* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मौसमी पावसाच्या मागावर/On the trail of monsoon rains

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१४/८/२४

मौसमी पावसाच्या मागावर/On the trail of monsoon rains

अलेक्झांडर फ्रेटर..!!


एका दुर्मिळ व्याधीने नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या अलेक्झांडर फ्रेटर या ब्रिटिश पत्रकार लेखकाला भारतीय मॉन्सूनने आशेचा किरण दाखवला. आपलं दुःख विसरून तो या मॉन्सूनच्या यात्रेवर निघाला.

त्यांचा हा प्रवास मॉन्सूनचा अभ्यास म्हणून तर रोचक आहेच,पण आपल्याला आपल्याच देशाची नव्याने ओळख करून देणाराही आहे.


भारताच्या अर्थकारणात नैऋत्य मौसमी पाऊस मोठी महत्त्वाची भूमिका बजावतो.या पावसाच्या आगमनाचे अंदाज,त्यानुसारची त्याची वाटचाल याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं. मौसमी पावसाची नियमितता- अनियमितता हा हवामानतज्ज्ञांसाठी मोठा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय असतो.अलेक्झांडर फ्रेटर या ब्रिटिश लेखक आणि पत्रकारालाही या मौसमी पावसाने वेड लावलं.खरं तर अलेक्झांडर अगदी योगायोगानेच जगातलं सर्वाधिक पावसाचं गाव असणाऱ्या ईशान्य भारतातील चेरापुंजीला येऊन दाखल झाला होता,पण त्यानंतर त्याने इथल्या मॉन्सूनचा चक्क पाठलाग करण्याचा अचाट निर्णय घेतला. मौसमी पाऊस केरळमध्ये अवतरतो त्या सुमारास हा देखील तिथे पोहोचला आणि तिथून चेरापुंजीपर्यंत त्याने पावसाच्या प्रवासाचा मागोवा घेतला.त्या अनुभवांतून साकारलं एक विलक्षण पुस्तक- 'चेझिंग द मॉन्सून'.


अलेक्झांडर फ्रेटर आणि वादळी पाऊस यांची जोडी तशी त्याच्या जन्मापासूनचीच !त्याचे वडील स्कॉटिश मिशनरी डॉक्टर होते. अलेक्झांडरचा जन्म झाला तेव्हा ते वानुताऊ

या दक्षिण पॅसिफिक बेटावर स्थानिकांना वैद्यकीय मदत पुरवण्याचं काम करत होते.त्यादिवशी प्रचंड पाऊस पडत होता आणि वादळवारं सुटलं होतं.त्यावेळीच या बाळाने पहिला टाहो फोडला. घराला पत्र्याचं छप्पर होतं.जन्माला आल्याबरोबर ज्या बाळाने धो धो पावसाचा छपरावर होणाऱ्या आघातांचा आवाज ऐकला,त्याच्याच हातून मौसमी पावसाच्या प्रवासाचा मागोवा घेतला जाऊ

शकतो !त्यावेळी अलेक्झांडरचे वडील पॅसिफिक महासागरातील त्या द्वीपसमूहाच्या एक हजार मैल त्रिज्येच्या परिसरातले एकमेव डॉक्टर होते.बायकोचं बाळंतपण त्यांनीच केलं होतं,दुसरं कोण होतं तिथे ? तिथे होणारा पाऊस,हवेतील आर्द्रता,दिवसाचं आणि रात्रीचं तापमान यांची दैनंदिन नोंदही तेच ठेवत असत. त्यामुळे अलेक्झांडरला सोसायट्याचा वारा, सागरी वादळ वगैरे गोष्टींचं बाळकडूच मिळालं होतं.(पुढे काही वर्षांनी वडिलांनी आपल्या नोंदवह्या बघून 'तू जन्माला आलास त्यादिवशी ७ तास १३ मिनिटांमध्ये २.१ इंच पाऊस पडल्याचं' आपल्या मुलाला ऐकवलं होतं.)


