इटलीत राजेशाही आली या गोष्टींना मॅझिनीने मोठ्या दुःखाने मान्यता दिली.पण त्यास ध्येय म्हणून ही गोष्ट पसंत नव्हती.
तो लिहितो, 'मी मोठ्या दुःखाने राष्ट्राच्या इच्छेपुढे मान नमवीत आहे. पण राजशाहीच्या अनुयायांत वा सेवकात मात्र माझी गणना करता येणार नाही.'
आपल्या ध्येयाचा शेवटी विजय होईल, अशी त्याची श्रद्धा होती. तो म्हणतो, "भविष्यकाळच माझी श्रद्धा सत्यावर आधारलेली होती की नव्हती, हे ठरवील."
त्याच्या महत्त्वाकांक्षेचा निम्मा भाग पूर्ण झाला होता. इटलीचे एकीकरण झाले होते. पण इटलीचे हे शरीर अद्यापि बंधनातच होते.
मॅझिनीचे इटलीवर प्रेम होते. पण देशापेक्षा त्याला स्वातंत्र्य अधिक प्रिय होते. स्वतःच्या देशातून त्याला हद्दपार करण्यात आले होते. तो जगाचा नागरिक झाला होता.
त्याची राष्ट्रीयता म्हणजे आंतरराष्ट्रीयतेचा आरंभ होता. त्याची राष्ट्रीयता त्याला आंतरराष्ट्रीयतेकडे नेणारी होती.
वुइल्यम लॉइड गॅरिझन लिहितो, 'त्याच्या आत्म्याचा पूर्ण विकास झाला होता. त्याचे स्वातंत्र्यप्रेम जाती वा देश यांनी मर्यादित नव्हते, रक्ताचे, रंगाचे किंवा भौगोलिक भेद त्याच्या स्वातंत्र्यप्रेमास शिवले नव्हते.'
मॅझिनीच्या ठायी अहंकाराचा लवलेशही नव्हता. ऐहिक आकांक्षेचा अणुरेणूही नव्हता. कोणत्याही मायभूमीचे प्रेम त्याच्या मनात एखाद्या ज्वालेप्रमाणे पेटत होते.
पण दुसऱ्या राष्ट्राच्या द्वेषात पर्यवसान पावणारी देशभक्ती मात्र त्याच्या ठायी नव्हती. कार्लाइलचे बौद्धिक क्षितिज फार संकुचित असल्याबद्दल मॅझिनीने टीका केली आहे.
जो केवळ आपल्या देशापुरताच जगतो, तो त्याच्या मते मानवजातीचा द्रोही होय. तो म्हणतो, "जगाच्या ऐक्याचा खरा भाव कार्लाइलला कळलाच नाही. सर्व मानवांचे एक कुटुंब करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे."
या तत्त्वावर 'तरुण इटली' या पक्षाची संघटना करून पुढे त्यातूनच 'तरुण युरोप' ही संघटना त्याने काढली.
राजेशाही व आंतरराष्ट्रीय झगडे नष्ट करण्यासाठी सदैव व सर्वत्र धडपडणे हे एकच ध्येय या दोन्ही संस्थांनी आपल्यापुढे ठेवले होते. त्याचे सभासद युरोपातील सर्व देशांत स्वातंत्र्य, समता व बंधुता स्थापण्याच्या ध्येयाला स्वतःस वाहून घेत.
'समान व मुक्त लोकांतच खरी मैत्री होऊ शकते.'
विशिष्ट वतनदारी हक्क, जुलूम व आक्रमणशील स्वार्थ या सर्व गोष्टी भूतकालीनच करून टाकायच्या.
'विशिष्ट हक्क म्हणजे समानतेचा भंग, जुलूम म्हणजे स्वातंत्र्याचा भंग व स्वार्थाचे प्रत्येक काम म्हणजे बंधुतेचा भंग होय.'
प्रत्येक राष्ट्राने आपापल्या विशिष्ट गुणांचा विकास करून मानवी प्रगतीच्या सागरात आपला विशिष्ट सुंदर प्रवाह घेऊन यावे यासाठीच राष्ट्र असावीत.
