* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२/२/२६

स्वप्नं- एक देणगी / Dreams - a gift

स्वप्नं बघणाऱ्यांना,भविष्यात डोकवायला मिळायचं असेल तर,त्यांच्या पोटात फक्त श्रद्धा पाहिजे,दुसरं काही नको.


दिवस कधीकधी असा उगवतो की अगदी आतून असं वाटतं की,आज खूप वेगळं असं काहीतरी घडणार आहे.दिवस कधीकधी असाही उगवतो की,अशा खूप वेगळ्या गोष्टी घडून,आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात.


ठरलेल्या वेळेस जेसन स्टीव्हन्स यायचा म्हणून मी वाट बघत होतो.या भेटींपासून पुढच्या शोधयात्रेचा महिना सुरू व्हायचा असतो,आम्हा दोघांसाठी.बोस्टनच्या क्षितिजरेषेकडे पहात मी खिडकीशी उभा होतो.मनात रेड स्टीव्हन्सचे विचार होते.


ज्याच्यावर प्रेम असतं, त्याचा मृत्यू पचवणं कठीण असतं;

विशेषतः त्याच्या आठवणी जेव्हा सदासर्वकाळ तुमच्या मनात असतात. कांही लोकांचा आपल्यावर असा खोल परिणाम झालेला असतो,की ती माणसे आपला एक हिस्साच होऊन बसतात.रेड स्टीव्हन्सचा माझ्यावर तसाच परिणाम होता आणि मला माहीत आहे की त्याचा बऱ्याचजणांवर असा परिणाम झालेला होता.


खूपदा वाटून जायचं,फोन उचलावा,पलिकडून पश्चिम टेक्ससच्या बोलितला खरखरीत आवाज ऐकू यावा, मला प्रतिसाद मिळावा.

पण रेड स्टीव्हन्सनं माझ्या आयुष्यात आणलेल्या चांगल्या गोष्टी कायम माझ्याजवळ रहाणार आहेत,हे मला माहीत होते.


कॉन्फरन्स रूमच्या टोकाशी असलेल्या मोठ्या व्हिडिओ पडद्यावर रेड स्टीव्हन्स आमच्यासामोर आला.तो खरोखर अवलिया माणूस होता.आयुष्यात तो जे जे करीत गेला त्यातून त्याचा भन्नाटपणा उघड होत गेला.


"जेसन,तू तिथं बसला आहेस तेवढ्यात मी एक मिनीट वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांची जबाबदारी घेतल्याबद्दल मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्ज यांचे आभार मानण्यासाठी घेणार आहे.मला वाटतं की तू लक्षात ठेवशीलकी माझ्या मृत्यूपत्रातील शेवटच्या मसुद्याप्रमाणे मी तुझ्यासाठी योजलेली सर्वोत्तम देणगीत तुला जेव्हा मिळेल,ती माझे प्रिय मित्र थिओडोर हॉमिल्टन आणि मार्गारेट हेस्टिंग्ज यांचा खूपच हातभार लागल्यामुळे मिळेल.मोठ्या पडद्यावर रेड इतका सजीव वाटत होता. मला त्याला सांगावसं वाटलं,मला हे त्याचं काम करतांना खूप आनंद वाटत होता.पण हे पण मला ठाऊक होतं की हे शब्द बोलण्याचा काही उपयोग नव्हता.मला मात्र वाटलं माझ्या पद्धतीनं जेसनच्या या प्रवासात त्याची साथ करण्यासाठी त्यानं मला निवडलं तेव्हा मला आनंद वाटला,हे त्याला ठाऊक असणार,


"जेसन या महिन्यात तू जो धडा शिकायचा आहेस,तो धडा आहे स्वप्न,एक देणगी.ही देणगी थोर स्त्री पुरूषांना मिळालेली असते.

स्वप्नं म्हणजे आपल्या जीवनाचा गाभा असतात.जीवन जसं आहे तसं नाही,तर ते जसं असायला हवं,म्हणजे स्वप्नं,खास लोकांच्या मनात, हृदयात,स्वप्नं जन्मतात.पण ती स्वप्नं फळाला आली म्हणजे सगळ्या जगाला त्यांचा लाभ घेता येतो.


"तुला माहीत नसणार,पण थिओडोर हॅमिल्टन देशभर उत्तम विधिज्ञ म्हणून ओळखला जातो.मला तो जेव्हा भेटला,तेव्हा तसं होण्याचं त्याचं स्वप्न मी ओळखलं होतं आणि गेली पन्नास वर्षे हे स्वप्न तो जगतो आहे.हे स्वप्न वास्तवात येण्याआधी त्याच्या मनात,त्याच्या हृदयात आकाराला आलं होतं.


"लुइझियानाच्या दलदलीतून भटकता भटकता टेक्ससमध्ये तेल आणि गुरंढोरं यांची सगळ्यात मोठी उलाढाल करणारा सम्राट होण्याची स्वप्नं मी पहात असायचा.ती स्वप्नं माझा इतका भाग बनून गेली की, जेव्हा माझं पण उद्दिष्ट मी गाठलं तेव्हा मी पूर्वी कधीच न राहिलेल्या आपल्या घरातच मुक्कामाला जणू पोचलो होतो.


 (सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर EMBASSY BOOK DISTRIBUTORS ) "या सर्वोत्तम देणगीला निश्चित रूप देत असतांना, त्यातल्या त्यात सर्वश्रेष्ठ देणगी कोणती बरं,असं ठरवायचा मी प्रयत्न करत होतो.एकाच देणगीचं नाव घ्यायचं झालं तर मी स्वप्न ह्या देणगीचं नाव घेईन. 


जीवन कसं आहे त्यापेक्षा ते कसं असावं ही दृष्टी आपल्याला स्वप्नांमुळेच येते.या स्वप्नांमधूनच,या जीवनातून जी जी इतर देणगी मिळवायची असेल तिच्यासाठी मार्ग सापडतो."


रेड थोडा वेळ थांबला आणि तो विचारात गढून गेल्यासारखा वाटला.तो पुढे बोलायला लागला,"जेसन स्वप्नांची तुझी ओळख करून द्यायची तर आधी काही स्वप्नं कशी असतात,

याची तुला माहिती करून द्यायला हवी.आयुष्यभर अशा खूप स्वप्नांची मला जाण होती.


स्वप्नांबरोबरची माझी सलगी हा माझा ठेवा होता.


"मला आयुष्यात भेटलेला स्वप्न बघणारा सर्वात मोठा माणूस,लोकांच्या कल्पनाशक्तीला स्पर्श करील अशी ठिकाणं,अशा वस्तू तयार करण्याची त्याला प्रचंड आस होती.ही आस त्यानं आयुष्यभर जपली.त्याच्या वाट्याला माघार,मानहानी,अपयश नाहीतर हेटाळणीही आली.जेव्हा भेटायचा,तेव्हा तो त्याच्या नवीन योजनांविषयी,नवीन बेता विषयी माझ्यापाशी बोलायचा.भितीवर टांगायला नव्या नव्या स्वप्नांच्या पाट्या तयार करण्याची त्याला सवय लागली होती. आणि त्या योजनेच्या पुर्ततेसाठी आराखडे तो तयार करायचा.


"मला आठवतंय,तो मृत्यूशय्येवर होता.त्याच्या खोलीत छताला त्यानं त्याच्या नवीन योजनेचा आराखडा टाचून घेतला होता.

त्याच्या डोक्यात जसजसा त्या योजनेला आकार येत होता,

तसतसा तो त्या छतावरील आराखड्यामुळे जास्त स्पष्ट होत होता.


"रूग्णालयात त्याला भेटायला एक वार्ताहर आला. माझा मित्र इतका अशक्त झाला होता की त्याला जेमतेम बोलायला येत होते.तो पलंगावर जरा सरकला आणि वार्ताहाराला त्याने शेजारी आडवं व्हायला सांगितलं.असं केल्यानं छतावरच्या त्या आराखड्याकडे त्यांना नीट बघता येऊन त्याविषयी मित्राला चर्चा करता येणार होती.


"एका गंभीर दुखण्याशी झगडत असतांनाही एखादा माणूस एवढी आपली आस जपतोय हे पाहून तो वार्ताहर गहिवरला.वार्ताहाराने त्याची मुलाखात आटोपली.माझ्या मित्राचा त्यानं निरोप घेतला आणि तो रूग्णालय सोडून निघून गेला.


"नंतर त्याच दिवशी माझा मित्र गेला.


"तू मुद्दा निसटू देऊ नकोस बरं.मृत्यूशय्येपर्यंत आपली ज्वलंत स्वप्नं जोपासत,आयुष्यभर ती अगदी उत्कटपणे सांभाळणारा माणूस केवढा नशीबवान असला पाहिजे. आयुष्यभर माझा मित्र त्याच्या स्वप्नांमध्ये जगला.ती स्वप्नं सतत संख्येनं वाढायची आणि आकारानं मोठी व्हायची.त्यानं स्वप्नापैकी एखादा मैलाचा दगड गाठला की लगेच आणखी एखादं मोठं आणि एखादं जास्त दिव्य स्वप्नं त्याला खुणावत असायचं.


"अतिशय थेट पद्धतीनं खूप लोकांना स्वप्न बघायला आणि जास्त चांगल्या जगाची कल्पना करायला त्यानं शिकवलंय त्याचं नाव होतं वॉल्ट डिस्ने.


"पण तुला एक काळजी घ्यावी लागेल.आयुष्यभर जपायची स्वप्नं : ती केवळ तुझीच असायला हवीत. दुसऱ्या कोणाची ती असूच शकत नाहीत. आणि ती स्वप्नं संख्येनं आणि आकारानं वाढती रहायला हवीत.


"माझा दुसरा एक मित्र होता.त्याच नावं तुला माहीत नाहीये.तो म्हणायचा,खूप कष्ट करायचे आणि आयुष्याची पन्नाशी आल्यावर निवृत्त व्हायचं,असं त्याचं स्वप्न होतं.त्यानं खरोखर खूप कष्ट केले आणि धंद्यात अफाट यश मिळवलं.तो निवृत्त होण्याचं स्वप्न बाळगून होता.पण त्यापलिकडे कसलीच ओढ त्याला नव्हती.


"त्याच्या पन्नासाव्या वाढदिवशी आम्ही बरीचजणं जमलो.

