* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: अदृश्य पाचर — The Invisible Wedge | भाग २

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

8/20/26

अदृश्य पाचर — The Invisible Wedge | भाग २

उत्पादन आणि वापर यांच्यातील विसंवादात, फारकतीतच असा भ्रष्टाचार अनुस्यूत असतो. उत्पादित माल उत्पादकापासून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी बाजाराची आवश्यकता निर्माण झाली, यातच मागे आपण पाहिलेल्या स्विचबोर्डची आणि तो चालविणाऱ्याची, म्हणजेच बेसुमार अधिकार धारण करणाऱ्या बाजाराचे संचालन करणाऱ्यांची विशिष्ट जागाही अवश्य निर्माण होणे गृहितच होते.

उत्पादन आणि वापर यांच्यातली फारकत हे दुसऱ्या लाटेचे व्यवच्छेदक लक्षण झाले. त्याने आपल्या मानसिक जीवनावर, आपल्या व्यक्तिमत्त्वविषयक कल्पनांवरदेखील खूप परिणाम केला. वागणूक म्हणजे व्यवहारांचा एक संच झाला.

एखादा समाज मैत्री, नाती किंवा जमातीच्या, सरंजामी निष्ठेवर उभारला जाण्याऐवजी, दुसऱ्या लाटेच्या ‘राज्या’त प्रत्यक्ष किंवा सूचित अशा करारबद्ध बंधनांवर आधारलेल्या संस्कृतीचा उदय झाला. आजचे पतिपत्नी देखील वैवाहिक कराराची गोष्ट करतात.

उत्पादक आणि ग्राहक यांच्या भूमिकांतील विसंवादामुळे दुहेरी व्यक्तिमत्त्व जन्माला आले. ज्या व्यक्तीला एक उत्पादक म्हणून कुटुंब, शाळा आणि वरिष्ठ यांनी संतोषाकडे पाठ फिरवायला, शिस्तप्रिय व्हायला, संयमी, नियंत्रित, आज्ञाधारक, संघातील एक घटक व्हायला शिकवले, त्याच व्यक्तीला त्याच वेळी एक ग्राहक म्हणून ताबडतोब संतुष्ट व्हायला, हिशोबी असण्याऐवजी तृप्त व्हायला, शिस्तीचा त्याग करायला, स्वतःच्या वैयक्तिक सुखाच्या मागे लागायला, म्हणजेच थोडक्यात असे की, अगदी वेगळी व्यक्ती बनायला शिकविण्यात आले!

विशेषतः पाश्चात्त्य राष्ट्रांत ग्राहकावर जाहिरातीचा जोरदार भडिमार करत राहून त्याला उधारीवर घ्यायला, एकदम मनाने उचल घेऊन खरेदी करायला, ‘आता उड्डाण करा, पैसे नंतर द्या’ अशा वृत्तीत पडायला भाग पाडले गेले; आणि वर अशी मखलाशी करून दाखवण्यात आली, की असे करण्यात तुमची राष्ट्रभक्तीच दिसून येते. कारण यायोगे तुम्ही राष्ट्राची अर्थव्यवस्था वेगाने चालू ठेवता व राष्ट्राचे कल्याण करता.

लैंगिक फाटाफूट

शेवटी, दुसरी लाट-समाजांमध्ये उत्पादक आणि ग्राहक यांच्यात ज्या प्रचंड पाचरीने फूट पाडली, त्याच पाचरीने आणखी सामाजिक फाटाफूट घडवून आणली. तिच्यामुळे कौटुंबिक जीवनावर, तसाच लैंगिक भूमिकांवर आणि माणसाच्या ‘अंतर्गत जीवना’वरही फार मोठा परिणाम झाला.

