* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एका महामानवाचे एक भव्य स्वप्न ! A grand dream of a great man!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

7/15/26

एका महामानवाचे एक भव्य स्वप्न ! A grand dream of a great man!

त्यांचं म्हणणं एका दृष्टीने अगदी बरोबर आहे. गांधीजींची विचारप्रणाली भारतीय संस्कृतीला आधारभूत असलेल्या तत्त्वांशी मिळती जुळती आहे; इतकंच नव्हे तर,विविध धर्मांतल्या मध्यवर्ती शिकवणुकीशीही तिचं अगदी जवळचं नातं आहे, 

'धर्मादर्थश्च कामश्च सधर्मः किं न सेव्यते' (धर्मापासून अर्थ आणि काम या दोहोंचाही लाभ होतो, असं असून, धर्माचा अवलंब मानव का करीत नाही?) हा व्यासांचा आर्त आक्रोश विसाव्या शतकातल्या गांधींच्या तोंडीही शोभून दिसतो यात शंका नाही.

व्यक्तिजीवनाची कोंडी फोडून धर्मबुद्धीनं दैनंदिन सामाजिक जीवनात प्रवेश केला पाहिजे,म्हणून गांधींनी आमरण जीवाचं रान केलं.त्यांच्या शिकवणुकीचा आत्मा विश्वात्मक धर्मबुद्धी हाच आहे.या धर्मबुद्धीभोवती परिस्थितीला अनुरूप अशा नानाविध चळवळी त्यांनी उभ्या केल्या.या चळवळींच्या अनुषंगानं जे कर्मकांड निर्माण झालं,तेच त्यांच्या अनेक अंध अनुयायांनी गांधीवाद म्हणून उराशी कवटाळलं.प्रत्येक धर्माच्या बाबतीत दुर्दैवानं असंच घडत आलं आहे.मग बिचारी गांधींची धर्मबुद्धी तरी त्याला अपवाद कशी होणार? हा हा म्हणता गांधीवादाचा गंडा बांधणारे खरेखोटे शिष्य निघाले.ज्यांना जमले त्यांनी आपले मठ स्थापन केले देवळं बांधली.साहजिकच पुजाऱ्यांची वर्दळ वाढली. नैवेद्याची अडचण पडू नये म्हणून सर्वप्रकारची दक्षता घेण्यात येऊ लागली.काहींनी श्रद्धेनं,अनेकांनी प्रवाहपतित म्हणून आणि पुष्कळांनी लाभ उठविण्याच्या उद्देशानं,निर्जीव गांधीवादाच्या धुपारत्या काकडआरत्या तार स्वरात म्हणायला सुरुवात केली.हे जे विपरीत घडलं,त्याचा दोष गांधींना किंवा त्यांच्या शिकवणुकीला देणं हे अतिशय अन्यायाचं होईल.असा दोष देण्यानं संन्याशाला चोर म्हणून सुळी देण्याचं क्षणिक समाधान लाभेल;पण खरे अट्टल चोर चोऱ्या करायला मोकळेच राहतील.

त्या विद्यार्थ्यांच्या अप्रीतीचं दुसरं लक्ष्य होतं गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची पोपटपंची करीत रहाणारे कार्यकर्ते.सर्व गांधीवादी कार्यकर्त्यांवर हा आरोप करता येणार नाही, हे माझ्या तरुण मित्रांना समजावून सांगणं सोपं आहे. विनोबा,जयप्रकाश यांसारख्यांची नुसती नावं घेतली किंवा भूदान ग्रामदान यांसारख्या चळवळींचा उल्लेख केला तरी,या आरोपातली अतिव्याप्ती सहज लक्षात येईल.मात्र एक गोष्ट कबूल केलीच पाहिजे -गांधीजी होते तोपर्यंत त्यांच्या सर्वसामान्य अनुयायांमध्ये सामाजिक परिवर्तनाची जी सक्रिय तळमळ होती,ती गांधीजींच्या मृत्यूनंतर फार लवकर संपुष्टात आली. जनतेच्या सुखदुःखांशी सहृदयतेनं संपर्क साधणारे, तिच्या मोडक्या-तोडक्या जीवनात मिसळून जाऊन ते अधिक विशुद्ध व समृद्ध करण्यासाठी धडपड करणारे, परार्थ हाच परमार्थ आहे या भावनेनं सेवेचं एक लहानसं क्षेत्र निश्चित करून,त्यात अखंड काम करीत राहणारे गांधीवादी कार्यकर्ते गेल्या वीस वर्षांत दुर्मीळ होत गेले. दिल्लीपासून गल्लीपर्यंत जो तो

सोयीस्करपणे गांधीचं नाव वापरू लागला,ते नाव हे एक चलनी नाणं बनलं. १९४७पूर्वी हे नाणं अस्सल सोन्याचं होतं.स्वार्थी लोकांनी त्यातलं सोनं नाहीसं करून ते नाणं कथलाचं बनवलं आहे.

