अलौकिक कामगिरी
गांधीजींनी गेल्या अर्धशतकात भारतीय स्वातंत्र्यासाठी जशी अलौकिक कामगिरी बजावली त्याचप्रमाणे जागतिक शांततेच्या दृष्टीनेही महत्त्वाची कामगिरी पार पाडली.त्यांनी आम्हाला अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची शिकवण दिली.पण दुष्ट प्रवृत्तीमुळे नमते घेणारे ते निष्क्रिय तत्त्वज्ञान नव्हते.
आंतरराष्ट्रीय मतभेदामध्येसुद्धा शांततेने निवाडा देणारे ते क्रियाशील तत्त्वज्ञान होते. जगातील कोणत्याही सामर्थ्यवान सैन्यापेक्षा, युद्धसाहित्यापेक्षा मानवाचे मानसिक सामर्थ्य मोठे असते हे त्यांनी आम्हाला दाखवून दिले.त्यांनी राजकीय चळवळीला नैतिक मूल्यांची जोड दिली व साध्य नि साधने भिन्न मानता येणार नाहीत;कारण शेवटी साधनांनीच साध्य नियंत्रित केले जाते असा त्यांनी आदेश दिला.
मनुष्यस्वभावाला असलेल्या मर्यादांकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही त्याचप्रमाणे मुत्सद्द्यांपुढे ज्या समस्या आहेत त्यांकडेही आपण कानाडोळा करू शकत नाही.आज जगाची जी रचना आहे तिचा विचार करता जगात युद्धाचा मुळीच संभव नाही असेही आपण म्हणू शकत नाही;पण दिवसेंदिवस अशी खात्री होत चालली आहे की,नैतिक कायद्याचे श्रेष्ठत्व आपण मानले नाही तर आपल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संबंधात कायमची शांतता नांदणार नाही.जोपर्यंत योग्य साधनांनी योग्य साध्ये निर्माण होणार नाहीत,
तोपर्यंत यातून नव्या अनिष्ट गोष्टी निर्माण होतील,गांधीजींच्या संदेशाचे हे मूल सूत्र होते.जीवनात योग्य रीतीने पाऊल टाकण्यासाठी मानवसमाजाने गांधीजींच्या संदेशाचा अर्थ समजावून घ्यायला हवा.
कोणत्याही प्रकारची भीती,भय न बाळगण्याचा त्यांनी आम्हाला आदेश दिला.भीतीची भावना अत्यंत नीच आहे इतकेच नव्हे तर भीतीच्या पोटी द्वेष व हिंसेचा जन्म होतो.आपल्या अनेक लोकांना या शिकवणीची विस्मृती पडली नि भीतीने आम्हाला ग्रासून टाकले.पण भीती लांबच्या शत्रूची नव्हती तर एकमेकांची आपल्याला भीती वाटत होती. त्यातूनच अनिष्ट कृत्यांचा प्रादुर्भाव झाला.
गांधीजींनी आम्हाला सत्यावर कसे प्रेम करावे व वैयक्तिक व्यवहारातच नव्हे तर सार्वजनिक राष्ट्राराष्ट्रांमधील व्यवहारातही सरळ धोरणाने कसे वागावे हेही शिकविले.त्यांनी आम्हाला माणसाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व समजावून दिले,द्वेषातून नि हिंसेतून द्वेषाचा,हिंसेचा नि विध्वंसाचाच उदय होतो हे त्यांनी शिकविले.
त्यांनी आम्हाला निर्भयतेचा,ऐक्याचा, सहिष्णुतेचा नि शांततेचा मार्ग दाखविला.
भारताने आज जगात फार नाव मिळविलेले आहे.ही महानता मिळण्याची जी अनेक कारणे आहेत त्यांत गांधीजी हे एक मोठे कारण आहे.गांधीजींनीच हा मोठेपणा भारताला मिळवून दिला.
भारताच्या सैन्याने, आरमाराने अगर संपत्तीने प्राप्त झालेला हा मोठेपणा नाही.या थोर पुरुषाने जगातल्या नैतिक क्षेत्रातला व जगातल्या मुत्सद्द्यांमधला क्षुद्रपणा जगाच्या नजरेला आणला.
