* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: चिम्पॅन्झी व जेन गुडाल / Chimpanzees and Jane Goodall

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

४/३/२६

चिम्पॅन्झी व जेन गुडाल / Chimpanzees and Jane Goodall

जेन गुडाल हिचा जन्म लंडन येथे १९३४ साली झाला.तिचं शिक्षण बोर्नमाऊथ इथं झालं.तिचे वडील पेशाने इंजीनिअर होते.दुसऱ्या महायुद्धाला सुरवात होताच त्यांना फ्रान्स व नंतर मलायात पाठवण्यात आले.तेव्हा तिची आई- वान्ने ही जेन व दुसऱ्या मुलीला घेऊन खेड्यात राहणाऱ्या आईकडे राहायला गेली.त्यावेळी जेन पाच वर्षांची होती. कोंबडीच्या खुराड्यात स्वतःला कोंडून घेऊन कोंबडी अंडी कशी घालते हे तासन्तास पाहत राही.तिच्या आईला ते ठाऊक नसे.ती घाबरून जाई व पोलिसांकडे जेन हरविल्याची तक्रार नोंदवी.


जेनला प्राण्यांविषयीची पुस्तके आवडत.विशेषतः ह्यूग लॉफ्टिंग याचे डॉक्टर डू लिटज याच्या साहसकथा तिला खूप आवडायच्या.एका प्रसंगी ते आफ्रिकेतील हजारो माकडांना झालेल्या साथीच्या रोगापासून मुक्त करायला जातात.जेन ही आठवण सांगताना लिहिते "त्यावेळी मी आठ वर्षांची असेन. तेव्हापासून मला वाटे,की आपणाला आफ्रिकेतील वन्य प्राण्यांबरोबर राहायचं आहे."


अठराव्या वर्षी शाळा सोडून ती लंडन येथील एका फिल्म स्टुडिओत कामाला लागली.तिच्या वर्गमैत्रिणीचे आईवडील केनिया येथे शेती करीत.या मैत्रिणीनं जेनला केनियाला येण्याचं आमंत्रण दिलं.तिने ते लगेच स्वीकारलं.नैरोबी येथे तिची भेट प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ लुई लिके यांच्याशी झाली.ते त्यावेळी केनिया येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे क्युरेटर होते.त्यांनी तिला सचिव म्हणून कामावर घेतलं.१९५७ साली त्यांनी टांगानिका सरोवराच्या किनाऱ्यावर टांझानिया येथे आढळून येणाऱ्या चिम्पॅन्झीचं अनेक महिने ती निरीक्षण करू शकेल काय,असं तिला विचारलं. आलेल्या या अनपेक्षित संधीनं तिचं मन हरखून गेलं. लिके यांनी या योजनेसाठी आवश्यक तो पैसा मिळवला.ती इंग्लंडला परत गेली आणि तिथल्या समृद्ध ग्रंथालयातून चिम्पॅन्झी या विषयावरील जेवढी पुस्तकं मिळतील तेवढी अठरा महिन्यांच्या काळात तिनं वाचली.


जून १९६० साली जेन आईला सोबत घेऊन आफ्रिकेत पोचली.त्या वेळी वान्ने गुडालचं वय ८४ वर्षांचं होतं. चिम्पॅन्झीच्या गॉम्बे संरक्षण क्षेत्रात【चिम्पॅन्झी बरोबर राहणारी जेन गुडाल,शब्दांचं धन,मारुती चितमपल्ली, प्रकाशक,मकरंद कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर】पहिल्या आगमनाची आठवण अजूनही ती विसरली नव्हती.टांगानिका सरोवराकाठची मोकळी जागा तेथील वनरक्षकांनी दाखविली.तिथं त्या मायलेकीनं राहण्यासाठी राहुटी उभी केली.


आई म्हणते "तिथल्या किनाऱ्यावर बबून माकडं खेळत होती.बाकी जिकडे तिकडं विलक्षण सामसूम.आम्ही गर्दीपासून खूप दूर आलो होतो."


