* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

8/12/26

आदिम दुःखाचे मुक्तिस्थानक हॉस्पिटल — Hospital: A Sanctuary for the Suffering.

मानवी जीवनात कळत-नकळत प्रवेशणारी संस्था म्हणजे रुग्णालय-हॉस्पिटल ! आज घडीला अत्यंत वादग्रस्त, परंतु तितकीच गरजेची असणारी ही संस्था प्राचीन काळापासून दुःखमुक्तीचे एक केंद्र म्हणून कार्यरत आहे. जीवक व सुश्रुताच्या परंपरेतील अनेक डॉक्टर आजही त्याच निष्ठेने आपले सेवा कार्य करताहेत. त्यांना अनेक कुशल अकुशल तंत्रज्ञांची मदत होत आहे. परंतु अंतिमतः ही सारी माणसेच आहेत. गुण आणि दोष असणारी, स्वतःची सुख-दुःखे, व्यथा-वेदना असणारी.आपण या सर्वांकडे एका रुग्णाच्या किंवा ग्राहकाच्या नजरेने पाहतो.परंतु डॉ. रवींद्र श्रावस्ती हे हॉस्पिटलकडे दुःखमुक्तीचे जीवनदायी केंद्र म्हणून पाहतात. व्यथा-वेदना घेऊन येणारी व ती दूर करण्यासाठी अहोरात्र झटणारी माणसे नीटपणे समजून घेऊन, शब्दांतून मांडण्याचे गुंतागुंतीचे काम येथे लेखकाने ललित स्वरूपात केले आहे. या लेखनात बुद्धाचा दुःख स्वीकारण्याचा आणि त्यातून मुक्त होण्यासाठी झगडण्याचा विचार आहे आणि त्याला कारुण्याच्या भावनेची जोड आहे. म्हणून हे लेखन मेडिको व नॉनमेडिको वाचकांसाठी महत्त्वपूर्ण व अनुभवसंपन्न बनविणारे आहे.

१. रुग्णांचा कारखाना उर्फ मेल मेडिकल वार्ड

हा वार्ड सदा गजबजलेला. कितीही स्वच्छ केले तरी घाणेरडा होणारा. रोगगच्च वार्ड. रोगाचे प्रकार तर किती? प्रचंड ! मोजदादच करता येणार नाही.

वेदनांचे प्रकारही भरपूर आणि त्याची जातकुळीही भिन्नच. आकांत, आक्रोश यांचे प्रमाण तर अतिप्रचंड ! हृदय तर धसका घेईलच. चक्क सारे शरीर धसकटून जाईल, उचकटून जाईल असे टाहो इथल्या गजबजलेल्या वार्डमधून बाहेर पडत असतात. मृत्यूची जा ये इथे हमखास चालू असतेच. त्यापेक्षा जगण्याची जिवंत चिवट लढाई इथे चालू असते. या वार्डचे श्वास चोवीस तास, १२ महिने, वर्षोन् वर्षे चालूच आहेत. अनेकांचे श्वास इथे गेले, तितकेच आलेही! पण या वार्डाने मात्र श्वासणे सोडले नाही. या वार्डाला कुलूप घातलेय असेही कधी झाले नाही. एखाद्या दिवशी या वार्डमध्ये कुणीच माणूस आला नाही, असेही कधी झाले नाही.

तर असा हा मेल मेडिकल वार्ड उर्फ पुरुष वैद्यकीय कक्ष. आत प्रवेश केल्या केल्या दोन चार बेडवर नाकात नळी घातलेले चार दोन रुग्ण हमखास दिसतीलच. चिक्कार दारू पिऊन बेशुद्ध झालेले किंवा पिकावर फवारण्यासाठी वापरतात ते 'रोगार'सारखे पातळ विष प्यायलेले रुग्ण ह्या बेडवर न चुकता दिसतातच.

दोन्ही प्रकारचे रुग्ण मोठमोठ्याने ओरडत असतात, शिव्या देत असतात, दंगा दंगा करत असतात. एक ओरडला की लगेच दुसरा ओरडतो. दुसऱ्याने शिवी दिली की, पहिला तितक्याच तत्परतेने शिवी हासडतो. दोघांची जुगलबंदी चाललेली असते. गंभीर वातारवणात तेवढीच लोकांची मौजमजा. दारू प्यायलेला

शुद्धीवर येत असताना दंगा करत असतो तर दुसरा विष प्यायलेला विषावर उतारा म्हणून दिलेल्या अॅटोपिनच्या ओव्हर डोसमुळे असंबंध बडबड किंवा शिव्या देत असतो. काही असो त्या दोघांच्या जुगलबंदीमुळे मेल मेडिकलमधील गंभीर वातावरण मिस्किल झालेले असते.

त्यापुढील पाच-सहा बेड तर जवळजवळ राखीवच । दारूच्या दुष्परिणामामुळे झालेले आजार घेऊन वावरणारे लोक या बेडवर विसावलेले असतात. पिवळे जर्द डोळे तसेच पिवळे झालेले शरीर असे रुपडे असलेले, लिव्हर खराब झाल्यामुळे कावीळ झालेले लोक. तिथेच कुठेतरी अॅडमिट असतात. चेहरा सुजलेला, हात पाय सुजलेले, पोटात पाणी भरलेले असे रुग्ण मिळतातच. दारू पिऊन पिऊन लिव्हर जेव्हा दगडासारखे होते, तेव्हा असे पाणी शरीरभर पाझरत राहते. सरकारी 'उपसा जलसिंचन योजने' सारखे. कितीही पाणी काढले तरी फुटलेले नळ पाझरतात तसे यांचे 'असायटिस' नावाचे पाणी पोटातून झरतच असते.

सलाईनची जाडजुड सुई पोटाच्या त्वचा व स्नायूतून आरपार घुसविल्यावर पोटाच्या पोकळीत साचलेले पाणी (Ascites) सलाईनच्या नळीमधून वाहू लागते. ते काचेच्या बाटलीत साठविले जाते. दररोज ४-५ लोकांच्या पोटांमधून असे पाणी काढावेच लागते. वाईट गोष्ट अशी की, दुसऱ्या दिवशी पोट पुन्हा तसेच पाण्याने तुडुंब भरलेले असते. कोयना धरण भरल्यासारखे. मग पुन्हा उपसा करा. जणू उपसा जलसिंचन योजना.

कुणीतरी या लोकांच्या सुटलेल्या पोटाला बघून खवचटपणे म्हणते Ever pregnant never delivered!

एके दिवशी मी एका वयस्कर 'अल्कोहोलिक ड्रिंकर'च्या पोटातील पाणी काढत होतो - ड्रेन करत होतो. का कोण जाणे मला बोलण्याची उबळ आली. मी त्याला विचारले, 'काय मामा, पानी कंच्या नदीचं? क्रिश्नेचं की पंचगंगेचं?'

मला वाटलं आजोबा उसळेल. लाखोली वाहील. त्यानं तसंच इरसाल उत्तर दिलं, 'पानी कोयनेचं हाय! धरणाचं नव्हं. व्हात्या नदीचं. घे हात धुन ! घे चुळ भरून !'

—-----

—-----

मघाच्या ४-५ कॉटच्या जागेतच कुठेतरी कावीळ मेंदूत घुसल्यामुळे बेशुद्ध झालेले रुग्ण अॅडमिट केलेले असतात, यांची स्थिती मात्र भयानकच, अतिशय गंभीर, मृत्यूच्या पावलांनी गजबजलेली ही कॉट, नाकातून जठरात सोडलेली नळी. त्यातून येणारे रक्त नावाचे काळपट पाणी. लघवी मार्गात घातलेल्या नळीतून येणारा युरीनचा पिवळाजर्द स्राव, पोटात तुडुंब घुसलेले पाणी. ते बाहेर काढावे तर आणखी शुद्ध हरपणार किंवा माणूस दगावणार. लिव्हरच्या ठिकऱ्या झालेल्या आणि मेंदूच्या साऱ्या संवेदना बधीर झालेल्या. मध्येच आकडी येईल, झटके येतील, मध्येच आरडाओरड ऐकायला येईल. ब्लड, अॅल्बुमिन, डेक्स्ट्रोज, बी कॉम्प्लेक्स, लॅक्ट्युलोज कायबाय चालू असते. शून्य उपयोग आणि एक दिवस भयाण मृत्यू माणसाचे गाठोडे करतो. गाठोड्यात बांधलेल्या त्याची तरुण बायको हंबरडा फोडते -

धन्या आता तुला कुटं शोधू ?

पाखरा तुला कुटल्या घरट्यात बघू ?

कुटं हुडकू रे, धन्या ?

वाद्या, कुटं बघू तुला, कुटं शोधू ?

काठी म्हनत नव्हतास. लोकांड म्हणत नव्हतास दना दना पाटीवर हानत हुतास. आता त्या पोरक्या पाटीवर कोन काठी हानणार रे, वासरा! आता चिपाड तर हानायला ये रे, लेकरा...'

(वासरू, लेकरू ही सारी विशेषणं नवऱ्यासाठीच बरं)

आता थोडं पुढं गेल्यावर कोपऱ्यात ३-४ बेड आहेत. भिंतीवर कसलेसे डाग आहेत. तसे बेडवरसुद्धा काळे, लाल, पिवळे डाग आहेतच. दुर्गंधी तर इथे सदाचीच ठाण मांडून असते. पॅरालिसीस उर्फ अर्धांगवायू झालेले रुग्ण इथे ठेवलेले असतात. हात हालत नाही, पाय हालत नाही, शरीर हालत नाही, बोलता येत नाही किंवा चाचरत बोलता येते. थोडे शुद्धीवर किंवा पूर्ण बेशुद्ध, असे रुग्ण. या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यापूर्वी अकिवाट, नागरमनोळी इथे यांना दाखवून आणलेले असतेच. त्यावेळेस एखादा माणूस चालत असतो तो इथे येईपर्यंत निश्चल झालेला असतो. बोलता माणूस 'अबोल' झालेला असतो किंवा शुब्बीवर असलेला माणूस बेशुद्ध झालेला असतो !

अंगारा-भंडारा असले 'प्राचीन आर्ट' ही कपाळावर विलसत असतात. गंडेदोरे, भंडाऱ्याची पेटी असले 'प्राचीन फॅशनेबल' आयटम कडोसरीस किंवा हातापायात, गळ्यात गुंडाळून त्यांना आणलेले असते. एवढे करून फरक पडलाच तर पडला म्हणून इथे आधुनिक दवाखान्यात आणलेले असते.

पीजी डॉक्टर येतो. तपासतो आणि 'स्ट्रोक झालाय' म्हणून सांगतो. सी.टी. स्कॅन करायला लागेल म्हणून सांगून 'रेफरल चिट' देऊन निघून जातो. प्राथमिक तेवढे उपचार सुरू केले जातात.

गंमत म्हणा किंवा ट्रॅजेडी म्हणा आता पैसे संपलेले असतात. दुसऱ्या तिसऱ्या दिवसाची वाट पहात ते निश्चेष्ट शरीर पूर्ण निदानाची आणि योग्य ट्रिटमेंटची वाट पहात बसते. कधीतरी सी.टी. स्कॅन होतो. त्याचा रिपोर्ट यायला अर्धा एक दिवस जातो. रिपोर्ट येतो तोही भल्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी दुपारी. मेंदूत रक्तस्राव किंवा मेंदूला रक्त पुरवठा नाही असा रिपोर्ट. मग खरी ट्रिटमेंट सुरू होते. तोपर्यंत बराच जिवंत मेंदू मेलेला असतो. महत्त्वाचा काळ (Crucial period) वाया गेलेला असतो. वाचलेला मेंदू थोडा थोडा काम करू लागतो. किंवा तोही थकून भागून कधीतरी मरून जातो. नंतर माणूस मरतो.

ज्या समाजाचा मेंदूच हरवलाय,तिथे माणसाचा मेंदू पॅरालाईज होणारच.योग्य उपचाराविना सडून जाणारच !

—--

—--

आता वार्डच्या त्या कोपऱ्यात पहा. दिसले? खोकलणारे, धापणारे लोक. नाकात ऑक्सिजनची नळी आणि भात्यासारखी धपापणारी छाती. हिरवा पिवळा कफ उर्फ बडका किडनी ट्रे मध्ये किंवा भिंतीच्या फरशीवर फेकलेला. इथलीही दुर्गंधी नाकातले संवेदनेचे केस जाळणारी. नाकालासुद्धा स्नायू असतात ते इथे आल्यावर कळते. छातीचे स्नायू एवढे दमतात की शरीराला श्वास घेण्यासाठी इतर स्नायूंची मदत घ्यावीच लागते. पोटाचे, मानेचे पुढील स्नायू: एवढेच काय नाकपुड्यांचे स्नायूही त्यासाठी वापरावे लागतात. जणू कुणीतरी नाक आणि तोंड दाबलेय! कुठून हवा येणार? कुठून ऑक्सिजन मिळणार? अशी अवस्था,

तर असे हे पेशन्ट, ऑक्सिजनसाठी क्षणक्षण तडफडणारे. त्यांची अवस्था बघवत नाही; त्यांना त्यांचे हाल सोसता सोसवत नाहीत. बाहेर हवा आहे; ऑक्सिजन आहे. पण तो योग्य तेवढा फुफ्फुसात शिरत नाही. फुफ्फुसांचा दगड झालाय न्यूमोनिया झालाय किंवा फुफ्फुस नावाच्या हवेच्या पिशवीला कातरणारा टी.बी. झालाय. किंवा ह्याच हवेच्या पिशवीला दाबणारे 'प्लुरल इफ्युजन' नावाचे पाणी किंवा 'एम्पायमा' नावाचा पू फुफ्फुसाच्या बाहेरील आवरणात दाटलेला असतो. जीव गुदमरून टाकणारे हे आजार. ऑक्सिजन वेळेवर लावला नाही तर जिवंतपणी मरण म्हणजे काय ते तेच जाणोत ! तेच सहन करू शकतात. नुसता तडफडणारा जीव ! पाण्यावाचून माशासारखा, ऑक्सिजनवाचून माणसासारखा !

पेशन्टच्या डोक्याकडचा कॉटचा भाग. त्यावर ठेवलेली लोखंडी कमान -त्या कमानीवर पाठ व मान ठेवून ऑक्सिजनसाठी धडपडणे म्हणजे काय असते हे त्या मानेला आणि त्या माणसालाच ठाऊक !

……..

…….