असं होण्याची कारणं अनेक आहेत.ती फार गुंतागुंतीची आहेत.त्या सर्वांची मीमांसा इथं करणं अप्रस्तुत होईल. मात्र,एका कारणाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. मानवी जीवनाचा ओघ कोणत्या दिशेनं वाहात आहे, भारतीय माणसाचं मन किती झपाट्याने बदलत आहे. याची फिकीर न करता केवळ गांधीजींना प्रिय असलेल्या तत्त्वांचा पुन्हापुन्हा उच्चार करून यापुढे काम भागणार नाही.प्रत्येक महापुरुषाचा त्याच्या  शिकवणुकीची फोलं पाखडीत बसणाऱ्या शिष्य-प्रशिष्यांकडून पराभव होतो अशी इतिहासाची साक्ष आहे.तो अनुभव गांधींनाही घ्यावा लागला. गांधींच्या या पराभवाचं कारण भारतीय सामाजिक मनाच्या दुबळ्या आणि निष्क्रिय आदर्श पूजेतच सापडेल.कुठल्याही क्रांतिकारी तत्त्वज्ञानाचा आपण जयजयकार करतो;पण ते तत्त्वज्ञान आचरणात उतरविण्याची वेळ आली म्हणजे,त्यातल्या सळसळणाऱ्या चैतन्याकडं आपण पाठ फिरवतो आणि प्रेतं शृंगारावीत त्याप्रमाणं त्यातल्या कर्मकांडाचं आम्ही स्तोम माजवीत सुटतो.

डॉ.राममनोहर लोहिया यांनी भारतातल्या मार्क्सवादाविषयी जे लिहिलं आहे,तेच कमी अधिक प्रमाणात इथल्या गांधीवादालाही लागू पडेल.डॉ. लोहिया म्हणतात,"मार्क्सवादी विचारसरणीची दोन मुख्य अंगं आहेत.पहिलं,अर्थव्यवस्था बदला म्हणजे सारं काही बदलेल.भाषा,जातिप्रथा,नैतिकता आदीसंबंधींचे सारे प्रश्न सुटतील.दुसरे,अर्थव्यवस्था बदलण्यासाठी वैयक्तिक मालकीच्या उत्पादक साधनांचा व संपत्तीचा नाश करणं जरूर आहे.तसंच,त्याकरता यंत्रविज्ञान व औद्योगीकरण आवश्यक आहे.क्रांतिकारी मार्क्सवादी व्यक्तिगत,

उत्पादक संपत्तिसाधनांच्या विनाशाला महत्त्व देतो.हे क्रांतिकारक कार्य करीत असताच भाषादी प्रश्नही क्रांतिकारक पद्धतीनं सोडवितो.षंढ मार्क्सवाद अशी समजूत करून घेऊन बसतो की,विज्ञानीकरण आणि उद्योगीकरण केलं की, आर्थिक व्यवस्था बदलेल.आणि आपोआप बाकी सारे प्रश्न सुटतील.स्वातंत्र्योत्तर भारताने धड गांधीवादाला आपले गुरू केले नाही;की क्रांतिकारी मार्क्सवाद स्वीकारला नाही.फक्त षंढ मार्क्सवाद त्याने पत्करला." ('जनमनगण' पृ. २८)

डॉ. लोहियांनी मार्क्सवादाचे जे दोन वर्ग कल्पिले आहेत.तसेच गांधीवादाचेही क्रांतिकारी गांधीवाद आणि भोंगळ गांधीवाद असे दोन स्वच्छ भेद पडतात. गांधीवादाचे क्रांतिकारकत्व १९४७ पर्यंत जनतेला जाणवत होतं;पण गांधींच्या देहावसानानंतर तो ज्वलंत स्फुलिंग हां हां म्हणता विझला.सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने गांधीवाद तरुण पिढीला आकृष्ट करील हे शक्यच नव्हतं.एखाद्या संताच्या समाधीपाशी भलीमोठी जत्रा

भरावी,पण कुणालाही त्या संतांच्या शिकवणुकीचे स्मरण असू नये,फक्त त्या जत्रेच्या निमित्ताने भरलेल्या बाजाराची चलती व्हावी,असा काहीसा प्रकार गेल्या वीस वर्षांत वाढत गेला. 