वानुताऊमधल्या त्यांच्या घरात एक पेंटिंग होतं. त्याच्या खाली 'चेरापुंजी, शआसाम,द वेटेस्ट प्लेस ऑन अर्थ' असं लिहिलेलं होतं. हे पेंटिंग फ्रेटरच्या वडिलांना त्यांच्या ग्लासगोमधल्या वॅपशॉट नावाच्या शाळासोबत्याने भेट दिलेलं होतं.वॅपशॉट चेरापुंजीमध्ये स्कॉटिश मिशनमध्ये कार्यरत होता.वॅपशॉट आणि अलेक्झांडरच्या वडिलांचा पत्रव्यवहार म्हणजे हवामानविषयक वार्ताची देवाणघेवाणच असे.वॅपशॉटचं पत्र आलं की बाबा फ्रेटर अंतर्मुख बनत.चेरापुंजीला एका दिवसात पडणारा पस्तीस इंच (एक हजार पन्नास मि.मी.) पाऊस म्हणजे त्यांच्या कल्पनेबाहेरची घटना होती.अलेक्झांडरचे वडील त्या वेळी 'कधीतरी चेरापुंजीला जाऊ या' असं नेहमी म्हणत.त्यांना वाटत असे,की हवामान शास्त्राच्या दृष्टीने चेरापुंजी हे 'व्हॅटिकन' समान आहे आणि तिथे भर मॉन्सूनमध्ये पाऊसमापी घेऊन उपस्थित असणं ही पवित्र तीर्थयात्रा आहे! वॅपशॉटच्या पत्रातल्या आणखी एका घटनेचा त्यांना कायम अचंबा वाटत असे.तिथे पावसामुळे जमिनीची दलदल व्हायची.त्यामुळे मृतदेह पुरणं शक्य होत नसे.मग हे मृतदेह मधाने भरलेल्या पिंपांमध्ये ठेवले जात असत.पावसाळा संपला आणि जमीन कोरडी झाली की मग त्यांचे अंत्यसंस्कार पार पडत.)


वडिलांच्या अशा चिकित्सक,जिज्ञासू छत्रछायेखाली अलेक्झांडर वाढत होता.तो पाच वर्षांचा असताना जपानने फिलिपीन्समध्ये सैन्य उतरवलं.फ्रेटर कुटुंबीय राहत होते त्या भागातल्या सर्व ब्रिटिश नागरिकांना ऑस्ट्रेलियात हलवण्यात आलं.त्यात अलेक्झांडर,त्याची आई आणि बहीण हेदेखील होतेच.अलेक्झांडरच्या वडिलांनी मात्र ऑस्ट्रेलियात जायला नकार दिला.युद्ध संपेपर्यंत ते अमेरिकी सैनिकांवर उपचार करत युद्धक्षेत्रातच वावरले.युद्ध संपलं. युद्धात जपान्यांशी लढता लढता कोहिमा इथे वॅपशॉट मारला गेल्याची बातमी फ्रेटरना मिळाली.बातमीसोबतच वॅपशॉटची अखेरच्या दिवसांतली पत्रंही त्यांच्याकडे आली.वॅपशॉटचं प्रेत ब्रिटिश उपायुक्तांच्या बंगल्याच्या आवारात पुरलेलं होतं.वॅपशॉटलाही मधाच्या बुधल्यात ठेवला होतं का,हा प्रश्न अलेक्झांडरला ती बातमी कळल्यावर पडला होता;

पण त्या शंकेचं निरसन करून घ्यायचं त्याने टाळलं होतं. 


अलेक्झांडरच्या वडिलांनी त्यानंतर मरेपर्यंत एकदाही चेरापुंजीचं नाव पुन्हा तोंडातून काढलं नाही.त्यांनी युद्धकाळात केलेल्या सैनिकांच्या सेवेबद्दल त्यांना 'एमबीई सिव्हील' ही पदवी आणि पदक मिळालं.ते पाचव्या वर्गाचं होतं.ते पाचव्या वर्गाचं का,दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्गाचं का नाही,हा प्रश्नही अलेक्झांडरला पडत असे; पण त्याचं उत्तरही त्याने कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही.मोठेपणी अलेक्झांडर वृत्तपत्रलेखन करू लागला.पंच,न्यूयॉर्कर यासारख्या प्रतिष्ठित नियतकालिकां

साठी त्याने लेखन केलं.आपल्या लेखनकामाचा एक भाग म्हणून त्याला चिनी तुर्कस्तानातून प्रवास करावा लागला.