जगात भारताला हे असे मानाचे स्थान मिळाले याचे कारण नैतिक मूल्यांच्या दृष्टीने सारे जग भारताकडे पहाते हे आहे.
साम्राज्याशी सामना
काही बाबतीत आपण दुबळे असलो तरी आमच्या महान नेत्याकडून आम्हाला त्या दुबळ्या परिस्थितीतही शिकवण मिळाली.आमचे लोक निःशस्त्र असले, त्यांच्याकडे काही संपत्ती नसली अगर संपत्तीचे कोणतेही प्रतीक त्यांच्या हाती नसले तरी त्यांनी भारतातल्या अनेक वर्षे ठाण मारून बसलेल्या संपन्न साम्राज्याशी निकराचा सामना दिला.हा एक विलक्षण सामना होता.सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गांधीजींनी भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर पदार्पण केले त्या काळाकडे मी आज मागे वळून पाहात आहे.त्यांनी दक्षिण आफ्रिकेत केलेल्या कार्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळालेली होती नि त्यांची सर्वत्र वाखाणणी होत होती हे खरे असले तरी भारतीय राजकारणाच्या पातळीवरून त्यांनी आपल्या राजकीय हालचालींना सुरुवात केली नव्हती.पण त्यांनी एकदम भारतीय राजकारणात पदार्पण करून जनतेला संदेश दिला.त्या संदेशात एक प्रकारची जादू होती.तसा तो संदेश अगदी साधा होता. त्यांनी भारतातील परिस्थितीचे विश्लेषण केले ते असे होते की,मुख्यतःसर्वसाधारण जनता नि अन्य लोक यांच्यातसुद्धा भीतीची भावना पसरलेली होती म्हणून गांधीजींनी आम्हाला बजावून सांगितले, "भिऊ नका, कसली भीती वाटते,तुम्हाला काय होणार आहे असे तुम्हाला वाटते?" ते अशा अनुरोधाने बोलत होते की, भारतीय जनतेला राजकीय परिस्थितीची भीती वाटत असावी.
आम्ही काही केले व ती गोष्ट ब्रिटिश सरकारला आवडली नाही तर आम्हाला शिक्षा होईल,आम्हाला तुरुंगात टाकले जाईल,
आमच्यावर गोळ्याही झाडल्या जातील,अशी भीती सर्वत्र पसरलेली होती.गरिबातल्या गरीब शेतकऱ्याला व खालच्या थरातील सर्व लोकांना ही भीती वाटणे साहजिकच होते.कारण गरीब शेतकऱ्याने कष्टाने पिकविलेले सारे धान्य जमीनदाराच्या घशात जात होते व धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्याला उपाशी राहावे लागत होते.जमीनदार, जमीनदाराचा कारभारी,पोलिस व सावकार या सर्वांच्या लाथा आणि बुक्के त्या बिचाऱ्या शेतकऱ्यालाच खावे लागत होते.वातावरणात फरक झाला होता की गांधीजींच्या आवाजातच काही जादू होती ते मला कळत नाही.पण गांधीजींनी ज्यावेळी 'भिऊ नका' या शब्दांची घोषणा केली त्यावेळी त्यांच्या शब्दांनी योग्य पकड घेतली.आमची अंतःकरणे एकदम उचंबळून आली व आमची खात्री पटली की,आता घाबरण्यासारखे काही राहिलेले नाही.गरीब शेतकऱ्यानेसुद्धा आपली वाकलेली पाठ ताठ केली नि तो निर्भयपणाने लोकांच्या नजरेला नजर भिडवू लागला.त्याच्या खोल गेलेल्या डोळ्यात आशेचे किरण दिसू लागले! याचा परिणाम म्हणजे साऱ्या देशात जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्वत्र स्थित्यंतर घडून आले.अनेक उलथापालथीला आम्हाला तोंड द्यावे लागले. पण 'घाबरू नका' या गांधीजीच्या संदेशाने आम्हाला तारले व आता घाबरण्यासारखे काही नाही याची आम्हाला खात्री पटली.भीती म्हणजे काय ती आम्हीच मनात निर्माण केलेली होती.आम्ही लाखो लोक तुरुंगात गेलो.तुरुंगात जाणे हे काही तितके सुखाचे नव्हते.काही लोकांना त्रास झाला व दुःखही सहन करावे लागले.आपण ज्या दृष्टीने पहातो त्या दृष्टीवर सुखदुःखांच्या कल्पना अवलंबून असतात.
