* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: बर्फाळ बेटावरचा संघर्ष Clash on the Ice Island

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

4/11/26

बर्फाळ बेटावरचा संघर्ष Clash on the Ice Island

चार संशोधकांची मदतनीस म्हणून उत्तर ध्रुवाजवळील निर्जन बेटावर गेलेल्या एका एस्किमो महिलेवर अखेरीस एकटीनेच जीव तगवण्याची वेळ येते.केवळ बफनि व्यापलेल्या त्या प्रदेशात तिचा कसा टिकाव लागतो त्याची गोष्ट.....!!


अ‍ॅडा ब्लॅकजॅक


१० सप्टेंबर १९२१ रोजी अलास्काच्या नोम शहरातून 'सिल्व्हर वेव्ह' नावाचं जहाज रंगल बेटाच्या दिशेने कूच करतं तेव्हा अ‍ॅडा ब्लॅकजॅकच्या मनात काहर माजलेलं असतं.

रँगलसारख्या उत्तर ध्रुवाजवळच्या निर्जन आणि बर्फाचं वाळवंट असणाऱ्या बेटावर वर्षभर मुक्काम ठोकण्याचा वेडेपणा आपण कसा काय करू शकतो हे तिला अजूनही कळत नसतं.अनाथाश्रमात वाढणाऱ्या आजारी मुलासाठी पैशांची गरज नसती तर तिने हे पाऊल कधीही उचललं नसतं. अ‍ॅडा एस्किमो असते;पण लहानपणी बहुतेक काळ मिशनरी शाळेत काढल्यामुळे बर्फाळ प्रदेशात टिकून राहण्याचं उपजत ज्ञान तिच्याकडे जवळपास नसतंच. इतर एस्किमो स्त्रियांप्रमाणे ती चांगली शिलाई करू शकत असते आणि मिशनरी शिक्षणामुळे तिला मोडकंतोडकं का होईना,इंग्रजी लिहिता-बोलता येत असतं एवढंच..


.. रँगल बेटाकडे निघालेल्या मोहिमेत तिचा समावेश होण्याचं कारण तेच असतं - इंग्रजीची तोंडओळख आणि शिंपिणीचं कसब.कॅनडाचा एक्सप्लोरर विल्हामुर स्टीफन्सन याने आखलेल्या या मोहिमेत चौघा साहसवीर संशोधकांनी भाग घेतलेला असतो.या मोहिमेचा प्रमुख असतो अ‍ॅलन क्रॉफर्ड हा २० वर्षांचा कॅनेडियन तरुण,त्याच्या सोबत लॉर्न नाइट (वय २८), फ्रेड मॉरर (वय २८) आणि मिल्टन गेल (वय १६) हे तिघं अमेरिकी या मोहिमेचा भाग असतात.रँगल आयलंडवर वर्षभर मुक्काम ठोकून तिथल्या परिस्थितीचा,दगड-मातीचा, प्राण्यांचा,

वनस्पतींचा, बदलत्या हवामानाचा अभ्यास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.शिवाय या बेटावर हक्क कुणाचा यासाठीही त्या काळी स्पर्धा सुरू असते.ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेल्या कॅनडामधील स्टीफन्सनला ब्रिटिशांसाठी या बेटावर हक्क प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा असते.


या निर्जन बेटापर्यंत पोहोचणं आणि पुढे तिथे राहणं सोपं नसतं.हे तरुण वर्षभर तिथे राहू शकले तर रँगल बेटावर हिवाळा काढणारे ते पहिले मानवप्राणी ठरणार असतात.