सागरी सपाटीपासून सरासरी दहा हजार फुटांवर असणाऱ्या भूभागातून त्याने जीपचा चित्तथरारक प्रवास केला.तिथलं काम उरकून तो काही दिवसांसाठी लंडनला आला असता एक दिवस त्याच्या पायांमधल्या संवेदनाच नाहीशा झाल्या.बूट खूप घट्ट बांधल्यामुळे किंवा वेडंवाकडं झोपल्यामुळे असं होत असावं,असा त्याने निष्कर्ष काढला.पहिल्या दिवशी फक्त पावलं बधीर होती,दुसऱ्या दिवशी गुडघ्यापर्यंतच्या पायांमधली जाणीव नष्ट झाली, तेव्हा हे काहीतरी वेगळं आहे हे त्याला जाणवलं. तरीही तो डॉक्टरकडे जायची टाळाटाळ करत होता.कारण त्याच्या मते पाकिस्तानातून काराकोरम महामार्गावरून काशगरला जाऊन परत येतानाच्या प्रवासात विषाणूबाधा होणं अशक्य नव्हतं.शिवाय त्यात कुठे तरी 'आपल्याला काय होणार?' हा फाजील आत्मविश्वासही होताच.


मात्र,ज्या वेळी हातापायांत,पाठीत आणि छातीतही मुंग्या यायला लागल्या तेव्हा मात्र अलेक्झांडर हादरला.त्याने रुग्णालयात जायचा निर्णय घेतला.प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर त्याला 'नॅशनल हॉस्पिटल फॉर नर्व्हस डिसीझेस'मध्ये दाखल करण्यात आलं.चेतासंस्थेचे इंग्लंडमधील एक ख्यातनाम तज्ज्ञ जॉन मॉर्गन-ह्यूज आणि त्यांच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली. अलेक्झांडरच्या मणक्यांमधला द्रव काढून त्याचीही तपासणी करण्यात आली.इतरही (त्याच्या मते) भयावह चाचण्या करण्यात आल्या.

त्यावरून असं निदान केलं गेलं,की अलेक्झांडरला अरनॉल्ड-चिआरी नावाची एक अत्यंत दुर्मिळ आनुवंशिक व्याधी होती आणि हिंदकुश-काराकोरम

मधील जीपच्या प्रवासातील धक्क्यांनी ती आणखी त्रासदायक बनली होती.या व्याधीवर उपाय नाही असं तज्ज्ञांचं मत बनलं.अलेक्झांडरला गळापट्टा वापरण्याचा सल्ला दिला गेला.त्याने जीपचा प्रवास टाळायला हवा,

असंही वापरण्यात आले. मात्र घरी जाण्यापूर्वी चेतासंस्थेचे शल्यशास्त्रज्ञ डॉ.डेव्हिड ग्रेट त्याला तपासतीलअसंही सांगण्यात आलं.ग्रँटनी त्याचे सर्व वैद्यकीय अहवाल काळजीपूर्वक वाचले आणि शस्त्रक्रियेने अलेक्झांडर बरा होण्याची पन्नास टक्के शक्यता वर्तवली.मात्र,शस्त्रक्रियेमुळे कायमस्वरूपी सुधारणा होईलच याची खात्री देता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.अलेक्झांडरला नैराश्याने ग्रासलं.त्याचं कामातलं लक्ष उडालं.साध्या साध्या गोष्टीही पूर्ण करणं त्याला कठीण होऊ लागलं.एकदा तो नेहमीप्रमाणे तपासणीसाठी गेलेला असताना तिथे त्याला एक उत्कृष्ट इंग्रजी बोलणारी बाप्टिस्टा नावाची गोव्याची स्त्री भेटली.तिच्या नवऱ्यालाही असाच त्रास होत होता.