मार्क्सवादाचा सारा रोख ज्याप्रमाणं उत्पादनाची साधनं आणि त्यांच्याद्वारे निर्माण होणारी संपत्ती यातून खास व्यक्तिगत हक्क नाहीसे करण्यावर आहे,त्याप्रमाणं गांधीवादाचं मुख्य लक्ष व्यक्तिमनाचं उद्बोधन,सामाजिक मनाच्या संवेदनशीलतेचं संवर्धन आणि या दोन्हींच्याद्वारे चिरकालिक होऊ शकेल असे सामाजिक परिवर्तन या गोष्टी आहेत.गांधीजींना नवा मनुष्य घडवायचा होता. समाजासाठी व्यक्तीनं जाणीवपूर्वक त्याग करायला शिकले पाहिजे हे या परिवर्तनाच्या प्रक्रियेचे पहिले सूत्र आहे. मार्क्सला समाजरचना आमूलाग्र बदलायची होती. गांधींनाही समाजव्यवस्थेत मूलभूत बदल हवे होते; पण मार्क्सचा मुख्य रोख आहे भौतिक परिवर्तनावर.उलट गांधीजींची श्रद्धा आहे आत्मिक परिवर्तनावर. रक्तरंजितक्रांतीनं भौतिक परिवर्तन घडवता येतं;पण आत्मिक परिवर्तनात अभिप्रेत असतो तो मनुष्याच्या स्वभावातला बदल- जीवनाकडं पाहण्याच्या त्याच्या दृष्टिकोनातला पालट, तोही केवळ वरवरचा नव्हे,अगदी आतून उचंबळून आलेला.संस्कृतीच्या पातळीवर स्थिर होणारा.अशा परिवर्तनाकरता पिढ्यान् पिढ्या मनुष्य ज्या संस्कारात वाढला त्यांच्याहून अगदी भिन्न असे संस्कार त्याच्यावर करावे लागतात.नवा समाज अस्तित्वात आला म्हणजे,नवा मानव निर्माण होईल ही मार्क्सची कल्पना.ती वास्तवाशी कितपत सुसंगत आहे याचं उत्तर रशिया,चीन वगैरे साम्यवादी राजवटीतल्या सामान्य मनुष्याचं आंतरिक जीवन देऊ शकेल.

क्रांतिकारी गांधीवादआपल्या देशात गेल्या वीस वर्षांत अस्तित्वात असता तर,नवा मानव घडविण्याच्या गांधीजींच्या स्वप्नाला वास्तवाचा निकष लावून त्याचं मूल्यमापन करता आलं असतं.पण तशा प्रकारचे प्रयत्न शासनाकडून आणि जनतेकडून मोठ्या प्रमाणात मुळीच झाले नाहीत.साहजिकच,आजच्या तरुण पिढीला ज्याचं दर्शन घडतं तो गांधीवाद कोणत्याही बाजूनं जवळचा वाटू नये यात अस्वाभाविक असं काय आहे? यांत्रिकीकरण व औद्योगिकीकरण यांच्याद्वारे येणाऱ्या समृद्ध जीवनाची अंधुक स्वप्नं तरुण पिढीला आकृष्ट करीत आहेत.या स्वप्नांचं क्रांतिकारी गांधीवादाशीसुद्धा जिथं जवळचं नातं नाही,तिथं निर्जीव गांधीवादाला कोण धूप घालणार?

क्रांतिकारी गांधीवाद म्हणजे मानवाला नव्या उच्च संस्कृतीच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न.मनुष्यस्वभाव मूलतः स्वार्थी आहे.तो संपूर्णतः बदलता येईल का? हा या बाबतीतला मोठा वादग्रस्त प्रश्न आहे.गांधीजींची माणसाच्या अंतःकरणातल्या मांगल्यावर (Divine in man) पराकोटीची श्रद्धा होती.ती नसती तर, आफ्रिकेतल्या सत्याग्रहापासून नौखालीतल्या पदयात्रेपर्यंत त्यांच्या जीवनाचं जे महाभारत घडलं ते घडू शकलं नसतं.श्रद्धेचं सामर्थ्य मोठं असतं हे मान्य केलं तरी,उत्कट श्रद्धा हा सामान्य मनुष्याचा स्थायी भाव असू शकतो का? हा प्रश्न अप्रस्तुत ठरण्याचं कारण नाही.मनुष्य अगदी विसाव्या शतकातला पढिक, पंडितसुद्धा प्रथमतःआपल्या वासनांचा गुलाम असतो. मग इतर भावनांचा,कोणत्याही,विशिष्ट श्रद्धेपेक्षा अमर्याद सुखोपभोगांची इच्छाच सामान्य मनुष्याच्या जीवनावर राज्य करीत आली आहे;अशी इतिहासाची साक्ष आहे.ही साक्ष खोटी मानून नव्या मानवी मनाच्या संस्कृतीची स्वप्नं पहाणं कितपत योग्य होईल? तो स्वप्नाळूपणा ठरणार नाही काय? इ.प्रश्न तरुणपिढीनं उपस्थित केले तर,त्यांची उत्तरं गांधीवादाच्या समर्थकांना द्यावीच लागतील.

