* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: चेलपतंग : एक शिल्पकार / Chelpatang: A craftsman

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

3/30/26

चेलपतंग : एक शिल्पकार / Chelpatang: A craftsman

चेलपतंग हे सामान्यतः पाण्यानजीक,तसेच तळ्यावर आणि नदीवर पावसाळ्यात उडताना दिसतात.बहुतेकांचा रंग भुरा असला,तरी त्याला काही अपवादही असतात.चेलपतंगाची मादी पाणवनस्पतीवर अंडी घालते.परंतु काही प्रकारचे पतंग पाण्यात प्रवेश करून तळ्यातील दगडा-धोंड्यांवर अंडी घालतात.अंड्यांच्या राशींचा पाण्याशी संपर्क येताच ती त्वरित फुगतात.सुमारे दहा दिवसांनी त्यांतून अर्भक बाहेर पडून पाण्यात वळवळताना दिसतात.बहुतेक चेलपतंगांची ही अर्भकं स्वतःभोवती कोष तयार करतात.त्यातून त्यांचं तोंड आणि पाय तेवढे दिसतात.या कोष करण्याच्या पद्धतीवरून त्यांच्या विविध जातींची ओळख होते. काहींना पाणगोगलगाईच्या कवचापासून कोष तयार करायला आवडतं.काही बारीक वाळूचे कण कोष तयार करण्याकरिता उपयोगात आणतात. तर काही पाण्यात पडलेल्या पानांपासून केलेल्या गोल चकत्यांचा कोष करतात. या गोल चकत्या अत्यंत अचूक असतात.कोणा माणसाला कात्रीच्या साह्यानंदेखील तशी एकसारख्या आकाराची वर्तुळं कापता येणार नाहीत. काही पतंग रेतीचे कण आणि झाडाच्या बारक्या काटक्या यांपासून कोष तयार करतात. कोष करण्यात चेलपतंगांच्या अर्भकांनी दाखविलेली सौंदर्यवृत्ती व कृतीतील अचूकता अभूतपूर्व असून,जीवशास्त्रज्ञांना त्याचं कोडं कित्येक वर्ष उलगडलं नव्हतं.


चेलपतंगाच्या डिंभकाचा (अर्भक) आहार नाजूक नसतो.

काही प्रामुख्यानं शाकाहारी आहेत,ते पाणवनस्पतीवर आपली उपजीविका करतात. काही मात्र मांसाहारी आहेत.ते कृमि कीटकांवर जगतात परंतु कित्येकदा ते एकमेकांनाच खाऊन टाकतात.जेव्हा त्यांची पूर्ण वाढ होते,तेव्हा ते कोषाचं दार लहान खडा किंवा वनस्पतीचा कचरा वापरून बंद करतात.काही काळ अशा अवस्थेत विश्रांती घेतल्यावर डिंभकांचा अवतार बदलून, त्यांचं पीलुकात (पुपा) रूपांतर होतं.या अवतारात त्यांचं प्रौढ पतंगांशी साम्य दिसत असलं,तरी त्यांचे अवयव मृदू व पिवळट पांढरे असतात.

गोलाकार शरीरावर लहान पंख खोवल्यासारखे उगवतात.हा अवतार अंदाजे पंधरा दिवस टिकतो.पीलुक आपल्या करवतीसारख्या जबड्यानं कोश कापून तो अत्यंत जोमानं मधल्या पायांच्या साहाय्यानं पोहत पाण्याबरोबर डोकावणाऱ्या पाणवनस्पतीवर किंवा दगडावर येतो.बाहेरील हवेच्या संर्पकात येताच त्याचं प्रौढ चेलपतंगात रूपांतर होतं.पीलुक आपल्या शरीराचा त्याग करून नवीन चेलपतंगाचं शरीर धारण करतो.पंख पूर्णपणे पसरले जातात अन् काही क्षणांतच चेलपतंग हवेत उडू लागतो. काही चेलपतंगांच्या जातीचा पूर्णावतार पाण्याच्या पृष्ठभागावरच होतो.अशा वेळी चेलपतंग हजारोंच्या समूहातून हवेत उडू लागलेले दिसतात.जर त्या पाण्यात ट्राउट मासे असतील,तर त्यांना चेलपतंगांच्या रूपानं जणू मेजवानीच मिळते.त्या वेळी जलपृष्ठावर मोठी खळबळ माजते.


सर्वच जातींच्या चेलपतंगांना कोषाचं आवरण राहात नाही.असे पतंग पाण्यात पिशवीच्या आकाराची जाळी तयार करतात.कोष-डिंभकापेक्षा हे विनकोषाचे डिंभक मोठे चपळ असतात.असे डिंभक ओढ्यातील दगडगोटे हलविले,की त्यांखाली आढळून येतात.अशा ठिकाणी त्यांच्या जाळयाही दिसून येतात.