आम्ही कोणत्या तरी दुराचरणाने,दुष्कृत्याने कलंकित होऊन तुरुंगात गेलो असतो तर त्यामुळे आम्हाला अतिशय दुःख झाले असते.आम्ही जे केले त्यात घाबरण्यासारखे काही नाही;उलट अभिलाषा बाळगण्यासारखी ती गोष्ट आहे असे आम्हांला आत्मीयतेने वाटू लागले.
गांधीजींच्या स्फूर्तिदायक मार्गदर्शनाने भारतात जी शांततावादी क्रांती झाली,त्या क्रांतीचे नियम जगातील अनेक समस्या सोडविण्यासाठी लागू केले जाण्याची शक्यता आहे.भारतातील या क्रांतीने जगाच्या नजरेला अशी गोष्ट आलेली आहे की,शारीरिक बलाने काही माणसाच्या नशिबाचा निकाल लावता येत नाही. याबबतीत आपण ज्या पद्धतीने लढा देतो नि ज्या पद्धतीने त्याचा शेवट होतो तीच गोष्ट अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
गांधीजींच्या शिकवणीनेच भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची उद्दिष्टे आम्ही निश्चित केलेली आहेत.जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करताना कोणत्याही शक्तिमान राष्ट्राशी अगर राष्ट्रगटाशी हातमिळवणी न करता स्वतंत्र धोरणाने प्रत्येक वादग्रस्त तेढीच्या प्रश्नाचा विचार करावयाचा.गुलामगिरीत खितपत घडलेल्या लोकांना मुक्त करायचे राष्ट्रीय नि वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा.वर्णभेदाचें उच्चाटन करायचे त्याचप्रमाणे जगातील बहुसंख्य जनतेला ग्रासणाऱ्या अज्ञानाचा,रोगराईचा नि उणिवांचा उच्छेद (समूळ नाश) करायचा! भारताने जे परराष्ट्रीय धोरण अंगीकारले आहे ते नकारात्मक नाही अगर तटस्थपणाचे नाही.ते निश्चित नि महत्त्वाचे धोरण आहे.
भारताची प्रगती घडवून आणण्यासाठीच केवळ शांततेच्या धोरणाची भारताला जरुरी आहे असे नसून त्या शांततेचे जागतिक दृष्ट्याही महत्त्व आहे.जगात युद्धाची जी भीती आहे ती कमी करणे व अखेरीलाही युद्धाची भीती माणसाच्या मनातून काढून टाकणे ही आमच्यापुढील समस्या आहे.पण साऱ्या जगाने युद्धाची भाषा बोलायला सुरुवात केली,राष्ट्रगटांनी एकमेकांची बाजू घेतली तर युद्धाची भीती कशी टाळता येईल
राष्ट्र या नात्याने आमचा दुबळेपणा अगर आमच्या उणिवा यांची आम्हाला जाणीव आहे.आमच्यात कोणता तरी सर्वश्रेष्ठ गुण आहे असाही आमचा दावा नाही.पण सध्या जागतिक राजकारणाबाबत आमचे जे स्वतंत्र, अलिप्ततेचे धोरण आहे त्या धोरणापासून मिळणारे फायदे गमावून बसण्याची आमची तयारी नाही,हे अलिप्ततेचे जागतिक संघर्षात सहभागी होण्याचे धोरण केवळ आम्हालाच उपकारक आहे असे नव्हे तर जागतिक शांतता नि स्वातंत्र्य यासाठीही उपकारक आहे.शांतता व स्वातंत्र्य यांच्यावर घाला पडण्याची वेळ आली,मानवी स्वातंत्र्यावर व शांततेवर संकट आले की भारत मूग मिळून स्वस्थ बसेल असे नाही.या परिस्थितीत भारताने तटस्थ धोरण स्वीकारले तर त्या उद्दिष्टांचा विश्वासघात केल्यासारखे होईल.