वैचित्र्यातही आनंद असतो, मात्र ते वैचित्र्य अविरोधी असावे.
तो लिहितो, 'त्या त्या लोकांचे विशिष्ट कार्य आहे. मानवजातीच्या सर्वसामान्य ध्येयाच्या पूर्ततेसाठी ते ते राष्ट्र सहकार्य करील. त्या त्या राष्ट्राचे विशिष्ट ध्येय म्हणजेच त्या त्या राष्ट्राची राष्ट्रीयता. राष्ट्रीयता पवित्र आहे.'
पण राष्ट्रीयतेचे ध्येय मोठ्या संयुक्त मानवतेच्या ध्येयाला पूरक मात्र असले पाहिजे. मोठ्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी छोटे ध्येय.
शांततामय जगाच्या प्रेमसंगीतात स्वतंत्र असणाऱ्या त्या राष्ट्राची विशिष्ट तान मिसळेल व मधुर असे महासंगीत निर्माण होईल.
'ज्या वेळेस सर्व लोक व सर्व राष्ट्र ज्यांची ही मानवजात बनली आहे, स्वतंत्र होतील, त्यांच्या देशात जनतेची खरी सत्ता स्थापन होईल, तेव्हाच अशा या स्वतंत्र व मुक्त राष्ट्रांचे एक मोठे रिपब्लिकन कॉन्फेडरेशन करणे शक्य होईल.
सर्वांना समान अशा तत्त्वांच्या घोषणेप्रमाणे हे जागतिक फेडरेशन चालेल. सर्वसंमत असा एक करार असेल, तद्नुसार सर्व जण वागतील. सारे एका ध्येयाची पूजा करतील.
कोणते ते ध्येय? विश्वव्यापक अशा नैतिक कायद्याचे संशोधन व तदनुसार सतत वर्तन.'
'सर्व मानवजातीचे संयुक्त रिपब्लिक' हे मॅझिनीचे ध्येय होते.
हे स्वप्न प्रत्यक्षात यावे म्हणून तो फ्रान्समध्ये गेला. त्या काळी फ्रान्स हे सर्वांत जास्त स्वतंत्र राष्ट्र होते. पण जगातील इतर राष्ट्रांना स्वातंत्र्याचा, समतेचा व बंधुतेचा हात द्यावयास फ्रेंच लोक अद्यापि तयार नव्हते.
जागतिक सहानुभूतीचा मॅझिनीसारखा विश्वात्मक पुरुष अद्यापि धोक्याचा समजला जाई. त्याला पुन्हा एकदा फ्रान्स सोडून जाण्याबद्दल बजावण्यात आले, पण त्याने आज्ञा मोडली.
जाण्याऐवजी तो मार्सेलमध्ये एका अज्ञात कोपऱ्यात लपून राहिला. वीस वर्षे एका लहानशा खोलीत त्याने स्वेच्छेचा बंदिवास सोसला.
पवित्र राष्ट्रांचे दूत व गुप्त पोलीस त्याचा जगभर शोध करीत होते. तरी तो या लहानशा खोलीत निर्वेधपणे राहून व मित्रांची आणि समविचाराच्या सहकारी बंधूंची भेट घेऊन दुसऱ्या शहरातील सहकाऱ्यांना सूचना पाठवी व सल्ला देई.
येथेच तो अधिक चांगल्या जगाची आपली योजना पूर्ण करीत होता.
१८४८-४९ हे वर्ष युरोपभर 'क्रांतीचे साल' मानले जाते. आपले स्वप्न सत्यसृष्टीत येणार, असे मॅझिनीला क्षणभर वाटले.
क्रांतीची प्रचंड लाट युरोपभर उठली. राजे इटलीतून हद्दपार केले गेले. रोममध्ये रिपब्लिक स्थापले गेले. मॅझिनीस हद्दपारीतून परत बोलावण्यात आले. नव्या रिपब्लिकचे तीन गव्हर्नर निवडण्यात आले. त्यात तोही एक होता.
