* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: पक्षी मानवांचे बेट / ISLAND OF BIRD HUMANS

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२/८/२४

पक्षी मानवांचे बेट / ISLAND OF BIRD HUMANS

३०.०७.२४ या लेखातील शेवटचा भाग ..


टिआहआन्कोच्या मातीतून मानव आणि इतर प्राणी त्याने बनवले आणि त्यांच्यात जीव ओतला.त्यांना त्याने भाषेची देणगी दिली.चालीरीती,कला शिकवल्या आणि आकाशमागनि जगातल्या निरनिराळ्या मातीत पोहोचवून त्यांना त्या त्या भागात वस्ती करायला सांगितले.


काही काळाने त्याच्या सूचनेप्रमाणे काम चालू आहे की नाही,त्यात त्यांना यश प्राप्त होत आहे की नाही हे पाहण्यासाठी वीरकोचा आणि त्याचे त्यांना सहकारी जगप्रवासाला निघाले.म्हाताऱ्याचा वेश करून ॲन्डीज पर्वत आणि किनारपट्टीवर फिरत असताना त्यांचे कधी कधी चांगले स्वागत झाले,कधी नाही.

काचा या ठिकाणी त्याचा फार अपमान झाला आणि खवळून त्याने तिथल्या डोंगराच्या कड्यालाच प्रचंड आग लावली.बघता बघता तो देशच अग्निच्या भक्ष्यस्थानी पडायला लागला.तिथल्या कृतघ्न लोकांनी त्याची क्षमा मागितल्यावरच त्याने एका क्षणात सर्व आग विझवून टाकली.


सल्ला देत,सूचना करीत वीरकोचाने पुढे प्रवास सुरू केला.अनेक ठिकाणी लोकांनी त्याची मंदिरेही बांधली.शेवटी सागराच्या लाटांवर आरूढ होऊन तो महासागरावर अदृश्य झाला.मी परत येईन असे सांगायला तोही विसरला नव्हता.


स्पॅनिश लोकांनी मध्य व दक्षिण अमेरिकेवर कब्जा केला तेव्हा वीरकोचाची वीरगाथा सर्वत्र त्यांच्या कानावर पडली.आकाशमार्गाने आलेल्या धिप्पाड गोऱ्या लोकांबद्दल तोपर्यंत कोणीच कधी ऐकले नव्हते.चकित होऊन सर्व क्षेत्रात मानवप्राण्याला मार्ग दाखवणाऱ्या सूर्यपुत्रांच्या कथाही त्यांनी ऐकल्या.या प्रत्येक कथेत सूर्यपुत्र निश्चित परत येणार होते हे आश्वासन होतेच.


अमेरिका खंडाला जुन्या संस्कृतींचे माहेरघर म्हणत असले तरी या खंडाची जाणीव झाली आहे ती गेल्या हजार वर्षांतच.


मागावर वस्त्र विणण्याची कला अवगत नसताना ५००० वर्षांपूर्वी इंका लोक कापूस का पिकवत होते हे गूढच आहे.


माया लोकांना चाक माहीत होते.त्यांनी रस्तेही बांधले पण चाकाचा उपयोग कधीच केला नाही.


ग्वाटेमालातील टिकल येथील पिरॅमिडमध्ये हिरव्या जेडचा पाचपदरी नेकलेस सापडणे हा चमत्कारच! एव्हढ्यासाठी की हा दगड फक्त चीनमध्येच मिळतो.


ओलमेक जमातीच्या सुरेख शिरस्त्राणे घातलेल्या अप्रतिम मूर्तीचे कौतुक तिथेच जाऊन करायला पाहिजे.त्यापैकी एकही मूर्ती जगातल्या कुठल्याही म्युझियममध्ये आढळणार नाही.कारण? कारण जगात बांधलेला एकही पूल या मूर्तीचे वजन पेलू शकणार नाही.


आजपर्यंत ५० टनांच्या वर वजन उचलू शकतील अशा क्रेन्स अस्तित्वात नव्हत्या. हल्ली हल्ली काही शेकडो टन वजन उचलण्याची क्षमता असलेल्या क्रेन्स आपण बनवायला लागलो आहोत.पण आपले पूर्वज ? काही वेळा तर वाटते की आपल्या पूर्वजांना प्रचंड शिळा पर्वत कपारींवर नाहीतर दऱ्याखोऱ्यात नेण्याचा मुलखावेगळा छंदच असावा.