सूर्य उगवताच जेन रोज ७६० मीटर उंच असलेल्या पर्वत शिखरावर चढे.तेथून ती जंगलातल्या चिम्पॅन्झीचा शोध घेई.किती तरी आठवडे गेले.तिला त्याचं फक्त दुर्बिणीतून निसटतं दर्शन होई.म्हणून ती रात्र रात्र त्या शिखरावर मुक्कामाला राही.तिला बघताच चिम्पॅन्झी पोबारा करीत. गोम्बेला येऊन आठ महिने झाले.जेन नित्याप्रमाणे जंगलातून वर वर चढत होती,तर तिच्या वाटेवर समोर चिम्पॅन्झी बसलेला.जवळच वरच्या एका फांदीवर बसलेल्या नराचा तिनं हू असा आवाज ऐकला. तिच्या डाव्या बाजूला सळसळ ऐकू आली अन् समोर चमकणारे काळे डोळे दिसले.तिच्या मागेच हू असा दुसरा आवाज आला.चिम्पॅन्झीच्या कळपानं तिला घेरलं होतं.झाडावर बसलेल्या चिम्पॅन्झीनं एकमात्र हा ऽ आऽ आह अशी आरोळी ठोकताच जेन भीतीनं गर्भगळित झाली.तो जोरजोरानं फांदी हलवीत होता.इतर चिम्पॅन्झीनं त्याच्या आवाजाचं अनुकरण केलं. कावरी-बावरी झालेली जेन एका ठिकाणी दबा धरून बसली.रागानं अनावर झालेला,साऱ्या अंगावरले केस ताठ झालेले असा एक चिम्पॅन्झी झुडपांतून सरळ तिच्यावर धावला.नंतर वळून त्यानं जंगलाची वाट धरली.सारे चिम्पॅन्झी त्याच्या मागे निघून गेले.


जेन या प्रसंगाविषयी लिहिते "कशी तरी मी उठून उभी राहिले.त्या जंगलात फक्त माझ्याच हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येत होता." तिची भीती पार उडाली.आलेल्या अद्भुत अनुभवाची तिला मौज वाटली.तिला वाटलं त्या चिम्पांझींना आता तिची भीती वाटत नाही.त्यांनी तिला स्वीकारलं आहे.


खरा प्रसंग पुढं घडला.राखी पांढरी दाढी असलेल्या एका रुबाबदार नराने तिच्या राहुटीतील केळी पळवली. त्याचं नाव तिनं दाढीवाला डेव्हिड असं ठेवलं.नंतर काही दिवसांनी तो आपल्या दोघा सोबत्यांबरोबर तिच्या अगदी जवळ आला.पहिल्यांदा जेन इतक्या जवळून चिम्पॅन्झीला बघत होती.दाढीवाल्या डेव्हिडनं आपसात खरा संवाद साधण्याची संधी पहिल्यांदा जेनला दिली होती.ओढ्याकाठी असलेल्या डेव्हिडचं ती निरीक्षण करीत होती.


तिनं एक पिकलं फळ उचललं आणि तळहातावर ठेवून तो त्याच्यापुढं केला.त्यानं त्या हाताकडं पाहिलं,नंतर तिला बघितलं.तो तिच्याजवळ आला.त्यानं आपला हात तिच्या हातावर ठेवला.काही क्षण तिचा हात हळुवार दाबला.या अभूतपूर्व प्रसंगाविषयी ती लिहिते "त्यानं मला दिलेल्या आश्वासनाचं शास्त्रीयदृष्ट्या कसलं स्पष्टीकरण करणार! माझ्या अपेक्षेपेक्षा मला फार मोठं श्रेय मिळालं होतं."


गोम्बेच्या जंगलात केलेली जेन गुडालची संशोधनं आणि अभ्यासपूर्ण निरीक्षणे लिकेनं प्रसिद्ध केली.तिनं रानटी चिम्पॅन्झीवरची निरीक्षणे चालू ठेवली.आता गोम्बे, राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जातं.


१९६१ सालापर्यंत तिनं चिम्पॅन्झीच्या वर्तणुकीविषयी असामान्य ज्ञान अवगत केलं होतं.एवढ्या संशोधनाच्या आधारे केम्ब्रिज विद्यापीठात तिला इथॉलॉजी वर्तणुकीवर पीएच.डी.करण्याची परवानगी मिळाली. १९६२ साली तिला इंग्लंडला जाण्याची परवानगी दिली. तिथल्या अठरा महिन्यांच्या वास्तव्यात चिम्पॅन्झीवरील प्रबंध विद्यापीठाला सादर करून ती परत गोम्बे राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली.आचार्य ही पदवी मिळाल्यावर आता सारं काही संपलं,असं तिला वाटलं नाही.