आता वार्डच्या अगदी दुसऱ्या कोपऱ्यात बघा. खंगलेले, काळेनिळे झालेले, इजिप्तच्या ममीसारखे देह झालेले रुग्ण कॉटवर झोपवलेत. एड्सने घेरलंय त्यांना. मुख्यतः २० ते ३० वयोगटातले रुग्ण आहेत हे. क्वचित एखादा ६०-७० चा. हा तसा अस्पृश्य भाग. इथे तसे फारसे कुणी फिरकत नाही. फिरकलेच तर रुग्णाला स्पर्श करण्याचे टाळतात. स्पर्श केलाच तर ग्लोव्हज् घालून, मास्क वापरून. एखादा सन्माननीय अपवाद असतो, नाही असे नाही. बाकींच्या दृष्टिकोनातून ते अस्पृश्य - अस्पृश्यच ते !

कुणाला वारंवार संडास लागले आहे कित्येक महिने कित्येक वर्षांपासून. कुणाचा तापच हटत नाही. कुणाच्या पोटात, छातीत, मणक्यात, मेंदूत पाणी झालेय. कुणाला टी.बी. झालाय. कुणाचे शरीरच खंगतेय. नुसता हाडांचा सापळा. मांस खरडलेय हाडाना. असे दिसतात ममीफाईड बॉडी! नाना प्रकार.

यांच्या सेवेशी तसे फुटकळ नातेवाईक. चार हात लांब राहून बोलणारे.

मॅरिड रुग्णांची बायको मात्र सदोदित सेवेला हजर असणारी, 'माझ्या नवऱ्याला वाचवा' म्हणून अजिजणारी, धडपडणारी. हाताला ग्लोव्हज् वा तोंडाला मास्क असलं काही न वापरता सेवाशुश्रूषा करणारी. दुर्गंधाने माखलेल्या बेडखाली, बेडजवळ बसून राहणारी किंवा रात्री-बेरात्री जीव थकला की तिथेच घाणीत झोपणारी. तिच्यासाठी जीव हळहळतो !

आश्चर्याची बाब म्हणजे त्यातल्या बऱ्याच बायका एचआयव्ही निगेटीव्ह । त्यांच्या शरीरात एचआयव्हीचा व्हायरस नाही. नवऱ्याच्या मात्र शरीरात एचआयव्ही. त्याने मौजमजा केली, गुण उधळले म्हणून त्याला एचआयव्ही. हे कळूनही त्या बिचाऱ्या त्यांच्यासाठी राबतात. भारतीय नारी तुम्ही ग्रेट !

इथले एड्सग्रस्त जिणे आणि मृत्यू दोन्हीही अपमानास्पद, लाजीरवाणे, नो सिम्पथी अ‍ॅट ऑल.

…..

…..

आता इथून थोडे बाहेर या. वार्डच्या दरवाजा लगत काही बेड आहेत. पांढरे फटफटीत. नखांचे चमचे झालेले, केसही पांडुरके धुरकटलेले. मक्याच्या केसासारखे भुरके. क्वचित डोळ्याभोवती काळी वर्तुळे. हातांच्या पेरांच्या मागच्या बाजूस काळी मेहंदी लावल्यासारखे डाग नकल पिग्मेंटेशन. ओठांच्या कोपऱ्यात जखमा, जीभ टकली बाल्ड किंवा त्यावर जखमांचे भूखंड जिऑग्राफीकल टंग. पूर्ण निस्तेज माणसे. केविलवाणी. आता मरतील की मग मरतील अशी. चार दोन पावले टाकली तरी धापतात. मटकन खाली बसतात किंवा चक्कर येऊन कोसळतात. पूर्वीपेक्षा दुपटीने पांढरी फिक्क पांढरी फटक पडतात. पांढरी जीभआपसुक बाहेर येतेच. डोळेही पांढरे केलेले असतातच. पण्डुरोग तो हा.

कुणालाही कणव येईल अशी यांची अवस्था.

इथे दोन दृश्ये कायम दिसतात.

दृश्य एक. काळे लालभडक रक्त असलेल्या रक्ताच्या बाटल्या. ते काळे भडक रक्त शरीरात चढविले जातेय. कधी तरी रिअॅक्शन येऊन हुडहुडणारा, धडधडणारा रुग्ण. अंगभर गांध्या येऊन सुजलेला रुग्ण. क्वचित तडतडून मरतो अशी रुग्णांची पोट्रेटस् नेहमी इथे तयार होतात.

दृश्य दोन.

कधी कधी रक्त का कमी झाले कळत नाही. निदानच लागत नाही. मग छातीच्या हाडाच्या मगजामधून मगजमिश्रित रक्त किंवा खुब्याच्या हाडामधून हाडाचा एक टवका तपासणीसाठी काढला जातो. त्याला बोन मॅरो अ‍ॅस्पिरेशन किंवा बोन मॅरो बायॉप्सी असे म्हणतात.

ही तपासणी करताना त्या जागी भूल दिली जाते. तरीही रुग्णाचे हाल होतेच. रुग्ण अगदी गुरासारखा ओरडतो. बॉब ठोकतो. तडफडतो.

खरे तर बोन मॅरो नव्हें बोंब मारो अ‍ॅस्पिरेशन (बायॉप्सी) असेच म्हणायला हवे. वेदनादायकच हा प्रकार, परंतु निदान करण्यासाठी, पेशन्टचा जीव वाचविण्यासाठी हे करणे भागच असते. असो.

आता आणखी काही गोष्टी सांगायला हव्यातच. तर हे एवढेच आजार नाहीत इथे भेटणारे, आणखी भरपूर आहेत. मलेरिया, टायफॉईड, हगवणीचे प्रकार, काविळीचे आजार, तापाचे असंख्य प्रकार आजारः हृदय, मेंदू, पोट, मज्जारज्जू, त्वचा, सांधे, डोळे, नाक, कान, घसा, दात.... कशाकशाचे म्हणून सांगावे.

हे कमी म्हणून की काय आंतरग्रंथींचे आजार आणि हो राहिलेच. कॅन्सर ! विविध अवयवांचे कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर, तर यांचेही रुग्ण इथे अ‍ॅडमिट असतात. जिथे बेड मिळेल तिथे किंवा जमिनीवर गादी टाकून. त्यामुळे या आजारांचे रुग्ण इतस्ततः विखुरलेले असतात. यांचीही संख्या प्रचंड असते. फक्त ते विखुरलेले असतात एवढेच.

कॅन्सरचा आजार तसा जीवघेणाच. निदान होते तेच मुळी अगदी उशिराने. त्यानंतर त्यावरील उपचार म्हणजे रोग परवडला, असे म्हणण्याची पाळी. उपचार प्रचंड महागडे. शस्त्रक्रियेचे उपचार म्हणजे कॅन्सरग्रस्त अवयव कुरतडणे किंवा तो अवयवच काढणे. विरुपता, विद्रूपता ठरलेली.

पहा औषधोपचार म्हणजे केमोथेरपी शरीरातल्या कॅन्सरच्या पेशी औषधाने मारणे. वाळल्याबरोबर ओलेही जळते तसे कॅन्सरच्या पेशीबरोबर नॉर्मल पेशीही मारल्या जातात.

रेडोओथेरपी म्हणजे कॅन्सरग्रस्त अवयव जाळणे.

जीवन केविलवाणे! उपचाराने शरीराचे होरपळणे आणि मृत्यू वेदनादायक,

मृत्यू सहज, पुन्हा जिवंतपणा दुर्लभ !

कॅन्सरच्या मृत्यूचे एक बरे असते. लोक हळहळतात, फारच हळहळतात. सिम्पथी भरपूर, जीवन कृतार्थ वाटावे असा मृत्यू !

तर हा मेल मेडिकल वार्ड, इथे प्रत्येक भिंतीवर, कोपऱ्यात, दारात, वाराबाहेर, बसल्या ठिकाणी, झोपल्या ठिकाणी, खायच्या जागी पिचकाऱ्या दिसतील, पानाच्या, गुटख्याच्या. तंबाखूच्या.

अत्तराचे वास असतील तसेच दारूचे, माव्याचे भपकारेही असतील.

आजारांनी - आजाऱ्यांनी, माणसांनी गजबजलेला वार्ड. डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, वार्ड आया यांचा जीव जातो इथे सेवा देताना. जीव मेटाकुटीला येतो. पायाला चाके लावून फिरावे लागते वार्डभर. तरीही तक्रारी चालूच राहतात पेशन्टकडून, नातेवाईकांकडून. समाधानच होत नाही त्यांचे.

हलगर्जी करतात 

लक्ष देत नाहीत 

खिदळत असतात 

कुणाचा पायपोस कुणास नाही 

शिकावू डॉक्टरच बघतात

 त्यांना काय कळते? 

आमचा माणूस तुमच्या निष्काळजीपणामुळे गेला

 बघून घेतो. सोडतच नाही कुणाच्या बाला 

आमचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही.

…..

…..

असे शेरे. अशा धमक्या. नेहमीच ऐकायला मिळतात. अगदी वरपर्यंत तक्रार होते. पेपरमध्ये छापले जाते. विपर्यस्त बातम्या येतात. वातावरण ढवळून निघते. स्टाफमध्ये भीती. डॉक्टरांमध्ये दहशत. बरेचसे.

रुग्ण अ‍ॅडमिट होतच राहतात. तेच ते पुन्हा पुन्हा घडत राहते. इतिहास घडत राहतो. 'बि'घडत राहतो. रणांगण तेच. पात्रे बदलतात. गात्रे बदलतात.

पुन्हा तेच

पळापळ, गडबड गोंधळ

धुमश्चक्री.

धुमाकूळ.

---

आदिम दु:खाचे मुक्तिस्थानक हॉस्पिटल, डॉ. रवींद्र श्रावस्ती,नाग-नालंदा प्रकाशन,प्रकाशक-त्र्यंबकेश्वर मिरजकर.

नमस्कार वाचकांनो.

आपलं या पुस्तक प्रवासात स्वागत.वरील पुस्तक क्रमशः प्रकाशित करीत आहे.विजय गायकवाड.



8/10/26

सातेरी आई आणि वेताळ बाबा/Sateri Ai and Vetal Baba.

सातेरी आई डोलत होती वाऱ्यामंदी। 

आम्ही तिची पुरी केली नाकेबंदी। 

सातेरी आई न्हात होती पावसामंदी। 

आम्ही तिला राउळ बांधले चिरेबंदी ।। 

वेताळ बाबा शेकत होता उन्हामंदी। 

त्याला पार झाकुन टाकला सावलिमंदी। 

खुशिमंदी नाचत होता पावसामंदी। 

आम्ही त्याला गाडुन टाकला देवळामंदी।।

मी जिथे जन्मलो त्या पुण्यातल्या सर्वोच्च स्थानावर वेताळ बाबा आरूढ आहेत.त्यांच्या कृपाछत्राखाली, त्यांच्या टेकडीवर भटकत भटकत मी वाढलो.आमचा मूळ गाव आहे गोव्यात.तिथल्याही गावा-गावांत वेताळ बाबा राहतात,जवळपास सोबतीला असते सातेरी आई, दोघेही स्वयंभू,सातेरी वसतीला असते वारुळांत,तर वेताळबाबा एखाद्या सुळक्यासारख्या शिळेत.सातेरी धरणीमातेची योनी आहे तर वेताळ लिंग.निसर्गाच्या प्रसवशक्तीची प्रतीके,त्यांच्या संगमातून सारी जीवसृष्टी उद्भवली.सातेरी वेताळांनी नेहमीच मोकळ्यावर निसर्गाच्या सान्निध्यात खुलावे.त्यांची रावळे देवळे कधीच बांधू नयेत.खरे तर साऱ्याच जीवजातींनी खुलेपणे निसर्गातली आपापली भूमिका वठवत 'वसुधैव कुटुंबकम्' अशा भावनेने नांदावे.पण हळूहळू मानवाची आणि परिसराची नाळ तुटली आहे.त्याला सगळ्याभोवती काहीतरी कृत्रिम वेष्टन घालायची खोड पडली आहे.तेव्हा आता सातेरी वेताळांना तो मोकळ्यावर,डोंगरमाळांवर,वनकाननांत राहू देत नाही. खणाखणी,तोडफोड करत त्यांच्या अवतीभोवती दगड, विटा,चुना,सिमेंट,पोलादाचे इमले रचतो.हे सगळे साहित्य जुळवण्यासाठी आणखी नासधूस करतो. मूळच्या वारुळांना शिळांना पार गाडून टाकतो.

मनमोर

पण सतत बांधकामात गढूनही मानवाचे निसर्गप्रेम काही पूर्णपणे आटलेले नाही.लहानपणी मी वेताळाच्या डोंगरावर मनमुराद हिंडायचो,तेव्हा बरोबर असायचा माझा एक आणि आमच्या शेजाऱ्यांचे तीन,असे चार कुत्रे राजा,टिपू,गोट्या आणि पिंग्या.वेताळाच्या आसपास फारसे कोणी भेटायचे नाही.कारण डोंगराच्या अवती-भोवती सगळी शेती होती,आणि गवळ्यांची वस्ती.आमच्या घरासारखी अगदी मोजकी घरे.एखाद वेळी भटक्या जमातींतले दोन-चार शिकारी भेटायचे. म्हणायचे,तुझ्याकडे चार कुत्री आहेत.आम्हाला दे की त्यातली एक-दोन ! लहानपणापासून मला पक्षी बघायचा नाद होता.तेव्हा डोंगरावर भरपूर सातभाई, चंडोल,होले,लावे,तित्तर,खाटीक,ससाणे होते; पण ह्या शिकाऱ्यांच्या फेऱ्यांत मोर टिकणे शक्य नव्हते.नंतर चाळीस वर्षे पुण्याबाहेर काढून परतलो.आपसूकच माझी पावले वेताळाच्या डोंगराकडे वळली.वेताळाला आता देवळात झाकलेले पाहून जरा हळहळलो.पण अवती-भोवतीचे दृश्य पाहून माझ्या मनमोराचा पिसारा अक्षरशः फुलला,कारण आज इथे चिक्कार मोर बागडताहेत.मधे एक बातमी होती की ह्या परिसरात मोरांना पकडायचे सापळे नजरेस आले.सजग पक्षीमित्रांनी ते हुडकून हुडकून मोर वाचवले.जसजशी डोंगराभोवतीची वस्ती वाढली,जसजसे जास्तीत जास्त लोक टेकड्यांवर फिरायला लागले,तसतसे त्यांच्या जागरूकतेतून मोरांना संरक्षण मिळू लागले.वृक्षराजी पण फोफावली.ह्या टेकड्यांवर बांधकामे अजिबात नकोत म्हणून हे नागरिक लढताहेत.हा पुण्यातलाच नाही,तर जगभरचा अनुभव आहे.निसर्गाचे मनापासून रक्षण केले आहे लोकांनी - धनदांडग्यांशी आणि त्यांच्या गळ्यात गळे घालणाऱ्या सत्ताधीशांशी भांडत-भांडत. आपल्या भारतभूत जसे अनेक जागरूक निसर्गप्रेमी आहेत तसेच अमेरिकेतही.अशा एका तरुण निसर्गप्रेमीची लढत हेच आहे वारूळ पुराण या पुस्तकाचे सूत्र.

