* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२/३/२६

महामानव बापूजी / Great man Bapuji

अलौकिक कामगिरी


गांधीजींनी गेल्या अर्धशतकात भारतीय स्वातंत्र्यासाठी जशी अलौकिक कामगिरी बजावली त्याचप्रमाणे जागतिक शांततेच्या दृष्टीनेही महत्त्वाची कामगिरी पार पाडली.त्यांनी आम्हाला अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची शिकवण दिली.पण दुष्ट प्रवृत्तीमुळे नमते घेणारे ते निष्क्रिय तत्त्वज्ञान नव्हते.

आंतरराष्ट्रीय मतभेदामध्येसुद्धा शांततेने निवाडा देणारे ते क्रियाशील तत्त्वज्ञान होते. जगातील कोणत्याही सामर्थ्यवान सैन्यापेक्षा, युद्धसाहित्यापेक्षा मानवाचे मानसिक सामर्थ्य मोठे असते हे त्यांनी आम्हाला दाखवून दिले.त्यांनी राजकीय चळवळीला नैतिक मूल्यांची जोड दिली व साध्य नि साधने भिन्न मानता येणार नाहीत;कारण शेवटी साधनांनीच साध्य नियंत्रित केले जाते असा त्यांनी आदेश दिला.


मनुष्यस्वभावाला असलेल्या मर्यादांकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही त्याचप्रमाणे मुत्सद्द्यांपुढे ज्या समस्या आहेत त्यांकडेही आपण कानाडोळा करू शकत नाही.आज जगाची जी रचना आहे तिचा विचार करता जगात युद्धाचा मुळीच संभव नाही असेही आपण म्हणू शकत नाही;पण दिवसेंदिवस अशी खात्री होत चालली आहे की,नैतिक कायद्याचे श्रेष्ठत्व आपण मानले नाही तर आपल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संबंधात कायमची शांतता नांदणार नाही.जोपर्यंत योग्य साधनांनी योग्य साध्ये निर्माण होणार नाहीत,

तोपर्यंत यातून नव्या अनिष्ट गोष्टी निर्माण होतील,गांधीजींच्या संदेशाचे हे मूल सूत्र होते.जीवनात योग्य रीतीने पाऊल टाकण्यासाठी मानवसमाजाने गांधीजींच्या संदेशाचा अर्थ समजावून घ्यायला हवा.


कोणत्याही प्रकारची भीती,भय न बाळगण्याचा त्यांनी आम्हाला आदेश दिला.भीतीची भावना अत्यंत नीच आहे इतकेच नव्हे तर भीतीच्या पोटी द्वेष व हिंसेचा जन्म होतो.आपल्या अनेक लोकांना या शिकवणीची विस्मृती पडली नि भीतीने आम्हाला ग्रासून टाकले.पण भीती लांबच्या शत्रूची नव्हती तर एकमेकांची आपल्याला भीती वाटत होती. त्यातूनच अनिष्ट कृत्यांचा प्रादुर्भाव झाला.


गांधीजींनी आम्हाला सत्यावर कसे प्रेम करावे व वैयक्तिक व्यवहारातच नव्हे तर सार्वजनिक राष्ट्राराष्ट्रांमधील व्यवहारातही सरळ धोरणाने कसे वागावे हेही शिकविले.त्यांनी आम्हाला माणसाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व समजावून दिले,द्वेषातून नि हिंसेतून द्वेषाचा,हिंसेचा नि विध्वंसाचाच उदय होतो हे त्यांनी शिकविले.

त्यांनी आम्हाला निर्भयतेचा,ऐक्याचा, सहिष्णुतेचा नि शांततेचा मार्ग दाखविला.


भारताने आज जगात फार नाव मिळविलेले आहे.ही महानता मिळण्याची जी अनेक कारणे आहेत त्यांत गांधीजी हे एक मोठे कारण आहे.गांधीजींनीच हा मोठेपणा भारताला मिळवून दिला.

भारताच्या सैन्याने, आरमाराने अगर संपत्तीने प्राप्त झालेला हा मोठेपणा नाही.या थोर पुरुषाने जगातल्या नैतिक क्षेत्रातला व जगातल्या मुत्सद्द्यांमधला क्षुद्रपणा जगाच्या नजरेला आणला.

जगात भारताला हे असे मानाचे स्थान मिळाले याचे कारण नैतिक मूल्यांच्या दृष्टीने सारे जग भारताकडे पहाते हे आहे.


साम्राज्याशी सामना


काही बाबतीत आपण दुबळे असलो तरी आमच्या महान नेत्याकडून आम्हाला त्या दुबळ्या परिस्थितीतही शिकवण मिळाली.आमचे लोक निःशस्त्र असले, त्यांच्याकडे काही संपत्ती नसली अगर संपत्तीचे कोणतेही प्रतीक त्यांच्या हाती नसले तरी त्यांनी भारतातल्या अनेक वर्षे ठाण मारून बसलेल्या संपन्न साम्राज्याशी निकराचा सामना दिला.हा एक विलक्षण सामना होता.सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गांधीजींनी भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर पदार्पण केले त्या काळाकडे मी आज मागे वळून पाहात आहे.त्यांनी दक्षिण आफ्रिकेत केलेल्या कार्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळालेली होती नि त्यांची सर्वत्र वाखाणणी होत होती हे खरे असले तरी भारतीय राजकारणाच्या पातळीवरून त्यांनी आपल्या राजकीय हालचालींना सुरुवात केली नव्हती.पण त्यांनी एकदम भारतीय राजकारणात पदार्पण करून जनतेला संदेश दिला.त्या संदेशात एक प्रकारची जादू होती.तसा तो संदेश अगदी साधा होता. त्यांनी भारतातील परिस्थितीचे विश्लेषण केले ते असे होते की,मुख्यतःसर्वसाधारण जनता नि अन्य लोक यांच्यातसुद्धा भीतीची भावना पसरलेली होती म्हणून गांधीजींनी आम्हाला बजावून सांगितले, "भिऊ नका, कसली भीती वाटते,तुम्हाला काय होणार आहे असे तुम्हाला वाटते?" ते अशा अनुरोधाने बोलत होते की, भारतीय जनतेला राजकीय परिस्थितीची भीती वाटत असावी.

आम्ही काही केले व ती गोष्ट ब्रिटिश सरकारला आवडली नाही तर आम्हाला शिक्षा होईल,आम्हाला तुरुंगात टाकले जाईल,

आमच्यावर गोळ्याही झाडल्या जातील,अशी भीती सर्वत्र पसरलेली होती.गरिबातल्या गरीब शेतकऱ्याला व खालच्या थरातील सर्व लोकांना ही भीती वाटणे साहजिकच होते.कारण गरीब शेतकऱ्याने कष्टाने पिकविलेले सारे धान्य जमीनदाराच्या घशात जात होते व धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्याला उपाशी राहावे लागत होते.जमीनदार, जमीनदाराचा कारभारी,पोलिस व सावकार या सर्वांच्या लाथा आणि बुक्के त्या बिचाऱ्या शेतकऱ्यालाच खावे लागत होते.वातावरणात फरक झाला होता की गांधीजींच्या आवाजातच काही जादू होती ते मला कळत नाही.पण गांधीजींनी ज्यावेळी 'भिऊ नका' या शब्दांची घोषणा केली त्यावेळी त्यांच्या शब्दांनी योग्य पकड घेतली.आमची अंतःकरणे एकदम उचंबळून आली व आमची खात्री पटली की,आता घाबरण्यासारखे काही राहिलेले नाही.गरीब शेतकऱ्यानेसुद्धा आपली वाकलेली पाठ ताठ केली नि तो निर्भयपणाने लोकांच्या नजरेला नजर भिडवू लागला.त्याच्या खोल गेलेल्या डोळ्यात आशेचे किरण दिसू लागले! याचा परिणाम म्हणजे साऱ्या देशात जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्वत्र स्थित्यंतर घडून आले.अनेक उलथापालथीला आम्हाला तोंड द्यावे लागले. पण 'घाबरू नका' या गांधीजीच्या संदेशाने आम्हाला तारले व आता घाबरण्यासारखे काही नाही याची आम्हाला खात्री पटली.भीती म्हणजे काय ती आम्हीच मनात निर्माण केलेली होती.आम्ही लाखो लोक तुरुंगात गेलो.तुरुंगात जाणे हे काही तितके सुखाचे नव्हते.काही लोकांना त्रास झाला व दुःखही सहन करावे लागले.आपण ज्या दृष्टीने पहातो त्या दृष्टीवर सुखदुःखांच्या कल्पना अवलंबून असतात.

आम्ही कोणत्या तरी दुराचरणाने,दुष्कृत्याने कलंकित होऊन तुरुंगात गेलो असतो तर त्यामुळे आम्हाला अतिशय दुःख झाले असते.आम्ही जे केले त्यात घाबरण्यासारखे काही नाही;उलट अभिलाषा बाळगण्यासारखी ती गोष्ट आहे असे आम्हांला आत्मीयतेने वाटू लागले.


गांधीजींच्या स्फूर्तिदायक मार्गदर्शनाने भारतात जी शांततावादी क्रांती झाली,त्या क्रांतीचे नियम जगातील अनेक समस्या सोडविण्यासाठी लागू केले जाण्याची शक्यता आहे.भारतातील या क्रांतीने जगाच्या नजरेला अशी गोष्ट आलेली आहे की,शारीरिक बलाने काही माणसाच्या नशिबाचा निकाल लावता येत नाही. याबबतीत आपण ज्या पद्धतीने लढा देतो नि ज्या पद्धतीने त्याचा शेवट होतो तीच गोष्ट अत्यंत महत्त्वाची मानली जाते.


गांधीजींच्या शिकवणीनेच भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची उद्दिष्टे आम्ही निश्चित केलेली आहेत.जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करताना कोणत्याही शक्तिमान राष्ट्राशी अगर राष्ट्रगटाशी हातमिळवणी न करता स्वतंत्र धोरणाने प्रत्येक वादग्रस्त तेढीच्या प्रश्नाचा विचार करावयाचा.गुलामगिरीत खितपत घडलेल्या लोकांना मुक्त करायचे राष्ट्रीय नि वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा.वर्णभेदाचें उच्चाटन करायचे त्याचप्रमाणे जगातील बहुसंख्य जनतेला ग्रासणाऱ्या अज्ञानाचा,रोगराईचा नि उणिवांचा उच्छेद (समूळ नाश) करायचा! भारताने जे परराष्ट्रीय धोरण अंगीकारले आहे ते नकारात्मक नाही अगर तटस्थपणाचे नाही.ते निश्चित नि महत्त्वाचे धोरण आहे.


भारताची प्रगती घडवून आणण्यासाठीच केवळ शांततेच्या धोरणाची भारताला जरुरी आहे असे नसून त्या शांततेचे जागतिक दृष्ट्याही महत्त्व आहे.जगात युद्धाची जी भीती आहे ती कमी करणे व अखेरीलाही युद्धाची भीती माणसाच्या मनातून काढून टाकणे ही आमच्यापुढील समस्या आहे.पण साऱ्या जगाने युद्धाची भाषा बोलायला सुरुवात केली,राष्ट्रगटांनी एकमेकांची बाजू घेतली तर युद्धाची भीती कशी टाळता येईल


राष्ट्र या नात्याने आमचा दुबळेपणा अगर आमच्या उणिवा यांची आम्हाला जाणीव आहे.आमच्यात कोणता तरी सर्वश्रेष्ठ गुण आहे असाही आमचा दावा नाही.पण सध्या जागतिक राजकारणाबाबत आमचे जे स्वतंत्र, अलिप्ततेचे धोरण आहे त्या धोरणापासून मिळणारे फायदे गमावून बसण्याची आमची तयारी नाही,हे अलिप्ततेचे जागतिक संघर्षात सहभागी होण्याचे धोरण केवळ आम्हालाच उपकारक आहे असे नव्हे तर जागतिक शांतता नि स्वातंत्र्य यासाठीही उपकारक आहे.शांतता व स्वातंत्र्य यांच्यावर घाला पडण्याची वेळ आली,मानवी स्वातंत्र्यावर व शांततेवर संकट आले की भारत मूग मिळून स्वस्थ बसेल असे नाही.या परिस्थितीत भारताने तटस्थ धोरण स्वीकारले तर त्या उद्दिष्टांचा विश्वासघात केल्यासारखे होईल.म्हणूनच भारताचे आजचे अलिप्ततेचे धोरण म्हणजे संघर्षाकडे पाठ फिरवून दूर पळून जाण्याचे,बेफिकिरीचे अगर पूर्ण तटस्थेतेचे धोरण नाही.भारताच्या या अलिप्ततेच्या धोरणात जागतिक क्षेत्रात सहजीवन निर्माण करण्याचे तत्त्व सामावलेले आहे.शांततावादी सहजीवन म्हणजे कोणत्याही समस्येबाबत शांततेने वादविवाद करणे, इतरांचा दृष्टिकोन समजून घेणे,आपल्या मतांचा दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रश्नात हस्तक्षेप करून उलथापालथ न करणे! आपण जी गोष्ट प्राणांपेक्षाही प्रिय मानतो तिचाच त्याग करणे अगर आमचा निर्णय इतर राष्ट्रांवर लादणे असा मात्र या धोरणाचा अर्थ नव्हे, अलिप्ततेचे धोरण हे एक मूलभूत उद्दिष्ट आहे,पण एखाद्या विशिष्ट परिस्थितीला अगर प्रसंगाला ते कसे लागू करायचे याबाबतीत निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार आहे.आमचे अलिप्ततेचे असे धोरण आहे. याचा अर्थ आपण एखादी गोष्ट मान्य करायची अगर करायची नाही असे नाही.जे उद्दिष्ट आपले ठरले आहे ते साध्य करण्यासाठी स्वतंत्र निर्णय घेण्याचे तत्त्व तटस्थतेच्या धोरणात सामावलेले आहे.


