विज्ञानाधारित तंत्रज्ञानातून ऊर्जा,पदार्थ हाताळण्याची, त्यावर प्रक्रिया करण्याची नवनवी तंत्रे विकसित करता आली.वाफेवर चालणाऱ्या इंजिनाने मानवी श्रमांहून खूप जोरने काम करण्याच्या शक्यता निर्माण झाल्या, भराभर पाणी उपसून खूप जास्त खोलवर खणत कोळसा काढणे शक्य झाले तारयंत्राद्वारा भराभर दूरवर संदेश पाठवता येऊ लागले.ह्या साऱ्या तंत्रांतून औद्योगिक क्रान्ती होऊ शकली.तिच्या जोडीला एक नवी भांडवलशाही अर्थव्यवस्था रचली गेली.आर्थिक उत्पादनाचे तीन घटक आहेत.नैसर्गिक संसाधने,मानवी श्रम आणि भांडवल.अठराव्या शतकापर्यंत उत्तर आणि दक्षिण अमेरिका ही दोन प्रचंड खंडे पादाक्रान्त करून युरोपीयांनी भरपूर भांडवल व नैसर्गिक संसाधने आपल्या हातात आणली होती.दक्षिण अमेरिकेतील इन्का साम्राज्याचे सोन्याचे साठे लुटून युरोपात पैसाच पैसा पोचला,तर उत्तर अमेरिकेतील मूलवासीयांचे शिरकाण करत अफाट वनसंपत्ती,सुपीक शेतजमीन, खनिजे हाती आली.चणचण होती मानवी श्रमांचीच. बऱ्याच अंशी आफ्रिकेतील काळ्या लोकांना गुलाम करुन हीही भरून काढली.
युरोपीयांच्या ह्या साऱ्या भरभराटीमागे त्यांची आक्रमक वृत्ती होती.वाटेल तशी हिंसा करण्याची तयारी होती. देवाने मानवाला सारी पृथ्वी उपभोगासाठी निर्माण केली आहे ही ईसाई धर्माची शिकवण होती.अँटहिल कादंबरीतल्या काही संवादांत ह्या तत्त्वप्रणालीचे विवेचन पाहायला मिळते : ही देवाची इच्छा आहे.रेनी गंभीरपणे म्हणाला.तुम्हाला बायबलमध्ये भेटेल ते.त्यानं आपल्याला पृथ्वीचं राज्य दिलं - बसून आ वासून पाहायला नाही तर सुबत्ता वाढवायला,वंश वाढवायला.आपण राष्ट्रीय उद्यानांमध्ये बसून कविता लिहून नाही मोठे झालो.तू सेमीजपैकी आहेस.
तुझ्यात ते रक्त आहे! उगीच काहीतरी उदारमतवादी स्वप्नं पाहत भरकटू नकोस!"
हिन्द स्वराज
मुबलक भांडवल,मुबलक नैसर्गिक संसाधने ह्यांच्या आधारावर युरोपाने एक हिंसक अर्थव्यवस्था उभी केली.ही उभारत असताना एकीकडे युरोपात समता, बंधुत्व,स्वातंत्र्याचा उद्घोष चालला होता,तर दुसरीकडे अमेरिकेत मूलवासींची कत्तल चालू होती.
आफ्रिकेतील काळ्या गुलामांना अतिशय क्रौर्याने वागवण्यात येत होते.आशियात वेगळी रणनीती अवलंबिली गेली. आशियावर कब्जा करायला आल्या होत्या इंग्रज,फ्रेंच, डच व्यापारी कंपन्या.