इटली देश आता खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. साऱ्या जगाला आता इटली स्वातंत्र्याचा खरा मार्ग दाखवील, असे त्याला वाटले.
पण हे इटालियन रिपब्लिक अल्पजीवी ठरले. पवित्र कराराच्या फौजा इटलीवर चालून आल्या. राजेरजवाड्यांचा जुलूम पुन्हा सुरू झाला. राजेशाही पुन्हा घोड्यावर स्वार झाली.
मॅझिनी पुन्हा दुःखदायी व उदास एकांतवासात गेला. विचारांच्या हुतात्म्यांभोवती शेवटी उदास एकांतता असतेच.
मॅझिनीने आपल्या हद्दपारीची बरीच वर्षे इंग्लंडमध्ये काढली. इंग्लंडचे सरकारही मॅझिनीचा पत्रव्यवहार तपासे. पण येथे त्याला बरेच मित्र मिळाले. बहुजन समाजात त्याच्या विचारांना पाठिंबा देणारे बरेच अनुयायी त्याला लाभले.
तो युरोप व इंग्लंड यांच्यामध्ये सारख्या येरझारा करीत होता. युरोपातील राजांनी रिपब्लिकला ठार केले होते. पण मॅझिनी त्यांना जणू रिपब्लिकचे भूतच वाटे.
त्यांना मॅझिनीची भीती वाटे. तो आपल्या काळातील अत्यंत विख्यात पुरुष होता. त्याची कीर्ती सर्वत्र होती व त्याची भीतीसुद्धा सर्वांना वाटे.
पण कीर्तीविषयी तो अगदी बेफिकीर होता. तो नेहमी आपल्या ध्येयाविषयी बोले, स्वतःविषयी कधीही बोलत नसे.
तो आपल्या जर्नलमध्ये लिहितो, 'प्रत्येक मोठ्या युगात, उगवत्या सूर्यप्रकाशासमोर जशी मेणबत्ती क्षुद्र, त्याप्रमाणे वैयक्तिक चरित्र यःकश्चित दिसते.'
लंडनमधील त्याचे निवासस्थान अत्यंत परिचित मित्रांनाच माहीत असे. त्याची एक लहान खोली होती. ती पुस्तकांनी भरलेली असे. तिच्यात तंबाखूचा धूर सदैव भरलेला असे.
या खोलीत तो मित्रांना भेटे, पाहुण्यांच्या मुलाखती घेई. खुर्चीवर शांतपणे बसून सारखी सिगार ओढीत तो विचारात रमे. तो धुक्यात वा मेघवलयात आच्छादिलेल्या एखाद्या गंभीर दैवी विभूतीप्रमाणे दिसे.
सभोवतालच्या मर्त्य जनांच्या गोष्टी ऐकणारा, अती दूरच्या व वरच्या प्रदेशातील उच्च वातावरणातला तो अती मानवी मानव वाटे.
त्यांच्या संभाषणात तो नेहमीच भाग घेई असे नाही. पण त्याच्या विचारांना पेटवणारा एखादा शब्द जेव्हा कोणी बोले, तेव्हा त्याचे काळेभोर इटालियन डोळे लगेच चमकून उठत व त्याची वाग्मितागंगा सुरू होई.
पण वाग्मितागंगा म्हणण्यापेक्षा त्याच्या शब्दांना रसरशीत निखारे म्हणणेच अधिक बरे, कारण त्याचे शब्द ऐकताच श्रोत्यांना व्हेसुव्हियसमधून बाहेर पडणाऱ्या लाव्हाच्या तेजाळ प्रवाहांची आठवण होई.
त्याच्याभोवती नेहमी पक्षी असत. पिंजऱ्यात कोंडलेले नव्हेत, तर त्याच्या खोलीत मोकळेपणाने उडणारे-बागडणारे ते पक्षी म्हणजे त्यांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाची जणू प्रतीकेच होती.
स्वातंत्र्याची प्रगतीपर चळवळ कोठेही सुरू असो, तिला त्याचा सदैव पाठिंबा असे. अमेरिकेतील काळ्यांवरील गुलामगिरी व युरोपातील गोऱ्यांची गोऱ्यांवरील गुलामगिरी, दोहोंचाही तो कट्टा वैरी होता.
