* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: निंबोणीचं झाड करवंदी / Nimbus tree Karvandi

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

3/24/26

निंबोणीचं झाड करवंदी / Nimbus tree Karvandi

लहानपणी आम्ही भावंडे चांदण्या रात्री गच्चीत खेळत असू.आई एक अंगाई गीत गायची.ते मला अजून आठवते.


चांदोबा चांदोबा भागलास का ? 

लिंबोणीच्या झाडामागे लपलास का ? 

लिंबोणीचे झाड करवंदी, 

मामाचा वाडा चिरेबंदी.


कडूनिंबाचे झाड दिवसा फारसे आकर्षक दिसत नाही.

सायंकाळी त्याच्या सालीचा गर्द तांबूस रंग काळा दिसू लागतो आणि त्याची सुंदर हिरवी पानं निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर मोठी मनमोहक वाटतात.चांदण्या रात्री दिसणारे त्याचे राजन्वती रूप माझ्या मनातून इतकी वर्षं कधीच मावळलं नाही.


उत्तर भारतातील लोकगीतांतून निंबाचा वारंवार उल्लेख येतो.गावात प्रत्येक घरासमोर एखादं तरी निंबाचं झाड असतंच.ह्या वृक्षाच्या फांद्यांना झोका बांधून युवक-युवती एकत्रित येऊन गीत गात झोका घेत कालक्रमणा करतात.ही गीते बहुतेक शृंगारिक प्रेमाची असतात.


जुन्या काळी पायी मजल दरमजल करीत प्रवास करणारे पथिक प्रकृती चांगली राहावी म्हणून रात्री निंबवृक्षाखाली झोपत.निंबाच्या वृक्षाविषयी एक मजेदार गोष्ट सांगितली जाते.


दीर्घ काळ लांबच्या प्रवासाला निघालेला पती लवकर घरी यावा अशी पत्नीची इच्छा होती.तिनं वैद्याचा सल्ला घेतला.

वैद्यानं तिला सांगितलं की, तुझ्या पतीला सांग की,प्रवासात जाताना चिंचेच्या झाडाखाली झोपत जावं,आणि परतीच्या प्रवासात कडूनिंबाच्या झाडाखाली झोपावं.झालं,पती प्रवासाला निघाला.चिंचेच्या झाडाखाली झोपल्यानं माणसं आजारी पडतात.तो चिंचेच्या झाडाखाली झोपून लवकरच आजारी पडला.प्रकृती बरी नसल्यानं त्यानं पुढचा प्रवास रद्द केला.पत्नीच्या सल्ल्याप्रमाणं परतीच्या प्रवासात तो निंबाच्या झाडाखाली झोपायचा.घरी परत येईपर्यंत त्याची प्रकृती चांगली झाली.पती परत आलेला पाहून ती आनंदित झाली.


गावात घरोघरी आढळून येणारी निंबाची झाडं मुक्त प्रेमीजनांना कशी आवडणार ? हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीत त्याचं प्रतिबिंब पडलं आहे.ही आरोग्यनिधीची झाडं गावाबाहेर एकान्ती असती तर ! पण ती असतात एक तर घरापुढे,रहदारीच्या रस्त्याला किंवा मंदिराच्या समोर.तिन्ही ठिकाणी प्रेमिकांची कुचंबणा.हा कल्पवृक्ष गाथा सप्तशतीतील नायिकांना विष वृक्षासारखा कडू वाटतोय.


पाटलाच्या पोरावर भाळलेल्या एकीनं निरोप पाठवला,'

पाटलाच्या पोरा,तू बायकोच्या तंत्रानं वागतोस व तिला भितोस;तू कडुनिंबाच्या झाडावरील किड्यासारखा आहेस.तू कोणावरही कृपा करीत नाहीस.आम्हाला तुझं दर्शनही होत नाही.तरी गाव तुझ्यासाठी झुरत आहे.'



धन उत्तम व्यवहारानं मिळवायचे असते.दुष्टाच्या पैशाची कशी वाट लागते पहा.


'दुष्टांनी द्रव्य संपादन केलं तर ते त्याचं दान कुणाला करतात ? अर्थात हलकटांनाच.निंबाची फळं पिकली तरी ती कावळेच खाणार.'


ग्रंथपंडिताला ती जीवनाचं रहस्य सांगताना म्हणते, 'हे धार्मिक,तू दुःशिक्षित आहेस.तू निंबाच्या किड्यासारखा आहेस.काय व्हायचे असेल ते होऊ दे,नरकात जाऊ,पण दोघेही बरोबर जाऊ.'


