* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

4/1/26

कृतज्ञता - एक देणगी / Gratitude - a gift

आपल्या जीवनात ज्या काळात आपण जास्त जास्त गोष्टींचा हव्यास करतो,तेव्हा आपल्याजवळ असलेल्या गोष्टींबद्दल आपण समाधानी असावे.असं केल्यानं खूपदा आपल्याला आढळतं की, आपलं जीवन आजच भरून पावलं आहे.

हाव्या महिन्यात आमच्या एकत्रित होणाऱ्या भेटीसाठी जेसन आला.मागच्या महिन्यात त्याचा जो धडा होता,त्याच्या असलेल्या गोष्टीच फक्त त्याला द्यायच्या होत्या,त्या त्याला महिनाभर देता येतील एवढ्या सापडल्या,याचा मला अजूनहि अचंबा वाटत होता.शिकलेल्या सर्व धड्यांचा मी विचार करत होतो, आणि मला आठवण झाली,की आता थोडेच धडे राहिले होते,आणि मग जेसनला रेड स्टीव्हन्सकडून सर्वोत्तम देणगी मिळणार होती.

माझ्या मनाची स्थिती जणू बेसबॉलमधल्या,ज्याची मेडन ओव्हर पूरी होत आल्यावर जशी होईल,तशी झाली, थोडीशी जरी चूक या टप्प्यावर झाली,तर हातातोंडाशी आलेल्या यशावर पाणी पडेल आणि कष्ट वाया जाणार असे होईल.जेसननं प्रत्येक महिन्याचं योजलेलं काम व्यवस्थित पार पाडलं होतं,आम्हा दोघांना एक काम तडीस नेल्यासारखं वाटलं,पण त्याच वेळेला असं वाटत होतं की आम्ही आधीच्या वेळेपेक्षा खूपच जास्त काही गमावण्याची शक्यता आहे.

मिस् हेस्टिंग्ज,जेसन आणि मी कॉन्फरन्स रूममधे जमलो होतो,तेव्हा मला वाटलं रेड स्टीव्हन्स आता आमच्या पुढ्यात काय घेऊन येतोय हे कळायला आम्ही सर्वच उत्सुक झालो होतो.मिस् हेस्टिंग्जने व्हिडिओ सुरू केला आणि रेड स्टीव्हन्सची परिचित छबी आमच्यासमोर आली.

"तुम्हाला सर्वांना शुभेच्छा,जेसनचं अभिनंदन आणि मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्जना धन्यवाद."

रेड स्टीव्हन्सन उजवा डोळा मिचकावला.पाच दशकांपेक्षा जास्त काळापासून त्याची ही लकब माझ्या परिचयाची होती.हे मिचकावणं कित्येक भाव सांगून जायचं.त्याच्या प्रेतयात्रेला जाऊन आल्यावर आता हे मिचकावण मला यापुढे कधीच दिसणार नाही,हे मला लक्षातच आलं नव्हतं.

त्याचं बोलणं सुरू झालं,"जेव्हा आपण आपलं मृत्युपत्र तयार करतो,आणि या व्हिडिओसारखी व्हिडिओ तयार करतो,तेव्हा आपोआपच आपण आपल्या सबंध आयुष्याचा विचार करतो.मी खूप ठिकाणी गेलोय, आणि खूप गोष्टींचा मी अनुभव घेतलाय,त्यामुळे की काय मी तर एकच जीवन जगलो हे लक्षात ठेवणं फार जड जातं.

"मी तरूण असतांनाची आठवण सांगतो,मी इतका गरीब होतो की,मला खायला अन्न मिळावं म्हणून दिवसभर कष्ट करावे लागायचे,आणि रात्री मी रस्त्याच्या कडेला झोपायचो.मला हे पण आठवतंय की अमीर उमराव,धनिक,श्रींमत यांच्या संगतीत मी होतो आणि अशा ऐषोआरामी जीवनाच्या सर्व गोष्टी मला ठाऊक होत्या.मी आज मागे वळून बघीतलं तर त्या गोष्टींबद्दल कृतज्ञतेनं माझं मन भरतं.

"मला वाटतं,ज्या काळाचे माझे भयंकर वाईट अनुभव आहेत.त्या काळाच्या सुद्धा माझ्या काही आठवणी मात्र रम्य आहेत."

रेड थबकला,त्याच्या विचारांची जुळवाजुळव केली त्यानं,आणि दामटून बोलला तो."जेसन,या महिन्यात तू जो धडा शिकणार आहेस,त्याचा आवाका असा आहे की,त्यामुळे तुझ्या आयुष्यात ज्याचा पूर्ण अभाव आहे, त्याला स्पर्श होईल.तो अभाव असणारी गोष्ट म्हणजे कृतज्ञता.

"काय विडंबना आहे,काय विचित्र गंमत आहे पहा,या जगात ज्यांनी खूप कृतज्ञ असावं,ते जवळ जवळ अजिबात कृतज्ञ नसतात,आणि असेही खूप लोक असतात की जे जवळजवळ कंगाल असूनही अत्यंत कृतज्ञभावनेने जगत असतात. .

"मी तेव्हा तरूणच होतो.नुकताच स्वतःच्या पायावर उभा राहून जग जिंकू बघत होतो.तेव्हा मला एक गृहस्थ भेटला.त्याचं वर्णन आजच्या जगात बेघर असं करता येईल.मग पाह्यलं तर असे कित्येक लोक होते तेव्हा,की जे इथे तिथे बारीक सारीक काम करीत देशभर भटकत होते.तो मंदीचा काळ होता,आणि ही बरीच भटकी आणि उचलेगिरी करणारी माणसं चांगली सुशिक्षित होती,आणि त्यांच जीवन समृद्ध अनुभवांचं होतं,

"जवळजवळ वर्षभर मी आणि जॉश सहप्रवासी होतो. तेव्हा तो वयस्क वाटायचा मला पण मी तेव्हा अपरिपक्व वयाचा होतो,त्यामुळे माझा कदाचित अंदाज चुकीचाही असेल,मला भेटलेल्या माणसांमध्ये तो असा एकमेव माणूस असेल की,ज्याच्याबाबत मी छातीठोकपणे सांगू शकतो की त्याच्या वाट्याला एकही वाईट दिवस आला नव्हता,आणि जर का त्याचा कधी दिवस वाईट गेलाच असेल तर त्याची कधीच दिसण्याजोगी खूण नसायची,

आम्ही इकडे तिकडे प्रवास करायचो,तेव्हा आम्हाला कधी भिजायला व्हायचं,कधी थंडीनं आम्ही कुडकुडायचो,तर कधी भुकेनं व्याकूळ असायचो.पण जॉशचा मूड कधी जायचा नाही.तो सर्वांशी चांगल्याच गोष्टी बोलायचा.

सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल 

"शेवटी,मी जेव्हा टेक्ससमध्ये कायम वास्तव्य करायचं आणि तेथे माझं नशीब आजमवायचं ठरवलं,तेव्हा मी आणि जॉशमधली साथ संपली,कुठे स्थिरस्थावर व्हायचं त्याच्या रक्तातच नव्हतं.आमचा वियोग होण्याच्या वेळी मी त्याला विचारलं,तो सदा असा मस्त मूडमध्ये का बरं असायचां ? त्यानं मला सांगितलं की त्याच्या आईने त्याला जो वारसा दिला होता,त्यांत मृत्युपत्रांतर्गत एक सुवर्णयादी होती.

त्यानं मला उलगडून सांगितलं की,तो बिछान्यात रोज सकाळी उठल्याबरोबर,जिथे तो असेल,तिथंही झोपेतून उठल्याबरोबर डोळ्यासमोर मनानं एक सोनेरी फलक आणतो,त्यावर त्याच्या आयुष्यात त्यानं ज्यांच्याबद्दल विशेष कृतज्ञ असावं अशा दहा गोष्टी लिहिलेल्या आहेत.त्यानं मला सांगितलं की,त्याच्या आईनं असं तिच्या आयुष्यभर अगदी रोज केलंय.त्यानं त्याच्या आईसोबत असं केलेलं असल्यामुळे त्यानं एकही दिवस चुकवलेला नाही.जवळजवळ साठ वर्षांपूर्वी या उपक्रमात मी पण जॉशबरोबर असायचो.त्यामुळे की काय मी पण एकही दिवस चुकवला नाहीये,

आणि म्हणून मी आज या टप्प्यावर इथवर येऊन उभा आहे काही दिवशी मी खूपशा छोट्याछोट्या गोष्टींबद्दल आभारी असतो.आणि कधीकधी माझं जीवन आणि माझ्या भोवतालच्या सगळ्या गोष्टी याबद्दल मला विलक्षण धन्यता वाटते."

रेडनं घसा साफ केला,तो एक घोटभर पाणी प्यायला,जरा सावरला आणि पुढं बोलू लागला "जेसन,आज मी ती सुवर्णयादी मृत्युपत्राद्वारे तुझ्याकडे सुपुर्द करतो आहे.जॉशची आई,नंतर जॉश,त्याच्यामार्फत मी आणि आता तू,असा या यादीचा शंभर वर्षांहून जास्तच काळ प्रवास झालाय.जॉशच्या आईला हा उपक्रम कसा सापडला,हे मला माहित नाही,म्हणून ही गोष्ट मला माहित आहे त्यापेक्षाही जुनी असू शकेल.

