सर्पदंशानंतर अण्णा वाचला खरा,पण त्याला हात गमवावा लागला याचं दुःख मोठं होतं. त्याच्यावर वेळीच आणि योग्य उपचार झाले असते तर कदाचित त्याचा हात वाचू शकला असता.माझ्याबरोबरच माझ्या मित्रांनाही याची खंत होतीच.एवढंच नव्हे,तर लवकरच मला कळलं, की ससूनमधल्या काही डॉक्टरांनाही त्याची रुखरुख लागून राहिली होती.डॉ.डी.एन. जोशी आणि डॉ.डी.बी. कदम हे त्यातलेच दोघं.हे दोघं उत्साही तरुण नुकतेच बी.जे.मेडिकल कॉलेजमधून पोस्ट - ग्रॅज्युएशन करून तिथेच लेक्चरर म्हणून लागले होते.
अण्णाच्या सर्पदंशाच्या वेळी दोघंही ज्युनियर विद्यार्थी होते.अण्णाच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये काही तरी चुकतंय असं दोघांनाही तेव्हाच समजलं असावं.
त्यामुळे किमान यापुढे ससूनमध्ये येणाऱ्या सर्पदंशाच्या प्रत्येक केसचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायचा असं त्या दोघांनी ठरवलं होतं.
त्यातून कदाचित उपचाराची नवी सुधारित पद्धती तयार होऊ शकेल आणि पर्यायाने सर्पदंशाने मृत्यू होण्याचं किंवा हातपाय गमावावे लागण्याचं प्रमाण कमी होईल अशी त्यांना आशा होती.त्यांच्या कामाबद्दल कळल्यावर मी आपणहून या संशोधनात सहभागी व्हायचं ठरवलं.त्या वेळी टेल्कोमध्ये माझी कायम फर्स्ट शिफ्ट असायची.दुपारी घरी आलो की मी लगेचच ससूनला पळायचो.१९८७ सालच्या जानेवारी महिन्यात आमच्या संशोधनाला सुरुवात झाली.त्यासाठी मेडिसिन विभागाचे प्रमुख,कॉलेजचे डीन आणि ससून हॉस्पिटलचे सुपरिंटेंडन्ट अशा अधिकाऱ्यांची परवानगी मिळवली.
पहिल्या टप्प्यात आम्ही १९८६ या संपूर्ण वर्षभरात सर्पदंशाने दाखल झालेल्या रुग्णांच्या केस स्टडीज करायला सुरुवात केली.पुढचे दोन महिने त्या वर्षातील सर्पदंशाच्या सगळ्या रुग्णांचे केसपेपर नीट तारीखवार लावून घेण्यातच गेले.आता अनेक शिकाऊ डॉक्टरांनी हाताळलेले,अनेकविध हस्ताक्षरांत टिप्पणी केलेले,अमुकतमुक उपचार, उपाय आणि तपासण्या करण्याचे आदेश, त्यावरचे उपचार आणि कार्यवाही अशा असंख्य केसपेपरचा अभ्यास करण्याचं डोईजड काम पुढे होतं.
अभ्यासाला सुरुवात कुठून करावी हे आमच्यापैकी कुणालाच सुचत नव्हतं.तीन-चार दिवस असेच गेले.एका संध्याकाळी आम्ही तिघं कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा घेत असताना डी. बी.ताडकन उठला आणि निघाला.मी आणि डी. एन.त्याच्या मागोमाग गेलो.पहिला केसपेपर खसकन् ओढून डी.बी.बारकाईने पाहू लागला. आम्ही जमवलेल्या केसपेपरवर त्याने त्याची अभ्यासू नजर रोखली आणि तो म्हणाला, "कळलं!आपण पहिल्यांदा जेंडरपासून सुरू करू यात.पेशंट स्त्री होती की पुरुष,मग वय,मग भौगोलिक स्थान आणि मग बाकी क्लिनिकल डीटेल्स."आम्ही तत्परतेने कामाला लागलो. अशा रीतीने आमच्या नव्या रिसर्च प्रोजेक्टची सुरुवात झाली.
बी.जे.मेडिकलचे इतरही काही लेक्चरर्स स्वतःहून आम्हाला मदत करू लागले, तर काहीजणांनी हेटाळणीही चालवली;पण आम्ही अर्थातच त्याकडे लक्ष न देता आमचं काम सुरू ठेवलं.सुमारे सातशे केसपेपर्सचा अभ्यास करायला तीन-चार महिन्यांचा काळ लागला.या सर्व माहितीचा तर्कसुसंगत अभ्यास करून नेमकं अनुमान काढण्याचं आणि त्यावर विश्लेषण करण्याचं मुख्य काम अद्यापही बाकी होतं.एकदा डीबी आणि डीएनचे सीनियर मित्र डॉ.श्याम बावीकर सहजच आमच्या रूमवर आले.