उंच,विशाल वाढणाऱ्या निंबाची पानं सदा हिरवीगार असतात.पानं कात्रीदार असून घनदाट असतात.निंबाचं मूळ उत्पत्तिस्थान ब्रह्मदेशात असलं तरी अमरकोशासारख्या प्राचीन ग्रंथात त्याचा उल्लेख आला आहे.


पारिभद्रे निम्बतरुर् मन्दारः पारिजातकः


कडुनिंबाचे चार प्रकार आहेत पारिभद्र,निंबतरू, मन्दार व पारिजातक.निंबाला पांढऱ्या रंगाची, मधाचा वास असलेली बारीक फुलं एकदा मार्च-एप्रिल महिन्यात व दुसऱ्यांदा पावसाळ्यात येतात.पिकलेली फळं पिवळीधमक दिसतात.

या फळांना लिंबोणी म्हणतात.पिकलेली रसाळ फळं कावळ्यांना खूप आवडतात.इतरही पक्षी व मधमाश्या निंबांच्या झाडाकडे आकर्षिल्या जातात.


त्याच्या अनेक उपयोगांवरून वैद्य त्यास भूलोकातील कल्पतरू म्हणतात प्राचीन आर्यऋषिवर्यांनी त्याच्या अलौकिक गुणाचा शोध लावून त्यास मोठे श्रेष्ठपद दिले आहे.त्याच्या सेवनानं अनेक व्याधींचे निर्मूलन होते.या वृक्षाची नुसती पानेच खाऊन राहिलेले तेजःपुंज आणि शक्तिमान असे काही विरक्त कधी कधी नजरेस पडतात.

निंबाची छाया घनदाट व गार करवंदी असते.निंबाचा वृक्ष फार जुनाट झाला म्हणजे त्याच्या खोडास शुद्ध चंदनाचा सुवास येतो


हा एकदा तोडला तरी पुन्हा त्याची मुळे फुटून त्याचा काही वर्षांनी मोठा वृक्ष होतो.पिंपळ व निंब या दोहोंची फारच मैत्री आहे.जेथे जेथे.पिंपळाचा पार असतो तेथे तेथे बहुतकरून निंबही असतो.


वृक्षाच्छादित मार्ग बनविण्यासाठी निंबाइतके योग्य झाड नाही.उन्हाळ्यात जेव्हा सावलीची जरूरी असते त्या वेळी निंब आपल्या करवंदी सावलीनं व सभोवतालच्या निरामय वातावरणानं प्रवाशांना आनंद देतो.राईत त्याची वाढ उंच होत नाही.मात्र हमरस्त्यावर झार्ड नजीकनजीक असल्यानं तो

उंच वाढत असला तरी सरळ कधीच नसतो.त्याला जेथून खालच्या भागातून फांद्या फुटतात त्या मोठ्या रेखीव व शोभादायक असतात.


जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसारक केंद्र,सीताबाई,नागपूर


कावळ्यांना आश्रय देणाऱ्या वृक्षांना ऋग्वेदात काकाम्बीर म्हटलं आहे.निंबवृक्षाची गणना अशा झाडांतच करायला हवी.निंबाच्या झाडावर कावळ्यांची अनेक घरटी दरवर्षी दिसून येतात. वैशाख महिन्यात या वृक्षावर कावळ्यांनी घरटी करणं पुढे सुकाळ असल्याचं सुचविते.एरव्ही कावळ्याचा आवाज किती कर्कश ! पण ज्यांनी ह्या काकाम्बीरावरील घरट्यात बसलेल्या कावळीचा आवाज ऐकला असेल तो त्या आवाजानं विचलित झाल्याशिवाय राहणार नाही. केवढा अद्भुत स्वर तिच्या कंठातून स्रवतो.


या वृक्षाच्या बाबतीत एक चमत्कार कधी कधी आढळून येतो.त्याच्या मोठ्या आडव्या फांदीतून एकाएकी ताडीसारखा पांढरा द्रव वाहू लागतो.असं होणं लोक अशुभ मानतात.ते स्रवणं काही दिवसांनंतर आपोआपच थांबतं.


लिंबोणीतील बियांपासून तेल काढतात.ते 'मारगोसा' या नावानं ओळखलं जातं.त्याचा उपयोग जंतुनाशक द्रव्ये औषधे बनविण्याकरिता होतो.वातावरील रोगात त्याचे तेल मालीश करण्याकरिता उपयोगात आणतात.


निंबाचे लाकूड टणक व टिकावू असल्यानं जहाजबांधणीत त्याचा उपयोग होतो.त्याच्या लाकडापासून खेळणी,शेतीची अवजारे व बैलगाड्या तयार करतात.


■■■ समाप्त