महंमदाच्या मरणानंतर पुष्कळशा शतकांनंतर हे जग मुसलमान व ख्रिश्चन यांच्यामधील युद्धभूमी झाले.मशीद व चर्च यांमध्ये लाजिरवाणी स्पर्धा सुरू झाली होती.शरीरे मारून मानवी मनाचा ताबा कोणी घ्यायचा याबाबत या दोघांमध्ये शर्यत लागली होती.वास्तविक पाहता,खरा मुसलमान ईश्वरशरण असतो,व खरा ख्रिश्चन शांतीचे उपनिषद् मानतो. पण अनुयायी मिळविण्याच्या स्पर्धेत दोघांनाही आपापल्या सत्यधर्माचा विसर पडला.या दोन्ही धर्मांस उगाच नावे ठेवायची अशातला भाग नाही. नेहमीच तलवारीने धर्म लादला गेला असे नाही. कितीतरी मुसलमान व (शार्लमन : पोपला वाचवून स्वतः सम्राट होणारा,
मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - सानेगुरुजी, मधुश्री पब्लिकेशन)
खिश्वन असे होते की,त्यांनी आपल्या उदार व उदात्त वर्तनाने परधर्मीयांमध्ये ईश्वरशरणागतीचा सुंदर मुस्लीम धर्म व प्रेमाचा खिश्चन धर्म यांचा प्रसार केला.पण त्या त्या धर्मानुयायांचे पुढारी महत्त्वाकांक्षी असत,त्यांना कशाचीही दिक्कत नसे. धर्माच्या मिषाने,धर्माच्या बुरख्याखाली व ईश्वराच्या नावाने ते स्वार्थ साधू पाहत.महंमदानंतर जे मुस्लीमांचे खलिफा झाले,त्यांनी मुस्लीम धर्म व मुस्लीम सत्ता रक्ताने सर्वत्र चालू करण्याचे व्रत उचलले.आफ्रिकेचा उत्तर भाग व युरोपातील स्पेन देश वगैरेंकडे हाती तलवार घेऊन ते दयाळू अल्लाचे भीषण वैभव पसरवीत चालले.ख्रिश्चन धर्मीय राजांनीही प्रेमसिंधू येशूचा धर्म पश्चिम युरोपभर रक्ताने शिकविला.
मुसलमान आपला धर्म वर उत्तर फ्रान्समध्ये नेऊ लागताच खाली स्पेनमध्ये येणाऱ्या ख्रिश्चनांशी त्यांची झटापट झाली.महंमदाच्या मरणानंतर बरोबर शंभर वर्षांनी टूर्स येथे झालेल्या मोठ्या लढाईत शार्लमनचा आजा चार्लस मार्टेल (मार्टेल = धाव घालणारा) याच्या सेनापतित्वाखाली लढणाऱ्या ख्रिश्चनांचा विजय झाला.
चार्लस मार्टेल हा फ्रान्सच्या राजाचा मुख्य प्रधान होता.त्या वेळचे फ्रेंच लोक आजच्या फ्रान्समध्ये व जर्मनीमध्ये राहत होते;फ्रान्समध्ये राहणारे ज्या भाषेतून पुढे आजची फ्रेंच भाषा बनली,ती भाषा बोलत व जर्मनीत राहणारे फ्रेंच ज्या भाषेतून पुढे आजची जर्मन भाषा बनली,ती 'टिओटिक' म्हणजे 'जनतेची भाषा' बोलत.अशा रीतीने भाषांत फरक होते,तरी प्रसंगी फ्रेंच व जर्मन एकच होते,दोघांचा राजाही एकच होता.चार्लस मार्टेलच्या वेळी राजा केवळ नामधारी होता.मुख्य प्रधानच सर्वसत्ताधीश अनभिषिक्त हुकूमशहा होता.टूर्स येथे फ्रँकांनी मुसलमानांचा पराजय केला त्याचे श्रेय राजाकडे न जाता चार्लस मार्टेल यालाच मिळाले.'