* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: निर्जन वाळवंटात अस्तित्वाची लढाई / The battle for survival in the desert

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१०/३/२६

निर्जन वाळवंटात अस्तित्वाची लढाई / The battle for survival in the desert

रिकीच्या पोटातली भुकेची भावना वाढीस लागते. 


सुरुवातीला 'सुटका व्हावी' या एकाच विचाराने त्याचं मन आक्रंदत असतं.मग त्याची जागा तहान घेते.आता नदीशेजारी राहून तहान भागल्यानंतर त्याचं पोट त्याला ओरडून भुकेची जाणीव करून देऊ लागतं;पण अजूनही ज्याने पोट भरेल असं काहीही त्याच्या नजरेच्या टप्प्यात येत नाही.मात्र,


अजूनही 'आपली सुटका होणार नाही' किंवा 'आपण आता मरू' या विचाराने रिकीच्या मनाला स्पर्शही केलेला नसतो. आज ना उद्या आपली सुटका होणार याची त्याला खात्री असते.


नदीच्या किनाऱ्याजवळून किंवा पात्रातून चालता चालता एके ठिकाणी त्याला एक पायवाट आतल्या बाजूला गेलेली दिसते.

आता त्याच्यापुढे प्रश्न उभा राहतो.या पायवाटेने गेलं तर कदाचित एखाद्या जाग असलेल्या शेतावर किंवा वस्तीवर आपण पोहोचू शकू. पण तसं करताना नदीची साथ सोडावी लागणार.पुढे गेल्यावर पाणी आणि खायला गवत मिळालं नाही तर काय करायचं ? बराच वेळ स्वतःशी वाद घालत तो त्या पायवाटेवरून जाऊन बघायचं ठरवतो.सुटका करून घ्यायची असेल तर आपल्यालाच हात-पाय मारावे लागतील,असं स्वतःला बजावतो.

पायवाटेवरून आत जमीन हळूहळू कोरडी होत जाते.अधूनमधून काही डबकी लागतात,पण थोड्या वेळाने तीही कमी होत जातात.

ऊन मी म्हणू लागतं.आपण नदी सोडून कुठून या दिशेला आलो,

असं रिकीला होऊन जातं.शिवाय,त्या पायवाटेने रिकीला अजून तरी कोणत्याही मानवी खाणाखुणांपर्यंत आणून पोहोचवलेलं नसतं.आता पुढे चालत राहावं की परत नदीपाशी जावं,असा विचार करत असताना वाट आणखी मोठी होते,झाडांची संख्या वाढते आणि थोड्याच वेळात रिकी एका प्रॉपर्टीपाशी येऊन थडकतो.तिथे कुंपण घातलेलं असतं आणि एक मोठ्या आकाराचा साइनबोर्डही.त्यावर लिहिलेलं असतं, हेट्सबरी बीफ कंट्री! ही जागा कुणाच्या तरी मालकीची आहे आणि आपण तिथे पोचलेलो आहोत ही गोष्टही रिकीला जवळपास सुटका झाल्याचा आनंद देते.


