हा पण गेला सोडुन तर ? पुढं तुमचं काय ?' मी चाचरत बोललो. 
'डाॕक्टर हा सोडुन गेला तरी,तो माझं आईपण घेवुन जावु शकणार नाही ना ?
एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देतो... त्यावेळी नुसतं बाळच जन्माला आलेलं नसतं... एक आई पण जन्म घेते त्याचवेळी... !
दोन जीव जन्मतात त्यावेळी... एक मुल आणि एक आई ! 
जन्माला आलेल्या त्या बाळाने आईला, 
आईपण हे त्याच्या जन्मावेळीच बहाल केलेलं असतं... हे लाभलेलं आईपण कोण कसं काढुन घेईल ?
मी काय बोलणार यावर... ? 
मी स्तब्ध झालो...!
स्वतःच्या जगण्याची भ्रांत असतांना,कटु अनुभव गाठीशी असतांना,पुन्हा ती कुणाचीतरी आई होण्याचा प्रयत्न करते...! हे वेडेपण आहे कि आई व्हायला आसुसलेल्या मातेची गाथा... ?
'चला निघु मी डाॕक्टर ? 
केळी घ्यायचीत मला...' आजीच्या वाक्यानं मी भानावर आलो. 
'आता केळी कशाला...? नाही म्हणजे कुणाला... ?' 
मी अजुनही धक्क्यांतुन सावरलो नव्हतो. 
'अहो, तो काल मला म्हणाला,केळ्याचं शिकरण खाऊशी वाटतंय.मग मी सकाळी पैसे घेवुन निघाले केळी आणायला... पण लाॕकडाउन मुळे सगळंच बंद, केळी कुठंच मिळेनात.आता घरी जावुन त्याला कुठल्या तोंडानं सांगु,केळी मिळाली नाहीत म्हणुन...! 
मग आठवलं... मंदिरात येतांना लोकं केळी सफरचंद वैगेरे फळं घेवुन येतात देवाला वाहण्यासाठी... जातांना यातलंच एखादं फळ भिका-यांना देवुन जातात... ! 
म्हटलं बघु,पैशानं नाही तर भीक मागुन तरी मिळेल एखादं केळ...! शिकरण करुन देईन हो,पोराचं मन तरी मोडणार नाही...!' 
भरलेल्या डोळ्यांनी मला आता मंदिर दिसेना,देव दिसेना... दिसत होती फक्त एक आई... ! 
रस्त्यावरल्या अपंग पोरामध्ये आपलं पोर पाहणारी ही बाई...!निराधाराला पदराखाली घेणारी ही बाई...!
हातात पैसे असुनही कुणाच्यातरी आनंदासाठी भीक मागायलाही तयार झालेली ही बाई...!
याच बाईत मला दिसली आई !!!
भरल्या डोळ्यांनी मी तीचे पाय धरायला वाकलो,तीने पाया पडु दिलं नाही... ! 
'आज्जी, म तुमची एखाद्या वृद्धाश्रमात सोय करु...? दाटल्या गळ्यानं मी विचारलं. 
यावर डोळे बारीक करत तीनं विचारलं होतं,'पण वृद्धाश्रमात दोघांची एकत्र सोय होईल आमची... ?' 
'नाही आज्जी,वृद्धाश्रमात तुमची सोय होईल,मुलाचं मग बघु काहीतरी... !' 
माझं बोलणं उडवुन लावत, माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाली... ,'काय डाॕक्टर,मग काय फायदा...? माझ्यावाचुन तो कसा राहील ? बरं निघते मी... अजुन केळ्याची सोय करायचीय मला...' 
असं म्हणत, ती निघाली केळी शोधायला...! 
मी इकडं तिकडं आसपास पाहिलं... सर्व बंद. 
आज कुणाच्या हातात मला केळी दिसली असती तर मीच जावुन मागुन आणली असती...
मला दोघांचं भविष्य दिसत होतं... आजी कुठवर त्या मुलाचं करेल किंवा तो अपंग मुलगा तरी आजीला किती आणि कशी साथ देणार...या विचारानं आज्जीला शेवटचं विचारलं, 'आज्जी वृद्धाश्रमाचं काय करु...?'
यावर ती हसत म्हणाली होती, 'अहो या वयात मोठ्या मुश्किलीने पुन्हा आई झाल्येय मी ... आता कशाला मायलेकरांची ताटातुट करता... ? 
या आधी दोन ल्येकरं गमावलीत मी.... आता तिसऱ्याला तरी माझ्याबरोबर राहु दे...त्याच्या अंतापर्यंत किंवा माझ्या अंतापर्यंत ...!
ती झराझरा चालत माझ्यासमोरुन निघुन गेली...!
नव्यानंच पुन्हा आई झालेल्या,म्हातारपणानं वाकलेल्या त्या माऊलीच्या पायात इतकं बळ आलं कुठुन ... ? 
आईला वय कुठं असतं...?
ती कधीच म्हातारी होत नाही, हेच  खरं ! 
गरीब असण्याचा श्रीमंत असण्याचा,तरुण असण्याचा, वृद्ध असण्याचा,पैसे असण्याचा,पैसे नसण्याचा कशाचाही संबंध नसतो आई होण्याशी... ! 
ती फक्त आई असते !
पोराची एक इच्छा भागवण्यासाठी ती भीकही मागु शकते... ! 
पोरासाठी मागितलेली एक भीक एका पारड्यात आणि सढळ हातानं केलेली हजारो दानं दुस-या पारड्यात ! 
दोन्हीचं वजन सारखंच...!!! 
यानंतर मी त्या जागेवर,केळी घेवुन ब-याचदा गेलो... पण ती दिसत नाही !
हातात केळी घेवुन माझी नजर तीला शोधत असते...
का कोण जाणे...तीला शोधतांना मंदिराचा कळस झुकलाय असा मला भास होतो...! 
का कोण जाणे...तीला शोधतांना दारातली ती तुळस मोहरली आहे असा मला भास होतो...!
का कोण जाणे...तीला शोधतांना तीने उच्चारलेला शब्द न् शब्द आज अभंग झाला आहे असा मला भास होतो...!का कोण जाणे...तीला शोधतांना मी पुन्हा बाळ झालो आहे असा मला भास होतो...!
का कोण जाणे...!!!
डाॕ.अभिजीत सोनवणे,डाॕक्टर फाॕर बेगर्स…