आपण ज्याला गांधी तत्त्वज्ञान अगर वैचारिक भूमिका म्हणतो त्या वैचारिक पातळीवर आपण पोहोचलो नाही. पण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आमचा आमच्या धोरणावर अजूनही प्रभाव आहे.आम्हाला शांतता हवी असेल तर त्या शांततेचे वातावरण आपण निर्माण करायला हवे. आपल्याविषयी ज्यांना संशय वाटतो त्यांना आपण जिंकण्याचा - प्रयत्न करायला हवा.आमची बाजू, आमची मनोभूमिका इतरांनी समजून घ्यावी अशी आपली अपेक्षा असते.त्याचप्रमाणे इतरांचीही भूमिका आपण समजून घ्यायला हवी.अनिष्ट गोष्टींचा अगर आक्रमणाचासुद्धा प्रतिकार करताना आपण शांततेची भूमिका पत्करायला हवी व जे केवळ भीतीने अगर अन्य कारणांनीही आपले शत्रुत्व पत्करण्यास तयार झाले आहेत त्यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे करायला हवा. ही शिकवण आम्हाला गांधीजींनी दिली.आमच्यातील अपूर्णत्वाची जाणीव असतानाही त्यांच्या महान शिकवणीपासून स्फूर्ती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आपले ध्येय उच्च असले तर आपण


उच्च तत्त्वांनाही चिकटून रहायला हवे.बुद्धकालापासून ते आजच्या गांधी-युगापर्यंत भारताची उच्च परंपरेची ही पार्श्वभूमी आहे.

आजच्या परिस्थितीत कोणत्याही सरकारला राज्यकारभार चालविताना अहिंसेच्या तत्त्वाचा पुरस्कार करता येणार नाही.

अहिंसेच्या तत्त्वाला आपण चिकटून राहिलो तर आपणास सैन्य,आरमार, वैमानिक दल इतकेच नव्हे तर पोलिस पथकेही ठेवता येणार नाहीत.आजच्या परिस्थितीच्या संदर्भात एखादे उच्च ध्येय लगेच अंमलात आणता येईल असे नाही.हे ध्येय साकार करण्यासाठी आपणास वाट पहावी लागेल.काश्मीरवर टोळीवाल्यांनी हल्ला केला त्यावेळी तेथे भारतीय सैन्य पाठविल्याच्या आमच्या धोरणांचे गांधीजीनी समर्थनच केले.

इतकेच नव्हे तर त्यांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन आशीर्वाद दिला ! संपूर्णपणे अहिंसेच्या तत्त्वाला चिकटून राहणाऱ्या नि त्या तत्त्वाचा पूर्ण पुरस्कार करणाऱ्या गांधीजींनी आमच्या धोरणाला मान्यता दिली ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. विशिष्ट परिस्थितीत सरकारला संरक्षणासाठी हिंसेचा वापर करण्याचा अधिकार पोहोचतो हे गांधीजींनी मान्य केले.भारत सरकार आजच्या परिस्थितीत आपला हा हक्क अबाधित राखील हे तितकेच खरे आहे. तथापि आम्ही आमची भूमिका अशी स्पष्ट केलेली होती. की, निव्वळ संरक्षणासाठीच सैन्याचा वापर करायचा, युद्धाला चिथावणी द्यायची नाही, अगर युद्ध सुरू करायचे नाही. अगर आक्रमक हालचाली सुरू करायच्या नाहीत. हेच आमचे मूलभूत धोरण होते !


गांधीजींची हुकूमशहाप्रमाणे भूमिका नव्हती.कुणाही माणसावर आपला निर्णय लादण्याची त्यांच्यात शक्ती होती.त्यांना इतरांवर निर्णय लादता आला असता.पण त्यांनी तसे केले नाही.त्यांनी जे काम करायचे ते प्रेमाने, सलोख्याने केले.आम्ही वारंवार त्यांच्याशी वादविवाद केला,त्यांशी भांडलोसुद्धा व त्यांना आमची विचारसरणी पटविण्याचा प्रयत्न केला.


गांधीजींमधला अलौकिक गुण म्हणजे इतरांतून चांगले गुण शोधून काढण्याचे त्यांचे कौशल्य ! एखाद्या माणसामध्ये अनेक दुर्गुण असले तरी नेमके त्याच्यातले गुण शोधून काढण्याची कला गांधीजींना चांगली साधलेली होती.त्यामुळे त्या बिचाऱ्या माणसाला त्याच्या इच्छेविरुद्धही चांगले वागावे लागत असे.


गांधीजी आपला निर्णय इतरांवर लादण्याचा प्रयत्न न करता इतरांची मने जिंकण्याचा प्रयत्न करीत असत.लोकांनी आपले विचार दाबून टाकावे आणि आंधळेपणाने त्यांचे अनुकरण करावे.असे गांधींना कधीच वाटले नाही.त्यांना असे अंधानुकरण नको होते.पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे अपरिहार्यपणे लोकांना स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडणे अनेक प्रसंगी कठीण जात असे.तरीही गांधीजींनी लोकांच्या या भूमिकेला कधी प्रोत्साहन दिले नाही.गांधीजींविषयी बोलणे मला आवडते याचे कारण त्यामुळे माझ्या मनाला समाधान वाटते व एका महानतेची जाणीव होते.त्या जाणिवेने मन वेगळ्या वातावरणात जाते.


आपल्या स्वतःभोवतीच्या संकुचित भूमिकेपासून आपण वेगळ्या प्रदेशाच्या वातावरणात पदार्पण करतो नि त्या वातावरणात आपणास जीवनातले क्षुद्र हेवेदावे,द्वेष, मत्सर दिसत नाहीत! गांधीजींचा विचार केल्याने मनाला एक प्रकारचे समाधान लाभत होते.पण आता आपण त्यांचे वारंवार नाव घेऊनही त्यांच्या तत्त्वाप्रमाणे आपले आचरण का होत नाही या विचाराने व शंकेने मन व्यथित होते.गांधीजींच्या सान्निध्यात येत असताना अंतःकरणात अशी कालवाकालव होते की आपण गांधीजींचे अनुयायी होण्यास लायक आहोत की नाही! आपण बोलतो एक व दाखवतो अगर कृती करतो दुसरी,असे तर आपल्या हातून होत नाही ना? ते हयात असताना जर अशी परिस्थिती तर ते आमच्या सान्निध्यात नसताना आमची भूमिका कशी राहील? तेव्हा गांधीजींची स्मृती नेहमीच आमच्यापुढे ही समस्या उभी करते !पण अशा प्रकारे निरर्थक प्रश्नचिन्हात आम्हाला फार वेळ गुरफटून राहाता येत नाही.चालू परिस्थितीच्या अनुरोधाने आमच्या कल्पनेप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यायला हवा आहे.


गांधीजी हे निव्वळ उच्च तत्त्वे बाळगणारे व सत्याचे पुरस्कर्ते होते असे नव्हे तर त्यांना पूर्णपणाने जनमनाची नाडीही अवगत होती.भारतीय जनतेचा प्रतिनिधी म्हणून घेण्याचा कुणाला खरा हक्क असेल तर तो गांधीजींनाच ! गांधींजी भारतीय जनतेला ओळखत होते इतकेच नव्हे तर ते आम्हा कुणापेक्षाही जनतेच्या जीवनाचा एक भाग होऊन बसले होते गांधीजींनी जनतेला ज्या काही अलौकिक गोष्टी करायला सांगितल्या त्या लोकांनी त्यांच्या आदेशाप्रमाणे पार पाडल्याही;पण त्यांनी जनतेला कोणती अशक्य गोष्ट पार पाडण्यास सांगितली असेही नाही.एखाद्या व्यक्तीकडून गांधीजी कडक शिस्त पाळण्याची अपेक्षा करतील पण सर्वसाधारण जनतेकडून मात्र ते सक्तीच्या शिस्तीची अपेक्षा करणार नाहीत.तथापि त्यांनी अनिष्ट गोष्टींच्या बाबतीत कधी तडजोडीची भूमिका स्वीकारली नाही.या विशाल जगात केवढाही महान नेता असला तरी त्याला दैनंदिन कार्यात कधी तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागतच नाही असे काही म्हणता येत नाही.


भावी इतिहासकार गतेतिहासाबद्दल लिहिताना आमच्या देशातील चालू परिस्थितीच्या अनुरोधाने काय लिहितील? ते इतिहासकार आमच्या महान नेत्याबद्दल असे लिहितील की,भारतात जन्म घेतलेल्या या नेत्याने हातात हातात हात घालून सहकार्याने कसे वागावे हे गुलामगिरीत खितपत पडलेल्या आपल्या देशबांधवांना शिकविले! एकाच देशात जन्मलेल्या व एकाच संस्कृतीच्या जनतेला विभागणाऱ्या ज्या कृत्रिम भिती होत्या त्या पार जमीनदोस्त करून आपल्यापेक्षा कमनशिबी असलेल्या हरिजनांना उच्च दर्जा देण्यास त्या नेत्याने आपल्या शिकवणीने भाग पाडले.ते इतिहासकार आणखी असेही लिहितील की, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेली भारतीय जनता असंख्य वर्षांच्या निद्रेतून जागी झाली व अभिमानाने मान उंचावून त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले व इतर देशांच्या स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. शेकडो वर्षांनंतर भारताने आपले तेज प्रगट केले. आपल्या प्राचीन संस्कृतीने तेजाळलेला आपला आवाज जगाला ऐकविला व त्या आवाजाचा साऱ्या जगावर परिणाम घडून आला! आम्ही भारतीयांनी आम्हांला अनेक शतकांपासून मिळालेला महान वारसा दूर फेकून दिला व धर्म,जात नि प्रांत यांचे भांडवल करून आम्ही एकमेकांमध्ये भांडत रहाण्याची नीच पातळी स्वीकारली तर सारे जग आपल्याला काय म्हणेल?


आपल्या जगात अनेक अनिष्ट गोष्टी आहेत अगर अनेक प्रकारचे द्रौर्बल्य आहे. पण मोठा दुबळेपणा म्हणजे भीती भीतीची भावना ! भीती हे अनेक अनिष्ट गोष्टींचे मूळ आहे.ज्या व्यक्तीला अगर राष्ट्राला भीतीने पछाडलेले आहे त्या व्यक्तीला,राष्ट्राला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते व अभिमानाने मान उंचवण्यासही ते राष्ट्र समर्थ होऊ शकत नाही.पण गांधीजींच्या तत्त्वज्ञानापासून आम्हाला हे सामर्थ्य मिळाले.मनातील सारी भीती टाकून एकजुटीने निर्भयपणे शक्तिमान साम्राज्याशी सामना देण्याची शिकवण गांधीजीनी भारतीय जनतेस दिली! मग आता बंगालमध्ये अगर आसाममध्ये राहणाऱ्या आमच्या लोकांनी एकमेकांची भीती का बाळगावी? अशिक्षित लोक अगर छोट्या मनाचे लोकच एक भाषा दुसऱ्या भाषेविरुद्ध उलटविण्याचा नि भाषा भगिनींमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतात;पण शहाणे लोक मात्र भाषाभाषांमध्ये वितुष्ट न आणता मातृभाषेखेरीज अन्य भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात!