त्यांना इथली नैसर्गिक संसाधने, कच्चा माल अगदी स्वस्तात हवा होता.आणि आपल्या मायदेशातल्या उत्पादनांसाठी बाजारपेठांवर कब्जा करायचा होता.नैसर्गिक संसाधनांवर पकड घट्ट करायला एक आधार होता,वसाहतवाद्यांचे खासे तत्त्व - विजेत्यांचा हक्क'. हा विजेत्यांचा हक्क गाजवत त्यांनी भारताच्या वनसंपत्तीवर कब्जा केला आणि ही वनसंपत्ती काळजीपूर्वक वापरणाऱ्या खेडुतांना, आदिवासींना हालअपेष्टेत लोटले.आपल्या 'शेतकऱ्यांचा आसूड' या रचनेत जोतिबा फुल्यांनी याचे मोठे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे:पूर्वी ज्या शेतकऱ्याजवळ फारच थोडी शेती असत व ज्याचा आपल्या शेतीवर निर्वाह होत नसे,ते आसपासच्या डोंगरावरील दऱ्याखोऱ्यांतील जंगलांतून उंबर,
जांभूळ वगैरे झाडांची फळे खाऊन व पळस,मोहा इत्यादी झाडांची फुले,पाने आणि जंगलांतून तोडून आणलेला लाकूडफाटा विकून,
पेट्टीपासोडीपुरता पैसा जमा करत व गावच्या गायरानाच्या भिस्तीवर आपल्याजवळ एक दोन गायी व दोनचार शेरड्या पाळून त्यांच्यावर जेमतेम गुजारा करून मोठ्या आनंदाने आपल्या गांवीच राहात असत.परंतु आमचे मायबाप सरकारचे कारस्थानी युरोपीयन कामगारांनी आपली विलायती अष्टपैलू अक्कल सर्व खर्ची घालून भलेमोठे टोलेजंग जंगलखाते नवीनच उपस्थित करून,त्यामध्ये एकंदर सर्व पर्वत, डोंगर,टेकड्या,दरीखोरी व त्याचे भरीस पडीत जमिनी व गायराने घालून फॉरेस्ट खाते शिखरास नेल्यामुळे दीनदुबळ्या पंगु शेतकऱ्याच्या शेरडास या पृथ्वीच्या पाठीवर रानचा वारा सुद्धा खाण्यापुरती जागा उरली नाही.दुसऱ्या बाजूने आपल्यासाठी बाजारपेठा खोलण्यासाठी त्यांनी अनेक क्लृप्त्या लढवल्या. बंगालातल्या विणकरांचे कापड इंग्रजांच्या मँचेस्टरच्या गिरण्यांशी स्पर्धा करत होते.ते उत्पादन बंद पाडण्यासाठी त्यांनी ढाक्याच्या विणकरांचे अंगठे तोडले.
चीनवर इंग्रजांचा प्रत्यक्ष ताबा मिळू शकला नाही.तिथे लोकांना जबरीने अफूच्या व्यसनात पाडले. चीनच्या राज्यकर्त्यांनी अफूवर बंदी घालताच अफूचा व्यापार खुला करून घेण्यासाठी लष्करी बळाचा वापर केला आणि ह्या व्यापारातून भरपूर पैसे कमावले.ह्या साऱ्या करामतीत त्यांनी भारतातील वेगवेगळ्या घटकांशी हातमिळवणी केली.पुढे मोठे पैसेवाले झालेले अनेक भारतीय व्यापारी इंग्रजांच्या अफूच्या व्यापारात सामील होते.
हे सगळे महात्मा गांधींना जाणवत होते.म्हणून ते १९०९ साली लिहिलेल्या आपल्या 'हिन्द स्वराज' ह्या पुस्तकात विचारतात 'युरोपात सभ्यता आहेच कुठे? युरोपीयांनी जे काय कमावले आहे ते सारे हिंसेच्या पोटी.त्यातले काहीही आपल्याला नकोच नको.'
असे प्रतिपादन करत महात्मा गांधींनी आपल्याला विज्ञान,
तंत्रज्ञान,यंत्रे, औद्योगिक उत्पादन हे सारेच्या सारे टाकाऊ ठरवले.
पण ह्या तत्त्वविवेचनातून प्रत्यक्षात काय कारवाई केली पाहिजे,
आज भारतीय गिरणी मालकांनी काय केले पाहिजे,असे विषय जेव्हा पुढे येतात तेव्हा महात्मा गांधींच्या मांडणीची धार अगदी बोथट बनते.
