रिकी मेगी वाळवंटातल्या नरकवासातून परतल्यावर ऑस्ट्रेलियात बराच गदारोळ झाला.त्याची हकीगत खरी की खोटी यावर वर्तमानपत्रांत चर्चा झडल्या.अशाच एका वर्तमानपत्रातील पत्रकार ग्रेग मॅक्लीन याने रिकीच्या सविस्तर मुलाखती घेऊन हे 'लेफ्ट फॉर डेड इन द आऊटबैंक' हे पुस्तक आकारालं आणलं.
अतिशय कमी झाला होता.त्यातच उन्हाचा तडाखा आता आधीपेक्षाही वाढलेला असतो.संध्याकाळी ऊन उतरल्यावर तो सलग एखादा किलोमीटर चालू शकत असतो पण दिवसा मात्र शंभर-दोनशे मीटर चालल्यावरही त्याला दम लागू लागतो.त्यात आपण कुठे चाललो आहोत याची कल्पना नसल्यामुळे ही पायपीट आणखीच अंगावर येत असते.तहानेने जीव जातो की काय अशी परिस्थिती तयार होते.आपण वेड्यासारखे पाणी सोडून आलो याबद्दल रिकी स्वतःलाच शिव्या देतो;पण दोन दिवस त्या स्थितीत काढल्यावर पुन्हा एकदा त्याला झाडांची गच्च दाटी लागते आणि त्यापल्याड आणखी एक पाणथळ रिकीची वाट पाहत असते.हाही बंधाराच असतो,पण आधीच्या बंधाऱ्यापेक्षा किती तरी मोठा.आता या बंधाऱ्यापाशी तरी माणसं असलीच पाहिजेत;अन्यथा,कोण कशाला एवढा बंधारा बांघेल,असा विचार करत रिकी स्वतःला पाण्यापाशी झोकून देतो.
थोड्याच वेळात या नव्या बंधाऱ्याच्या भोवतीही रिकीचं विश्व उभं राहू लागतं.तहान-भुकेची व्यवस्था लागल्यावर तो पुन्हा एकदा राहण्यासाठी नवं खोपटं बांधण्याच्या मागे लागतो.या वेळी त्याचं नशीब जोरावर असतं.त्या कुरणावर त्याला गाई-म्हशींना खाद्य द्यायला वापरलं जाणारं मोठं लोखंडी पिंप सापडतं.जमिनीत खड्डा करून त्यात ते पिंप आडवं घट्ट बसवल्यावर रिकीचं घर तयार होतं.शिवाय डास आणि पाऊस आत येऊ नये म्हणून नाना आयडिया लढवून तो ते घर फुलप्रूफ बनवतो.आणि सुरू होतो संघर्षाचा नवा टप्पा.
या घरामुळे लवकरच रिकीला आणखी एक शोध लागतो.त्या घरात फांद्यांची जाडजूड बिछायत घातली नाही तर उन्हामुळे तापलेल्या पत्र्यामुळे रिकीचं बूड शेकून निघत असतं.त्यावरून त्याला आपलं खाणं या पत्र्यावर ठेवून भाजून घेण्याची कल्पना सुचते.मग तर काय,आता खरंखुरं जेवण जेवल्याचा आनंद त्याला मिळू लागतो.या नव्या जागी रिकीच्या खाद्यपदार्थांमध्येही बरीच वाढ होते.नवे किडे,नव्या प्रकारच्या अळ्या,बेडकांच्या किती तरी जाती आणि पाली असा खुराक सुरू होतो.असेच दिवस जात राहतात.रिकीच्या घराच्या आसपास कुणीही फिरकत नाही.या वाळवंटात भरकटून त्याला आता दीड महिना उलटून गेलेला असतो.आपण आता कायमचे इथेच मुक्कामी असणार की काय असं रिकीला वाटू लागतं. दोन-तीन वेळा एक छोटं विमान त्याच्या डोक्यावरून अगदी जवळून उडत जातं.रिकीला वाटतं,पायलट आपल्याकडे पाहतो आहे;पण प्रत्यक्षात पुढे काहीच घडत नाही.
खाणं-पिणं,खोपटं आणखी सोईचं बनवण्यासाठी दिवसभर काहीबाही करत राहणं आणि उरलेला वेळ पाण्याकाठी किंवा खोपटात बसून विचार करत राहणं एवढंच रिकीच्या हातात असतं. आणखी एक काम त्याला सतत व्यापून असतं.वेळ मिळेल तेव्हा तो आग पेटवण्याचा प्रयत्न करून पाहत असतो.कधी दगड एकमेकांवर घासून,तर कधी लाकडं, तर कधी सूर्याच्या उष्णतेचा उपयोग करून.पण त्यात मात्र रिकीला काही केल्या यश मिळत नाही.त्या काळात त्याच्या मनात काय काय चालू राहतं.