चिम्पॅन्झीविषयी जेनला जेवढं ज्ञान प्राप्त झालं,तेवढं क्वचितच कुणाला असेल.आयुष्यातील तीन तपं ती आफ्रिकेच्या घनदाट जंगलात राहिली.६५ वर्षांच्या वयातही जेनला वृद्धापकाळानं स्पर्श केला नव्हता.त्या वेळीही ती एखाद्या तरुणीसारखी दिसे.ती रोज पहाटे उठून जंगलाची वाट धरायची. तासन्तास ती चिम्पांझींचं निरीक्षण करायची.कित्येकदा अनेक दिवस त्यांच्या जीवनक्रमाचं अवलोकन करी.ते खातात काय,भितात कशी,प्रेम कसं,मातापित्यांचं वात्सल्य कसं,मृत्यू कसा- इत्यादी त्यांच्या जीवनाच्या अनेक पैलूंवरील दुर्मिळ निरीक्षणाच्या तिनं नोंदी केल्या आहेत.आजतागायत तिनं सहा ग्रंथांची निर्मिती केली आहे.शेकडो निबंध लिहिले आहेत.एखाद्या वन्य प्राण्याविषयी इतकं दीर्घकाळ संशोधन कोणी केलं नाही.


चिम्पॅन्झीवर लिहिलेल्या प्रबंधावरून तिनं 'इन द शेंडो ऑफ मॅन' हा ग्रंथ १९७१ मध्ये सिद्ध केला. या ग्रंथाचा सतरा भाषांत अनुवाद झाला आहे.शास्त्रज्ञ आणि सामान्य रसिक वाचक अशा सर्वांना तो सारखाच आवडला.चिम्पॅन्झीविषयी तिला अवगत झालेलं ज्ञान तिनं मोठ्या लालित्यपूर्ण भाषेतसादर केलं आहे. शास्त्रीय विधानं करताना कुठंही दुर्बोधता येऊ दिली नाही.तिचं सारं लेखन निर्मितीच्या पातळीवर जातं.

चिंतनाद्वारे तिला झालेलं जीवनदर्शन सोप्या, साध्या,सरळ भाषेत प्रकट केलं आहे.


"तिच्या लेखनात शास्त्रज्ञाची शिस्त व माणसांची संवेदना दिसून येते," असे अनेक विद्वान शास्त्रज्ञांनी तिच्या लेखनाविषयी अभिप्राय व्यक्त करताना लिहिले आहे. 'द चिम्पॅन्झी ऑफ गोम्बे' हा ग्रंथ १९८६ मध्ये प्रसिद्ध झाला.

त्यात ज्या चिम्पॅन्झीच्या कळपाचा तिनं अभ्यास केला,

त्यातील प्रत्येकाला त्यांच्या स्वभावानुसार नावे दिली आहेत.प्रत्येकाला ती नावानं ओळखत असे.


या तिच्या उत्कृष्ट ग्रंथाने विक्रीचा उच्चांक गाठला.तिचं तिसरं पुस्तक १९८९ साली प्रसिद्ध झालं.या साऱ्या ग्रंथांतून सचित्र पुराव्यानुसार चिम्पॅन्झीचा जीवनवृत्तान्त दिला आहे.पूर्वसूरींनी चिम्पॅन्झीच्या वर्तणुकीविषयी जी गृहिते व्यक्त केली होती,त्यांना तिनं आपल्या संशोधनाने छेद दिला आहे.विकल,वुल्फी,सैतान व स्प्राऊट यांची तिनं दिलेली शब्दचित्रं जगातील शास्त्रज्ञ आणि सामान्य वाचकांना आवडली.