आपल्या सभोवतालच्या जगापुढे आपण दृष्टी फेकूया. आंतरराष्ट्रीय परिस्थितीत अनुकूल पालट झाला आहे असे आपणास वाटते.आता मात्र परिस्थिती जास्त बिकट झाली आहे.लोकांनी एकमेकांविरुद्ध तलवारीचा खणखणाट करायला प्रारंभ केला आहे! अशा परिस्थितीत आम्ही किंचित प्रमाणात जरी आत्मसंतुष्ट वृत्ती दाखविली,ऐक्याचा अभाव व्यक्त केला तर आपण दुबळे ठरू,आपल्याला अपयश येईल! आपण आपली मने नि डोळे उघडे ठेवून वागायला हवे.ज्या थोर नेत्याने भारतीय जनतेत एवढी प्रचंड शक्ती निर्माण केली, त्यांच्यात एकजूट करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या थोर नेत्याची आपण या प्रसंगी सतत स्मृती वागवायला हवी.आपल्या या थोर नेत्याच्या नावाचा पुनरुच्चार करणे अगर त्याची स्मृती बाळगणे यानेच केवळ भागणार नाही.त्याने आपल्याला जी अमोल शिकवण दिली आहे ती सदैव मनात बाळगून आपण त्या शिकवणीच्या अमृताने सारा देश संपन्न केला पाहिजे.आमच्या जीवनातला प्रकाश मावळला असून सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले आहे.आमचे परमप्रिय बापूजी,आमचे राष्ट्रपिता आम्हास सोडून गेले ! आमच्या जीवनातला प्रकाश मावळला असे मी एकदा उद्‌गार काढले तथापि माझे ते उद्‌गार चुकीचेही होते. कारण आपल्या देशात ज्या प्रकाशाचे तेज फुंकले गेले होते तो प्रकाश काही सामान्य प्रकारचा प्रकाश नव्हता! ज्या प्रकाशाने हा सारा देश दशदिशा उजळून टाकला तो प्रकाश आणखी असंख्य वर्षे या देशात प्रकाशत राहील! हजारो वर्षांनंतरही या प्रकाशाची तेजस्वी किरणे आपल्या देशात चकाकत राहतील.साऱ्या जगाला ती प्रकाशकिरणे पाहायला सापडतील व त्या प्रकाशकिरणांनी अनेकांच्या अंतःकरणाला समाधान लाभेल.कारण त्या प्रकाशात आजच्या घडीपेक्षा उद्याच्या घडीचे प्रतिबिंब जास्त प्रमाणाने एकवटलेले आहे.त्या प्रकाशात जिवंत शाश्वत सत्य सामावलेले आहे.तो प्रकाश आम्हाला योग्य मार्ग दाखवीत आहे, प्रमादापासून बाजूला सारून अनादी काळापासून अस्तित्वात असलेल्या या देशाला स्वातंत्र्याप्रत नेत आहे !


समाप्त…!

२८/२/२६

महामानव बापूजी / Great man Bapuji

भारत घडवायचा होता? गांधीजींनी असे उद्‌गार काढले होते,हा देश आपला आहे,असे गरिबांतल्या गरीब भारतीयाला अभिमानाने म्हणता येईल असा भारत देश मला घडवायचा आहे.असा देश घडविण्यात या साऱ्या गरिबांनाही अधिकार राहील. या देशातील जनतेत उच्च व नीच असा वर्ग राहणार नाही.या देशात सर्व जातीजमाती पूर्ण सलोख्याने एकत्र नांदतील,या भारतात अस्पृश्यतेच्या शापाचा कलंक कुठे दिसणार नाही,मादक पदार्थांच्या सेवनाला स्थान मिळणार नाही.पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही समान हक्क मिळतील.माझ्या स्वप्नसृष्टीतला हा असा भारत देश आहे!"


पददलित जनतेचा उद्धार


हिंदूंना परंपरेने जो वारसा मिळालेला आहे त्याचा गांधीजींना अभिमान वाटत होता.त्यांनी हिंदुधर्माला विश्वव्यापी रूप देण्याचा प्रयत्न केला व सर्व धर्मांना सत्याच्या कक्षेत नेऊन बसविले.


हिंदुधर्माला संकुचित स्वरूप देण्यास त्यांनी नेहमीच नकार दिलेला आहे.त्यांनी एकदा लिहिले होते, "भारतीय संस्कृती ही निव्वळ हिंदू,इस्लामी अगर कोणतीही पूर्ण संस्कृती नाही.या सर्व संस्कृतींचा तो एक संगम आहे."त्यांनी आणखी एकदा लिहिले होते की, "जगातील सर्व देशांतील संस्कृतींचे वारे अगदी मुक्तपणे माझ्या घराभोवती वाहात राहावे अशी माझी इच्छा आहे;पण यांपैकी कोणत्याही देशातील वायुगतीने माझ्या भूमीवरील माझे स्थान उडून जाणार नाही याची मी खबरदारी घेईन.परक्यांच्या घरात आगंतुक,भिकारी अगर गुलाम म्हणून राहाण्यास मी स्पष्ट नकार देईन!" आधुनिक विचारधारेचा गांधीजींच्या जीवनावर परिणाम झालेला होता तरी त्यांनी आपल्या भारतीय विचारमूल्यांचे मूळ सोडलेले नव्हते.उलट त्या मुळाला ते निग्रहाने चिकटून राहिलेले होते. भारतातल्याच नव्हे तर जगातील पददलित जनतेशी एकरूप होण्याची,त्यांच्याशी समभावनेने मिसळण्याची गांधीजींची मनोभूमिका होती.पददलित जनतेचा उद्धार करण्याच्या ध्येयवादी भूमिकेने त्यांनी आपल्या जीवनात धर्मालाही दुय्यम स्थान दिले.


"अर्धपोटी असणाऱ्या राष्ट्राला धर्म नसतो अगर त्या राष्ट्राला कसली कला माहीत नसते.लक्षावधी उपाशी लोकांना जी गोष्ट उपायकारक ठरते त्या गोष्टीतच माझ्या डोळ्यांना सौंदर्य दिसते.लक्षावधी लोकांशी बोलू शकेल,त्यांना समजू शकेल अशी कला अगर साहित्य यांची आपणास आज जरूरी आहे."प्रत्येकाच्या डोळ्यांतून वाहाणाऱ्या अश्रुधारा कायमच्या पुसून टाकायची त्यांची महत्त्वाकांक्षा होती.स्वतःवर पूर्ण विश्वास,विलक्षण शक्तीची जोड, प्रत्येकाला स्वातंत्र्य नि समानता मिळवून देण्याचे ध्येय, गरिबांच्या जीवनाच्या दृष्टीने या साऱ्या ध्येयधोरणांचा वापर करायची मनोभूमिका यामुळे लोहचुंबकाकडे लोखंड आकर्षित होते त्याप्रमाणे सर्वसाधारण जनता

गांधीजींकडे आकर्षिली गेली यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.गांधीजी आपल्या धोरणाने भूतकाळाचा भविष्यकाळाशी मेळ घालीत असून सध्याचा जो भयाण वर्तमानकाळ आहे त्याचा केवळ सोपानशिलेसारखा उपयोग करीत आहेत,नि भविष्यकाळातील आशाआकांक्षांचे व जीवनाचे मंदिर उभारीत आहेत असे सर्वसाधारण जनतेला वाटले. 


सर्वसाधारण जनतेचीच ही भूमिका होती असे नव्हे तर विचारवंतांचीही हीच भूमिका होती.गांधीजींच्या विचारा

प्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे या विचारवंतांना आपल्या जीवनातल्या सवयी बदलणे जड गेले व या बदलांमुळे त्यांचे मन संभ्रमित झाले,गोंधळले तरी त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाला मान दिला.गांधीजींनी आपल्या अनुयायांतच नव्हे तर त्यांच्या विरोधकांतही व ज्या तटस्थ लोकांची मने गोंधळलेली होती,कोणत्या बाजूने विचार करावा हे त्यांना समजत नव्हते,त्यांच्यातही गांधीजींनीच मानसिक क्रांती घडवून आणली.


कारभाराची लोकशाही


गांधीजींची लोकशाही कारभाराची जी कल्पना होती तीमध्ये बहुसंख्य अथवा प्रतिनिधित्व यांना स्थान नव्हते. त्यांची लोकशाहीची कल्पना सेवाधर्म,त्याग व नैतिक मूल्ये यांच्यावर आधारलेली होती.आपण जन्मजात लोकशाहीवादी आहोत असा गांधीजींचा दावा होता. गांधीजी लोकशाहीवादी असोत अगर नसोत,पण लक्षावधी जनतेच्या ज्ञात-अज्ञात अशा आकांक्षांचे ते सारतत्त्व होते.अर्थातच आपण ज्याला लोकशाही भाषेत जनतेचे प्रतिनिधित्व मानतो त्यापेक्षाही गांधीजींचे हे वैचारिक व मानसिक प्रतिनिधित्व जास्त महत्त्वाचे मानता येईल.लक्षावधी लोकांच्या आशा आकाक्षांची गांधीजी म्हणजे प्रत्यक्ष मूर्तीच होय.गांधीजी हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते अगर त्यांच्या भावनांचे प्रतिबिंब त्यांच्या ठायी दिसत होते तरी ते सामान्य नव्हते.तीव्र बुद्धिमत्ता,शुद्ध भावना,उत्कृष्ट सदाभिरुची, विशाल दृष्टी,मानवतावादी दृष्टिकोन व आपल्या भावनांवर व वासनांवर कब्जा ठेवणारा संन्यस्त, भावनांचे उदात्तीकरण करणारा ध्येयवादी पुरुष, लोहचुंबकाप्रमाणे लोकांना आपल्याकडे खेचून घेणारा माणूस,या दृष्टीने गांधीजींकडे पाहिले तर त्यांना सामान्य शेतकऱ्याची संज्ञा कशी लावता येईल? तरीही ते मनोभावनेने शेतकरी होते.प्रत्येक प्रश्नाकडे पाहायची त्यांची दृष्टी शेतकऱ्याची होती.जीवनातील काही गोष्टींकडे शेतकऱ्याच्याच अंधदृष्टीने ते पाहात होते. भारतदेश हा शेतकरी भारत आहे.

त्यामुळे या भारताला गांधीजी चांगले ओळखत होते.


भारतातील लहानसहान कंपनांचीही त्यांच्यावर प्रतिक्रिया होत होती.भारतातील परिस्थितीचे त्यांना उपजत ज्ञान होते.माणसाच्या मानसशास्त्राचा त्यांचा सूक्ष्म अभ्यास होता.त्यामुळे कोणत्या क्षणी आपण कोणत्याही समस्येबाबत हस्तक्षेप करावा याचे त्यांना ज्ञान होते.वैचारिकदृष्ट्या पाहिले तर गांधीजी विलक्षण रीतीने मागासलेले असल्याचे दिसून येत होते.पण कृतीची वेळ आली की,त्यांच्यासारखा महान क्रांतिकारक अलीकडच्या काळात भारतात झाला नाही असे म्हटले तरी चालेल.त्यांचे अद्वितीय असे व्यक्तिमत्त्व होते. सर्वसाधारण मोजमापाने अगर तर्कशास्त्राच्या ठोकळनियमांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करणे अशक्य होते.आरामखुर्चीवर बसून समाजवादाच्या गप्पा मारणारे समाजवादी लोक गांधीजींना पहिल्या नंबरचा 'प्रतिगामी' समजत असत;पण वस्तुस्थिती अशी होती की,या 'प्रतिगामी' माणसाला भारत म्हणजे काय हे माहीत होते,

भारताचा अर्थ त्यांनी समजून घेतला होता. ते बहुतांशी शेतकरीच होते व ठोकळेबाज धोरणाच्या कोणत्याही क्रांतिकारकाला जे जमले नाही ते गांधीजींनी करून दाखविले.त्यांनी सारा भारत हालवून टाकला.


स्वयंपूर्ण खेड्याचे स्वप्न


गांधीजी प्रतिगामी असोत अगर क्रांतिकारक असोत, त्यांनी भारताचा चेहरामोहरा बदलून टाकला. परिस्थितीने बदललेल्या अवनतीच्या अवस्थेत खितपत पडलेल्या भारतीयांचा त्यांनी अभिमान जागृत केला, त्यांना चारित्र्याचा धडा शिकविला,

सर्वसामान्य जनतेत शक्ती व जागृती निर्माण केली व भारतीय प्रश्नाला जागतिक महत्त्व आणून दिले.गांधीर्जीचे ध्येयधोरण व ते साध्य करण्यासाठी अध्यात्माचा केलेला वापर आपण एकवेळ बाजूला ठेवला तरी त्यांनी अहिंसावाद व सविनय कायदेभंगाचा आपल्या आंदोलनात जो उपयोग केला ती पद्धती म्हणजे गांधीजींनी देशाला व जगाला दिलेली एक अद्वितीय देणगी आहे,असे म्हणता येईल.भारतीय परिस्थितीला त्यांचे ते अहिंसेचे व सविनय कायदेभंगाचे तत्त्व पुरेपूर जुळणारे होते असे म्हणता येईल.


