* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: पऱ्यांचा परिसर / Precincts of fairies.

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

7/17/26

पऱ्यांचा परिसर / Precincts of fairies.

एकदा महर्षी टॉलस्टॉयनं मॅक्सिम गॉर्कीला विचारलं, "तुला हॅन्स अँडरसनच्या परीकथा आवडतात काय ?" नंतर विचारमग्न होऊन तो म्हणाला,

"परीकथांचे रशियन भाषांतर मी वाचलं होतं.नंतर दहा वर्षांनी ते पुन्हा वाचून काढलं.अन् मला जाणीव झाली की हॅन्स अँडरसन जीवनात किती एकटा होता.अगदी एकटा.तो भटक्या होता आणि म्हणूनच एकटा होता."

हॅन्स अँडरसनच्या बापानं त्याला समजावून घेतलं.पण त्याच्या मरणानंतर तो आई असूनही पोरका झाला. इथूनच त्याच्या परिकथेतल्या जीवनाला सुरुवात होते. निराधार हॅन्स एकटाच नशीब शोधायला ह्या उघड्या जगात निघाला.तो म्हणायचा,'दुष्ट पऱ्यांनी मला निराधार,निराश्रय केलं.'पण त्यांनीच त्याला राजवाड्यात नेलं.डेन्मार्कचा राजा फ्रेडरिक याच्या आश्रयाला तो राहिला.तिथं त्यानं मन लावून अध्ययन केलं.साऱ्या युरोपभर त्यानं प्रवास केला.वन,प्राणी आणि पक्षी यांच्या जगात तो रमला.

स्वतःभोवती त्यानं एक आगळंवेगळं पऱ्यांचं जग निर्माण केलं.तो जगद्विख्यात परिकथाकार झाला.जगातला तो पहिला परीकथाकार. अन् आयुष्याच्या शेवटी म्हणाला,'चांगल्या पऱ्यांनी माझं जीवन आनंददायी केलं.माझ्या हातून परीकथा लिहून घेतल्या.'

मला नेहमी वाटे,खरंच पऱ्यांचं खरंखुरं जग असावं काय ? माझं सारं आयुष्य जंगलात गेलेलं.पण मी चुकूनही कधी हाती बंदूक धरली नाही.शिकाऱ्याच्या बंदुकीला जंगली जनावरं तर बळी पडतातच;पण आपल्याला न दिसणारी छोटीछोटी माणसंही हकनाक बळी पडत असावीत.मला आठवतं ते परीचं गाणं-

'Up the airy mountain

Down the rushy glen,

We daren't go a-hunting,

For fear of little men.'

नवेगाव-बांधावरील माझ्या निवासस्थानी माझी मुलगी छाया कित्येकदा घरासमोरच्या आवळीच्या झाडाखाली तासन्तास एकटीच खेळत असे.कित्येकदा स्वतःशीच तिची गुणगुण वा बोलणं चाले.दुर्दैवानं तिच्या वयाचे सोबती-सवंगडी तिला जंगलात कधी बरोबर खेळायला मिळालेच नाहीत.मी तिला एकदा सहज विचारलं, "अगं,तू कुणाशी बोलत असतेस ? तुला वेड तर लागलं नाही ?"ती हसतबागडत म्हणाली, "कुणाशी म्हणजे ? पऱ्यांशी बोलते.

आपल्या घरामागच्या उंच पहाडातल्या जंगलातून त्या रोज माझ्याबरोबर खेळायला येतात.कधी झाडावरची बोरं,तर कधी एरुण्या,तर कधी करवंदं तोडायला त्या मला मदत करतात.त्यांना आपल्या मोराच्या पिलांशी खेळायला फार आवडतं."

"असं काय ! कशा दिसतात त्या?"

"हॅन्स अँडरसनच्या परीकथेतल्या पऱ्यांसारख्या."

त्यावेळी छाया चौथीत होती.तिच्या वाढदिवशी मी हॅन्स अँडरसनच्या परीकथेचा संच तिला भेट दिला होता.ती मन लावून अभ्यास करी.पण जंगलात तिच्या शिक्षणाची आबाळ झाली.