वारूळ पुराण

पर्यावरणाची,निसर्गाच्या सुरक्षेची वारूळ पुराणाच्या लेखकांना एड् विल्सनना मोठी कळकळ आहे. आधुनिक जगातल्या उलथापालथी निसर्गावर प्रचंड आघात करताहेत,हे त्यांना दिसते.तरीही एड् विल्सन हे ह्या उलाढाली घडविणाऱ्या आधुनिक अर्थ-शासनव्यवस्थेचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. 

'अँटहिल' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी ह्या द्वंद्वातून त्यांच्या मनात चालू असलेला जो 'आपुलाचि वाद आपणासी'आहे त्याचा मागोवा घेते.कथानायकाचे वंशद्वेषी अलाबामा राज्यातील बालपण,निसर्ग निरीक्षणाची आवड,महाविद्यालयातले कीटकांवरचे शास्त्रीय काम,सगळे जणू एड् विल्सनच्या आयुष्याचे प्रतिबिंब आहे.मग कादंबरीचा नायक रॅफ त्यांच्यासारखाच पदव्युत्तर शिक्षणासाठी हार्वर्डला येतो. तोही निसर्गसंरक्षण आणि 'दिल मांगे मोअर'वाली हव्यासवादी,चंगळवादी,आक्रमक अर्थव्यवस्था यांच्या संघर्षात बुडून जातो.फक्त एड् विल्सन हार्वर्डला येऊन एक ख्यातनाम जीवशास्त्रज्ञ बनतात,तर रॅफ विज्ञान बाजूला ठेवून वकील बनतो आणि एका मोठ्या बांधकाम व्यवसायात शिरून त्याच्या पुढचा तिढा सोडवतो.माझ्याही आयुष्यात असे बरेच काही घडले आहे.मला पण बालपणी निसर्ग निरीक्षणाची गोडी लागली,मीही पदव्युत्तर शिक्षणासाठी हार्वर्डला गेलो. त्या वेळी व्हिएटनामच्या युद्धाने अमेरिका ढवळून निघाली होती;हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांची युद्धविरोधी मोहीम जोरात होती.रॅफसारखा मीही अशा सगळ्या वादविवादांत रंगून गेलो.नंतर जन्मभर भारतात निसर्गरक्षण आणि आर्थिक विकास यांच्या संघर्षातून तोड कशी काढावी या समस्येशी झगडत राहिलो.म्हणून नंदा खरेंनी,'तू या अँटहिलच्या अनुवादाला दीर्घ प्रस्तावना लिही' म्हटल्यावर खूप खुललो.

इलियड

अँटहिल पुस्तकाची सुरुवात होते होमरच्या इलियडमधल्या एका अवतरणाने ! जन्मल्यापासून मरेपर्यंत एकमेकांना रक्तबंबाळ करत मानवाची यातनामय जीवनगाथा उलगडत राहावी ही तर ईश्वरेच्छा आहे.जीवन म्हणजे एक संघर्ष आहे,बळी तो कान पिळी हा तर जगाचा नैसर्गिक न्याय आहे,उत्क्रान्तीचा परिपाक आहे,अशी एक विचारधारा आहे.ह्याला म्हणतात सामाजिक डार्विनवाद.जगात आज अग्रगण्य समजले जाणारे उत्क्रान्तिशास्त्रज्ञ विल्सन ह्याच विचारधारेचे पुरस्कर्ते आहेत.कट्टर उजव्या पंथाच्या राजकीय नेत्यांशी त्यांची दोस्ती आहे.विल्सनच्या बुद्धीचा फेरा चौफेर चालतो.त्यांनी उत्क्रांतिशास्त्र,सामाजिक शास्त्रे आणि धर्म ह्यांच्या परस्परसंबंधांवरचे एक पुस्तक लिहिले आहे.पण त्या पुस्तकातल्या विवेचनातला धर्म म्हणजे केवळ येशू ख्रिस्ताचा धर्म.मी त्यांना म्हटले,अहो ह्यात तुम्ही मांडलेल्या अनेक संकल्पनांचा गौतम बुद्धाने खोलवर विचार केला आहे,त्यावर मांडणी केली आहे. तुम्हाला कशी कल्पना नाही? ते म्हणाले.खरे आहे मी धर्माबद्दल खूप लिहिले पण मला माझ्या ईसाई धर्माखेरीज कशाचीही जाण नाही. जीवनात जबरदस्त संघर्ष आहे तसाच सहकारही.आजपावतो उत्क्रांती शास्त्रातले बहुतांश प्रतिपादक एकांगी,रात्रंदिन जीवांना युद्धाचा प्रसंग,अशा संघर्षाच्या भूमीवर भर देऊन सहकाराकडे दुर्लक्ष होत आले आहे पण उत्क्रांती वादाच्या प्रमुख उद्गात्याचा चार्ल्स डार्विनचा दृष्टिकोन असा संकुचित नव्हता.त्याने जीवसृष्टीतला संघर्ष कसा उद्भवतो ह्याचे सुस्पष्ट निरुपण केले.पण ह्याबरोबरच डार्विनला जीवसृष्टीत सहकार्य आहे,परोपकारही आहे, आणि त्याचा मुलस्तोत्र काय आहे हे कोडे सोडवणे  अत्यावश्यक आहे हेही जाणवत होते.म्हणूनच तो आवर्जून म्हणतो की,मुंग्या,मधमाशांच्या संघातल्या श्रमिकांच्या परोपकारी जीवनशैलीचा उलडडा करणे हे उत्क्रांतीशास्त्रापुढचे एक महत्त्वाचे आव्हान आहे.

निसर्ग निवड

डार्विनने उत्क्रान्तीला दिशा देणाऱ्या,गती देणाऱ्या प्रक्रियेचा उलगडा करून दाखवला.ही आहे निसर्ग निवडीची - natural selection ची प्रक्रिया.ही प्रक्रिया कुठे कुठे अपेक्षित आहे ? जिथे जिथे पुनरुत्पादन असते व त्यातून ज्या नव्या आवृत्त्या,नकला,प्रती बनतात त्या बहुतांश मुळासारख्याच असल्या तरी अधूनमधून त्यांच्यात थोडे फार तरी बदल घडत असतात आणि मग अशा बदललेल्या प्रतींच्यात जी वेगळी गुणवैशिष्ट्ये निर्माण होतात,त्यांचा त्या प्रती तगण्यावर,फळण्यावर परिणाम होऊ शकतो,तिथे तिथे. थोडक्यात म्हणजे प्रजनन,आनुवंशिकता आणि अखंड वैविध्यनिर्मिती ह्यांच्या त्रिवेणी संगमातून निसर्गात अहोरात्र निवडीची प्रक्रिया चालू राहते,आणि त्या प्रक्रियेतून एक अफाट वैविध्याने नटलेली सृष्टी उभारली जाते.ही सृष्टी त्रिविध आहे : प्रथम अस्तित्वात आलेली जीवसृष्टी आणि तिच्या जोडीलाच क्रमाने अवतरलेली मानवनिर्मित कल्पसृष्टी व कृत्रिम वस्तुसृष्टी.सगळ्या कल्पसृष्टीच्या मुळाशी असलेल्या शब्दांचाच विचार करा.मुले आईच्या शब्दांच्या नकला करतात,त्यांना नवे आयुष्य देतात,वापरता वापरता शब्दांत बदल होत राहतात,आज चलती असलेले भारनियंत्रणासारखे शब्द फोफावतात,तर तोच अर्थ अधिक स्पष्ट करून सांगणारे वीजकपातीसारखे शब्द लयाला जातात. 

Satericha Wada Zala Chirebandi | Madhav Gadgil,सातेरीचा वाडा झाला चिरेबंदी। माधव गाडगीळ Varul Puran | E. O. Willson.Sankshipta Anuwad: Nanda Khare

वारूळ पुराण । ई. ओ. विल्सन

संक्षिप्त अनुवाद । नंदा खरे

प्रकाशक । अरविंद घनःश्याम पाटकर, 

जीवसृष्टीसारखी शब्दसृष्टीही सतत नवनवी रूपे घेत वाढत राहते.तसेच कृत्रिम वस्तूंचे.मोबाईल फोनांच्या प्रती सारख्या बनवल्या जातात,त्यांच्यात सारखे बदल होत राहतात,वस्तुसृष्टीही सतत नवनवी रूपे घेत वाढत राहते.जीवसृष्टी,कल्पसृष्टी आणि वस्तुसृष्टी ह्या त्रिविध सृष्टींचे वेगवेगळे आविष्कार आपले विश्व घडवत राहतात.अँटहिल कादंबरीत ह्या तीन विश्वांचा खेळ डोळ्यासमोर आणला आहे.

राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…!

8/8/26

वांब : एक गूढ प्रवासी मासा/Wamba: A mysterious migratory fish.

वांब (eel) हा माशाच्या जातीचा अतिशय गूढ प्राणी आहे.त्याची जीवनकथा इतर माशांप्रमाणे नसून,ती फार विलक्षण,विचित्र आणि अतर्क्यअशा गोष्टींनी भरलेली आहे.दिसायला सापासारख्या.बुळबुळीत अंगाच्या वांब माशाविषयीचं रहस्य अनेक शतकं शास्त्रज्ञांना उलगडत नव्हतं.अडीच हजार वर्षांपूर्वी वांब माशाविषयीची पहिली नोंद अ‍ॅरिस्टॉटलनं केली आहे. तो 'नॅचरल हिस्ट्री ऑफ अ‍ॅनिमल्स' या ग्रंथात वांबविषयी लिहितोः

'Among insects and fishes, some cases are found wholly devoid of the duality of sex. For instance, the eel is neither male or female, and can engender nothing. In fact, those who assert that eels are at times found with hair-like or worm-like progeny attached, make only random assertions from not having carefully noticed the locality of such attachments. For no eel nor animal of this kind is ever viviparous, unless previously oviparous; and no eel was ever yet seen with an egg... When people rest duality of sex in the eel on the assertion that the head of the male is bigger and longer, and the head of the female smaller and more snubbed, they are talking diversity of species for diversity of sex.'

(कीटक आणि माशांमध्ये,काही प्रकरणे लिंग द्वैतापासून पूर्णपणे विरहित आढळतात.उदाहरणार्थ,वाम मासा नर किंवा मादी नसतो आणि तो कशालाही जन्म देऊ शकत नाही.खरे तर,जे लोक असा दावा करतात की वाम माशांसोबत कधीकधी केसांसारखी किंवा किड्यांसारखी संतती आढळते,ते अशा संलग्नतेच्या जागेचे काळजीपूर्वक निरीक्षण न केल्यामुळे केवळ अंदाधुंद दावे करतात.कारण कोणताही वाम मासा किंवा या प्रकारचा प्राणी,पूर्वी अंडी घालणारा (ओव्हिपॅरस) असल्याशिवाय कधीही पिल्लांना जन्म देत नाही;आणि आजपर्यंत कोणत्याही वाम माशासोबत अंडे दिसलेले नाही... जेव्हा लोक वाम माशातील लिंग द्वैत या दाव्यावर आधारतात की नराचे डोके मोठे आणि लांब असते,आणि मादीचे डोके लहान आणि अधिक चपटे असते, तेव्हा ते प्रजातींच्या विविधतेबद्दल बोलत असतात,जी लैंगिक विविधतेसाठी वापरली जाते.)

अ‍ॅरिस्टॉटलचं वांब विषयीचं ज्ञान त्या काळात अपुरं होतं.सुमारे पन्नास वर्षापूर्वी वांबच्या विणीविषयीची माहिती प्राणिशास्त्रज्ञांना झाली.मधल्या काळात वांबविषयी प्रचंड अज्ञान होतं.इजिप्तमधील नाइल नदीच्या चिखलातून सूर्यप्रकाशाच्या प्रभावामुळं वांबचा जन्म होतो,असा समज पूर्वी दृढ होता.काहींचं म्हणणं होतं की,ते गांडुळासारखे एकमेकांना चिकटून असतात.वांब म्हातारा झाला की तो दुसऱ्या वांबांना जन्म देतो.तर काहींचा समज असा की,जसा मोत्याच्या शिंपल्यात पाण्याचा थेंब गेल्यावर त्याचा मोती होतो,तसाच दवाच्या थेंबापासून वांब जन्माला येतो.

वांब हजारो मैलांचा प्रवास करीत गोड्या पाण्यातून समुद्राकडं जातात,याची त्या काळात माहिती नव्हती.

सोळाव्या शतकातील स्वित्झर्लंडचा निसर्ग-अभ्यासू कॉनॅड गेन्सर लिहितो की,एका वर्षी अभूतपूर्व कडक हिवाळा पडला.वांब पाण्यातून बाहेर येऊन त्यांनी शेतातल्या गवताच्या गंजीचा उबेसाठी आसरा घेतला; परंतु हिमवर्षावामुळं ते मृत झाले.पाण्याबाहेर ते पाच-पाच दिवस जगू शकतात,असंही त्यांचं म्हणणं आहे.वांब अनेक प्रकारचे असतात हे त्या काळातही माहीत होतं.रुपेरी,हिरवे,काळे,तांबूस अशा नाना रंगांचे बांब दिसून येत.अ‍ॅरिस्टॉटलच्या काळात विलोच्या पानासारख्या दिसणाऱ्या माशाविषयी लोकांना माहिती होती. आर्थिकदृष्ट्या त्याचं काहीच महत्त्व नसल्यानं त्यांनी कधी अशा माशांकडं लक्ष दिलं नाही.इटलीचा निसर्गतज्ज्ञ स्कोपोली यानं इ.स. १७७७ मध्ये वर्गीकरण करताना त्यांचा पातळ डोकं असलेल्या मत्स्य वर्गात समावेश केला. इ.स. १८६१ साली जर्मन जीवशास्त्रज्ञ कॅरस यानं अनुमान केलं की,ही वांब माशाची डिंबावस्था (larval) आहे. देशोदेशी, वर्षानुवर्ष वांबविषयी जीवशास्त्रज्ञांनी संशोधन चालूच ठेवलं.

