* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: Great man Bapuji

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२६/२/२६

Great man Bapuji

कोणत्याही देशाच्या इतिहासात गांधीजींना स्वतःच्या जीवनात मिळालेले पूर्णत्व कचित इतरांच्या वाट्याला आले असेल ! जणू ते लिव्हिंग लिजंडच होते !


बापूजींनी ज्या गोष्टीला स्पर्श केला तिला मौलिकता प्राप्त झाली.त्या गोष्टींचे सोने झाले ! त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांनी प्रारंभ केलेल्या कार्यात पूर्णता मिळालेली नाही असे जरी त्यांना वाटत होते तरी त्यांच्या कार्यात त्यांना भरपूर यश मिळाले.गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे फलाची अपेक्षा न करता त्यांनी कार्य केले आणि फळ त्यांच्या पाठीमागे धावत आले.त्यांचे दीर्घ जीवन,त्या जीवनात त्यांनी केलेली कष्टाची कामे, ठराविक चाकोरीच्या जीवनक्रमातूनच त्यांनी केलेले विलक्षण धाडसी प्रयोग या सर्वांकडे दृष्टी टाकल्यानंतर त्यांच्या जीवनक्रमात कुठेही कसलाही विसंवादी स्वर ऐकू येत नाही.त्यांचे विविध क्षेत्रातले कार्य म्हणजे जणू काय स्वरैक्य.त्यांचा प्रत्येक शब्द व हालचाल म्हणजे जणू स्वरमालिका ! त्यांनी ज्या जीवनक्रमाची निवड केली तो जीवनक्रम जगाच्या रूढीपेक्षा भिन्न असला तरी त्यांनी जीवनाची कला आत्मसात केल्यामुळे नकळत ते एक संपन्न कलाकार झाले ! सत्याच्या व चांगुलपणाच्या शोधानेच मानवी जीवनाला कलेचा आकार मिळत जातो.


शक्तिमान आत्मा


गांधीजी जसजसे वृद्ध होत जाऊ लागले तसतसे त्यांचे शरीर म्हणजे त्यांच्या शरीरात वास करीत असलेल्या शक्तिमान आत्म्याचे ते एक कार्यवाहू साधन आहे याचा प्रत्यय येऊ लागला.त्यांचे भाषण आपण ऐकू लागलो, त्यांच्याकडे दृष्टी टाकली की त्यांच्या शरीराचा आपणांस विसर पडू लागला,व ते जिथे स्थानापन्न झाले ते मंदिर व त्यांनी पाऊल टाकले ती पवित्र भूमी असे आपणांस वाटू लागले!


पंडित जवाहरलाल नेहरू,संकलन: ह. वि. देसाई,गांधी नावाचे महात्मा,संपादन - रॉय किणीकर,सहाय्यक - अनिल किणीकर,

डायमंड पब्लिकेशन


त्यांच्या मृत्यूतदेखील उज्वलता,विकलात्मकता होती. बापूजी ज्या प्रकारचे जीवन जगले त्या जीवनाच्या दृष्टीने विचार करता त्यांचा मृत्यू हा त्यांच्या जीवनक्रमाचा कळस आहे असे सर्वार्थाने म्हणता येईल. सामर्थ्याची पूर्ण सूत्रे हाती असतानाच त्यांना मृत्यू आला! प्रार्थनेच्या क्षणी त्यांना मृत्यू आला याचे निःसंशय त्यांना समाधान वाटले असेल! ज्या ऐक्यासाठी त्यांनी आपल्या संबंध आयुष्यात अविरत कार्य केले,सारे जीवन वाहून घेतले व आयुष्याच्या अखेरीलाही त्यांनी आपली निष्ठा सोडली नाही त्या निष्ठेच्या परिपूर्णतेसाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले ! क्षणात मृत्यू यावा असे साऱ्यांना वाटते,तसाच डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्यांना मृत्यू आला! वयोमानाने अगर आजाराने शरीर कोमेजून जाते, निस्तेज होते अगर मनाला विस्मृती येते असे काही त्यांच्या बाबतीत झाले नाही.त्यांच्या शक्तीचा परमोत्कर्ष झालेला असतानाच त्यांना मृत्यू आला.आमच्या मनात व ज्या युगात आपण राहात आहोत त्या युगाच्या मनोमनी त्यांनी जे चित्र निर्माण केले आहे ते कधीच पुसले जाणार नाही.