स्त्रियांना मत असावे, असे म्हणणारा तो स्त्रियांच्या हक्कांचा पहिला पुरस्कर्ता होय.
आपल्या एका निबंधात तो लिहितो, 'स्त्री-जातीवर प्रेम करा. त्यांच्याविषयी आदर बाळगा. स्त्रियांवरील प्रभुत्वाची प्रत्येक कल्पना मनातून काढून टाका. तुम्ही स्त्रियांहून कशातही थोर नाही. श्रेष्ठ नाही.'
तो स्त्री-पुरुषांच्या समान हक्कांचा व समान कर्तव्यांचा पुरस्कर्ता होता.
'नागरिक व राजकीय क्षेत्रांत स्त्रीला समान माना. ज्या ध्येयाला आपण एक दिवस नक्की जाऊन पोहोचणार आहोत, त्या ध्येयाकडे मानवी आत्मा स्त्री-पुरुषांच्या दोन पंखांनी उड्डाण करीत जाऊ दे.'
एकोणीसाव्या शतकात अत्यंत छळली गेलेली व सत्ताधाऱ्यांच्या शिकारी कुत्र्यांकडून सारखा पाठलाग केली गेलेली व्यक्ती मॅझिनी ही होय.
त्याच्या फोटोची प्रत युरोपातील प्रत्येक पोलिसाजवळ होती. मॅझिनी दृष्टीस पडताच त्याला अटक करण्याचा हुकूम प्रत्येक शिपायाला दिलेला होता. तो सारखा येथून तिथे हाकलला जात होता.
तो कोणत्याही देशाचा नागरिक नव्हता. तो मानवांवर फार प्रेम करी म्हणूनच ते त्याचा द्वेष करीत.
मेल्यावर मात्र त्याला मोठ्या थाटामाटाने मूठमाती मिळाली. त्याला ही एकप्रकारे मरणोत्तर नुकसान भरपाईच होती म्हणा ना!
१८७२ साली तो मरण पावला. त्याच्या शवपेटीबरोबर सत्तर हजार लोक कबरस्तानात गेले.
प्रथम प्रेषितांना ठार मारायचे आणि मग त्यांची प्रेते पुजायची ही मानवांची नेहमीचीच युक्ती आहे.
मॅझिनीच्या मृत्यूबरोबरच राष्ट्राराष्ट्रांमध्ये प्रेमाचे व मोकळेपणाचे बंधुत्व निर्मिण्याची त्याची कल्पनाही विरून गेली.
मॅझिनीला अपयश आले. कारण तो पाशवी बलावर विसंबून होता. राष्ट्राचे खून करून का त्यांना परस्परांवर प्रेम करायला लावता येईल?
जगाला मॅझिनी जरूर पाहिजे. पण तो तलवार धारण न करणारा असला पाहिजे आणि कधी ना कधी तो मिळेलही. कारण खरी गरज असली की ती पूर्ण होतेच होते.
— भाग समाप्त — संयुक्त मानवतेच्या स्वप्नापासून मॅझिनीच्या अखेरच्या संघर्षापर्यंत
संपादकीय तथ्यपडताळणी
१. मॅझिनीचा जन्म व मृत्यू
निश्चित: ज्युसेप्पे मॅझिनी यांचा जन्म २२ जून १८०५ रोजी जेनोआ येथे झाला आणि १० मार्च १८७२ रोजी पिसा येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव जेनोआ येथील स्टॅलिनो स्मशानभूमीत दफन करण्यात आले.
२. कार्बोनरी आणि 'तरुण इटली'
निश्चित: मॅझिनी कार्बोनरी या गुप्त क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते आणि नंतर त्यांनी १८३१ मध्ये 'तरुण इटली'ची संकल्पना पुढे नेली. तिचे प्रमुख ध्येय एकसंध, स्वतंत्र आणि प्रजासत्ताक इटली निर्माण करणे होते.