इजिप्शियन लोकांनी पिरॅमिडचे दगड अस्वानच्या खाणीतून काढून नेले.ईस्टर आयलंडमधील लोकांनी त्यांचे प्रचंड पुतळे दूरदूरच्या खाणींपासून सध्याच्या जागांवर नेले.टिआहुआन्को येथे सापडलेले काही राक्षसी दगड कुठल्या खाणीतून काढले त्याचा उलगडाच होत नाही.आपले पुराणकालीन पूर्वज जरा चक्रमच वाटतात नाही? प्रत्येक गोष्टीत स्वतःचा छळ करून घ्यायची बहुधा आवडच असावी त्यांना. नाहीतर दगडांच्या खाणीपासून दूर दूर,नको नको त्या दऱ्याखोऱ्यात नाहीतर पर्वतांवर असे पुतळे उभारण्याची काही गरज पडली होती का त्यांना?


आपल्याला वाटतात तेवढे ते खरोखर मूर्ख असतील का? त्यांची भव्य मंदिरे,पिरॅमिडस्, मूर्ती वगैरे सर्व त्यांना खाणींजवळच बांधता आले असते,मग ते त्यांनी का केले नाही? कारण प्रत्येक ठिकाणच्या आख्यायिका सांगतात की,ही कामे अमुक ठिकाणीच व्हायला पाहिजेत म्हणून !


इंकांचा कुझको येथील सुप्रसिद्ध किल्ला सहज सुचले म्हणून त्या जागेवर बांधला नसणार;

आख्यायिकाच सांगत होत्या की ती जागा पवित्र होती म्हणून! दुसरी गोष्टही निश्चित.भविष्यकालीन अंतराळ संशोधनाला चालना देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी या पौराणिक इमारतीखाली,

अवशेषांखाली, अजून दडून असल्याच पाहिजेत.


आपल्याला जितकी दूरदृष्टी आहे तितकी दूरदृष्टी हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीला भेटी देणाऱ्या अंतराळवीरांना नक्कीच होती. त्यांना संपूर्ण खात्री होती की एक दिवस पृथ्वीवरील मानव स्वतःच्या कौशल्याने, स्वतःची बुद्धी वापरून अंतराळात पाऊल टाकेल म्हणून!


आपल्या पृथ्वीवरील बुद्धिमान जमाती आपल्यासारख्याच जीवन जगणाऱ्या, बुद्धिमान असणाऱ्या,अनंत अवकाशातील जमातींशी संपर्क सांधण्याच्या प्रयत्नात आहेत;हे ऐतिहासिक सत्य आहे.कुठल्या ग्रहांवर अशा जमाती असण्याची शक्यता आहे,आपण अंतराळात कुठे संदेश पाठवावेत,आपल्या संदेशाचे उत्तर १०० वर्षांत मिळेल की १००० की १०००० वर्षांत याची थोडीशीही कल्पना नसताना आज आपण रेडिओ लहरींद्वारा अज्ञात अशा परग्रहांवरील बुद्धिमान जमातींशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत.


पण ही सर्व माहिती आपल्या पृथ्वीवरच दडून आहे का? गुरुत्वाकर्षणाचे परिणाम नष्ट करणे,अणू -

परमाणु,ॲन्टिमेंटर या सर्व गोष्टींवर आपले प्रयोग चालू आहेत;पण पृथ्वीवर सर्वत्र दडलेले हजारो वर्षापूर्वीचे आधुनिक तंत्रज्ञान शोधण्याचा आपण कितीसा प्रयत्न करीत आहोत? हजारो वर्षांपासून मानवाचा स्वतःचे अस्तित्व राखण्याचा,सुधारण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याचे खरे समर्थन एकच आहे. भूतकाळापासून शिकणे,अनंत विश्वातील आपले स्थान जाणून घेणे व इतर अशाच बुद्धिमान जमातींशी हात मिळवणे. 