ते चित्र तर कधीच पुसट होणार नाही.पण गांधीजींनी त्यापेक्षाही मोठी किमया घडवून आणलेली आहे.त्यांनी आमच्या मनाचा व बुद्धीचा ठाव घेऊन त्यांना वळण लावले.त्यांच्या कर्तृत्वाच्या काळात घडलेली पिढी काळाच्या प्रवाहात गडप होईल.पण त्यांनी या पिढीला जी शिकवण दिली ती शिकवण या नंतरच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.कारण गांधीजींनी दिलेली शिकवण ही भारताच्या आत्म्याचा एक भाग होऊन बसलेली आहे.ती भारताची अस्मिता आहे!


राष्ट्रीय वारसा


बापूजींनी भारताच्या राजकीय क्षितिजावर पदार्पण केले ते आम्हाला संपन्न करण्यासाठी,आम्हाला समर्थ बनविण्यासाठी.पण त्यांनी आम्हाला जे सामर्थ्य दिले ते एक क्षणाचे,एक दिवस पुरणारे,वर्षभर टिकणारे नसून त्या सामर्थ्याने आपणास राष्ट्रीय वारसा प्राप्त झाला आहे.त्यांनी आपल्या देशासाठीच नव्हे तर जगासाठीही महान कामगिरी बजावलेली आहे.तीसुद्धा विलक्षण प्रभावाने.आता त्यांनी जी कर्तव्ये,जीवनपद्धती निश्चित केली आहे तिच्याशी प्रामाणिक राहून आपले कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.आपण आता कर्तव्यपराङ्‌मुख होता कामा नये.त्यांच्या स्मृतीची आपणास कधी विस्मृती पडता कामा नये.आपण देशकार्याच्या बाबतीत जी प्रतिज्ञा घेतलेली आहे,ज्या प्रतिज्ञेचा आपण वारंवार पुनरुच्चार करतो ती प्रतिज्ञा साकार करण्यासाठी आपण आपल्या प्रयत्नांची व आपल्या शक्तीची पराकाष्ठा करायला हवी.


अशक्त शरीराच्या या छोट्या माणसाच्या शरीरात काहीतरी पोलादासारखे होते.कोणत्याही महान शक्तीपुढे त्यांचे ते शरीर नमले नाही.त्यांच्या चेहऱ्यात देखणेपणा नसला,त्यांनी कमरेला छोटेसे वस्त्र गुंडाळलेले असले तरी त्यांच्याकडे पाहताच आपण त्यांच्या राजेशाही तेजाने दिपून जात होतो,त्यांच्यापुढे आपण विनम्र होत होतो.आणि ज्या वेळी गांधीजी कोणतीही आज्ञा करीत असत त्या वेळी ती आज्ञा मानावीच लागे.त्या बाबतीत ते कुणाचीही गय करीत नसत.त्यांचे शांत,सखोल डोळे इतरांच्या अंतःकरणात भावनात्मक प्रतिसाद निर्माण करीत.त्यांच्या भाषणाच्या वेळी एखादा प्रेक्षक असो अगर हजारो प्रेक्षक असोत इतकी छाप पडे की,प्रत्येक जण गांधीजींशी तद्रूप होई. त्यांच्या भाषणाने श्रोते मोहित होतात,समरस होतात याचे कारण गांधीजींच्या वक्तृत्वशैलीने अगर शब्दावडंबराने ते भारले जातात असे नव्हे तर त्यांची भाषा साधी सोपी असते,त्यात मुळीच पाल्हाळ नसतो, त्यात एखादासुद्धा अनावश्यक शब्द नसतो.