आजवरच्या आयुष्यात घडून गेलेलं सारं पुन्हा अनुभवल्यासारखं समोर येतं.बालपणीच्या आठवणी,आई-वडील, बहिणी, मित्र-मैत्रिणी,आनंदाचे दिवस,केलेल्या चुका.. असं बरंच काही मनाशी घोळवत तो आला दिवस काढत असतो. अनेकदा त्याच्या मनात लिफ्टच्या बहाण्याने त्याला लुबाडणाऱ्या आणि इथे वाळवंटात आणून सोडणाऱ्या चोरट्यांचाही विचार येत असतो.तो विचार आला की त्याचं शरीर तापायला लागत असतं.इथून सुटलो की त्या लोकांना शोधून काढायचंच,असं तो स्वतःला बजावत असतो.पण आता त्याचा सगळा प्रयत्न सुटकेसाठी नव्हे,तर केवळ जिवंत राहण्यासाठी असतो. आरसा नसला तरी अनेकदा बंधाऱ्याच्या नितळ पाण्यात डोकावून बघताना त्याला स्वतःचं झपाट्याने खंगत चाललेलं शरीर दिसत असतं.उठता-बसता त्याला स्वतःचीच हाडं टोचू लागलेली असतात.शंभर किलोचा दणकट रिकी आता एक सांगडा बनून राहिलेला असतो.
काही दिवसांनी रिकीला एक मित्र मिळतो.ते एक वाळवंटी कुत्रं असतं.एक डोळा फुटलेलं कुत्रं.लवकरच रिकी त्या कुत्र्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो. इतके दिवस ज्या गोष्टी तो स्वतःशी आणि त्या काठीशी बोलत असतो त्या सांगायला एक जिवंत प्राणी मिळतो.काही दिवसांनी पुन्हा दिवस पालटतात.पाऊस थांबतो आणि रिकीच्या अन्न-पाण्याचा साठा हळूहळू कमी होऊ लागतो. पाणी आणि प्राणी आणखी बरेच दिवस पुरतील अशी रिकीची खात्री असते;पण ते संपल्यावर काय,हा विचार त्याला अस्वस्थ करत असतो.त्याला मनातून जाणवू लागलेलं असतं,की आता यापुढे नव्याने मोहीम सुरू करण्याची शक्ती आपल्यात राहिलेली नाही. त्यामुळे तो अन्न आणि पाणी दोन्हीही जपून वापरायला सुरुवात करतो.मध्येच एकदा त्याच्या परिसरात काही छोटे इमू न जाणे कुठून पाण्याच्या शोधात भरकटत येतात.त्यांच्याकडे पाहिल्यावर रिकीचे डोळे चमकतात. एखाद्या इमूला जरी आपण मारू शकलो तर.. पण हे काम कोणत्या हत्याराने तडीस नेता येईल याचा विचार करेपर्यंत ते इमू सुसाट वेगाने आले तसे गायब होतात. एकदा एक कांगारूही त्याच्या जवळ येतो;
पण तोही हुलकावणी देऊन पळ काढतो.अर्थात,एवढे मोठे प्राणी मारण्याची ताकद आपल्यात राहिलेली नाही,हेही रिकीला मनातून माहिती असतंच.एकेक करून प्राणी संपत जातात.आसपासची हिरवळ आणि पाणीदार फुलंही खाऊन संपू लागतात.एवढंच काय,बंधाऱ्यातलं पाणीही कमी होत शेवाळ्याने भरलेल्या डबक्याचं रूप घेतं.एकाक्ष कुत्रा अजूनही रिकीच्या मागे मागे फिरत असतो.हा खरोखर आपल्याला मित्र मानतोय की आपण मरण्याची वाट बघतोय हे रिकीला कळेनासं होतं.कधी कधी त्याचीही मती फिरते.त्याला वाटतं,
आपल्याजवळच्या लोखंडी सळीने या कुत्र्याला मारावं आणि त्याला खावं;पण मित्र मानलेल्या कुत्र्याला मारायला काही केल्या रिकीचं मन धजत नाही.आणि एके दिवशी अचानक तो कुत्रा गायब होतो.त्याला कुणी मारलं की तो आपोआप मेला,की फक्त दुसरीकडे कुठे तरी भरकटत गेला ते रिकीला कळू शकत नाही.त्याच्या एकुलत्या एक सोबत्यानेही त्याची साथ सोडलेली असते.
आता आपली सुटका होईल का,हा विचार मनात आणणंही रिकीला नकोसं वाटतं.त्या विचाराने त्याचं आधीच निराश झालेलं मन आणखी गटांगळ्या खाऊ लागतं.एके सकाळी त्याला जाग येते तेव्हा कुत्र्यांच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू येतो.पाहतो तर चार-पाच दांडगट वाळवंटी कुत्रे त्याच्या खोपटाभोवती घिरट्या घालत असतात.गिधाडाने मरणाऱ्या प्राण्याची आशाळभूतपणे वाट पाहावी तसंच ते दृश्य असतं.हे आपलं घर नसून आपलं थडगं आहे,असं रिकी स्वतःशीच खूपदा म्हणत राहतो.त्या कुत्र्यांमुळे त्याचं खोपटातून बाहेर पडणं जवळपास बंद होऊन जातं.ते आसपास नाहीत असं बघून जवळचंच गवत तोंडात कोंबून आणि शेवाळलेलं पाणी पिऊन रिकी खोपटात पडून राहू लागतो.