अंतराळावर स्वारी चढवण्याचे प्रयत्न करणे हाच मानवजातीचा प्रयत्न राहील,तेव्हाच पृथ्वीवर शांतता नांदेल आणि स्वर्गाची दारे उघडतील.अंतराळ संशोधनाचे निष्कर्ष हाती आले की पृथ्वीवरील आपापसातील युद्धे किती मूर्खपणाची आहेत याची सर्वांनाच जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.सर्व देश एकोप्याने परग्रहांवरील स्वारीसाठी आपले आधुनिक तंत्रज्ञान वापरायला सुरुवात करतील;तेव्हा पृथ्वीवरील इतर प्रश्न त्यामानाने किती क्षुल्लक आहेत याची जाणीव होऊन,विश्वातील पृथ्वीचे स्थान शोधण्याचा प्रयत्न मार्गाला लागेल.एकदा का अंतराळाची कवाडे उघडली की मानवाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.जगात शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्याचे 'देवांचे' वचन त्याच वेळी प्रत्यक्षात उतरेल.(देव?छे! परग्रहावरील अंतराळवीर !,

बाळ भागवत,मेहता पब्लिशिंग हाऊस..) कल्पनाविश्वात रममाण होण्याचा हा प्रकार आहे असे ज्यांना वाटत असेल त्यांना थॉमस मानचे एक वाक्य सांगावेसे वाटते. 


'संशयी माणसाचे महत्त्व एकच ! त्याला कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही.'


समाप्त…


वाचता वाचता वेचलेले.. काही अभ्यासू नोंदी..


जव्हारची स्वारी : मे १६७२ च्या सुमारास मोरोपंत पिंगळे दहा हजार स्वारांसह जव्हारच्या स्वारीसाठी रवाना.शिवाजी महाराज या वेळी नेमके कुठे होते हे सांगणारं विश्वसनीय साधन उपलब्ध नसलं,तरी ते मोरोपंतांना सुरतजवळ येऊन मिळतील असा एका इंग्रजी पत्रात उल्लेख (शिवकालीन पत्रसारसंग्रह क्रमांक १४७४) जयराम पिंडे यांच्या 'पर्णालपर्वत ग्रहणाख्यानामा'तही तसा उल्लेख.जव्हारचे राज्य कोळी राजा विक्रमशाह याच्या ताब्यात तर रामनगर सोमशाहच्या ताब्यात होते.हे दोघेही चौथिया राजा म्हणून ओळखले जात.दमण प्रांत या वेळी गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात होता. परंतु तेथील प्रजा मूळ हिंदू राजाला त्याने आपणाला कसलाही त्रास देऊ नये म्हणून उत्पन्नाचा चौथा हिस्सा देत असे.

म्हणून हे चौथिया राजे.१५९९ पासून हा प्रांत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला तरीही हे राजे हा चौथ वसूल करत.त्याबदल्यात या राजांनी आपल्या प्रजेचे चोर-दरोडेखोरांपासून रक्षण करावे अशी अट पोर्तुगीजांनी त्यांना घातली होती.१६७० मध्ये राजा विक्रमशाहाने सोमशाहाविरुद्ध बंड पुकारले आणि पोर्तुगीजांनी दमणची चौथाई आपणास द्यावी अशी मागणी केली.पोर्तुगीजांनी नकार देताच त्याने या मुलखातील गावं लुटली.

रामनगरच्या राजाला त्याचा बंदोबस्त करता आला नाही.त्यामुळे पोर्तुगीजांनी ही चौथाई मान्य केली.पुढं सोमशाहाने पोर्तुगीजांच्या मदतीने विक्रमशाहाविरुद्ध हत्यार उपसले.त्याची अनेक गावं लुटली तरीही त्याला विक्रमशाहाचा बीमोड करता आला नाही.डिसेंबर १६७१ मध्ये कोळीराजाच्या विरुद्धच्या या लढाईत आपणाला मदत करावी अशी विनंती पोर्तुगीजांनी शिवाजीमहाराजांना केली.याच संधीची वाट पाहात असलेल्या शिवाजीमहाराजांनी मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली फौजा रवाना केल्या. या फौजांनी ५ जून रोजी विक्रमशाहाचा पराभव केला.जव्हार स्वराज्यात आले शिवाय मोरोपंतांनी १७ लाखाचा खजिना ताब्यात घेतला.जव्हारची सीमा नाशिकला लागूनच होती. तिथून सुरत फक्त १०० मैल.विक्रमशाह तिथून मोगलांच्या आश्रयास पळून गेला.


मोरोपंत पुढे सोमशाहवर म्हणजे रामनगरवर चालून गेले.ते येत असल्याची खबर कळताच घाबरून गेलेला सोमशाह आपल्या बायका- मुलांसह गणदेवीपासून आठ मैलांवरच्या चिखली गावी पळून गेला.१६ जून ते १४ जुलैच्या दरम्यान रामनगर मराठ्यांच्या ताब्यात आलं.

