* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: माकडांचा हल्ला / Attack of the monkeys

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

3/28/26

माकडांचा हल्ला / Attack of the monkeys

▶ त्या वेळी दिलीप बंड यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतली होती.ते अतिशय कार्यक्षम आणि पर्यावरणप्रेमी अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. आमचे मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंक्यांनी मला फोन करून आयुक्तांची ओळख करून द्यायला त्यांच्या बंगल्यावर बोलावलं.ओळख-पाळख झाली.बोलता बोलता मी त्यांना म्हटलं, "सर,आपण प्राणिसंग्रहालय बघायला नक्की या.कधी येता?" मला वाटलं, ते म्हणतील, येतो वेळ मिळाला की.पण ते पटकन म्हणाले, "आजच येतो संध्याकाळी".झालं, माझं धाबे दणाणलं ! कारण त्या दिवशी नेमका मंगळवार होता.आमच्या साप्ताहिक सुटीचा वार. नवे आयुक्त भेटीला येणार आणि तयारी पूर्णपणे शून्य ! सगळे कर्मचारी आपापल्या घरी.पण आयुक्तांना आज येऊ नका तरी कसं म्हणणार? मी ताबडतोब तिथून बाहेर पडलो आणि आमच्या पार्कची होनहार सफाई कर्मचारी जयाकडे गेलो.जयाचं शिक्षण फारसं झालं नसलं,तरी पडेल ते काम ती मन लावून करत असे. नवीन कामं शिकत असे. पार्कचं काम आपलं मानून करत असे. तिला पार्कवर घेऊन आलो.अण्णा बोराटे निवासी वॉचमन होते. गणपत आणि राऊतही ड्युटीवर होते.हातात फारसा वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही पटापट टीम पाडल्या आणि कामाला लागलो.गणपतने राजा,निकी,तारा,जेरी सर्वांना इनडोअर सेक्शनमध्ये बंद करून बिबट्यांचा पिंजरा साफ केला.राऊतने मगरकुंड उरकलं.सर्वांनी मिळून पक्षालय झाडून घेतलं.बोराटे अण्णांनी सर्पकुंड आणि ओटे स्वच्छ केले.जयाने सगळे पाथवे झाडून घेतले.आता उरलं मंकी हिल.मी एकटाच मंकी हिलवर गेलो.मागच्या बाजूला असलेल्या इनडोअर सेक्शनमधून छोट्या पुलावरून आऊटडोअर सेक्शनमध्ये आलो आणि कचरा गोळा करायला सुरुवात केली.


तुटक्या चपला,कोल्डड्रिंक्सच्या रिकाम्या बाटल्या,कसकसले रॅपर्स अशी बरीच सामग्री आमच्या 'सुजाण' प्रेक्षकांनी मंकी हिलवर भिरकावून तिथली शोभा वाढवली होती ! हातातल्या पोत्यात एकेक ऐवज जमा करत मी चाललो होतो.झाडांवरून सगळी माकडं माझी गंमत पाहत होती.एखादं खाली उतरून परत दुसऱ्या झाडावर चढून बसत असे.तोवर आमच्या परिवारात एक नवा सदस्यही दाखल झाला होता.गौरी आणि आक्क्याला पिल्लू झालं होतं.ते तेव्हा पाच-सहा महिन्यांचं असेल.ते नेहमी गौरीच्या किंवा एखाद्या माकड मावशीच्या कमरेला मिठी मारून बसत असे. त्यामुळे त्याला आम्ही 'मोबाइल' म्हणू लागलो.पुढे त्याचं ते नावच पडलं.तर मी कचरा गोळा करत असताना हा मोबाइल अचानक एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी खाली उतरला आणि नेमका मी त्याच्या समोर आलो.एका हातात पोतं,दुसऱ्या हातात पाइपचा तुकडा हा माझा अवतार पाहून तो घाबरला असावा.सगळी माकडं एका झाडावर आणि हे पिल्लू एकटंच दुसऱ्या झाडावर.तो भीतीने मोठ्याने चीत्कारला. झालं,त्याच्या चित्कारण्याने डेंजरचा सिग्नल गेला.गौरीने झाडावरून उडी मारली आणि माझ्या कंबरेला ती जोरकस चावली.प्रचंड बेनांनी मी कळवळलो.तेवढ्यात राणीनेही थेट माझ्या पाठीवरच उडी घेतली आणि तिनेही माझ्या खांद्याचा चावा घेतला.राजीने तर अत्यंत आवेशाने पुढच्या बाजूने पोटावरच चाल केली.माकडांचा चीत्कार, माझं कळवळून ओरडणं, वेदना,जखमा आणि रक्त ! सगळा गोंधळ माजला.त्या तिघी तर मला सोडायलाच तयार नव्हत्या.