म्हणूनच भारताचे आजचे अलिप्ततेचे धोरण म्हणजे संघर्षाकडे पाठ फिरवून दूर पळून जाण्याचे,बेफिकिरीचे अगर पूर्ण तटस्थेतेचे धोरण नाही.भारताच्या या अलिप्ततेच्या धोरणात जागतिक क्षेत्रात सहजीवन निर्माण करण्याचे तत्त्व सामावलेले आहे.शांततावादी सहजीवन म्हणजे कोणत्याही समस्येबाबत शांततेने वादविवाद करणे, इतरांचा दृष्टिकोन समजून घेणे,आपल्या मतांचा दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रश्नात हस्तक्षेप करून उलथापालथ न करणे! आपण जी गोष्ट प्राणांपेक्षाही प्रिय मानतो तिचाच त्याग करणे अगर आमचा निर्णय इतर राष्ट्रांवर लादणे असा मात्र या धोरणाचा अर्थ नव्हे, अलिप्ततेचे धोरण हे एक मूलभूत उद्दिष्ट आहे,पण एखाद्या विशिष्ट परिस्थितीला अगर प्रसंगाला ते कसे लागू करायचे याबाबतीत निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार आहे.आमचे अलिप्ततेचे असे धोरण आहे. याचा अर्थ आपण एखादी गोष्ट मान्य करायची अगर करायची नाही असे नाही.जे उद्दिष्ट आपले ठरले आहे ते साध्य करण्यासाठी स्वतंत्र निर्णय घेण्याचे तत्त्व तटस्थतेच्या धोरणात सामावलेले आहे.
आपण ज्याला गांधी तत्त्वज्ञान अगर वैचारिक भूमिका म्हणतो त्या वैचारिक पातळीवर आपण पोहोचलो नाही. पण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आमचा आमच्या धोरणावर अजूनही प्रभाव आहे.आम्हाला शांतता हवी असेल तर त्या शांततेचे वातावरण आपण निर्माण करायला हवे. आपल्याविषयी ज्यांना संशय वाटतो त्यांना आपण जिंकण्याचा - प्रयत्न करायला हवा.आमची बाजू, आमची मनोभूमिका इतरांनी समजून घ्यावी अशी आपली अपेक्षा असते.त्याचप्रमाणे इतरांचीही भूमिका आपण समजून घ्यायला हवी.अनिष्ट गोष्टींचा अगर आक्रमणाचासुद्धा प्रतिकार करताना आपण शांततेची भूमिका पत्करायला हवी व जे केवळ भीतीने अगर अन्य कारणांनीही आपले शत्रुत्व पत्करण्यास तयार झाले आहेत त्यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे करायला हवा. ही शिकवण आम्हाला गांधीजींनी दिली.आमच्यातील अपूर्णत्वाची जाणीव असतानाही त्यांच्या महान शिकवणीपासून स्फूर्ती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आपले ध्येय उच्च असले तर आपण
उच्च तत्त्वांनाही चिकटून रहायला हवे.बुद्धकालापासून ते आजच्या गांधी-युगापर्यंत भारताची उच्च परंपरेची ही पार्श्वभूमी आहे.
आजच्या परिस्थितीत कोणत्याही सरकारला राज्यकारभार चालविताना अहिंसेच्या तत्त्वाचा पुरस्कार करता येणार नाही.
अहिंसेच्या तत्त्वाला आपण चिकटून राहिलो तर आपणास सैन्य,आरमार, वैमानिक दल इतकेच नव्हे तर पोलिस पथकेही ठेवता येणार नाहीत.आजच्या परिस्थितीच्या संदर्भात एखादे उच्च ध्येय लगेच अंमलात आणता येईल असे नाही.हे ध्येय साकार करण्यासाठी आपणास वाट पहावी लागेल.काश्मीरवर टोळीवाल्यांनी हल्ला केला त्यावेळी तेथे भारतीय सैन्य पाठविल्याच्या आमच्या धोरणांचे गांधीजीनी समर्थनच केले.