"ते काही असू दे,मी आता तुझ्याकडे सोपवतोय आणि सुरूवातीला तू दक्षता बाळगलीस,तर लवकरच ती गोष्ट तुझ्या श्वासोच्छ्वासाप्रमाणे केवळ तुझी होऊन जाईल."

"या महिन्यात तुझ्याकडे ज्याज्या गोष्टी आहेत,आणि त्यांच्याबाबत तू आभारी असावंस अशा गोष्टींचा तू विचार करायचा आहेस.

महिन्याच्या शेवटी तू जेव्हा परत येशील तेव्हा त्या सोनेरी यादीचा तुझा तर्जुमा मिस्टर हॅमिल्टनला उलगडून सांगायचा.मी आशा करतो की तुझ्या उरलेल्या आयुष्यभर तू हा उपक्रम राबवशील आणि मग आज जसा तो वारसा कुणाला सोपवण्याची विशेष संधी मला मिळते आहे,तशी परत तुलाही ती मिळेल."

रेडची छबी मावळली आणि पडदा रिकामा झाला.

दुसऱ्या दिवशी माझ्या नेहमीच्या सवयीने मी बरोबर पाच वाजता उठलो.गजराच्या घड्याळाशिवाय मी कित्येक वर्षे असा उठत आलोय.रेडनं जेसनला सांगितलेल्या सोनेरी यादीविषयी मी विचार करत पडून राहिलो,आणि अंथरूणाच्या बाहेर येईपर्यंत मी माझी स्वतःची यादी जुळवू लागलो.अंथरूणातून बाहेर पडायला पूर्वी लागायचा त्यापेक्षा जास्तच वेळ आत्ता,म्हणजे ऐंशी वर्षांचा झाल्यावर लागायला लागला.म्हणून मग माझ्या लक्षात आलं की रोज रेड स्टीव्हन्सचा कृतज्ञतेचा धडा गिरवायला माझ्यापाशी खूप वेळ होता.

महिन्याचा शेवट जसजसा जवळ येऊ लागला.तसतशी मला जेसन स्टीव्हन्सची आठवण येऊ लागली. माझ्याप्रमाणे त्याचीही सोनेरी यादी करण्यात रोज प्रगती होत असावी,अशी मला आशा वाटत होती.मला चिंताच होती खरं तर,कारण प्रत्येक गोष्टींवर हक्क असल्यागत त्याची सगळी जिंदगी गेली होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवशी जेसन जरा लवकरच आला.त्याच्या डोळ्यात चमक होती,आणि त्याची चाल जरा उडतीच होती.माझी चिंता जरा कमी झाली. जेसननं आणि मी हस्तांदोलन केलं,आणि त्यानं मिस् हेस्टिंग्जला अभिवादन केलं.मी माझ्या टेबलाशी बसलो, जेसननं मिस् हेस्टिंग्जसाठी खुर्ची सरकावली,आणि स्वतः तिच्या शेजारच्या रिकाम्या खुर्चीत स्वारी विराजमान झाली.

मी तर सांगूनच टाकलं,"वा छान मूडमध्ये दिसतोयस आज,जेसन."

तो मोठ्यानं हसला आणि म्हणाला,"मला कल्पना नव्हती,एवढी खूप कारणं निघालीयेत माझा मूड चांगला व्हायला."

जेसननं त्याची सोनेरी यादी सांगायला सुरूवात केली. "या महिन्यात अगदी रोज मी अशा गोष्टींचा विचार करीत होतो की ज्यांच्याकरिता मी कृतज्ञ असायला हवं. त्या इतक्या मोठ्या संख्येनं आहेत,याची मला कधीही कल्पना नव्हती.

"अगदी प्रथम म्हणजे,माझं आरोग्य.माझं आरोग्य नेहमी ठीकच असतं.गेले दहा महिने रेड आजोबांच्या मृत्युपत्राच्या कारणाने निरनिराळ्या लोकांना मी भेटलो, ज्यांना काही ना काही प्रकृतीच्या तक्रारी होत्या,म्हणून मी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी नेहमीच कृतज्ञ राहीन."

"त्या खालोखाल,मी माझ्या तारूण्यासाठी कृतज्ञ आहे. आतापर्यंत आयुष्यात मी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींना मुकलो आहे.पण मला वाटतं,तारूण्यामुळे कुठलाही अडथळा पार करता येईल.

"तिसरी बाब म्हणजे,माझं घर.मी त्यासाठी कृतज्ञ आहे. रेड आजोबांच्या दातृत्वामुळे हे सुंदर घर शक्य झालं. मला इतके दिवस त्याचं महत्त्व कळलंच नव्हतं,खरं तर कळायला हवं होतं,पण मृत्युपत्राच्या या सर्वोत्तम देणगीमुळे मला इतरांसोबत त्यात राहता आलं आणि त्याचं महत्त्व कळलं.

"चौथा क्रमांक येतो माझ्या मित्रांचा.मी त्यांचा ऋणी आहे."

त्यानं मिस् हेस्टिंग्जकडे आणि माझ्याकडे पाहिलं आणि तो पुढं वाचू लागला."तुम्ही दोघं ब्रायन, गस् कॉल्डवेल, रेड स्टीव्हन्स होममधली मुलं आणि मला नीट सांगता येत नाहीये,पण एक खास कारणास्तव - माझे रेड आजोबा.

"पाचवी गोष्ट म्हणजे,माझं शिक्षण,यासाठी मी धन्य आहे.जरी मी कॉलेजमध्ये फार लक्ष दिलं नाही तरी पुढे काही शिकायचं म्हटलं,शिक्षण आणि विद्या यांना माझ्या आयुष्याचा एक खराखुरा भाग करायचं तर,त्याची सामग्री मला मिळाली.

"सहावं स्थान,माझ्या रेड आजोबांमुळे मी वर्षानुवर्षे जिथं जिथं हिंडलो,जे जे अनुभवलं,त्याचं मी ऋण मानतो.

"मी माझ्या गाडीचे आभार मानतो,सातव्या क्रमांकाने. अगदी विश्वासाची,विसंबून रहावं अशी,आणि चालवायला गंमत वाटते अशी आहे ती.ब्रायनकडून मला ठाऊक झालं की,माझ्यासारखे सगळे नशिबवान नसतात.

"आठवा क्रमांक येतो माझ्या कुटुबाचा,इतकी वर्ष मी त्यांची किंमत नेहमी ओळखत नव्हतो.पण मी आता इतक त्याबद्दल शिकलोय की मी जास्त चांगल्या प्रकारे त्यांच्याबरोबर राहीन,आणि त्याच वेळेला नव्या नव्या लोकांबरोबर संबंध जोडून कौटुंबिक नातं निर्माण करीन.

"इतकी वर्ष रेड आजोबांनी मला जो पैसा दिला, त्याबद्दल मी फार धन्य आहे.हा क्रमांक नववा.पण याहून जास्त महत्त्वाचं,म्हणजे रेड आजोबांच्या प्रयत्नांमुळे पैशाचे विविध उपयोग आणि पैशाची किंमत मी शिकलो.याबद्दल भविष्यकाळात मला जास्त शिकायचंय आणि माझ्याजवळ असलेला पैसा अधिक शहाणपणानं कसा वापरायचा हे पण मी शिकणार आहे.

"आता शेवटचा क्रम दहावा.सर्वोत्तम देणगीकडे जाणाऱ्या प्रत्येक पायरीबद्दल मी धन्य आहे.मी रेड आजोबांचे आभार मानतो.त्यांनी माझ्या आयुष्याचा विचार करून विचारांची जुळवाजुळव केली.

त्यांची इच्छा अंमलात तुम्ही दोघांनी आणलीत.यासाठी मी तुमचे आभार मानतो.

मिस् हेस्टिंग्जनं त्याला रोखलं आणि ती म्हणाली, "जेसन,काय छान यादी आहे ही! सोनेरी यादी. कृतज्ञता,ही एक देणगी तुला चांगली समजली आहे."

जेसन हसला आणि म्हणाला,"मिस् हेस्टिंग्ज, खरोखर आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मला असं खूप सांगण्यासारखं होतं.आपण ज्यांच्यासाठी कृतज्ञ रहावं, अशा कितीतरी गोष्टी आहेत,त्यांना दहापर्यंत मर्यादित ठेवणं फार कठीण आहे."

मी जेसनचं अभिनंदन केलं,आणि जेसननं निरोप घेण्याआधी आम्ही सर्वांनी हस्तांदोलन केलं.मी स्वतःला बजावलं की,दुसऱ्या दिवशी सकाळी जी सोनेरी यादी करीन त्यात जेसन आणि रेड स्टीव्हन्स दोघंही असतील. आणि मी ज्या गोष्टींसाठी स्वतःला धन्य मानावं अशा गोष्टींचा मी विचार करू लागलो.