दरम्यान,मंकी हिलवरचा कोलाहल ऐकून प्रतिभा आणि तेजस धावत तिथे पोचले.त्यांनी मक्याची कणसं, शेंगा, चिकू,केळी- जे हाताला येईल ते आत फेकून त्या तिघी माकडिणींचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सुरू केला.तेवढी संधी साधून मी अक्षरशः गडाबडा लोळत पाण्याच्या खंदकात उडी मारली.पोहता न येणाऱ्या आणि पाण्याची भीती वाटणाऱ्या मला पाण्यातच उडी मारायचं कसं सुचलं कुणास ठाऊक ! तेवढ्यात जय पाहुजा नावाचा आमचा स्वयंसेवक तिथे पोहोचला.त्याने पळतच सर्पकुंडावरची लाकडी शिडी आणली आणि खंदकात सोडली. तिच्यावरून चढत मी ताबडतोब बाहेर आलो आणि पळत घर गाठलं.जखमा किती गंभीर आहेत हे बघण्याचंही मला सुचलं नाही.डोक्यात फक्त एकच विचार होता, आयुक्त येण्याची वेळ झालीय.आपल्याला उशीर व्हायला नको.भराभरा रक्ताळलेले कपडे अक्षरशः सोलून काढले आणि सुके कपडे घालून,शर्ट इन करत मेन गेटकडे पळालो. यस ! टायमिंग वॉज परफेक्ट !... मी पोचायला आणि आयुक्तांची गाडी आत यायला.


सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन


आयुक्त दिलीप बंड यांनी आधी पक्षालय पाहिलं.मग शेकरु, बिबटे, मगर, साप- सगळं पाहून प्रश्न विचारत,गप्पा मारत आम्ही मंकी हिलवर गेलो.मंकी हिल पाहून बंडसाहेब खूष झाले. मला म्हणाले, "काय सुंदर माकडं आहेत। चावत बिवत नाहीत ना?" त्यांनीही नेमका हाच प्रश्न का विचारावा? त्यांना काय उत्तर द्यावं ते न कळून मी शांतच राहिलो.निघताना बंडसाहेब पुन्हा म्हणाले,"अनिल, खूप छान ठेवलं आहे तुम्ही पार्क.तुमच्या प्राणी-पक्ष्यांसाठी अजून काही लागत असेल तर तसा प्रस्ताव तयार करून द्या,मी लगेचच मंजूर करीन."आश्वासन देऊन ते निघून गेले.गाडी गेली आणि अचानक मी मटकन खुर्चीत बसलो.गेला तासभर स्वतःला कसंबसं रोखून धरलं होतं.आता मात्र वेदना सहन होईनात.पोटा-पाठीवरच्या जखमांमधून रक्तस्राव होऊन नव्याने घातलेले कपडेही ओले होऊ लागले होते.आयुक्तांबरोबर आलेल्या उद्यान अधिक्षक साळुंक्यांना घडलेली घटना थोडक्यात सांगितली.आधी का सांगितलं नाहीस, असं म्हणत ते माझ्यावर चांगलेच खवळले आणि त्यांनी मला गाडीत घालून ताबडतोब हॉस्पिटलला पाठवलं.पुढे हे दुखणं मला महिना दोन महिने पुरल.


त्या घटनेनंतर मी विचार करत राहिलो, की असं का घडलं असावं? गौरी, राणी, राजी सगळ्यांनाच मी वाढवलं होतं,प्रेमाने खाऊ घातलं होतं.गौरीचे डोहाळे पुरवले होते.तरी त्यांनी माझ्यावर हल्ला का करावा? माझ्या मते याचं एकच कारण होतं : तिच्या बाळाला माझ्यापासून धोका आहे अशी शंका तिला आली.बाळंत आई आणि तिचं पिल्लू यांच्यामधून जायचं नाही, हा निसर्गाचा संकेत मी नकळत मोडला होता. त्यामुळे एरवी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकणाऱ्या त्या तीन माद्यांनी मला चांगलाच धडा शिकवला होता.त्यातल्या त्यात दिलासा एवढाच,की त्या माकडिणींच्या मदतीला कोणीही नर आला नाही.आक्क्याने माझ्यावर हल्ला केला असता तर माझं काय झालं असतं याचा विचारही करवत नाही." 