काही व्यक्ती,काही प्रसंग,काही पुस्तकं,काही अनुभव माणसाला काहीकाळ उच्च पातळीवर नेऊ शकतात. पण तिथं तो दीर्घकाळ राहू शकत नाही.पाणी आपली पातळी शोधीत खाली जातं ना,तसं असतं सर्वसामान्य माणसाचं जीवन.स्वतःच्या स्वार्थी स्वप्नांनी त्याचा बहुतेक भाग व्यापलेला असतो.आपल्या वासना आणि सुखाच्या कल्पना यांचा लगाम सामाजिक धर्मबुद्धीच्या हाती देणं त्याला सहसा जमत नाही.हा अनुभव जमेला धरला म्हणजे,नव्या मानवाची जडण-घडण हे अत्यंत अवघड काम आहे हे कुणीही कबूल करील.गांधीजींनी या बाबतीत जे काही सिद्धान्त मनाशी बांधले ते स्वतःच्या अनुभवावरून.साहजिकच त्यांत एक मोठं न्यून राहिलं.

सूर्याप्रमाणं सतत प्रकाशणारी गांधीजींसारख्या महामानवाची आत्मशक्ती आणि काजव्याप्रमाणे अधूनमधून लुकलुकणारी सामान्य माणसांची आत्मशक्ती यांतील अंतर गांधीजींनी लक्षात घेतलं असतं तर फार बरं झालं असतं.भारतीय संस्कृतीचा टेंभा मिरविणाऱ्या या देशातल्या गेल्या दोन तपांतल्या अनुभवांनी गांधीजींच्या विचारसरणीतल्या वैगुण्यावर नेमकं बोट ठेवलं आहे.सध्या आपल्या देशाला भेडसावीत असलेला कुटुंबनियोजनाचाच प्रश्न घेऊ.या बाबतीतली सामान्य मनुष्याची दुर्बलता गांधीजींनी कधीच नीट जाणून घेतली नाही.माणसाच्या पहिल्या भुकेइतकीच दुसरी भूक अनियंत्रित असते.संस्कृतीनंही नियंत्रित न होऊ शकणारी एक जीवप्रवृत्ती या नात्यानंच माणसाच्या कामभावनेकडं आपण पाहिलं पाहिजे.

पण ही दृष्टी जशी प्राचीन संतांपाशी नव्हती,तशीच एका बाजूनं त्यांच्याशी संलग्न असलेल्या गांधीजींपाशीही नव्हती.

संततिनियमनाचा पुरस्कार पाश्चात्त्य देशात दीर्घकाळ सुरू आहे.१९२०-२५ च्या सुमाराला आपल्याकडं त्यासंबंधी थोडं लिहिलं बोललं जाऊ लागलं.पण सुशिक्षित समाजाचा दृष्टिकोनसुद्धा याबाबतीत त्या काळी दूषितच होता.संततिनियमनाची चर्चा हा काही गलिच्छ प्रकार आहे असे मानणारे चांगले चांगलें डॉक्टर त्याकाळात मी पाहिले आहेत.१९३६ मध्ये या चळवळीच्या एक अग्रगण्य पुरस्कर्त्या मागरिट सँगर भारतात आल्या.गांधीजींना भेटण्याकरता.सँगरबाईंची भूमिका गांधींनी मान्य केली नाही.या नाजूक व्यावहारिक प्रश्नाचा त्यांनी शुद्ध तात्विक दृष्टीनं परामर्श घेण्याचा प्रयत्न केला.

सँगरबाईंना गांधी म्हणाले,"स्त्री ही आपल्या पतीची किंवा पित्याची गुलाम नाही,पुरुषाने तिला गुलाम बनविले.व गुलामगिरीच्या सरावानं तिला त्यात भूषण वाटू लागले.स्त्री ही पुरुषाची गुलाम नव्हे ही माझी शिकवण माझ्या भगिनींना पटली तर हिंदुस्थानात संततिनियमनाचा प्रश्न उद्भवणार नाही.कामविकाराच्या तृप्तीसाठी पुरुष स्त्रीच्या जवळ जातो तेव्हा त्याचा यशस्वीपणे प्रतिकार करण्यास तिने शिकले पाहिजे. आपले शारीरिक संबंध सुरू रहावेत,आपल्या मागं मुलाबाळांचं लेंढार लागू नये असं म्हणणं म्हणजे केवळ कामलालसाच नव्हे काय? प्रजोत्पादन व्हायला नको असेल तर,स्त्री-पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवताच कामा नये.तीन किंवा चार मुलं झाल्यानंतर पति- पत्नींनी शरीरसुखाचा मोह का सोडू नये? तेवढी मुलं होईपर्यंत त्या दोघांना विषयसुख काय कमी मिळालेलं असतं? दुसऱ्याची गुलामगिरी करताना माणसाला लाज वाटते, तशी विषयसुखाची करताना का वाटू नये?"