१९६३ साली तिनं दाढीवाल्या डेव्हिडचं निरीक्षण केलं.ती त्याला चांगलं ओळखत होती.त्यानं एकदा सुळ्या दातांनी मृत रानडुकरांची चिरफाड करून त्याचं मांस खाल्लं.रानटी चिम्पॅन्झीनं मांस खाल्याची ही पहिली नोंद.नंतर तिनं निरीक्षणाच्या आधारे सिद्ध केलं की,चिम्पॅन्झी हे माकडं,

रानडुकरं व हरणाची पाडसं खातात.ते कळपानं शिकार करतात व नंतर मांस वाटून खातात.


माणसाला बुद्धी असते म्हणून शिकारीसाठी हत्यार वापरतात असं नव्हे;तर चिम्पॅन्झीदेखील त्याचा उपयोग करतात.एकदा दाढीवाल्या डेव्हिडनं गवताची लांब काडी तोडली अन् वारुळाच्या छिद्रात घातली.लगेच ती बाहेर काढली.त्यावर वाळवी होती.ती लगेच त्यानं खाल्ली.आणखी एक हत्यार चिम्पॅन्झी उपयोगात आणतात.ते आहे पानांचा चोथा.जंगलात ढोली असलेले वृक्ष असतात.त्यात पावसाचं पाणी साठतं.परंतु,ते पाणी खोलात असल्यानं पिता येत नाही.त्यासाठी एक युक्ती करतात.मूठभर पाला चावून त्याचा चोथा झाला,की ढोलीतल्या पाण्यात टाकतात.चोथा पाण्यानं ओला होतो.ढोलीतून तो काढून त्यातील पाणी चिम्पॅन्झी शोषून घेतात.जेन म्हणते,"कुठल्याही इतर प्राण्यापेक्षा चिम्पॅन्झी अनेक प्रकारच्या वस्तू अनेक कारणास्तव उपयोगात आणतात.अशी बुद्धी फक्त माणसाजवळ आहे." चिम्पॅन्झीविषयी अनेक वर्षांच्या संशोधन आणि अभ्यासानंतर तिला आढळून आलं,की त्यांच्यात आणि मानवाच्या स्वभावात साम्य आहे.ती म्हणते, "जीवशास्त्रीय उत्पत्ती अथवा जननशास्त्राचा विचार केला,तर चिम्पॅन्झी आणि मानवात नव्वद टक्के साम्य आहे.तसेच त्यांच्या आणि आपल्या जीवनचक्रात साधर्म्य आहे.षनःहबाल्यावस्था पाच वर्षे,पौगंडावस्था नऊ ते तेरा वर्षे,प्रजोत्पत्ती व वृद्धापकाळ पस्तीस किंवा चाळीस वर्षे आणि रानटी अवस्थेत पन्नासाव्या वर्षांच्या आसपास मृत्यू."


आपल्याप्रमाणे चिम्पांझींच्या स्वभावातही भय,दुःख, राग,लोभ व असूया हे गुण आहेत.मित्र आणि परिवाराशी अनेक पिढ्यांचे स्नेहसंबंध असतात.जेनला आढळून आलं,

की चिम्पॅन्झी माता आपल्या लहान पिलाला छातीशी धरून गोंजारतात.दीर्घ काळाच्या ताटातुटीनंतर मित्र उराउरी भेटतात.हस्तांदोलन करतात. पिलं हात पसरून अन्नाची भीक मागतात.त्यांचे दुःखदेखील आपल्याइतकेच खरे आहे.जेव्हा फ्लो या वृद्ध मातेने खाली कोसळून प्राणत्याग केला,तेव्हा तिचा मुलगा फ्लिंट तिच्या प्रेताजवळ अनेक दिवस बसून होता. लवकरच त्यानं अन्नत्याग केला.तिच्या मृत्यूनंतर एका महिन्यानं शोकाकुल अवस्थेत आईनं जिथं देह ठेवला होता तिथंच त्यानं प्राण सोडला.


या ग्रंथात एक हृदयस्पर्शी प्रसंग आहे.चिम्पांझींना नवबालकांचं मोठं कौतुक वाटतं.कळपातील साऱ्या जणांचा या बालकांवर लोभ असतो.त्याला कुठं ठेवू अन् कसं करू असं वाटतं.एका चिम्पॅन्झी मातेला वाटलं,की आपलं बाळ जेनला दाखवावं,म्हणून ती जेनचा परकर ओढू लागते.तिच्या या वागणुकीचं तिला आश्चर्य वाटतं.