डच जीवशास्त्रज्ञ गेमझोई (Gemzoe) यानं वांबविषयीचं संशोधन सातत्यानं चालू ठेवलं.त्याला असं आढळून आलं,की वांबची वाढ प्रामुख्यानं उन्हाळ्यात होते.त्यांच्या वाढीची तुलना झाडाच्या वाढीशी करता येईल.झाडाच्या खोडास जशी आतून वर्तुळ असतात, तशी लंबवर्तुळाकार वर्तुळं वांबच्या शरीरात दिसून येतात.अशी वर्तुळं मोजून वांबची वयोमर्यादा काढता येते. त्यावरून असं आढळून आलं की,ज्या वेळी ते वांब सहा वर्षाचे होतात, त्या वेळी माद्यांची वाढ नरापेक्षा जलद गतीनं होते. गोड्या पाण्यात राहात असताना साडेसहा ते साडेआठाव्या वर्षी त्या वयात येतात. त्या वेळी माद्यांची लांबी १४ ते २६ इंच असते.नर मात्र साडेपाच ते साडेसहाव्या वर्षात वयात येतात. त्या वेळी त्यांची लांबी १२ ते २० इंच असते.काही वांब गोड्या पाण्यात अधिक काळ राहून मोठ्या आकाराचे होतात. अशा वांबांची आयुर्मर्यादा २० ते ३० वर्षं असू शकते.

या काळात वांब खूप खादाड असतात.गांडुळं,अळ्या, कुजलेले मासे,माशांची अंडी,जलचर पक्षी,पाणउंदीर, बेडूक आणि कालवे इत्यादींचा ते फडशा पाडतात. खायला पुष्कळ मिळेल अशा ठिकाणी दबा धरून राहतात.मोठमोठे वांब वाहत्या पाण्यावाटे तळ्यात प्रवेश करतात.तिथं रानबदकाच्या किंवा पाणकोंबडीच्या नुकत्याच अंड्यांबाहेर पडलेल्या पिलांवर ते ताव मारतात.कधी कधी ते सापाप्रमाणे भक्ष्याला विळखा घालून मारण्यास कमी करीत नाहीत.बगळे,क्रौंच वगैरे पक्ष्यानं त्याला टोकल्यास त्याच्या मानेभोवती वाबाचा विळखा पडून दोघंही मरून पडलेले अनेक वेळा पाहायला मिळतात.

वांब माशांना हवेच्या दाबात फरक पडलेला तेव्हाच समजून येतो,विजेच्या कडकडाटानं आणि ढगांच्या गर्जनांनी चिखलात दडून बसलेल्या वांबांना जाग येते. किनाऱ्यावरील कृमिकीटक,खेकडे बिळाबाहेर येणार, याची त्यांना जाणीव झाल्यावर ते हालचाल करू लागतात.वाढलेल्या वांबाचा जबडा व त्याचे अवयव प्रमाणाबाहेर विकसित झालेले दिसतात.त्यांची पाठ काळी,तर पोटाचा वर्ण पांढरा किंवा पिवळट असतो. परंतु बहुतेकांचा रंग पिवळटच असतो.म्हणून त्यांना पिवळे वांब असंही म्हणतात.या काळात ते स्थलांतर करीत नाहीत. नर-मादी दिसायला सारखीच असतात.

वांब जसजसे वयात येऊ लागतात.तसतसे ते वर्णानं काळे दिसू लागतात.पोट पांढरं आणि दोन्ही अंगांना ब्राँझ रंगाचे पट्टे असतात.डोकं गोलाकार बनतं, नाकाचा भाग टोकदार होतो.डोळे बटबटीत असून डोक्याच्या भागावर असतात.पोटाखालचे पर (fin) लांब,टोकदार आणि काळे दिसू लागतात.

या काळात त्याची पचनक्रिया मंदावते.लिंगाचा विकास होतो.अशा अवस्थेत त्यांना रुपेरी वांब म्हणून ओळखलं जातं.ते मिताहारी होतात.अंधाऱ्या रात्री त्यांचा समुद्राच्या दिशेनं प्रवास चालू होतो.

त्यांच्या मार्गावर लावलेल्या जाळ्यात आणि सापळ्यात ते अडकलेले आढळून येतात.जे समुद्राला जाऊन मिळाले,ते मात्र पुन्हा कधीही परत येत नाहीत.

परंतु रुपेरी वांबाचा समुद्रातील प्रवेश आणि त्याची दिसणारी पिलावळ यांमधील काळाचं गूढ काही उलगडता येत नव्हतं.या रहस्याचा शोध इ.स. १९०४ साली जोसेफ श्मिट या डच जीवशास्त्रज्ञानं घेतला. त्यानं समुद्र धुंडाळून या माशाविषयी खूप माहिती जमा केली.त्यानं सतरा वर्षं विस्तृत आणि सखोलपणे संशोधन करून या माशाचा जीवनक्रम निश्चित केला.

श्मिट याला असं आढळून आलं की,रुपेरी वांब बाल्टिकमधून स्थलांतर करताना सागर-किनाऱ्याला समांतर असा प्रवास एका विशिष्ट दिशेनं करतात.त्या मार्गावर जाळ्या लावल्याशिवाय वांब त्यात सापडत नसत.रुपेरी वांबांना ओळखणीसाठी चिन्हं करून समुद्रात सोडण्यात आलं.त्यावरून त्यांच्या प्रवासाची दिशा आणि वेग निश्चित करण्यात आला.हे सर्व वांब बाल्टिक समुद्रातून अटलांटिक महासागराकडं गेले,वांब व त्यांची अर्भकं यांच्या पद्धतशीर अभ्यासाला अशी सुरुवात झाली.श्मिट बोटीनं वेस्ट इंडीजकडे जाऊ लागला,तशी त्याला वांबाची लहान अर्भकं विपुल प्रमाणात आढळून येऊ लागली.

अ‍ॅटलांटिक महासागरात बर्म्युडा बेटाजवळ त्यांची उत्पती झाल्यावर ती अर्भकं सहाशे ते हजार फूट खोलीवर वावरू लागतात.सुमारे दोन हजार फॅदम (बारा हजार फूट) खोलीवर ते गेल्यावर त्यांचं संशोधन करणं अवघड असल्यामुळं वांब माशांची अंडी,अर्भकं आणि त्यांचे विविध अवतार यांविषयी शास्त्रज्ञांना काहीच माहिती मिळू शकली नाही. एकदा अंडी घातल्यावर वांबाचा मृत्यू होतो.

पावसाळ्यात त्यांची वीण होते.या काळात १५० ते २०० फॅदम खोलीवर अर्भकं वावरू लागतात.ती सूक्ष्म वनस्पतींवर उपजीविका करतात.वाढ वेगानं होऊन ती एक इंच लांबीची होतात.याच काळात ती पश्चिम 

अ‍ॅटलांटिककडं मोर्चा वळवितात.दुसऱ्या वर्षात ती दोन इंच लांबीची होतात.या काळात ती मध्य अ‍ॅटलांटिक पर्यंत पोहोचलेली असतात.तीन इंच लांबीची होतात. तेव्हा त्यांचं तिसरं वर्ष पूर्ण झालेलं असतं.त्या वेळी ती युरोपच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलेली असतात. पारदर्शक असलेली ही अर्भकं विलोच्या पानांसारखी दिसतात.हिवाळ्यात त्यांचं रूपांतर अंगठीच्या आकारात होतं.रक्त तांबडं दिसतं.त्यांचा अवतार (elvers) बदललेला असतो.या वेळी त्यांचा प्रवास वर वर नदीच्या दिशेनं सुरू होतो.ती आपल्या माता-पित्याचं अनुकरण करीत इच्छित स्थळी जातात.त्यांना चिलाण आवडते. तिथं ही अर्भकं छिद्रं,फटी, झाडाच्या मुळ्यांच्या जाळ्या यांत किंवा दगडाखाली लपून राहतात.पहिल्याच वर्षी गोड्या पाण्यात आढळून आलेले वांब चार इंच लांब, दुसऱ्या वर्षी साडेपाच इंच लांब,तरतिसऱ्या वर्षी सात इंच लांब झालेले दिसतात.याच काळात त्यांच्या शरीराच्या मध्यभागी खबले दिसू लागतात.

वांब माशाच्या शरीरात विजेच्या धक्क्यासारखा धक्का देण्याची शक्ती असते व ती तीनशे व्होल्ट इतकी असते. विद्युत्शक्तीनं भारलेल्या स्नायूंनी याचं शरीर व्यापलेलं असतं.याच्या डोक्याकडच्या बाजूकडील हातभर भाग सोडला,तर याचे लांबच्या लांब शेपूट ही एक बॅटरीच असते.विजेनं भारलेल्या स्नायूंचा संबंध नसांमार्फत मेंदूपर्यंत भिडलेला असतो.

सामान्यतःवांब माशांचे शेकडो प्रकार आहेत,परंतु त्यांतील मोरे (moray) व काँगर (conger) हे भयंकर शिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.जलाशयाच्या काठच्या बिळांतून आणि भेगांतून ते भक्ष्याचा मागोवा घेत असतात.त्याकरता त्यांच्या शरीराची सापासारखी असणारी रचना अनुकूल ठरते.अनवधानानं शत्रूनं वांबावर हल्ला केला,तर बिळाचा आश्रय घेतलेला वांब त्याच्यावर भयंकर आक्रमणाचा पवित्रा घेतो.त्यामुळेच वांब आणि साप सृष्टीत टिकून राहिले आहेत.

मोरे वांब हा ऑक्टोपसचा अट्टल शत्रू आहे.पाण्यातील बिळा-भेगांतून दडून बसलेल्या ऑक्टोपसवर वांब तुटून पडतो.त्याचे हात जबड्यात आवळून धरतो आणि स्वतःभोवती गरगर फिरवून हात पिरगाळून तोडून टाकतो.कित्येकदा मोर ऑक्टोपसच्या तावडीत सापडतो.ऑक्टोपस त्याच्या गळ्याभोवती आपले हात आवळतो;परंतु वांब आपल्या लांब शेपटीच्या फासानं त्याच्या तावडीत सापडलेल्या आपल्या तोंडाची सुटका करून घेतो.

अ‍ॅटलांटिक महासागरात जन्माला येऊन, हजारो मैलांवर जगाच्या पाठीवर सर्वत्र जाऊन तिथं गोड्या पाण्यात निसर्गाची हाक येईपर्यंत वांब कालक्रमणा करतात.पुन्हा निसर्गप्रेरणेनंच हजारो मैलांचा प्रवास करून जन्मभूमीकडं धाव घेतात,ते पुन्हा परतीच्या वाटेवर न येण्याकरिता !

जन्मापासून मृत्यूपर्यंतची वांब माशाची गूढ यात्रा पाहून साहजिकच मला त्या प्राण्याविषयी कुतूहल वाटलं, तेव्हा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी करू लागलो. याकरता दर वर्षी नियमितपणे कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील खाडी आणि खाजण भागात मी तिथल्या वाटाड्यांबरोबर भटकू लागलो.

शार्क माशाची शिकार करणारी केरळ प्रांतातील कोळ्यांची एक टोळी मालवणच्या समुद्रकिनारी मुक्कामाला होती.वांब माशाबद्दल त्यांच्याजवळ चौकशी केली,परंतु त्या संवादातून फारसं काही हाती आलं नाही.एके दिवशी मालवणच्या खाडीनजीकच्या खाजणातून भटकत असताना एक काळी-सावळी उंच व्यक्ती खाली वाकून जमिनीतील छिद्रांतून भराभर लांबसर जीव बाहेर काढताना दुर्बिणीतून दिसली. आम्ही त्याला गाठण्याचा प्रयत्न करू लागलो,तसा तो पुढं पुढं निघून जाऊ लागला.शेवटी त्याला हाका मारून थांबविलं.

तो गृहस्थ केरळच्या टोळीतलाच होता.नाव फर्नांडिस. त्याला मोडकंतोडकं हिंदी कळत होते.आम्ही काही वेळ त्याच्याबरोबर राहून तो काय पकडतो,हे पाहण्याची इच्छा दर्शविली.त्याची काही हरकत नव्हती.हलक्या पायांचा फर्नांडिस खाजणीतून अलगद चालायचा. खाली वाकून जमिनीत उभं बीळ दिसलं की त्यात आमिष बांधलेला गळ घालायचा.गळाला हातभर लांबीची नायलॉनची दोरी बांधलेली होती.बिळात गळ दोन-तीन वेळा गोल फिरविला की सावज त्याला लागे. तो गळ बाहेर काढताच त्याला हातभर लांबीची सापासारखी बेटोळी काया असलेला प्राणी अडकलेला दिसे.फर्नाडिस त्याला गळातून काढून खांद्याला अडकवलेल्या बांबूच्या उंच दुरडीत टाकायचा. त्याच्याजवळ चौकशी केली, तेव्हा त्या प्राण्याचं नाव त्यानं 'ईल' असं सांगितलं.

त्याचं अगदी जवळून निरीक्षण केलं असता,तो रंगानं हिरवा होता.आपल्या मजबूत अणकुचीदार शेपटीनं खाजणीच्या जमिनीत छिद्र पाडून हा वांब राहायचा. शार्क माशाचं आमिष म्हणून तो हे वांब गोळा करीत होता.या काळात वांबाविषयी जेवढं वाचायला मिळेल, तेवढं मी वाचत असे.

परंतु एकदा 'सायलंट स्प्रिंगं' ग्रंथाची लेखिका रॅचेल कर्सन हिनं लिहिलेल्या 'अण्डर द सी विंड' या पुस्तकातील 'ओडीसी ऑफ द ईल' ही निसर्गकथा वाचली.तिने कथेत वर्णन केलेले वांब माशाच्या विविध निवासस्थानांचे सूक्ष्मतर बारकावे आणि त्यांच्या गोड्या पाण्यापासून ते सागरकिनाऱ्यापर्यंतच्या प्रवासाचं केलेलं प्रत्ययकारी वर्णन वाचून मी थक्क झालो.