●●● समाप्त ●●●

3/30/26

चेलपतंग : एक शिल्पकार / Chelpatang: A craftsman

चेलपतंग हे सामान्यतः पाण्यानजीक,तसेच तळ्यावर आणि नदीवर पावसाळ्यात उडताना दिसतात.बहुतेकांचा रंग भुरा असला,तरी त्याला काही अपवादही असतात.चेलपतंगाची मादी पाणवनस्पतीवर अंडी घालते.परंतु काही प्रकारचे पतंग पाण्यात प्रवेश करून तळ्यातील दगडा-धोंड्यांवर अंडी घालतात.अंड्यांच्या राशींचा पाण्याशी संपर्क येताच ती त्वरित फुगतात.सुमारे दहा दिवसांनी त्यांतून अर्भक बाहेर पडून पाण्यात वळवळताना दिसतात.बहुतेक चेलपतंगांची ही अर्भकं स्वतःभोवती कोष तयार करतात.त्यातून त्यांचं तोंड आणि पाय तेवढे दिसतात.या कोष करण्याच्या पद्धतीवरून त्यांच्या विविध जातींची ओळख होते. काहींना पाणगोगलगाईच्या कवचापासून कोष तयार करायला आवडतं.काही बारीक वाळूचे कण कोष तयार करण्याकरिता उपयोगात आणतात. तर काही पाण्यात पडलेल्या पानांपासून केलेल्या गोल चकत्यांचा कोष करतात. या गोल चकत्या अत्यंत अचूक असतात.कोणा माणसाला कात्रीच्या साह्यानंदेखील तशी एकसारख्या आकाराची वर्तुळं कापता येणार नाहीत. काही पतंग रेतीचे कण आणि झाडाच्या बारक्या काटक्या यांपासून कोष तयार करतात. कोष करण्यात चेलपतंगांच्या अर्भकांनी दाखविलेली सौंदर्यवृत्ती व कृतीतील अचूकता अभूतपूर्व असून,जीवशास्त्रज्ञांना त्याचं कोडं कित्येक वर्ष उलगडलं नव्हतं.


चेलपतंगाच्या डिंभकाचा (अर्भक) आहार नाजूक नसतो.

काही प्रामुख्यानं शाकाहारी आहेत,ते पाणवनस्पतीवर आपली उपजीविका करतात. काही मात्र मांसाहारी आहेत.ते कृमि कीटकांवर जगतात परंतु कित्येकदा ते एकमेकांनाच खाऊन टाकतात.जेव्हा त्यांची पूर्ण वाढ होते,तेव्हा ते कोषाचं दार लहान खडा किंवा वनस्पतीचा कचरा वापरून बंद करतात.काही काळ अशा अवस्थेत विश्रांती घेतल्यावर डिंभकांचा अवतार बदलून, त्यांचं पीलुकात (पुपा) रूपांतर होतं.या अवतारात त्यांचं प्रौढ पतंगांशी साम्य दिसत असलं,तरी त्यांचे अवयव मृदू व पिवळट पांढरे असतात.

गोलाकार शरीरावर लहान पंख खोवल्यासारखे उगवतात.हा अवतार अंदाजे पंधरा दिवस टिकतो.पीलुक आपल्या करवतीसारख्या जबड्यानं कोश कापून तो अत्यंत जोमानं मधल्या पायांच्या साहाय्यानं पोहत पाण्याबरोबर डोकावणाऱ्या पाणवनस्पतीवर किंवा दगडावर येतो.बाहेरील हवेच्या संर्पकात येताच त्याचं प्रौढ चेलपतंगात रूपांतर होतं.पीलुक आपल्या शरीराचा त्याग करून नवीन चेलपतंगाचं शरीर धारण करतो.पंख पूर्णपणे पसरले जातात अन् काही क्षणांतच चेलपतंग हवेत उडू लागतो. काही चेलपतंगांच्या जातीचा पूर्णावतार पाण्याच्या पृष्ठभागावरच होतो.अशा वेळी चेलपतंग हजारोंच्या समूहातून हवेत उडू लागलेले दिसतात.जर त्या पाण्यात ट्राउट मासे असतील,तर त्यांना चेलपतंगांच्या रूपानं जणू मेजवानीच मिळते.त्या वेळी जलपृष्ठावर मोठी खळबळ माजते.


सर्वच जातींच्या चेलपतंगांना कोषाचं आवरण राहात नाही.असे पतंग पाण्यात पिशवीच्या आकाराची जाळी तयार करतात.कोष-डिंभकापेक्षा हे विनकोषाचे डिंभक मोठे चपळ असतात.असे डिंभक ओढ्यातील दगडगोटे हलविले,की त्यांखाली आढळून येतात.अशा ठिकाणी त्यांच्या जाळयाही दिसून येतात.


कित्येक वेळा अशा जाळ्या पाणवनस्पतीच्या पानामागं तयार केलेल्या दृष्टोत्पत्तीस येतात.


चेलपतंगांची आणखी एक जात आहे.त्यांची अर्भकं दगडांना किंवा काड्याकुड्यांना चिकटलेल्या रेशमी लांब नळीत राहतात.ट्राउट माशांची शिकार करण्यासाठी चेलपतंगाचं आमिष गळाला लावतात. पतंगांचे सारे अवतार माशांना खूप आवडतात.


जंगलांतून वाहणारे ओढे,तळी,सरोवराचा परिसर किंवा नद्या ही जलस्थानं चेलपतंगांची आवडती निवासस्थानं आहेत.

अशा सुंदर जलस्थानाभोवती पक्षिनिरीक्षण करीत असताना मी चेलपतंगाच्या अवताराचंही निरीक्षण करीत असे.त्यामुळं ही पाणस्थळं मला अतिशय जवळून पाहता आल्यानं जो आनंद मिळाला,तो,वेगळाच.अशा जलस्थलावर कित्येक वेळा पक्षिजीवनाचा अभाव असला,तरी तेथील वास्तव्य मला कधी कंटाळवाणं वाटलं नाही.


कीटकांचं निरीक्षण करण्याचा छंद मला जडल्याचं श्रेय शाळेमधील माझ्या एका मित्राला आणि रानोपाळ हिंडणाऱ्या लिंबामामाला द्यावं लागेल. आमच्या गल्लीत पांडुरंग सुपे नावाचा माझा मित्र राहात असे.एक-दोन वर्षांनी तो पुढल्या वर्गात होता. गणित विषयात तो हुशार होता.मला कधी त्यात अडचण आली,की मी त्याच्याकडं धाव घेत असे.माडीवर एका लहानशा खोलीत तो अभ्यास करायचा.घडवंचीवर फळचा टाकून त्यानं आपल्या अभ्यासाची बैठक तयार केली होती.तीवर बसून तो खिडकीजवळ अभ्यास करताना दिसे.खोलीवर लिंबाची गर्द सावली पडे.तिथून बाहेर पाहिलं,की जिकडेतिकडं कडुनिंबाची,तर कुठं चिंच-पिंपळांची, तर कुठं शेवग्या-हादग्याची झाडं डोकावताना दिसत.फुलपाखरं गोळा करण्याचा त्याला छंद होता.एका जाड पुठ्यावर पांढरा कागद चिकटवून त्यावर विविध रंगा-आकारांची फुलपाखरं व पतंग टाचणीनं टोचून ठेवलेले दिसत.ते त्याच्या अभ्यासाच्या खोलीचं आकर्षण होतं.


जवळच असलेल्या रानात कित्येक वेळा मी त्याच्याबरोबर फुलपाखरं व पतंग पकडण्यासाठी साहाय्य करायला जाई.

अशा वेळी सुपे त्यांच्याविषयी खूप माहिती सांगायचा.


घरच्या गरीब परिस्थितीमुळं पांडुरंग सुपेला मॅट्रिकच्या पुढं शिक्षण घेता आलं नाही.नाही तर तो एखादा चांगला कीटकशास्त्रज्ञ झाला असता.


श्रावण महिन्यात लिंबामामाबरोबर माळकरीण आत्याच्या शेताकडं जाताना वाटेत विस्तीर्ण असं माळरान लागतं.

तिथल्या पाउलवाटेनं जाताना मला नाना रंगांची फुलपाखरं उडताना दिसायची. गवतातून जाताना विविध प्रकारचे आणि रंगारूपांचे तुडतुडे टणाटण उड्या मारताना आढळून यायचे.त्यांना पकडण्याच्या नादात मी कुठच्या कुठं मागं राहायचा.लिंबामामा आपल्या शेरडांबरोबर दूरपर्यंत निघून गेलेला असायचा. दुपारी एखाद्या शेताच्या बांधावरील झाडाच्या सावलीत बसून मी आईनं बांधून दिलेली दशमी खायचा.दूर सुंदर डोळ्यांसारखी दिसणारी पाण्याची डबकी किंवा एखादं छोटं तळं असायचं. लिंबामामाची वामकुक्षी चाललेली असायची. पाण्यावर जाणाऱ्या शेरडांच्या मागोमाग मीही जायचा.जाताना एखाद्या डबक्यात मला मासोळ्यांसारखी दिसणारी बेडकांची इवलीशी अर्भकं दिसायची.पाण्याकाठी बसून मी त्यांच्याकडं पाहात राही.