पाठीला पुस्तकांचं न पेलवणारं ओझं टांगून भुरुभुरु हवेत केस उडत असलेली चिमुरडी छाया जंगलातल्या वाटेनं शाळेतून दोनतीन किलोमीटरचं अंतर चालत येत असल्याचं दृश्य मी अजूनही विसरलो नाही.लहान मुलं खोटं बोलत नाहीत.असं असलं तरी मला हे सारे तिच्या मनाचे खेळ असावेत असं वाटलं.ती गोष्ट नंतर मी पार विसरून गेलो.छायाचं एकटीनं खेळणं चालूच होतं.

नंतर काही वर्षांनी यॉर्कशायर इथल्या दोघी बहिणींची एक सत्यकथा वाचली.१९२० साली 'स्ट्रेंड' ह्या ख्यातनाम इंग्रजी मासिकात पहिल्यांदा पऱ्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले.१९१७ च्या वसंत ऋतूत एल्सी आणि फ्रान्सिस ग्रिफिथ या अनुक्रमे सोळा व दहा वर्षांच्या मुलींनी पऱ्यांबरोबर मैत्री जोडली. त्या त्यांच्याबरोबर कॉटिंगलेतल्या घरामागच्या अरुंद दरीत

खेळत.नवीन सवंगड्यांविषयी त्या दोघींनी आपल्या आई-वडिलांना सांगितलं.पण त्यांनी त्या मुलींवर विश्वास ठेवला नाही.एल्सीनं वडिलांचा कॅमेरा घेतला, अन् चक्क आपल्याबरोबर खेळणाऱ्या बागडणाऱ्या पऱ्यांचे फोटो खेचले.ते 'स्ट्रेंड'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.लोकांचा त्यावर विश्वास बसेना.अनेक निष्णात छायाचित्रकारांनी ती छायाचित्रं आणि निगेटिव्हज तपासले.त्यात कुठलाही तांत्रिक दोष नव्हता.परंतु पऱ्या या जगात अस्तित्वात नसताना ही छायाचित्रं मिळाली कशी,याचं कोडं काही उलगडेना.

यात काहीतरी लबाडी आहे असं अनेक जिज्ञासूंना वाटू लागलं.

शेवटी प्रख्यात गुप्त पोलीस अधिकारी सर आर्थर कॉनन डॉयल याची या प्रकरणी चौकशी करण्याकरिता नेमणूक करण्यात आली.त्यानं दुसरा कॅमेरा घेतला.फोटोग्राफी-प्लेटवर ओळखणीसाठी खुणा केल्या,आणि त्या कॅमेऱ्यानं पऱ्यांचे फोटो काढण्यासाठी एल्सीला सूचना दिल्या. एल्सीनं पुन्हा पऱ्यांचे फोटो घेतले आणि डॉयलला दाखवले.त्यानं पाहिलं-पायांत लहान बूट,डोक्यावर निमुळती टोपी व पंख असलेल्या पारंपरिक पऱ्या त्यात दिसत होत्या.डॉयलला आश्चर्याचा धक्का बसला.या अभूतपूर्व घटनेवर त्यानं 'कमिंग ऑफ फेअरीज' हा ग्रंथ लिहिला.त्यात तो शेवटी म्हणतो,"या धरित्रीवर आपल्यासारखंच पऱ्यांचं एक जग अस्तित्वात आहे हे सिद्ध करता आलं तर आपल्या मनाची काय अवस्था होईल हे सांगणं कठीण.हे स्वायत्त जग अद्भुत असं आयुष्य जगतं;आणि आश्चर्य हे की वातावरणाच्या लहरीतील काही फरकानं ते आपल्यापासून वेगळं झालेलं आहे."

तुम्ही कधी नवेगाव-बांधला पहिल्यांदा गेलात की तळ्याकाठी मासे पकडणारा एखादा धीवर तुम्हाला एक गोष्ट ऐकवील.ती ऐकण्याची इच्छा असो वा नसो.