त्या रानात काही गाई आणि त्यांची वासरं फिरत असतात.भरपूर बीफ रिकीच्या टप्प्यात असतं,आतडी पिळवटून निघालेली असतात;पण गाय मारून खाण्याचा विचार तो फारसा गांभीर्याने करत नाही.एक तर आता आपली सुटका होणार असं त्याला वाटत असतं.दुसरं,हातात कुठलंच हत्यार नसताना गाईला मारणार कसं, हाही प्रश्न असतोच.नदी सोडल्यापासून न थांबता चालल्यामुळे रिकीचे पाय पुन्हा एकदा रक्तबंबाळ झालेले असतात.एका जागी शांतपणे बसून तो आधी पायांकडे लक्ष देतो.आता यापुढे या पायांनी चालणं म्हणजे थेट मांसाचे तुकडे जमिनीवर टेकवणं, तो सरळ आपला टी-शर्ट फाडतो आणि त्याचे तुकडे पावलांना गुंडाळतो.त्याने त्याच्या पायांच्या वेदना काहीशा कमी होतात एवढंच काय ते.चालायला मदत म्हणून रिकी एक चांगली काठीही पैदा करतो. त्याशिवाय चालणं आता जवळपास अशक्य झालेलं असतं.लवकरच ती काठी बहुपयोगी असल्याचं रिकीच्या लक्षात येतं.त्या काठीने तो खोदू शकत असतो.एखाद्या झाडावर काठी अडकवून त्यावर फाटक्या शर्टचं कापड टाकलं की उन्हापासून संरक्षण होतं असतं.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिकीला एक साथीदार मिळतो.त्याच्या जीवघेण्या एकटेपणापासून थोडीशी सुटका.स्वतःशी बोलून वैतागल्यामुळे तो या निर्जीव काठीशी गप्पा मारायला लागतो.काही काळातच ती काठी त्याच्यासाठी इतकी जिवलग बनते की ती आसपास नसेल तर तो अस्वस्थ होऊ लागतो.रात्रीच्या मुक्कामातही ती काठी कायम हाताशी असेल याची काळजी घेऊन झोपायची सवय त्याला लागते.


नदी सोडून दोन दिवस उलटून जातात.कुठे तरी डबक्यात साचलेलं चिखलाचं पाणी सोडलं तर त्याला प्यायला काहीही मिळालेलं नसतं.तहान असह्य होऊन तो एके ठिकाणी अंग टाकतो आणि देवाला म्हणतो,की आता पाऊस पाड.त्याशिवाय मी पुढे चालू शकत नाही. योगायोग असा,की खरोखरच तासाभरात आभाळ भरून येतं आणि पाऊस कोसळू लागतो.पोटभर पाणी पिऊन रिकी पुन्हा चालू लागतो.ही पायवाट आपल्याला माणसांपर्यंत घेऊन जाईल,ही त्याची आशा अजून तरी फोलच ठरलेली असते.ही वाट बहुतेक मला माझ्या थडग्याकडेच घेऊन चालली असावी,असे विचारही त्याच्या मनात घोळू लागलेले असतात.

तेव्हाच त्याला रस्त्यावर दोन बाजूंना दोन बाण असलेल्या पाट्या दिसतात.त्यातल्या कुठल्या रस्त्याने गेलं की एखादं घर असेल ? आपण नेमके त्याच्या विरुद्ध रस्त्याने गेलो तर काय? असे अनेक प्रश्न रिकीला पडतात.त्यामुळे तो दोन्हीकडे थोडं थोडं अंतर जाऊन बघायचं ठरवतो. एका रस्त्याने बरंच अंतर चालल्यावरही त्याला मनुष्यवस्तीच्या काहीच खाणाखुणा दिसत नाहीत.ना तिकडे पाणी असतं,ना खाता येईल असं गवत,ना आणखी काही.तिकडे रिकीला फक्त मोठाले दगड दिसतात.ते पाहून त्याला सुचतं,की ते एकत्र मांडून SOS चं चिन्ह काढता येईल,जेणेकरून आकाशातून जाणाऱ्या विमानांना ते दिसेल.अर्धा दिवस त्या प्रयत्नात घालवल्यानंतर तो पुन्हा दोन रस्ते फुटलेल्या जागेकडे चालू लागतो.संध्याकाळ झालेली असते आणि भुकेने रिकी इतका कासावीस झालेला असतो की न राहवून तो एका झाडावर बसलेल्या अळ्यांचा शोध घेऊ लागतो.


एका झुडपावर त्याला तशा अळ्या सापडतात.त्या खात असतानाच अचानक त्याच्या हाताला काही तरी जोरात चावतं.

पाहतो तो एक मोठा किडा त्याच्या हातावर बसलेला असतो.