पाण्यात अनेक प्रकारचे कीटक असत. त्यांना हातातील काडीनं मी डिवचून पाहायचा. सायंकाळी परत येताना झुडपावर अनेक प्रकारचे पतंग बसलेले दिसत.ते फारसे उडत नसत.हात लावायला गेलं की ते लगेच उडून दुसऱ्या झुडपावर बसत.जिकडे-तिकडं नाना रंगांची रानफुलं फुललेली असत.

त्या रानफुलांकडं पाहात पाहातच मी घरी परतायचा.

लिंबामामा फारसा बोलत नसे; 


परंतु त्याच्या अबोल सोबतीनं मला लहानपणी या माळरानातून मुक्तपणं भटकता आलं.तो एकच सावधगिरीची सूचना देई.कुठल्याही झुडपात हात घालू नकोस किंवा बिळात बोट घालू नकोस. कारण त्यात साप-किरडू दडून बसलेले असतात.


बालपणी माझ्या मनात असलेली कीटक जगाविषयीची जिज्ञासा मोठेपणी वनाधिकारी झाल्यावर जंगलातही पुरी करता आली.त्यांच्या अद्भुत जगाचा पाठपुरावा करता आला. जाणीवपूर्वक त्यांचं निरीक्षण करीत असताना कित्येक वेळा मी स्वतःला हरवून बसे.


पाखरमाया,मारुती चितमपल्ली, साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर


मालवण आणि वेंगुर्ला इकडील खाडीत नावेतून प्रवास करताना मी पक्षिनिरीक्षण तर करायचाच, परंतु कीटकांचं अद्भुत जगही पाहायला विसरायचा नाही.एकदा बाभूळबनातून हिंडत असताना, बाभळीच्या फांदीला लटकलेल्या हाताच्या करंगळीएवढ्या लांबीचं बंडल चालू लागल्याचं मी पाहिलं.तो चेलपतंगाच्या सुरवंटांनी काट्यांपासून बनविलेला कोष होता.अशा प्रकारची घरं बांधण्यात ते मोठे कुशल असतात.


सुरवंट आपलं झुलतं घर काट्यांनी बांधताना पाहणं मोठं मनोरंजक असतं.पहिल्यांदा सुरवंट आपल्याभोवती अत्यंत चिवट,नळीच्या आकाराचा कोष विणतो.जर आत काय चाललं आहे हे पाहायचे असेल तर कात्रीनं कोष कापावा लागतो. रंगगोपनामुळं वातावरणात छोट्या जीवाला कसं संरक्षण मिळतं,याचं हे उत्तम उदाहरण आहे. कोषाच्या भोवती बाभळीच्या काट्यांचं आवरण असतं.मी त्या सुरवंटाच्या कारागिरीचं निरीक्षण करीत होतो.सुरुवातीला सुरवंटानं कोषाचं टोक रेशमाच्या धाग्यानं फांदीला नीट बांधलं.नंतर काट्याभोवतालची बारीक पानं त्यानं कुरतडून टाकली,कोषासहित तो काट्याजवळ पोहोचला. तिथं त्यानं पुन्हा कोष नीट अडकवला.काटा तोंडानं कुरतडून त्याचा तुकडा केला.तो लगेच कोषाच्या प्रवेशद्वाराजवळ चिकटवला.पुन्हा तो आत गडप झाला.नंतर कोषात विलक्षण हालचाल होत असल्याचं बाहेरून दिसलं.अचानक तो कोषाच्या दुसऱ्या छिद्रातून डोकावला.तोडलेला काटा त्यानं तिथं नीट लावून घेतला.पुढच्या तीन जोडीच्या पायानं तो काटा इकडून तिकडं हलवीत होता. आतून विणीचं काम करून त्यानं काटा पक्का बसविला.नंतर छिद्र बंद केलं,

कीटकसृष्टीतील हा वास्तुशास्त्रज्ञच.प्रत्येक काट्याची लांबी मोजून घ्यावी.त्यातील लांबीत कुठंही फरक आढळून येणार नाही.


चेलपतंगाला सुरवंट-कोषातून काढून त्याला काचेच्या स्वच्छ पाण्याच्या भांड्यात ठेवलं,की लगेच तो स्वतःभोवती कोष विणतो.भांड्यात जी साधनसामग्री ठेवलेली असेल,तिच्या साहाय्यानं सुरवंट बाहेरून कोष सजवितो.त्यात चिरमिरीएवढे लहान शंख ठेवल्यास सुरवंट त्यांचा उपयोग करतो. तसेच रंगीबेरंगी काचेच्या मण्यांचे आणि शिपल्यांचे पांढरे तुकडे भांड्यात ठेवले,तर त्या साहित्याचा देखील तो कलात्मकरीत्या उपयोग करतो.योग्य वेळी कलात्मक सजावटीच्या व्यापाचा विसर पडून त्याला पंख फुटतात.लगेच तो हवेत उडून जातो. मुक्त जगात गेल्यावर त्याला आपल्या कोषाची आठवण तरी होत असेल काय ?


■■■ समाप्त..■■■



3/28/26

माकडांचा हल्ला / Attack of the monkeys

▶ त्या वेळी दिलीप बंड यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतली होती.ते अतिशय कार्यक्षम आणि पर्यावरणप्रेमी अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. आमचे मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंक्यांनी मला फोन करून आयुक्तांची ओळख करून द्यायला त्यांच्या बंगल्यावर बोलावलं.ओळख-पाळख झाली.बोलता बोलता मी त्यांना म्हटलं, "सर,आपण प्राणिसंग्रहालय बघायला नक्की या.कधी येता?" मला वाटलं, ते म्हणतील, येतो वेळ मिळाला की.पण ते पटकन म्हणाले, "आजच येतो संध्याकाळी".झालं, माझं धाबे दणाणलं ! कारण त्या दिवशी नेमका मंगळवार होता.आमच्या साप्ताहिक सुटीचा वार. नवे आयुक्त भेटीला येणार आणि तयारी पूर्णपणे शून्य ! सगळे कर्मचारी आपापल्या घरी.पण आयुक्तांना आज येऊ नका तरी कसं म्हणणार? मी ताबडतोब तिथून बाहेर पडलो आणि आमच्या पार्कची होनहार सफाई कर्मचारी जयाकडे गेलो.जयाचं शिक्षण फारसं झालं नसलं,तरी पडेल ते काम ती मन लावून करत असे. नवीन कामं शिकत असे. पार्कचं काम आपलं मानून करत असे. तिला पार्कवर घेऊन आलो.अण्णा बोराटे निवासी वॉचमन होते. गणपत आणि राऊतही ड्युटीवर होते.हातात फारसा वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही पटापट टीम पाडल्या आणि कामाला लागलो.गणपतने राजा,निकी,तारा,जेरी सर्वांना इनडोअर सेक्शनमध्ये बंद करून बिबट्यांचा पिंजरा साफ केला.राऊतने मगरकुंड उरकलं.सर्वांनी मिळून पक्षालय झाडून घेतलं.बोराटे अण्णांनी सर्पकुंड आणि ओटे स्वच्छ केले.जयाने सगळे पाथवे झाडून घेतले.आता उरलं मंकी हिल.मी एकटाच मंकी हिलवर गेलो.मागच्या बाजूला असलेल्या इनडोअर सेक्शनमधून छोट्या पुलावरून आऊटडोअर सेक्शनमध्ये आलो आणि कचरा गोळा करायला सुरुवात केली.


तुटक्या चपला,कोल्डड्रिंक्सच्या रिकाम्या बाटल्या,कसकसले रॅपर्स अशी बरीच सामग्री आमच्या 'सुजाण' प्रेक्षकांनी मंकी हिलवर भिरकावून तिथली शोभा वाढवली होती ! हातातल्या पोत्यात एकेक ऐवज जमा करत मी चाललो होतो.झाडांवरून सगळी माकडं माझी गंमत पाहत होती.एखादं खाली उतरून परत दुसऱ्या झाडावर चढून बसत असे.तोवर आमच्या परिवारात एक नवा सदस्यही दाखल झाला होता.गौरी आणि आक्क्याला पिल्लू झालं होतं.ते तेव्हा पाच-सहा महिन्यांचं असेल.ते नेहमी गौरीच्या किंवा एखाद्या माकड मावशीच्या कमरेला मिठी मारून बसत असे. त्यामुळे त्याला आम्ही 'मोबाइल' म्हणू लागलो.पुढे त्याचं ते नावच पडलं.तर मी कचरा गोळा करत असताना हा मोबाइल अचानक एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी खाली उतरला आणि नेमका मी त्याच्या समोर आलो.एका हातात पोतं,दुसऱ्या हातात पाइपचा तुकडा हा माझा अवतार पाहून तो घाबरला असावा.सगळी माकडं एका झाडावर आणि हे पिल्लू एकटंच दुसऱ्या झाडावर.तो भीतीने मोठ्याने चीत्कारला. झालं,त्याच्या चित्कारण्याने डेंजरचा सिग्नल गेला.गौरीने झाडावरून उडी मारली आणि माझ्या कंबरेला ती जोरकस चावली.प्रचंड बेनांनी मी कळवळलो.तेवढ्यात राणीनेही थेट माझ्या पाठीवरच उडी घेतली आणि तिनेही माझ्या खांद्याचा चावा घेतला.राजीने तर अत्यंत आवेशाने पुढच्या बाजूने पोटावरच चाल केली.माकडांचा चीत्कार, माझं कळवळून ओरडणं, वेदना,जखमा आणि रक्त ! सगळा गोंधळ माजला.त्या तिघी तर मला सोडायलाच तयार नव्हत्या.