नंतर मी असे प्रवास करणारे वांब भंडारा-चंद्रपूरसारख्या तलावांच्या प्रदेशात आढळून येतात की काय म्हणून चौकशी करू लागलो,तर तिथल्या स्थानिक ढीवरांना, तसेच तळ्याकाठी राहणाऱ्या जाणत्या लोकांना त्यांची माहिती होती.ते ईलला 'तंबू मासा' म्हणून ओळखतात. ते भंडारा-चंद्रपूर जिल्ह्यांतील नद्यांतून आढळून येतात. क्वचितच तळयात दिसतात.कारण समुद्रापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास नदीपर्यंतच येऊन ठेपतो. नदीला किंवा तिला मिळणाऱ्या उपनद्यांना जर बांध घातले,तर तंबू माशांना बांध चढून तलावात प्रवेश करता येत नाही.धरणात पाणी अडविल्यामुळं नदीखालची पात्रं लवकर आटून जातात.त्यामुळं तंबू माशांची संख्या कमी कमी होत आहे.नदी ते समुद्र अशा परतीच्या प्रवासात बरेच बांब कामी येतात.समुद्र ते भंडारा-चंद्रपूर नदीतील प्रवासाचा क्रम त्यांना चिन्हांकित करून अभ्यासण्यासारखा आहे.अशा अ‌द्भुत माशांविषयी,ते खाण्यास योग्य आहेत,यापलीकडं सध्या तरी आपणास काहीच माहिती नसावी,याचं आश्चर्य वाटतं.

इटिया डोहाकाठी तिडके गावात राहणाऱ्या भिवा डीवराला नदीतील आणि तळ्यातील माशांविषयी खूप माहिती आहे.अहिर वांब, वांब, सर्प वांब आणि मोर वांब असे चार प्रकारचे बांब आढळून येत असल्याचं त्यानं सांगितलं.तंबू माशाची अंडी,पिलं त्यानं कधीच पाहिलेली नाहीत.ते बरोबर आहे.

परवाच्या भेटीत त्यानं तंबू माशाविषयी एक नवीनच माहिती सांगितली.तंबू मासा हातात धरला,तर बुळबुळीत अशा द्रव पदार्थानं तो माखलेला असतो. असा मासा हातात धरून,त्याच्या सर्वांगावर चण्याचं पीठ चोळून,काही वेळानं ते परत काढून घ्यावं.असं मिश्रण दम्याच्या विकारावर रामबाण औषध आहे,असं त्यानं सांगितलं.मात्र अशा उपयोगात आणलेल्या तंबू माशाची हत्या न करता त्याला परत नदीत सोडून द्यावं लागतं,हेही सांगायला तो विसरला नाही.

वांब माशाच्या जीवनवृत्तांताचं आकलन व्हावं,म्हणून समुद्रकिनाऱ्यावरील.खाड्या आणि खाजणे,तसेच नदी यांच्या काठाकाठानं माझा प्रवास वर्षानुवर्ष चालू आहे. घरी त्याच्याविषयीची पुस्तकं वाचण्यापेक्षा मला मासेमारी करणाऱ्या कोळ्यांबरोबर गप्पागोष्टी करायला आवडतात.भारतीयांना देखील वांबाविषयी प्राचीन काळापासून माहिती असल्याचं दिसून येतं. 'अमरकोश' आणि 'अभिधान चिंतामणि' कोशात माशाचे भेद सांगताना शकुल-वांबचा उल्लेख आला आहे.

रोहितो महुरः शालो राजीवः शकुलस् तिमिः ॥ (अमरकोश ११/२७३)

वांब माशाचे शकुल व कलक असे दोन प्रकार सांगितले आहेत.

शकुले स्यात् कलकोऽथ गडकः शकुलार्भकः ॥ (४.४.११)

परंतु सर्वाधिक महत्त्वाचा उल्लेख सम्राट अशोकाच्या पाचव्या स्तंभावरील शिलालेखात आला आहे :

'देवानं पिये पियदसि लाज हेवं अहा सडुवीसति वसअभिसितेन मे इमानि जातानि अवधियानि कटानि, से यथा-सुके, सालिका, अलुने, चक्रवाके, हंसे, नंदीमुखे, गेलाटे, जतुका अम्बा कपीलिका, दडी, अनठिकमछे, वेदवेयके, गंगापुपुटके, संकुजमछे, कफटसयके, पंनससे, सिमले सडके, ओकपिंडे, पलसते, सेतकपोते, गामकपोते सवे चतुपदे ये पटिभोगं नो एति न च खादियति ।...'

पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपुर.

अर्थ : देवांना प्रिय असा प्रियदर्शी राजा असं म्हणाला की, अभिषेक होऊन सव्वीस वर्षे झालेला मी पुढील प्राणी अवध्य (घोषित) केले आहेत ते पोपट,मैना, अरुण (Pinkheaded Duck) चक्रवाक, हंस, नंदीमुख (Comb Duck),गेलाट नावाची घूस,जतुका नावाचे छोटे वटवाघूळ, राणी मुगी, दुडी नावाची कासवाची मादी, हाडे नसलेला मासा, जीवंजीवक (Pheasant), गंगातीरावरील रानकोंबडा, शकुल मत्स्य (Eel), कमठ नावाचे कासव, साळू, पर्ण ससा, गवा, सांड (उंटीण), वानर, चितळ, पांढरे, कबूतर (Snow Pigeon), गाव कबूतर (Blue Rock Pigeon) आणि जे खाण्यात किंवा भोगण्यात येत नाहीत, असे सर्व चातुष्पाद.

बाराव्या शतकात राजा सोमेश्वरानं 'मानसोल्लास' या ग्रंथाची रचना केली आहे. मत्स्यविनोद या प्रकरणात बांब माशाचा उल्लेख करून म्हटलं आहे की, त्याची उत्पत्ती समुद्रात होते (४/१४/१३८५,८६).

समाप्त..

8/6/26

प्रवास अजूनही सुरू आहे.The journey is still on.

माझ्यानंतर काय उरेल?

"माणूस एक दिवस निघून जातो; पण त्याने पेरलेले विचार त्याच्यानंतरही चालत राहतात."

मी अनेकदा स्वतःला एक प्रश्न विचारतो—

माझ्यानंतर काय उरेल?

हे विचार मनात आले की, माझं लक्ष कधीच घराकडे, पैशाकडे किंवा मालमत्तेकडे जात नाही.

कारण या सगळ्या गोष्टी काळानुसार बदलतात.

पण काही गोष्टी अशा असतात, ज्या माणसानंतरही जिवंत राहतात.

त्या म्हणजे...

त्याचे विचार.

त्याची मूल्यं.

त्याने घडवलेली माणसं.


मी आयुष्यभर एकाच गोष्टीवर विश्वास ठेवला.

पुस्तकं माणूस घडवतात.

आज जर माझ्या लेखनातून एखादा तरुण पुस्तकांच्या प्रेमात पडला असेल...

एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी छोटंसं वाचनालय सुरू केलं असेल...

एखाद्या पालकाने मुलाला मोबाईलऐवजी पुस्तक भेट दिलं असेल...

तर मला वाटतं—

मी जगलो, त्याला अर्थ मिळाला.


माझी ओळख लेखक म्हणून राहिली नाही तरी चालेल.

माझे फोटो कुठे लावले नाहीत तरी चालेल.

माझ्या नावाने रस्ते किंवा सभागृह झाली नाहीत तरी चालेल.

पण...

एखाद्या घरात पुस्तकांचं कपाट उभं राहिलं...

एखाद्या मुलाच्या हातात पहिलं पुस्तक गेलं...

एखाद्या माणसाने पुन्हा वाचायला सुरुवात केली...

तर तोच माझा खरा स्मारक असेल.


मी नेहमी म्हणतो—

आपण झाड लावतो...

कारण त्याची सावली आपल्यासाठी नसते.

ती पुढच्या पिढीसाठी असते.

लेखनही तसंच असतं.

मी आज जे लिहितो आहे...

ते कदाचित माझ्यासाठी नाही.

ते अशा एखाद्या वाचकासाठी आहे...

जो मला कधी भेटणारही नाही.

पण माझ्या शब्दांत त्याला स्वतःचा मार्ग सापडेल.


मला मृत्यूची भीती नाही.

मला एकच भीती वाटते...

माझे विचार माझ्याबरोबरच संपले तर?

म्हणूनच मी लिहित राहतो.

प्रत्येक लेख...

प्रत्येक व्याख्यान...

प्रत्येक पुस्तक...

ही माझी काळाशी चाललेली संवादाची धडपड आहे.


आज मयान माझ्या मांडीवर खेळतो.

उद्या तो मोठा होईल.

त्याच्या हातात हे पुस्तक जाईल.

तो त्यातील प्रत्येक गोष्ट मान्य करेलच असं नाही.

पण...

जर त्याला या पुस्तकातून एक गोष्ट समजली—

"माझे बाबा आयुष्यभर शिकत राहिले."

तर मला वाटेल...

मी त्याच्यासाठी योग्य वारसा ठेवला.


मी रिकाम्या हाताने आलो.

रिकाम्या हातानेच जाणार आहे.

पण...

जाताना माझ्या हातात नसले तरी चालेल...

माझे विचार एखाद्याच्या हातात पुस्तकाच्या रूपाने असतील, एवढंच पुरेसं आहे.

मी जगाकडून काय शिकलो?

"माझे सर्वात मोठे शिक्षक शाळेत नव्हते; ते आयुष्यात भेटले."

आज मी जे काही आहे, ते फक्त पुस्तकांमुळे घडलं असं म्हणणं पूर्ण सत्य ठरणार नाही.

कारण पुस्तकांनी मला विचार दिले...

पण त्या विचारांना जगायला शिकवलं ते माणसांनी.

आयुष्य हेच माझं सर्वात मोठं विद्यापीठ ठरलं.

आणि या विद्यापीठात भेटलेला प्रत्येक माणूस माझा शिक्षक होता.


काही शिक्षकांनी मला वर्गात शिकवलं.

काही लेखकांनी पुस्तकांतून शिकवलं.

पण अनेकांनी मला एक शब्दही न बोलता शिकवलं.

एका आईने त्याग शिकवला.

एका वडिलांनी कष्ट शिकवले.

एका शेतकऱ्याने संयम शिकवला.

एका मजुराने श्रमाची प्रतिष्ठा शिकवली.

एका विद्यार्थ्याने जिज्ञासा शिकवली.

आणि एका लहान मुलाने निरागसपणा शिकवला.


माझ्या आयुष्यात अनेक श्रीमंत माणसं भेटली.

अनेक विद्वान भेटले.

अनेक प्रसिद्ध व्यक्तींनाही भेटण्याचा योग आला.

पण त्यांच्यापेक्षा मला जास्त शिकवून गेले ती साधी, सामान्य माणसं.

ज्यांचं नाव कुठल्याही वर्तमानपत्रात छापून येत नाही.

ज्यांच्या मुलाखती कुठल्याही वाहिनीवर दाखवल्या जात नाहीत.

पण जी आयुष्य रोज प्रामाणिकपणे जगतात.


मी एक गोष्ट अनुभवली आहे.

जी माणसं जास्त संघर्ष करतात...

ती जास्त नम्र असतात.

कारण त्यांना जीवनाची किंमत कळलेली असते.

त्यांना प्रत्येक घासामागचं श्रम माहीत असतात.

प्रत्येक अश्रूमागची वेदना माहीत असते.

आणि प्रत्येक हसण्यामागचा संघर्षही माहीत असतो.


माझ्या आयुष्यातील प्रत्येक अपयशाने मला थांबवलं नाही.

उलट...

त्याने मला स्वतःकडे पाहायला शिकवलं.

यश माणसाला टाळ्या देतं.

पण अपयश माणसाला आरसा दाखवतं.

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे धडे मला यशाने नाही...

अपयशाने दिले.


आज मी कोणालाही उपदेश करत नाही.

कारण मला माहीत आहे...

प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे.

प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे.

मी फक्त माझा प्रवास सांगतो.

त्यातून कोणाला काही घ्यायचं असेल...

तर ते त्यांनी घ्यावं.


आज मी मागे वळून पाहतो...

तेव्हा मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक माणूस आठवतो.

कोणीतरी हात दिला.

कोणीतरी शब्द दिले.

कोणीतरी संधी दिली.

कोणीतरी विश्वास दिला.

आणि काहींनी...

वेदना दिल्या.

पण आज त्या वेदनांबद्दलही माझ्या मनात राग नाही.

कारण...

त्यांनीही मला काहीतरी शिकवलं.


आयुष्याच्या या टप्प्यावर मी एका निष्कर्षापर्यंत आलो आहे.

माणूस किती मोठा झाला, यापेक्षा...

तो किती शिकत राहिला, हे अधिक महत्त्वाचं आहे.

आणि मी...

आजही शिकतो आहे.

प्रत्येक पुस्तकातून.

प्रत्येक भेटीतून.

प्रत्येक प्रवासातून.

आणि प्रत्येक दिवसातून.

अजून कितीतरी चालायचं आहे

"मी ध्येयापर्यंत पोहोचलो आहे, असं मला कधीच वाटलं नाही. प्रत्येक टप्प्यानंतर मला नवीन प्रवास दिसत गेला."

माझ्या आयुष्याकडे अनेकजण यशाची कहाणी म्हणून पाहतात.

कोणाला माझं पुस्तकप्रेम दिसतं.

कोणाला लेखनाचा प्रवास.

कोणाला व्याख्यानांचा.

तर कोणाला मयानचा जन्म झाल्यानंतर आयुष्यात आलेला आनंद.

पण...

मी स्वतःकडे तसं पाहत नाही.

मला माझं आयुष्य म्हणजे एखादा पर्वत सर केल्याचा प्रवास वाटत नाही.

उलट...

आजही मी पायथ्याशी उभा असलेला एक प्रवासी आहे.


लहानपणी मला वाटायचं...

शिक्षण पूर्ण झालं की शिकणं संपतं.

नोकरी मिळाली की संघर्ष संपतो.

घर झालं की काळजी संपते.

पुस्तक लिहिलं की स्वप्न पूर्ण होतं.

पण आयुष्याने प्रत्येक वेळी माझा हा समज चुकीचा ठरवला.

प्रत्येक ध्येय गाठल्यानंतर...

माझ्यासमोर एक नवीन ध्येय उभं राहिलं.

प्रत्येक उत्तरानंतर...

एक नवीन प्रश्न जन्माला आला.

आणि प्रत्येक प्रवासानंतर...

एक नवीन वाट मला खुणावत राहिली.


म्हणूनच आज मी स्वतःला यशस्वी म्हणण्याऐवजी...

प्रवासी म्हणणं अधिक पसंत करतो.

कारण प्रवासी थांबत नाही.

तो चालत राहतो.

पडतो.

उठतो.

शिकतो.

पुन्हा चालतो.


आज माझ्याकडे हजारो पुस्तकं आहेत.