३. संयुक्त युरोपची कल्पना
निश्चित: मॅझिनीची राष्ट्रवादाची संकल्पना संकुचित राष्ट्रवादापुरती मर्यादित नव्हती. स्वतंत्र राष्ट्रांनी परस्पर सहकार्य करून व्यापक मानवबंधुत्व आणि युरोपीय संघटनेच्या दिशेने वाटचाल करावी, अशी त्यांची राजकीय-सामाजिक भूमिका होती.
४. व्हिएन्ना काँग्रेस आणि 'पवित्र करार'
अंशतः बरोबर: १८१४–१५ मधील व्हिएन्ना काँग्रेसनंतर युरोपातील राजकीय व्यवस्था पुन्हा उभारण्यात आली. 'Holy Alliance' हा रशिया, ऑस्ट्रिया आणि प्रशिया यांच्यातील स्वतंत्र करार होता; तो संपूर्ण व्हिएन्ना काँग्रेसचा शांतता करार नव्हता. त्यामुळे मूळ लेखातील 'या पवित्र करारानुसार...' हा भाग ऐतिहासिकदृष्ट्या अधिक गुंतागुंतीचा आहे.
५. पोलंड, इटली आणि ऑस्ट्रियाचा प्रभाव
निश्चित / संदर्भ आवश्यक: व्हिएन्नानंतर पोलंडच्या मोठ्या भागावर रशियन प्रभाव वाढला आणि इटालियन द्वीपकल्पातील अनेक प्रदेशांमध्ये ऑस्ट्रियाचा प्रभाव निर्णायक राहिला. मात्र 'इटलीचे शतखंड करून ऑस्ट्रियन राजघराण्यातील अनेकांना तुकडे वाटले' ही मूळ लेखातील भाषाशैली ऐतिहासिक वर्णनापेक्षा साहित्यिक अतिशयोक्तीच्या स्वरूपाची आहे.
६. मोन्रो सिद्धांत
अंशतः बरोबर: अमेरिकेचे अध्यक्ष जेम्स मोन्रो यांनी १८२३ मध्ये युरोपीय शक्तींनी अमेरिकन खंडातील नव्या राजकीय व्यवस्थांमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका मांडली. मूळ लेखातील संदर्भ याच व्यापक ऐतिहासिक पार्श्वभूमीशी संबंधित आहे.
७. १८४८–४९ ची क्रांती आणि रोमन प्रजासत्ताक
निश्चित: १८४८–४९ च्या क्रांतिकारी लाटेत रोमन प्रजासत्ताक स्थापन झाले आणि मॅझिनी त्याच्या नेतृत्वाशी संबंधित होते. हे प्रजासत्ताक अल्पकाळ टिकले आणि फ्रेंच सैन्याच्या हस्तक्षेपानंतर त्याचा पराभव झाला.
८. मॅझिनीचे इंग्लंडमधील निर्वासन
निश्चित: मॅझिनी १८३७ नंतर इंग्लंडमध्ये राहिले आणि तेथून आपल्या राजकीय विचारांचा व चळवळींचा प्रसार करत राहिले.
९. स्त्री-पुरुष समानतेबाबत मॅझिनी
अंशतः बरोबर / संदर्भ आवश्यक: मॅझिनीच्या विचारांत स्त्रियांच्या समान नागरी व राजकीय अधिकारांना महत्त्व होते. मात्र मूळ लेखातील 'स्त्रियांच्या हक्कांचा पहिला पुरस्कर्ता' हा शब्दप्रयोग अतिशयोक्त आहे. त्याला निश्चित ऐतिहासिक तथ्य म्हणून मांडता येत नाही.
१०. मॅझिनीचा मृत्यू आणि अंत्यसंस्कार
निश्चित: मॅझिनींचे निधन १० मार्च १८७२ रोजी पिसा येथे झाले. त्यांचे पार्थिव जेनोआ येथे नेण्यात आले आणि १७ मार्च १८७२ रोजी स्टॅलिनो येथे अंत्यसंस्कार झाले. अंत्ययात्रा अत्यंत मोठी होती. मात्र मूळ लेखातील 'सत्तर हजार' हा नेमका आकडा स्वतंत्र प्राथमिक पुराव्याशिवाय पुरावा अपुरा या श्रेणीत ठेवणे योग्य आहे.