दरम्यान,मंकी हिलवरचा कोलाहल ऐकून प्रतिभा आणि तेजस धावत तिथे पोचले.त्यांनी मक्याची कणसं, शेंगा, चिकू,केळी- जे हाताला येईल ते आत फेकून त्या तिघी माकडिणींचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सुरू केला.तेवढी संधी साधून मी अक्षरशः गडाबडा लोळत पाण्याच्या खंदकात उडी मारली.पोहता न येणाऱ्या आणि पाण्याची भीती वाटणाऱ्या मला पाण्यातच उडी मारायचं कसं सुचलं कुणास ठाऊक ! तेवढ्यात जय पाहुजा नावाचा आमचा स्वयंसेवक तिथे पोहोचला.त्याने पळतच सर्पकुंडावरची लाकडी शिडी आणली आणि खंदकात सोडली. तिच्यावरून चढत मी ताबडतोब बाहेर आलो आणि पळत घर गाठलं.जखमा किती गंभीर आहेत हे बघण्याचंही मला सुचलं नाही.डोक्यात फक्त एकच विचार होता, आयुक्त येण्याची वेळ झालीय.आपल्याला उशीर व्हायला नको.भराभरा रक्ताळलेले कपडे अक्षरशः सोलून काढले आणि सुके कपडे घालून,शर्ट इन करत मेन गेटकडे पळालो. यस ! टायमिंग वॉज परफेक्ट !... मी पोचायला आणि आयुक्तांची गाडी आत यायला.


सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन


आयुक्त दिलीप बंड यांनी आधी पक्षालय पाहिलं.मग शेकरु, बिबटे, मगर, साप- सगळं पाहून प्रश्न विचारत,गप्पा मारत आम्ही मंकी हिलवर गेलो.मंकी हिल पाहून बंडसाहेब खूष झाले. मला म्हणाले, "काय सुंदर माकडं आहेत। चावत बिवत नाहीत ना?" त्यांनीही नेमका हाच प्रश्न का विचारावा? त्यांना काय उत्तर द्यावं ते न कळून मी शांतच राहिलो.निघताना बंडसाहेब पुन्हा म्हणाले,"अनिल, खूप छान ठेवलं आहे तुम्ही पार्क.तुमच्या प्राणी-पक्ष्यांसाठी अजून काही लागत असेल तर तसा प्रस्ताव तयार करून द्या,मी लगेचच मंजूर करीन."आश्वासन देऊन ते निघून गेले.गाडी गेली आणि अचानक मी मटकन खुर्चीत बसलो.गेला तासभर स्वतःला कसंबसं रोखून धरलं होतं.आता मात्र वेदना सहन होईनात.पोटा-पाठीवरच्या जखमांमधून रक्तस्राव होऊन नव्याने घातलेले कपडेही ओले होऊ लागले होते.आयुक्तांबरोबर आलेल्या उद्यान अधिक्षक साळुंक्यांना घडलेली घटना थोडक्यात सांगितली.आधी का सांगितलं नाहीस, असं म्हणत ते माझ्यावर चांगलेच खवळले आणि त्यांनी मला गाडीत घालून ताबडतोब हॉस्पिटलला पाठवलं.पुढे हे दुखणं मला महिना दोन महिने पुरल.


त्या घटनेनंतर मी विचार करत राहिलो, की असं का घडलं असावं? गौरी, राणी, राजी सगळ्यांनाच मी वाढवलं होतं,प्रेमाने खाऊ घातलं होतं.गौरीचे डोहाळे पुरवले होते.तरी त्यांनी माझ्यावर हल्ला का करावा? माझ्या मते याचं एकच कारण होतं : तिच्या बाळाला माझ्यापासून धोका आहे अशी शंका तिला आली.बाळंत आई आणि तिचं पिल्लू यांच्यामधून जायचं नाही, हा निसर्गाचा संकेत मी नकळत मोडला होता. त्यामुळे एरवी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकणाऱ्या त्या तीन माद्यांनी मला चांगलाच धडा शिकवला होता.त्यातल्या त्यात दिलासा एवढाच,की त्या माकडिणींच्या मदतीला कोणीही नर आला नाही.आक्क्याने माझ्यावर हल्ला केला असता तर माझं काय झालं असतं याचा विचारही करवत नाही." 


◆◆◆ समाप्त ◆◆◆


"One must imagine Sisyphus happy" हे प्रसिद्ध वाक्य Albert Camus यांनी त्यांच्या The Myth of Sisyphus या निबंधात मांडले आहे. मानवी जीवनातील निरर्थकता (absurdity) समजून घेण्यासाठी आणि त्या निरर्थकतेला माणूस कसा प्रतिसाद देऊ शकतो, हे सांगण्यासाठी हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.


ग्रीक पुराणकथांमध्ये सिसिफस हा एक राजा होता. देवतांनी त्याला एक कठोर शिक्षा दिली होती—एक प्रचंड मोठा दगड डोंगरावर ढकलत शिखरापर्यंत न्यायचा; पण जसेच तो दगड शिखरावर पोहोचेल, तसेच तो पुन्हा खाली घसरून येईल. मग सिसिफसला पुन्हा तेच काम सुरू करावे लागेल. ही प्रक्रिया अनंत काळ चालणारी होती—अर्थहीन, कंटाळवाणी आणि अंतहीन.कॅम्यू यांच्या मते मानवी जीवनही काही अंशी असेच आहे. माणूस रोज उठतो, काम करतो, थकतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चक्र सुरू होते. शेवटी मृत्यू येतो. या संपूर्ण प्रक्रियेचा विचार केला, तर जीवनात अंतिम असा काही "अर्थ" दिसून येत नाही. यालाच कॅम्यू Absurdism म्हणतात—माणूस जीवनात अर्थ शोधतो; पण विश्व मात्र मठ्ठ, मख्ख आणि अर्थहीन आहे.


मग अशा परिस्थितीत आनंद कसा मिळवायचा?

इथेच कॅम्यूचा महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. सिसिफसच्या शिक्षेत कोणताही बदल होऊ शकत नाही. दगड पुन्हा खाली येणारच. पण त्या परिस्थितीकडे पाहण्याची त्याची मानसिकता मात्र बदलू शकते. कॅम्यू म्हणतात—जेव्हा सिसिफस दगड खाली घसरताना पाहतो आणि पुन्हा खाली चालत जातो, तेव्हा त्याला आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असते. त्याला ठाऊक असते की ही शिक्षा कधीच संपणार नाही. तरीसुद्धा तो बंडखोर वृत्तीने ते काम स्वीकारतो. म्हणूनच कॅम्यू शेवटी म्हणतात—"आपण सिसिफसला आनंदी असल्याची कल्पना केली पाहिजे."


जीवनाला एखादा उदात्त किंवा अंतिम अर्थ नसला तरी माणूस आपल्या जाणीवेच्या बळावर, स्वातंत्र्याच्या अनुभवातून आणि बंडखोर वृत्तीमधून स्वतःचा अर्थ निर्माण करू शकतो. जग कदाचित निरर्थक असू शकते; पण माणूस स्वतः निरर्थक नसतो. तो जगण्याची निवड करतो, संघर्ष करतो आणि त्या संघर्षातच स्वतःचा आनंद शोधतो.


"One must imagine Sisyphus happy" हे वाक्य जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देते. जीवनात अंतिम अर्थ नसला तरी माणसाने निराश होण्याची गरज नाही. उलट, हीच जाणीव त्याला अधिक स्वतंत्र, अधिक प्रामाणिक आणि अधिक जिवंत बनवते.

जग कदाचित निरर्थक असू शकते; पण त्या निरर्थकतेशी झुंज देत जगणारा माणूस मात्र अर्थपूर्ण असतो—आणि कदाचित त्यातच खरा आनंद दडलेला असतो.मला मात्र येथे चार्वाक कॅम्यूपेक्षा अधिक सुसंगत वाटतो. चार्वाक इतरांना सुखावण्याच्या भानगडीत फार पडत नाही. तो स्पष्टपणे सांगतो—सर्वप्रथम स्वतः सुख मिळवा; नंतर इतरांचा विचार करा. हा विचार स्वार्थी आणि स्वकेंद्री वाटू शकतो; पण कदाचित त्यातच शहाणपण दडलेले आहे. हे जग एका विशाल अरण्यासारखे आहे. या अरण्यात तुम्ही पिकनिकसाठी आला आहात. पिकनिक करण्यासाठी तुम्हाला जितकी जागा आवश्यक आहे, तेवढीच जागा स्वच्छ करून घ्या. संपूर्ण जंगल स्वच्छ झाल्यावरच मी पिकनिक करीन, असा विचार केलात तर ते कधीच घडणार नाही—आणि तुमची पिकनिकही कायमची राहून जाईल. अधिकचा व्याप नको अन ताप नको!