त्याचा पन्नासावा वाढदिवस आणि त्याची निवृत्ती साजरी केली.त्यानं त्याचं स्वप्न नीट कशालातरी जोडून घेतलं असतं तर त्याच्या जीवनातला तो सर्वात आनंदाचा दिवस झाला असता.दुर्दैवानं त्याची सारी कर्तबगारीची वर्ष त्याच्या धंद्यासाठी खर्ची पडली. त्यात मात्र त्याला खूप अभिमान आणि आत्मसन्मान मिळाला.सुकाणूप्रमाणे वाट दाखवणारा उद्योगधंदा थांबवला तेव्हा अंगात जोम,ताकद असलेला तो माणूस निवृत्तीनंतर ढेपाळायला लागला.लवकरची निवृत्ती मिळावी असं त्याचं नेहमी म्हणणं होतं.पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की त्याच्या जगण्याला आधार मिळावा अशी काही आस राहिलीच नाही."नंतर एकाच महिन्यानं माझ्या या दुसऱ्या मित्रानं आत्महत्त्या केली.


"एक स्वप्न पाहणारा माणूस,तो मृत्यूशय्येवर असतानाही जीवनभर जपलेल्या ओढीमुळे उत्साहित होत होता आणि दुसरा,ज्याचं स्वप्न त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी अशोभनीय होतं,त्यानी आत्महत्त्या केली.यांच्यातला फरक तुला स्पष्ट झालाच असेल.


"जेसन स्वप्न हे फक्त तुझं असणं फार महत्त्वाचं आहे.ते सब घोडे बारा टक्के नसतं.तुझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसेल असं तुझं स्वप्न असावं.तुझ्याबरोबर ते स्वप्न ही वर्धिष्णू वाढत रहावं.त्या स्वप्नांची ओढ असणारा फक्त तूच असशील.


रेड स्टीव्हन्स थांबला,त्यानं घसा साफ केला,आणि असं वाटलं की त्याच्या मनाचं तारू दिशा बदलत आहे. शेवटी तो बोलू लागला. "जेसन,या महिन्यात स्वप्नांच्या देणगीच्या अनुभवाला तू सुरूवात करायची आहेस. सगळं शक्य आहे असं समजायचं.आयुष्यात काय काय करायचं,काय काय व्हायचं,काय काय मिळवायचं याची यादी कर.तुझ्या अंतःकरणाचा सर्वात जास्त कशाकडे ओढा आहे हे विचारात घेऊन अग्रक्रम कशाला द्यायचा ती यादी तयार करायची.


"महिन्याच्या अखेरीस तू त्यातल्या काही स्वप्नांबद्दल मिस्टर हॅमिल्टन बरोबर बोलायचे.


उत्तर बरोबर किंवा चूक असं नसणार.आणि लक्षात ठेव जशी वर्ष लोटतील तशी तुझी स्वप्नं वाढतील आणि विकसित होतील,

स्वप्नांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे,स्वप्न बघणारा होण्याची प्रक्रिया.


"तुला सुंदर स्वप्नं बघण्याचं जीवन मिळो."


रेड स्टीव्हन्सची प्रतिमा लोप पावलीआणि कॉन्फरन्स रूममधल्या टेबलवर घडी घालून ठेवलेल्या हातांकडे जेसन क्षणभर बघत राहिला.शेवटी तो म्हणाला, "आयुष्यात आपण काय करायचं याविषयी मी कधीच विचार केला नाहीये.आपण जिवंत असतो आणि जीवनाचा प्रवाह दिवसामागून दिवस गेले की आपोआप चालू राहतो,असंच मला वाटतं."


मी उभा राहून दाराच्या दिशेनं चालता चालता म्हटलं, "जेसन स्वप्नं बघायला सुरुवात करायला ही छान वेळ आहे.आणि हे शिकायचं असलं तर रेड स्टीव्हन्सकडूनच शिकायचं.त्याच्याहून दुसरा कोणी चांगला शिक्षक नाही. महिन्याच्या शेवटी तुझ्या अहवालाची मी वाट बघतो."


कॉन्फरन्सरूममधून मी बाहेर पडलो,तेव्हा जेसन विचारांमध्ये गढलेला होता आणि मला वाटतं त्याच्या स्वप्नांमध्ये ही.तीन आठवड्यांनी मी माझ्या लिहिण्याच्या टेबलाशी जेसन स्टीव्हन्ससमोर बसलो होतो आणि तो त्याच्या जीवनभराच्या स्वप्नांबद्दल बोलत होता.तो दिवस मी कधीच विसरणार नाही.त्यानं सुरूवात हळूहळू केली होती,पण तो मग बोलण्याच्या रंगात आला.


"सुरूवातीला मला काय करायचंय,कोण व्हायचंय, काय हवंय याची एक लांबचलांब यादी तयार केली.मग लक्षात आलं की ती काही वास्तविक पाहता स्वप्न नव्हती मला हवं तर त्या गोष्टी करणं,तसं बनणं,त्या मिळवणं मला सहज शक्य होतं.आजवर त्या करायला मी वेळ किंवा उत्साह दाखविला नव्हता इतकंच.पण मी जेव्हा वॉल्ट डिस्नीचा विचार केला,तेव्हा माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टी आल्या." जेसन जरासा थांबला.त्यानं मिस् हेस्टिंग्जकडे बघून परत माझ्याकडे बघितलं.मला वाटतं त्याला प्रोत्साहन हवं होतं.मिस् हेस्टिंग्ज हसली आणि तिनं त्याच्याकडे बघत मान डोलावली.जेसननं बोलणं पुढे चालू ठेवलं.त्याचा विश्वास वाढायला लागला होता.


"कुठल्या तरी मार्गानं,वंचित तरूण माणसांचं आयुष्य सुधारावं म्हणून मला काही करता यायला हवं.म्हणजे माझ्या डोळ्यासमोर गरीब तरूण माणसं नाही येत.ज्या लोकांच्या कल्पनेतही स्वतःची ताकद,उत्कट इच्छा, मूल्ये या गोष्टी नाहीत की ज्यामुळे त्यांचे आयुष्य अर्थपूर्ण नाही,अश्या लोकांसाठी मला काम करायचंय. माझे आजोबा रेड माझ्यासाठी जे करताहेत ते मी एका प्रकारे दुसऱ्या तरूणांसाठी करणार आहे."


मिस् हेस्टिंग्जने टाळ्या वाजवल्या.आणि ती आनंदानं म्हणाली, "जेसन मला हे ऐकून फार उत्तेजित वाटतंय. तू किंवा दूसरा कोणी याहून चांगलं आपल्या आयुष्यात करील असं मला वाटत नाही. "जेसन माझ्याकडे बघून म्हणाला, "तुम्हाला हे ठीक वाटतंय ना ?"


हसत मी उत्तर दिलं, "जेसन,चाळीस वर्षांच्या सहवासानंतर मी एक तत्त्व शिकलो आणि ते असं की आयुष्याच्या लढाईत टिकाव धरायचा तर नेहमी मिस् हेस्टिंग्जशी सहमत व्हावं.आणि खरंच माझंपण तिच्यासारखंच मत आहे.तुझ्या जगण्यासाठी एक अगदी छान स्वप्न,एक योग्य ध्येय तुला मिळालं.तुझ्या आजोबांच्या मित्रांच्या गोष्टींची सतत आठवण ठेव. आजोबांनी तुला त्या गोष्टी ऐकवल्या आहेतच. तू जिवंत असेपर्यंत तुझ्या स्वप्नांना जिवंत ठेव."


मिस् हेस्टिंग्ज जेसनबरोबर लिफ्टपर्यंत गेली.मी आपल्या लिहिण्याच्या टेबलाशी एकटाच राहिलो. मी आपल्या स्वप्नांचा विचार करायला लागलो.ती आजही, माझ्या ऐशीव्या वर्षीही,माझी सोबत करत आहेत.पण तरी मी तेव्हाच शपथ घेतली की माझी सर्व स्वप्न टिकून असतील आणि वर ती वर्धिष्णूही असतील.


समाप्त...

३१/१/२६

माझ्या वातावरणातला मुलगा / A boy in my environment

ते बाह्य बदल क्युबामध्ये रोजच घडत होते.या क्रांतीबद्दल जाणून घेण्याची,जी ताकद खूप काळासाठी दाबून ठेवण्यात आली होती.त्या लोकांमधल्या ताकदीला जाणून घ्यायचा एक मार्ग म्हणजे क्युबामधल्या सर्व संघटनांना,कार्यस्थळांना भेट देणं. आणि वैद्यकीय प्रश्नातील मन ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे नुसती माहिती करून घेणं किंवा स्थळांना भेट देणं नव्हे तर ज्यांनी या संघटना,कार्यस्थळे उभारली त्यांच्याबद्दल जाणून घेणं.तिथे जा आणि त्यांना कोणते आजार आहेत,कोणते रोग झाले आहेत हे शोधा,त्यांनी इतकी वर्षे किती तीव्र गरिबी अनुभवली आहे,वारसा म्हणून मिळालेली दडपशाही आणि शरणागती सहन केली आहे ते पाहा.डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी अशा समाजातल्याच व्यक्तींनी मनापासून त्यांच्या नवीन कामावर जायला हवे.


डॉक्टरांचं काम नेहमीच महत्त्वपूर्ण असतं.जगामध्ये जे काही घडतंय त्याबद्दल माहिती असणं,रुग्णाच्या संबंधित काय घडतंय,रुग्णाची मानसिकता काय आहे, वेदनेचं दुःख काय आहे हे सगळं समजून घेणं हे डॉक्टरांच्या सामाजिक जीवनातलं.फार मोठ्या जबाबदारीचं काम आहे.


काही महिन्यांपूर्वी हॅवानामधल्या काही विद्यार्थ्यांच्या गटानं,काही नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांच्या गटानं ग्रामीण भागात जायला नकार दिला आणि तिथे जायला जास्त पैशांची मागणी केली. मागच्या अनुभवावरून.हे असं घडणं स्वाभाविक होतं, कमीतकमी माझ्यासाठी तरी आणि मला ते समजले. मला आठवतं तसंच हे काही वर्षांपूर्वी होतं.पुन्हा एकदा हा एक बंडामधील योद्धा आहे.एका चांगल्या भविष्याची खात्री हवी असलेला हा एकाकी सेनानी आहे.चांगली स्थिती आणि त्यानं किंवा तिनं केलेल्या कामाची पावती त्याला हवी आहे.


