* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: पक्षिशास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटल / Ornithologist Aristotle

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

4/9/26

पक्षिशास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटल / Ornithologist Aristotle

पुस्तकं...


मी गेल्यावर, 

तुला वाटेल की आपल्या बाबांनी 

वाचलियेत ही सारी पुस्तकं... 


पण नाही, 

अर्धही वाचता आलेलं नाहीय, 

येणारही नाही हे ठाऊक होतं मला तरी, 

मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं... 


माझ्यासाठी माझ्या बापाने

काहीच सोडलं नव्हतं मागं, 

ही अक्षर ओळख सोडून फक्त... 


जिच्या मागे धावत मी 

पोहोचलो आहे इथवर, 

तुला सांगण्या समजावण्यासाठी की, 

मलाही सोडता येणार नाहीय मागे, 

काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी... 


ही काही पुस्तकं आहेत फक्त, 

जी तुला दाखवतिल वाट. 

चालवतिल,तुला थांबवतिल, 

कधी पळवतिल,कधी 

निस्तब्ध करतील, 

बोलतं करतिल,कधी

टाकतिल संभ्रमात, 

सोडवतिल गुंते, 

वाढवतिल पायाखालचा चिखल, 

कधी बुडवतिल,तरवतील,कधी

वाहवतील,कधी थोपवतील,प्रवाह

अडवतिल,तुडवतिल,सडवतील, 

बडवतील,हरवतिल,सापडतील... 


तुझ्याशी काहीही करतील, 

ही पुस्तकं... 


तू समोर आल्यावर, 

नेहेमीच कवेत घेवुन मी माझ्यातली

धडधड तुला देण्याचा प्रयत्न करतो... 


तशीच ही पुस्तकं 

उघडतील मधोमध,पसरतील हात, 

मिठीत घेतील तुला, 

आपोआप होतिल हृदयाचे ठोके... 


यांच्यात रहस्य आहेत दडलेली,

अनेक उत्तरंही असतील,

प्रश्नांमधे कदाचित कुठेच

प्रश्नही नसतील... 


एक लक्षात ठेव,

आपलं आयुष्यच पल्प फिक्शन,कधी क्लासिक,

सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल,कधी कवितिक ,

कधी किचकट,कधी सोपं असतं,ध्यानात असु दे या सगळ्यात वाईट काहिच नसतं... 


त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक, 

त्याच वेळची गरज असतं,समज नसतं... 


मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असतील, 

जी नेतील तुला जायचं आहे तिथं, 

फक्त मी असेन, 

तिथं मात्र तुला पोहोचता येणार नाही... 


कारण मी आधीच

होवुन गेलेलो असेन तुझ्यासाठी, 

एखादी कथा,एखादी कादंबरी, 

एखादी कविता, एखाद्या पुस्तकातली... 


माझी आठवण आली की, 

या प्रचंड ढिगाऱ्यातलं ते एखादं पुस्तक शोध... 


तुझा प्रवास बघ कसा

सोपा होवुन जाईल... 


(प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम )



पक्षिशास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटल / Ornithologist Aristotle


सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो व प्लेटोचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल अशी अभूतपूर्व गुरु-शिष्याची परंपरा दृष्ट लागण्यासारखी आहे,पण अ‍ॅरिस्टॉटल मात्र नुसताच तत्त्ववेत्ता नव्हता,तर जगातील एक थोर चिंतनशील निसर्गज्ञानी होता,पक्षिशास्त्रज्ञ म्हणून तर त्याचं कार्य फार मोठं आहे.


अशा या थोर पुरुषाचा जन्म अथेन्समधील स्टगिरा येथे इ. स. पूर्वी चौथ्या शतकात झाला.त्याचे वडील निकोमॅकस,

अ‍ॅलेक्झांडरच्या आजोबांचे राजवैद्य होते. लहान असतानाच अ‍ॅरिस्टॉटल पोरका झाला.त्याच्या वडिलांचे जिवलग मित्र प्रोझेनस यांनी त्याला लहानाचं मोठं केलं.आयुष्याच्या पूर्वार्धात तो संरक्षण विभागात नोकरीस होता.परंतु युद्ध व त्या अनुषंगानं होणारी माणसांची हत्या यांचा उबग येऊन त्यानं ती नोकरी सोडली.उदरनिर्वाहाकरिता तो अथेन्स येथे औषधं विकत असे.