निर्विवाद प्रामाणिकपणा,व्यक्ती वैशिष्ट्य यांचा लोकांवर प्रभाव पडतो.त्यांचे भाषण ऐकताना या छोट्या मूर्तीत प्रचंड आंतरिक सामर्थ्य असल्याचा प्रत्यय येतो.लोकांच्यावर प्रभाव पाडणे व प्रतिस्पर्थ्यांना जिंकणे ही गांधीजीची शक्ती विलक्षण आहेगांधीजी जितके नम्र होते तितकेच तत्त्वाचा प्रश्न आला तर कठोर व कणखर होते.


जितके मधुभाषी तितकेच तत्त्वाच्या बाबतीत कधी नमते न घेणारे,तितकेच प्रत्येक बाबतीत प्रामाणिक.त्यांचे डोळे दिसायला शांत पण त्या नेत्रांत निश्चयाची व शक्तीची ज्योत सतत तेवणारी!त्यांचा आवाज शांत स्वरुपाचा,कधी न चढणारा.लक्षावधी लोकांच्या गोंगाटात तो आवाज साऱ्यांना ऐकू येणारा! त्यांच्या शांत व मधुर आवाजात कुठे तरी पोलादाचा रस दडवला असावा! त्यांच्या आवाजात सभ्यतेचे व विनम्रतेचे मिश्रण झालेले होते.

तरीही त्या आवाजात भीती वाटावी इतकी गंभीरता सामावलेली होती.प्रत्येक शब्दात अर्थपूर्णता व काटेकोर आस्थेवाईकपणा.पण त्यांच्या प्रत्येक शांततेच्या व मैत्रीच्या शब्दांत ओतप्रोत सामर्थ्य सामावलेले होते व त्या प्रत्येक शब्दांत अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या निश्चयाची नि कृतीची शक्ती प्रतीत होत होती.


गांधीजी : एक कोडे


गांधीजी हे एक कोडे आहे,गूढ प्रश्न आहे.ती ब्रिटिश सरकारपुढे एक समस्या होती असे नव्हे तर त्यांचे स्वकीय नि सहकारी यांच्यापुढेही ती एक समस्याच होती.भारताखेरीज अन्य देशांत गांधीर्जीसारख्या धार्मिक द्रष्ट्याला काही स्थान मिळाले नसते.पण भारत अजूनही अशा धर्मात्म्याची भाषा समजू शकतो. म्हणूनच गांधीजी पापपुण्याच्या,सत्याच्या नि अहिंसेच्या गोष्टी बोलू शकले.

भारतीय पौराणिक काळात अशा संन्यस्त महापुरुषांच्या असंख्य गोष्टी असून या महापुरुषांनी आपल्या त्यागी जीवनाने नि तपः सामर्थ्याचा पर्वत निर्माण करून देवादिकांनाही हालविले आहे!आध्यात्मिक हानीच्या जलसंचयातून निर्माण झालेल्या गांधीजींच्या विलक्षण सामर्थ्याचा प्रत्यय येताच मला नेहमी पुराणकालातील महापुरुषांच्या चमत्कारांची आठवण येते.गांधीजी हे या जगातले साधेसुधे नाणे नव्हते,हे वेगळ्या पद्धतीचे,धातूचे,नाणे होते.त्यांच्या नेत्रातून नेहमी कुणीतरी 'अज्ञात' आमच्याकडे टवकारून पाहत होता !