आमचे मित्र विनायक पाटील याच्याकडून व्हॉट्सअप माध्यमातून माझ्यापर्यंत आलेला वाचणीय लेख….

3/26/26

कीटकांचं अद्‌भुत जग / The wonderful world of insects

मी कीटकशास्त्रज्ञ नाही,परंतु पक्ष्यांच्या भक्ष्यांचा अभ्यास करताना कीटकांच्या सृष्टीकडे माझं लक्ष वेधलं गेलं.जेव्हा त्यांच्या अद्भुत व गूढ जीवनाचा उत्तरोत्तर परिचय होत गेला,


तेव्हा वाटलं आपणदेखील हेन्री जीन फेबर या कीटकशास्त्रज्ञाप्रमाणे सारं आयुष्य कीटकांचा अभ्यास करायला हवा होता. 


पक्षिनिरीक्षणाकरिता जंगलात तसंच पाण्याच्या काठानं खूप हिंडावं लागतं.अशा भटकंतीत मला झालेलं हे कीटकसृष्टीचं दर्शन :

पाणकोळी : श्रावण महिन्यात नवेगाव सरोवराकाठच्या झिलाणीतून डोंगीनं भटकण्यात मोठा आनंद असतो. जिकडेतिकडे हिरवंगार दिसत असतं.झिलाणीतील देवधानाला लोंब्या आलेल्या असतात.देवनळांची बेटं हवेत डोलत असतात.परळ नावाच्या पाणवनस्पतीला बी धरू लागतं.

आवळ्याच्या पानासारख्या दिसणाऱ्या पिटुंडीच्या फांद्या आपल्याच ओझ्यानं पाण्यावर ओणावतात.


डोंगी संथपणे या पाणवनस्पतीच्या गुंतावळीतून बाहेर निघते.

मधूनच सरोवराचं नितळ पाणी दिसू लागतं.या नितळ पाण्याखाली चिला नावाच्या वनस्पतीचं जाळं जिकडेतिकडे पसरलेलं दिसतं.

त्यामुळे पाण्याचा रंगही हिरवा-निळा दिसतो.


घनदाट जंगलातून जाताना,दोन झाडांच्या बुंध्यांच्या आश्रयानं जाळी बांधून सावजाची वाट पाहणारे देवकोळी मी पाहिलेत.

रानात हिंडताना जमिनीतील छिद्रात जाळं विणून झाडांआड बसून सावटीची वाट पाहत असलेले पारधी कोळी पायाजवळ आढळून यायचे.परंतु पाणकोळी बघण्याचा योग आला नव्हता. ती संधी मला अनायासे मिळाली.डोंगी चालविणाऱ्या ढिवराला ती स्थिर करण्याकरिता सांगितलं.नितळ पाण्यात पोहत असलेल्या पाणकोळ्याकडे मी पाहत होतो.पोट व पायाखाली हवेचा बुडबुडा धरून पाणकोळी पोहत होता.ती त्याची तऱ्हाच मुळी अभूतपूर्व होती.त्यानं मला आणखीन एक आश्चर्याचा धक्का दिला.


पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असलेल्या चिला वनस्पतीच्या आधारानं त्यानं घंटीच्या आकाराचं जाळं विणलं होतं.

पाण्याच्या पातळीवर येऊन बुडबुड्यांना पाय व पोटाखाली पकडून त्या जाळीत तो साठवीत होता.जाळं बुडबुड्यांनी भरेपर्यंत त्याचं हे कार्य न कंटाळता चालू होतं.बुडबुड्यांच्या रूपानं अस्तित्वात असलेल्या प्राणवायूचा उपयोग करून तो त्या जाळ्यात सहज राहतो.


विणीच्या काळात तो घंटीच्या आकाराचं दुसरं एक जाळं आपल्या शेजारीच बांधतो.दोहोत एक गुप्त दार असतं.त्यातून त्याला मादीच्या जाळीत प्रवेश करता येतो.नंतर मादीच्या जाळीची भिंत तो तोडून टाकतो. त्यामुळे पाण्याचे बुडबुडे तिच्याही घरात प्रवेश करतात. काही दिवसांनी मादी अंडी घालते.अंड्यांतून पिलं बाहेर आल्यावर ती त्या घरातील एकेका बुडबुड्यावर स्वार होऊन आनंदानं जलविहार करू लागतात.हे दृश्य खरोखरच मोठं अद्‌भुतरम्य असतं. वाटतं,निसर्गानं आपली अशी रहस्यं जमिनीपेक्षा पाण्यातच अधिक लपवून ठेवली आहेत.ती एखाद्याला प्रयत्नानंच दृष्टीला पडतात.


तांबड्या मुंग्या : त्या दिवशी जंगलातल्या पायवाटेनं जाताना मोहाच्या झाडावर बऱ्याच चावऱ्या तांबड्या मुंग्या दिसल्या.अशा झाडाखालून जाताना त्या अंगावर पडतात आणि अशा काही चावा घेतात की, आपल्या अंगाची आग आग होते.मी जवळून पाहिलं तर त्या पानांचं घरटं बांधण्याच्या कामात गर्क होत्या.काही मुंग्या साखळी करून पानाची घडी घालीत होत्या. पानाच्या कडा त्यांनी जबड्यात धरल्या होत्या.जिथे पानं एकमेकाला चिकटली होती,

तिथे त्यांना जोडण्याचं काम मोठ्या जलद गतीनं करीत होत्या.

स्वतःचं एक अर्भक तोंडात धरून ती मुंगी ह्या जुडाईवर त्याला घासत होती. त्यातून पांढरा चीक बाहेर येत होता.डिंकानं चिकटवावीत तशी पानं एकमेकांना चिकटत होती.


हे पानाचं गोलाकार घरटं या तांबड्या मुंग्यांसाठी नव्हतं, तर त्या आपल्या गाईंसाठी गोठा बांधीत होत्या.मातकट रंगाचे मावा नावाचे कीटक जंगलात विपुल सापडतात. वनस्पतीतील रस शोषून घेताना हे मावा कीटक त्यातून आवश्यकतेपेक्षा अधिक साखर शोषून घेतात.जास्त असलेली साखर पोटावर असलेल्या सूक्ष्म नळीतून बाहेर येऊ लागते.या द्रवाला मावा म्हणतात.मावा रस मुंग्यांना खूप आवडतो.जसं शेतकरी गाईचं दूध काढतो तसं मुंग्या माव्याला दोहतात.मुंगीनं आपल्या स्पर्शिकेनं माव्याच्या नलिकेवर आघात करताच त्यातून गोड द्रव बाहेर येऊ लागतो.


या पानाच्या गोठ्यात मुंग्या मावा कीटकांना आणून पाळतात.या कीटकांची कमतरता कधी मुंग्यांना जाणवत नाही.कारण माव्याची अंडी या गोठ्यात आणून साठवितात.त्यातून जन्माला येणाऱ्या मावा कीटकापासून सातत्यानं गोड द्रवाचा पुरवठा होत असतो.

एखाद्या धंदेवाईक गवळ्याप्रमाणे काही जातींच्या तांबड्या मुंग्या झाडावर उंच ठिकाणी फूटबॉलएवढ्या आकाराचं गोल घरटं बांधून त्यावर मातीचा गिलावा करतात.त्यात या गाईंना ठेवतात. गाईंसाठी लागणारा पानांचा चारा मुंग्या तोंडात धरून घराकडे परत येताना दिसतात.


कोणालाही जवळपास येऊ न देणाऱ्या या रानटी,क्रूर मुंग्या तांबड्या सुतार पक्ष्याला मात्र आपल्या घरट्यात आसरा देतात.इतर सुतार पक्ष्यांप्रमाणे तांबड्या सुताराची चोच लांब व मजबूत नसल्यामुळे साहजिकच त्याला झाडाच्या बुंध्यात छिद्र पाडून आपलं घरटं करता येत नाही.म्हणून हा पक्षी त्या मुंग्यांच्या घरट्याला चोचीनं छिद्र पाडून त्यात आपला खोपा बांधतो.या त्यांच्या विलक्षण सहजीवनाचं गूढ मात्र अद्यापि पक्षिशास्त्रज्ञांना देखील उलगडता आलं नाही.


पाणकीटक : उन्हाळ्याचे दिवस.मी जंगलातून हाथी पागडीच्या पाऊलवाटेनं खाली उतरलो.बराच वेळ उन्हातून चढउतार करीत फिरत असल्यामुळे मला खूप तहान लागली होती.या डोंगराच्या पायथ्याला स्वच्छ पाण्याचा झरा असल्याचं मला माहीत होतं.