पण अजून लाखो पुस्तकं वाचायची बाकी आहेत.

आज हजारो वाचक भेटले.

पण अजून कितीतरी माणसांपर्यंत पुस्तकांचा सुगंध पोहोचायचा आहे.

आज अनेक व्याख्यानं झाली.

पण अजून कितीतरी शाळांमध्ये...

कितीतरी गावांमध्ये...

कितीतरी मुलांच्या डोळ्यांत पुस्तकांविषयीची उत्सुकता जागवायची आहे.


माझ्या आयुष्याने मला एक सुंदर सत्य शिकवलं.

पूर्णविराम हा शेवट नसतो.

तो अनेकदा नव्या परिच्छेदाची सुरुवात असतो.

म्हणूनच...

या पुस्तकाचा शेवट जरी जवळ येत असला...

तरी माझ्या प्रवासाचा शेवट अजून खूप दूर आहे.


आज माझ्या हातात लेखणी आहे.

डोळ्यांसमोर पुस्तकं आहेत.

आजूबाजूला माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत.

आणि मनात अजूनही शिकण्याची भूक जिवंत आहे.

यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं असू शकतं?


मी आजही सकाळी जागा होतो...

तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारतो—

"आज कालपेक्षा चांगला माणूस होण्यासाठी मी काय करणार?"

हा प्रश्नच माझ्या आयुष्याचा मार्गदर्शक आहे.

माझ्या वाचकांना एक पत्र

प्रिय वाचक,

तुमच्या हातात हे पुस्तक आलं आहे, याचा अर्थ आपल्या दोघांच्या आयुष्यात एक सुंदर भेट घडली आहे.

मी तुम्हाला ओळखत नाही.

तुमचं वय काय आहे...

तुम्ही विद्यार्थी आहात की शिक्षक...

शेतकरी, कामगार, गृहिणी, अधिकारी की पुस्तकप्रेमी...

हे मला माहीत नाही.

पण एक गोष्ट मला नक्की माहीत आहे.

आपल्याला जोडणारा एक धागा आहे—पुस्तकांचा.


हे पुस्तक लिहिताना माझा एकही दिवस असा गेला नाही की, मी स्वतःला लेखक समजलो.

मी फक्त माझं आयुष्य तुमच्यासमोर प्रामाणिकपणे ठेवलं.

माझे संघर्ष लपवले नाहीत.

माझे अश्रू लपवले नाहीत.

माझ्या चुका लपवल्या नाहीत.

कारण मला वाटतं...

जगाला परिपूर्ण माणसं नको आहेत.

जगाला प्रामाणिक माणसं हवी आहेत.


या पुस्तकातून तुम्ही माझं कौतुक करावं, अशी माझी अपेक्षा नाही.

माझं आयुष्य आदर्श आहे, असंही मला वाटत नाही.

माझी एकच इच्छा आहे—

या पुस्तकातील एखादं वाक्य...

एखादा प्रसंग...

एखादा विचार...

तुमच्या आयुष्यातील एखाद्या वळणावर तुमच्या सोबत उभा राहिला, तर मला वाटेल की माझी लेखणी सार्थकी लागली.


तुम्ही हे पुस्तक वाचून पूर्ण कराल.

पुस्तक बंद कराल.

आणि पुन्हा आपल्या आयुष्यात रमून जाल.

पण...

एक विनंती आहे.

हे पुस्तक कपाटात ठेवण्याआधी...

एक नवीन पुस्तक हातात घ्या.

कारण...

या पुस्तकाचं खरं यश माझ्या विक्रीत नाही.

ते तुमच्या पुढच्या वाचनात आहे.


जर तुमच्या घरी पुस्तकांचं कपाट नसेल...

तर एक छोटा कोपरा पुस्तकांसाठी ठेवा.

जर तुमच्याकडे मुलं असतील...

तर त्यांना पुस्तक भेट द्या.

जर मित्र असतील...

तर त्यांच्याशी पुस्तकांवर बोला.

जर शिक्षक असाल...

तर विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर वाचनाची भेट द्या.

आणि जर तुम्ही स्वतः अजून वाचायला सुरुवात केली नसेल...

तर आजच करा.

कारण...

पुस्तकं आयुष्य बदलतात.

मी त्याचा जिवंत पुरावा आहे.


माझ्या आयुष्यात भेटलेल्या प्रत्येक माणसाने मला काहीतरी दिलं.

आता मला वाटतं...

या पुस्तकाच्या माध्यमातून मीही समाजाला काहीतरी परत द्यावं.

हा माझा छोटासा प्रयत्न आहे.


शेवटी...

जर कधीतरी आयुष्यात आपल्या भेटीचा योग आला...

तर माझ्याकडून स्वाक्षरी घेण्यापेक्षा...

मला एवढंच सांगा—

"तुमच्यामुळे मी पुन्हा वाचायला सुरुवात केली."

माझ्यासाठी त्यापेक्षा मोठा सन्मान दुसरा असू शकत नाही.


मी निरोप घेत नाही.

कारण...

पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या माणसांची भेट कधीच संपत नाही.

आज हे पुस्तक संपेल.

उद्या एखाद्या दुसऱ्या पुस्तकात आपण पुन्हा भेटू.

तोपर्यंत...

वाचत राहा.

विचार करत राहा.

माणूस म्हणून वाढत राहा.

शेवटचं पान... की नव्या प्रवासाची सुरुवात?

"प्रत्येक पुस्तक संपतं; पण प्रत्येक चांगलं पुस्तक वाचकाच्या आयुष्यातून पुढे जगत राहतं."

आज या पुस्तकाचं शेवटचं पान लिहिताना माझ्या मनात अनेक भावना एकाच वेळी दाटून आल्या आहेत.

या पानापर्यंत पोहोचण्यासाठी मला किती वर्षांचा प्रवास करावा लागला, याचा हिशेब आता मी ठेवत नाही.

कारण हे पुस्तक एका दिवसात लिहिलं गेलेलं नाही.

हे पुस्तक माझ्या आयुष्याने लिहिलं आहे.

माझ्या प्रत्येक संघर्षाने एक परिच्छेद लिहिला.

प्रत्येक अपयशाने एक धडा लिहिला.

प्रत्येक पुस्तकाने एक विचार दिला.

आणि प्रत्येक माणसाने या पुस्तकात स्वतःचं एक पान जोडून ठेवलं.


आज मी मागे वळून पाहतो...

तेव्हा मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक चेहरा दिसतो.

माझे आई-वडील...

मेघा...

मयान...

माझे शिक्षक...

माझे मित्र...

माझ्यावर विश्वास ठेवणारी माणसं...

माझे वाचक...

आणि माझ्या हातात पुस्तक ठेवणारे असंख्य लेखक.

या सगळ्यांशिवाय हे पुस्तक लिहिणं शक्यच नव्हतं.


मी आयुष्यभर एक गोष्ट जपली.

मी पुस्तकं कधी विकत घेतली नाहीत...

मी माझं आयुष्य विकत घेतलं.

कारण प्रत्येक पुस्तकाने मला माझ्यातला एक नवीन माणूस दाखवला.

आज मी जसा आहे...

तो पुस्तकांशिवाय कधीच घडला नसता.


जर या पुस्तकातून तुम्ही माझ्याबद्दल काही जाणून घेतलं असेल...

तर मला आनंद आहे.

पण...

जर या पुस्तकामुळे तुम्ही स्वतःबद्दल विचार करायला सुरुवात केली असेल...

तर माझं लेखन सार्थक झालं आहे.


माझ्या आयुष्याचा निष्कर्ष फार मोठा नाही.

तो फक्त एवढाच आहे—

माणूस मोठा होण्यात अर्थ नाही.

माणूस चांगला होण्यात अर्थ आहे.

ज्ञान मिळवण्यात अर्थ नाही.

ज्ञान वाटण्यात अर्थ आहे.

पुस्तकं जमवण्यात अर्थ नाही.

पुस्तकं जगण्यात अर्थ आहे.


आज मी हे पुस्तक पूर्ण करतो आहे.

पण माझी लेखणी थांबणार नाही.

माझं वाचन थांबणार नाही.

माझे प्रश्न थांबणार नाहीत.

आणि...

माझा प्रवासही थांबणार नाही.

कारण...

जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत शिकणं आहे.


मी जाताना माझ्यासोबत काहीच घेऊन जाणार नाही.

पण जर माझ्या शब्दांनी...

एका मुलाच्या हातात पुस्तक दिलं...

एका तरुणाला विचार दिला...

एका कुटुंबात वाचनाची परंपरा सुरू केली...

तर मी या पृथ्वीवर येण्याचं ऋण थोडंफार फेडलं, असं मला वाटेल.


आज मी हे पुस्तक पूर्ण करत नाही.

मी ते तुमच्या हातात सोपवत आहे.

आता ते माझं राहिलेलं नाही.

ते तुमचं आहे.

तुमच्या विचारांचं आहे.

तुमच्या प्रवासाचं आहे.


आणि शेवटी...

माझ्या आयुष्याचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर मी एवढंच म्हणेन—

"शाळेने मला अक्षरं दिली.
पुस्तकांनी मला विचार दिले.
माणसांनी मला जगायला शिकवलं.
आणि या तिन्हींच्या संगतीत मला माझं आयुष्य सापडलं."


समारोप

"माझ्या हातात नेहमी पुस्तक असू दे.
माझ्या मनात नेहमी प्रश्न असू दे.
माझ्या शब्दांत नेहमी माणुसकी असू दे.
आणि माझ्या प्रवासाला कधीच पूर्णविराम लागू नये."

– विजय गायकवाड


समाप्त...?

नाही.

प्रवास अजूनही सुरू आहे...

8/4/26

शब्दांचा प्रवास / The Journey of Words.

प्रस्तावना

काही प्रवास पावलांनी मोजले जातात, काही मैलांनी. पण काही प्रवास असे असतात की ते शब्दांनी घडतात.

माझ्या आयुष्यातील पहिला मोठा प्रवास पुस्तकांपर्यंत पोहोचण्याचा होता. त्या प्रवासाने मला विचार दिले, प्रश्न दिले आणि स्वतःकडे नव्याने पाहण्याची दृष्टी दिली. पण एक दिवस मला जाणवलं—विचार केवळ स्वतःपुरते जपण्यासाठी नसतात; ते वाटले की अधिक समृद्ध होतात.

मी कधी लेखक होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. व्यासपीठावर उभं राहून बोलण्याचीही कल्पना केली नव्हती. एका सामान्य फौंड्री कामगाराचं आयुष्य पुस्तकांच्या सहवासात शांतपणे पुढे जात होतं. पण पुस्तकांनी माझ्या हातात दिलेले शब्द हळूहळू माझ्या आयुष्याचा मार्ग बनू लागले.

लेखन सुरू झालं.

व्याख्यानं सुरू झाली.

नवीन माणसं भेटू लागली.

वाचक जोडले गेले.

आणि मला समजू लागलं की, शब्दांची खरी ताकद टाळ्यांमध्ये नसते; ती एखाद्या माणसाच्या मनात निर्माण झालेल्या एका नव्या विचारात असते.

या भागात माझ्या प्रसिद्धीची कथा नाही.

ही आहे शब्दांमुळे जुळलेल्या नात्यांची कथा.

एका ब्लॉगची कथा.

पहिल्या व्याख्यानाची कथा.

वाचकांनी दिलेल्या प्रेमाची कथा.

आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे—पुस्तकांनी एका सामान्य माणसाला इतर माणसांपर्यंत पोहोचवलेल्या प्रवासाची कथा.

आजही माझा विश्वास पूर्वीइतकाच दृढ आहे—

शब्द माणसाला मोठं करत नाहीत; ते माणसाला अधिक माणूस बनवतात.


"मॅट्रिक फेल" विजय : पुस्तकांच्या विश्वात.”

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक दिवस येतो, जेव्हा त्याचा संघर्ष पहिल्यांदा समाजाच्या नजरेस पडतो. त्या दिवशी मिळणारा सन्मान हा व्यक्तीचा नसतो; तो त्याच्या प्रवासाचा असतो. अनेक वर्षे शांतपणे चाललेल्या वाटेला त्या दिवशी शब्द मिळतात आणि त्या शब्दांतून अनेकांना स्वतःचा चेहरा दिसू लागतो.

माझ्या आयुष्यात असा दिवस २१ जानेवारी २०२४ रोजी आला.

त्या दिवसामागे दोन माणसं शांतपणे उभी होती—डॉ. दीपक शेटे आणि भरत बुटाले.

डॉ. दीपक शेटे यांनी माझी ओळख लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक भरत बुटाले यांच्याशी करून दिली. त्यांनी मला लोकमतच्या कार्यालयात बोलावलं. मी तेव्हा स्वतःला कोणताही विशेष माणूस समजत नव्हतो. मी फक्त फौंड्रीत काम करणारा, पुस्तकांवर प्रेम करणारा एक सामान्य वाचक होतो.

बुटाले सरांनी माझ्याशी संवाद सुरू केला. त्यांनी माझ्या नोकरीबद्दल विचारलं. पुस्तकांबद्दल विचारलं. पहाटे चार वाजता उठण्याच्या सवयीबद्दल विचारलं. माझ्या संघर्षाबद्दल विचारलं. त्या संवादात मी कोणताही अभिनय केला नाही. माझं आयुष्य जसं होतं, तसं त्यांच्या समोर मांडलं.

काही दिवसांनी रविवारच्या लोकमतमध्ये माझ्यावर मोठा लेख प्रसिद्ध झाला.

शीर्षक होतं—

"मॅट्रिक फेल" विजय : पुस्तकांच्या विश्वात

हे शीर्षक पाहताच माझे डोळे पाणावले.

एकेकाळी "मॅट्रिक फेल" हा शब्द माझ्या मनात वेदना निर्माण करायचा. समाजाच्या नजरेत तो अपयशाचा शिक्का होता. पण त्या दिवशी त्याच शब्दांच्या पुढे "पुस्तकांच्या विश्वात" हे शब्द उभे होते.

त्या क्षणी मला जाणवलं—

अपयश बदललं नव्हतं; त्याचा अर्थ बदलला होता.

त्या लेखात माझ्या घराचा उल्लेख होता. फौंड्रीतील श्रमांचा उल्लेख होता. महिन्याच्या पगारातून पुस्तकांसाठी पैसे बाजूला ठेवणाऱ्या माझ्या वेडेपणाचा उल्लेख होता. पहाटे चार वाजता सुरू होणाऱ्या माझ्या वाचन, चिंतन आणि लेखनाच्या दिनक्रमाचाही उल्लेख होता.