गांधीजींचा जीवनविषयक दृष्टिकोन व आपण ज्याला आधुनिक दृष्टिकोन म्हणतो त्यात मूलभूत मतभेद आहेत ही गोष्ट खरी आहे असे मला वाटते.आधुनिक जगातले वाढते जीवनमान व छानछोकीपणाची वाढती प्रवृत्ती यांचे त्यांना कधी आकर्षण वाटले नाही.कारण या छानछोकीपणामुळे नैतिक मूल्यांचा अपहार होतो असे त्यांचे मत होते.त्यांना छानछोकीपणाचे आयुष्य आवडत नव्हते.कष्टाळू जीवनाचाच मार्ग त्यांना मान्य होता. चैनबाजीच्या धोरणाने लबाडीचा जन्म होतो व सद्‌गुणांचा लोप होतो असे त्यांना वाटत होते.गरीब श्रीमंतांच्या जीवनपद्धतीत व जीवनविकासासाठी त्यांना प्राप्त होणाऱ्या संधींमध्ये जे महदंतर दिसून येत होते त्याचा त्यांच्या मनावर फार परिणाम होत होता.म्हणूनच त्यांनी स्वतःच्या मानसिक समाधानासाठी,गरीब श्रीमंतांमधील महदंतर कमी करण्यासाठी गरिबांची जीवनपद्धती स्वीकारली,त्यांचा पोषाख अगर अर्धनग्नपणा जाणूनबुजून स्वीकारला,गरीब व श्रीमंत यांच्यात जी अंतराची खोल,विशाल दरी आहे


याची दोन मुख्य कारणे आहेत असे गांधीजींना वाटत होते.पहिले कारण,परकीयांची राज्यसत्ता नि राज्यसत्तेमुळे होणारे रक्तशोषण,

दुसरे कारण, पाश्चिमात्य देशात यांत्रिक युगाने निर्माण झालेली भांडवलशाही,औद्योगिक संस्कृती!या दोन्ही बाबतीत त्यांची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र स्वरूपाची होती.जुन्या काळातील स्वयंशासित,स्वयंपूर्ण खेड्यांकडे त्यांचे मन वेध घेत होते.त्या जुन्या काळातील स्वयंपूर्ण खेड्यात उत्पादन त्याची विभागणी व त्याचा समतोलपणा त्यांना हवा होता.आजच्याप्रमाणे त्या काळी राजकीय अगर आर्थिक सत्ता केंद्रित नव्हती,विकेंद्रित होती.त्या काळी तेथे विशुद्ध लोकशाहीचा अंमल चालू होता.त्या काळात गरीब श्रीमंतांच्या राहणीमानात फारसे अंतर नव्हते. शहराचे आजच्यासारखे अरिष्ट त्यावेळी नव्हते व जीवनसत्त्वे देणाऱ्या भूमीशी लोकांचा संपर्क राहात होता व उघड्या जागेत लोकांना शुद्ध हवा मिळत होती. जीवनाच्या अर्थाबाबत त्यांच्यात व इतरांत अशा प्रकारे मूलभूत मतभेद होते.अर्थात हे केवळ मतभेद होते.

पण हे मतभेद त्यांच्या भाषेत व प्रत्येक कृतीत प्रतीत होत होते.त्यांच्या निःसंदिग्ध व तेजस्वी भाषेच्या शक्तीचे मुख्यतः

भारतातील व अनेक राष्ट्रांतील धार्मिक,नैतिक शिकवणुकीतच मूळ होते.तेथूनच त्यांना स्फूर्ती मिळत होती.नैतिक मूल्ये अबाधित राहिली पाहिजेत, साध्यासाठी अयोग्य साधनांची तरफदारी केली जाता कामा नये,साध्यासाठी अयोग्य साधनाचे 'समर्थन' झाले, आणि नैतिक मूल्ये राहिली नाहीत तर व्यक्ती व समाज नष्ट होईल,त्यांची अधोगती होईल असे गांधीजींचे आग्रही मत होते.


गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव देशातील जनतेत अनेक बाजूंनी पसरला व त्या प्रभावाचे जनमनावर ठसेही उमटले;पण भारतातील जनतेच्या अंतःकरणात त्यांना नेता या नात्याने पहिल्या दर्जाचे श्रेष्ठ स्थान मिळाले ते केवळ त्यांच्या अहिंसेच्या धोरणाने अगर त्यांच्या अर्थशास्त्रीय सिद्धान्तांनी नव्हे.पारतंत्र्यातून मुक्त होण्याचा भारताचा निर्धार,जाज्ज्वल्य राष्ट्रीयत्व,उन्मत्त सत्तेपुढे नमते घेण्यास पूर्ण नकार,राष्ट्राच्या इभ्रतीला धक्का पोहोचेल असे कोणतेही धोरण स्वीकारण्यास नकार,या जनतेच्या भावनांची मूर्तिमंत प्रतिमा म्हणजे गांधीजी ! भारतातील अनेक लोकांनी शेकडो प्रश्नांच्या बाबतीत जरी त्यांच्याशी मतभेद व्यक्त केले,त्यांच्यावर टीका केली व मतभेदांमुळे ते त्यांच्यापासून दूर झाले तरी भारतीय स्वातंत्र्यासाठी आंदोलनाचा व कृतीचा समय आला त्यावेळी गांधीजींपासून दूर गेलेली माणसे परत आली नि त्यांनी गांधीजींना आपला नेता मानले.नव्हे,गांधीजींना नेता मानणे त्यांना अगदी अपरिहार्य वाटले.


जनतेचा मनोधर्म


गांधीजींनी भारतीय जनतेचा मनोधर्म समजून घेण्याचा प्रयत्न केला तसा भूतकाळात अगर वर्तमानकाळात क्वचितच अन्य नेत्यांनी प्रयत्न केला असेल.गांधीजी भारतातल्या खेड्यापाड्यात सर्वत्र हिंडले व तेथील लक्षावधी लोकांशी त्यांनी संपर्क साधला. इतकेच नव्हे तर तेथील लोकांच्या अंतःकरणाचा त्यांनी ठाव घेतला,त्यांच्या दुःखात ते समरस झाले.त्यामुळेच लक्षावधी लोकांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.


भारतदेश नि भारतीय जनतेच्या समस्या यासंबंधी त्यांना कोणती माहिती नव्हती असे नाही.त्यांना इतिहासाबद्दल फारशी आवड नव्हती व इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्यांची जरी प्रवृत्ती नव्हती,तरी भारताच्या इतिहासाचे मूळ ते कधी विसरले नव्हते,

भारताच्या प्रचलित राजकीय प्रश्नावर त्यांनी आपले लक्ष केंद्रिभुत केले होते तरी चालू घडामोडींचा त्यांचा चांगला अभ्यास होता.त्या घडामोडींकडे त्यांचे चांगले लक्ष असे. कोणत्याही प्रश्नातील अनावश्यक बाजूकडे दुर्लक्ष करून कोणत्याही प्रश्नातील मुख्य सूत्र अगर प्रश्नाचा गाभा हाती घेण्याची प्रगल्भता त्यांना चांगली साधलेली होती. कोणत्याही प्रश्नाची कसोटी नैतिक मूल्यांनी लावावयाची त्यांची पद्धती होती.ते जो प्रश्न हाताळीत असत त्यावर त्यांची जबरदस्त पकड असल्या.


गांधीजींनी आपल्या आंदोलनाच्या मधल्या काळात कितीही चुका केल्या 'तरी त्यांची युद्धाची जी मूलभूत रचना असते त्यात ते कधी बदल करीत नाहीत',असे बर्नार्ड शॉ यांनी एकदा उद्‌गार काढले होते.काँग्रेसच्या नेतृत्वाखाली गांधीजींनी जी आंदोलने सुरू केली ती आंदोलने म्हणजे भारत व भारतातील सामान्य जनता यांच्या हितसंबंधांच्या दिशेने त्यांनी पार पाडलेली महान कामगिरी आहे असे म्हणता येईल.त्यांनी राष्ट्रीय पातळीवरून आंदोलन सुरू करून देशातील लक्षावधी पददलित जनतेचे जीवन घडविण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारच्या दडपणांमुळे कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करण्यास असमर्थ ठरलेल्या जनतेला त्यांनी स्वाभिमानाची जाणीव करून दिली.त्यांनी जनतेला देशातील राजकीय व आर्थिक प्रश्नांबाबत विचार करायची शिकवण दिली.भारतीयांच्या जीवनात गांधीजींनी क्रांतिकारक कार्य केले.वैचारिक दृष्ट्या गांधीजींपेक्षा जास्त प्रगतिपर विचारसरणी असलेले अनेक राजकीय गट त्यावेळी भारतात कार्य करीत होते; पण या गटांचे जमिनीवर पाय नव्हते.ते अंतरिक्षात विहार करीत होते.त्यामुळे जनतेकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.पण आवश्यक ती परिस्थिती निर्माण करून जनतेची मने कशी काबीज करावीत हे गांधीजींना माहीत होते.


सामान्य असून असामान्य


सोसाट्याचा वारा यावा व त्या वायुलहरीत आपण शुद्ध हवेत श्वासोच्छ्वास करावा,प्रकाशकिरणांच्या झोताने काळोखाचा भेद होऊन आपल्या नेत्रांपुढील अंधकार क्षणार्धात व्हावा असे गांधीजींचे व्यक्तिमत्त्व होते। झंझावाताने सारी उलथापालथ होते तशी गांधीजीच्या व्यक्तिमत्त्वाने लोकांच्या मनाची उलथापालथ झाली! गांधीजी काही कुठून तरी आकाशातून उत्तरले असे नाही.ते सर्वसामान्य जनतेतूनच निर्माण झाले.त्यांनी सामान्यांची आत्मीयतेने लक्ष दिले."किसान कामगारांच्या पाठीवरचे तुमचे ओझे आधी फेकून द्या, त्यांच्या रक्तशोषणावर तुम्ही जगता आहात,दारिद्रय व दुःखे निर्माण करणारी ही समाजपद्धती बदलून टाका, नष्ट करा!"असा गांधीजींनी आम्हांला आदेश दिलेला होता.निर्भयपणा,सत्य व कृती हा त्यांच्या शिकवणुकीचा मूलमंत्र होता.अर्थातच या मूलमंत्राच्या मुळाशी सर्वसामान्य जनतेचे कल्याण करणे हाच हेतु होता. आमच्या प्राचीन ग्रंथांतून आपणास शिकवण मिळाली आहे की,व्यक्तीला अगर राष्ट्राला मिळणारी अमोल देणगी म्हणजे अभय,निर्भयता ! हे निव्वळ शारीरिक धैर्य नसून मनाचे धैर्य आहे! भारतीय इतिहासाच्या उषःकालात चाणक्य व याज्ञवल्क्य यांनी आपणांस असे मार्गदर्शन केले होते की जनतेला पूर्णपणे निर्भय बनविणे हे लोकनेत्याचे परम कर्तव्य आहे.ब्रिटिश राजवटीच्या काळात सारा देश भीतीच्या भावनेने व्यापलेला होता.सर्वसाधारण जनतेची मने दारुण भीतीने जर्जर झालेली होती.सैन्याची भीती,पोलिसांची दहशत,सर्वत्र पसरलेल्या गुप्त पोलिसांच्या जाळ्याची चिंता,अधिकारी वर्गाविषयी वाटणारा धसका,दडपशाही,कायद्यांनी होणारा थरकाप,सावकार व जमीनदारांनी चालविलेला छळ,बेकारी व उपासमार यांनी दुबळ्या झालेल्या मनात निर्माण झालेले भय या सर्व भयभीती विरुद्ध गांधीजींनी आपला निश्चयी आवाज उठविला, "घाबरू नका!"