इतकेच नव्हे तर त्यांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन आशीर्वाद दिला ! संपूर्णपणे अहिंसेच्या तत्त्वाला चिकटून राहणाऱ्या नि त्या तत्त्वाचा पूर्ण पुरस्कार करणाऱ्या गांधीजींनी आमच्या धोरणाला मान्यता दिली ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. विशिष्ट परिस्थितीत सरकारला संरक्षणासाठी हिंसेचा वापर करण्याचा अधिकार पोहोचतो हे गांधीजींनी मान्य केले.भारत सरकार आजच्या परिस्थितीत आपला हा हक्क अबाधित राखील हे तितकेच खरे आहे. तथापि आम्ही आमची भूमिका अशी स्पष्ट केलेली होती. की, निव्वळ संरक्षणासाठीच सैन्याचा वापर करायचा, युद्धाला चिथावणी द्यायची नाही, अगर युद्ध सुरू करायचे नाही. अगर आक्रमक हालचाली सुरू करायच्या नाहीत. हेच आमचे मूलभूत धोरण होते !
गांधीजींची हुकूमशहाप्रमाणे भूमिका नव्हती.कुणाही माणसावर आपला निर्णय लादण्याची त्यांच्यात शक्ती होती.त्यांना इतरांवर निर्णय लादता आला असता.पण त्यांनी तसे केले नाही.त्यांनी जे काम करायचे ते प्रेमाने, सलोख्याने केले.आम्ही वारंवार त्यांच्याशी वादविवाद केला,त्यांशी भांडलोसुद्धा व त्यांना आमची विचारसरणी पटविण्याचा प्रयत्न केला.
गांधीजींमधला अलौकिक गुण म्हणजे इतरांतून चांगले गुण शोधून काढण्याचे त्यांचे कौशल्य ! एखाद्या माणसामध्ये अनेक दुर्गुण असले तरी नेमके त्याच्यातले गुण शोधून काढण्याची कला गांधीजींना चांगली साधलेली होती.त्यामुळे त्या बिचाऱ्या माणसाला त्याच्या इच्छेविरुद्धही चांगले वागावे लागत असे.
गांधीजी आपला निर्णय इतरांवर लादण्याचा प्रयत्न न करता इतरांची मने जिंकण्याचा प्रयत्न करीत असत.लोकांनी आपले विचार दाबून टाकावे आणि आंधळेपणाने त्यांचे अनुकरण करावे.असे गांधींना कधीच वाटले नाही.त्यांना असे अंधानुकरण नको होते.पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे अपरिहार्यपणे लोकांना स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडणे अनेक प्रसंगी कठीण जात असे.तरीही गांधीजींनी लोकांच्या या भूमिकेला कधी प्रोत्साहन दिले नाही.गांधीजींविषयी बोलणे मला आवडते याचे कारण त्यामुळे माझ्या मनाला समाधान वाटते व एका महानतेची जाणीव होते.त्या जाणिवेने मन वेगळ्या वातावरणात जाते.
आपल्या स्वतःभोवतीच्या संकुचित भूमिकेपासून आपण वेगळ्या प्रदेशाच्या वातावरणात पदार्पण करतो नि त्या वातावरणात आपणास जीवनातले क्षुद्र हेवेदावे,द्वेष, मत्सर दिसत नाहीत! गांधीजींचा विचार केल्याने मनाला एक प्रकारचे समाधान लाभत होते.पण आता आपण त्यांचे वारंवार नाव घेऊनही त्यांच्या तत्त्वाप्रमाणे आपले आचरण का होत नाही या विचाराने व शंकेने मन व्यथित होते.गांधीजींच्या सान्निध्यात येत असताना अंतःकरणात अशी कालवाकालव होते की आपण गांधीजींचे अनुयायी होण्यास लायक आहोत की नाही! आपण बोलतो एक व दाखवतो अगर कृती करतो दुसरी,असे तर आपल्या हातून होत नाही ना? ते हयात असताना जर अशी परिस्थिती तर ते आमच्या सान्निध्यात नसताना आमची भूमिका कशी राहील? तेव्हा गांधीजींची स्मृती नेहमीच आमच्यापुढे ही समस्या उभी करते !पण अशा प्रकारे निरर्थक प्रश्नचिन्हात आम्हाला फार वेळ गुरफटून राहाता येत नाही.चालू परिस्थितीच्या अनुरोधाने आमच्या कल्पनेप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यायला हवा आहे.