औद्योगिक समाजात प्रचलित असलेल्या लैंगिक विषयाबाबतच्या अनेक ठाम समजांपैकी एक म्हणजे संबंधात पुरुष हा वस्तुनिष्ठ असतो, तर स्त्री ही आत्मनिष्ठ असते. ह्यात जर काही तथ्यांश शोधायचा असेल, तर तो कदाचित काही पक्क्या जीवशास्त्रीय सत्यांत आढळणार नाही, तर या अदृश्य पाचरीने केलेल्या मनोवैज्ञानिक परिणामात आढळेल.

पहिल्या लाटेखालील समाजात बहुतेक काम शेतात किंवा घरात केले जात असे. संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे, एखाद्या आर्थिक गटाप्रमाणे श्रम करीत असे आणि बहुतेक उत्पादन गावातच वापरले जात असे, किंवा जमीनदाराकडे त्यातील काही भाग पाठवला जात असे.

कौटुंबिक जीवन आणि कार्यान्वित जीवन (Work-life) एकमेकांत गुंफले गेले होते; जणू एकमेकांत विरघळून गेले होते. प्रत्येक खेडे बहुतांशी स्वयंपूर्ण असल्यामुळे दुसऱ्या खेड्यात काय घडते आहे, या गोष्टीवर ते कधीच अवलंबून नसे.

एका उत्पादक गटात बहुतेक कामगार कितीतरी प्रकारची कामे गरजेनुसार किंवा कोणाचे आजारपण उद्भवल्यास किंवा आवडीनेही करीत असत. औद्योगिक क्रांतीपूर्वी कामाची विभागणी अगदी प्राचीन स्वरूपाची होती. त्यामुळे पहिल्या लाटेच्या शेतीप्रधान समाजातील काम एकमेकांवर अवलंबून राहण्याच्या बाबतीत खालच्या पातळीवरचे असे.

ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इतर देशांमध्ये आलेल्या प्रचंड दुसऱ्या लाटेने काम शेत व घर या ठिकाणांतून उचलून कारखान्यात नेले आणि परस्परावलंबित्व खूपच वाढवून ठेवले.

आता कामासाठी सामूहिक प्रयत्न, कामाची विभागणी, मेळ, अनेक निरनिराळ्या कौशल्यांचे एकत्रीकरण या गोष्टींची गरज निर्माण झाली. दूरदूरच्या ठिकाणांहून आलेल्या, एकमेकांना ज्यांनी पूर्वी कधी पाहिलेही नसेल, अशा हजारो लोकांच्या काळजीपूर्वक आखलेल्या सहवर्तणुकीवर त्याचे यश अवलंबून राहू लागले.

एखाद्या विशिष्ट परिस्थितीमुळे एखादी मोठी पोलाद गिरणी किंवा काच कारखाना आवश्यक तेवढा मालाचा पुरवठा ऑटो प्लांटला करू शकला नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम त्या संपूर्ण उद्योगावर आणि त्या भागाच्या अर्थकारणावर होऊ लागले.

परस्परावलंबित्वाच्या खालच्या व वरच्या पातळ्यांत झालेल्या टक्करीतून भूमिका, जबाबदाऱ्या आणि मिळणारा मोबदला यांच्या संदर्भात तीव्र संघर्ष निर्माण झाला.

उदाहरण द्यावयाचे झाल्यास, सुरुवातीच्या काळातील कारखानदारांच्या अशा तक्रारी होत्या, की त्यांचे कामगार कारखान्याच्या कार्यक्षमतेची पर्वा करत नाहीत. जेव्हा त्यांची अतिशय गरज असते, तेव्हा ते मासे मारायला जातात, अश्वक्रीडेत गुंग होतात किंवा दारू पिऊन येतात.

खरे पाहता, हे सुरुवातीच्या काळातले औद्योगिक कामगार ग्रामीण विभागातील परस्परावलंबित्वाच्या खालच्या पातळीची सवय असलेले होते. त्यांना संकीर्ण उत्पादन प्रक्रियेत आपली भूमिका काय आहे आणि आपल्या बेजबाबदार वृत्तीमुळे या प्रक्रियेत अपयश, खंड किंवा गैरव्यवस्था कशी निर्माण होते, याविषयीचे ज्ञान अगदी कमी होते किंवा अजिबात नव्हते.