शांततावादाचा समन्वय


जनतेच्या अंगावर जे भीतीचे वस्त्र पसरलेले होते ते पूर्णपणे नाही तरी बऱ्याच प्रमाणाने बाजूला सारले गेले. खरे म्हटले तर भारतीय तत्त्वज्ञानाच्या संस्काराने आपल्या पूर्वजांनी जीवनाकडे पहाण्याची तशी शांततावादी भूमिका निश्चित केली होती.पूर्णांशाने भारतीय संस्कृतीचा परिपाक असलेल्या गांधीजींच्या जीवनात शांततावादाचा समन्वय झालेला होता.पण ध्येयधोरणाच्या बाबतीत कार्य करताना अलौकिक उत्साह व कृती याबाबतीत त्यांच्याजवळ राक्षसी सामर्थ्य होते असे म्हटले तरी अतिशयोक्तीचे होणार नाहीं.त्यांच्या पायांना तर अखंड गती होतीच.पण इतरांनाही त्यांनी आपल्या पायांच्या गतीबरोबर अखंडित चालायला भाग पाडले.त्यांनी आम्हांला खेड्यात पाठविले.त्यांनी आपल्या असंख्य अनुयायांना खेड्यांत पाठवून जनतेपर्यंत जो नवा संदेश पाठविला त्या संदेशाने सारी खेडी गजबजून गेली.शेतकरी वर्ग अनेक शतकांच्या घोर निद्रेतून थरकाप होऊन जागा झाला.मानसिक समाधानाच्या कवचातून तो बाहेर फेकला गेला.या परिस्थितीचा आमच्या मनावरही दूरवर परिणाम झाला.उपासमारीने होरपळलेला,चिखलाच्या भीतीने बांधलेल्या घरांत दारिद्र्य सहन करीत धरणीमातेची सेवा करणारा शेतकरी प्रथमंच आम्हाला पहायला मिळाला. पुस्तकांपेक्षा या खेड्यांत जाऊन आम्ही भारतीय अर्थशास्त्राचे धडे घेतले.खेड्यांत जाऊन जो भावनात्मक अनुभव आम्ही घेतला त्यामुळे आमच्या जुन्या जीवनमानाकडे वळणे आम्हांला कठीण गेले.स्वातंत्र्य आले.अनेक वर्षे मनात असलेली आमची स्वातंत्र्याची आकांक्षा सफल झाली.आणि हे स्वातंत्र्यही हिंसक मार्गांनी मिळाले नाही.पण स्वातंत्र्यसूर्याच्या उदयानंतर क्षणार्धात देशात काळोखाचे साम्राज्य पसरले! लोकांची डोकी फिरली ! भीती व द्वेषभावनांनी आमची मने आंधळी झाली व आमच्या संस्कृतीने आमच्यावर लादलेली संयमाची सारी बंधने तटातट तुटली गेली! भीतीचे भयानक डोंगर पुढे उभे राहिले व माणसांनी केलेल्या राक्षसी कृत्यांनी आमच्या मनात क्षणात भयाण शून्यता निर्माण झाली! प्रकाश मावळत चालला असे आम्हाला क्षणभर वाटले.पण एक तेजस्वी ज्योत तेवत होती,आजूबाजूला पसरलेल्या काळोखाला भेदून सर्वत्र प्रकाशकिरणे फेकीत होती! या पवित्र ज्योतीचा प्रकाश आमच्या नेत्रांवर पडताच आमच्यातील शक्ती व ज्या आशा लुप्त झाल्या होत्या त्या पुनः जिवंत झाल्या व आम्हाला विश्वासाने वाटू लागले की,क्षणिक संकटांनी आपल्या जनतेची अंतःकरणे व्यापून टाकलेली असली तरी या साऱ्या परिस्थितीवर मात करून आम्हाला मार्गदर्शन करणारा भारताचा तेजस्वी आत्मा अविचल आहे! या भयाण संकटांत गांधीजींच्या अस्तित्वाचा आधार किती महान होता याची तुमच्यापैकी किती जणांना कल्पना असू शकेल? त्यांनी अर्धशतकापेक्षा जास्त काळात देशाची अभूतपूर्व सेवा केली, स्वातंत्र्यकालीन देशाला मार्गदर्शन केले याची आपल्या सर्वांना जाणीव आहे.पण त्यांनी स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या पाशवी अत्याचाराच्या परिस्थितीत जी देशाची सेवा केली त्या अविस्मरणीय सेवेशी कोणतीच तुलना करता येणार नाही.आपल्या सभोवतालचे जग विनाशाकडे जात आहे,अशा परिस्थितीत एखाद्या प्रचंड खडकाप्रमाणे अगर दीपगृहाप्रमाणे सत्याचा प्रकाश दाखवीत ते निश्चल राहिले.साऱ्या गोंधळात व गजबजाटात त्यांचा शांत आवाज साऱ्यांना योग्य तो मार्ग दाखवीत होता.


चिरस्थायी विजयाकरिता प्रयत्न


गांधीजीनी आपल्या जीवनात भारताखेरीज,भारतातील गरीब व पददलित जनता यांच्याखेरीज अन्य विचार केला नाही.त्यांना मुक्त करणे नि त्यांचे जीवनमान उंचावणे हेच त्यांचे ध्येय होते.देशातील गोरगरिबांना किमान कपडे वापरता येत नाहीत म्हणून गांधीजींनी त्यांच्यासारखे साधे कपडे घालून ते वावरू लागले. देशातील असंख्य अर्धनग्र लोकांप्रमाणे गांधीजी राहू लागले.चिरस्थायी विजयासाठी त्याचा पाया सत्याच्या कठीण खडकावर उभारला पाहिजे असे गांधीजीचे स्पष्ट मत होते.त्यांनी आम्हांला चळवळीची नि राजकीय युद्धाची नवी पद्धती शिकविली,लोकशाहीचा नवा मार्ग दाखविला.राजकारणात सत्य,सद्भावना नि अहिंसा यांचा प्रभाव किती पडू शकतो हे गांधीजींनी प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले.भारतातील कोणत्याही नागरिकाचे राजकीय अगर धर्मतत्त्व कोणतेही असले तरी त्याचा मान राखून त्याच्याशी सहकार्य करण्याची अमोल शिकवण त्यांनी आम्हाला दिली.आपण सारे भारतमातेचे पाईक आहोत नि इथेच आपल्याला राहायचे आहे,

इथेच देह सोडायचा आहे!आपण संपादन केलेल्या स्वातंत्र्यात आपण समान भागीदार आहोत! भारतातील असंख्य कोटी जनतेपैकी प्रत्येकाला समान संधी मिळायला हवी,स्वतंत्र भारताला जे काही मिळेल ते समान तत्त्वाने मिळायला हवे.समाजात काही विशेष अधिकार असलेल्या हितसंबंधी लोकांसाठीच गांधीजी जगले नि त्यांनी देह ठेवला असे नाही.तेव्हा गांधीजींनी ज्या धोरणाने नि मार्गाने कार्य केले तसेच आपणास करायला हवे.


गांधीजींनी कसे जगावे नि कसे मरावे याचा मार्ग दाखविला आहे.त्यांनी आम्हाला शिकविलेला हा धडाच आहे.त्यांनी आम्हाला जो मार्ग दाखविला आहे त्या मार्गान त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करून ध्येयसिद्धीकडे जाणे हेच प्रमुख कर्तव्य आहे ! त्यांनी दाखविलेल्या मार्गाने जाऊन आम्ही जीवनात नि मृत्यूतही कर्तव्य करणे यापेक्षा आणखी मोक्ष तो कोणता?


गेल्या अनेक पिढ्यांत जे थोर हिंदू भारतीय होऊन गेले त्यापैकी गांधीजी एक थोर भारतीय होते.आपण हिंदू भारतीय आहोत याचा त्यांना अभिमान वाटत होता. त्यांना आपला भारतदेश प्राणाहून प्रिय वाटत होता. याचे कारण म्हणजे युगानुयुगे भारताने कधीही न बदलणाऱ्या सत्याची कास धरलेली होती,हे होय. ते मूलतः धार्मिक प्रवृत्तीचे होते.त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या भारताचे ते राष्ट्रपिता होते.तरी कोणत्याही धार्मिक अगर राष्ट्रीय सीमेपुरते त्यांच्या तत्त्वज्ञानाचे क्षेत्र मर्यादित नव्हते.माणसांमाणसामध्ये

धर्माधर्मांमध्ये ऐक्य घडून यावे अशा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाचे ते मानवतावादी होते.


माणसांच्या मनावर व अंतःकरणावर एवढा महान प्रभाव त्यांना कसा गाजवता आला? भावी युगातील लोक त्याला निवाडा देतील त्यांच्या संपन्न व अलौकिक व्यक्तित्वातील काही बाजूंचा त्यांच्या सान्निध्यातील लोकांनी अर्थ लावावयाचा प्रयत्न करायला हवा.

त्यांच्या जीवनातील त्यांचा महत्त्वाचा दृष्टिकोन म्हणजे सत्य. अयोग्य आणि अन्याय्य मार्गाने चांगले साध्य संपादन करता येणार नाही असे त्यांनी सत्याची भुमिका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केले.सत्याच्या या जाणिवेनेच त्यांनी आपल्या हातून चुका होताच आपण हिमालया एवढ्या चुका केल्या हे त्यांनी जाहीर केले.


अपुर्ण उर्वरित भाग पुढील लेखामध्ये…






२६/२/२६

Great man Bapuji

कोणत्याही देशाच्या इतिहासात गांधीजींना स्वतःच्या जीवनात मिळालेले पूर्णत्व कचित इतरांच्या वाट्याला आले असेल ! जणू ते लिव्हिंग लिजंडच होते !


बापूजींनी ज्या गोष्टीला स्पर्श केला तिला मौलिकता प्राप्त झाली.त्या गोष्टींचे सोने झाले ! त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांनी प्रारंभ केलेल्या कार्यात पूर्णता मिळालेली नाही असे जरी त्यांना वाटत होते तरी त्यांच्या कार्यात त्यांना भरपूर यश मिळाले.गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे फलाची अपेक्षा न करता त्यांनी कार्य केले आणि फळ त्यांच्या पाठीमागे धावत आले.त्यांचे दीर्घ जीवन,त्या जीवनात त्यांनी केलेली कष्टाची कामे, ठराविक चाकोरीच्या जीवनक्रमातूनच त्यांनी केलेले विलक्षण धाडसी प्रयोग या सर्वांकडे दृष्टी टाकल्यानंतर त्यांच्या जीवनक्रमात कुठेही कसलाही विसंवादी स्वर ऐकू येत नाही.त्यांचे विविध क्षेत्रातले कार्य म्हणजे जणू काय स्वरैक्य.त्यांचा प्रत्येक शब्द व हालचाल म्हणजे जणू स्वरमालिका ! त्यांनी ज्या जीवनक्रमाची निवड केली तो जीवनक्रम जगाच्या रूढीपेक्षा भिन्न असला तरी त्यांनी जीवनाची कला आत्मसात केल्यामुळे नकळत ते एक संपन्न कलाकार झाले ! सत्याच्या व चांगुलपणाच्या शोधानेच मानवी जीवनाला कलेचा आकार मिळत जातो.


शक्तिमान आत्मा


गांधीजी जसजसे वृद्ध होत जाऊ लागले तसतसे त्यांचे शरीर म्हणजे त्यांच्या शरीरात वास करीत असलेल्या शक्तिमान आत्म्याचे ते एक कार्यवाहू साधन आहे याचा प्रत्यय येऊ लागला.त्यांचे भाषण आपण ऐकू लागलो, त्यांच्याकडे दृष्टी टाकली की त्यांच्या शरीराचा आपणांस विसर पडू लागला,व ते जिथे स्थानापन्न झाले ते मंदिर व त्यांनी पाऊल टाकले ती पवित्र भूमी असे आपणांस वाटू लागले!


पंडित जवाहरलाल नेहरू,संकलन: ह. वि. देसाई,गांधी नावाचे महात्मा,संपादन - रॉय किणीकर,सहाय्यक - अनिल किणीकर,

डायमंड पब्लिकेशन


त्यांच्या मृत्यूतदेखील उज्वलता,विकलात्मकता होती. बापूजी ज्या प्रकारचे जीवन जगले त्या जीवनाच्या दृष्टीने विचार करता त्यांचा मृत्यू हा त्यांच्या जीवनक्रमाचा कळस आहे असे सर्वार्थाने म्हणता येईल. सामर्थ्याची पूर्ण सूत्रे हाती असतानाच त्यांना मृत्यू आला! प्रार्थनेच्या क्षणी त्यांना मृत्यू आला याचे निःसंशय त्यांना समाधान वाटले असेल! ज्या ऐक्यासाठी त्यांनी आपल्या संबंध आयुष्यात अविरत कार्य केले,सारे जीवन वाहून घेतले व आयुष्याच्या अखेरीलाही त्यांनी आपली निष्ठा सोडली नाही त्या निष्ठेच्या परिपूर्णतेसाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले ! क्षणात मृत्यू यावा असे साऱ्यांना वाटते,तसाच डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्यांना मृत्यू आला! वयोमानाने अगर आजाराने शरीर कोमेजून जाते, निस्तेज होते अगर मनाला विस्मृती येते असे काही त्यांच्या बाबतीत झाले नाही.त्यांच्या शक्तीचा परमोत्कर्ष झालेला असतानाच त्यांना मृत्यू आला.आमच्या मनात व ज्या युगात आपण राहात आहोत त्या युगाच्या मनोमनी त्यांनी जे चित्र निर्माण केले आहे ते कधीच पुसले जाणार नाही.


ते चित्र तर कधीच पुसट होणार नाही.पण गांधीजींनी त्यापेक्षाही मोठी किमया घडवून आणलेली आहे.त्यांनी आमच्या मनाचा व बुद्धीचा ठाव घेऊन त्यांना वळण लावले.त्यांच्या कर्तृत्वाच्या काळात घडलेली पिढी काळाच्या प्रवाहात गडप होईल.पण त्यांनी या पिढीला जी शिकवण दिली ती शिकवण या नंतरच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.कारण गांधीजींनी दिलेली शिकवण ही भारताच्या आत्म्याचा एक भाग होऊन बसलेली आहे.ती भारताची अस्मिता आहे!