मी जसा पायथ्याजवळ आलो,तसा झरा वाहत असलेला मंजूळ आवाज कानी पडला.जवळ जाऊन पाहतो तो दोन काळ्या शिळांच्या फटीतून करंगळीएवढी पाण्याची धार खाली वाळूत पडत होती. खाली जाऊन पाहिलं तर,तो झिरपलेला झरा एका नितळ पाणझरीत पडत होता.त्यात काही पाणनिवळ्या पाण्यावरून अलगदपणे इकडून तिकडे तरंगताना दिसल्या.त्यांच्या सावल्या तळातल्या वाळूत पडल्या होत्या.इतक्यात वाटाण्याएवढे काळ्या रंगाचे, चपटे पाणकीटक दगडांच्या फटीफटींतून बाहेर येऊ लागले.थोड्याच वेळात त्यांचा थवा पाण्यावर तरंगू लागला.

बराच वेळ मी त्यांच्या क्रीडेकडे पाहत होतो.


काही लहान मासोळ्या तळात विसावल्या होत्या. त्यातील एक मासोळी पोहत पुढे आली.तोच सारे पाणकिडे तिच्यावर तुटून पडले.तिच्या मांसाचे लचके तोडून खाऊ लागले.शेवटी मासोळीचा फक्त सांगाडा तेवढा तरंगताना दिसला.हे सारं नाट्य पाहून मी आश्चर्यचकित झालो.


पाणी स्वच्छ वाटत असलं तरी गाळून घेतल्याशिवाय आम्ही वनाधिकारी असं पाणी कधी पीत नाही.ती साधनसामग्री माझ्याजवळ नव्हती. मला कबीराचा दोहा आठवला :


गुरु जानके कीजिये। पानी छानके पीजिये ।।


इतक्यात समोरच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या जीपचा आवाज येताच मी तिकडे धाव घेतली.


झुलतं घर : एकदा बाभूळ-वनातून हिंडत असता बाभळीच्या फांदीला लटकलेलं हाताच्या करंगळीएवढ्या लांबीचं बंडल चालू लागल्याचं पाहिलं. चेल पतंगाच्या सुरवंटांनी काट्यांपासून बनविलेला तो कोश होता.अशा प्रकारची घरं बांधण्यात ते मोठे कुशल असतात.


सुरवंट आपलं झुलतं घर काट्यांनी बांधताना पाहणं मोठं मनोरंजक असतं.पहिल्यांदा सुरवंट स्वतःभोवती अत्यंत चिवट,

नळीच्या आकाराचा कोश विणतो. कोशाभोवती बाभळीच्या काट्यांचं आवरण असतं.मी त्या सुरवंटाच्या कारागिरीचं निरीक्षण करीत होतो. सुरवातीला सुरवंटानं कोशाचं टोक रेशमाच्या धाग्यानं फांदीला नीट बांधलं.नंतर काट्यांभोवतालची बारीक पानं कुरतडून टाकली.कोशासहित तो काट्यांजवळ पोचला.तिथे पुन्हा कोश अडकविला.काटा तोंडाने कुरतडून त्याचा तुकडा केला.तो लगेच कोशाच्या प्रवेशद्वाराजवळ चिकटविला.पुन्हा तो आत गडप झाला. नंतर कोशात विलक्षण हालचाल होत असल्याचं बाहेरून दिसत होतं.अचानक तो कोशाच्या दुसऱ्या छिद्रातून डोकावला.

तोडलेला काटा त्यानं पुन्हा तिथे नीट लावून घेतला.पुढच्या तीन जोडीच्या पायानं तोडलेला काटा तो इकडून तिकडे हालवीत होता. आतून विणीचं काम करून काटा पक्का बसवीत होता. नंतर ते छिद्र त्यानं आतून बंद केलं.


कीटक सृष्टीतील हा वास्तुशास्त्रज्ञच,प्रत्येक काट्याची लांबी मोजून घ्यावी,त्यात आपणांला लांबीत कुठेही फरक आढळून येणार नाही.बाभळीच्या काट्यांत असणाऱ्या या कोशाला रंगगोपनामुळे संरक्षण मिळतं.


मधमाशा व गांधीलमाशा यांच्याप्रमाणे मुंग्यादेखील सामाजिक जीवन जगतात,मानवानं मुंग्यांची बुद्धिमत्ता व उद्योगप्रियता यांचं कौतुक केलं आहे.परंतु फारच कमी लोकांना माहीत आहे की,

माणसांप्रमाणे मुंग्यादेखील अनेक प्रकारची कामं पार पाडू शकतात. त्यांच्या प्रत्येक वारुळात सुतार,गवंडी,वैद्य,शेतकरी, परिचारिका,शिपाई आणि सैनिक अस्तित्वात असतात


पानं कापणाऱ्या मुंग्या : पानं कापणाऱ्या (लीफ कटिंग) मुंग्या आणि एका जातीची अळंबी (फंगस) यांच्यात अद्वितीय असं सहजीवन आहे.या मुंग्यांना कात्रीसारखे जबडे असतात.त्यांच्या साह्यानं त्या 'व्ही' आकारात पानं कापतात.नंतर ती पानं वारुळात नेली जातात.कित्येकदा अशी वारुळं मैलभर अंतरापर्यंत असू शकतात.एक मुंगी झाडाची पानं कापून जमिनीवर टाकते.दुसरी ती वारुळाकडे घेऊन जाते.काही वेळानं त्या आपल्या कामाची अदलाबदल करतात.


अशा मुंग्यांची वारुळं आकारहीन व उंच असून त्यांचा विस्तार वीस पंचवीस फुटांच्या मध्यरेषेत असतो. 


या वारुळांत प्रवेश करण्यास बिळं असतात.वारुळात प्रवेश केल्यावर उतरत्या अशा वाटेवर पानं गोळा केली जातात.या उतरत्या वाटा वातानुकूलित असतात.गोळा केलेल्या पानांचं चर्वण करून त्यांचे बारीक तुकडे करण्याचं काम कामकरी मुंग्या करतात.काही पानांचे तुकडे जमिनीवर लावून त्यांचं रोपवन तयार करतात. त्यांना खत घालतात.


निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर


मुंग्या एवढा खटाटोप का करीत असाव्यात असा शास्त्रज्ञांना प्रश्न पडतो.वारुळातील तापमान वाढावं म्हणून? त्यामुळे त्यांची अंडी उबविली जावीत म्हणून? पानाचं रासायनिक विघटन होऊन आतील तपमान वाढतं असं शास्त्रज्ञांचं अनुमान होतं.१८७४ साली मुंग्यांच्या या कृतीचं खरं कारण शोधून काढण्यात आलं. पानांची लागवड करताच त्यावर अळंबी वाढू लागतात. त्यावरील अनेक गुठळ्यांचं छत पाहिल्यावर कोबी फुलाची आठवण होते.या अळंब्यांचा उपयोग मुंग्या आपली पिलं वाढविण्यासाठी करताततसंच त्यांचा उपयोग पानं कापणाऱ्या प्रौढ मुंग्यांनादेखील होतो. वारुळात तसंच अन्यत्र कुजलेल्या वनस्पतींवर वाढणाऱ्या अळंब्यांत कसलंही साम्य नाही.


आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही अळंबी वारुळाबाहेर कुठेच आढळून येत नाही.ती फक्त पानं कापणाऱ्या मुंग्यांच्या वारुळातच वाढते.या मुंग्यांनी त्यांची शेती केली नाही तर ती नष्ट होईल,म्हणजे या अळंबीशिवाय मुंग्यादेखील जगू शकणार नाहीत.या अळंबीतून निर्माण होणारा द्रवपदार्थच मुंग्या पचवू शकतात.अशा प्रकारचं उभयतांमधील सहजीवन म्हणजे एकमेकांचा प्राणच आहे.सहजीवनाचं हे सातत्य मुंग्या पिढ्यान् ‌पिढ्या चालू ठेवतात.अनुनयकाळात पानं कापणारी राणी मुंगी अळंबीची गोळी तोंडाखालच्या पिशवीत घेऊन वारुळाबाहेर पडते,राणी मुंगीचे पंख झडून जाताच ती जमिनीत छिद्र पाडून त्यात अळंबी सोडते.नंतर ती अंडी घालावयाला बसते.कितीही भूक लागली तरी ती काही खात नाही.थोड्याच अवधीत अंड्यातून जन्माला आलेल्या कामकरी मुंग्या पानं गोळा करून लागवडीला सुरवात करतात.राणीनं स्वतःबरोबर आणलेल्या अळंबीचं बीजाणू पेरलं जातं.साऱ्या नवीन वसाहतीला पुनश्च अन्न मिळू लागतं.


हे अळंबीचं बीजाणू कोठून येतं? पानं कापणाऱ्या मुंग्यांच्याच वारुळात ते का वाढतं ? दुसऱ्या प्रकारच्या वनस्पतींवर मुंग्या का जगू शकत नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरं अजून तरी सापडलेली नाहीत.मुंग्यांना त्याची पर्वा नाही.युगानुयुगं जिवंत राहण्याची किमया फक्त त्यांनाच ठाऊक आहे.