पण या लेखातील सर्वात सुंदर गोष्ट वेगळीच होती.

भरत बुटाले यांनी माझी स्तुती केली नव्हती.

त्यांनी पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या एका सामान्य माणसाची कथा समाजासमोर ठेवली होती.

लेख प्रसिद्ध झाल्यानंतर फोन सतत वाजत राहिला. संदेशांचा वर्षाव झाला. मित्र, शिक्षक, लेखक, डॉक्टर, कवी, विद्यार्थी, वाचक—अनेकांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. त्या प्रत्येक संदेशात माझं कौतुक कमी आणि पुस्तकांविषयीचा आदर अधिक होता.

डॉ. दीपक शेटे यांनी मला "वाचनाचा दीपस्तंभ" म्हटलं. माधव गव्हाणे यांनी लिहिलं की, "हा सन्मान एका विजयचा नाही; तो हजारो पुस्तकप्रेमींचा आहे." अनेक मित्रांनी व्यक्त केलेल्या भावना वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—

लोक माझं अभिनंदन करत नव्हते; ते वाचनसंस्कृतीचा सन्मान करत होते.

या प्रवासात मला अनेक अभ्यासू वाचक भेटले. त्यापैकी एक नाव मी विशेष कृतज्ञतेने घेतो—लेखक संजय वारके.

ते स्वतः एक संवेदनशील लेखक, शिक्षक आणि नव्या पिढीला घडवणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. पुस्तकांशी त्यांचं असलेलं नातं मला नेहमी प्रेरणा देतं. माझ्या ब्लॉगवरील लेख ते केवळ वाचत नाहीत, तर त्यावर मनापासून प्रतिक्रिया देतात.

"१४० लिटर पाणी लागते चहाला" हा माझा लेख वाचल्यानंतर त्यांनी लिहिलं—

"१४० लिटर पाणी लागते हे मला आजच समजलं. एवढा सूक्ष्म विचार कधीच केला नव्हता. पाण्याबाबत जागृती करणारे विचार. आवडलं."

ही प्रतिक्रिया माझ्यासाठी केवळ कौतुक नव्हतं; ती एका जागरूक वाचकाने दिलेली विचारांची दाद होती.

काही दिवसांनी ते स्वतः त्यांच्या नव्या पुस्तकाची भेट घेऊन माझ्या घरी आले.

तो क्षण मी कधी विसरणार नाही.

लेखकाने वाचकाला भेटणं महत्त्वाचं असतं; पण वाचकाने लेखकाकडे पुस्तक घेऊन येणं हा त्या लेखकासाठी सर्वात मोठा सन्मान असतो.

त्या दिवशी मला पुन्हा एकदा जाणवलं—

लेखनाचं खरं यश प्रसिद्धीत नसतं; ते माणसांशी जुळलेल्या नात्यात असतं.

आजही भरत बुटाले माझे जिवलग मित्र आहेत. पुस्तकं, समाज, विज्ञान, इतिहास, विचार आणि माणसं—या विषयांवर आमच्या चर्चा रंगतात. त्या चर्चांमधून मलाही नवं शिकायला मिळतं. विचारांची मैत्री ही कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी असते, याची जाणीव त्यांनी मला करून दिली.

त्या दिवशी मी स्वतःशी एक वचन केलं.

लोकमतमध्ये माझ्यावर लेख छापला गेला म्हणून माझा प्रवास संपलेला नाही.

खरं तर त्या दिवसापासून माझी जबाबदारी वाढली आहे.

कारण आता लोक माझ्याकडे केवळ विजय गायकवाड म्हणून पाहत नव्हते.

ते माझ्याकडे पुस्तकांच्या विश्वात जगणारा एक माणूस म्हणून पाहू लागले होते.

आजही मी स्वतःला "मॅट्रिक फेल" म्हणायला लाजत नाही.

कारण मला आता कळलं आहे—

परीक्षेतील अपयश हे आयुष्याचं अंतिम प्रमाणपत्र नसतं.

पुस्तकांनी मला शिकवलं की, माणसाची खरी पदवी त्याच्या जिज्ञासेत, त्याच्या प्रामाणिकपणात आणि सतत शिकत राहण्याच्या वृत्तीत असते.

म्हणूनच आज मी अभिमानाने म्हणू शकतो—

"मी मॅट्रिकमध्ये अपयशी ठरलो; पण पुस्तकांनी मला जीवनाच्या विद्यापीठात प्रवेश दिला."

आणि हा प्रवेश कोणत्याही गुणपत्रिकेने नाही, तर वाचन, चिंतन आणि माणुसकीवरील प्रेमाने मिळाला.

पुस्तकातून व्यासपीठापर्यंत : माझा पहिला शब्द.

काही माणसं बोलायला शिकतात आणि मग पुस्तकांकडे वळतात.

माझा प्रवास याच्या नेमका उलटा होता.

मी आधी पुस्तकांशी बोलायला शिकलो आणि नंतर माणसांशी.

पुस्तकं माझे पहिले श्रोते होती. त्यांच्या पानांवर मी माझे प्रश्न ठेवले. त्यांच्या लेखकांशी मनातल्या मनात संवाद साधला. प्रत्येक पुस्तक संपलं की, मला वाटायचं—आणखी एक मित्र भेटला.

पण एक दिवस असाही आला, जेव्हा त्या शांत संवादाला आवाज मिळणार होता.

माझ्या आयुष्यातील पहिल्या व्याख्यानामागे उभे होते माझे जिवलग मित्र माधव गव्हाणे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझ्यातला वक्ता मी ओळखण्यापूर्वी त्यांनी ओळखला. त्यांनीच मला सेलू येथे व्याख्यानासाठी उभं केलं.

सभागृह भरलेलं होतं.

समोर शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासू वाचक आणि अनेक मान्यवर बसले होते.

मी व्यासपीठावर उभा राहिलो.

माझ्या हातात कोणतंही टिपण नव्हतं.

कोणतंही लिखित भाषण नव्हतं.

फक्त आयुष्यभर पुस्तकांतून साठवलेले विचार होते.

मी बोलण्यासाठी तोंड उघडलं...

पण शब्द बाहेर आले नाहीत.

कंठ दाटून आला.

डोळ्यांत पाणी आलं.

काही क्षण मी नुसता श्रोत्यांकडे पाहत उभा राहिलो.

त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार होता—

"या जगात मला इतकी प्रेम करणारी माणसं कशी भेटली?"

मी बोलू शकलो नाही.

त्या दिवशी मी शब्दांनी नाही...

तर अश्रूंनी माझं पहिलं व्याख्यान दिलं.

आज मागे वळून पाहताना मला वाटतं—

ते अपयश नव्हतं.

तो माझ्या आयुष्यातील सर्वात प्रामाणिक क्षण होता.

कारण त्या दिवशी व्यासपीठावर वक्ता उभा नव्हता.

एक कृतज्ञ माणूस उभा होता.

कार्यक्रम संपल्यानंतर मी स्वतःशी एक निर्णय घेतला.

"आजचे हे अश्रू माझ्या कृतज्ञतेचे असतील; पण यानंतर व्यासपीठावर मी रडणार नाही. आता शब्दच माझ्या भावना व्यक्त करतील."

त्या दिवसानंतर मी पुन्हा कधी व्याख्यानासाठी पाठांतर केलं नाही.

मी कधी कागद घेऊन व्यासपीठावर गेलो नाही.

माझं टिपण आजही माझी पुस्तकं आहेत.

माझ्या व्याख्यानात मी पुस्तकांतील संदर्भ सांगतो.

संशोधन सांगतो.

जीवनातील अनुभव सांगतो.

पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे—

मी माणसांना पुस्तकांवर प्रेम करायला शिकवण्याचा प्रयत्न करतो.

माझा ठाम विश्वास आहे—

ज्ञान देण्यापेक्षा ज्ञानावर प्रेम निर्माण करणं अधिक महत्त्वाचं आहे.

व्याख्यानानंतर अनेक जण भेटायला येतात.

कोणी हात हातात घेतं.

कोणी पुस्तकावर सही मागतं.

कोणी डोळ्यांत पाणी आणून म्हणतं—

"साहेब, आम्ही शिक्षण घेतलं; पण पुस्तकांचा सहवास हरवला. तुमच्यामुळे पुन्हा पुस्तक हातात घ्यावंसं वाटलं."

या एका वाक्यासमोर कोणताही पुरस्कार लहान वाटतो.

एक प्रसंग माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे.

एका महाविद्यालयात व्याख्यानासाठी गेलो होतो.

नेहमीप्रमाणे साधे कपडे घातले होते.

गेटवरच्या शिपायाने मला थांबवलं.

"कुठे चाललात?"

मी शांतपणे उभा राहिलो.

थोड्याच वेळात प्राचार्य आले.

त्यांनी हसत त्या शिपायाला सांगितलं,

"हेच आजचे प्रमुख पाहुणे आहेत."

कार्यक्रमानंतर तो शिपाई माझ्याजवळ आला.

त्याच्या डोळ्यांत अपराधीपणा होता.

तो म्हणाला,

"साहेब, मला माफ करा."

मी त्याचा हात हातात घेतला आणि हसून म्हणालो,

"माफी मागू नका मित्रा. अजूनही जग कपड्यांवरून माणूस ओळखतं. एक दिवस कपड्यांच्या आतला माणूस ओळखायला शिकेल, एवढीच आशा आहे."

त्या दिवशी पुन्हा एकदा मला पुस्तकांचं ऋण जाणवलं.

कारण त्या उत्तरात माझा अहंकार नव्हता.

तो पुस्तकांनी दिलेला संयम होता.

आज हजारो श्रोत्यांसमोर उभं राहून मी सहज बोलतो.

पण प्रत्येक व्याख्यानापूर्वी मी स्वतःला एकच गोष्ट आठवण करून देतो—

मी इथे बोलण्यासाठी नाही, शिकण्यासाठी आलो आहे.

कारण प्रत्येक श्रोत्यात मला माझाच एखादा भाग दिसतो.

प्रत्येक प्रश्न मला अधिक नम्र बनवतो.

प्रत्येक संवाद मला नवीन विचार देतो.

आज माझ्यासाठी व्याख्यानाची व्याख्या खूप सोपी आहे—

"व्याख्यान म्हणजे स्वतःचे अनुभव दुसऱ्यांच्या आयुष्याशी जोडण्याची कला."

आणि वक्ता?

"वक्ता तो नाही जो सर्व काही जाणतो; वक्ता तो आहे जो सतत शिकत राहतो."

म्हणूनच प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी मी मनापासून एक वाक्य सांगतो—

"मी जुने कपडे घालतो; पण पुस्तकं नेहमी नवी विकत घेतो. या जगातील सर्वात श्रीमंत माणूस तो नाही ज्याच्याकडे सर्वाधिक पैसा आहे; सर्वात श्रीमंत तो आहे, ज्याच्याकडे विचारांची भूक आणि पुस्तकांवर प्रेम आहे."

माझ्यासाठी हे वाक्य केवळ भाषणाचा शेवट नाही.

ते माझ्या आयुष्याचा सार आहे.


माणसांमुळे समृद्ध झालेलं आयुष्य.

मी आयुष्यात हजारो पुस्तकं वाचली. प्रत्येक पुस्तकाने मला एक नवा विचार दिला. पण आज मागे वळून पाहताना मला एक गोष्ट स्पष्ट दिसते—पुस्तकांनी मला विचार दिले, पण त्या विचारांना जगण्याची ऊब माणसांनी दिली.

माणूस कधीच एकटा घडत नाही.

त्याच्या प्रवासात अनेक हात असतात. काही हात आधार देतात. काही हात दिशा दाखवतात. काही हात पडू देत नाहीत. आणि काही हात फक्त खांद्यावर ठेवून इतकंच सांगतात—

"मी तुझ्यासोबत आहे."

माझ्या आयुष्यात अशी अनेक माणसं आली. त्यांच्यापैकी प्रत्येकाने मला काही ना काही दिलं. कुणी विचार दिला. कुणी व्यासपीठ दिलं. कुणी आत्मविश्वास दिला. कुणी योग्य वेळी योग्य माणसांशी भेट घडवून दिली.

डॉ. दीपक शेटे यांनी माझ्यातील क्षमता माझ्याआधी ओळखली. त्यांनी मला अनेक माणसांशी जोडून दिलं. माझ्या आयुष्यातील अनेक सुंदर वळणांच्या मागे त्यांचा निःशब्द हात आहे.

माधव गव्हाणे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मला पहिल्यांदा व्यासपीठ दिलं. त्यांनी माझ्यातील वक्त्याला ओळखलं, जेव्हा मी स्वतः अजूनही स्वतःला फक्त एक वाचक समजत होतो.

वरिष्ठ पत्रकार भरत बुटाले यांनी माझ्यासारख्या एका साध्या फौंड्री कामगाराचा प्रवास हजारो वाचकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी माझ्यावर लेख लिहिला; पण प्रत्यक्षात त्यांनी एका पुस्तकवेड्या माणसाच्या जिद्दीचा सन्मान केला.

दादासाहेब ताजणे यांनी मला मैत्रीचा अर्थ शिकवला. मित्र म्हणजे फक्त आनंदात सोबत करणारा माणूस नसतो. गरज ओळखून, आपण मागण्याआधी मदतीसाठी उभा राहणारा माणूस म्हणजे मित्र.

माझा जिवलग मित्र विष्णू गाडेकर पाटील यांनी मला ब्लॉगची भेट दिली. त्या एका निर्णयामुळे माझे विचार जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचले. अनेकदा एक छोटासा निर्णय आयुष्याची दिशा बदलतो, याचा तो जिवंत अनुभव आहे.

माझ्या आयुष्यातील आणखी एक सुंदर अनुभव म्हणजे लेखक आणि शिक्षक संजय वारके यांच्याशी जुळलेलं नातं.

आजच्या काळात पुस्तकं वाचणारे लोक कमी होत आहेत, आणि वाचलेल्या पुस्तकांवर मनापासून प्रतिक्रिया देणारे तर त्याहून कमी. संजय वारके हे त्या दुर्मिळ माणसांपैकी एक आहेत.

ते माझे ब्लॉग नियमित वाचतात. एवढंच नाही, तर प्रत्येक लेखाशी संवाद साधतात. त्यांच्या प्रतिक्रिया केवळ कौतुकाच्या नसतात; त्या विचारांना पुढे नेणाऱ्या असतात.