राष्ट्रीय वारसा


बापूजींनी भारताच्या राजकीय क्षितिजावर पदार्पण केले ते आम्हाला संपन्न करण्यासाठी,आम्हाला समर्थ बनविण्यासाठी.पण त्यांनी आम्हाला जे सामर्थ्य दिले ते एक क्षणाचे,एक दिवस पुरणारे,वर्षभर टिकणारे नसून त्या सामर्थ्याने आपणास राष्ट्रीय वारसा प्राप्त झाला आहे.त्यांनी आपल्या देशासाठीच नव्हे तर जगासाठीही महान कामगिरी बजावलेली आहे.तीसुद्धा विलक्षण प्रभावाने.आता त्यांनी जी कर्तव्ये,जीवनपद्धती निश्चित केली आहे तिच्याशी प्रामाणिक राहून आपले कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.आपण आता कर्तव्यपराङ्‌मुख होता कामा नये.त्यांच्या स्मृतीची आपणास कधी विस्मृती पडता कामा नये.आपण देशकार्याच्या बाबतीत जी प्रतिज्ञा घेतलेली आहे,ज्या प्रतिज्ञेचा आपण वारंवार पुनरुच्चार करतो ती प्रतिज्ञा साकार करण्यासाठी आपण आपल्या प्रयत्नांची व आपल्या शक्तीची पराकाष्ठा करायला हवी.


अशक्त शरीराच्या या छोट्या माणसाच्या शरीरात काहीतरी पोलादासारखे होते.कोणत्याही महान शक्तीपुढे त्यांचे ते शरीर नमले नाही.त्यांच्या चेहऱ्यात देखणेपणा नसला,त्यांनी कमरेला छोटेसे वस्त्र गुंडाळलेले असले तरी त्यांच्याकडे पाहताच आपण त्यांच्या राजेशाही तेजाने दिपून जात होतो,त्यांच्यापुढे आपण विनम्र होत होतो.आणि ज्या वेळी गांधीजी कोणतीही आज्ञा करीत असत त्या वेळी ती आज्ञा मानावीच लागे.त्या बाबतीत ते कुणाचीही गय करीत नसत.त्यांचे शांत,सखोल डोळे इतरांच्या अंतःकरणात भावनात्मक प्रतिसाद निर्माण करीत.त्यांच्या भाषणाच्या वेळी एखादा प्रेक्षक असो अगर हजारो प्रेक्षक असोत इतकी छाप पडे की,प्रत्येक जण गांधीजींशी तद्रूप होई. त्यांच्या भाषणाने श्रोते मोहित होतात,समरस होतात याचे कारण गांधीजींच्या वक्तृत्वशैलीने अगर शब्दावडंबराने ते भारले जातात असे नव्हे तर त्यांची भाषा साधी सोपी असते,त्यात मुळीच पाल्हाळ नसतो, त्यात एखादासुद्धा अनावश्यक शब्द नसतो.

निर्विवाद प्रामाणिकपणा,व्यक्ती वैशिष्ट्य यांचा लोकांवर प्रभाव पडतो.त्यांचे भाषण ऐकताना या छोट्या मूर्तीत प्रचंड आंतरिक सामर्थ्य असल्याचा प्रत्यय येतो.लोकांच्यावर प्रभाव पाडणे व प्रतिस्पर्थ्यांना जिंकणे ही गांधीजीची शक्ती विलक्षण आहेगांधीजी जितके नम्र होते तितकेच तत्त्वाचा प्रश्न आला तर कठोर व कणखर होते.


जितके मधुभाषी तितकेच तत्त्वाच्या बाबतीत कधी नमते न घेणारे,तितकेच प्रत्येक बाबतीत प्रामाणिक.त्यांचे डोळे दिसायला शांत पण त्या नेत्रांत निश्चयाची व शक्तीची ज्योत सतत तेवणारी!त्यांचा आवाज शांत स्वरुपाचा,कधी न चढणारा.लक्षावधी लोकांच्या गोंगाटात तो आवाज साऱ्यांना ऐकू येणारा! त्यांच्या शांत व मधुर आवाजात कुठे तरी पोलादाचा रस दडवला असावा! त्यांच्या आवाजात सभ्यतेचे व विनम्रतेचे मिश्रण झालेले होते.

तरीही त्या आवाजात भीती वाटावी इतकी गंभीरता सामावलेली होती.प्रत्येक शब्दात अर्थपूर्णता व काटेकोर आस्थेवाईकपणा.पण त्यांच्या प्रत्येक शांततेच्या व मैत्रीच्या शब्दांत ओतप्रोत सामर्थ्य सामावलेले होते व त्या प्रत्येक शब्दांत अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या निश्चयाची नि कृतीची शक्ती प्रतीत होत होती.


गांधीजी : एक कोडे


गांधीजी हे एक कोडे आहे,गूढ प्रश्न आहे.ती ब्रिटिश सरकारपुढे एक समस्या होती असे नव्हे तर त्यांचे स्वकीय नि सहकारी यांच्यापुढेही ती एक समस्याच होती.भारताखेरीज अन्य देशांत गांधीर्जीसारख्या धार्मिक द्रष्ट्याला काही स्थान मिळाले नसते.पण भारत अजूनही अशा धर्मात्म्याची भाषा समजू शकतो. म्हणूनच गांधीजी पापपुण्याच्या,सत्याच्या नि अहिंसेच्या गोष्टी बोलू शकले.

भारतीय पौराणिक काळात अशा संन्यस्त महापुरुषांच्या असंख्य गोष्टी असून या महापुरुषांनी आपल्या त्यागी जीवनाने नि तपः सामर्थ्याचा पर्वत निर्माण करून देवादिकांनाही हालविले आहे!आध्यात्मिक हानीच्या जलसंचयातून निर्माण झालेल्या गांधीजींच्या विलक्षण सामर्थ्याचा प्रत्यय येताच मला नेहमी पुराणकालातील महापुरुषांच्या चमत्कारांची आठवण येते.गांधीजी हे या जगातले साधेसुधे नाणे नव्हते,हे वेगळ्या पद्धतीचे,धातूचे,नाणे होते.त्यांच्या नेत्रातून नेहमी कुणीतरी 'अज्ञात' आमच्याकडे टवकारून पाहत होता !


अबाधित मोहकपणा,गूढ सामर्थ्य यांचा लोकमतावर प्रभाव पाडणारे गांधीजी लोकविलक्षण होते.गांधीजींचे लेखन अगर त्यांची सुभाषिते यावरूनही या लेखनाच्या मागे असणाऱ्या गांधींच्या स्वभावाची अगर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची काही कल्पना येत नाही. गांधीजींनी देशाची जी सेवा केली आहे,ती किती अभूतपूर्व! त्यांनी आपल्या देशबांधवांच्या अंतःकरणात धैर्य व पौरुषत्त्व निर्माण केले.त्यांनी जनतेला अहिंसा व सहनशीलतेची शिकवण दिली.त्यांनी लोकांना ध्येयासाठी आनंदाने त्यागाची परिसीमा गाठण्याची शिकवण दिली व त्यांच्यांत अभिमान निर्माण केला.धैर्य हा चारित्र्याचा प्रबल पाया आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यांनी एकदा असे उद्‌गार काढले होते,"धैर्याखेरीज जीवनात नैतिकता, धर्म व प्रेम यांना स्थान नाही. भीतीच्या भावनेतून सत्याचा अगर प्रेमाचा मार्ग दिसत नाही!" हिंसेपेक्षाही भ्याडपणा तिरस्करणीय आहे असे त्यांनी एकदा आम्हाला बजावले होते.माणसाला काही ध्येय गाठायचे असले तर शिस्त ही त्या कार्याची प्रतिज्ञा व हमी आहे! त्याग,शिस्त अगर मनोनिग्रह यांखेरीज मानवजीवनात अन्य मुक्ती नाही,शिस्तीखेरीज निव्वळ त्याग निरर्थक आहे असे गांधीजींचे स्पष्ट मत होते.


पुनरुज्जीवनाचा हेतू


गांधीजींशी ज्यांची प्रत्यक्ष ओळख नव्हती व ज्यांनी त्यांचे फक्त लिखाणच वाचलेले होते त्यांना गांधीजी म्हणजे एखाद्या धर्मोपदेशकासारखे कडक धोरणाचे, लांबट चेहऱ्याचे,

धर्मोपदेशकाप्रमाणे काळा झगा घालून फिरणारे असावेत असे वाटणे साहजिक आहे.पण गांधीजींच्या लेखनावरून त्यांच्या स्वभावाची पारख करणे अन्यायाचे ठरेल,गांधीजींनी जे लेखन केले त्यापेक्षाही ते फार मोठे होते.त्यांनी केलेल्या लिखाणावर टीका करून त्यांच्या मोठेपणाचे मूल्यमापन करता येणार नाही.त्यांचे हास्य जितके आनंददायक वाटत असे तितकेच ते परिणामकारक होते व त्या हास्यातून मनाच्या मोकळेपणाचा प्रत्यय येत असे.

त्यांच्या स्वभावात बालकाचा निर्व्याजपणा दिसत असे.मुलाच्या स्वभावातल्या मोहकपणाचाही त्यांच्या स्वभावात प्रत्यय येत असे.त्यांनी एखाद्या ठिकाणी प्रवेश केला की त्यांच्या पदार्पणासमवेत स्वच्छ वाऱ्याची झुळूक येऊन तिथले वातावरण तेजाळून टाकीत असे.गांधीजी नैसर्गिक सौंदर्याची वाखाणणी करीत असत तरी मानवनिर्मित सौंदर्याविषयी अगर कलेविषयी त्यांना फारशी कदर,आस्था नव्हती.पण त्यांनी आपल्या जीवनपद्धतीत आपल्या कल्पनेप्रमाणे जीवनसौंदर्य निर्माण केले होते.त्यांच्या प्रत्येक वागणुकीत अर्थ, सौंदर्य होते व कृत्रिमतेचा पूर्ण अभाव होता.


राष्ट्रीय चळवळीतही गांधीजींनी धार्मिकतेवर व आध्यात्मिकतेवर भर दिला.पण त्यांच्या धर्माच्या कल्पनेत ठोकळेबाजपणा अगर हटवादीपणा नव्हता. त्यांची जीवनाकडे पाहायची दृष्टी धार्मिकतेवर आधारलेली होती व त्यांच्या चळवळीवरही धार्मिक भावनेचा प्रभाव होता.तसेच सर्वसाधारण जनतेच्या हितसंबंधाच्या दृष्टीने गांधीजींच्या धोरणात पुनरुज्जीवनाचाच हेतू प्रामुख्याने सामावलेला होता. राजकारणात हिंदूंची अगर मुसलमानांचीही बाजू मांडताना धार्मिक प्रवृत्तीवर जो भर दिला जात होता त्याचे मला फार दुःख होत होते.हे धोरण मला मुळीच आवडत नव्हते.

मौलवी,मौलाना व स्वामी लोक आपल्या भाषणांत जाहीरपणाने ज्या घोषणा करीत असत त्या मला अत्यंत दुर्दैवी वाटत होत्या.

त्यांचे इतिहासाचे, समाजकारणाचे व अर्थशास्त्राचे ज्ञान मला अगदी चुकीचे वाटत होते आणि प्रत्येक गोष्टीला जे धार्मिक वळण दिले जात होते,त्यामुळे स्पष्ट विचारसरणीला पायबंद पडतो असे मला वाटत होते.गांधीजींचे काही विचारही मला विसंवादी वाटत असत.ते रामराज्याचा सुवर्ण युग म्हणून उल्लेख करीत असत व ते युग आपल्याला देशात निर्माण करावयाचे आहे असा वारंवार उल्लेख करीत असत.पण या बाबतीत गांधीजींशी वादविवाद करायला मी असमर्थ होतो.मी माझ्या मनाचे एवढेच समाधान करून घेत होतो की, रामराज्य हा शब्द लोकप्रिय आहे,लोकांना कळतो म्हणून गांधीजी त्या शब्दाचा उल्लेख करतात.कोणतेही विचार लोकांच्या अंतःकरणापर्यंत नेऊन पोहोचवायची त्यांना चांगली कला साधलेली होती.


गांधीजींचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे अत्यंत कठीण होते. सर्वसाधारण आधुनिक माणसाला त्यांची भाषाही समजत नसे.गांधीजींना आम्ही ओळखू शकलो असे आम्हाला वाटत असे.ते महान नेते आहेत या जाणिवेने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या हाती काही काळापर्यंत तरी कोरा चेक दिला होता.