ही विचारसरणी कर्मठ पावित्र्यवादाची (Puritanism), स्त्रीला पुरुषाच्या तपश्चर्येच्या मार्गातली धोंड मानणाऱ्या प्राचीन ऋषिमुनींची आणि शरीरसुख हे पाप आहे ही परंपरागत कल्पना उरी बाळगणारांची आहे हे सहज लक्षात येईल.संयमाच्या अत्युच्च पातळीवरून गांधीजी स्त्री - पुरुष संबंधाकडं पाहतात.पण व्यवहारात कुठलीही उच्च तात्त्विक भूमिका हे स्वप्नरंजन ठरतं असा अनुभव आहे.गांधीजींनी सँगरबाईंना भारतीय मनुष्य, संयमानं संततिनियमन करील असा हवाला दिला.पण या गोष्टीला वीस वर्षं झाली नाहीत तोच या देशाला कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम हाती घेणं भाग पडलं. लोकांनी गांधीजींचा संयमाचा उपदेश मुकाट्यानं ऐकून घेतला आणि प्रजोत्पादन पूर्ववत सुरू ठेवलं.गांधीजींनी अपेक्षिलेल्या संयमाचा एकदशांश भाग जरी आमच्यापाशी असता,तरी या देशाचं कोटकल्याण झालं असतं.गेली दहा वर्षं कुटुंबनियोजनाचे ढोल कानी कपाळी बडवले जात असताना,या कार्यक्रमावर पैसा आणि शक्ती भरपूर प्रमाणात.खर्च होत असताना, परिस्थितीत फारसा आशादायक बदल झालेला नाही. साऱ्या देशाची गोष्ट दूर राहू द्या.ज्या महाराष्ट्राला आपल्या बुद्धीचा आणि बुद्धिवादित्वाचा अभिमान आहे, जिथं रघुनाथराव कर्त्यांसारखा संततिनियमनाचा निःस्वार्थी, निधडा आणि कडवा प्रचारक पन्नास वर्षापूर्वी निर्माण झाला, तिथली लोकसंख्याही अजून कुटुंबनियोजनाला फारशी दाद देत असलेली दिसत नाही.१९५१ साली महाराष्ट्राची लोकसंख्या तीन कोटी ऐंशी लक्ष होती.आता १९७१ साली ती पाच कोटी होईल असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सांगितले.हे सारं लक्षात घेतलं म्हणजे,सामान्य मनुष्याच्या संयमाविषयी आणि त्याच्या नैतिक निग्रहाविषयी गांधीजींना वाटणारा विश्वास किती निराधार होता याची खात्री पटते.जी स्थिती स्त्री - पुरुष संबंधाची तीच दारूबंदीची.तीच लॉटरीसारख्या सभ्य द्यूतक्रीडेची.आहे रे आणि नाही रे या दोन वर्गांतल्या संघर्षाची. देशामध्ये भौतिक समृद्धी वाढत असली तरी,

तिच्या वाटपावर कोणत्याही प्रकारचे नैतिक नियंत्रण नाही.कायद्याची नियंत्रणे आहेत; पण ती फार दुबळी ठरत आहेत.वाघाला सुतळीन बांधून ठेवण्याच्या प्रयत्नासारखी,कायद्याला नेहमी अनेक पळवाटा असतात.पण नैतिक मूल्य नेहमी आपल्या पायाखालची एकच वाट आनंदानं तुडवीत जातात.मग ती कितीही काटेरी असोत.

"ज्याच्या हाती सत्ता तो पारधी" अशी देशातल्या उत्पादनांच्या साधनांची आणि त्यांच्याद्वारे निर्माण होणाऱ्या संपत्तीची स्थिती आहे.आपण तोंडानं लोकशाहीच्या,सामाजिक समतेच्या आणि आर्थिक न्यायाच्या मोठमोठ्या गप्पा मारतो,आणि त्या मारीत असतानाच बऱ्या वाईट मार्गाने गबर होणारे अनेक नवे धनिक वर्ग अस्तित्वात येत असलेले पाहतो.या नवधनिकांवर नियंत्रण घालण्याचं आणि काळ्याबाजाराच्या मुळावर कुऱ्हाड चालविण्याचं सामर्थ्य सरकारपाशी नाही.गांधींना अभिप्रेत असलेला नवा मानव या देशात पूर्वपिक्षाही अधिक दुर्मीळ होऊन बसला आहे.उलट खोऱ्यानं आपल्याकडं माती ओढावी त्याप्रमाणं सुप्तासुप्त मार्गांनी आपण अधिक श्रीमंत कसे होऊ,आपल्याला जास्तीत जास्ती चैन कशी करता येईल? पुत्रपौत्रांना कुबेराचा वारसा ठेवण्याची आपली इच्छा कशी सफल होईल,याचाच विचार धनवंतांच्या मनामध्ये घोळत असलेला दिसतो.श्रीमंती हा सुखाच्या मंदिराकडं जाणारा राजरस्ता आहे,यावर विश्वास नसणारा एक महत्त्वाचा वर्ग गांधींच्याकाळी होता. पण आता सोने,रुपे,नाणे, हेच प्रत्येकाचं आवडतं गाणं झालं आहे. "पैसा लुच्चा आहे" असं विनोबा म्हणतात.तो ज्यांच्यापाशी असतो त्यांनाही आपल्यासारखा करून सोडतो,असा दारुण अनुभव दुर्दैवानं या देशात येत आहे.साहजिकच उच्चार आणि आचार यांच्यात पूर्वी कधीही दिसली नसेल अशी अक्राळ विक्राळ घोर दरी पसरल्याचं भयानक दृश्य सामान्य मनुष्य पहात आहे. या दरीच्या दर्शनानं भोवळ आलेल्या तरुण पिढीनं गांधीवाद आणि गांधीवादी कार्यकर्ते यांच्याविषयी अप्रीती दर्शवावी यात नवल नाही.