●●● समाप्त ●●●

3/24/26

निंबोणीचं झाड करवंदी / Nimbus tree Karvandi

लहानपणी आम्ही भावंडे चांदण्या रात्री गच्चीत खेळत असू.आई एक अंगाई गीत गायची.ते मला अजून आठवते.


चांदोबा चांदोबा भागलास का ? 

लिंबोणीच्या झाडामागे लपलास का ? 

लिंबोणीचे झाड करवंदी, 

मामाचा वाडा चिरेबंदी.


कडूनिंबाचे झाड दिवसा फारसे आकर्षक दिसत नाही.

सायंकाळी त्याच्या सालीचा गर्द तांबूस रंग काळा दिसू लागतो आणि त्याची सुंदर हिरवी पानं निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर मोठी मनमोहक वाटतात.चांदण्या रात्री दिसणारे त्याचे राजन्वती रूप माझ्या मनातून इतकी वर्षं कधीच मावळलं नाही.


उत्तर भारतातील लोकगीतांतून निंबाचा वारंवार उल्लेख येतो.गावात प्रत्येक घरासमोर एखादं तरी निंबाचं झाड असतंच.ह्या वृक्षाच्या फांद्यांना झोका बांधून युवक-युवती एकत्रित येऊन गीत गात झोका घेत कालक्रमणा करतात.ही गीते बहुतेक शृंगारिक प्रेमाची असतात.


जुन्या काळी पायी मजल दरमजल करीत प्रवास करणारे पथिक प्रकृती चांगली राहावी म्हणून रात्री निंबवृक्षाखाली झोपत.निंबाच्या वृक्षाविषयी एक मजेदार गोष्ट सांगितली जाते.


दीर्घ काळ लांबच्या प्रवासाला निघालेला पती लवकर घरी यावा अशी पत्नीची इच्छा होती.तिनं वैद्याचा सल्ला घेतला.

वैद्यानं तिला सांगितलं की, तुझ्या पतीला सांग की,प्रवासात जाताना चिंचेच्या झाडाखाली झोपत जावं,आणि परतीच्या प्रवासात कडूनिंबाच्या झाडाखाली झोपावं.झालं,पती प्रवासाला निघाला.चिंचेच्या झाडाखाली झोपल्यानं माणसं आजारी पडतात.तो चिंचेच्या झाडाखाली झोपून लवकरच आजारी पडला.प्रकृती बरी नसल्यानं त्यानं पुढचा प्रवास रद्द केला.पत्नीच्या सल्ल्याप्रमाणं परतीच्या प्रवासात तो निंबाच्या झाडाखाली झोपायचा.घरी परत येईपर्यंत त्याची प्रकृती चांगली झाली.पती परत आलेला पाहून ती आनंदित झाली.


गावात घरोघरी आढळून येणारी निंबाची झाडं मुक्त प्रेमीजनांना कशी आवडणार ? हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीत त्याचं प्रतिबिंब पडलं आहे.ही आरोग्यनिधीची झाडं गावाबाहेर एकान्ती असती तर ! पण ती असतात एक तर घरापुढे,रहदारीच्या रस्त्याला किंवा मंदिराच्या समोर.तिन्ही ठिकाणी प्रेमिकांची कुचंबणा.हा कल्पवृक्ष गाथा सप्तशतीतील नायिकांना विष वृक्षासारखा कडू वाटतोय.


पाटलाच्या पोरावर भाळलेल्या एकीनं निरोप पाठवला,'

पाटलाच्या पोरा,तू बायकोच्या तंत्रानं वागतोस व तिला भितोस;तू कडुनिंबाच्या झाडावरील किड्यासारखा आहेस.तू कोणावरही कृपा करीत नाहीस.आम्हाला तुझं दर्शनही होत नाही.तरी गाव तुझ्यासाठी झुरत आहे.'



धन उत्तम व्यवहारानं मिळवायचे असते.दुष्टाच्या पैशाची कशी वाट लागते पहा.


'दुष्टांनी द्रव्य संपादन केलं तर ते त्याचं दान कुणाला करतात ? अर्थात हलकटांनाच.निंबाची फळं पिकली तरी ती कावळेच खाणार.'


ग्रंथपंडिताला ती जीवनाचं रहस्य सांगताना म्हणते, 'हे धार्मिक,तू दुःशिक्षित आहेस.तू निंबाच्या किड्यासारखा आहेस.काय व्हायचे असेल ते होऊ दे,नरकात जाऊ,पण दोघेही बरोबर जाऊ.'


उंच,विशाल वाढणाऱ्या निंबाची पानं सदा हिरवीगार असतात.पानं कात्रीदार असून घनदाट असतात.निंबाचं मूळ उत्पत्तिस्थान ब्रह्मदेशात असलं तरी अमरकोशासारख्या प्राचीन ग्रंथात त्याचा उल्लेख आला आहे.


पारिभद्रे निम्बतरुर् मन्दारः पारिजातकः


कडुनिंबाचे चार प्रकार आहेत पारिभद्र,निंबतरू, मन्दार व पारिजातक.निंबाला पांढऱ्या रंगाची, मधाचा वास असलेली बारीक फुलं एकदा मार्च-एप्रिल महिन्यात व दुसऱ्यांदा पावसाळ्यात येतात.पिकलेली फळं पिवळीधमक दिसतात.

या फळांना लिंबोणी म्हणतात.पिकलेली रसाळ फळं कावळ्यांना खूप आवडतात.इतरही पक्षी व मधमाश्या निंबांच्या झाडाकडे आकर्षिल्या जातात.


त्याच्या अनेक उपयोगांवरून वैद्य त्यास भूलोकातील कल्पतरू म्हणतात प्राचीन आर्यऋषिवर्यांनी त्याच्या अलौकिक गुणाचा शोध लावून त्यास मोठे श्रेष्ठपद दिले आहे.त्याच्या सेवनानं अनेक व्याधींचे निर्मूलन होते.या वृक्षाची नुसती पानेच खाऊन राहिलेले तेजःपुंज आणि शक्तिमान असे काही विरक्त कधी कधी नजरेस पडतात.

निंबाची छाया घनदाट व गार करवंदी असते.निंबाचा वृक्ष फार जुनाट झाला म्हणजे त्याच्या खोडास शुद्ध चंदनाचा सुवास येतो


हा एकदा तोडला तरी पुन्हा त्याची मुळे फुटून त्याचा काही वर्षांनी मोठा वृक्ष होतो.पिंपळ व निंब या दोहोंची फारच मैत्री आहे.जेथे जेथे.पिंपळाचा पार असतो तेथे तेथे बहुतकरून निंबही असतो.


वृक्षाच्छादित मार्ग बनविण्यासाठी निंबाइतके योग्य झाड नाही.उन्हाळ्यात जेव्हा सावलीची जरूरी असते त्या वेळी निंब आपल्या करवंदी सावलीनं व सभोवतालच्या निरामय वातावरणानं प्रवाशांना आनंद देतो.राईत त्याची वाढ उंच होत नाही.मात्र हमरस्त्यावर झार्ड नजीकनजीक असल्यानं तो

उंच वाढत असला तरी सरळ कधीच नसतो.त्याला जेथून खालच्या भागातून फांद्या फुटतात त्या मोठ्या रेखीव व शोभादायक असतात.


जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसारक केंद्र,सीताबाई,नागपूर


कावळ्यांना आश्रय देणाऱ्या वृक्षांना ऋग्वेदात काकाम्बीर म्हटलं आहे.निंबवृक्षाची गणना अशा झाडांतच करायला हवी.निंबाच्या झाडावर कावळ्यांची अनेक घरटी दरवर्षी दिसून येतात. वैशाख महिन्यात या वृक्षावर कावळ्यांनी घरटी करणं पुढे सुकाळ असल्याचं सुचविते.एरव्ही कावळ्याचा आवाज किती कर्कश ! पण ज्यांनी ह्या काकाम्बीरावरील घरट्यात बसलेल्या कावळीचा आवाज ऐकला असेल तो त्या आवाजानं विचलित झाल्याशिवाय राहणार नाही. केवढा अद्भुत स्वर तिच्या कंठातून स्रवतो.


या वृक्षाच्या बाबतीत एक चमत्कार कधी कधी आढळून येतो.त्याच्या मोठ्या आडव्या फांदीतून एकाएकी ताडीसारखा पांढरा द्रव वाहू लागतो.असं होणं लोक अशुभ मानतात.ते स्रवणं काही दिवसांनंतर आपोआपच थांबतं.


लिंबोणीतील बियांपासून तेल काढतात.ते 'मारगोसा' या नावानं ओळखलं जातं.त्याचा उपयोग जंतुनाशक द्रव्ये औषधे बनविण्याकरिता होतो.वातावरील रोगात त्याचे तेल मालीश करण्याकरिता उपयोगात आणतात.


निंबाचे लाकूड टणक व टिकावू असल्यानं जहाजबांधणीत त्याचा उपयोग होतो.त्याच्या लाकडापासून खेळणी,शेतीची अवजारे व बैलगाड्या तयार करतात.


■■■ समाप्त