त्यांच्यापैकी बहुतेकांना अगदीच केविलवाणे वेतन मिळत असल्याने त्यांना याबाबत काही काळजी किंवा विचार करण्याचे कारण नव्हते.

कामाच्या या दोन पद्धतींमधल्या झगड्यात कामाच्या नव्या पद्धतीचा जय होत गेला. अधिकाधिक काम व उत्पादन कारखाने व कचेऱ्यांकडे सोपवण्यात आले आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी कमी होत गेली.

लाखो कामगार उच्च परस्परावलंबी कामाच्या जाळ्याचे भाग बनून गेले. दुसऱ्या लाटेतील कामाने पहिल्या लाटेशी निगडित कामाच्या मागासलेल्या पद्धतीवर मात केली.

मात्र स्वावलंबित्वावर परस्परावलंबनाने मिळविलेला हा विजय तसा कधीच पूर्णत्वाला गेला नाही. एका ठिकाणी ही कामाची जुनी पद्धत हट्टाने जतन करण्यात आली. ते ठिकाण म्हणजे घर.

प्रत्येक घर म्हणजे जीवशास्त्रीय पुनरुत्पादन, म्हणजेच मुले जन्माला घालून ती वाढविणे आणि सांस्कृतिक प्रसारण या कामात मग्न असलेला विकेंद्रित कामगार गट होता.

परंतु जर एखादे कुटुंब मुलाला जन्म देऊ शकले नाही, किंवा जन्म दिलेल्या मुलांना चांगल्या तऱ्हेने वाढवू शकले नाही, कामगार म्हणून त्या मुलांना तयार करू शकले नाही, तरी त्या अपयशाचा परिणाम शेजारच्या कुटुंबाच्या या बाबतीतल्या यशावर होत होता असे नाही.

दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे, घर हे खालच्या पातळीवरील परस्परावलंबी कार्यक्षेत्रच राहिले.

नेहमीप्रमाणेच गृहिणी आर्थिक कामांबाबतचीही आपली महत्त्वपूर्ण कामे करत राहिली. ती ‘निर्मिती’ करत राहिली. परंतु तिचे उत्पादन विभाग ‘अ’ गटासाठीच होते. तिच्या स्वतःच्या कुटुंबाच्या उपयोगासाठी होते. बाजारासाठी नव्हते.

नवरा मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आर्थिक उत्पादनाच्या कामासाठी दूर जात होता. बायको मात्र घरातच राहून अप्रत्यक्ष आर्थिक काम करत राहिली.

ऐतिहासिकदृष्ट्या अधिक प्रगत ठरलेल्या कार्यपद्धतीची जबाबदारी पुरुषाने स्वीकारली. स्त्री पूर्वीच्याच जुन्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कार्यपद्धती सांभाळत मागे राहिली.

तो जणू काही वेगाने भविष्याकडे निघाला होता, आणि ती भूतकाळातच राहिली.

ह्या विभागणीमुळे व्यक्तिमत्त्वात आणि अंतर्गत जीवनात फाटाफूट निर्माण झाली. कारखाना किंवा कचेरी यांच्या सार्वजनिक किंवा सामुदायिक स्वरूपाने परस्पर मेळ व ऐक्य यांची गरज निर्माण केली. तटस्थ विश्लेषणावर आणि वस्तुनिष्ठ नात्यांवर भर देण्यात येऊ लागला.

लहान असल्यापासूनच मुलांची तयारी दुकान वगैरे बाहेरच्या परस्परावलंबी जगात वावरण्याच्या दृष्टीने करण्यात येऊ लागली. पुरुष म्हणून त्यांना वस्तुनिष्ठ होण्याचे प्रोत्साहन देण्यात येऊ लागले.