जर हे ते लोक नसते तर काय झालं असतं? बहुतेक करून ज्यांची कुटुंबे त्यांच्या शिक्षणासाठी पैसे देऊ शकत होते,ज्यांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि आता ते व्यावसायिक सराव सुरू करत होते. जादूनं म्हणा किंवा कसंही,जर विद्यापीठाच्या व्याख्यान हॉलमधून २०० किंवा ३०० शेतकरी बाहेर पडले असते तर काय झालं असतं ?


सोप्या भाषेत सांगायचं,तर ते शेतकरी त्यांच्या भावाला किंवा बहिणीला भेटण्यासाठी अतिशय आनंदाने लगेचच पळाले असते.त्यांनी शिक्षणासाठी दिलेली अनेक वर्षं वाया गेली नाहीत हे दाखवण्यासाठी त्यांनी सर्वाधिक जबाबदारी आणि सर्वाधिक काम असलेल्या पदांची विनंती केली असती.जेव्हा नवीन विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी वर्गाची मुलं कोणत्याही प्रकारची

पदवी प्राप्त केल्यावर घडतं; ते तेव्हा तसंच घडलं असतं.


पण आपल्याला भविष्याकडे भीतीनं पाहण्याची गरज नाही आणि माणसांना कामगार वर्ग किंवा शेतकरी वर्गाच्या मुलांमध्ये आणि प्रतिक्रांती-विरोधकांमध्ये विभाजित करायला नको.ते सरळ आहे,

खरं नाही आणि क्रांतीत राहणाऱ्या माननीय व्यक्तीला त्यात शिकण्यासारखं काहीही नाही.


आमच्यापैकी जो पहिला गट ग्रॅन्वाला पोहोचला होता, ज्यांनी स्वतःला सिएरा मेस्त्रामध्ये स्थापित केलं होतं,जे त्यांच्यासोबत राहणाऱ्या शेतकरी आणि कामगारांचा आदर करायला शिकले,त्या कोणालाही शेतकरी किंवा कामगार असण्याचा भूतकाळ नव्हता.

साहजिकपणे ते असे होते,ज्यांना काम करायचंच होतं,ज्यांना लहानपणापासून काहीतरी हवं होतं.पण भूक,खरी भूक काय असते हे कोणालाही माहीत नव्हतं, आणि आम्हाला तात्पुरत्या,दोन वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर ते समजायला लागलं होतं. 


आणि त्या नंतर खूप गोष्टी स्पष्ट होत गेल्या.एका माणसाच्या आयुष्याची किंमत पृथ्वीवरच्या सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीपेक्षा करोडो पटींनी जास्त आहे हे आम्ही उत्तम प्रकारे शिकलो.आम्ही कामगार किंवा शेतकऱ्यांची मुलं नव्हतो,ही गोष्ट आम्ही तिथे शिकलो. मग आम्ही हे कशासाठी चार दिशांना ओरडून सांगायला हवं की आम्ही कोणीतरी विशेष आहोत आणि बाकी उरलेले क्युबन लोक शिकूदेखील शकत नाहीत? होय ते शिकू शकतात.खरंतर क्रांतीची हीच अपेक्षा आहे की त्यांनी शिकायला हवं,अपेक्षा आहे की त्यांना हे समजायला हवं की चांगल्या उत्पन्नापेक्षा आपल्या नेत्याची सेवा करणं जास्त महत्त्वाचं आहे,कृतज्ञता कायमस्वरूपी टिकणारी आहे,एखाद्याने जमा केलेल्या सोन्यापेक्षा जास्त काळ टिकणारी आहे.प्रत्येक डॉक्टरने त्याच्या कार्यवर्तुळातही लोकांची कृतज्ञता मिळवली पाहिजे.हा मौल्यवान खजिना मिळवू शकतो आणि त्यानं तो मिळवायला हवा.


आपण आपल्या जुन्या संकल्पना पुसून टाकायला हव्यात आणि लोकांच्या जास्तीतजास्त जवळ जायला हवे.आधीसारखे नाही,

कारण तुम्ही सर्व असे म्हणाल, नाही,मी तर लोकांचा मित्र आहे.

मला कामगार आणि शेतकरी लोकांशी बोलायला आवडते,आणि मी रविवारी अशा अशा ठिकाणी असं... असं बघायला जातो. प्रत्येक जण ते करतो.पण ते लोक दानधर्मासाठी करतात आणि आपण हे एकतेसाठी करतो.आपण पण "हे बघा आम्ही आलो आहोत", हे सांगण्यासाठी जायला नको."आम्ही इथे तुम्हाला काही द्यायला आलो आहोत,तुम्हाला आमचे विज्ञान शिकवण्यासाठी आलो आहोत,तुमच्या चुका दुरुस्त करण्यासाठी,तुम्हाला सुसंस्कृत बनवण्यासाठी,तुमच्या प्राथमिक ज्ञानाचा अभाव दूर करण्यासाठी आलो आहोत.आपण शोधात्मक भावनेच्या उत्साहाने जायला हवं, शहाणपणाच्या अशा महान स्रोतापासून शिकण्यासाठी लोक आहेत," हे आपण सांगायला हवं.


आपल्याला बऱ्याचदा अशी जाणीव होते की,आपण किती चुकीच्या संकल्पनांमध्ये होतो ज्या आपल्याला माहीत होत्या.त्या आपल्यातल्याच एक भाग झाल्या होत्या आणि साहजिकच आपल्या चेतनेचाही भाग झाल्या होत्या.प्रत्येक वेळेस आपण आपल्या सर्व संकल्पना बदलल्या पाहिजेत,केवळ सामान्य किंवा तांत्रिक संकल्पनाच नव्हे,तर काही वेळा वैद्यकीय संकल्पना

देखील.एखाद्या मोठ्या शहरात रोगांवर केले जातात तसे उपचार खेड्यात उपलब्ध नाहीत असं आपण नेहमीच पाहतो.आपण असं बघू की डॉक्टरांनासुद्धा शेतकऱ्यासारखं बनावं लागेल,त्याला किंवा तिला नवीन पदार्थांची लागवड करणं शिकावं लागेल,आणि आता एक गरीब देश असलेला क्युबा कदाचित जगातील सर्वांत श्रीमंत कृषिदेश असू शकतो, त्याच्या अन्नरचनेत विविधता आणण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या उदाहरणातून नवीन प्रकारचे अन्न खाण्याची कला जोपासावी लागेल.आपण पाहू की अशा परिस्थितीत आपल्याला थोडं शैक्षणिक बनावं लागेल,कधी थोडं जास्तदेखील;कधी इतके राजकीयदेखील की आपण आपला शहाणपणा गमावणार नाही,आपल्याला हे दाखवून द्यावं लागेल की आपण लोकांसोबत शिकायला तयार आहोत.नवीन क्युबाच्या निर्मितीसाठी तो महान सुंदर अनुभव घ्यायला आम्ही तयार आहोत.


आपण आधीच महत्त्वाची पावलं उचलली आहेत. १ जानेवारी १९५९ आणि आजमधील अंतर पारंपारिक पद्धतीने मोजता येणार नाही.काही काळापूर्वीच लोकांना समजलंय की इथे फक्त हुकूमशहाच पडला नाही तर इथली पूर्ण व्यवस्थाच कोलमडली आहे.आता लोकांनी हे समजून घ्यायला हवं की या कोसळलेल्या व्यवस्थेच्या अवशेषांवरच अशी व्यवस्था उभी राहायला हवी-जी लोकांना परिपूर्ण आनंद देईल.


आमची अशी खात्री पटली आहे की शत्रू एक आहे. आपल्याला माहीत आहे की,प्रत्येक जण याची वाट बघत आहे की कोणीतरी त्यांचे ऐकून घेईन,आपला आणि संपूर्ण लॅटिन अमेरिकेचा शत्रू,युनायटेड स्टेटमधलं एकाधिकारशाहीचं सरकार आहे असं सांगण्यापूर्वी एकाधिकारशाहीच्या विरोधातलं आपलं मत स्पष्टपणे मांडण्यापूर्वी,दूतावासात कोणीतरी आपलं म्हणणं ऐकून घेऊन ते प्रसारित करेल.


जेव्हा सगळ्यांना माहीत आहे की शत्रू कोण आहे, जेव्हा शत्रूच्या विरोधात लढणाऱ्या लोकांमध्ये समान धागा असणं आपला सुरुवातीचा मुद्दा असेल,तेव्हा दुसरा मुद्दा येतो.आपलं क्युबामध्ये काय ध्येय आहे? आपल्याला काय हवं आहे? आपल्याला लोकांचा आनंद हवा आहे की नको? आपण क्युबाच्या संपूर्ण आर्थिक मुक्तीसाठी लढत आहोत की नाही? आपण कोणत्याही लष्करी गटाशिवाय,कोणताही अंतर्गत किंवा विदेशी निर्णय घेण्यासाठी पृथ्वीवरच्या कोणत्याही मोठ्या शक्तीच्या दूतावासाच्या सल्ल्याशिवाय,इतर अनेक मुक्त देशांप्रमाणे आपला देश मुक्त करण्यासाठी लढत आहोत का? आपण ज्यांच्याकडे जास्त आर्थिक सुबत्ता आहे त्यांच्याकडून ज्यांच्याकडे अजिबात नाही अशांना परत वाटप करण्याबद्दल विचार करत आहोत का? आपण कलात्मक कामाबद्दल,रोज आनंद देणाऱ्या गोष्टी करण्याबाबत विचार करत आहोत का? जर करत असू,तर आपल्याकडे आधीच आपली ध्येयं आहेत. मोठ्या धोक्याच्या वेळेस,मोठ्या चिंतेच्या वेळेस आणि मोठ्या निर्माणाच्या वेळेस जे काही ग्राह्य धरले जाते ते म्हणजे मोठे शत्रू आणि मोठी ध्येयं.जर आपण सहमत असू तर आपल्याला माहीत आहे की आपल्याला कुठे जायचं आहे,नंतर आपल्याला आपलं काम सुरू करायचं आहे.


मी सांगत होतो की क्रांतिकारी बनण्यासाठी क्रांती होणं गरजेचं आहे.आपल्याकडे ती आधीच झाली आहे. आणि क्रांतिकारी व्यक्तीला हेदेखील माहीत असायला हवं की त्याला किंवा तिला कोणत्या लोकांसोबत काम करायचं आहे.मला असं वाटतं की आपण अजूनही एकमेकांना व्यवस्थित ओळखत नाही.