पण माणसांनी जगण्यासाठी पूर्ण प्रतिकूल अशा बेटावर राहायचं तर त्यांना एस्किमोंची मदत घेणं भाग असतं. शिकार करायला,

प्राण्यांचं मांस शिजवून स्वयंपाक करायला,जळणासाठी लाकडं फोडायला आणि मुख्य म्हणजे या प्राण्यांच्या कातड्याचे कपडे शिवायला एस्किमो कुटुंब सोबत असणं आवश्यक असतं.त्यानुसार स्टीफन्सनने आपल्या नोममधल्या एजंटांकरवी काही एस्किमोंशी बोलणी करून ठेवलेली असतात;पण प्रत्यक्षात जाण्याची वेळ जवळ येते तसे अ‍ॅडा सोडून सगळे एस्किमो या मोहिमेकडे पाठ फिरवतात.या बेटाची कीर्तीच तशी असते.एक तर हे बेट कुणालाही जवळ येऊ देत नाही आणि कुणी जवळ गेलंच तर त्याला पुन्हा परत सोडत नाही,असं एस्किमोंमध्येही बोललं जात असतं.ही मोहीम धोकादायक आहे आणि एकदा त्या बेटावर गेलं की माणूस जिवंत परतणार नाही,अशी भीती सरसकट सगळ्या एस्किमोंना वाटत असते.अ‍ॅडाच्या मनातही ती भीती असतेच.एकीकडे पैशाची आत्यंतिक गरज आणि दुसरीकडे मृत्यूच्या खाईत नेणारी मोहीम,अशा कात्रीत अ‍ॅडा

सापडलेली असते.आपण परत आलो नाही तर आपल्या मुलाचं पुढे काय होईल याची कल्पनाही तिला करवत नाही.दुसरीकडे,

मोहिमेला गेलो नाही तर जगण्यासाठी आणि मुलाला उपचार देण्यासाठी पैसे कुठून आणणार हा तिच्यापुढचा प्रश्न असतो.शेवटी मनावर दगड ठेवून अ‍ॅडा मोहिमेसाठी तयार होते.


सिल्व्हर वेव्ह जहाजावर या मोहिमेला लागणारी रसद भरली जाते.खाद्यपदार्थ,लिखाण आणि संशोधन साहित्य,हत्यारं, दारूगोळा,स्वयंपाकाची भांडी,शिया आणि ध्रुवीय कुत्री हे सगळं सामान आणि मोहिमेच्या सदस्यांना बेटावर सोडून जहाज पुन्हा नोमला परतणार असतं.एकदा का जहाज परत गेलं की पुन्हा मानवी वस्तीकडे परतण्याचं,एवढंच काय,तिकडे एखादा निरोप पाठवण्याचंही कोणतं साधन या मोहीमवीरांकडे असणार नसतं.एका अर्थाने ही हाराकिरीच. 


मोहिमेतल्या चौघा साहसवीरांनी ती स्वच्छेने पत्करलेली असते.अ‍ॅडासाठी मात्र ती नाइलाजाने स्वीकारलेली काळ्या पाण्याची शिक्षा असते.


१० सप्टेंबरला निघून सिल्व्हर वेव्ह जहाज १६ सप्टेंबरला रँगल बेटावर पोहोचतं.मोहीमवीर आणि जहाजावरचे खलाशी मिळून सामान बेटावर उतरवतात.


चौघंही आपापल्या घरी पाठवण्यासाठी शेवटची पत्रं लिहून जहाजाच्या कप्तानाकडे सोपवतात.आता जहाजाचा निरोप घेण्याची वेळ झालेली असते.चौघंही तरुण अतिशय आनंदात आणि रोमांचित अवस्थेत असतात.आपलं नाव इतिहासात कोरलं जाणार असल्याची जाणीव त्यांची छाती रुंद करत असते,तर इकडे अ‍ॅडा मात्र त्यांच्यापासून दूर धाय मोकलून रडत असते.आत्ताच्या आत्ता पळत जावं,जहाज थांबवावं नि या चौघांची माफी मागून नोमला परतावं,हा विचार तिच्या मनाचा ताबा घेऊ लागलेला असतो.आता आपला मुलगा पुन्हा कधीच दिसणार नाही,या जाणिवेने तिचं काळीज लक लक करत असतं.पण अचानक तिच्या मनात विचार येतो,'मीही निघून गेले तर या तरुण वेड्यांची काळजी कोण घेईल? त्यांचे कपडे कोण शिवेल? त्यांच्यासाठी जेवण कोण रांधेल? मला थांबायलाच हवं.' डोळ्यांतले अश्रू थोपवत अ‍ॅडा दूर होत जाणाऱ्या जहाजाकडे पाहत राहते.