"बरं का सायब,”डोंगरावरच्या उंच शिखराकडे पाहात तो सांगेल,"हे मोठं तळं कोलदेवानं बांधलं.त्याला सात बहिणी होत्या."अन् लहान बांधाकडे बोट दाखवून म्हणेल,"ती पार पाहिलीत ? सात बहिणींनी ती बांधलीय.म्हणून तिला सात बहिणींची पार म्हणतात. त्या चिरंजीव आहेत.ह्या तळ्याचं अन् इथल्या जंगलाचं त्या संरक्षण करीत रात्रंदिवस फिरत असतात."

सात बहिणींच्या पारीवर उभं राहिलं की पाठीमागं सुंदर अद्भुतरम्य झिलाण आहे अन् पुढं खोलखोल अफाट पसरलेलं पाणी.तो धीवर पुढं म्हणेल,

"साब,इथं सोन्याची नथ ल्यालेली जलपरी आहे.ज्या धीवराच्या जाळ्यात ही परी सापडेल,त्याचं भाग्य उदयाला येईल."

ऐकणारा प्रवासी हे सारं जिज्ञासेनं,कुतूहलानं ऐकत असला,तरी त्याला ते खरं वाटत नाही.तरी पण ह्या तळ्याकाठी राहणारे धीवर हे सारं खरं समजून शतकानुशतकं लोकांना कथा सांगत असतात.

मला मात्र ते खरं वाटतं.इथल्या झिलाणीकाठच्या उंच दरडीवरच्या शिळांवर दिवसा,रात्री अन् पहाटे तासन्तास एकटा बसून मी पक्षिनिरीक्षण केलंय.इथंच मला परमेश्वररूपी सुंदर पक्ष्यांचं गूढ कळलं आहे.हा परिसर देवराई म्हणून अजूनही अस्पर्श आहे.निर्वंश होण्याच्या भीतीनं माणसाच्या कुऱ्हाडी इथपर्यंत अजून तरी पोहोचलेल्या नाहीत.

दरेकसाजवळच्या दलदलीकाठचा दल्लू गोंड तर अहोरात्र परीसाच्या चिंतनात असायचा.तिथल्या गूढ दलदलीभोवती फिरणाऱ्या परीसाच्या मागोमाग जायचा.त्याला तिथं अप्सरा दिसायच्या.सदान्कदा देवलोकात मग्न असलेला दल्लू एखाद्या जांभळीच्या सावलीत निभ्रांतपणे बसलेला दिसायचा.मी भेटलो की सौम्य स्मित करायचा.

गॅव्हिन मॅक्सवेलचा 'रिंग ऑफ ब्राइट वॉटर' हा हुदाळ्याविषयीचा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. हुदाळ्याच्या निरीक्षणाच्या व अभ्यासाच्या निमित्तानं तो समुद्रकाठच्या अतिदूर गावातल्या मोठमोठ्या,भव्य व उजाड निवासस्थानात एकटाच वर्षानुवर्षं राहिलाय. समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळ्यांकडून त्यानं पऱ्यांविषयी ऐकलंय.बरंच काही त्यानं पाहिलं आहे आणि अनुभवलं आहे. 'रॅव्हन सीक द ब्रदर' ह्या ग्रंथात तो लिहितो,

"सायंकाळी लावलेलं जाळं काढण्यासाठी एकदा एक कोळी पहाटेच्या काळोखात समुद्रावर गेला.तिथं अंधार कधीच नसतो.

स्वयंभू प्रकाशानं सारा परिसर उजळला होता.त्यानं जाळं काढायला सुरुवात केली,तेव्हा नेहमीपेक्षा ते जड वाटलं.एखादी मोठी मासोळी सापडली असावी ह्या आनंदातच त्यानं आपलं जाळं ओढतओढत काठावर आणलं.पाण्याबाहेर काढलं. पाचसहा फूट लांबीची ही मासोळी नेहमीपेक्षा वेगळीच दिसत होती.त्या कोळ्यानं अगदी जवळून पाहिलं. कमरेपासून वर ती तरुण स्त्री होती;तर तिला खाली माशाचं शेपूट होतं.मातीशी नातं असलेला कोळी कधी भित्रा नसतो.त्यानं त्या स्त्रीला उचलून घरी आणलं.