आपल्याला अजूनही थोडा प्रवास करायला हवा आहे. जर आपल्याला ध्येय माहीत असेल,आपला शत्रू माहीत असेल आणि जर कुठे प्रवास करायचा आहे ती दिशा माहीत असेल,तर बाकी फक्त उरते,ते म्हणजे


रोजचा रस्ता माहीत असणं आणि त्यावर चालणं. कोणीही त्या रस्त्याकडे बोट दाखवू शकत नाही,तो रस्ता प्रत्येकाचा वेगळा असतो,हा तो रस्ता आहे ज्यावरून तो किंवा ती रोज प्रवास करत असतात,रोज वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जात असतात आणि आपल्या व्यावसायिक जीवनात त्याचा अवलंब करत असतात, लोकांच्या चांगल्यासाठी ते समर्पित असतात.


जर आपल्याकडे आधीच हे पैलू असतील,ज्यांद्वारे आपल्याला भविष्याकडे वाटचाल करायची आहे,तर मग चला जोसर्तीमाच्या एका वाक्याचं स्मरण करू या, 'जे सध्या माझ्या आचरणात आलं नसलं,तरी ते आपण आपल्या आचरणात आणलं पाहिजे', 'सांगण्याचा उत्तम मार्ग म्हणजे करणं.' आणि चला तर मग... क्युबाच्या भविष्याकडे वाटचाल करू या.


समाप्त..

२९/१/२६

माझ्या वातावरणातला मुलगा / A boy in my environment

'द मोटरसायकल डायरीज' लिहिल्यानंतर आठ वर्षांनी अर्नेस्टो चे गव्हेरा क्युबाच्या क्रांतिकारी सरकारमध्ये मध्यवर्ती व्यक्ती झाला होता.अल्बर्टो ग्रॅनाडोसोबतच्या आपल्या प्रवासानंतर,त्यानं पुन्हा लॅटिन अमेरिकेचा प्रवास केला,ग्वाटेमालामध्ये सीआयए समर्पित बंडाचा अनुभव घेतला आणि क्युबाच्या क्रांतिकारी चळवळीत सामील झाला.त्यामुळे शेवटी १९५९ मध्ये त्याला सत्ता मिळाली.क्युबामधले वैद्यकीय विद्यार्थी आणि कामगार यांच्या समोर दिलेल्या भाषणाचा प्रभाव हा त्याच्या स्वतःच्या वैद्यकीय विद्यार्थी ते राजकीय कार्यकर्त्यापर्यंतच्या प्रवासावर पडला.


जवळजवळ सगळ्यांना माहीत आहे की,अनेक वर्षांपूर्वी मी माझं आयुष्य डॉक्टर म्हणून सुरू केलं होतं.'डॉक्टर' म्हणून सुरुवात केल्यावर मी औषधांचा अभ्यास करायला सुरुवात केली.तेव्हा मी आज धारण केलेल्या बहुतेक संकल्पना माझ्या आदर्शाच्या भांडारात गैरहजर होत्या.


परिशिष्ट : वैद्यकीय विद्यार्थ्यांसमोर भाषण,अर्नेस्टो चे गव्हेरा,द मोटरसायकल डायरीज,अनुवाद - अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन


प्रत्येकालाच व्हायचं असतं.तसं मलाही यशस्वी व्हायचं होतं.मी खूप प्रसिद्ध संशोधक व्हायचं स्वप्न बघितलं होतं.खरोखरच मानवतेला धरून असेल असं काहीतरी साध्य करण्यासाठी मी अथक परिश्रम घ्यायचं स्वप्न पाहिलं.पण हे त्याच वेळी शक्य असेल.ज्या वेळी आपला स्वतः चा विजय होईल.मी.जसे आपण सर्वच आजूबाजूच्या परिस्थितीची मुलं आहोत,मीपण होतो.


विशिष्ट परिस्थितीमुळे आणि कदाचित माझ्या स्वभावामुळे पदवी मिळाल्यानंतर मी लॅटिन अमेरिकेतून प्रवास करायला सुरुवात केली.आणि मला हे देश जवळून बघता आले.डॉमिनिकन सोडल्यानंतर मी अमेरिकेतल्या एकूणएक गावांना भेट दिली आहे.


जसा मी आधी विद्यार्थी आणि नंतर डॉक्टर म्हणून प्रवास केला,तसा माझा गरिबी,भूक,रोगराई,कमी संशोधनामुळे मुलांना बरं करण्याची कमतरता यांच्याशी जवळून संबंध येत गेला आणि मला एक विशिष्ट प्रकारचा सुन्नपणा आला.तिथं मूल गमावणं ही फार मोठी गोष्ट नव्हती.आपली मातृभूमी,लॅटिन अमेरिकेतही वाईट परिणाम झालेल्या वर्गामध्ये हे घडत आलं आहे. आणि त्यावेळी मला असं जाणवायला लागलं की,हे प्रसिद्ध संशोधक होण्या इतकंच किंवा वैद्यकीय शास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याइतकच महत्त्वाचं आहे आणि यातून लोकांना मदत होत होती.


पण आपल्या सगळ्यांप्रमाणे मीही परिस्थिती चा मुलगा म्हणून जगत होतो आणि मला त्या लोकांना माझ्या वैयक्तिक प्रयत्नांतून मदत करण्याची इच्छा होती.मी आधीच भरपूर प्रवास केला होता.तेव्हा मी ग्वाटेमालामध्येच होतो आणि मी डॉक्टरांना मार्गदर्शक ठरतील अशा नोट्स काढायला सुरुवात केली होती. 


क्रांतिकारक डॉक्टर होण्यासाठी मला काय आवश्यक आहे याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली.तरी हा हल्ला झाला,(१९५४) युनायटेड फ्रूट कंपनीने केलेले यूएस स्टेट डिपार्टमेंट सीआयएचे निर्देशक, फॉस्टर डलस आणि कॅस्टीलो आर्मास या त्यांच्या हातातल्या कठपुतळीने,या साऱ्यांनी सत्तांतराचा डाव साधला.ते सगळे एक सारखेच आहेत. (त्यानं अर्बेंझची जागा घेतली) क्युबाचे लोक अजून परिपक्वतेच्या पातळीवर पोहोचले नाहीत हे लक्षात घेऊन मी आक्रमक झालो आणि एका चांगल्या दिवशी बरेच जण पळून जाण्याचा मार्ग स्वीकारतात तसंच मीही ग्वाटेमालामधून निसटून जाण्याचा मार्ग स्वीकारला. कारण ती माझी जन्मभूमी नव्हती.


मग मला एक मूलभूत गोष्ट जाणवली.क्रांतिकारक डॉक्टर होण्यासाठी किंवा क्रांतिकारक होण्यासाठी प्रथम क्रांती होणं आवश्यक असतं.अलिप्त प्रयत्न, वैयक्तिक प्रयत्न,आदर्शाची शुद्धता,संपूर्ण आयुष्य आदर्शाच्या श्रेष्ठांना अर्पण करण्याची इच्छा म्हणजे लॅटिन अमेरिकेच्या कोपऱ्यात शत्रूचं सरकार आणि प्रगतीच्या विरुद्ध असणाऱ्या सामाजिक परिस्थितीविरुद्ध लढणं,असे प्रयत्न केले तर काही उपयोग नाही.


आपल्या क्युबात क्रांती होणं गरजेचं होते. त्यासाठी ज्यांना शस्त्रांचा वापर आणि लढण्याचा सराव आहे,ज्यांना शस्त्रांची किंमत आणि माणसांच्या एकीत किती ताकद असते हे माहीत आहे,अशा सगळ्यां लोकांना एकत्र करणं गरजेचं होतं.


म्हणजे मग आपण आज आपल्या समोर असलेल्या समस्येच्या गाभ्यात शिरतो.आपल्याकडे आधीपासूनच हक्क आहेत आणि इतर कोणत्याही गोष्टींपूर्वी कर्तव्य आहे,एक क्रांतिकारी डॉक्टर एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या व्यवसायाचे तांत्रिक ज्ञान लोकांच्या सेवेत ठेवते.आता आपण पूर्वीच्या प्रश्नाकडे परत येऊ.एखादी व्यक्ती वैयक्तिक प्रयत्नांना समाजाच्या गरजांना कशी जुळवते?आपल्या प्रत्येकाचे आयुष्य कसे होते,आपण प्रत्येकाने डॉक्टर म्हणून किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात क्रांतीपूर्वी आपण कसं काम केलं हे आपल्याला पुन्हा आठवायचं आहे. 


आपल्याला ते परत उत्साहानं करावं लागेल.त्यानंतर आपण असा निष्कर्ष काढू की,त्यापूर्वीच्या युगात आपण जे काही विचार लादले होते ते सर्व दूर केले पाहिजेत आणि एक नवीन प्रकारचा माणूस निर्माण केला पाहिजे,जो नवीन क्युबाचं प्रतिनिधित्व करेल.मग जरा सोपं होईल.


क्युबामध्ये एक नवीन प्रकारचा मनुष्य तयार होत आहे, हे तुमच्यासाठी चांगले आहे.हे हॅवानामधल्या रहिवाशांसाठी चांगले आहे;पण ही कल्पना पचवायला इतरांना अवघड जाऊ शकतं.राजधानीत पूर्णपणे कौतुक केलं जाऊ शकत नाही,पण जे इतर कोपऱ्यांत दिसू शकतं.तुमच्यापैकी जे २६ जुलै रोजी सिएरा मेस्त्राला गेले होते,त्यांनी नक्कीच काहीतरी महत्त्वाचं पाहिलं असेल.तुम्ही अशी मुलं पाहिली असतील जी उंचीने ८-९ वर्षांची असल्यासारखी वाटतात.पण ती खरंतर १३-१४ वर्षांची असतात.

ती सिएरा मेस्त्राची खरी मुले आहेत,भुकेली मुले आहेत आणि सर्व प्रकारच्या गरिबीचे,कुपोषणाचे ते बळी आहेत.


या लहान क्युबामध्ये चार-पाच दूरचित्रवाहिन्या,शेकडो रेडिओ स्टेशन्स आहेत,इथे आधुनिक विज्ञानानं प्रगती केली आहे,तिथे जेव्हा एका रात्रीही मुलं शाळेत आली आणि त्यांनी विजेचा प्रकाश पाहिला तेव्हा त्यांना ते खूप तारे चमकत असल्यासारखेच वाटले! तुमच्यापैकी काही जणांनी त्या मुलांना पाहिलं असेल जी आता सामूहिक शाळांमध्ये शिकतात.अबकडपासून ते व्यापार सुरू करण्यापर्यंत अगदी क्रांतिकारक होण्यापर्यंतचे ज्ञान ते शिकताहेत.ही क्युबामध्ये जन्माला येत असलेली नवीन पिढी आहे.ती दुर्गम अशा ठिकाणी जन्माला येत आहे, जिथे सहकारी कार्यस्थळं आहेत. 