आम्ही लिहिलेल्या पत्रावळ्या त्यांनी निरखून पाहिल्या आणि तिथलीच कात्री घेऊन नवीन कागदाच्या उभ्या पट्ट्या कापायला सुरुवात केली.
त्यांना डिंक लावून आमच्या पत्रावळ्या मागच्या बाजूने एकापुढे एक अशा संगतवार पद्धतीने चिकटवायला घेतल्या.त्यांच्या या नव्या कल्पनेमुळे आमच्या कामात खूपच सुसूत्रता आली.आम्ही चौघांनी अशा पद्धतीने डाटा कम्पायलेशन करायला घेतलं. पुढच्या तीन-चार दिवसांतच अख्ख्या खोलीभर आमचं डाटा शीट तयार झालं.त्यामुळे आता तिथे पायही ठेवायला जागा उरली नव्हती.
आता आमच्या अभ्यासात आणखी मजा येऊ लागली.शिरूर परिसरातून आलेले घोणसदंशाचे रुग्ण;भोर, वेल्हा परिसरातील मण्यारदंश,मुळशी-मावळातील नागदंश,पावसाळ्याच्या सुरुवातीचे फुरशांचे दंश आणि एखाद-दुसरा ट्रेकवर गेलेल्या शहरी तरुणाला झालेला चापड्याचा (बांबू पिट व्हायपर) दंश अशा विविध प्रकारचे दंश झालेल्या व्यक्तींची वयं,त्यांचे व्यवसाय आणि कामाचं स्वरूप अशी खूपमाहिती आमच्याकडे जमा होऊ लागली.
घोणसाचा दंश प्रामुख्याने दिवसा होतो,तर मण्यारीचा रात्री.नागाचा कधीही आणि फुरशाचा मात्र कधीतरीच.
सर्पदंश हे प्रामुख्याने २८ ते ४० या वयोगटातील शेतीचं काम करणाऱ्या पुरुषांना झाले असल्याचंही आमच्या लक्षात आलं.त्यातूनही पायापेक्षा हाताला जास्त सर्पदंश झाले होते. अशा सर्वच रुग्णांवर केली गेलेली उपाय योजना,त्यात अनवधानाने राहिलेल्या त्रुटी अशा सर्वच बाबींचा सविस्तर अभ्यास करायला मिळाला आणि त्यातूनच सर्पदंश उपाययोजनेमध्ये विशिष्ट मापदंड ठरवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो.
त्याच दरम्यान डीएनला कुठून तरी समजलं की सिंगापूर विद्यापीठात सर्पविष व सर्पदंश या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.तिथे आम्ही आमच्या शोधनिबंधाचं प्रारूप पाठवून दिलं,आणि ते चक्क स्वीकारलंही गेलं.
एवढंच नव्हे,तर हा शोधनिबंध सादर करण्यासाठी सिंगापूरला येण्याचं आमंत्रणही आम्हा तिघांना मिळालं.आम्ही आनंदाने अक्षरशः वेडे झालो. निमंत्रण आम्हा तिघांनाही होतं,पण त्याचा प्रवासखर्च आयोजक देणार नव्हते.त्यामुळे तिघांनी जाणं परवडणारं नव्हतं.पण आमच्यापैकी कोणीच एकट्याने जायला तयार होईना.
मेडिसिन डिपार्टमेंटला कामाचा खूप लोड आहे,अशी सबब पुढे करून डीबी मागे हटला. त्याच्या या निर्णयामुळे मी आणि डीएन असं दोघांनीच जायचं निश्चित झालं.
मुंबई-सिंगापूर-मुंबई अशा विमानखर्चाच्याच किमतीमध्ये आमच्या एका ट्रॅव्हल एजंट मित्राने आम्हाला बँकॉक-पटाया-सिंगापूर अशी पर्यटन सहलच बुक करून दिली.विमानाच्या तिकिटांसाठी घरच्यांकडून आणि मित्रांकडून पैसे जमवले.
वरखर्चासाठी मात्र आमच्याकडे पैसे नव्हते.