गांधीजी हे निव्वळ उच्च तत्त्वे बाळगणारे व सत्याचे पुरस्कर्ते होते असे नव्हे तर त्यांना पूर्णपणाने जनमनाची नाडीही अवगत होती.भारतीय जनतेचा प्रतिनिधी म्हणून घेण्याचा कुणाला खरा हक्क असेल तर तो गांधीजींनाच ! गांधींजी भारतीय जनतेला ओळखत होते इतकेच नव्हे तर ते आम्हा कुणापेक्षाही जनतेच्या जीवनाचा एक भाग होऊन बसले होते गांधीजींनी जनतेला ज्या काही अलौकिक गोष्टी करायला सांगितल्या त्या लोकांनी त्यांच्या आदेशाप्रमाणे पार पाडल्याही;पण त्यांनी जनतेला कोणती अशक्य गोष्ट पार पाडण्यास सांगितली असेही नाही.एखाद्या व्यक्तीकडून गांधीजी कडक शिस्त पाळण्याची अपेक्षा करतील पण सर्वसाधारण जनतेकडून मात्र ते सक्तीच्या शिस्तीची अपेक्षा करणार नाहीत.तथापि त्यांनी अनिष्ट गोष्टींच्या बाबतीत कधी तडजोडीची भूमिका स्वीकारली नाही.या विशाल जगात केवढाही महान नेता असला तरी त्याला दैनंदिन कार्यात कधी तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागतच नाही असे काही म्हणता येत नाही.
भावी इतिहासकार गतेतिहासाबद्दल लिहिताना आमच्या देशातील चालू परिस्थितीच्या अनुरोधाने काय लिहितील? ते इतिहासकार आमच्या महान नेत्याबद्दल असे लिहितील की,भारतात जन्म घेतलेल्या या नेत्याने हातात हातात हात घालून सहकार्याने कसे वागावे हे गुलामगिरीत खितपत पडलेल्या आपल्या देशबांधवांना शिकविले! एकाच देशात जन्मलेल्या व एकाच संस्कृतीच्या जनतेला विभागणाऱ्या ज्या कृत्रिम भिती होत्या त्या पार जमीनदोस्त करून आपल्यापेक्षा कमनशिबी असलेल्या हरिजनांना उच्च दर्जा देण्यास त्या नेत्याने आपल्या शिकवणीने भाग पाडले.ते इतिहासकार आणखी असेही लिहितील की, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेली भारतीय जनता असंख्य वर्षांच्या निद्रेतून जागी झाली व अभिमानाने मान उंचावून त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले व इतर देशांच्या स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. शेकडो वर्षांनंतर भारताने आपले तेज प्रगट केले. आपल्या प्राचीन संस्कृतीने तेजाळलेला आपला आवाज जगाला ऐकविला व त्या आवाजाचा साऱ्या जगावर परिणाम घडून आला! आम्ही भारतीयांनी आम्हांला अनेक शतकांपासून मिळालेला महान वारसा दूर फेकून दिला व धर्म,जात नि प्रांत यांचे भांडवल करून आम्ही एकमेकांमध्ये भांडत रहाण्याची नीच पातळी स्वीकारली तर सारे जग आपल्याला काय म्हणेल?