जहाज गेल्यावर चौघंही झपाट्याने कामाला लागतात. राहण्यालायक आणि सामान ठेवण्यासाठी निवारे उभारणं हे त्यांचं पहिलं काम असतं.एक खोपटं राहण्यासाठी आणि एक सामान ठेवण्यासाठी.सलग १६ तास काम केल्यावर त्यांचे निवारे उभे राहतात.रँगल बेटाच्या या भागात नावालाही झाडं नसली तरी समुद्रातून वाहत आलेल्या लाकडांचा तिथे खच पडलेला असतो.

त्यांचा वापर करून घरं बांधली जातात.बर्फ पडायला सुरुवात झाली की बर्फाच्या भिंती उभारून घरं आणखी पक्की करण्याचा त्यांचा इरादा असतो.एस्किमो न मिळाल्याने सगळी कामं या चौघांनाच करावी लागतात.राहण्याची तात्पुरती व्यवस्था झाल्यावर लवकरच त्यांचा दिनक्रम ठरून जातो.


चौघंही तरुण रोज सकाळी उठून बेटाच्या अभ्यासाला बाहेर पडतात.जवळपासची टेकाडं पालथी घालायची, वनस्पतींचा अभ्यास करायचा,नमुने घ्यायचे,प्राण्यांची मोजदाद करायची आणि सँपल्स घेऊन दुपारपर्यंत कॅम्पकडे परतायचं,असा त्यांचा उद्योग ठरून जातो.कॅम्पवर आणखी कामं वाट बघत असतातच. सुरुवातीला उभे केलेले निवारे हे किमान गरजा भागवणारे असतात.त्यात सुधारणा,दुरुस्त्या,डागडुजी करण्याचं काम बराच काळ चालू राहतं.शिवाय ते करत असलेल्या अभ्यासाच्या,

आसपास दिसणाऱ्या परिसराच्या आणि रोज घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांच्या नोंदी आपापल्या वहीत करणं हे एक महत्त्वाचं काम असतं.अ‍ॅडापूर्णवेळ स्वयंपाकात तरी गुंतलेली असते किंवा काही ना काही शिवत तरी असते.


जसजसे दिवस जातात तसतशी रँगल बेटावरच्या या पाच रहिवाशांचीएकमेकांशी ओळख होत जाते. एकमेकांचे स्वभाव,त्यातल्या खाचाखोचा कळू लागतात.क्रॉफर्डला फालतू विनोद सांगायला आवडतात.नाइट चित्रविचित्र कविता रचत असतो.अ‍ॅडा नेहमी कोणत्या तरी प्रार्थना पुटपुटत असते आणि गेल कोणत्याही वेळी आपल्या वहीत किंवा टाइपरायटरावर काही तरी लिहित असतो.मॉररला शंभरशेसाठ औषधं घेण्याचा नाद असतो.डोकेदुखी, चक्कर,अपचन,बद्धकोष्ठ अशा कोणत्या ना कोणत्या तक्रारीवरची गोळी घेतल्याखेरीज त्याला झोप लागत नसते.