हे जोडपं खानदानी श्रीमंत होतं.दर पावसाळ्यात तो केरळात उपचाराला जायचा आणि मौसमी पावसाचं स्वागत करायचा.अशी व्याधी जडलेली असूनही तो निराश मात्र वाटत नव्हता. अलेक्झांडरने त्या दोघांशी गप्पा मारायला सुरुवात केली.पाहता पाहता त्यांच्या गप्पा रंगल्या.गप्पांदरम्यान त्या स्त्रीने फ्रेटरला भारतातल्या मौसमी पावसाळ्यातल्या वाऱ्यांबद्दल ऐकवलं.तिच्या पतीने त्या वाऱ्यांचा फायदा घेऊन ग्लायडिंग क्षेत्रात केलेला पराक्रम ऐकवला.त्या ओघात मुंबईचा पाऊस,

गोव्याचा पाऊस यांची माहितीही आलीच.अलेक्झांडरने भारतातल्या पावसाचा एकदा तरी अनुभव घ्यायलाच हवा,असं आवर्जून सांगितलं.'मॉन्सून हा प्रचंड सेक्सी असतो'.तो अलेक्झांडरला म्हणाला,मॉन्सूननंतर मार्चमध्ये अनेक अनौरस मुलं जन्माला येतात.पुढे त्याच्या बायकोने पुष्टी जोडली,पावसाने पुनरुज्जीवनाचा आनंद मिळतो.

बाप्टिस्टा पती-पत्नीकडून अलेक्झांडरला कळलं,की


 एक जूनला मॉन्सून केरळात दाखल होतो,नैऋत्य मौसमी वारे त्याला उत्तरेकडे ढकलत नेतात,तो हिमालयापर्यंत प्रवास करतो आणि चेरापुंजीला कळस गाठतो. दिल्लीला मॉन्सून एकोणतीस जूनला पोहोचतो,हे फ्रेटरला सांगताना 'त्याची शाश्वती देता येत नाही' हे त्याला सांगायलाही दोघं विसरले नाहीत.


हे सारं ऐकून अलेक्झांडरची उत्सुकता चाळवली गेली आणि त्याच्या डोक्यात मॉन्सूनचा पाठलाग करण्याची कल्पना चमकून गेली. त्याने तसं त्या दोघांना बोलून दाखवल्यावर त्यांनी चमकून त्याच्याकडे पाहिलं.त्यात अवघड असं काही नाही,पण त्यासाठी त्रिवेंद्रमला सुरुवात करावी लागेल.मग त्याच्याबरोबर धावायचं.ते म्हणाले. त्यांनी आपलं व्हिजिटिंग कार्ड अलेक्झांडरला दिलं आणि त्याचा निरोप घेतला.डोक्यात चमकून गेलेल्या त्या एका कल्पनेने अलेक्झांडर इतका उत्तेजित झाला,की तो तपासणीसाठी डॉक्टरांसमोर गेला तेव्हा त्याचा आनंदी चेहरा पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं.


मान कशी आहे?" त्यांनी विचारलं


"ती आहे तशीच आहे! तिची सवय होतेय."तो म्हणाला.तो हे प्रथमच कोणाकडे तरी कबूल करत होता;पण ते खरं होतं.डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.मग विचारलं,तू मधला काळ काय करत होतास?फारसं काही नाही. ओढवलेल्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं याचा विचार करत होतो.स्वतःची कीव करत होतो.


आणि आता ?


आता मी भारतात जायची तयारी करतोय!

तो म्हणाला.


पावसाच्या प्रदेशात जायचंय,हे मनात आल्यानंतर अलेक्झांडरच्या मेंदूतल्या काही सुप्त पेशी जागृत झाल्या.त्यांनी त्याच्या बऱ्याच निद्रीस्त स्मृतींना खडबडून जागृत केलं. बालपणीच्या चेरापुंजीच्या पावसाच्या स्मृतींनी भारतात जाऊन पावसात भिजायची त्याला ओढ लागून राहिली.


मौसमी पावसाचा पाठलाग करण्याचा निश्चय झाल्यानंतर अलेक्झांडरने प्रामुख्याने मौसमी पाऊस आणि थोड्याफार प्रमाणात भारताबद्दल जी मिळेल ती माहिती वाचायला सुरुवात केली. त्या वाचनातून त्याच्या एक लक्षात आलं,की भारतात त्या आधीची दोन-तीन वर्षं मौसमी पाऊस खूप अनियमित झाला होता.लंडनमधील वृत्तपत्रांनी त्या वर्षीही पावसाची लक्षणं ठीक नाहीत,

त्यामुळे भारतात दुष्काळ पडू शकतो, अशी शक्यता वर्तवली होती.भारताच्या काही भागांत गेल्या काही वर्षांत नेहमीपेक्षा कमी पाऊस होत होता,काही भागात तो अजिबात झालेला नव्हता,तीच परिस्थिती याही वर्षी असेल,असं या बातम्या वर्तवत होत्या.