त्यामुळे प्रवासात पैशाची काटकसर करण्याशिवाय इलाज नव्हता.सर्वप्रथम बँकॉकला पोहोचलो,तिथून पटाया गाठलं.तिथे दोन दिवस राहिलो.इतर पर्यटक भरपूर पैसे खर्च करून वॉटर स्पोर्ट खेळत होते. आम्ही मात्र तिथल्या टेकडीवजा डोंगरावर छोटासा ट्रेक करण्याचा निर्णय घेतला.टेकडीवर पोहोचून सगळ्यांचे 'वॉटर स्पोर्ट्स' पाहत बसलो. बँकॉकमध्ये सोन्याचा बुद्ध,झोपलेला नव्वद फुटी बुद्ध,नदीतला बाजार वगैरे पाहिलंच,पण आम्हाला मुख्य आकर्षण होतं ते तिथल्या सर्प उद्यानाचं.तिथे आशिया खंडात आढळणारे अनेक रंगीबेरंगी,आकर्षक पण विषारी असे पिट व्हायपर साप पाहिले.भला थोरला किंग कोब्रा तिथले कामगार लीलया हाताळत होते.तीन-चार प्रकारच्या मण्यारीही बघायला मिळाल्या. तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो.ओळखी करून घेतल्या.तिथे आलेल्या पर्यटकांना ते लोक सतत निरनिराळ्या सापांचे विष काढून दाखवत होते आणि ते विष ताबडतोब प्रयोगशाळेत पाठवलं जात होतं.
त्यापासून अँटिव्हेनम लस बनवून ती जगभर निर्यात केली जात होती.ओळख काढल्यामुळे ही सर्व प्रक्रिया जवळून बघता आली.या ओळखीमुळेच पुढे आमच्या सर्वोद्यानामध्ये किंग कोब्राच्या विषासाठी लागणारं अँटिव्हेनम आम्हाला त्यांच्याकडून मिळवता आलं.अर्थात ती बरीच नंतरची गोष्ट.सिंगापूरला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी विद्यापीठ गाठलं.
कॉन्फरन्समध्ये विविध देशांतील जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, सर्पविषतज्ज्ञ,फिजिशियन्स,क्लिनिशियन्स आणि काही शल्यविशारदही सहभागी झाले होते.
आमच्या शोधनिबंधाचा प्रथम लेखक डॉ.डी. एन.
जोशी असल्याने तो सादर करण्याची जबाबदारी त्याचीच होती.आमच्या प्रेझेंटेशनची वेळ आली तशी त्याची छाती धडधडू लागली. डीएनने आपल्या खास पुणेरी इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशनला सुरुवात केली तेव्हा तो किती प्रभावी बोलू शकेल याबद्दल मला शंकाच होती; पण अतिशय शांतपणे आणि सोप्या भाषेत माहिती सांगत त्याने लवकरच सगळ्यांची मनं जिंकली.मी स्लाइड्स बदलण्याचं काम करत होतो.
आम्ही जवळपास पस्तीसेक स्लाईड्स दाखवल्या.
प्रत्येक स्लाइडवर डीएन अत्यंत आश्वासकपणे आमचे निष्कर्ष मांडत होता. व्याख्यान संपल्यावर त्याला जोरदार टाळ्या पडल्या आणि भरपूर प्रश्नोत्तरं झाली.प्रश्नांनाही त्याने समाधानकारक उत्तरं दिली.मी तर चाट पडलो.
मराठमोळ्या वातावरणात वाढलेल्या डीएनने परिषद गाजवली.सर्वच देशांच्या प्रतिनिधींनी त्याच्या आणि पर्यायाने आम्हा सर्वांच्याच संशोधनाला पावती दिली होती.चार दिवसांच्या या परिषदेमध्ये आम्हाला खूप काही नवं शिकायला मिळालं.सर्पदंश आणि उपचार या विषयामध्ये पारंगत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकारी व्यक्तींशी ओळखी झाल्या. माझ्यासाठी तर पुढच्या कामाच्या दृष्टीने ही मोठीच पर्वणी होती.आमच्याकडे पैसे इतके कमी होते की जवळपास चारही रात्री आम्ही काही न खाता उपाशीपोटीच झोपून गेलो. परतण्याच्या दिवशी हॉटेलचं बिल चुकवलं आणि पैसे मोजले तर जेमतेम विमानतळावर पोहोचण्याएवढी आणि पुढे मुंबई-पुणे बसप्रवासाएवढीच शिल्लक सोबत होती.
विमानतळावर खाण्याचे प्रचंड पदार्थ डोळ्यांसमोर नाचत होते,पण पैसे नसल्याने खाता येत नव्हतं.
अखेर विमानात बसलो. टेक-ऑफपूर्वी एक हवाईसुंदरी गोळ्या चॉकलेट्सनी भरलेला ट्रे सर्वांसमोर नाचवत आमच्या जवळ आली.
आम्ही दोघांनी हावरटासारख्या दोन्ही मुठी भरून घेतल्या आणि अक्षरशः अधाशासारखे खाऊ लागलो.त्यानंतर पुढ्यात आलेले खाद्यपदार्थही अधाशासारखे चापले.वर दोन-दोन कप कॉफी मारली आणि आत्मा शांत केला.पण असं असलं तरीही आम्ही खूष होतो.या कॉन्फरन्सने आम्हाला वेगळाच आत्मविश्वास दिला होता.- सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन..!