कित्येक वेळा अशा जाळ्या पाणवनस्पतीच्या पानामागं तयार केलेल्या दृष्टोत्पत्तीस येतात.


चेलपतंगांची आणखी एक जात आहे.त्यांची अर्भकं दगडांना किंवा काड्याकुड्यांना चिकटलेल्या रेशमी लांब नळीत राहतात.ट्राउट माशांची शिकार करण्यासाठी चेलपतंगाचं आमिष गळाला लावतात. पतंगांचे सारे अवतार माशांना खूप आवडतात.


जंगलांतून वाहणारे ओढे,तळी,सरोवराचा परिसर किंवा नद्या ही जलस्थानं चेलपतंगांची आवडती निवासस्थानं आहेत.

अशा सुंदर जलस्थानाभोवती पक्षिनिरीक्षण करीत असताना मी चेलपतंगाच्या अवताराचंही निरीक्षण करीत असे.त्यामुळं ही पाणस्थळं मला अतिशय जवळून पाहता आल्यानं जो आनंद मिळाला,तो,वेगळाच.अशा जलस्थलावर कित्येक वेळा पक्षिजीवनाचा अभाव असला,तरी तेथील वास्तव्य मला कधी कंटाळवाणं वाटलं नाही.


कीटकांचं निरीक्षण करण्याचा छंद मला जडल्याचं श्रेय शाळेमधील माझ्या एका मित्राला आणि रानोपाळ हिंडणाऱ्या लिंबामामाला द्यावं लागेल. आमच्या गल्लीत पांडुरंग सुपे नावाचा माझा मित्र राहात असे.एक-दोन वर्षांनी तो पुढल्या वर्गात होता. गणित विषयात तो हुशार होता.मला कधी त्यात अडचण आली,की मी त्याच्याकडं धाव घेत असे.माडीवर एका लहानशा खोलीत तो अभ्यास करायचा.घडवंचीवर फळचा टाकून त्यानं आपल्या अभ्यासाची बैठक तयार केली होती.तीवर बसून तो खिडकीजवळ अभ्यास करताना दिसे.खोलीवर लिंबाची गर्द सावली पडे.तिथून बाहेर पाहिलं,की जिकडेतिकडं कडुनिंबाची,तर कुठं चिंच-पिंपळांची, तर कुठं शेवग्या-हादग्याची झाडं डोकावताना दिसत.फुलपाखरं गोळा करण्याचा त्याला छंद होता.एका जाड पुठ्यावर पांढरा कागद चिकटवून त्यावर विविध रंगा-आकारांची फुलपाखरं व पतंग टाचणीनं टोचून ठेवलेले दिसत.ते त्याच्या अभ्यासाच्या खोलीचं आकर्षण होतं.


जवळच असलेल्या रानात कित्येक वेळा मी त्याच्याबरोबर फुलपाखरं व पतंग पकडण्यासाठी साहाय्य करायला जाई.

अशा वेळी सुपे त्यांच्याविषयी खूप माहिती सांगायचा.


घरच्या गरीब परिस्थितीमुळं पांडुरंग सुपेला मॅट्रिकच्या पुढं शिक्षण घेता आलं नाही.नाही तर तो एखादा चांगला कीटकशास्त्रज्ञ झाला असता.


श्रावण महिन्यात लिंबामामाबरोबर माळकरीण आत्याच्या शेताकडं जाताना वाटेत विस्तीर्ण असं माळरान लागतं.

तिथल्या पाउलवाटेनं जाताना मला नाना रंगांची फुलपाखरं उडताना दिसायची. गवतातून जाताना विविध प्रकारचे आणि रंगारूपांचे तुडतुडे टणाटण उड्या मारताना आढळून यायचे.त्यांना पकडण्याच्या नादात मी कुठच्या कुठं मागं राहायचा.लिंबामामा आपल्या शेरडांबरोबर दूरपर्यंत निघून गेलेला असायचा. दुपारी एखाद्या शेताच्या बांधावरील झाडाच्या सावलीत बसून मी आईनं बांधून दिलेली दशमी खायचा.दूर सुंदर डोळ्यांसारखी दिसणारी पाण्याची डबकी किंवा एखादं छोटं तळं असायचं. लिंबामामाची वामकुक्षी चाललेली असायची. पाण्यावर जाणाऱ्या शेरडांच्या मागोमाग मीही जायचा.जाताना एखाद्या डबक्यात मला मासोळ्यांसारखी दिसणारी बेडकांची इवलीशी अर्भकं दिसायची.पाण्याकाठी बसून मी त्यांच्याकडं पाहात राही.

पाण्यात अनेक प्रकारचे कीटक असत. त्यांना हातातील काडीनं मी डिवचून पाहायचा. सायंकाळी परत येताना झुडपावर अनेक प्रकारचे पतंग बसलेले दिसत.ते फारसे उडत नसत.हात लावायला गेलं की ते लगेच उडून दुसऱ्या झुडपावर बसत.जिकडे-तिकडं नाना रंगांची रानफुलं फुललेली असत.