गांधीवाद व मार्क्सवाद ही दोन्ही परस्परविरोधी तत्त्वज्ञानं आहेत असं मानलं जातं.पण त्यांच्या अंतरंगात एक समान जिव्हाळ्याचा धागा आहे.तो म्हणजे मानवाविषयीची करुणा,सामान्य मनुष्याविषयीचा कळवळा,त्या सामान्य मनुष्याच्या सुखानं जगण्याच्या हक्कावर धनवंत,बलवंत आणि बुद्धिमंत वर्गांकडून होणाऱ्या आक्रमणाला असलेला पोटतिडकीचा विरोध. या दोन्ही तत्त्वज्ञानांचा केवळ गाभा लक्षात घेऊन, त्यांचा खराखुरा समन्वय करण्याचा प्रयत्न स्वराज्यप्राप्तीनंतर आपण केला असता,तर देशात आज दिसणारी अभद्र चित्रं रंगविण्याचं धाडस काळपुरुषाला झालं नसतं.अज्ञान,दारिद्र्य,विषमता,धर्मभोळेपणा या गोष्टी काही मूठभर सज्जनांकडून सहजासहजी नष्ट होण्याइतक्या वरवरच्या नाहीत.या विषवृक्षांची पाळंमुळं जशी कालबाह्य झालेल्या समाजरचनेत खोलवर पसरलेली आहेत,तशीच त्या रचनेत बद्ध झालेल्या दुर्बल मानवी मनातही विखुरलेली आहेत.ही पाळमुळं खणून काढण्याचं काम पिढ्यानपिढ्या करावं लागणार आहे. व्रतस्थ वृत्तीनंआणि बुद्धिवादी भूमिकेवरून आपली मांड पळभरही चळू न देता शे-दोनशे माणसांपैकी एखाद्यानं जरी निष्ठेनं या कामाला स्वतःला वाहून घेतलं तरी, त्याचा त्याग,चारित्र्य आणि ध्येयवाद यांच्यापासून सामान्यांना स्फूर्ती मिळते,धुळीवर खिळलेली त्यांची दृष्टी नकळत वर वळते.

स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याकडे घडायला हवं होतं ते हे.पण दुर्दैवानं ते घडलं नाही.अर्धकच्चा मार्क्सवाद आणि अर्धकच्चा गांधीवाद यांच्या मिश्रणातून संधीसाधूंनी आणि प्रवाहपतितांनी आपल्याला सोयीस्कर असं नवं कोरं करकरीत तत्त्वज्ञान बनवलं, या ढोंगी तत्त्वज्ञानानं देशापुढल्या सर्व समस्या जटिल आणि अवघड करून टाकल्या आहेत.तरुण पिढीला गांधीजींचं आकर्षण वाटत नाही याचं मुख्य कारण तिची दृष्टी  सभोवतालच्या परिस्थितीवर खिळली आहे.तिला पावलोपावली बोचणारे आणि पायांची चाळण करणारे अनेक काटे ज्या पिढीचे गांधी हे प्रमुख नेते होते त्या पिढीनंच पेरले आहेत याची तिला जाणीव आहे. 

सैनिकांच्या पळपुटेपणामुळं लढाईत अपयश येतं,पण त्या पराभवाची इतिहास नोंद करतो ती सेनापतीच्या नावानं.गांधीजींच्या बाबतीत नेमकं तेच झालं आहे.