एका ज्योतिषानं त्याला,अथेन्स येथे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यानं त्याचा भाग्योदय होईल, असं सांगितल्यावरून तो वयाच्या सतराव्या वर्षी प्लेटोच्या पाठशाळेत विद्यार्जनासाठी जाऊ लागला,

तेथे त्यानं तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला.प्लेटोचा तो लाडका विद्यार्थी होता.प्लेटो कित्येकदा म्हणत असे की, माझ्यानंतरची परंपरा अ‍ॅरिस्टॉटल चालवील.गुरूचा आशीर्वाद खरा ठरला.त्याची कीर्ती झपाट्यानं ग्रीस देशात पसरली.ही वार्ता त्या काळी राज्य करीत असलेल्या अ‍ॅलेक्झांडरच्या वडिलांच्या कानावर गेली. त्यानं अ‍ॅरिस्टॉटलची नियुक्ती युवराज अ‍ॅलेक्झांडरचे शिक्षक म्हणून केली.त्या वेळी अ‍ॅरिस्टॉटल बेचाळीस वर्षांचा व युवराज अवघा पंधरा वर्षांचा होता.


बारा वर्षांहून अधिक काळ तो राजाश्रयाला राहिला. अलेक्झांडर सत्तावीस वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा खून एका अधिकाऱ्यानं केला.अशा राजनीतीचा उबग येऊन त्यानं राजदरबार सोडला.तो परत आपल्या गावी आला.राजाश्रयाला असताना त्यानं आपल्या जन्मगावावर फार उपकार केले होते.

युद्धात उद्ध्वस्त झालेलं ते गाव त्यानं राजाच्या साह्यानं परत वसविलं.देशोधडीला लागलेल्या तेथील नागरिकांना त्यानं पुन्हा बोलावून घेतलं.कित्येकांना गुलामगिरीतून मुक्त केलं.असा हा धर्मपुत्र परत आलेला पाहून सर्वांना आनंद झाला.त्यानं गावकऱ्यांच्या साहाय्यानं नवीन पाठशाळा स्थापन केली,


अ‍ॅरिस्टॉटलची ही पाठशाळा पुढे नावारूपाला आली.त्याच्या शाळेत विद्यार्जन करणं मोठ्या प्रतिष्ठेचं समजलं जाई,तो आपल्या विद्यार्थ्यांना पाठशाळेच्या पटांगणातून शिष्यगणासह चालत चालत शिकवीत असे.म्हणून त्याला पेरिपॅटेटिक म्हणून संबोधलं जाई.


तो नुसताच रूक्ष पंडित नव्हता.संसारी जीवनातही तो सुखी होता.त्याला दोन बायका होत्या.दोन मुलं होती. तो शानषोकीनं राही.उत्तम कपडे वापरी.बोटांत सोन्याच्या अंगठ्या घाली.पण त्याचा पिंड निसर्गात अधिक रमत असे.निसर्गात अनेक रहस्यं दडली आहेत.ती रहस्यं त्याच्या चिंतनाचा विषय होता.अशा गूढांचा शोध-बोध घेत भटकंती करावी,असं त्याला वाटे.पण निसर्ग-इतिहासाचा अभ्यास करणं,हे काही एकट्या-दुकट्या माणसाचं काम नाही.त्याला साधन-संपत्ती व राजाश्रय लागतो.या कार्यात त्याचा एके काळी विद्यार्थी असलेल्या सम्राट अ‍ॅलेक्झांडरनं साहाय्य केलं.त्याच्या दिमतीला विविध विषयांतील आठशे जाणकार त्यानं दिले.राज्यातील शिकारी,पारधी आणि मासे मारणाऱ्या कोळ्यांना सूचना दिल्या की, वन्यजीवांविषयी शास्त्रीयदृष्ट्या काही माहिती मिळाल्यास त्यांनी ती अ‍ॅरिस्टॉटलला द्यावी.त्यानं निसर्गज्ञानाविषयीची शेकडो लक्षावधी हस्तलिखितं मिळवली नकाशे गोळा केले.वन्य जीवांचे नमुने प्रयासानं प्राप्त केले.आयुष्याच्या अखेरपर्यंत हे त्याचं कार्य चालू होतं.