ख्रिश्चन धर्माचा त्राता','ख्रिस्ताचे नाव राखणारा',म्हणून त्याचा गौरव करण्यात आला. इटलीतील लंबार्डियन लोक ख्रिश्चन शिकवण मानीत नव्हते,म्हणून त्यांच्यावर स्वारी करण्यासाठी पोपने मार्टलला गौरवपूर्वक बोलावले;पण पोपला साह्य करण्यापूर्वीच मार्टल मरण पावल्यामुळे ते काम 'ठेंगणा पेपिन' नावाच्या त्याच्या मुलावर पडले.तो फ्रैंकाच्या राजाचा मुख्यमंत्री होता;पण मुख्य प्रधानकीवर त्याला समाधान नव्हते;राजा होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती.इटलीत जाण्यापूर्वी ज्याच्या हाती खरोखर खरी राजसत्ता आहे,
त्यानेच राजा का होऊ नये?"असा मोठा मुत्सद्देगिरीचा व सूचक प्रश्न त्याने पोपला केला. पोपने होकारार्थी उत्तर पाठवून फ्रँकांचा राजा "चाइल्डेरिक" याला भिक्षू होण्यास सांगितले व पेपिनला 'ईश्वराच्या कृपेने झालेला फ्रँकांचा राजा' म्हणून गादीवर बसविले
पोपच्या या उपकाराची परतफेड म्हणून पेपिनने इटलीवर स्वारी केली व लंबार्डीतील लोकांना जिंकून त्यांची अनेक शहरे पोपला भेट म्हणून दिली.'पेपिनची देणगी' या नावाने ही भेट प्रसिद्ध असून हिच्या योगानेच चर्चच्या ऐहिक वैभवाचा, पृथ्वीवरील सत्तेचा प्रारंभ झाला.यापूर्वी पोप केवळ काल्पनिक अशा स्वर्गातील राज्यातच दंग असत; पण यानंतर ते पृथ्वीवरच्या खऱ्याखुऱ्या धनदौलतीत रस घेऊ लागले.
चर्चचे व स्टेटचे लग्न लागले,पेपिनच्या देणगीपासून सुमारे हजार वर्षे चर्चने जगावर प्रभावी वर्चस्व गाजविले,व ते बव्हंशी शापप्रद व दुःखदायकच होते.
ठेंगू पेपिन इ.स. ७६८ मध्ये मरण पावला व त्याचा मुलगा शार्लमन हा न्यूस्टिया व आस्ट्रेशिया म्हणजे आजचे फ्रान्स व जर्मनी यांचा राजा झाला.शार्लमन या शब्दाचा अर्थ मोठा चार्लस शार्लमन पित्याप्रमाणेच महत्त्वाकांक्षी वीर होता,
चर्चचा कड़वा रखवालदार होता.उत्तर स्पेनमध्ये त्याने सारासीन मुसलमानांचा पराजय केला. सारासीनांना युरोपातून संपूर्णपणे हाकलून देण्याचा प्रयत्न त्याने केला;पण त्याला त्यात यश आले नाही.ही जी पवित्र युद्धे चालली होती,त्यांचा परिणाम म्हणून शेवटी मुसलमान व ख्रिश्चन यांच्या दरम्यान पिरनीज पर्वत ही हद्द ठरली.दक्षिण स्पेनची सत्ता मुसलमानांनी आपल्या हाती ठेवली.ख्रिश्चन लोक शार्लमनच्या पवित्र मुठीच्या संरक्षणाखाली उत्तरेकडे,तद्वतच पूर्व युरोपभर पसरले.न्यूस्ट्रिया,आस्ट्रेशिया,क्रिशिया,
अक्विटेनिया,बर्गंडी, बव्हेरिया, लंबार्डी,सॅक्सनी इत्यादी सर्व प्रदेशांवर शार्लमनची सत्ता प्रस्थापित झाली.शार्लमनला सॅक्सनीबरोबरच बरीच लढत द्यावी लागली.तेथील लोक बरेच हट्टी होते.ते एकदम नवीन धर्म पत्करीनात.पण शार्लमनने एका दिवसांत साडेचार हजार लोकांची कत्तल करून शेवटी त्यांच्या गळी ख्रिश्चन धर्म उतरविलाच.जे जिवंत राहिले,त्यांनी ख्रिस्त हा दयाळू आहे हे मुकाट्याने कबूल करून बाप्तिस्मा घेतला व ख्रिश्चनांचा धर्म स्वीकारला.