म्हणून जेन तिच्या मागोमाग जाते.ती एका झुडपाजवळ थांबते.माता त्या झुडपातून पिलाला बाहेर काढून जेनला दाखवते.या प्रसंगावरून असं वाटतं,की जेन चिम्पांझींच्या जीवनाशी किती एकरूप झाली होती, तिनं त्या वन्य प्राण्यांचा किती विश्वास संपादन केला होता! नाही तर वन्य प्राणी आपल्या पिलाजवळ माणसाला अजीबात येऊ देत नाहीत.


युरोप आणि अमेरिकेतून डझनावरी विद्यार्थी तिच्याबरोबर सहायक म्हणून काम करायला आले. परंतु,ही योजना अकस्मात मे १९७५ साली बंद करण्यात आली.त्याचं कारण असं घडलं,की काही आतंकवादी शस्त्रे घेऊन टांगानिका सरोवराच्या शिबिरात आले.बंदुकीच्या नळीसमोर तिथल्या चौकीदाराला धरून त्यांनी जेन गुडालचा ठावठिकाणा विचारला.परंतु,त्यानं सांगायचं नाकारलं,तेव्हा त्या हल्लेखोरांनी तिघा अमेरिकन व डच संशोधकांना गौर येथे पळवलं.दोन महिने त्यांना खंडणीसाठी तिथं डांबून ठेवलं आणि भरपूर खंडणी मिळाल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं.या जीवघेण्या प्रसंगानंतर गोम्बे येथे परदेशी संशोधक येईनासे झाले.परंतु,न डगमगता धैर्यानं जेननं टांगानिका येथील रहिवाशांना क्षेत्र सहायकांचे शिक्षण देऊन संशोधनासाठी संघ तयार केला.आज तिथं निष्ठेने काम करणाऱ्या बावीस जणांचा संघ कार्यरत आहे.जेन त्या सहायकांविषयी म्हणते, "त्या साऱ्यांचं चिम्पॅन्झीवर माझ्याइतकंच प्रेम आहे.आपल्या खेड्यात ते चिम्पॅन्झीविषयी बोलतात आणि आपल्या परिवाराला त्यांच्या हालचाली बघण्यासाठी आणतात."


१९६४ साली जेननं ह्युगो वॅन लॉविक या डच छायाचित्रकाराशी विवाह केला. ह्युगो वन्य प्राण्यांचा उत्तम छायाचित्रकार होता. 'इन द शॅडो ऑफ मॅन' या ग्रंथातील चिम्पॅन्झी व जेनची छायाचित्रं ह्युगोने काढली आहेत.त्या ग्रंथाची समृद्धी वाढविण्यातत्याचंही श्रेय आहे.पुढे या उभयतांनी 'इनोसन्ट किलर्स' हा ग्रंथ लिहिला.त्यात रानकुत्री,कोल्हा आणि तरस या वन्य प्राण्यांची अप्रतिम छायाचित्रं आहेत.या दोघांचं गोम्बेमध्ये एकत्र येणं म्हणजे सुवर्णमणिकांचन योग होता.१९६७ साली गोम्बे येथे त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव ग्रब.तो बालपणापासून जंगलातच वाढला.आता तो पूर्व आफ्रिकेत वन्यजीवांविषयी संशोधन करतो.या मुलाला तिनं जंगलात कसं वाढवलं याचा वृत्तांत तिनं 'ग्रब द बुशबेबी' या पुस्तकात दिला आहे.


जेन व ह्युगोचा विवाह अयशस्वी ठरला.नंतर १९७५ साली तिनं डेरेक ब्रायसेमन यांच्याशी पुनर्विवाह केला. ते टांझानिया राष्ट्रीय असेंब्लीचे सभासद आणि तेथील राष्ट्रीय उद्यानाचे संचालक होते.दुर्दैवाने १९८५ साली त्यांचं कॅन्सरनं निधन झालं.