अ‍ॅरिस्टॉटलनं विविध विषयांवर एकूण चारशे ग्रंथ लिहिले.बरेच ग्रंथ काळाच्या उदरात व युद्धाच्या खाईत नष्ट झाले.त्यांपैकी आता फक्त अठ्ठेचाळीस ग्रंथ उपलब्ध आहेत.


याच काळात त्यानं भौतिक व आधिभौतिक शास्त्रावरील अलौकिक ग्रंथ प्रसिद्ध केले.ह्यामुळं सम्राटाची नाराजी झाली.

गुरूनं त्याला दिलेल्या अमूल्य ज्ञानाची तो स्वतःमध्ये जपणूक करीत होता.त्या ज्ञानाचा त्याला कोणी वाटेकरी नको होता.त्यानं आपल्या गुरूला पाठविलेल्या शेवटच्या पत्रात लिहिलं,"मला राजापेक्षा विद्वान होणं आवडलं असतं.माझा आनंद आपण हिरावून घेतला.माझी घोर निराशा झाली."


पण सम्राटाची रसिकता व दिलदारपणा आयुष्यात कधी कमी झाला नाही.म्हणूनच तो डायोनिअससारख्या निःसंग,विरक्त व ज्ञानी माणसाची जेवढी कदर करी, तेवढाच युद्धात शौर्य दाखविणाऱ्याचा गुणगौरव करी.राजरोष झाला तरी लोकांनी अ‍ॅरिस्टॉटलवर हात ठेवले नाहीत.त्यांच्यापुढं सॉक्रेटिसचं उदाहरण होतंच.


त्याचा 'हिस्टरी नॅचरॅलिस' हा ग्रंथराज अद्वितीय आहे.जग अ‍ॅरिस्टॉटलला प्राणिशास्त्राचा जनक म्हणूनच ओळखतं.ह्या अधिकारी व्यक्तीनं निसर्गाविषयी जे जे काही लिहिलं ते बहुमोलाचं आहे,परीक्षणापेक्षा शास्त्राला त्याच्यापासून सुरुवात होते.निसर्गाचा इतिहास लिहिण्यासाठी त्यानं अविश्रांत श्रम केले.त्याच्या सव्यसाची लेखणीनं स्पर्श केला नाही,असा कोणताही विषय नाही.परंतु या सर्वांत पक्षिशास्त्र हा त्याचा आवडता विषय होता.


पक्ष्यांचं वर्गीकरण त्यानं त्यांच्या बाह्य लक्षणांवरून केलं आहे.गरुड व घारीसारखे तीक्ष्ण नख्या असलेले तीन बोटांचे पक्षी,लावा,तितिर व रानकोंबड्यांसारखे साधी तीन बोटे असलेले,जमीन उकरणारे विष्किरी पक्षी आणि बोटं कातडीनं जोडलेले जलचर पक्षी असं त्यानं त्याचं वर्गीकरण केलं आहे.


ज्या पक्ष्यांना तीक्ष्ण नख्या असतात,त्यांच्या छातीचा भाग इतर पक्ष्यांपेक्षा अतिशय सशक्त असतो.त्यांच्या पायांना पुढं तीन व मागं एक बोट असतं.मानमोडी कुळातील पक्ष्यांच्या पायांना मात्र दोनच बोटं असतात. चोचीत जीभ व दातांचं स्थान आहे.नाक व कानासाठी छिद्रं असतात.त्यांचा उपयोग अनुक्रमे वास घेण्यासाठी व ऐकण्यासाठी होतो.डोळ्यांवरील पापण्यांना केस नसतात.ज्या पक्ष्यांना तीक्ष्ण नख्या नसतात त्यांना आर असते.