सेनापती बापट
एका दृष्टीने महात्मा गांधींच्या तत्त्वविवेचनाची सत्त्वपरीक्षा झाली मुळशी आंदोलनात.सह्यगिरी महाराष्ट्राचे उदकभांडार आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि पश्चिम उतारांवर जो प्रचंड पाऊस कोसळतो त्याने गोदावरी,भीमा,कृष्णा ह्या पश्चिमवाहिनी नद्या आणि त्यांच्या उपनद्या भरभरून वाहतात.हे पाणी साठवून एक तर ते दक्खन पठारावरच्या कमी पावसाच्या प्रदेशाला पाणीपुरवठा करता येतो,किंवा झपाट्याने कोकणात खाली उतरवून त्यातून वीज निर्माण करता येते.शेतीसाठी,शहरांना पाणी पुरवण्यासाठी छोटे-मोठे बांध अनेक शतकांपासून बांधले गेले आहेत.दीड दोन हजार वर्षांपासून दक्षिण भारतात तलावांची जाळीच्या जाळी उभारण्यात आली. पेशव्यांनी कात्रज जवळ तलाव बांधून पुण्याला पाणी पुरवठा केला.पण इंग्रजांनी आधुनिक तंत्रे वापरून खूपच मोठी धरणे बांधणे सुरू केले.पुण्याला पाणी पुरवण्यासाठी आणि शेतीसाठी असे एक मोठे धरण पुण्याच्या पश्चिमेला १८७९ साली खडकवासल्याला बांधले.मग जशा मुंबईत गिरण्या आल्या,वस्ती वाढू लागली,तशी घाटमाथ्याजवळ साठवलेले पाणी पश्चिमेला उतरवून वीज निर्माण करण्याची कल्पना निघाली.पोलादाचे उत्पादन सुरू करणाऱ्या टाटांनी १९११ मध्ये जलविद्युत ऊर्जा कंपनी स्थापन करून लोणावळ्याजवळ दोन धरणे बांधून पाण्यापासून वीज उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली.
लोणावळ्याची धरणे जिथे बांधली,तिथे मुख्यतःराहात होते धनगर आणि ठाकर.टाटांनी ह्यांना ना विचारले,ना पुसले. नुकसानभरपाईची बातच सोडा.सरकारच्या पूर्ण पाठिंब्यावर जागा ताब्यात घेतली,धरणे बांधली.मूळचे मालक मुकाट्याने निघून गेले.मग तिसरे धरण बांधायला निघाले मुळशी पेट्यात.हा प्रदेश आंबेमोहोर तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होता.इथली बरीचशी जमीन पुण्यातल्या सुशिक्षित वर्गातल्या लोकांच्या मालकीची होती.ती कसत होते स्थानिक कष्टकरी,मराठ्यांच्या इतिहासात शिवाजीचे सैनिक म्हणून मानाचे स्थान असलेले मावळे.इथेही टाटांचे इंजिनिअर सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने मालकांना न पुसता - न विचारता सरळ शेतांत घुसले,चर खणू लागले.पण अनेक जमीन मालक होते भारतीय असंतोषाचे जनक समजल्या जणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुण्यातले. शेतजमीन अन्यायाने हिरावून घेतली जात आहे म्हणून आंदोलन उभे राहिले.त्याचे नेतृत्व केले सेनापती म्हणून लोकांनी पदवी बहाल केलेल्या पांडुरंग वामन बापटांनी. सेनापती होते संघटन कुशल,प्रभावी लेखक,वक्ते, विचारवंत.अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी (वारुळ पुराण,माधव गाडगीळ,ई.ओ.विल्सन,संक्षिप्त अनुवाद-नंदा खरे)निःस्वार्थीपणे जीव ओतून काम करणारे.
मढेकरांच्या शब्दात आयुष्य अक्षरशःवितळवून समाजाच्या भल्यासाठी झटणारे.
कुणि मारावे,कुणी मरावे,
कुणी जगावे खाउनि दगड;
वितळवून कुणि आयुष्यांना
ओतावे अन् सोन्याचे घड.
राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!