या वाचनाच्या जोडीला अलेक्झांडरने पावसासाठी भारतात कोणते उपाय केले गेले, याचीही माहिती मिळवली.पुस्तकात अलेक्झांडर अशा ऐकीव माहितीद्वारे कळलेल्या सरकारी जलसंपदा खात्यातर्फे एका योगसाधना करणाऱ्या साधूला पाऊस पाडण्यासाठी बोलावलं जाणं,व्याघ्रचर्मावर बसून त्या साधूने दोन तास चार मिनिटं ध्यान लावणं,त्यानंतर मुसळधार पाऊस होण्याचं भाकीत वर्तवण योगायोगाने त्याचवेळी कोचीनमधे मुसळधार पाऊस होणं,मग बंगलोरमधल्या अधिकाऱ्यांनी त्याला त्याबद्दल जाब विचारल्यावर त्याचं चिडणं,वगैरे वगैर अलेक्झांडरने असंही नमूद केलं आहे,की 'तो साधू भारतीय प्रशासनाने भारतीय अवकाश कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणूनही अधिकृतरित्या नेमलेला होता. भारताच्या पहिल्या अग्निबाणाचं प्रक्षेपण अयशस्वी झालं.तेव्हा त्याची नेमणूक झाली. त्याच्या आशीर्वादाने दुसरं प्रक्षेपण यशस्वी झालं.'अलेक्झांडरने लिहिलेल्या या माहितीचं मात्र मी इथे खंडन करू इच्छितो.मी गेली कित्येक दशकं मौसमी पाऊस आणि भारतीय अवकाश संशोधनाच्या बातम्या गोळा करत आलो आहे.

आकाशवाणीतर्फे श्रीहरीकोटा इथे जाऊन भारतीय अवकाश कार्यक्रम आणि एसएलव्ही-३ चं प्रक्षेपण यासंबंधी 'नवे सीमोल्लंघन' हा कार्यक्रम तयार करण्याची संधी मला मिळाली होती.त्यावेळी 'नारळ फोडणे' हा विधी सोडला तर कुठल्याही साधू वगैरेचा उल्लेख कुणी केल्याचं मला आठवत नाही. 


त्यामुळे अलेक्झांडरचं पुस्तक प्रथम वाचल्यावर मी हा विषय माझ्या परिचितांकडे काढला. त्यावेळी 'असं काहीही झालेलं नाही.डॉ. गोवारीकरांना असली थोतांडं मान्य नव्हती.असं मला सांगण्यात आलं.असो.


आवश्यक ती माहिती मिळवून मग नाणेफेक करून एक दिवस अलेक्झांडरने भारतात जायचं ठरवलं.ही गोष्ट आहे १९८७ सालची.मुंबईत उतरल्यावर त्याने प्रथम 'इंडियन एक्स्प्रेस' हे इंग्रजी वृत्तपत्र विकत घेतलं.त्यात पहिल्याच पानावर मौसमी पावसाची बातमी होती.नैऋत्य मौसमी वारे वाहायला सुरुवात झाली होती. दक्षिण अंदमानच्या आणि त्याला लागून असलेल्या सागरावरून हे वारे वाहत असले तरी ते अगदीच क्षीण होते.नेहमी मॉन्सून अंदमान द्वीपसमूहावर वीस मेच्या सुमारास जोर धरतो. या वर्षी त्याला एक आठवडा उशीर होईल,असा अंदाज वर्तवलेला होता.एअर इंडियाच्या विमानाने अलेक्झांडर त्रिवेंद्रमला पोहोचला तेव्हा मे महिन्याचा अखेरचा आठवडा होता.