आजच्या आपल्या चर्चेच्या विषयाशी या सर्वांचा खूप संबंध आहे.डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कामगारांचे क्रांतिकारी चळवळीत एकीकरण आहे.कारण मुलांना प्रशिक्षण देणं,त्यांचं पोषण करणं,शिक्षण देणं हे क्रांतीचं कार्य आहे.जमीनदारांच्या अनुपस्थितीत त्यांच्या जमिनीचं वाटप करण्याचं काम,रोज फळाची अपेक्षा न करता त्याच जमिनीवर घाम गाळणं हे अतिशय चांगलं काम क्युबामध्ये घडलं आहे.


रोगाविरुद्धची लढाई निरोगी शरीर निर्माण करण्याच्या तत्त्वांवर आधारित असावी.कमकुवत भागावर डॉक्टरांनी केलेल्या कलात्मक कार्यावर नाही;तर एकत्रितपणे विशेषतः सामाजिक एकत्रीकरणावर असावी.


एक दिवस औषध हे असे शास्त्र बनलं पाहिजे जे रोगांना प्रतिबंध करेल,जे संपूर्ण जनतेला त्यांच्या वैद्यकीय जबाबदाऱ्यांकडे वळवेल,जो नवीन समाज आपण बनवत आहोत त्यात केवळ तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा काहीतरी असामान्य असे हाताळण्यासाठी हस्तक्षेप करावा लागेल.त्या संघटनात्मक कार्यासाठी,सगळ्यां क्रांतिकारी कार्यासाठी जी मूलभूत जरुरी असते,ती म्हणजे एक व्यक्ती.क्रांती ही एकामुळे होत नाही तर ती सामूहिक इच्छाशक्तीचा, सामूहिक पुढाकाराचा परिणाम असते.पण त्यातला विरोधाभास म्हणजे,ही माणसाच्या वैयक्तिक क्षमतेला मुक्त करणारी असते.


तथापि, क्रांती काय करत असेल तर ते म्हणजे,त्या क्षमतेला दिशा देण्याचे काम.आपलं आजचं काम वैद्यकीय व्यवसायातल्या सर्जनशील प्रतिभेला सामाजिक कार्याकडे वळवणं हे आहे.


एका युगाच्या अस्तापाशी आपण आहोत,केवळ क्युबात असं नाही.सगळा विरोधाभास असूनही,काही लोकांच्या आशा असूनही,जे काही भांडवलशाहीचे प्रकार आपण पाहिले आहेत ज्यात आपण वाढलो आणि ज्याने ग्रस्त झालो ते आता जगात सगळीकडेच पराभूत होताहेत. एकाधिकारशाहीचा पराभव होतोय.


सामाजिक शास्त्राचा प्रत्येक नव्या दिवशी विजय होतोय आणि आफ्रिका आणि आशियाच्या इतर अधीन खंडांमध्ये काही काळापूर्वी सुरू झालेल्या मुक्ती चळवळीच्या लॅटिन अमेरिकेत मोहरा असल्याचा अभिमान आणि आत्मत्यागाचे कर्तव्य आमच्याकडे होते.गहन सामाजिक बदल लोकांच्या मानसिकतेमध्येसुद्धा गहन बदलाची मागणी करतात.

व्यक्तीची सामाजिक वातावरणात स्वतःची अशी वेगळी अलिप्त क्रिया असते


असा व्यक्तिवाद क्युबामधून नष्ट व्हायला हवा. सामाजिक फायद्यासाठी व्यक्तिवादामध्ये उद्या प्रत्येक व्यक्तीचा पुरेपूर वापर झाला पाहिजे.पण आज जरी हे सगळं समजत असलं,मी सांगत असलेल्या सगळ्यां गोष्टी समजत असल्या आणि जरी सगळ्यांची वर्तमान, भूतकाळ आणि भविष्याबाबत विचार करण्याची इच्छा असली,तरी विचार करण्याची पद्धत बदलण्यासाठी - सखोल अंतर्गत बदल आवश्यक आहेत आणि गंभीर बाह्य बदल प्रामुख्यान सामाजिक बदल घडवून आणल्यानं यात मदत होईल.


…अपुरे राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…!!


२७/१/२६

अँडीजवरचा चमत्कार / Miracle on the Andes



अँडीजवरच्या यशकथेवर पीअर्स पॉल रीड या लेखकाने लिहिलेलं 'अलाइव्ह' हे पुस्तक जगभर प्रचंड गाजलं. या अपघातातून वाचलेल्या सोळाजणांशी, त्यांच्या नातेवाइकांशी, तसंच मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाइकांशी बोलून रीड यांनी ही कहाणी जिवंत केली. त्या वेळी ते स्वतः या मुलांच्या कहाणीत ते इतके गुंतून गेले होते की मुलं त्यांना सतरावा सर्व्हयव्हर म्हणत! याखेरीज नँडो पॅरेडो आणि रॉबर्ट कनेसा यांनीही स्वतःच्या कहाणीवर अनुक्रमे 'मिरॅकल ऑन अँडीज' आणि 'आय हॅड टु सर्काइव्ह' ही पुस्तकं लिहिली. या लेखासाठी मुख्यतः 'अलाइव्ह' या पुस्तकाचा आधार घेतला आहे.


त्यानुसार १५ नोव्हेंबरला अपघात होऊन ३३ दिवस होऊन गेल्यानंतर नँडो कनेसा आणि विंझटिन मोहिमेवर निघतात; पण नेमकी त्या दिवशी एवढी हिमवृष्टी होते की त्यांना लगेचच पुन्हा विमानाकडे परतावं लागतं. दोन दिवसांनंतर ते पुन्हा बाहेर पडतात. या वेळी विमानाच्या ठिकाणापासून खाली उतरून थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना विमानाचं शेपूट सापडतं. त्यांच्यासाठी तो जणू खजिनाच असतो. त्यात अनेक बॅगा असतात. त्यात या तिघांना बरेच नवे कपडे मिळतात. प्रत्येकजण अंगावरचे घाणेरडे कपड़े काढून कपड्यांचे नवे थर घालतो. त्याशिवाय वाचायला कॉमिक्स आणि  कॅमेरा अशी कमाईही होते. कॅमेरा अजूनही चालू स्थितीत असतो. (त्यामुळेच अँडीजवर अडकलेल्या या मुलांच्या वास्तव्याचे फोटो आज आपल्याला बघायला मिळतात.) पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना विमानाच्या रेडिओची बॅटरी सापडते. ही बॅटरी काढून रेडिओला लावली तर बाहेरच्या जगाशी संपर्क करता येईल असं त्यांना वाटत असतं; पण बॅटरी इतकी जड असते की तिथून ती इंचभरही हलत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी विमानाकडे परतून रेडिओ आणि त्यातल्या त्यात रेडिओची माहिती असणारा रॉय हार्ले यांना घेऊन पुन्हा इथे यायचं असं ते ठरवतात. त्या रात्री विमानाच्या त्या शेपटात त्यांना खूप काळात न मिळालेला आराम अनुभवता येतो. तिघं परततात. दुसऱ्याच दिवशी रेडिओ आणि रॉयसह ही पलटण पुन्हा तोच रस्ता चालू लागते. रॉय खूप खटपटी करतो, पण रेडिओ सुरू होत नाही. बाहेरच्या जगाशी संपर्क करण्याचा त्यांचा शेवटचा प्रयत्नही फोल ठरलेला असतो. परतीचा प्रवास रॉयसाठी विशेष अवघड ठरतो. शेवटच्या चढणीपाशी त्याच्यातले त्रास संपतात. मला इथेच सोडा, अशी विनवणी करत तो बर्फात पडून राहतो. त्याची वाट पाहत एका जागी थांबलो तर आपणही संपून जाऊ हे माहिती असूनही नँडो थांबून राहतो, त्याला ऐकवणार नाहीत अशा शिव्या घालत त्याच्यातली धुगधुगी पुन्हा जागी करतो. अगदी शेवटच्या टप्प्यावर तर तो कुठून शक्ती आणतो माहिती नाही, पण रॉयला अक्षरशः उचलून तो विमानापर्यंत घेऊन येतो.


या मोहिमेने झालेली शरीराची झीज भरून काढायला काही दिवस जातात. त्यानंतर तिघं पुन्हा एकदा बाहेर पडतात. या वेळी त्यांनी बऱ्यापैकी तयारी केलेली असते. प्रत्येकाने अंगावर पँट आणि शर्ट्सचे अनेक थर चढवलेले असतात. त्यावर तीन-तीन स्वेटर्स, मेलेल्या माणसांच्या कातडीपासून तयार केलेले सॉक्स,मांसाने भरलेली सॉक्सची पिशवी, पाण्याची बाटली, विमानातल्या सामानापासून तयार केलेले गॉगल्स, असा सगळा जामानिमा असतो. शिवाय या वेळी त्यांच्याकडे तिघंही मावतील अशी स्लीपिंग बॅगही असते. जाता जाता.


नँडो मागे वळतो आणि 'अन्नसाठ्या'ची जबाबदारी बघणाऱ्या मित्राला सांगतो, "समजा तशीच वेळ आली, तर माझ्या आई आणि बहिणीचं शरीर वापरायलाही मागेपुढे बघू नका." ." त्याच्या या वक्तव्याने तो मित्रच नव्हे तर आपणही गारद होऊन जातो. हे सांगण्याची ताकद नॅडोकडे कुठून येते ?


(तिघंही पश्चिमेकडे चालू लागतात.मरण्याआधी पायलट जे बोललेला असतो त्यावरून मुलांच्या लक्षात आलेलं असतं, की पश्चिमेकडे काही अंतरावर चिली देशाची हद्द सुरू होत असणार. त्यानुसार शेवटची मोहीम त्या दिशेने निघते. दिवसभर न थांबता चालत राहिलं तर रात्रीपर्यंत आपण किमान शिखराच्या जवळपास तरी पोहोचू, असा त्यांचा अंदाज असतो; पण प्रत्यक्षात बर्फामध्ये सगळीच अंतरं फसवी असतात. आत्ता दिसतंय ते टोक म्हणजे शिखर, असं वाटत असताना तिथे पोहोचल्यावर शिखर अजून बरंच वर असल्याचं त्यांच्या लक्षात येतं आणि नाइलाजाने ते तिघं पुन्हा शक्ती गोळा करून त्या दिशेने चालू लागत लागतात. 