परंतु नुसत्या चडफडाटानं,आदळ आपटीनं किंवा वैतागाच्या आणि वैफल्याच्या आहारी जाऊन तरुण पिढीपुढले अवघड प्रश्न सुटणार नाहीत.गांधींच्या अनुयायांनी त्यांच्या मूलगामी जीवनदृष्टीपेक्षा तिच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या कर्मकांडाला महत्त्व दिलं. हा दोष गांधींचा नाही.भारतीय माणसाच्या परंपरागत दुबळ्या मनाचा आहे.कोणाही मध्यस्थाची मदत न घेता, कुणाही भाष्यकाराला वाट न पुसता,तरुणांनी गांधीविचारांचा मागोवा घेतला तर,त्यांना एका महान आत्म्याचं दर्शन होईल.त्या आत्म्याच्या अंतरंगातून पाझरणाऱ्या करुणेची जाणीव झाल्यावर आपण एका महासागराच्या तीरावर उभे आहोत असा त्यांना भास होईल.दुर्दैवानं गांधीजींना दैनंदिन राजकारणात, समाजकारणात,अर्थकारणात सदैव बुडून रहावं लागलं. दुय्यम सुधारणांकरिता त्यांची किती तरी शक्ती खर्ची पडली.प्रतिभावान कवीनं घरातल्या जमाखर्चाचा मेळ बसावा म्हणून सारा बाजारहाट स्वतः करीत सुटावं तसा काहीसा हा प्रकार झाला;पण आपल्या अंतरंगात गांधी उद्याच्या निर्भय आणि निर्मळ मानवाचं जे भव्य स्वप्न पाहात होते,त्यात जशी बुद्ध,ख्रिस्ताची करुणा होती तशी यंत्रयुगातल्या संताची प्रज्ञाही होती.

मनुष्य हा दोन पायांवर चालणारा पशू नाही.प्रयत्नानं उच्च पातळीवर त्याला जाता येतं. ती पातळी गाठण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण करणं ही विसाव्या शतकातल्या मानवाची मुख्य गरज आहे, हे गांधींनी जाणलं होतं. त्यांच्या दृष्टीनं सारी माणसं सारखी होती. 

केवळ परमेश्वराची लेकरं म्हणून नव्हे,तर या जगात नांदायला आलेले स्खलनशील पण स्वप्नवेडे जीव म्हणून,या माणसांनी परस्परांशी मिळत जुळत घेतल्याशिवाय,सर्वांच्या सुखदुःखांचा काला करून तो चविष्टपणानं खाण्याची सवय स्वतःला लावून घेतल्याशिवाय,मानवजातीला स्वास्थ्याची आशा नाही.

भानवाला शांतिसुखाची आशा नाही,याची दखल राजकारणाशी संबंध आलेल्या जगातल्या दुसऱ्या कोणत्याही नेत्यानं घेतलेली नाही.दोन माणसं,दोन समाज,दोन राष्ट्र बंधुभावान जोडली गेल्याशिवाय यापुढं मानवाला भवितव्य नाही ही जाणीव गांधीजींच्या मनी मानसी सतत तेवत राहिली.तिचं मर्म तरुणांनी आत्मसात केलं नाही तर,गांधींच्या तत्त्वज्ञानातली आर्तता आणि ओलावा यांचा स्पर्श त्यांच्या मनांना होणार नाही.

दुर्दैवानं भारतीय सामाजिक मनाच्या पूर्वजन्म, आणि कर्मफल,दैववाद आणि धर्मभोळेपणा,स्वार्थ आणि कर्तव्यशून्यता,स्वप्नाळूपणा आणि विज्ञानविन्मुखता यांच्या कातऱ्यांत भारतीय सामाजिक मनाच्या शतशः चिंधड्या होऊन गेल्यामुळं,त्याला गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा गाभा पचवता आला नाही.त्यामुळं गांधीजी या जगातून निघून जाताच त्यांच्या तत्त्वज्ञानातलं चैतन्य हरपलं.ज्या आदर्शाला गांधीजी सहज हात घालू शकत होते,त्याच्याकडं वर मान करून पाहण्याची हिंमतही त्यांच्या नामधाऱ्या अनुयायांना आणि खुज्या देशबांधवांना राहिली नाही.पण हा काही गांधींच्या शिकवणुकीचा पराभव नव्हे.फार चांगलं बी रेताड जमिनीत पेरलं गेलं एवढाच त्याचा अर्थ.

बाह्यतः धर्मनिष्ठ पण अंतरी स्वार्थपरायण असलेल्या आमच्यातल्या पंडितांचा,धनवंतांचा, पुढाऱ्यांचा संकुचित दृष्टिकोन कायम ठेवून तरुणांच्यापुढील समस्यांची दाहकता कमी होणार नाही.गांधीजींनी जे जे सांगितलं त्यातली फोलं पाखडून सत्य घेणं आणि त्या सत्त्वाच्या सहाय्याने सामाजिक परिवर्तन घडवणं हे १९४७ नंतरच्या जाणत्या पिढीचं काम होतं.या पिढीनं गेल्या दहा-वीस वर्षांत देशात लोकशाहीचा आणि समाजवादाचा डांगोरा पिटला,पण शतकेच्या शतके या देशात वेदघोष घालू असूनही सामान्य मनुष्य जसा अडाणी राहिला,तसा मोठमोठ्या तत्त्वांच्या जल्लोषात तो अजूनही कोरडाच राहिला आहे.समाजवादी मूल्यं आपणाला प्रामाणिकपणे आचरणात आणायची असतील तर धनिकांनी,बुद्धिमंतांनी आणि वरिष्ठ वर्गीयांनी सर्वसामान्य मनुष्यापेक्षा स्वतः पाशी जे जे अधिक असेल ते ते इतरांना मिळावं म्हणून समर्पण भावनेनं देण्याची तयारी दर्शविली पाहिजे.नव्या मानवतेच्या स्पर्शानं उजळलेल्या बुद्धिनिष्ठ भूमिकेशिवाय हे घडणं शक्य नाही.