अशा त-हेने केरळमध्ये मौसमी पाऊस यायच्या आधी तेरा दिवस तो केरळमध्ये येऊन दाखल झाला होता.त्यावेळी सात राज्यांत दुष्काळी परिस्थिती होती.बऱ्याच ठिकाणी दोन दिवसांतून एकदा पाणी येत होतं.


दरवर्षी भारतातील अनेक प्रमुख वृत्तपत्रांचे प्रतिनिधी त्रिवेंद्रममध्ये मौसमी पावसाच्या वार्तांकनासाठी गोळा होतात.त्यामुळे त्रिवेंद्रमची वेधशाळा जगभर प्रसिद्ध आहे.ही वेधशाळा इ.स.१८४० मध्ये त्रावणकोरच्या महाराजांनी बांधली. त्यांना पाश्चात्य विज्ञान प्रगतीबद्दल खूप कुतूहल होतं.त्रिवेंद्रममधल्या एका टेकडीच्या माथ्यावर ही वेधशाळा उभी करण्यात आली आहे.ती बांधली गेली तेव्हा नागरी वस्तीपासून दूर होती.ती उंच ठिकाणी बांधल्यामुळे पूर्वीच्या काळी जेव्हा रडार यंत्रणा किंवा उपग्रहाने घेतलेल्या प्रतिमा उपलब्ध नसत. त्यावेळी व्हरांड्यात उभं राहून दूरदर्शीच्या साहाय्याने वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना मौसमी पावसाच्या ढगांचं निरीक्षण करता येत असे. आजही भारतात मौसमी पावसाचं आगमन झाल्याची घोषणा सर्वप्रथम इथूनच केली जाते.१८५२ ते १८६९ या कालावधीत जॉन ॲलन ब्राऊन हे खगोलशास्त्रज्ञ या वेधशाळेचे प्रमुख होते.त्यांच्या प्रयत्नांनी त्रिवेंद्रमची वेधशाळा वायव्य आशियातील सर्वांत महत्त्वाची वेधशाळा बनली,असं अलेक्झांडर नमूद करतो.हटके भटके,निरंजन घाटे,

समकालीन प्रकाशन(अलेक्झांडर जरी या वेधशाळेला वायव्य आशियातील सर्वांत महत्त्वाची वेधशाळा म्हणत असला तरी एकेकाळी ती आशिया खंडातील सर्वांत प्रगत वेधशाळा होती.योगायोगाने

ती पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तावर प्रस्थापित झाली.खरंतर ती दक्षिण आशियातील वेधशाळा आहे.)जॉन ॲलन ब्राऊन यांनी या ठिकाणी कार्यरत असताना दरवर्षी पाच ते सात जून दरम्यान मृग नक्षत्रावर (याला अलेक्झांडर मॉन्सून स्टार असं म्हणतो) या ठिकाणी पाऊस येतो, याची नोंद केली.अलेक्झांडर त्रिवेंद्रमच्या या वेधशाळेत ज्युलियस जोसेफ यांना भेटला.त्यावेळी जोसेफ हे दिल्लीतील विविध मंत्रालयांना आणि जगभरच्या वृत्तपत्रप्रतिनिधींना तसंच बीबीसी

सारख्या इतर माध्यमांना मौसमी पावसाच्या प्रगतीची माहिती देत होते.पाऊस त्यावेळी श्रीलंकेच्या उत्तर भागात होता.तो केव्हाही केरळात प्रवेश करेल अशी परिस्थिती होती.जोसेफना सतत दूरध्वनीवरून होणाऱ्या चौकशांना तोंड द्यावं लागत होतं.त्यातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते अलेक्झांडरशी बोलत होते. 'हे क्षेत्र फारच नाजूक पण खदखदतं क्षेत्र आहे. मी शास्त्रज्ञ म्हणून अलिप्तपणे बोलायचा, वागायचा प्रयत्न करतो;पण लोकांच्या भावना याबाबतीत गुंतलेल्या असतात.'हे त्यांचं म्हणणं खरं होतं.

कोट्यवधी भारतीयांचं जगणं,देशाची अर्थव्यवस्था यांचा मौसमी पावसाशी घनिष्ट संबंध असतो.एकादा शब्द चुकीचा वापरला गेला तर भारतभर खळबळ माजण्याची शक्यता असते.