जिथे अँडीजमधली हिमशिखरं सर करणं कसलेल्या गिर्यारोहकांसाठीही जवळपास अशक्य असतं, तिथे गिर्यारोहणातला 'ग' देखील माहिती नसलेली, महिनाभर उपाशी असलेली आणि गिर्यारोहणाची कोणतीही साधनं सोबत नसलेली तरुण पोरं केवळ इच्छाशक्तीच्या बळावर ती शिखरं चढत असतात.त्यातही सर्वांत पुढे असतो तो नँडो. लवकरात लवकर सुटका करून घेण्याच्या आणि पल्याड काय आहे हे पाहण्याच्या इच्छाशक्तीने त्याचा असा काही ताबा घेतलेला असतो की थकलेलं शरीर अस्तित्वातच नसल्यासारखा तो चालत असतो. त्याच्या झपाट्याला कनेसा आणि विंझटिन दोघंही पूरे पडत नसतात.


संध्याकाळ होते.अजून शिखर दृष्टिक्षेपातही नसतं. त्यामुळे अखेर त्यातल्या त्यात बरी जागा बघून रात्र काढायचा निर्णय होतो. ही जागा सपाटही नसते. फक्त समोर खडक असल्याने आपण खाली कोसळणार नाही, एवढाच काय तो दिलासा असतो. जवळपास उभ्यानेच झोपून हे तिघं रात्र घालवतात. उठतात ते पूर्ण गोठलेल्या अवस्थेत. अशी आणखी एक रात्र काढायला लागली तर आपण जिवंत असू का, हा विचार तिघांच्याही मनात येतो; पण नँडो थांबायला किंवा परतायला तयार नसतो. दुसऱ्या दिवशी दुपारी दोघा सोबत्यांना मागे टाकून तो अखेर शिखरावर पोहोचतो; पण ज्या आशेने तो हे शिखर चढून आलेला असतो.त्यावर पाणी फिरतं.शिखरावरून चहुबाजूंनी दिसत असतात त्या केवळ हिमाच्छादित पर्वतरांगा. कुठेही पर्वतरांगा संपून जीवन सुरू होत असल्याचं चिन्ह नसतं. त्यांच्या धडपडीची अखेर झालेली असते.


नॅडोच्या जागी कुणीही असतं तरी त्या शिखरावर शरीर टाकून तिथेच मृत्यूची वाट बघणं त्याने पत्करलं असतं किंवा पुन्हा विमानात जाऊन आपल्या सोबत्यांसोबत मृत्यूची वाट बघण्याचा मार्ग स्वीकारला असता. पण नँडो हार मानायला तयार नसतो. शरीरात त्राण नसताना आणि पुढे काय आहे याची पुसटही कल्पना नसताना तो पुढे चालत राहण्याचं ठरवतो. त्या परिस्थितीतही नँडोला आपण हे शिखर चढणं किती मोलाचं आहे याची जाणीव असते. या शिखरावर पोहोचलेला आपण पहिलाच माणूस असू, या विचाराने त्याचं मन भरून येतं. फाटलेल्या ओठांसाठी औषध म्हणून सोबत आणलेली लिपस्टिक घेऊन तो एका प्लास्टिक पिशवीवर 'माऊंट सेलर' असं लिहितो आणि एका दगडाखाली ठेवून देतो. त्या शिखराला त्याने स्वतःच्या वडिलांचं नाव दिलेलं असतं !


नामकरणाचं काम आटोपल्यावर तो परत एकदा परिस्थितीचं अवलोकन करू लागतो. त्याच्या लक्षात येतं, की हे शिखर उतरून पल्याड गेलं की काही किलोमीटरनंतर एक दरी आहे, जिथे बर्फाचं प्रमाण बरंच कमी झालेलं दिसतं आहे. पण तिथपर्यंत चालत जाणं शक्य आहे का? त्याच्या मनात त्याबद्दल शंकाही येत नाही. तो शिखर उतरून कनेसा आणि विंझटिन थांबलेले असतात तिथे येतो आणि कनेसाला सांगतो, "आपण विंझटिनला परत विमानाकडे पाठवू आणि त्याचा अन्नसाठा आपल्याकडे ठेवून घेऊ. म्हणजे आणखी काही दिवस आपल्याला तग धरून राहता येईल." नॅडोच्या वेड्या आशेवर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जावं की सध्या सुरक्षित वाटणाऱ्या दुसऱ्या पर्यायाकडे, विमानाकडे परतावं हे कनेसाला कळत नाही. त्याचं शरीर त्याला सांगत असतं, की आता पुढे चालत राहणं तुझ्या क्षमतेपलीकडचं आहे; पण तरीही का कुणास ठाऊक, अखेर तो नँडोसोबत जाण्याचा निर्णय घेतो. विंझटिन त्या दोघांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडे सोपवून मागे फिरतो आणि सुरू होतो या दोघांचा अखेरचा प्रवास.


दोघं पुन्हा एकदा माऊंट सेलर चढू लागतात. दोघंही इतके थकलेले असतात की दर चार पावलांनी त्यांना थांबावं लागत असतं. अखेर शिखर येतं आणि उतार सुरू होतो. उतरण्यासाठी शक्ती कमी लागत असते; पण चुकून एक पाऊल चुकीचं पडलं तरी मृत्यू ठरलेला. एखादं हाड मोडलं तरी अशा ठिकाणी परिणाम

तोच मृत्यू. त्यातून कनेसाची शक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही संपत आलेली असते. तो सतत नॅडोच्या मागे पडत असतो आणि त्याला हाका मारून आपण मागे असल्याची आठवण करून देत असतो. 


दुपार होते तेव्हा ते एका सपाटीवर पोहोचतात.अजून अंधारू लागलं नसलं तरी ती जागा मुक्कामासाठी चांगली वाटल्याने दोघंही तिथे थांबायचं ठरवतात. सूर्य अजूनही तळपत असल्यामुळे बर्फाने ओले झालेले कपडे काढून ते सुकवत ठेवतात. मांसाचे थोडे तुकडे आणि ब्रँडी असं जेवण करून स्लीपिंग बॅगमध्ये शिरतात. थंडी थोडी कमी झालीय याचा अर्थ आपण आता अँडीजच्या शेवटाला आलो असणार, अशी स्वतःची समजूत घालत ते झोपी जातात.


दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य वर आल्यावर न्याहारी करून ते पुन्हा चालू लागतात. रात्रीच्या विश्रांतीमुळे ते काही काळ झपाट्याने चालतात; पण लवकरच तो उत्साह संपतो आणि थकवा जाणवू लागतो. पूर्ण संपलेल्या शरीराकडे दुर्लक्ष करण्यासाठी कनेसा सतत देवाशी बोलत असतो. त्याचं देवाला मागणं असतं, 'हा प्रवास तुला जितका अवघड करायचाय तितका कर पण तो अशक्य होऊ देऊ नकोस.' नॅडोचे विचार आकाशातल्या बापापेक्षा पृथ्वीवरच्या त्याच्या सख्ख्या बापावर केंद्रित झालेले असतात.


दुपार उलटून गेल्यानंतर ते पुन्हा मुक्कामाची तयारी करतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की शिखरावरून पाहिलेली दरी आता बरीच जवळ दिसू लागलेली आहे. संध्याकाळ व्हायला आली असली तरीही अजून अंधाराची चिन्हं नाहीत. पर्वतरांगा संपत आल्याचंच हे चिन्ह असतं. सकाळी उठून पुन्हा चालणं सुरू होतं. आता कनेसाचा वेग आणखी मंदावतो. पावलं वाकडीतिकडी पडू लागलेली असतात. तो सतत नँडोला थांबण्यासाठी हाकारत असतो; पण शरीर तितकंच थकलेलं असलं तरी नॅडोचं मन त्याला पुढे पुढे खेचत असतं. अशाने अतिश्रमाने मरशील, हा कनेसाचा इशाराही तो कानाआड करतो. बर्फ कमी होऊ लागलेला असतो आणि आता पुढे काय दिसेल या ओढीने नँडो अक्षरशः पळत दरीच्या | शेवटाला येऊन पोहोचतो.


जे समोर दिसतं तो त्यांना स्वर्ग वाटतो! बर्फ संपून प्रचंड मोठे खडक उघडे पडलेले असतात आणि त्यामधून एक छोटा झरा वाहत असतो. झऱ्याच्या दोन्ही काठांवर गवत आणि दगडांवर शेवाळं उगवलेलं असतं. गवतात नाना प्रकारचे किडे बागडत असतात, पाली हिंडत असतात, पक्षी उडत असतात. हे दृश्य पाहून नँडो आणि कनेसा दोघंही आनंदाने वेडे होतात. गटागट झऱ्याचं पाणी पिऊन तेगवतात लोळण घेतात. कितीं तरी वेळ ते तिथेच पडून राहतात. अजून माणसांच्या वस्तीचा मागमूस लागला नसला तरी अँडीजच्या कराळ जबड्यातून त्यांची सुटका झालेली असते.


अर्थात प्रवास अजून संपलेला नसतो. आणि शेवटचा हा टप्पाच कनेसासाठी अतिशय कठीण ठरतो. त्याला जुलाबाचा त्रास होऊ लागतो; पण त्याच्या पाठीवरची पिशवी स्वतःकडे घेऊन नँडो चालतच राहतो. थोड्याच वेळात ते दोघं एका नदीच्या काठी पोहोचतात. नदीकाठी हिरवळ असते, झाडं असतात. थोडं लक्ष देऊन पाहिल्यावर कनेसाला अनेक मानवी खाणाखुणाही दिसू लागतात. काही झाडं कापलेली असतात. वाळलेली का असेना पण जनावरांची विष्ठा असते. थोड्या वेळाने नदीच्या पल्याड गाई चरत असल्यासारखंही त्याला वाटतं. आता आपण सुटलो, या आनंदात शेकोटी पेटवून ते मांस भाजून खातात आणि झोपी जातात. सकाळी उठल्यावर दोघांच्याही मनात पहिला विचार येतो तो उरलेलं मानवी मांस पुरून टाकण्याचा. दुसरा माणूस भेटण्याआधी ते काम केलं पाहिजे, असं दोघांनाही वाटत असतं. दोघं पुन्हा चालू लागतात. अखेर थोड्या वेळाने कनेसाला पल्याडच्या बाजूला घोड्यावर बसून चाललेली दोन माणसं दिसतात.