मार्क्सवादाच्या मार्गानं आलेला समाजवाद यांत्रिकीकरण व औद्योगिकीकरण करील. संपत्तीची समान वाटणी व्हावी म्हणून नवी सामाजिक चौकट ठोकून ठोकून घडवील,पण हे किंवा अशा प्रकारचे काही शांततापूर्ण मार्गांनी व्हायचे असेल तर,सामाजिक मनाची बधिरता नष्ट करून त्याला संवेदनशील आणि क्रियाशील करणे हा गांधींचा मार्ग - त्या मार्गावरली चाल कितीही कष्टप्रद असली तरी आपल्याला पत्करला पाहिजे. हा एकदम डोळ्यांत भरणारा नाही.तो आहे भिजवणीच्या पावसासारखा,आता नव्या सामाजिक मनाची जडण घडण घरात,शाळांत,महाविद्यालयात, कलाक्षेत्रात,साहित्यालयात,मंदिरात सर्वत्र होत राहिली पाहिजे.तरच ज्या चिरंतन मानवी मूल्यांवरल्या श्रद्धेमुळं गांधीजींनी या देशाला स्वातंत्र्यप्राप्तीचा अभिनव मार्ग दाखविला,त्या श्रद्धेची पताका खांद्यावर घेऊन सुखी आणि समाधानी समाजाचं स्वप्न साकार करण्याकरिता तरुण पिढीला धडपडता येईल.

वि.स.खांडेकर एका महामानवाचे एक भव्य स्वप्न,गांधी नावाचे महात्मा,संपादक - रॉय किणीकर,साहाय्यक- अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन.

मार्क्सवाद आणि गांधीवाद यांच्या या तात्विक अथवा व्यावहारिक वैगुण्यांचा काथ्याकूट करण्याऐवजी या दोन समर्थ विचारप्रणालींचा जीवनाच्या संदर्भात कसा उपयोग करून घेता येईल,हे नव्या पिढीनं जरूर पाहायला हवं.म्हणून गांधीवादाविरुद्ध कुरकुरणाऱ्या तरुणांना मी म्हणेन, "माझ्याहून तुम्ही शतपटीने भाग्यवान आहात. मी विद्यार्थी होतो तेव्हा,या दोन्ही महापुरुषांचे संस्कार आम्हाला मिळणं अशक्य होतं, मार्क्स होऊन गेला होता.पण आपल्या देशातल्या मोठमोठ्यांना त्याचा पत्ता नव्हता.गांधीचं महात्मायन पुढं घडायचं होतं.सुदैवानं ही दोन्ही जिवंत, ज्वलंत, तत्त्वज्ञानं केवळ कागदावरली नव्हेत;हाडामांसाच्या माणसांच्या जीवनात उतरलेली,राष्ट्रांचे चेहरेमोहरे बदलून टाकण्याची किमया करणारी - तुम्हांला लाभली आहेत. या दोन्ही महासागरांत अवगाहन करा.या दोन महासागरांच्या दरम्यान मोठं वाळवंट पसरलं आहे याची मला जाणीव आहे.पण या वाळवंटातून तुम्हाला मोठा कालवा खोदून काढला पाहिजे.असा कालवा तयार होईल त्या वेळी त्यांच्या संगमाला नव्या महातीर्थाचं महात्म्य प्राप्त होईल.त्या सागरतीर्थाचं स्वप्न पाहात पुढं चला.दोन नद्यांचा संगम पवित्र मानला जातो.दोन महासागरांचा संगम त्याच्याहूनही अधिक पवित्र आहे. हा संगम हे एक स्वप्नरंजन मानू नका.

बैलगाडीचा शोध न लागलेल्या काळात जंगलातल्या माणसाला आपला कुणी वारसदार चंद्रावर जाऊ शकेल असे स्वप्नात तरी वाटले असेल काय? पण तुमच्या पिढीत स्वप्नात न येणाऱ्या गोष्टीही सत्य स्थितीत उतरल्या आहेत.म्हणून म्हणतो,चिरचिऱ्या नजरेनं मागं पाहू नका. भिरभिरणाऱ्या डोळ्यांनी आणि थरथरणाऱ्या अंतःकरणांनी क्षितिजावरलं या सागरतीर्थाचं स्वप्न पाहात पुढं चला.खऱ्याखुऱ्या मानवी समतेचं कमळ कुठं फुलायचं असेल तर ते या सागरतीर्थांच्या आसपासच फुलेल!"

समाप्त …