◆◆◆ समाप्त ◆◆◆


"One must imagine Sisyphus happy" हे प्रसिद्ध वाक्य Albert Camus यांनी त्यांच्या The Myth of Sisyphus या निबंधात मांडले आहे. मानवी जीवनातील निरर्थकता (absurdity) समजून घेण्यासाठी आणि त्या निरर्थकतेला माणूस कसा प्रतिसाद देऊ शकतो, हे सांगण्यासाठी हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.


ग्रीक पुराणकथांमध्ये सिसिफस हा एक राजा होता. देवतांनी त्याला एक कठोर शिक्षा दिली होती—एक प्रचंड मोठा दगड डोंगरावर ढकलत शिखरापर्यंत न्यायचा; पण जसेच तो दगड शिखरावर पोहोचेल, तसेच तो पुन्हा खाली घसरून येईल. मग सिसिफसला पुन्हा तेच काम सुरू करावे लागेल. ही प्रक्रिया अनंत काळ चालणारी होती—अर्थहीन, कंटाळवाणी आणि अंतहीन.कॅम्यू यांच्या मते मानवी जीवनही काही अंशी असेच आहे. माणूस रोज उठतो, काम करतो, थकतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चक्र सुरू होते. शेवटी मृत्यू येतो. या संपूर्ण प्रक्रियेचा विचार केला, तर जीवनात अंतिम असा काही "अर्थ" दिसून येत नाही. यालाच कॅम्यू Absurdism म्हणतात—माणूस जीवनात अर्थ शोधतो; पण विश्व मात्र मठ्ठ, मख्ख आणि अर्थहीन आहे.


मग अशा परिस्थितीत आनंद कसा मिळवायचा?

इथेच कॅम्यूचा महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. सिसिफसच्या शिक्षेत कोणताही बदल होऊ शकत नाही. दगड पुन्हा खाली येणारच. पण त्या परिस्थितीकडे पाहण्याची त्याची मानसिकता मात्र बदलू शकते. कॅम्यू म्हणतात—जेव्हा सिसिफस दगड खाली घसरताना पाहतो आणि पुन्हा खाली चालत जातो, तेव्हा त्याला आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असते. त्याला ठाऊक असते की ही शिक्षा कधीच संपणार नाही. तरीसुद्धा तो बंडखोर वृत्तीने ते काम स्वीकारतो. म्हणूनच कॅम्यू शेवटी म्हणतात—"आपण सिसिफसला आनंदी असल्याची कल्पना केली पाहिजे."


जीवनाला एखादा उदात्त किंवा अंतिम अर्थ नसला तरी माणूस आपल्या जाणीवेच्या बळावर, स्वातंत्र्याच्या अनुभवातून आणि बंडखोर वृत्तीमधून स्वतःचा अर्थ निर्माण करू शकतो. जग कदाचित निरर्थक असू शकते; पण माणूस स्वतः निरर्थक नसतो. तो जगण्याची निवड करतो, संघर्ष करतो आणि त्या संघर्षातच स्वतःचा आनंद शोधतो.


"One must imagine Sisyphus happy" हे वाक्य जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देते. जीवनात अंतिम अर्थ नसला तरी माणसाने निराश होण्याची गरज नाही. उलट, हीच जाणीव त्याला अधिक स्वतंत्र, अधिक प्रामाणिक आणि अधिक जिवंत बनवते.

जग कदाचित निरर्थक असू शकते; पण त्या निरर्थकतेशी झुंज देत जगणारा माणूस मात्र अर्थपूर्ण असतो—आणि कदाचित त्यातच खरा आनंद दडलेला असतो.मला मात्र येथे चार्वाक कॅम्यूपेक्षा अधिक सुसंगत वाटतो. चार्वाक इतरांना सुखावण्याच्या भानगडीत फार पडत नाही. तो स्पष्टपणे सांगतो—सर्वप्रथम स्वतः सुख मिळवा; नंतर इतरांचा विचार करा. हा विचार स्वार्थी आणि स्वकेंद्री वाटू शकतो; पण कदाचित त्यातच शहाणपण दडलेले आहे. हे जग एका विशाल अरण्यासारखे आहे. या अरण्यात तुम्ही पिकनिकसाठी आला आहात. पिकनिक करण्यासाठी तुम्हाला जितकी जागा आवश्यक आहे, तेवढीच जागा स्वच्छ करून घ्या. संपूर्ण जंगल स्वच्छ झाल्यावरच मी पिकनिक करीन, असा विचार केलात तर ते कधीच घडणार नाही—आणि तुमची पिकनिकही कायमची राहून जाईल. अधिकचा व्याप नको अन ताप नको!


आमचे मित्र विनायक पाटील याच्याकडून व्हॉट्सअप माध्यमातून माझ्यापर्यंत आलेला वाचणीय लेख….