नँडो जिवाच्या आकांताने ओरडत त्यांचं लक्ष वेधून घेतो; पण खळाळत वाहणाऱ्या नदीतून त्याचा क्षीण आवाज त्यांना ऐकू जाईल का ही शंकाच असते. पण आता दैव त्यांच्या साथीला असतं. त्या माणसांना हे दोघं दिसतात. अर्थात बोललेलं ऐकू जात नसल्यामुळे ती माणसं दगडाला कागद आणि पेन बांधून या काठावर फेकतात. नँडो त्यावर घाईघाईने खरडतो, 'आम्ही उरुग्वेच्या विमान अपघातातून बचावलेले प्रवासी आहोत. आमच्याकडे खायला काहीही नाही. आमचे १४ सहप्रवासी अजूनही अँडीजच्या पोटात जिवंत आहेत.' ते वाचून तिकडून उत्तर येतं- 'उद्या!' त्याचबरोबर आणखीही एक दगड नॅडोच्या पुढ्यात येऊन पडतो. त्या दगडाला एक ब्रेडचा तुकडा बांधलेला असतो. तो तुकडा वाटून खाताना नँडो आणि कनेसाला रडू फुटतं. 'आपण वाचलो', एवढंच म्हणत ते किती तरी काळ रडत राहतात. विमान कोसळल्यानंतर सत्तराव्या दिवशी आणि तब्बल दहा दिवस चालून ते पुन्हा बाहेरच्या जगात पोहोचलेले असतात.


दुसऱ्या दिवशी या दोघांना घेऊन जायला घोड्यांवरून माणसं येतात. उरुग्वे विमान अपघातातले प्रवासी सापडल्याची बातमी सगळीकडे पोहोचते. विमानात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी नँडोला घेऊन हेलिकॉप्टर्स अँडीजमध्ये रवाना होतात. नँडो आणि कनेसासह सर्व १६ प्रवाशांची सुखरूप सुटका होते.


या घटनेला आता ४५ वर्षं उलटून गेली आहेत, पण इच्छाशक्तीच्या बळावर मृत्यूला पुरून उरलेल्या तरुणांची ही गोष्ट आजही 'अँडीजवरचा चमत्कार' बनून जगाला आश्चर्यचकित करते आहे.


हा तीन भागातील लेख संपला…!!




२५/१/२६

अँडीजवरचा चमत्कार / Miracle on the Andes

आठव्या रात्री नैंडोची बहीण सुझाना मरते. त्यानंतर प्रत्येकालाच आपल्या मित्रांकडे बघून सर्वांची शक्ती झपाट्याने कमी होत चालल्याचं लक्षात येतं. चॉकलेटचा एक छोटा तुकडा, एक चमचा जॅम आणि बाटलीचं एक टोपण भरून वाइन, एवढाच त्यांचा दिवसभरातला आहार असतो. आता अन्न मिळालं नाही तर आपण हळूहळू मरत जाणार याची जाणीव प्रत्येकाला आतून होते. पण अन शोधणार कुठे ? बाहेर ना गवताचं पातं असतं, ना कुठले कीटक, ना एखादा पक्षी. 


काहीजण बाहेर बर्फात खोदून दगडावर शेवाळं मिळतं का ते बघण्याचा प्रयत्न करतात. तिथे काहीच न सापडल्यामुळे विमानातल्या कुशन्समधला फोम खाण्याचाही प्रयत्न होतो; पण त्याने पोट बिघडून भलतीच पंचाईत होईल हे लक्षात आल्याने तोही मार्ग बंद होतो.


त्यानंतर हळूहळू प्रत्येकाला नकळत ही जाणीव होऊ लागते, की जगायचं असेल तर मेलेल्या मित्रांच्या शरीरातलं मांस खाण्या

खेरीज दुसरा पर्याय नाही. बहुतेक सारी मुलं अतिशय धार्मिक असतात. हा विचार मनात येणंदेखील अनेकांना पाप वाटत असतं. आपण काय पाप केलं म्हणून मला देव शिक्षा देतोय, हा विचार त्यांना रात्रंदिवस छळत असतो; पण दुसरीकडे त्याखेरीज पर्याय नाही, हे वास्तव असतं. मुलं आपापल्या मित्रांशी त्याबद्दल खासगीत बोलत असतात, पण सर्वांसमोर हा विषय काढणं टाळत असतात. अखेर कनेसा या विषयाला तोंड फोडतो. "दहा दिवस होऊन गेलेले आहेत. अजूनही आपली सुटका झालेली नाही. आता आपल्यालाच सुटकेसाठी हालचाल करावी लागेल, आणि त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे. दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही. समोर आपल्या मित्रांच्या शरीरांच्या रूपात अन्न पडलेलं असताना ते नाकारून मृत्यूला सामोरं जाणं म्हणजे आत्महत्या ठरेल. आणि आत्महत्या करणं पाप आहे." कनेसा आपल्या मित्रांना समजावण्याचा प्रयत्न करतो. हे मांस खाणं नाइलाज नसून आपलं कर्तव्य आहे, असं त्याचं म्हणणं असतं. मेडिकलचा विद्यार्थी म्हणून त्याच्या मताला महत्त्व असतं; शिवाय तो अतिशय धार्मिक असल्यामुळेही मुलांना त्याचं हे म्हणणं भिडतं. जी मुलं हा विचार करायला कचरत असतात तीदेखील त्याच्या या आवाहनामुळे तयार होतात. किमान तात्त्विकदृष्ट्या तरी ते मान्य करतात.पण ते प्रत्यक्षात आणणं अवघड असतं.

पुन्हा एकदा कनेसाच पुढाकार घेतो. एक फुटकी काचेची बाटली घेऊन तो बाहेर ठेवलेल्या मृतदेहांकडे जातो. पालथ्या टाकलेल्या एका मृतदेहाच्या कुल्ल्याचा मोठा भाग तो कापून काढतो आणि विमानाच्या छतावर मऊ होण्यासाठी ठेवतो; पण तो प्रत्यक्ष खाण्याची वेळ येते तेव्हा त्याचेही हात-पाय गळतात, उलटीची भावना होऊ लागते. बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष करणं वेगळं. शेवटी मनावर दगड ठेवून तो एक तुकडा कसाबसा गिळतो. 


त्याच्या बुद्धीने त्याच्या मनावर विजय मिळवलेला असतो. त्याच्या जगण्याआड येणारा एक संस्कार त्याने झटकून दिलेला असतो. त्याच्या मनात येतं, आता मी जगेन ! नक्की जगेन ! आपल्याच मित्रांचं शरीर कापून खाण्यापेक्षा मेलेलं बरं, अशी भावना असतानाही ही मुलं त्या निर्णयापर्यंत कशी येतात? ही कहाणी वाचत असताना आपल्या लक्षात येतं, की त्यापेक्षा मेलेलं बरं, असं म्हटलं तरी प्रत्यक्षात आपलं शरीर त्या भावनेला साथ देतंच असं नाही. ते जगण्याची धडपड करत राहतं. त्या धडपडीमुळेच मृत्यू आसपास फिरत असला तरी तो सहजी जवळ येऊ शकत नाही. त्यामुळेच सर्व प्रवासी थोड्याफार दिवसांच्या फरकाने या नव्या अन्नाचा स्वीकार करतात. आता अन्नाचा साठा कमी नसतो. नॅडोची आई आणि बहीण या दोघींना सोडून इतरांची शरीरं त्यासाठी वापरायची असं ठरतं. या नव्या अन्नपुरवठ्यामुळे मुलांच्या शरीरातली ताकद सावकाश का होईना, वाढू लागते. त्यामुळे लवकरच वेगळ्या दिशेने आणखी एक मोहीम काढली जाते. या वेळी तिघं मोहीमवीर प्रचंड प्रयत्नांनी एका छोट्या शिखरावर चढतात; पण तिथून पाहतात तो नजर जाईल तिथपर्यंत अँडीजच्या रांगाच रांगा पसरलेल्या असतात. त्या शिखराहून प्रचंड उंच शिखरं पल्याड उभी असतात. या वेळी रात्री शिखराजवळ मुक्काम करून हे तिघं दुसऱ्या दिवशी परततात; पण रात्रीची थंडी आणि अतिश्रमाने त्यांचा जवळपास जीव घेतलेला असतो. रात्री विमानाबाहेर मुक्काम करणं किती जीवघेणं आहे हे त्यामुळे लक्षात येतं. पुढच्या मोहिमेसाठी आणखी बरीच तयारी करावी लागणार हेही स्पष्ट होतं.

पण पुढच्या मोहिमेचा विचार करण्याआधीच त्यांना आणखी एक आघाताशी सामना करावा लागतो. एके रात्री झोपेची आराधना करत असतानाच प्रचंड हिमवादळ होतं आणि विमानासह सारे प्रवासी आत गाडले जातात. त्या धक्क्याने सर्वांना जाग येते तेव्हा प्रत्येकजण बर्फाच्या लादीखाली चिमटलेला असतो.

त्यांच्यापैकी जे लवकर सुटका करून घेऊ शकतात ते जिवाच्या आकांताने इतरांना वाचवतात. अंगात शक्ती नसतानाही प्रत्येकजण त्या क्षणी दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यात जशी माणुसकी असते, तसं आपण एकटेच जिवंत राहिलो तर पुढे काय याची भीतीही असते. अखेर मदतकार्य थांबतं तेव्हा लक्षात येतं, की या वादळाने आठजणांचा बळी घेतलेला आहे. त्यात त्यांचा कॅप्टन मार्सेलो असतो आणि त्यांना बहिणीप्रमाणे धीर देणारी-बचावलेल्यांमधली एकुलती एक स्त्री लिलियाना असते.


या घटनेने मुलांचं मनोधैर्यही पुन्हा एकदा खाली घसरतं. कालपर्यंत आपल्या शेजारी झोपणारा मित्र एका क्षणात गाडला गेला हे पचवणं अवघड असतं.