सुरत इथून फक्त साठ मैलांवर. शिवाजीराजा असा अगदी सीमेवर येऊन धडकल्याने सुरतेत पळापळ सुरू झाली होती. तिथल्या सुभेदारानं सुरतेचे दरवाजेही बंद करून टाकले होते.



शिवाजीराजांचे वकील : १६७२ मध्ये पोर्तुगीजांशी चौथाईच्या वसुलीबाबत बोलणी करण्यासाठी शिवाजीराजांनी पाठवलेले ते वकील म्हणजे पितांबर शेणवी,जिवाजी शेणवी आणि गणेश शेठ.१६७७ मध्ये रामनगर आणि कोळी राजांचा संपूर्ण मुलूख शिवाजीराजांच्या ताब्यात आला.त्यानंतर दमणच्या सीमेवर सैन्य ठेवून दमणला लुटारूंचा उपद्रव होणार नाही याची काळजी शिवाजीराजांनी घेतली आणि त्या बदल्यातल्या चौथाईची मागणी पोर्तुगीजांकडे केली.ही मागणी रास्त असल्याचे दमणच्या नगपालिकेने ठरविले आणि त्याबाबत पोर्तुगीज विजरईसही कळविण्यात आले.१० जानेवारी १६७८ रोजी विजरईने शिवाजीराजांचा हा हक्क मान्य केला व तसे त्यांना कळविले.त्यापूर्वी १५ सप्टेंबर १६७७ रोजी त्याने वसईच्या जनरलला लिहिलेल्या पत्रात आज्ञा केली आहे की 'चौथाईची रक्कम वसूल करून ठेवावी व चौथिया राजांशी ह्या बाबतीत जसा करार केला होता तसाच करार शिवाजींशी करावा.पण शिवाजीस द्यावयाची चौथाईची रक्कम त्याने रामनगरचे संपूर्ण राज्य हस्तगत केल्यापासूनच द्यावी.त्यापूर्वी देऊ नये.' त्यानंतर हे वकील बोलणी करण्यासाठी आले होते.त्याबाबत कॅरे यांनी ही नोंद केली आहे.पण तारीख चुकली आहे.वसईचा कॅप्टन दों मानुयेल लोबु द सिल्व्हैर यांच्याकडे चौथाईसंबंधाने विचारविनिमय करण्यासाठी शिवाजीराजांनी मे १६७७ मध्ये आवजीपंत ह्याला पाठवले होते. ही चौथाई शिवाजीराजांना देण्याचे पोर्तुगीजांनी कबूल केले परंतु अनेक सबबी सांगत पोर्तुगीजांनी ही रक्कम अखेरपर्यंत दिली नाहीच.उलट सदर रकमेपैकी तेरा हजारांपेक्षा अधिक रुपये गुप्तपणे रामनगरकरास दिले.तेही शिवाजीराजांविरुद्ध लढा सुरू ठेवण्यासाठी.ह्याचा उल्लेख गोव्याच्या हंगामी गव्हर्नरच्या दि.१२ मे १६७८च्या पत्रात आढळतो.पण लिस्बन येथील आज्युदच्या ग्रंथसंग्रहालयातील एका हस्तलिखितानुसार दमण प्रांतातील चौथाईचे उत्पन्न दरसाली १२९९५ असुर्प्या असून त्यापैकी १८९८असुर्प्या वतनदारासंबंधीचा खर्च वजा जाता चौथिया राजास ९०७७ असुर्प्या राहतात,अशी ४ जून १६८३ ची नोंद आहे.ह्यावरून शिवाजीराजास पोर्तुगीजांकडून चौथाईबद्दल दरवर्षी ही रक्कम येणे होते.१६८१ च्या अखेरपर्यंत ह्या चौथाईपैकी अनामत ठेवलेली रक्कम ११७३८असुर्प्या होते अशीही नोंद आढळते.ह्यावरून १६८१ पर्यंत ही रक्कम वसूल झाली नव्हती असे दिसून येते.असरफी हा 'सेराफिन' ह्या पोर्तुगीज चांदीच्या नाण्याचा अपभ्रंश.एक रुपया म्हणजे १.४ सेराफिन तर १० रुपये म्हणजे १३ सेराफिन.