आपल्या जगात अनेक अनिष्ट गोष्टी आहेत अगर अनेक प्रकारचे द्रौर्बल्य आहे. पण मोठा दुबळेपणा म्हणजे भीती भीतीची भावना ! भीती हे अनेक अनिष्ट गोष्टींचे मूळ आहे.ज्या व्यक्तीला अगर राष्ट्राला भीतीने पछाडलेले आहे त्या व्यक्तीला,राष्ट्राला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते व अभिमानाने मान उंचवण्यासही ते राष्ट्र समर्थ होऊ शकत नाही.पण गांधीजींच्या तत्त्वज्ञानापासून आम्हाला हे सामर्थ्य मिळाले.मनातील सारी भीती टाकून एकजुटीने निर्भयपणे शक्तिमान साम्राज्याशी सामना देण्याची शिकवण गांधीजीनी भारतीय जनतेस दिली! मग आता बंगालमध्ये अगर आसाममध्ये राहणाऱ्या आमच्या लोकांनी एकमेकांची भीती का बाळगावी? अशिक्षित लोक अगर छोट्या मनाचे लोकच एक भाषा दुसऱ्या भाषेविरुद्ध उलटविण्याचा नि भाषा भगिनींमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतात;पण शहाणे लोक मात्र भाषाभाषांमध्ये वितुष्ट न आणता मातृभाषेखेरीज अन्य भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात!
आपल्या सभोवतालच्या जगापुढे आपण दृष्टी फेकूया. आंतरराष्ट्रीय परिस्थितीत अनुकूल पालट झाला आहे असे आपणास वाटते.आता मात्र परिस्थिती जास्त बिकट झाली आहे.लोकांनी एकमेकांविरुद्ध तलवारीचा खणखणाट करायला प्रारंभ केला आहे! अशा परिस्थितीत आम्ही किंचित प्रमाणात जरी आत्मसंतुष्ट वृत्ती दाखविली,ऐक्याचा अभाव व्यक्त केला तर आपण दुबळे ठरू,आपल्याला अपयश येईल! आपण आपली मने नि डोळे उघडे ठेवून वागायला हवे.ज्या थोर नेत्याने भारतीय जनतेत एवढी प्रचंड शक्ती निर्माण केली, त्यांच्यात एकजूट करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या थोर नेत्याची आपण या प्रसंगी सतत स्मृती वागवायला हवी.आपल्या या थोर नेत्याच्या नावाचा पुनरुच्चार करणे अगर त्याची स्मृती बाळगणे यानेच केवळ भागणार नाही.त्याने आपल्याला जी अमोल शिकवण दिली आहे ती सदैव मनात बाळगून आपण त्या शिकवणीच्या अमृताने सारा देश संपन्न केला पाहिजे.आमच्या जीवनातला प्रकाश मावळला असून सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले आहे.आमचे परमप्रिय बापूजी,आमचे राष्ट्रपिता आम्हास सोडून गेले ! आमच्या जीवनातला प्रकाश मावळला असे मी एकदा उद्गार काढले तथापि माझे ते उद्गार चुकीचेही होते. कारण आपल्या देशात ज्या प्रकाशाचे तेज फुंकले गेले होते तो प्रकाश काही सामान्य प्रकारचा प्रकाश नव्हता! ज्या प्रकाशाने हा सारा देश दशदिशा उजळून टाकला तो प्रकाश आणखी असंख्य वर्षे या देशात प्रकाशत राहील! हजारो वर्षांनंतरही या प्रकाशाची तेजस्वी किरणे आपल्या देशात चकाकत राहतील.साऱ्या जगाला ती प्रकाशकिरणे पाहायला सापडतील व त्या प्रकाशकिरणांनी अनेकांच्या अंतःकरणाला समाधान लाभेल.कारण त्या प्रकाशात आजच्या घडीपेक्षा उद्याच्या घडीचे प्रतिबिंब जास्त प्रमाणाने एकवटलेले आहे.त्या प्रकाशात जिवंत शाश्वत सत्य सामावलेले आहे.तो प्रकाश आम्हाला योग्य मार्ग दाखवीत आहे, प्रमादापासून बाजूला सारून अनादी काळापासून अस्तित्वात असलेल्या या देशाला स्वातंत्र्याप्रत नेत आहे !
समाप्त…!