११. मॅझिनीचे अंतिम राजकीय ध्येय
निश्चित: मॅझिनीची राजकीय भूमिका इटलीच्या एकीकरणापुरती मर्यादित नव्हती. स्वतंत्र, लोकशाहीवादी आणि प्रजासत्ताक राष्ट्रांच्या व्यापक सहकार्याची त्यांची कल्पना त्यांच्या राजकीय विचारांचा महत्त्वाचा भाग होती.
ऐतिहासिक संदर्भभूमी
मॅझिनी हे इटालियन Risorgimento अर्थात इटलीच्या राष्ट्रीय एकीकरणाच्या चळवळीतील प्रमुख विचारवंत होते. त्यांच्या विचारांमध्ये राष्ट्रवाद, लोकशाही, प्रजासत्ताकवाद आणि मानवबंधुत्व यांचा संगम दिसतो.
त्यांनी इटली स्वतंत्र आणि एकसंध व्हावा अशी भूमिका घेतली; पण त्याच वेळी प्रत्येक राष्ट्राचे स्वातंत्र्य हे व्यापक मानवमुक्तीच्या ध्येयाशी जोडलेले असावे, असे ते मानत होते. म्हणूनच त्यांच्या विचारांमध्ये राष्ट्रीयता आणि आंतरराष्ट्रीय मानवबंधुत्व हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक होते.
१८४९ मधील रोमन प्रजासत्ताकाचा पराभव, त्यानंतरचे निर्वासन आणि दीर्घ राजकीय संघर्ष यांमुळे मॅझिनीचे आयुष्य सतत संघर्षमय राहिले. त्यांच्या अनेक राजकीय प्रयत्नांना तात्कालिक अपयश आले; तरी इटालियन एकीकरणाच्या विचारसरणीवर त्यांचा प्रभाव मोठा राहिला.
संदर्भ व स्रोत
ऑनलाइन मूळ / अधिकृत संदर्भ
१. Giuseppe Mazzini — Treccani, Dizionario Biografico
Treccani — Giuseppe Mazzini
२. Giuseppe Mazzini — Treccani, Enciclopedia
Treccani — Giuseppe Mazzini
३. Giuseppe Mazzini — Treccani, Dizionario di Storia
Treccani — Giuseppe Mazzini
४. U.S. Department of State — Historical Documents
Office of the Historian — Historical Documents
काय निश्चित? काय वादग्रस्त?
निश्चित
मॅझिनीचा जन्म १८०५ आणि मृत्यू १८७२.
कार्बोनरीशी त्यांचा संबंध.
'तरुण इटली'ची स्थापना.
इटलीच्या एकीकरणासाठी त्यांचा संघर्ष.
रोमन प्रजासत्ताकातील त्यांचा सहभाग.
दीर्घ निर्वासन आणि इंग्लंडमधील वास्तव्य.
प्रजासत्ताकवाद, लोकशाही आणि व्यापक मानवबंधुत्वाचा पुरस्कार.
अंशतः बरोबर
व्हिएन्ना काँग्रेस आणि 'पवित्र करार' यांचे मूळ लेखातील एकत्रित चित्रण.
युरोपवरील प्रतिगामी व्यवस्थेचे वर्णन.
मॅझिनीच्या स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचे काही विशिष्ट दावे.
वादग्रस्त / पुरावा अपुरा
'सत्तर हजार' लोक अंत्ययात्रेत सहभागी झाल्याचा नेमका आकडा.
मॅझिनीने नेमक्या किती वर्षांचा 'स्वेच्छेचा बंदिवास' एका लहान खोलीत घालवला, यासंबंधी मूळ लेखातील कालावधी.
काही ठिकाणी वापरलेले 'प्रथम', 'सर्वांत', 'प्रत्येक' किंवा 'सर्व' प्रकारचे व्यापक दावे.