मी "एका कप चहामागे १४० लिटर पाणी खर्च होतं" हा लेख लिहिला होता. त्या लेखावर त्यांनी लिहिलं होतं—

"१४० लिटर पाणी मला ही आजच समजले. एवढा सूक्ष्म विचार कधीच केला नाही. पाण्याबाबत जागृती करणारे विचार. आवडलं."

ही प्रतिक्रिया माझ्यासाठी मोठी होती. कारण ती एका जागरूक वाचकाची होती. लेखकाला सर्वांत मोठा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा त्याच्या शब्दांमुळे दुसऱ्या माणसाचा विचार विस्तारतो.

काही दिवसांनी ते स्वतः त्यांचं पुस्तक घेऊन मला भेटण्यासाठी घरी आले.

त्या क्षणी मला एक विलक्षण भावना आली.

लेखक स्वतः एका वाचकाच्या घरी पुस्तक घेऊन येतो—यापेक्षा त्या वाचकाचा मोठा सन्मान कोणता असू शकतो?

त्या दिवशी मला पुन्हा एकदा जाणवलं—

पुस्तकं केवळ वाचक घडवत नाहीत; ती माणसंही जोडतात.

आज माझ्या आयुष्यात अशी असंख्य माणसं आहेत, ज्यांची नावं एका प्रकरणात मावणार नाहीत. काहींनी एक फोन केला. काहींनी एक पुस्तक भेट दिलं. काहींनी एक वाक्य बोललं. काहींनी योग्य वेळी माझ्यावर विश्वास ठेवला.

या सगळ्यांनी मिळून माझा प्रवास समृद्ध केला.

आज लोक मला विचारतात, "तुमची सर्वात मोठी संपत्ती कोणती?"

मी क्षणाचाही विलंब न करता उत्तर देतो—

माझी माणसं.

पुस्तकांनी मला विचार दिले.

पण त्या विचारांना जगण्याचं कारण माणसांनी दिलं.

म्हणूनच आज मी मनापासून मानतो—

माणूस पैशाने श्रीमंत होत नाही.

तो नात्यांनी श्रीमंत होतो.

आणि ज्याच्या आयुष्यात चांगली माणसं आहेत, तो जगातील सर्वांत भाग्यवान माणूस आहे.

माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला—मित्र, गुरू, वाचक, लेखक, शिक्षक, सहकारी आणि कुटुंबीयांना—मी मनापासून प्रणाम करतो.

कारण माझ्या आयुष्याची कथा "मी"ने लिहिलेली नाही.

ती "आपण" या शब्दाने घडलेली आहे.

 'हो' म्हणण्याचं धैर्य आणि माणुसकीची साथ.

आयुष्यात काही कथा आपण फक्त वाचत नाही, तर त्या आपल्या जगण्याचा भाग बनतात. अशीच एक कथा मी हॅमिल्टन यांच्याबद्दल वाचली होती. शिक्षणाचा आधार नसतानाही प्रामाणिकपणा, कामावरील निष्ठा आणि प्रत्येक संधीला दिलेल्या एका "हो" मुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मानाचं स्थान मिळवलं. त्या कथेने मला एक गोष्ट शिकवली—काम कधीच लहान नसतं; माणसाची वृत्ती त्याला मोठं बनवते.

मयानच्या जन्माच्या काळात या विचाराचा अर्थ मला नव्याने उमगला.

माझी पत्नी सौ. मेघा हिने आई होण्याचा प्रवास अत्यंत धैर्याने पार पाडला. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता; पण त्या आनंदामागे असंख्य काळज्या, वेदना, संयम आणि उद्याच्या सुंदर स्वप्नांची ओढ दडलेली होती. त्या दिवसांत तिच्या आई-वडिलांची आठवण वारंवार मनात यायची. आपल्या लेकीच्या कुशीत बाळ यावं, ही त्यांची मनापासून इच्छा होती; पण नियतीने त्यांना तो क्षण पाहू दिला नाही. आज ते या जगात नसले, तरी जिथे कुठे असतील तिथून त्यांनी आपल्या लेकीचा आनंद आणि मयानवरचा पहिला प्रेमळ कटाक्ष नक्कीच अनुभवला असेल, अशी माझी श्रद्धा आहे.

या संपूर्ण प्रवासात माझे जिवलग मित्र, आदरणीय डॉ. सुधीर सरवदे सर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी केवळ वैद्यकीय मार्गदर्शन केले नाही, तर प्रत्येक क्षणी मानसिक आधार दिला. त्यांच्यासाठी आम्ही रुग्ण नव्हतो; आम्ही त्यांची माणसं होतो. मयानचा जन्म झाल्यानंतर सर आपल्या सहकुटुंब आमच्या घरी आले. त्यांनी मयानला प्रेमाने आशीर्वाद दिले. तो क्षण आजही माझ्या स्मरणात तितकाच जिवंत आहे.

त्या दिवशी मला जाणवलं की डॉक्टर हे फक्त औषधोपचार करणारे नसतात; ते अनेक कुटुंबांच्या आनंदाचे, आशेचे आणि विश्वासाचे रक्षक असतात. त्यांच्यासारख्या माणसांमुळेच संकटाचा प्रवास धीराने पार करता येतो.

मयानकडे पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—या छोट्याशा जीवाच्या जन्मामागे केवळ आमचा आनंद नव्हता; अनेकांच्या सदिच्छा, प्रार्थना, आशीर्वाद आणि निःस्वार्थ प्रेम उभं होतं.

आजही हॅमिल्टनची कथा आठवली की एकच विचार मनात येतो—मोठेपणा पदवीत नसतो; तो आपल्या कामात, आपल्या माणुसकीत आणि दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याच्या वृत्तीत असतो. आणि म्हणूनच माझ्या आयुष्याच्या या सुंदर पर्वात मेघाचा धीर, डॉ. सुधीर सरवदे सरांचे मार्गदर्शन आणि आपल्या सर्व आप्तस्वकीयांचे प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे.

 मामांच्या प्रेमाचा सोहळा.

मयानच्या जन्माने आमच्या आयुष्यात आनंदाचा नवा सूर उमटला. पण त्या आनंदाला एक हळवी किनारही होती.

माझी पत्नी सौ. मेघा हिचे आई-वडील आज या जगात नाहीत. आपल्या लेकीच्या कुशीत बाळ यावं, त्याचं बारसं करावं, त्याला मांडीवर घेऊन भरभरून आशीर्वाद द्यावेत, अशी प्रत्येक आई-वडिलांची स्वाभाविक इच्छा असते. पण नियतीने त्यांना तो आनंद अनुभवू दिला नाही. मयानचा जन्म त्यांच्या जाण्यानंतर झाला. आजही मला वाटतं, जिथे कुठे असतील तिथून त्यांनी आपल्या लेकीच्या संसारात फुललेला हा आनंद नक्कीच पाहिला असेल.

मात्र त्या रिकाम्या जागेची जाणीव मेघाच्या माहेरच्या माणसांनी होऊ दिली नाही.

तिचे भाऊ महेश भोसले आणि युवराज भोसले यांनी मयानच्या बारशाचा सोहळा ज्या प्रेमाने आणि उत्साहाने आयोजित केला, तो आयुष्यभर विसरणे अशक्य आहे. तो फक्त एक कौटुंबिक कार्यक्रम नव्हता; तो त्यांच्या बहिणीवरील प्रेमाचा, जबाबदारीचा आणि आई-वडिलांच्या जागी उभे राहण्याचा एक भावपूर्ण संकल्प होता.

मयानची मामी आणि संपूर्ण माहेरचे कुटुंब प्रत्येक क्षणी आनंदाने धावपळ करत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं—जणू घरात आलेलं हे बाळ संपूर्ण कुटुंबाचंच होतं.

कार्यक्रमासाठी सुमारे दीडशे किलोमीटरचा प्रवास करून अनेक नातेवाईक प्रेमाने उपस्थित राहिले. माझे जिवलग मित्र संतोष पांचाळ आणि त्यांच्या पत्नी.डॉ.श्री व सौ.श्रावस्ती यांनीही वेळ काढून उपस्थिती लावली.त्यांच्या उपस्थितीने हा आनंद आणखी द्विगुणित झाला.

त्या दिवशी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—रक्ताच्या नात्यांइतकीच जपलेली नातीही माणसाला श्रीमंत बनवतात. आई-वडिलांची उणीव कोणीच भरून काढू शकत नाही; पण त्यांच्या प्रेमाचा वारसा जपणारी भावंडं आणि आप्तस्वकीय मात्र दुःखाचं रूपांतर आनंदात करू शकतात.

मयानच्या बारशाचा तो दिवस माझ्यासाठी केवळ नामकरणाचा सोहळा नव्हता; तो नात्यांच्या उबदारपणाचा, प्रेमाच्या श्रीमंतीचा आणि कुटुंबाच्या एकजुटीचा अविस्मरणीय उत्सव होता.

त्या दिवशी मनोमन मी मेघाच्या आई-वडिलांना एकच शब्द म्हटला—

"तुम्ही निश्चिंत रहा... तुमच्या लेकीचं माहेर आजही तितक्याच प्रेमाने तिच्या पाठीशी उभं आहे."

माझं घर – माझं पहिलं विद्यापीठ.

माणूस जगात येतो तेव्हा त्याच्याकडे कोणतीही पदवी नसते. नसतो कोणताही सन्मान, कोणतंही नाव किंवा ओळख. त्याच्याकडे असतं ते फक्त एक घर—आणि त्या घरातली माणसं.

माझ्या आयुष्यातलं पहिलं विद्यापीठ कोणतं, असा प्रश्न कोणी विचारला, तर मी कोणत्याही प्रसिद्ध संस्थेचं नाव घेणार नाही.

मी शांतपणे सांगेन—

माझं घर.

आमचं घर मोठं नव्हतं. दोन साध्या खोल्या. सिमेंटच्या पत्र्याचं छप्पर. मर्यादित साधनं. पण त्या घरात प्रेमाची कमतरता कधीच नव्हती. गरिबी होती; निराशा नव्हती. संघर्ष होता; पण स्वप्नंही होती.

माझे वडील मोठ्याने ग्रंथ वाचायचे. त्या वेळी त्या शब्दांचा अर्थ मला कळत नव्हता; पण त्या आवाजाने माझ्या मनात विचारांची बीजं पेरली. आज मला जाणवतं की, माझ्या वाचनाचा पहिला धडा कोणत्याही शाळेत नाही, तर घरात सुरू झाला होता.

आईने आयुष्यभर कष्ट केले. तिच्या हातची भाकरी मला केवळ अन्न देत नव्हती; ती संयम, श्रम आणि समाधानाचं शिक्षण देत होती. आई-वडिलांनी मोठमोठे उपदेश केले नाहीत; त्यांनी स्वतःचं आयुष्य जगून दाखवलं. मुलांना सर्वात मोठं शिक्षण शब्दांनी नाही, तर आचरणातून मिळतं, हे मी त्यांच्याकडून शिकलो.

जीवन पुढे सरकत गेलं. पुस्तकं आयुष्यात आली. मित्र भेटले. गुरू लाभले. व्याख्यानं सुरू झाली. लोक भेटू लागले. पण घराने दिलेले संस्कार माझ्या प्रत्येक निर्णयात सोबत राहिले.

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार म्हणजे माझी पत्नी—मेघा.

लोकांना व्यासपीठावर बोलणारा विजय दिसतो; पण त्या विजयामागे शांतपणे उभी असलेली मेघा अनेकांना दिसत नाही.

माझ्या वाचनासाठी लागणारा वेळ, माझ्या आरोग्याची काळजी, माझ्या आहारातील शिस्त, माझ्या धावण्याची सातत्यपूर्ण साथ, माझ्या प्रत्येक स्वप्नावरचा तिचा विश्वास—या सगळ्यामुळेच मी माझा प्रवास अखंड सुरू ठेवू शकलो.

ती अनेकदा एकच वाक्य म्हणते—

"तुम्ही तुमचं काम करा. बाकीची काळजी मी घेते."

या एका वाक्यात मला संसाराचा संपूर्ण अर्थ सापडतो.

आमच्या आयुष्यात मयान आला आणि आयुष्याला एक नवा अर्थ मिळाला.

एकोणीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याचा जन्म झाला. त्या दिवशी मी फक्त वडील झालो नाही; मी अधिक जबाबदार माणूस झालो.

त्याच्याकडे पाहताना मला रोज एकच विचार येतो—

मुलांना संपत्तीपेक्षा संस्कारांचा वारसा द्यायला हवा.

त्याच्यासाठी मोठं घर उभारणं शक्य होईल की नाही, हे मला माहीत नाही. पण त्याच्यासाठी मोठं विचारविश्व उभारण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.

म्हणूनच आजही आमच्या घरात पुस्तकांना विशेष स्थान आहे.

माझा विश्वास आहे—

ज्या घरात पुस्तकं असतात, त्या घरात संवाद जिवंत राहतो.

ज्या घरात संवाद जिवंत राहतो, त्या घरात नाती टिकून राहतात.

आणि ज्या घरात प्रेम आणि विचार दोन्ही असतात, त्या घराला कोणत्याही वैभवाची गरज नसते.

आज माझ्या घराच्या भिंती साध्या आहेत.

पण त्या भिंतींनी माझे संघर्ष पाहिले आहेत.

माझ्या पहाटेच्या वाचनाचे साक्षीदार आहेत.

माझ्या लेखनातील असंख्य शब्द ऐकले आहेत.

माझ्या अपयशानंतरचं मौन आणि यशानंतरची नम्रताही त्यांनी अनुभवली आहे.

म्हणूनच माझ्यासाठी घर ही वास्तू नाही.

ते माझ्या आयुष्याचं पहिलं विद्यापीठ आहे.

आज मी जिथे उभा आहे, त्याचं श्रेय माझ्या पुस्तकांना आहे.

पण त्या पुस्तकांपर्यंत पोहोचण्याची वाट माझ्या घरातूनच गेली आहे.

म्हणून या प्रकरणाचा शेवट मी एका विश्वासाने करतो—

"जग जिंकण्याची सुरुवात घर जिंकण्यापासून होते. घरात प्रेम, विश्वास आणि विचार असतील, तर बाहेरच्या कोणत्याही संघर्षाची भीती राहत नाही."

माझं घर मोठं नाही.

पण माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं विद्यापीठ आहे.

आणि त्या विद्यापीठाची पदवी कागदावर मिळत नाही.

ती मिळते—

प्रेमाने, त्यागाने, कृतज्ञतेने आणि माणुसकीने जगताना.

"क्रमशः... पुढील भागात भेटूया."