एकुणात त्यांचं छान चाललेलं असतं.स्वयंपाकघराच्या कोठीत भरपूर खाद्यपदार्थ असतात,शिवाय शिकार करण्यासाठी प्राणीही.ध्रुवीय अस्वलं,सील,कोल्हे, वॉलरस हे प्राणी आणि घुबड,सीगल,कावळे असे काही पक्षी या मंडळींना रोज दिसत असतात.जसा हिवाळा सुरू होईल तशी विशेषतःव्हाइट सील्सची संख्या वाढेल,असा ध्रुवीय प्रदेशाचा अनुभव असलेल्या नाइट आणि मॉरर यांचा होरा असतो.याचा अर्थ अन्न कमी पडण्याची शक्यता नाही.खरं तर चौघांपैकी कोणालाच बंदूक चालवण्याची किंवा शिकारीची फारशी माहिती नसते.पण शिकार करण्याखेरीज दुसरा इलाजही नसतो. त्यामुळे हळूहळू सगळेच हात साफ करून घेतात. पहिले काही दिवस नेम चुकतात,गडबड उडते;पण नंतर जमतं.बेटावर दाखल झाल्यानंतर आठ दिवसांत त्यांना अस्वलाची जंगी शिकार मिळते.एस्किमो अ‍ॅडासाठी शिकार नेहमीची असणार असा इतरांचा समज असतो; पण प्रत्यक्षात शिकार करणं तर दूरच,तिला बंदुकीच्या आवाजाचीही भीती वाटत असते.म्हणजे या कामी तिची काही मदत होणार नाही हे स्पष्ट होऊन जातं.


मृत्यू पाहिलेली माणसं,मृ त्यू च्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या,संकटांच्या वावटळीत तग धरून राहणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्यांना,गोरी कानेटकर,समकालीन प्रकाशन


ते दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच हिम पडायला सुरुवात होते.ते एवढं वाढतं की आठ दिवस सर्वांना घरातच अडकून पडावं लागतं.लागोपाठ त्यांच्यावर ध्रुवीय वादळाचं संकट येऊन आदळतं.दिवसेंदिवस पाचहीजण त्यांच्या छोट्या घरात अडकून पडतात.रँगल आयलंडने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केलेली असते.


या काळात पहिल्यांदा त्यांना अ‍ॅडाच्या वागण्यात काही तरी बदल जाणवू लागतो.आधी तो कळत-नकळत असतो.कधी ती आढ्याकडे बघत राहिलेली दिसते,तर कधी एकटीच मुसमुसत असल्याचं कुणाच्या तरी लक्षात येतं.पण नंतर मात्र त्याचं रूपांतर घळाघळा आणि कधी कधी धाय मोकलून रडण्यात होत जातं.


पुढे पुढे तर काम करत असताना पूर्ण वेळ ती रडतच असते.किंवा कधी काम सोडूनही.या तरुण मुलांना तिच्याबद्दल फारसं काही माहीत नसतं.तिचा घटस्फोट झालाय आणि मुलाच्या उपचारांसाठी तिला पैशांची गरज आहे, एवढंच त्यांना कळलेलं असतं.ती कशामुळे रडतेय, तिला काय होतंय हे विचारण्याचा ते प्रयत्न करत असतात;

पण बहुतेक वेळा त्याचा उपयोग होत नसतो.लवकरच आणखी एक गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ लागते.अ‍ॅडाच्या मनात क्रॉफर्डबद्दल एक हळवा कोपरा तयार झालाय.ती झपाट्याने त्याच्याकडे ओढली जातेय.तिच्या मनात क्रॉफर्डबद्दल आकर्षण निर्माण होणं साहजिक असतं.मॉरर हा त्यांच्यातला थोडा वडीलधारा आणि अलिप्त असतो.नाइट असतो बोलघेवडा,पण बराचसा आक्रमक.अ‍ॅडाला त्याची काहीशी भीतीच वाटत असते.

गेल तर अगदीच लहान मुलगा असतो.तरुण अ‍ॅडाला तो लहान भावासारखा वाटत असतो.त्यामुळे आपलं सारं लक्ष अ‍ॅडाने क्रॉफर्डवर केंद्रित केल्यास आश्चर्य नसतं.हे सगळं गमतीत चाललेलं असतं तर प्रश्न नाही;पण अ‍ॅडाने काम थांबवून रडत बसणं किंवा क्रॉफर्डसाठी झुरणं त्यांना परवडणारं नसतं.

रँगलसारख्या बेटावर तर ते जीवघेणंच ठरणार असतं.त्यामुळे तिला समजावण्याचे,धमकावण्याचे सगळे प्रयत्न ते करून पाहतात;पण व्यर्थ.


या कथेतील तीन भागापैकी पहिला भाग …।