अबाधित मोहकपणा,गूढ सामर्थ्य यांचा लोकमतावर प्रभाव पाडणारे गांधीजी लोकविलक्षण होते.गांधीजींचे लेखन अगर त्यांची सुभाषिते यावरूनही या लेखनाच्या मागे असणाऱ्या गांधींच्या स्वभावाची अगर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची काही कल्पना येत नाही. गांधीजींनी देशाची जी सेवा केली आहे,ती किती अभूतपूर्व! त्यांनी आपल्या देशबांधवांच्या अंतःकरणात धैर्य व पौरुषत्त्व निर्माण केले.त्यांनी जनतेला अहिंसा व सहनशीलतेची शिकवण दिली.त्यांनी लोकांना ध्येयासाठी आनंदाने त्यागाची परिसीमा गाठण्याची शिकवण दिली व त्यांच्यांत अभिमान निर्माण केला.धैर्य हा चारित्र्याचा प्रबल पाया आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यांनी एकदा असे उद्‌गार काढले होते,"धैर्याखेरीज जीवनात नैतिकता, धर्म व प्रेम यांना स्थान नाही. भीतीच्या भावनेतून सत्याचा अगर प्रेमाचा मार्ग दिसत नाही!" हिंसेपेक्षाही भ्याडपणा तिरस्करणीय आहे असे त्यांनी एकदा आम्हाला बजावले होते.माणसाला काही ध्येय गाठायचे असले तर शिस्त ही त्या कार्याची प्रतिज्ञा व हमी आहे! त्याग,शिस्त अगर मनोनिग्रह यांखेरीज मानवजीवनात अन्य मुक्ती नाही,शिस्तीखेरीज निव्वळ त्याग निरर्थक आहे असे गांधीजींचे स्पष्ट मत होते.


पुनरुज्जीवनाचा हेतू


गांधीजींशी ज्यांची प्रत्यक्ष ओळख नव्हती व ज्यांनी त्यांचे फक्त लिखाणच वाचलेले होते त्यांना गांधीजी म्हणजे एखाद्या धर्मोपदेशकासारखे कडक धोरणाचे, लांबट चेहऱ्याचे,

धर्मोपदेशकाप्रमाणे काळा झगा घालून फिरणारे असावेत असे वाटणे साहजिक आहे.पण गांधीजींच्या लेखनावरून त्यांच्या स्वभावाची पारख करणे अन्यायाचे ठरेल,गांधीजींनी जे लेखन केले त्यापेक्षाही ते फार मोठे होते.त्यांनी केलेल्या लिखाणावर टीका करून त्यांच्या मोठेपणाचे मूल्यमापन करता येणार नाही.त्यांचे हास्य जितके आनंददायक वाटत असे तितकेच ते परिणामकारक होते व त्या हास्यातून मनाच्या मोकळेपणाचा प्रत्यय येत असे.

त्यांच्या स्वभावात बालकाचा निर्व्याजपणा दिसत असे.मुलाच्या स्वभावातल्या मोहकपणाचाही त्यांच्या स्वभावात प्रत्यय येत असे.त्यांनी एखाद्या ठिकाणी प्रवेश केला की त्यांच्या पदार्पणासमवेत स्वच्छ वाऱ्याची झुळूक येऊन तिथले वातावरण तेजाळून टाकीत असे.गांधीजी नैसर्गिक सौंदर्याची वाखाणणी करीत असत तरी मानवनिर्मित सौंदर्याविषयी अगर कलेविषयी त्यांना फारशी कदर,आस्था नव्हती.पण त्यांनी आपल्या जीवनपद्धतीत आपल्या कल्पनेप्रमाणे जीवनसौंदर्य निर्माण केले होते.त्यांच्या प्रत्येक वागणुकीत अर्थ, सौंदर्य होते व कृत्रिमतेचा पूर्ण अभाव होता.


राष्ट्रीय चळवळीतही गांधीजींनी धार्मिकतेवर व आध्यात्मिकतेवर भर दिला.पण त्यांच्या धर्माच्या कल्पनेत ठोकळेबाजपणा अगर हटवादीपणा नव्हता. त्यांची जीवनाकडे पाहायची दृष्टी धार्मिकतेवर आधारलेली होती व त्यांच्या चळवळीवरही धार्मिक भावनेचा प्रभाव होता.तसेच सर्वसाधारण जनतेच्या हितसंबंधाच्या दृष्टीने गांधीजींच्या धोरणात पुनरुज्जीवनाचाच हेतू प्रामुख्याने सामावलेला होता. राजकारणात हिंदूंची अगर मुसलमानांचीही बाजू मांडताना धार्मिक प्रवृत्तीवर जो भर दिला जात होता त्याचे मला फार दुःख होत होते.हे धोरण मला मुळीच आवडत नव्हते.