पाखरांच्या विणीविषयीच्या नोंदी मात्र अजूनही अबाधित आहेत.कोकिळा म्हणजे रूप बदललेला ससाणा नव्हे.दुसऱ्या पक्ष्यांची अंडी खाऊन त्यांच्या घरट्यात कोकिळा अंडी घालते आणि आपल्या पिलांचं संगोपन दुसऱ्या पक्ष्यांकडून करवून घेते.खंड्या, कस्तुरा, पंकोळी,बाज,श्येन व घुबड या पक्ष्यांच्या घरट्यांबाबत त्यानं मोठ्या विस्तारानं लिहिलं आहे.


पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी त्यानं अत्यंत महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत.तो लिहितो,"क्रौंच रशियातील विस्तीर्ण पठारावरून नाईल नदीच्या उगमानजीकच्या दलदलीपर्यंत प्रवास करतात.पिवश्या ढोक,हंस, महाहंस पाणकोंबड्या व हरोळ्या पक्षी समशीतोष्ण प्रदेशात हिवाळाभर राहतात.पण शतकानुशतकं स्थलांतराविषयी चालत आलेल्या भ्रामक कल्पनांचं मूळ त्याच्याकडूनच आलं आहे.त्याचं म्हणणं असं की,काही पक्षी आपला काल हिमनिद्रेत घालवितात.या त्याच्या अनुमानाची पाळंमुळं इतकी खोल गेली होती की,डॉ.इलियट काऊससारख्या विद्वान अमेरिकन पक्षिशास्त्रज्ञानं आभोळीच्या हिमनिद्रेवर एकशेब्यांशी निबंध लिहिले. हिमनिद्रेत पक्षी वृक्षांची ढोली,गिरिपर्वतातील गुहा, कपारी व चिखलानं भरलेल्या दलदलीचा आश्रय घेतात. हा त्याचा सिद्धान्त केवळ आभोळी पक्ष्यापुरता मर्यादित नव्हता,तर महाबक व घारी इत्यादी पक्ष्यांचं आचरणही आभोळीप्रमाणंच असतं,असं त्याचं म्हणणं होतं.


पक्ष्यांच्या हिमनिद्रेविषयीच्या सिद्धान्ताचा प्रभाव

अ‍ॅरिस्टॉटलनंतर दोन हजार वर्षेपर्यंत पक्षिशास्त्रज्ञांवर होता.

आभोळी पक्ष्यांचं हिवाळी निवासस्थान १९४४ साली त्यांच्या पायांतील कड्यांवरून शोधून काढण्यात आलं.परंतु आभोळीच्या हिवाळी स्थलांतराविषयीचं संपूर्ण गूढ अजूनही उकलता आलं नाही.


शब्दांचं धन,मारुती चितमपल्ली,छाया चितमपल्ली,

प्रकाशक-मकरंद कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र,

सीताबर्डी,नागपूर


स्थलांतराच्या काळात पक्षी आपलं रूप बदलतात, असंही अ‍ॅरिस्टॉटलचं मत होतं.उत्तरेकडून काही पक्षी येताच दक्षिणेकडील पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रयाण करतात.ऋतुमानातील बदलाप्रमाणं ते आपला पिसारा बदलतात.आता असं स्थलांतर करणारे पक्षी एकाच कुळातील असतात,असा शोध लागला आहे.


आकारानं मोठ्या पक्ष्यांचं स्थलांतर स्वीकारलं,तरी अगदी लहान लहान पक्षीदेखील स्थलांतर करतात,हे अ‍ॅरिस्टॉटलला मान्य नव्हतं,करकोचे व महाबक अशा मोठ्या पक्ष्यांच्या पाठीवर बसून लहान पक्षी प्रवास करतात.अशा प्रवासाच्या संधीची वाट पाहत छोटे पक्षी थव्याथव्यानं समुद्रकिनाऱ्यावर बसलेले आढळतात.असं त्यांन लिहून ठेवलं आहे.


¶¶¶ समाप्त ¶¶¶