शिवाय अव्हलांच आणखीही संकटं घेऊन येतं. विमान बर्फात गाडलं गेल्यामुळे मोठ्या मुश्किलीने तयार केलेली त्यातल्या त्यात उबदार खोली उद्धस्त झालेली असते. विमानातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झालेला असतो. दोन दिवसांनंतर प्रचंड परिश्रम करून, बोगदा तयार करून त्यांना पुन्हा सूर्यप्रकाशात यायला मिळतं. शिवाय सर्वांत मोठा फटका बसतो तो त्यांच्या अन्नसाठ्याला. पहिल्या अपघातात मेलेल्यांचे मृतदेह आता बर्फात आतवर गाडले जातात. या सगळ्या संकटांतून मार्ग काढत पुन्हा स्थिरस्थावर व्हायला अनेक दिवस जातात, पण आधीचे दिवस म्हणजे चैन होती, असं सर्वांना सतत वाटत राहतं.


या संकटातून सावरल्यावर पुन्हा मोहिमेची आखणी सुरू होते. 'निवड झाली नाही तरी मी मोहिमेवर जाणार' असा नॅडोचा निश्चय असतो. त्यामुळे त्याचं नाव पक्कं असतं. त्याच्याबरोबर कनेसाचं नाव नक्की होतं. त्यांच्याबरोबर आणखी कोण जाणार हे ठरवण्यासाठी एक छोटी मोहीम काढली जाते. त्यात रॉय हालें, कार्लिटोस पाएझ आणि विंझटिन असे तिघं जातात; पण परतताना त्यांच्यातले त्राण जवळपास संपतात. तिघांपैकी कोणी ना कोणी सतत खाली कोसळतं आणि इतरांना आपल्याला सोडून पुढे जाण्यासाठी विनवत राहतं, 'मी आता एक पाऊलही चालू शकत नाही. मला सोडा, मला मरू द्या', असं म्हणत राहते. पण आश्चर्य म्हणजे कुणीही कुणाला मागे ठेवत नाही. स्वतःचे प्राण शरीरातून जाण्याची वेळ आली तरीही इतरांचा विचार त्यांच्या मनातून जात नाही. कधी समजावून, कधी शिव्या देत उचकवून, कधी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यासाठी थांबत ते तिघं विमानात पोहोचतात. मृत्यूच्या इतक्या जवळ वावरत असतानाही ही तरुण पोरं जी नीतिमत्ता दाखवतात ती पाहून थक्क व्हायला होतं. पुढच्या मोहिमेतून रॉय आणि कार्लिटोस माघार घेतात. 'मोहीम काढणं अशक्य आहे, आपण इथेच मरणार आहोत', असं त्यांचं म्हणणं असतं. पण विंझटिन महणतो, "ते अवघड आहे. खरं, पण अशक्य नक्कीच नाही". त्यामुळे कनेसा आणि नॅडोसोबत विंझटिन मोहिमेवर जाणार हे ठरून जातं.


मोहीमवीरांची नावं नक्की झाल्यावर सगळीच मूलं मोहिमेच्या तयारीला लागतात. आतापर्यंतच्या मोहिमांनी त्यांना गरजांची जाणीव करून दिलेली असते. त्यानुसार गट पाडून काम सुरू होतात. काहीजण या तिघांसाठी स्लीपिंग बॅग बनवण्याच्या तयारीला लागतात. काहीजण मृतदेह शोधून अन्नाच्या शिदोरीची तजवीज करत असतात. काहीजण बर्फ वितळवून पाणी भरण्याच्या मोहिमेवर रुजू असतात. मोहीमवीरांना खास वागणूक मिळत असते. त्यांची शक्ती भरून निघावी यासाठी त्यांना अन्नाचा जादा वाटा दिला जातो. त्यांना कामातून सवलत मिळते. त्यांच्या विक्षिप्तपणाकडे, रागाच्या झटक्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. तेवीस वर्षांचा नँडो हा त्यातला एकटाच असा असतो की तो या सवलतीचा गैरफायदा घेत नाही. तो इतरांसारखीच कामं करत राहतो आणि कधीही स्वतःचा तोल ढळू देत नाही. खरं तर या अपघाताचा त्याला बसलेला फटका इतरांपेक्षा कैक पटीने जास्त असतो. त्याची आई आणि बहीण दोघीही त्याच्या डोळ्यांसमोर मरण पावलेल्या असतात; पण त्यामुळे हताश होण्याऐवजी उलट त्याच्या मनात सुटकेसाठी प्रयत्न करण्याची भावना आणखी प्रबळ होते. त्याच्या मनात सतत आपल्या वडिलांचा विचार असतो. बायको आणि दोन पोरांना घेऊन चाललेलं विमान कोसळलं, या बातमीचा त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल


याचा विचारही नँडोला करवत नसतो. त्यामुळेच लवकरात लवकर इथून सुटका करून घेत त्यांच्याकडे परतायचं, या इच्छेने त्याचा ताबा घेतलेला असतो. अशी प्रबळ इच्छाशक्ती काय चमत्कार घडवून आणू शकते याचं नँडो हे अफलातून उदाहरण असतं.


मोहीम निघण्याआधीचा काळ सर्वांसाठीच प्रचंड कठीण असतो. अँडीजवर अडकून महिना उलटलेला असतो. अपुऱ्या अन्नाचा त्यांच्या शरीराबरोबरच मनावरही परिणाम होऊ लागलेला असतो. अनेकदा छोट्या छोट्या कारणांवरून भडके उडत असतात. नैराश्याचे झटके येत असतात. अनेकांची प्रकृती खालावायला लागलेली असते. उरलेल्या मुलांमध्ये साहजिकच छोटे छोटे गट पडतात. हे गट एकमेकांवर चेक्स अँड बॅलन्सेस ठेवण्याचं काम करत असतात. मित्रमंडळी एकमेकांची काळजी घेत असतात, एकमेकांना इतरांच्या झटक्यांपासून जपत असतात. भांडणं जितक्या लवकर होत तितकीच लवकर ती मिटतातही. आपण सगळे एकत्र आहोत म्हणून जिवंत आहोत याची जाणीव प्रत्येकाला असते. मृत्यू दोन हातांवर उभा दिसत असताना त्यांचं मन अशक्य घुसळणीतून जात असतं. जसा मृत्यू सतत सोबत आहे तसाच देवही आपल्या खूप जवळ आहे असं अनेकांना वाटत असतं.


संध्याकाळ झाली आणि सारे आत आले की रात्री अनेक विषयांवर चर्चा रंगत असतात. त्या गप्पा म्हणजे प्रत्येक बुडत्यासाठी काडीचा आधार असतात. देवाने आपल्यावर ही वेळ का आणली, हा विषय अनेकदा त्या चर्चेत डोकं वर काढत असतो. जवळपास सारीच तरुण मंडळी सश्रद्ध असतात. देवाबद्दलच्या चिंतनातून त्यांना शांती मिळत असते आणि उमेदही. गप्पांमधला दुसरा विषय असतो तो रग्बी. जवळपास साऱ्यांची घरची शेती असल्यामुळे तो विषयही सतत बोलण्यात असतो. घर-कुटुंब-प्रेयसी हे विषय मात्र मनात घोंघावत असूनही फार कमी वेळा ओठांवर येतात. कारण त्यावर बोलणं सुरू झालं की बरं वाटण्याऐवजी त्रासच अधिक होत असतो. मनातल्या मनात मात्र आपल्या आई-वडिलांशी टेलिपथी साधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न चालू असतो; पण बहुतेक वेळा त्यांच्या गप्पांचाओघ खाद्यपदार्थांवर येऊन थांबत असतो. 


टोकाच्या उपासमारीमुळे खाणं ही त्यांच्या डोक्यात सदोदित फिरणारी एकमेव गोष्ट असते. अनेकदा प्रत्येकजण आपल्या आवडत्या पदार्थांबद्दल बोलत असतो. पूर्वी केलेल्यापार्ट्यांची वर्णनं चवीने रंगवली जात असतात. वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृतींची चर्चा होत असते. डोळ्यांसमोर आपल्या आवडीचा पदार्थ आणून तोंडाला सुटलेल्यापाण्याने आवंढा गिळत राहणं हे त्यांचं नेहमीचं काम असतं. पण दुर्दैव असं, की ते समाधानही त्यांच्या नशिबी नसतं. कारण थोड्यांत दिवसांत त्यांच्या लक्षात येतं, की या वर्णनांमुळे शरीरात पाचक रस तयार होताहेत, पण प्रक्रिया करायला पोटात पुरेसं अन्न कुठेय? त्यामुळे अल्सर होण्याची भीती असल्याचं त्यांना जाणवतं. मग जाणून-बुजून ही चर्चा कमी केली जाते.मुलांनी तिथल्या अमानवी वातावरणाशी जुळवून घेतलं असलं तरी समस्या कमी नसतात. 


संध्याकाळ झाली की १५-१६ तास त्यांना विमानात अडकून पडावं लागत असल्यामुळे लघवीला जाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. दरवेळी उठून बाहेर येणं म्हणजे सर्वांना तुडवत जाणं. मग त्यावर उत्तर निघतं, की दाराच्या शेजारी झोपलेल्या मुलाने सर्वांना रात्रभर एक टमरेल पास करत राहायचं. त्याने ते बाहेर मोकळं करून पुन्हा आत फिरवायचं. अशा जागी झोपण्यासाठी कोण तयार होणार? त्यामुळे या कामासाठीही शिफ्ट्स लावल्या जात. दुसरा प्रश्न असतो तो संडासला जाण्याचा. पुरेसं अन्न खायला मिळत नसल्यामुळे सगळ्यांनाच टोकाच्या बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागलेला असतो. दिवसांमागून दिवस जाऊनही अनेकांना संडासला होत नाही. कुणाचं पंधरवड्याने, तर कुणाचं तब्बल महिन्याभराने पहिल्यांदा पोट साफ होतं; पण त्यानंतर दुसरा त्रास सुरू होतो तो जुलाबांचा. त्यात असते नसते ती शक्ती पार संपून जाते.मधल्या काळात जबर जखमी झालेल्या त्यांच्यातल्या दोघांचा मृत्यू होतो. हे मृत्यू सर्वांनाच धक्का देऊन जातात. हिमवादळातून बचावलेल्यांना आता काही होणार नाही, या त्यांच्या विश्वासाला तडा जातो. सारे अचानक मृत्यूसमोर उघडे पडतात. आपल्यापैकी कोणीही कधीही दगावू शकतं, या विचाराने त्यांची मनःशांती आणि शक्तीही ढळते. आता लवकरात लवकर मोहीम काढायला हवी हे साऱ्यांना कळून चुकतं…


अपुर्ण राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखात.।।