मौलवी,मौलाना व स्वामी लोक आपल्या भाषणांत जाहीरपणाने ज्या घोषणा करीत असत त्या मला अत्यंत दुर्दैवी वाटत होत्या.

त्यांचे इतिहासाचे, समाजकारणाचे व अर्थशास्त्राचे ज्ञान मला अगदी चुकीचे वाटत होते आणि प्रत्येक गोष्टीला जे धार्मिक वळण दिले जात होते,त्यामुळे स्पष्ट विचारसरणीला पायबंद पडतो असे मला वाटत होते.गांधीजींचे काही विचारही मला विसंवादी वाटत असत.ते रामराज्याचा सुवर्ण युग म्हणून उल्लेख करीत असत व ते युग आपल्याला देशात निर्माण करावयाचे आहे असा वारंवार उल्लेख करीत असत.पण या बाबतीत गांधीजींशी वादविवाद करायला मी असमर्थ होतो.मी माझ्या मनाचे एवढेच समाधान करून घेत होतो की, रामराज्य हा शब्द लोकप्रिय आहे,लोकांना कळतो म्हणून गांधीजी त्या शब्दाचा उल्लेख करतात.कोणतेही विचार लोकांच्या अंतःकरणापर्यंत नेऊन पोहोचवायची त्यांना चांगली कला साधलेली होती.


गांधीजींचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे अत्यंत कठीण होते. सर्वसाधारण आधुनिक माणसाला त्यांची भाषाही समजत नसे.गांधीजींना आम्ही ओळखू शकलो असे आम्हाला वाटत असे.ते महान नेते आहेत या जाणिवेने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या हाती काही काळापर्यंत तरी कोरा चेक दिला होता.


नैतिक अधिष्ठानावर जोर


राजकारणात व इतर क्षेत्रांतही आम्हा सर्वांवर गांधीजींच्या विचारसरणीचा प्रभाव पडलेला होता. धर्मांच्या क्षेत्रातही आम्ही या प्रभावापासून फारसे अलिप्त नव्हतो.या विचारसरणीचा आमच्यावर प्रत्यक्ष प्रभाव पडत नव्हता तरी अप्रत्यक्षपणे प्रभाव पडला. आमच्या विचारसरणीच्या संरक्षणाचे किल्ले ढासळून पडत असत.धर्माचे बाह्य मार्ग,पद्धती मला मुळीच मान्य नव्हत्या व धर्माच्या नावाखाली धर्मवीरांनी जनतेची जी पिळवणूक अगर बनवाबनवी चालविली होती त्याचा मला मनापासून तिटकारा वाटत होता.पण आमच्या चळवळीला नि सत्याग्रहाला तेच नैतिक अधिष्ठान होते. अहिंसेच्या धोरणास मात्र मी कधीच पूर्ण मान्यता दिली नाही.त्या धोरणाचे मला जरासे आकर्षण वाटले. भारतातील परिस्थिती,आमच्या रूढी नि त्यांची पार्श्वभूमी यांचा विचार करता सध्याच्या परिस्थितीत हे धोरण ठीक आहे असे मला वाटते.पण ते धोरण कायमचे असावे असे मला कधीच वाटले नाही.धर्माचा संकुचित अर्थ न करता राजकारणात धार्मिक मूल्यांना स्थान देण्याची कल्पना मला बरी वाटली.योग्य साधनांनी योग्य साध्य गाठणे काही वाईट नाही.हे धोरण मला नैतिक तत्त्वाचे वाटते इतकेच नव्हे तर या धोरणात व्यवहारी राजकारणाचे धोरण सामावले आहे असेही वाटते.कारण साधने योग्य नसली तर आपण मनात बाळगलेल्या साध्यात आपल्याला अपयश मिळते.अनेक समस्या नि अडचणी उपस्थित होतात.