नैतिक अधिष्ठानावर जोर


राजकारणात व इतर क्षेत्रांतही आम्हा सर्वांवर गांधीजींच्या विचारसरणीचा प्रभाव पडलेला होता. धर्मांच्या क्षेत्रातही आम्ही या प्रभावापासून फारसे अलिप्त नव्हतो.या विचारसरणीचा आमच्यावर प्रत्यक्ष प्रभाव पडत नव्हता तरी अप्रत्यक्षपणे प्रभाव पडला. आमच्या विचारसरणीच्या संरक्षणाचे किल्ले ढासळून पडत असत.धर्माचे बाह्य मार्ग,पद्धती मला मुळीच मान्य नव्हत्या व धर्माच्या नावाखाली धर्मवीरांनी जनतेची जी पिळवणूक अगर बनवाबनवी चालविली होती त्याचा मला मनापासून तिटकारा वाटत होता.पण आमच्या चळवळीला नि सत्याग्रहाला तेच नैतिक अधिष्ठान होते. अहिंसेच्या धोरणास मात्र मी कधीच पूर्ण मान्यता दिली नाही.त्या धोरणाचे मला जरासे आकर्षण वाटले. भारतातील परिस्थिती,आमच्या रूढी नि त्यांची पार्श्वभूमी यांचा विचार करता सध्याच्या परिस्थितीत हे धोरण ठीक आहे असे मला वाटते.पण ते धोरण कायमचे असावे असे मला कधीच वाटले नाही.धर्माचा संकुचित अर्थ न करता राजकारणात धार्मिक मूल्यांना स्थान देण्याची कल्पना मला बरी वाटली.योग्य साधनांनी योग्य साध्य गाठणे काही वाईट नाही.हे धोरण मला नैतिक तत्त्वाचे वाटते इतकेच नव्हे तर या धोरणात व्यवहारी राजकारणाचे धोरण सामावले आहे असेही वाटते.कारण साधने योग्य नसली तर आपण मनात बाळगलेल्या साध्यात आपल्याला अपयश मिळते.अनेक समस्या नि अडचणी उपस्थित होतात.


गांधीजी हे मूलतः धार्मिक प्रवृत्तीचे गृहस्थ होते. ते अंतःकरणाने हिंदू होते,त्यांच्या अंतःकरणाच्या कोपऱ्यातही हिंदुत्व होते.पण त्यांच्या धर्माच्या कल्पनेत मुळीच ठोकळेबाजपणा नव्हता.धार्मिक विधींवर त्यांचा विश्वास नव्हता.गांधीजींची धर्माची कल्पना म्हणजे नैतिक नियम,सत्याचे नि प्रेमाचे नियम ! सत्य नि अहिंसा हे शब्द गांधींजी एकाच अर्थाने वापरीत असत. हिंदुधर्माचे मूलभूत तत्त्वज्ञान आपणास अवगत आहे असा त्यांचा दावा होता.तेव्हा ज्या धर्मग्रंथात त्यांच्या ध्येयवादी धर्मतत्त्वाशी न जुळणारे धर्मतत्त्व नसेल त्या धर्मग्रंथांत कुणी तरी आगंतुकपणाने प्रक्षिप्त मजकूर घुसडलेला आहे असे त्यांचे मत होते. "नैतिक पातळीवरून ज्या धार्मिक रूढीचे मी समर्थन करू शकत नाही अगर ज्या रूढीचे मला आकलन होऊ शकत नाही त्या रूढींचा नि रीतिरिवाजांचा मी गुलाम होऊ इच्छित नाही," असे गांधीजींनी एकदा जाहीर केले होते.


स्वतंत्र धोरण


आपल्या कल्पनेप्रमाणे व तात्त्विक भूमिकेप्रमाणे मार्ग पत्करण्याचे गांधीजींचे स्वतंत्र धोरण होते.या धोरणानेच ते आपल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाला मुरड घालीत असत.त्या तत्त्वज्ञानाचा विकास करीत असत.पण त्यांनी जी नैतिक मूल्ये निश्चित केली त्या अनुरोधानेच ते जीवनविषयक तत्त्वज्ञानाकडे पाहात असत.त्यांचे ते तत्त्वज्ञान योग्य होते की अयोग्य होते हा वादाचा मुद्दा असू शकेल पण हे मूलभूत मोजमाप ते प्रत्येक गोष्टीस व स्वतःलाही लावीत असत.राजकारणात व इतर बाबतीतही सर्वसाधारण माणसाला ही गोष्ट अडचणीची भासू लागली.त्यामुळेही गैरसमजही निर्माण झाला. बदलत्या परिस्थितीशी समन्वय साधण्याचा गांधीजींचा सतत प्रयत्न चालू होता.कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीशी मिळते न घेता त्यांनी आपला सरळ मार्ग बदलण्याचा कर्धीही प्रयत्न केला नाही.त्यांनी ज्या सुधारणा सुचविल्या,जो उपदेश केला त्याची त्यांनी सरळ आपल्या जीवनात अंमलबजावणी केली.त्यांनी कोणत्याही सुधारणेची सुरुवात स्वतःपासून सुरू केली. आपल्या हातांवर हातमोजे घट्ट बसावे त्याचप्रमाणे गांधीजीचे शब्द नि कृती एकमेकात सामावून जात असत.म्हणूनच काहीही घडले तरी त्यांनी आपल्या मूलभूत धोरणातील प्रामाणिकपणा व एकात्मता कधी सोडली नाही.त्यामुळेच त्यांचे कार्य व जीवन यांचा पूर्ण मिलाफ झालेला दिसून येतो.त्यामुळे त्यांच्या जीवनात पराभवाचे ज्या ज्या वेळी प्रसंग आले त्या वेळीही त्यांचे व्यक्तिमत्त्व तेजाळल्याचा आपल्याला प्रत्यय आला.

त्यांच्या भारतासंबंधी कोणत्या कल्पना होत्या, कोणत्या ध्येयवादी कल्पनांनी त्यांना भारत घडवायचा होता.? 


अपुर्ण शिल्लक भाग पुढील भागात..

२४/२/२६

नारायणमामा / Narayan Mama

नारायणा,अरे,पाट घेऊन बसायचंस,जमिनीवर काय बसलास ?" ह्या माईंच्या सूचनेवर "माईसाहेब,जमीन नुक्तीच गाईच्या शेणाने सारवलेली दिसती आहे.त्या शेणाची ऊब अजूनही आहे." ह्या नारायणमामाच्या उत्तरावर सगळेच हसले.त्यातही बच्चे कंपनी जास्तच.आज मंदा,मुक्ता गप्पांचा मनसोक्त आनंद घेत होत्या. कारण यशाने त्यांना तिथे बसायची परवानगी दिली होती त्यामुळे ना आता मंदाला सतत यशाच्या नजरेचा धाक होता ना मुक्ताला नजर चोरण्याची गरज.


तासभर गप्पा झाल्यावर माई म्हणाल्या,"अरे,तुम्ही रात्रभराचा प्रवास करून आला आहात.नारायण,तू आणि मुलं मागे आडावर जाऊन दात घासा आणि आंघोळी करा.बंब चांगला रसरसतोय,मी नुक्तीच पाहून आलेय.यशा विसणाला आडाचं पाणी शेंदून देईल.शकू इथेच स्वैपाकघरातल्या मोरीत करील आंघोळ."


नाही तरी मुलांना मागच्या अंगणात बांधलेल्या लक्ष्मी-पार्वती बघायच्याच होत्या.त्यामुळे माईआत्यांची सूचना ऐकल्यावर सगळे मागच्या अंगणाकडे धावायला लागले.मामींनी त्यांना थांबवून टॉवेल,ब्रश आणि टूथपेस्ट घ्यायची आठवण केल्यावर सगळे थांबले.बॅगा उघडायला लागले.त्यांच्या बरोबरीने यशा-मंदा-मुक्ता मागेपुढे करत होते.आत्तापर्यंत पाव्हणे आल्याच्या आनंदात त्यांचं सामानाकडे लक्षच नव्हतं.पण आता त्यांचं लक्ष मामांनी आणलेल्या बॅगांकडे गेलं.


उन्हाळ्याच्या सुट्टीत आड आटला,गावात पाण्याचा टँकर सुरू झाला की,त्यांचा मुक्काम ठाण्याला अशोकभाऊकडे हले.त्यावेळी त्यांचं अवाढव्य सामान काळ्या रंगाच्या,वरून रिबिट मारलेल्या अवजड लोखंडी पेट्यांत असे.त्या पेट्यांमध्ये काय काय असे ? तर - भाजणी असे,सातूचं पीठ असे,कपडेही असत. बापूंच्या बैठकीच्या सतरंजीत हे सगळं शंकर न्हावी आणि बाबू तांगेवाला ह्यांच्या मदतीने घट्ट बांधून त्याची वळकटी केलेली असे.

नारायणमामाचं सामान कसं आटोपशीर होतं.शिवाय ते रंगीत बॅगांमध्ये भरलेलं होतं. त्या बॅगा रबरी होत्या की प्लॅस्टिकच्या कोण जाणे! आणखी विशेष म्हणजे त्यांना अंगचीच कुलपं होती. सगळंच नवल! येताना ते सगळे रिझर्व्हेशन करून आले होते म्हणे.म्हणजे एकदा का तुम्ही रिझर्व्हेशन केलं की, तुमच्या जागेवर कुणीच बसत नाही.रेशनच्या रांगेत आपला दगड ठेवून जागा अडवतात तसं.सगळं अजबच की!


उन्हाळ्याच्या सुट्टीत ठाण्याला जाताना मोठी सर्कसच असे.डायरेक्ट ठाण्याला गाडी नसायची.त्यामुळे पहिल्यांदा मनमाडला जाऊन तिथून ठाण्याची गाडी पकडावी लागे.

मनमाडपर्यंत शंकर पोहचवायला यायचा. हमाल दरवाजातून सामान आत नेई.बापू आणि शंकर हे दोघे यशा-मंदा-मुक्ताला खिडकीतून आत ढकलत नि आतले प्रवासी त्यांना बाहेर ढकलत.मधल्यामध्ये मुलांचं चांगलंच मर्दन होई.


मामांचं हे आटोपशीर सामान मुलं नवलाईने पाहत होती.मामांच्या मुलांनी बॅगांमधून आपली टूथपेस्ट,

ब्रश, टर्किश टॉवेल बाहेर काढले.साबणाची वडी बाहेर पडताच सगळी खोली सुगंधित झाली.ह्या सगळ्या गोष्टी जवळून पहिल्यांदाच पाहत असल्याने यशा आणि मुक्ता हजार प्रश्न विचारत होते.त्यात नवल आणि कौतुक होतं पण असूया किंवा लोभ नव्हता.मुक्ताने तर हळूच टर्किश टॉवेल वरून हात फिरवून पाहिला आणि यशाने साबणाचा वास नाकात भरून घेतला.


आंघोळीच्या वेळी माधुरीने ही गंमत आपल्या वडिलांना सांगितली.तेव्हा त्यांना जरा अवघडल्यासारखं झालं.


नारायणमामांनी यशाला विचारलं,"यशा,आवडला का रे तुम्हाला हा टॉवेल ?पुढच्या वेळी येताना तुम्हा तिघांसाठी असे तीन टर्किश टॉवेल घेऊन येईन आणि तिघांसाठी टूथपेस्ट नि ब्रशसुद्धा."


धाकट्या बहिणी काही बोलायच्या आतच यशा म्हणाला,"मामा, इथे गावात पाणी खूपच कमी असतं. एवढे मोठाले टॉवेल धुवायला पाणीपण खूप लागेल ना. त्यामुळे आम्ही वापरतो ते पंचे सोयीचे आहेत.आमच्या गुरुजींनी आम्हाला कोळशाच्या राखंडीत कापूर अन् तुरटी घालून त्याच दतमंजन करायला शिकवलं आहे. बोटाने दात घासले की,मागूनपुढून दात स्वच्छ होतात असं गुरुजी म्हणतात.तुम्हाला जाताना डबीभर देऊ का मी तयार केलेलं मंजन ? आवडेल तुम्हाला."मामाला आपल्या भाच्याच्या बोलण्याचं कौतुक वाटलं.अजितने विचारलं, "यशादादा, इकडे थंडी खूप आहे ना? गाल-ओठ फुटल्यावर


तुम्ही काय लावता ?"


मुक्ता पटकन म्हणाली, "अरे,आमच्याकडे कोकमाचे खडे किंवा तेल मिळतं.तेच आम्ही हातापायांना लावतो."