त्याला इतक्या जोराने वेदना होतात की तो हात धरून जोरजोरात ओरडतो.त्या नादात आपण रस्ता सोडून आतल्या बाजूला भरकटलो आहोत याचं त्याला भान राहत नाही.थोड्या वेळाने त्याचं बोट,हात आणि नंतर चेहऱ्याची एक बाजूही सुजू लागते.

त्यातच अंधार पडतो आणि आपण रात्रीच्या मुक्कामासाठी जागाही न शोधता वेड्यासारखे इकडे-तिकडे फिरत ठेचकाळतो आहोत,या विचाराने रिकी आणखी घाबराघुबरा होतो.तो वेड्यासारखा रस्ता शोधत पळू लागतो.पहिल्यांदाच लक्कन त्याच्या मनात विचार येतो, की बहुतेक आपण या माळरानावरच मरून जाणार. आपलं काय झालं,आपण किती चाललो,किती सहन केलं,कुठे मेलो हे जगात कुणालाही कधीही कळणार नाही.इथेच कुठे तरी आपलं शरीर पडणार आणि जंगली कुत्री त्याची विल्हेवाट लावणार.हा विचार करतच तो रात्री तिथल्याच कुठल्या तरी झुडपाखाली कोसळतो.


पण पहाट पावसाची भुरभुर घेऊन येते.आपण रात्रीतून मेलो नाही.आपण जिवंत आहोत.एवढंच नव्हे,तर आपल्या तहानलेल्या जीवासाठी पाऊस पडतो आहे... रिकी नव्या उत्साहाने रस्ता शोधत चालू लागतो. भुकेमुळे समोर दिसणारं गवत,फुलं - जे शक्य असेल ते तो तोंडात टाकून बघत असतो.अखेर थोड्या वेळाने तो पुन्हा त्या पाट्यांपाशी येऊन ठेपतो आणि उलट दिशेने जाऊ लागतो.या सगळ्या गोंधळातही त्याने आपली काठी जिवापाड जपून ठेवलेली असते.


तिच्या साथीने पाय ओढत तो दिवसभर चालतो. रात्रीच्या सुमारास एका गवताळ,ओल्या भागापाशी येऊन पोहोचल्यावर तिथेच अंग टाकून झोपी जातो. डास आणि पिसवांनी त्याचा पिच्छा सोडलेला नसतो; पण त्यांना टाळणं अशक्य आहे हे मान्य करून त्याने त्या त्रासाचा विचार करणं सोडून दिलेलं असतं.


आता या वाळवंटात येऊन त्याला दोन आठवडे होऊन गेलेले असतात.आता यापेक्षा अधिक त्रास सहन करणं अशक्य आहे असं रिकीला वाटतं.आता काहीही करून आपली सुटका झालीच पाहिजे,असं तो स्वतःला बजावत असतो;पण त्याला कल्पना नसते की अजून बराच त्रास सहन करणं बाकी आहे.


एकदा थोडी हिरवळ आणि ओलावा असलेली जागा पकडून तो तिथे स्वतःसाठी आसरा तयार करायचं ठरवतो.पुढे चालायचं असेल तर दोन दिवस विश्रांती घेणं भाग असतं.काठीच्या आणि दगडांच्या मदतीने स्वतःला झोपता येईल एवढी जमीन उकरून तो त्यावरून पांघरण्यासाठी गवत आणि झाडांच्या फांद्या तोडून काढतो.तिथेच त्याला कित्येक दिवसांतला पहिला मांसाचा पहिला तुकडा खायला मिळतो.ती एक पाल असते.ती विषारी आहे की नाही,किंवा त्यातून असं कितीसं अन्न पोटात जाणार आहे याचा विचार न करता तो पटकन ती खाऊन टाकतो.तोवर त्याच्या शरीरातल्या भुकेच्या भावनेने राक्षसी रूप धारण केलेलं असतं. त्यामुळे पाल खाण्यात काही घृणास्पद आहे असं त्याला अजिबात वाटत नाही.आणखी दोन दिवसांच्या पायपिटीनंतर पुन्हा एकदा त्याला पाण्याची चाहूल लागते.हिरवाई वाढलेली असते. बेडूक आणि पालींसारखे प्राणी दिसू लागतात. जमिनीतली ओल वाढते.आणि एके दिवशी अचानक तो एका छोट्या बंधाऱ्याशी येऊन थांबतो.त्या बंधाऱ्यात भरपूर पाणी भरलेलं असतं.रिकी शांतपणे त्या पाण्यात शिरतो.पाण्यात पडून शरीराचा शीण कमी करण्याचा प्रयत्न करतो.या पाण्याच्या किनाऱ्यावर एक छोटंसं खोपटं बांधायचं,असा विचार करत तिथेच पडून राहतो. पाण्याजवळ राहायचं तर डासांपासून जीव वाचवण्यासाठी आसऱ्याची गरज असतेच.आजूबाजूच्या काटक्या,फांद्या आणि चिखल यांपासून तो आसरा बनवायला सुरुवात करतो.दिवसभर करायला दुसरं काहीच नसल्यामुळे त्यात मन गुंतून राहणं हाही फायदा असतोच.आसपास त्याला आणखी काही बांधकामाचं साहित्य दिसतं.त्यातून एक तात्पुरता आसरा तयार होतो.