आपल्यात आणि जंगलातल्या प्राण्यांमध्ये काहीच फरक नाही असं त्याला वाटू लागतं. त्या प्राण्यांना किमान त्रासाची जाणीव तरी नसते. आपलीही आता या त्रासातून सुटका झाली तर बरं, असा विचार त्याच्या मनात येऊ लागतो.आता मृत्यू सोडून आणखी काय वाईट घडू शकणार,असं वाटत असतानाच त्याला पुढचा फटका बसतो.
एके दिवशी रिकी उठतो तेव्हा त्याच्या चेहऱ्याची डावी बाजू सुजून ठणकत असते.रात्रीतून एखादा विषारी किडा आपल्याला चावला असावा असा अंदाज तो बांधतो.थोड्याच वेळात ते विष त्याच्या डाव्या हाताकडे पसरतं.आता आपण झोपून राहिलो तर कधी तरी ग्लानीतच आपल्याला मृत्यू येईल असं वाटून रिकी पडून राहतो;
पण किती तरी तास उलटतात,तरी ना मृत्यू येतो ना वेदना कमी होतात.आता तर त्याचा जबडा जवळपास बंद होतो.हाताने जोर धरून तो उचकटूनच त्याला तोंडात गवत कोंबावं लागत असतं.
गवत आत गेल्यावर तर मरणाच्या कळा सुरू होत असतात. त्याच्या लक्षात येतं,की आपल्याला विषारी किडा चावलेला नसून वेदना किडलेल्या दाढेमुळे होताहेत. खूप धीर एकवटून तो तोंडात बोट घालून खरोखरच कोणती दाढ दुखते आहे ते तपासतो.त्याचा अंदाज खरा असतो.ती दाढ काढून टाकली नाही तर काहीही खाणं अशक्य होऊन आपण मरणार हे त्याला कळून चुकतं. पण तसेही आपण कुठे जिवंत राहणार आहोत ? मग हातात काहीही साधन नसताना एवढी अघोरी शस्त्रक्रिया कशाला करायची,या उलटसुलट विचारांमध्ये आणखी दोन दिवस जातात.आता मात्र त्याला वेदना इतक्या असह्य होतात की आपल्या कारची किल्ली तोंडात घालून ती दाढ उपटण्याचा प्रयत्न तो सुरू करतो.सोबतीला वाकवता येतील अशा छोट्या ताराही असतात.आपण किती वेदना सहन करू शकतो हे आजवर आपल्याला माहितीच नव्हतं,असं रिकीला वाटून जातं.बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि असह्य छळ सहन केल्यानंतर कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू जाईल एवढ्या किंकाळ्या फोडत तो दात उपटून काढण्यात रिकी यशस्वी होतो.
ही शस्त्रक्रिया झाल्यावरही किती तरी वेळ रिकीला काहीही तोंडात घालता येत नाही की उठून पाण्यापर्यंत जाता येत नाही.त्या खोपटात चार-पाच दिवस अडकून पडल्यानंतर रिकीला वाटतं,
आता पुन्हा एकदा बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा;पण त्याचे पाय एखाद्या जेलीसारखे निर्जीव झालेले असतात तो पायांवर उभाच राहू शकत नाही. कसा तरी लोळण घेत तो बंधाऱ्यातल्या पाण्यापर्यंत पोहोचतो.पुन्हा तसाच खोपटापर्यंत लोळत येतो. तिथेच पडून राहतो - मृत्यूची वाट बघत.त्यानंतर काहीच दिवसांत..अचानक रिकीला कारचा आवाज ऐकू येतो पण हा नक्कीच वाऱ्याचा आवाज असणार असं समजून तो त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला भास होणंही अवघड नाही हेही त्याला माहिती असतंच.पण थोड्याच वेळात त्याला गिअर बदलण्याचाही आवाज येतो.वारा काही गिअर बदलत नाही,असं म्हणत तो आपल्या खोपटातून बाहेर डोकावतो,तर काही अंतरावर खरोखरच एक गाडी उभी असते.त्यातली दोन माणसं कुतूहलाने रिकीच्या खोपटाकडेच पाहत असतात.रिकीचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही.तो जोरजोराने त्यांच्याकडे बघून हात हलवू लागतो,खोपटातून बाहेर येण्यासाठी धडपडतो.
खोपटात कोणी तरी असल्याचं पाहून त्या माणसांचा हात नकळत आपल्या बंदुकीवर जातो;पण तेवढ्यात रिकी उठून उभा राहण्यात यशस्वी होतो आणि हा माणूस असल्याचं त्यांना कळतं.तब्बल ७१ दिवस मृत्यूच्या दाढेत वावरल्यानंतर रिकी मेगीसाठी पुन्हा एकदा जीवनाचे दरवाजे उघडलेले असतात.
●●● समाप्त ●●●