आज तेथील स्थानिक अधिकारी तिला ममा ब्रायसेमन म्हणतात.दार-ए-सलाम येथील समुद्रकिनाऱ्यावर तिचं घर आहे.दर वर्षी तिथं काही काळ तिचं वास्तव्य असतं. त्यावेळी ती आपल्या रसिक चाहत्यांच्या पत्रांना उत्तरे देते आणि संशोधनाविषयी पुस्तकं व निबंध लिहून चिम्पॅन्झीविषयी जगाला अद्ययावत ज्ञान देते.वर्षांतील आठ महिने ती अमेरिका व युरोप देशांत दौरा करते. तेथील विद्यापीठ,प्राणिसंग्रहालये व प्राणिसंरक्षक संस्थांमध्ये व्याख्याने देऊन गोम्बे येथील सहायकांचा पगार तसेच प्रशिक्षणासाठी लागणारा पैसा गोळा करते. चिम्पॅन्झीमित्र असलेली जेन त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करीत असते.फ्लो आणि दाढीवाला डेव्हिड तसंच त्यांचे वंशज आज संकटात आहेत.एकोणविसाव्या शतकाच्या अखेरीला त्यांची संख्या एक कोटी होती.आता जगातील चिम्पांझींची संख्या १ लाख ७५ हजार इतकी घसरली आहे.ती साऱ्या आफ्रिकेच्या जंगलातून पसरलेली आहे. झाडं तोडणाऱ्या कंपनी आणि शेतकरी त्यांचे निवासस्थान नष्ट करीत आहेत,तर काही भागात मांसाकरिता त्यांची हत्या केली जात आहे.


चिम्पांझींचे खरे वैरी अवैध शिकार करणारे आहेत.ते ह्या चिम्पांझींची पिलं पकडून सर्कस,कॅबेरेस्ट,प्राणी संग्रहालयात विकतात.जेन म्हणते, "पिलं धरण्याच्या मोहिमेत अथवा त्यांची वाहतूक करताना वीस पिलांपैकी एक पिलू जगतं." तिच्या प्रयत्नांमुळे जागतिक पातळीवर करारनामा होऊन त्यांना संरक्षण मिळविण्यात जेनला यश प्राप्त झालं आहे.परंतु तिला वाटतं,नुसते कायदे-कानून करून हे सारं काही थांबविता येणार नाही.तरी त्यामुळं बरेच नियंत्रण होईल.संशोधन प्रयोगशाळा आणि प्राणिसंग्रहालयातील चिम्पांझींचं राहणीमान उंचावं म्हणून जेन सातत्यानं काळजी वाहते.ती फार गाजावाजा किंवा आक्रोश करीत नाही.परंतु तिच्या शब्दाला मान आहे.


१९८९ साली जीव-औषधी शास्त्रज्ञांपुढे चिम्पॅन्झी आणि मानव यांच्यातील स्वभाव-साम्यांविषयी ती बोलली.तिच्या व्याख्यानानं अमेरिकेतील चिम्पांझींचे शास्त्रज्ञ गेझा टेलेकी प्रभावित होऊन म्हणाले, "पहिल्यांदा आम्हाला जाणीव झाली,की प्रयोगशाळेतील चिम्पॅन्झी उंदरापेक्षा निराळे आहेत." व्याख्यानाच्या शेवटी तेथील श्रोतृवर्ग टाळ्यांचा गजर करीत आनंदानं नाचला,तर कित्येक जणांच्या डोळ्यांत पाणी आलं.


वेळेअभावी आताशा जेन वर्षातून फक्त तीनदा गोम्बेला भेट देते.परंतु त्या भेटीचा तिला खूप आनंद होतो.ती म्हणते,

"चिम्पॅन्झर्झाबरोबर मला एकट्यानं राहणं आवडतं.त्यांच्या सहवासात साऱ्या विवंचनांचा मला विसर पडतो आणि मी मनानं प्रफुल्लित होऊन परतते."


गोम्बे येथील वास्तव्याचं तिसावं वर्ष साजरं करताना जेन म्हणाली,"ज्या चिम्पांझींना मी ओळखते,त्यांनी मला अति आनंद दिला व एक नवीन जीवनदृष्टी दिली. मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते.मी जगाला दाखवून दिलं,की ते कसे आगळेवेगळे प्राणी आहेत." अन् अशा प्राण्यांचे पुढील पिढीसाठी संरक्षण व जतन झाले पाहिजे. 


समाप्त…!!