घरी येताच तिची शेपटी गळून पडली आणि समोर एक सुंदर युवती उभी राहिली.तिची गळालेली शेपटी त्यानं अडगळीच्या खोलीत सांभाळून ठेवली.तिनं त्यानंतर त्याच्याबरोबर अनेक वर्षं सुखानं संसार केला.तिला मुलं झाली.पण एकदा त्या मुलांपैकी एकजण खेळत-खेळत अडगळीच्या खोलीत गेला असता त्याचा पाय चुकून त्या शेपटीवर पडला.आईकडे जाऊन त्यानं तिला विचारलं, 'आई,ती घरातली माशाची शेपटी ग कसली ?'

'अरेच्या ! ती तर माझी शेपटी !' जलपरी आनंदित होऊन मोठ्यानं म्हणाली,'माझी फार फार दिवसांपूर्वी हरवलेली शेपटी ! कशी मी विसरले कोण जाणे!'

आणि ती एकदासुद्धा मागं वळून न पाहता थेट समुद्राकडे निघाली.

त्यानंतर ती पुन्हा कधीही दिसली नाही!" हे झालं फार फार पूर्वीचं.त्या वेळी अस्पर्श्य वनं होती.गावानजीकच्या देवराई देवळाइतक्याच पवित्र होत्या.तळ्यामध्ये कमळं फुलत.तिथं पक्षिकुळं आश्रयाला येत.शहराजवळ सुंदर उद्यानं होती.नद्या संथ वाहत.त्यांच्या काठची झाडं आपलं पाण्यात पडलेलं स्वच्छ प्रतिबिंब पाहून हवेत आनंदानं डोलत.समुद्राच्या गाजेचा नादलुब्ध आवाज सुरू वृक्षाच्या पानापानांतून पाझरत कानी यायचा.खाडीला अद्भुतरम्य, गूढ खाजनीच्या जंगलांची हिरवीगार निःस्तब्ध किनार होती. वृक्षांना माणसं मानणारे आदिवासी जंगलात होते.

अन् गेल्या तीन-चार दशकांत हे सारं नष्ट होत चाललंय. जंगलं कमी होताहेत.देवराईचा कोळसा होतोय.खाडी सुकल्यामुळं तिच्या काठची जंगलं नाहीशी होताहेत. कारखान्यातलं दूषित पाणी नदीतून समुद्राला मिळत आहे.तळ्यातील पाण्याचा उपसा होतोय.सरोवरं आटत चाललीत.आभाळ आणि पाताळ कुणाच्या मालकीचं आहे ? ते देखील रेडिओ-अ‍ॅक्टिव्हसारख्या प्राणघातक किरणांनी दूषित झालेलं आहे.हे सारं उद्ध्वस्त होत असताना कितीजण व्यथित होत असतील ? पण ही सारी व्यथा एका स्त्रीनं 'सायलंट स्प्रिंग' या ग्रंथात मोठ्या प्रभावीपणं व्यक्त केली आहे.तिचं नाव रॅचेल कर्सन. ह्या ग्रंथानं साऱ्या जगाला परिसराविषयी विचार करायला लावलं.अन् अखेर परिसर-संरक्षणशास्त्राचा जन्म झाला.

जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सिताबर्डी,नागपूर.

पण हे सारं गेलेलं वैभव परत मिळणार काय ? लाभेलही कदाचित.पण त्याला भगीरथ प्रयत्न हवेत. भस्मासुराची गोष्ट आपल्याला माहीत आहे.त्याचं वरदानच शेवटी त्याला शाप ठरलं आणि तो नष्ट झाला.'परिसर' या शब्दाची व्युत्पत्ती व्याकरणकार काहीही करोत,पण मला वाटतं,पऱ्यांचा सर तो परिसर.ह्या पऱ्यांना वाचवा,म्हणजे सारा परिसर आपोआपच वाचेल !.

समाप्त