तर जन्मापासूनच मुलींना प्रजोत्पादनाच्या, बालसंगोपनाच्या, घरकामाच्या दृष्टीने तयार करण्यात येऊन त्यांना काही प्रमाणात समाजापासून दूर ठेवण्यात येऊ लागले. त्यांना आत्मलक्षी होण्यास शिकवण्यात येऊ लागले आणि वस्तुनिष्ठतेसह येणाऱ्या बुद्धिनिष्ठ, विश्लेषणात्मक विचार करण्यास त्या असमर्थ आहेत असे समजण्यात येऊ लागले.

ज्या स्त्रियांनी या तुलनात्मक एकाकीपणाला न जुमानता, घरातच गुंतून न पडता स्वतंत्र उत्पादनात लक्ष घातले, त्यांना त्यांच्यातील स्त्रीत्व कमी झाले, त्या थंड झाल्या, कठोर झाल्या आणि तटस्थ, वस्तुनिष्ठ झाल्या असा बोल लावला गेला, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही!

त्यातही गैरसमजुतीमुळे पुरुष उत्पादक म्हणून आणि स्त्री ग्राहक म्हणून ओळखली जाऊ लागली. वस्तुतः पुरुषही ग्राहक होते आणि स्त्रियाही उत्पादक होत्या.

यातून लैंगिक मतभेद, लैंगिक विषयाच्या रूढी अधिकाधिक तीव्र होत गेल्या.

दुसरी लाट पृथ्वीभर पसरण्याच्या कितीतरी पूर्वीच स्त्रिया दडपून टाकल्या जात होत्या; हे लिंगभेदावर आधारलेले आधुनिक युद्ध कामाच्या दोन पद्धतीतील युद्ध आहे. उत्पादन आणि वापर यांच्यामधील फारकतीतून ते निर्माण झालेले आहे.

अशा तऱ्हेची फुटीर अर्थव्यवस्था, लैंगिक फूट अधिकच खोल करीत राहिली.

आपण हे पाहिले, की एकदा एका ठिकाणी ठोकली गेलेली ही अदृश्य पाचर उत्पादकांपासून ग्राहकांना वेगळी करून चुकली. त्यामुळे अनेक बदल घडले. या दोन्हींचा दुवा म्हणून बाजाराची रचना करण्यात आली.

नवीन राजकीय व सामाजिक संघर्ष उद्भवले. नव्या लिंगविषयक भूमिका विचारात येऊन व्यवहारात आल्या.

परंतु या फुटीने आणखी देखील कितीतरी गोष्टी सूचित केल्या. तिचा असाही अर्थ झाला, की सर्व दुसरी लाट-समाजांनी एकाच तऱ्हेने काम करावे. त्यांना त्यांच्या काही मूलभूत गरजा पूर्ण करून मिळायला हव्यात. मग उत्पादनाचे उद्दिष्ट फायदा हे असो की नसो; उत्पादनाची साधने सार्वजनिक असोत की खाजगी असोत; बाजार खुला असो की नियोजनबद्ध असो; व्यवस्था समाजवादी असो किंवा भांडवलशाही—त्यात काही फरक पडणार नव्हता.

वापराऐवजी अदलाबदलीसाठी, देवाण-घेवाणीसाठीच उत्पादन केले जाईपर्यंत त्याला आर्थिक स्विचबोर्ड किंवा मार्केटकडेच जाऊन पोहोचणे भाग असे. दुसऱ्या लाटेची काही तत्त्वे अनुसरणे भागच होते.

ही तत्त्वे निश्चित ओळखल्यानंतर सर्व औद्योगिक समाजातील गुप्त चलनशक्तीची तत्त्वे उघड झाली. तरी आपल्याला दुसऱ्या लाटेच्या लोकांच्या विशिष्ट विचारसरणीची कल्पना करता येणे शक्य आहे.

कारण मूलभूत तत्त्वांच्या जोडीला ही तत्त्वे येऊन मिळाल्यानंतर दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीची वर्तणूकसंहिता तयार झाली.

समाप्त