गांधीजी हे मूलतः धार्मिक प्रवृत्तीचे गृहस्थ होते. ते अंतःकरणाने हिंदू होते,त्यांच्या अंतःकरणाच्या कोपऱ्यातही हिंदुत्व होते.पण त्यांच्या धर्माच्या कल्पनेत मुळीच ठोकळेबाजपणा नव्हता.धार्मिक विधींवर त्यांचा विश्वास नव्हता.गांधीजींची धर्माची कल्पना म्हणजे नैतिक नियम,सत्याचे नि प्रेमाचे नियम ! सत्य नि अहिंसा हे शब्द गांधींजी एकाच अर्थाने वापरीत असत. हिंदुधर्माचे मूलभूत तत्त्वज्ञान आपणास अवगत आहे असा त्यांचा दावा होता.तेव्हा ज्या धर्मग्रंथात त्यांच्या ध्येयवादी धर्मतत्त्वाशी न जुळणारे धर्मतत्त्व नसेल त्या धर्मग्रंथांत कुणी तरी आगंतुकपणाने प्रक्षिप्त मजकूर घुसडलेला आहे असे त्यांचे मत होते. "नैतिक पातळीवरून ज्या धार्मिक रूढीचे मी समर्थन करू शकत नाही अगर ज्या रूढीचे मला आकलन होऊ शकत नाही त्या रूढींचा नि रीतिरिवाजांचा मी गुलाम होऊ इच्छित नाही," असे गांधीजींनी एकदा जाहीर केले होते.


स्वतंत्र धोरण


आपल्या कल्पनेप्रमाणे व तात्त्विक भूमिकेप्रमाणे मार्ग पत्करण्याचे गांधीजींचे स्वतंत्र धोरण होते.या धोरणानेच ते आपल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाला मुरड घालीत असत.त्या तत्त्वज्ञानाचा विकास करीत असत.पण त्यांनी जी नैतिक मूल्ये निश्चित केली त्या अनुरोधानेच ते जीवनविषयक तत्त्वज्ञानाकडे पाहात असत.त्यांचे ते तत्त्वज्ञान योग्य होते की अयोग्य होते हा वादाचा मुद्दा असू शकेल पण हे मूलभूत मोजमाप ते प्रत्येक गोष्टीस व स्वतःलाही लावीत असत.राजकारणात व इतर बाबतीतही सर्वसाधारण माणसाला ही गोष्ट अडचणीची भासू लागली.त्यामुळेही गैरसमजही निर्माण झाला. बदलत्या परिस्थितीशी समन्वय साधण्याचा गांधीजींचा सतत प्रयत्न चालू होता.कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीशी मिळते न घेता त्यांनी आपला सरळ मार्ग बदलण्याचा कर्धीही प्रयत्न केला नाही.त्यांनी ज्या सुधारणा सुचविल्या,जो उपदेश केला त्याची त्यांनी सरळ आपल्या जीवनात अंमलबजावणी केली.त्यांनी कोणत्याही सुधारणेची सुरुवात स्वतःपासून सुरू केली. आपल्या हातांवर हातमोजे घट्ट बसावे त्याचप्रमाणे गांधीजीचे शब्द नि कृती एकमेकात सामावून जात असत.म्हणूनच काहीही घडले तरी त्यांनी आपल्या मूलभूत धोरणातील प्रामाणिकपणा व एकात्मता कधी सोडली नाही.त्यामुळेच त्यांचे कार्य व जीवन यांचा पूर्ण मिलाफ झालेला दिसून येतो.त्यामुळे त्यांच्या जीवनात पराभवाचे ज्या ज्या वेळी प्रसंग आले त्या वेळीही त्यांचे व्यक्तिमत्त्व तेजाळल्याचा आपल्याला प्रत्यय आला.

त्यांच्या भारतासंबंधी कोणत्या कल्पना होत्या, कोणत्या ध्येयवादी कल्पनांनी त्यांना भारत घडवायचा होता.? 


अपुर्ण शिल्लक भाग पुढील भागात..