"कोकमामुळे अंग फुटत नाही आणि नरमपण राहतं." मंदाने पुष्टी जोडली


संध्याकाळी यशा,मंदा,मुक्ता ह्यांचं पाहुण्यांना घेऊन गावाबाहेरच्या तळ्यावर फिरायला जायचं ठरलं.गावात पाण्याचा दुष्काळ असल्याने गावच्या नगरशेटनी खूप वर्षांपूर्वी गावाच्या सोयीसाठी हे तळं बांधलं होतं.त्या तळ्याचा गावाला उपयोगदेखील होत असे.मे महिन्यात तळं कोरडंठाक पडेपर्यंत घरोघरीच्या विहिरींना-आडांना पाणी असे.दूरदृष्टी ठेवून शेटजींच्या कुटुंबीयांनी तळ्याच्या सभोवती चिंच,कडुलिंब,पिंपळ अशी झाडं लावली होती.अर्थात जंगली झुडपं अन् बाभळीचीही झाडं त्या परिसरात खूप होती.

गावच्या प्रेक्षणीय स्थळांपैकी गावाबाहेरचं हे तळं एक होतं.


घरून निघाल्यापासून गप्पांना नुसता ऊत आलेला होता.अजित यशाला क्रिकेटच्या आणि त्याच्या शाळेच्या गमती सांगत होता.मंदा आणि मुक्ता माधुरीशी हितगुज करत होत्या.मोन्या कधी ह्यांच्यात तर कधी त्यांच्यात शिरण्याचा प्रयत्न करत होता.मामा आणि मामी सगळ्यांच्या मागून गप्पा मारत रमतगमत येत होते. मोकळी जागा बघून सगळे बसले.अजित आणि यशा तळ्यात चपटे दगड फेकून गोल चाकोऱ्या काढायला लागले.


'आजूबाजूला बाभळीचे मोठमोठे काटे आहेत रे...' मामांनी सगळ्यांना सावध केलं.गावातला प्रसिद्ध भेळभत्ता बरोबर आणला होता.तो खाऊन झाल्यावर पुड्याचा कागद बघून मामांना त्यांचं बालपण आठवलं."शकू,आम्ही लहानपणी कशी भिरभिरं बनवायचो,ते दाखवतो हं!"मामांनी तो भेळीचा कागद,बाभळीचा काटा आणि तिथेच पडलेली बकरीची लेंडी घेऊन बघता बघता एक भन्नाट भिरभिरं बनवलं अन् मोन्याला खेळायला दिलं.


"अजित,आमच्या लहानपणी तुमच्यासारखे क्रिकेट वगैरे खर्चिक खेळ नव्हते.


सगळे खेळ बिनखर्चाचे !"


घरी येता येता मामा यशाला म्हणाले,"यशवंतराव,उद्या सकाळी आपण सगळेच कोटमगावला देवीच्या दर्शनाला जाऊ.माई-बापूंनापण घेऊन जाऊ.सकाळी नऊच्या सुमारास येतील असे दोन तांगे तुम्ही आजच सांगून ठेवा.आणि हो,सकाळी लवकर उठून बेकरीतून पावपण घेऊन या म्हणजे माईला एवढ्या सगळ्यांचा नास्ता करण्यात वेळ घालवायला नको.तांगा सांगायला जाशील तेव्हा बाबूला उद्या रात्रीच्या पुण्याच्या गाडीला आम्हाला सोडायलाही सांग."


"म्हणजे काय,तुम्ही लगेच जाणार?" यशा-मंदा-मुक्ताने चकित होऊन एकसाथ विचारलं,"काय करणार बाबा! पापी पेट का सवाल है.उद्या गेलो नाही तर मला नोकरीवरून काढून टाकतील.मग इथे तुमच्या गावात येऊन मला भिरभिरी बनवून विकावी लागतील."


मामांच्या ह्या बोलण्यावर सारेच हसू लागले.


अण्णांच्या बेकरीतून पाव आणणं हा यशा आणि त्याच्या दोन्ही बहिणींसाठी सटीसहामासी येणारा योग होता.घरचं धान्य होतं.गाईचं दूध-तूप होतं.त्यामुळे खाण्या-पिण्याची ददात नव्हती.पण रोख पैसा खर्च करून काही खायचं आणणं त्याकाळी परवडत नव्हतं आणि तशी पद्धतही नव्हती.बापूंच्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये वरखर्च करताना महिन्याच्या शेवटी खर्चाची दोन्ही टोकं मिळवणं नेहमीच अडचणीचं असे.


माई त्यांना म्हणे,"सकाळी सकाळी हे बाहेरचे पाव आणून खाण्यापेक्षा मी तुम्हाला छानसे गरम गरम गाकर करून देते.दोन दोन हारोळ्या खाल्ल्या की,पोटातपण कसं दमदमीत असतं.नाही तर बाजरीची भाकरी आणि दूध आहेच."अण्णांच्या बेकरीतून उद्या पाव आणायचा हे आदल्या दिवशीच बापू मुलांना सांगत.मुलंही सकाळ कधी होते ह्याची वाट पाहत झोपत.झुंजूमुंजू झाल्यावर यशा आणि मंदा-मुक्ता पैकी जी कुणी जागी असेल ती थंडीचीच घरातून निघत.गल्लीतली कुत्री मागे लागत पण त्यांना दगड मारत,हाडहुड करत अण्णांच्या बेकरीपर्यंत पोहचत.बहुदा अजून अण्णांची बेकरी उघडलेली नसे.दुकानाबाहेरच्या थंडगार फरशीवर कोपऱ्यात ही भावंडं एकमेकांना चिकटून बसत.थंडीचा कडाका असला तरी दुकान उघडेस्तोवर तिथेच बसत. घरी जात नसत.न जाणो घरी जाऊन परत येऊ म्हटलं आणि बापूंनी बेत बदलला तर ! तर काय करायचं ?


बेकरीवाल्या अण्णांचं खरं नाव काय होतं कुणास ठाऊक. पण ते सगळ्यांना 'अण्णा' म्हणत म्हणून गावाने त्यांचंच नाव 'अण्णा' ठेवलं होतं.धुक्यात लांबून तपकिरी टोपी आणि पिवळसर कोट घातलेली आकृती दिसली की,मुलं खूश होत.यशाला पाहून अण्णा म्हणत, "यशाअण्णा,तुम्ही ताईसाहेबांना घेऊन थंडीचं असं बसलेलं पाहून माझ्या पोटात तुटत.आज सकाळी येणार हे कालच सांगितलं असतं तर लवकर आलो असतो. नाही तरी रात्रभर जागाच असतो."


मुलांना वाट बघायला लागली म्हणून अण्णा त्यांना पावांच्या बरोबर एकेक नानखटाईपण देत.अण्णांचं गावातल्या मुलांवर विशेष प्रेम होतं.बहुदा त्यांना स्वतःचं मूल नव्हतं.नानखटाई खात खात मुलं पाव घेऊन खुशीत घरी येत.यशा आणि मंदा घरी येईपर्यंत घरात उठाउठ झाली होती.मामा अंथरुणावर बसूनच माई-बापूंशी गप्पा मारत होते.माई-मामींच्या आंघोळी झाल्या होत्या.अजित-माधुरी आणि मोन्याने कालच त्यांच्या माईआत्याला बजावलं होतं की,'दामू दूध काढायला आला की,आम्हाला उठव,आम्हाला दूध काढताना पाहायचंय.'


त्याप्रमाणे ते तिघेही परसदारी गाईंचं दूध कसं काढतात त्याची गंमत बघायला गेले होते.माईंनी चहा ठेवला. मुक्ताने तिच्या वाटचा पाव घेऊन नेहमीप्रमाणे पावाची मधली बाजू कोरून पावाची चूल करायला घेतली.


साडेनवाच्या आधीच दोन्ही तांगे आले.आंघोळी, नास्ता आटोपून सगळे तयारच होते.माई,बापू,मामा,मामी एका तांग्यात आणि मुलं सगळी बाबूच्या तांग्यात बसली. घरातून निघाल्यापासून यशाची रनिंग कामेंट्री चालू होती.सुरुवातीलाच बालाजीचं देऊळ,सराफ कट्टा, काळ्या मारुतीचं मंदिर आणि बच्चू हलवायाचं मिठाईचं दुकान...सगळ्यांची माहिती सांगेस्तोवर गाव संपलं. गावाबाहेर आल्यावर यशाने त्यांना स्टेशनकडे जाणारा रस्ता दाखवला.


मुक्ता म्हणाली,"भावड्या आता शेटजीचा बाग मी दाखवणार हं!"


देवळातला पुजारी माईंना ओळखत होता.त्याने माईंना आणि शकुमामींना गाभाऱ्यात जाऊन देवीची ओटी भरू दिली.

नारायणमामांनी नारळ वाढवला.


माईंनी सांगितलं, "हे जागृत देवस्थान आहे.कुणाला काय मागायचं असेल तर ते जगदंबेकडे मागा!"


सगळी मुलं डोळे मिटून काहीतरी पुटपुटली.घरी येता येताच मुलं आणि मामा-मामी खरेदीसाठी बाहेर पडले. गाव पैठणीसाठी प्रसिद्ध असल्याने मामीसाठी पैठणी, महेशकडून पेढे आणि प्रकाश भत्तेवाल्याकडून भेळभत्ता अशी मोठी खरेदी झाली.मामांनी यशा आणि मंदा-मुक्तासाठीदेखील पेढे-भेळभत्ता घेतला होता.


दुपारी जेवणं झाली.थोड्यावेळ पाठीची कळ मोडून मामा-मामींनी सामानाचं पॅकिंग सुरू केलं.यशाला उगाचच फार उदास वाटू लागलं."नारायणा,येत जा रे मधूनमधून.अगदी दिवाळी ते दिवाळी नको करायला ! आणि येताना शकूला अन् मुलांनाही आणत जा.मुलं बघ कालपासून कशी खूश आहेत!"नोकरीच्या व्यापात असं जमणं फार सोपं नाही हे माहीत असूनही मामांनी बळेच होकार भरला. संध्याकाळचा चहा झाला.बाबूचा तांगा बाहेर येऊन उभा राहिला.बाबूने सामान समोर त्याच्या पायाजवळच्या जागेत आणि पायट्यावर व्यवस्थित बसवलं.


मामांची मुलं तर तांग्यात जाऊन बसलीसुद्धा.मामी आणि बापू बाहेर ओट्यावर उभे राहून गप्पा मारत होते. माई सुखरूप प्रवासासाठी देवाजवळ दिवा लावत असताना मामा देवघरात आले.माईना नमस्कार करून 'मुलांसाठी अन् अडल्या-पडल्याला राहू दे' म्हणत हजार रुपये माईंच्या हातात ठेवायला लागले तर माईंनी शॉक बसल्यासारखा हात मागे घेतला.


"नारायणा ! तू खूप मोठ्ठा झाला आहेस मलापण तुझा अभिमानच आहे. पण मला काही कमी नाही आणि काही प्रसंग पडलाच तर तुम्ही आहातच. एवढा डोंगराएवढा भाऊ परमेश्वराने दिला आहे.मला काय कमी आहे? आणि आज येताना तू मुलांसाठी खाऊ आणलेलाच आहेस."


मामांना मनोमन खात्री होती की,माई कधीही त्यांच्याकडे पैसे मागणार नाही. मामांचा गळा गहिवरून आला. "माई! तुला काय गं कमी पडणार ! देवाने सोन्यासारखी मुलं दिली आहेत. लहानपणी मोठी बहीण म्हणून आमच्यावर जसे संस्कार केलेस तसेच मुलांवर केलेस हे पाहून खूप बरं वाटलं. काल तुझ्या यशाला पुढच्या वेळी येताना टॉवेल,टूथपेस्ट आणू का म्हटलं तर ज्या तडफेने त्याने नकार दिला तेपण समोरच्याचं मन न दुखवता, तेव्हाच मनात विचार आला, ह्या घराचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल आहे. सध्या गरिबी आहे पण दारिद्र्य अजिबात नाही."


दोघा बहिणभावांच्या डोळ्यांतून अखंड गंगा-यमुना वाहायला लागल्या.बाहेरून बापूंनी दोनदा हाका मारल्या,"चला! गाडीची वेळ झालीय..."


तेव्हा कुठे दोघेही डोळे पुसत बाहेर आले.निरोपाचे शब्द उच्चारले गेले.तांगा निघाला.नजरेआड झाला.माई परत देवघरात येऊन देवासमोर बसल्या.मघाशी त्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहून बापूही समजूतदारपणे ओट्यावरच थांबले होते.तिन्ही मुलं कशीनुशी झाली.देवघरात जाऊन माईंना बिलगून बसली.


"माई,तू का बरं रडत होतीस?" समजूतदार मंदाने विचारलं.

तिघांनाही जवळ ओढत माई म्हणाल्या, "आनंदाश्रू होते ते! मुलांचं कौतुक ऐकलं की,प्रत्येक आईचं असंच होतं."


यशाला माई काय बोलल्या त्याचा अर्थ कळला नाही पण त्यांचा उबदार स्पर्श त्याला खूप सुखद आणि भारी वाटला.


समाप्त…!!