रिकीला जग जिंकल्याचा आनंद मिळतो.रात्री झोपायला एक ठिकाण,सकाळी उठून बंधाऱ्यात पोहायचं,पोटाला तडस लागेपर्यंत पाणी प्यायचं,खाण्यासाठी पाली किंवा बेडूक पकडायचे,पुन्हा रात्री आसऱ्याला यायचं.थोड्याच दिवसांत रिकीच्या मेन्यूमध्ये आणखी काही पदार्थांची भर पडते - खेकडे आणि जळवा! सुरुवातीला जळू खावी की नाही याबाबत रिकी द्विधा असतो;पण एक जळू टपकवल्यावर (आणि आसपास असणारं जळवांचं प्रमाण पाहता) लवकरच तो त्याचा आवडता पदार्थ बनतो.


या डॅमवर रिकीचं एकुणात बरं चाललेलं असतं. डास-पिसवा आणि जोराचा पाऊस आला की गळणारं खोपटं सोडलं तर तसा फारसा त्रास नसतो;पण रिकीची तब्येत सुधारण्याएवढं खाणं त्याला कधीच मिळत नाही. त्यातच काही दिवसांनी पाऊस थांबतो.बंधाऱ्यातलं पाणी कमी होऊ लागतं आणि त्याबरोबर आसपासचे प्राणी,म्हणजे रिकीचं खाद्यही.शिवाय,बंधाऱ्याशी पाण्याजवळ थांबावं की सुटकेच्या आशेने चालत राहावं,हा यक्षप्रश्न नेहमीप्रमाणे रिकीपुढे उभा असतोच. इथे पाणी आणि थोडं अन्न असलं तरी जगाशी संबंध नसलेल्या या वाळवंटात किती दिवस खितपत पडणार? इथून थोडं पुढे गेल्यावर एखादी वस्ती असेल तर ? पण सोबत पाणी घेऊन जायला काहीही नसताना हे सुख सोडून जाणं बरोबर आहे का? अनेक उलटसुलट विचार त्याच्या मनात घोंघावत असतात.जणू एका माणसामध्ये तो चार-पाच माणसं वागवत असतो.


पण हळूहळू पाणी संपू लागल्यावर त्याला मुक्काम हलवण्याचा निर्णय घ्यावाच लागतो.स्वतः तयार केलेलं छोटंसं जग मागे ठेवून तो चालू लागतो.चालणं सुरू केल्यावर त्याला जाणवतं,की मध्ये पायांना विश्रांती मिळाली असली आणि थोडंफार खायलाही मिळालं असलं तरी आपली शक्ती आता कमी कमी होत चालली आहे.रिकीचं वजन तर प्रचंड उतरलेलं होतंच,पण त्याचा दमसासही अतिशय कमी झाला होता.


★★★ अपूर्ण ★★★