लवकरच आम्हाला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली.सर्पविष आणि सर्पदंश या विषयावर अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या 'टॉक्सिकॉन' या जगप्रसिद्ध शोध नियतकालिकातही आमच्या शोधनिबंधाची दखल घेण्यात आली होती.त्यातूनही या क्षेत्रात आम्हाला भरपूर प्रसिद्ध मिळाली आणि ओळखी वाढल्या.पुढे डॉ.डी.एन.जोशी परदेशी गेला आणि डॉ.डी.बी.कदम बी.जे.मध्ये आधी प्राध्यापक आणि पुढे विभागप्रमुखही झाला.
एक वाचणीय नोंद - शिवाजीराजांचे वकील : १६७२ मध्ये पोर्तुगीजांशी चौथाईच्या वसुलीबाबत बोलणी करण्यासाठी शिवाजीराजांनी पाठवलेले ते वकील म्हणजे पितांबर शेणवी,जिवाजी शेणवी आणि गणेश शेठ.१६७७ मध्ये रामनगर आणि कोळी राजांचा संपूर्ण मुलूख शिवाजीराजांच्या ताब्यात आला.
त्यानंतर दमणच्या सीमेवर सैन्य ठेवून दमणला लुटारूंचा उपद्रव होणार नाही याची काळजी शिवाजीराजांनी घेतली आणि त्या बदल्यातल्या चौथाईची मागणी पोर्तुगीजांकडे केली.ही मागणी रास्त असल्याचे दमणच्या नगपालिकेने ठरविले आणि त्याबाबत पोर्तुगीज विजरईसही कळविण्यात आले.१० जानेवारी १६७८ रोजी विजरईने शिवाजीराजांचा हा हक्क मान्य केला व तसे त्यांना कळविले.त्यापूर्वी १५ सप्टेंबर १६७७ रोजी त्याने वसईच्या जनरलला लिहिलेल्या पत्रात आज्ञा केली आहे की 'चौथाईची रक्कम वसूल करून ठेवावी व चौथिया राजांशी ह्या बाबतीत जसा करार केला होता तसाच करार शिवाजींशी करावा.पण शिवाजीस द्यावयाची चौथाईची रक्कम त्याने रामनगरचे संपूर्ण राज्य हस्तगत केल्यापासूनच द्यावी.त्यापूर्वी देऊ नये.' त्यानंतर हे वकील बोलणी करण्यासाठी आले होते.त्याबाबत कॅरे यांनी ही नोंद केली आहे.पण तारीख चुकली आहे.वसईचा कॅप्टन दों मानुयेल लोबु द सिल्व्हैर यांच्याकडे चौथाईसंबंधाने विचारविनिमय करण्यासाठी शिवाजीराजांनी मे १६७७ मध्ये आवजीपंत ह्याला पाठवले होते. ही चौथाई शिवाजीराजांना देण्याचे पोर्तुगीजांनी कबूल केले परंतु अनेक सबबी सांगत पोर्तुगीजांनी ही रक्कम अखेरपर्यंत दिली नाहीच.उलट सदर रकमेपैकी तेरा हजारांपेक्षा अधिक रुपये गुप्तपणे रामनगरकरास दिले.तेही शिवाजीराजांविरुद्ध लढा सुरू ठेवण्यासाठी.ह्याचा उल्लेख गोव्याच्या हंगामी गव्हर्नरच्या दि.१२ मे १६७८च्या पत्रात आढळतो.पण लिस्बन येथील आज्युदच्या ग्रंथसंग्रहालयातील एका हस्तलिखितानुसार दमण प्रांतातील चौथाईचे उत्पन्न दरसाली १२९९५ असुर्प्या असून त्यापैकी १८९८असुर्प्या वतनदारासंबंधीचा खर्च वजा जाता चौथिया राजास ९०७७ असुर्प्या राहतात,अशी ४ जून १६८३ ची नोंद आहे.ह्यावरून शिवाजीराजास पोर्तुगीजांकडून चौथाईबद्दल दरवर्षी ही रक्कम येणे होते.१६८१ च्या अखेरपर्यंत ह्या चौथाईपैकी अनामत ठेवलेली रक्कम ११७३८असुर्प्या होते अशीही नोंद आढळते.ह्यावरून १६८१ पर्यंत ही रक्कम वसूल झाली नव्हती असे दिसून येते.
असरफी हा 'सेराफिन' ह्या पोर्तुगीज चांदीच्या नाण्याचा अपभ्रंश.एक रुपया म्हणजे १.४ सेराफिन तर १० रुपये म्हणजे १३