इ.स. ७९९ मध्ये शार्लमनला जरा नाजूक कामगिरी करायची होती.पोप तिसरा लिओ याच्यावर व्यभिचाराचा आरोप करून स्थानिक संस्कृतिसंरक्षकांनी त्याला मरेमरेतो ठोकले.शेवटी, तो आश्रयार्थ एका मठात गेला.त्याने शार्लमनची मदत मागितली.शार्लमन हा धर्माचा परित्राता होता, संघटित चर्चचा संरक्षक होता.शार्लमनने गुन्ह्याची चौकशी करून पोप निर्दोषी आहे,असे जाहीर केले. पोप खरोखर गुन्हेगार होता की नाही,हा भाग वेगळा;पण न्यायाधीश म्हणून बसण्याला मात्र शार्लमन लायक नव्हता.कारण तो निष्ठावंत ख्रिश्चन असला,तरी त्याच्या आवडीनिवडी मुसलमानी होत्या.त्याच्या चार बायका होत्या,पाच रखेल्या होत्या,त्याला सतरा मुले होती,
त्यांपैकी बरीच अनौरस होती.पण त्याने पोपला निर्दोष ठरविल्यामुळे पोपचे कल्याण झाले,त्याचप्रमाणे त्याचा स्वतःचाही फायदा झाला. इ.स. ८०० च्या नाताळच्या दिवशी तो सेंट पिटरच्या चर्चमध्ये प्रार्थना करीत असता एकदम पोप लिओ जणू काय दैवी प्रेरणा झाल्याप्रमाणे तिथे आला व त्याने शार्लमनच्या मस्तकावर सुवर्णमुकुट ठेवला. शार्लमन चकित झाला,निदान वरपांगी तरी त्याने आश्चर्यचकित झाल्यासारखे दाखविले.वास्तविक, त्या क्षणाची तो वाटच पाहत होता.तो मुकुट तयार झाल्याचे,तद्वतच पोप त्या दिवशी त्याच्या डोक्यावर ठेवणार असल्याचे,त्याला माहीत होते.तो जणू प्रार्थनेतच तन्मय झाला होता,प्रभुचितनात एकरूप झाला होता! त्याच्या डोक्यावर मुकुट ठेवला जाताच त्याने चकित होऊन डोळे उघडले.
नाटक बेमालूम वठले.प्रभूने जणू शार्लमनला सम्राट बनविले.प्रभूनेच पोपला ऐन वेळी स्फूर्ती दिली, असे सर्वत्र बोलले जाऊ लागले.शार्लमन अती पवित्र व देवाचा लाडका म्हणून मानला जाऊ लागला.जुन्या रोमन साम्राज्याची पुनर्स्थापना करून विजयी ख्रिस्ताच्या नावे नवे राज्य स्थापण्यासाठी शार्लमनची ईश्वरानेच निवड केली असे सर्वजण म्हणू लागले.शार्लमनला बाहत्तर वर्षांचे आयुष्य लाभले.त्याने मठ बांधले,लॅटिन भाषेच्या व्याकरणात ढवळाढवळ केली व त्याला नीट लिहिता-वाचता येत नव्हते,तरी ज्योतिष व तत्त्वज्ञान या विषयांतही त्याची लुडबूड चालूच होती!न ऐकणाऱ्यांच्याही डोक्यात सोटे मारून तो बायबल कोंबू पाहत होता.तो दारू पित होता; मांसाच्या मिटक्या मारीत होता;परधर्मीयांना स्वधर्मात आणीत होता,त्यांच्या बायकांस आपल्या विलासस्थानी नेत होता.ईश्वराची पूजा करीत होता व बेकायदा मुलेही पैदा करीत होता.अशा लीला करीत इ.स. ८१४मध्ये या स्वारीने देह ठेवला.पुढे तीनशे वर्षांनी ख्रिश्चन चर्चने त्याच्या कामगिरीचा गौरव करून त्याला संत केले.पण ख्रिस्ताने अशांचा अंतर्भाव आपल्या मित्रांत खचित केला नव्हता.ख्रिश्चन धर्म वाढविण्याची त्याला इतकी तहान लागली होती की,त्या भरात ख्रिस्ताच्या शिकवणीचा आत्माही तो विसरून गेला.ईश्वराच्या नावाआड स्वतःची पापकृत्ये लपविणाऱ्या दांभिक गुंडांमधला तो मुकुटमणी होता !
◇◇◇ समाप्त..◇◇◇