त्या रानफुलांकडं पाहात पाहातच मी घरी परतायचा.

लिंबामामा फारसा बोलत नसे; 


परंतु त्याच्या अबोल सोबतीनं मला लहानपणी या माळरानातून मुक्तपणं भटकता आलं.तो एकच सावधगिरीची सूचना देई.कुठल्याही झुडपात हात घालू नकोस किंवा बिळात बोट घालू नकोस. कारण त्यात साप-किरडू दडून बसलेले असतात.


बालपणी माझ्या मनात असलेली कीटक जगाविषयीची जिज्ञासा मोठेपणी वनाधिकारी झाल्यावर जंगलातही पुरी करता आली.त्यांच्या अद्भुत जगाचा पाठपुरावा करता आला. जाणीवपूर्वक त्यांचं निरीक्षण करीत असताना कित्येक वेळा मी स्वतःला हरवून बसे.


पाखरमाया,मारुती चितमपल्ली, साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर


मालवण आणि वेंगुर्ला इकडील खाडीत नावेतून प्रवास करताना मी पक्षिनिरीक्षण तर करायचाच, परंतु कीटकांचं अद्भुत जगही पाहायला विसरायचा नाही.एकदा बाभूळबनातून हिंडत असताना, बाभळीच्या फांदीला लटकलेल्या हाताच्या करंगळीएवढ्या लांबीचं बंडल चालू लागल्याचं मी पाहिलं.तो चेलपतंगाच्या सुरवंटांनी काट्यांपासून बनविलेला कोष होता.अशा प्रकारची घरं बांधण्यात ते मोठे कुशल असतात.


सुरवंट आपलं झुलतं घर काट्यांनी बांधताना पाहणं मोठं मनोरंजक असतं.पहिल्यांदा सुरवंट आपल्याभोवती अत्यंत चिवट,नळीच्या आकाराचा कोष विणतो.जर आत काय चाललं आहे हे पाहायचे असेल तर कात्रीनं कोष कापावा लागतो. रंगगोपनामुळं वातावरणात छोट्या जीवाला कसं संरक्षण मिळतं,याचं हे उत्तम उदाहरण आहे. कोषाच्या भोवती बाभळीच्या काट्यांचं आवरण असतं.मी त्या सुरवंटाच्या कारागिरीचं निरीक्षण करीत होतो.सुरुवातीला सुरवंटानं कोषाचं टोक रेशमाच्या धाग्यानं फांदीला नीट बांधलं.नंतर काट्याभोवतालची बारीक पानं त्यानं कुरतडून टाकली,कोषासहित तो काट्याजवळ पोहोचला. तिथं त्यानं पुन्हा कोष नीट अडकवला.काटा तोंडानं कुरतडून त्याचा तुकडा केला.तो लगेच कोषाच्या प्रवेशद्वाराजवळ चिकटवला.पुन्हा तो आत गडप झाला.नंतर कोषात विलक्षण हालचाल होत असल्याचं बाहेरून दिसलं.अचानक तो कोषाच्या दुसऱ्या छिद्रातून डोकावला.तोडलेला काटा त्यानं तिथं नीट लावून घेतला.पुढच्या तीन जोडीच्या पायानं तो काटा इकडून तिकडं हलवीत होता. आतून विणीचं काम करून त्यानं काटा पक्का बसविला.नंतर छिद्र बंद केलं,

कीटकसृष्टीतील हा वास्तुशास्त्रज्ञच.प्रत्येक काट्याची लांबी मोजून घ्यावी.त्यातील लांबीत कुठंही फरक आढळून येणार नाही.


चेलपतंगाला सुरवंट-कोषातून काढून त्याला काचेच्या स्वच्छ पाण्याच्या भांड्यात ठेवलं,की लगेच तो स्वतःभोवती कोष विणतो.भांड्यात जी साधनसामग्री ठेवलेली असेल,तिच्या साहाय्यानं सुरवंट बाहेरून कोष सजवितो.त्यात चिरमिरीएवढे लहान शंख ठेवल्यास सुरवंट त्यांचा उपयोग करतो. तसेच रंगीबेरंगी काचेच्या मण्यांचे आणि शिपल्यांचे पांढरे तुकडे भांड्यात ठेवले,तर त्या साहित्याचा देखील तो कलात्मकरीत्या उपयोग करतो.योग्य वेळी कलात्मक सजावटीच्या व्यापाचा विसर पडून त्याला पंख फुटतात.लगेच तो हवेत उडून जातो. मुक्त जगात गेल्यावर त्याला आपल्या कोषाची आठवण तरी होत असेल काय ?


■■■ समाप्त..■■■