कुठलंही प्राणिसंग्रहालय सहसा जंगली प्राण्यांसाठी असतं.पण अनेकदा आमच्यावर 'रेस्क्यू' केलेल्या प्राण्यांना सांभाळण्याची तात्पुरती जबाबदारीही येऊन पडायची.एकदा असंच झालं.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कोंडवाड्यामध्ये तीन-चार भटक्या गाईंना दाखल केलं गेलं होतं.त्यातली एक गाय गाभण होती आणि तिचे दिवस भरत आले होते.मध्यरात्री कधी तरी त्या गर्भार गाईला प्रसववेदना सुरू झाल्या आणि पहाटे तिने एका सुंदर,गोंडस वासराला जन्म दिला. सकाळी सकाळी या गुरांचे मालक कोंडवाड्यात आपापली गुरं सोडवण्यासाठी जाऊन पोहोचले. त्या गर्भार गाईच्या मालकाला कामगारांनी तिचं वासरू दाखवलं आणि त्याचा दंडही भरायला सांगितलं.ते वासरू होतं खोंड.त्या मालकाच्या दृष्टीने निरुपयोगी.त्याने ते वासरू घेऊन जायचं साफ नाकारलं.कालवड असती तर दंड भरूनही नेलं असतं.
पण हा बिनकामाचा बैल;कशाला नेऊ, असं त्याचं म्हणणं.
मालक गाईला टेम्पोत घालून चालता झाला,तेव्हा नुकत्या जन्मलेल्या वासराला एकटं सोडून जाताना त्या गाईने कसा हंबरडा फोडला असेल विचार करा.तिचं हंबरणं ऐकून वासरूही खूप तडफडलं,खूप वेळ ओरडलं;पण आपली आई परत येत नाही,असं बघून तिथल्याच गवताच्या भाऱ्यावर झोपी गेलं.आख्खा दिवस त्याने झोपून काढला.त्या रात्री कडाक्याची थंडी होती. त्यामुळे पहाटेच जाग येऊन ते वासरू भुकेने कळवळलं होतं.पालिकेचे अधिकारी राऊंडवर कोंडवाड्यात पोहोचले,तेव्हा ते तान्हं बेवारस वासरू पाहून त्यांनाही खूप वाईट वाटलं.
त्यांनी त्या वासराला ताबडतोब आमच्या पार्कमध्ये पाठवण्याचा आदेश दिला.त्यानंतर तासाभरातच ते वासरु आमच्याकडे आलं.तेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ही सगळी हकीकत आम्हाला समजली.आम्ही त्याचं नाव ठेवलं झुमरू.छोटे कान, गोंडा असलेली छोटीशी शेपटी.त्याच्या कपाळावर मधोमध पाढऱ्या रंगाचा एक सुरेख चांदवा.फारच गोड वासरू होतं ते.पण एवढं तान्हं दूधपितं वासरू सांभाळायचं म्हणजे आमची कसरतच होती. शिवाय जन्मल्या जन्मल्या ते उपाशी राहिलं होतं. आम्ही त्याच्यासाठी दूध आणि पाणी उकळून घेतलं.लहान बाळाच्या दूध पिण्याच्या बाटलीतून ते त्याला देण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली.बूच त्याच्या तोंडात सरकवलं,पण ते त्या चोखता येईना. एकदोनदा अयशस्वी प्रयत्न करून त्याने हताशपणे मान टाकली आणि बराच वेळ ते नुसतं पडून राहिलं.त्याला त्याच्या आईची उणीव भासत असणार.मग मी थोडं डोकं लढवलं.गरम पाण्यात टर्किश टॉवेल बुडवून त्याने वासराचं अंग पुसून काढलं.त्याच्या आईच्या उष्ण जिभेसारखाच त्याचा स्पर्श असेल असा माझा अंदाज होता.ही तरकीब उपयोगी पडली असावी.मी बाटलीचं बूच तोंडात दिल्यावर वासराने ते अधाश्यासारखं ओढायला सुरुवात केली.चार-पाच वेळा दुधाऐवजी तोंडात फक्त हवा गेल्यामुळे त्याला चांगलाच ठसका लागला.पण लवकरच त्याला बाटली कशी चोखायची याचा शोध लागला.पुढच्या १०-१५ मिनिटांत अर्धा लिटर दूध त्याच्या पोटात गेलं आणि आमचा जीव भांड्यात पडला.पोट भरल्यावर ते वासरू सरळ आमच्या बेडरूममध्ये घुसलं आणि आमच्या दोघांच्या मध्ये येऊन पहुडलं.झोपण्यापूर्वी त्याच्या थोड्याफार 'हम्मा हम्मा' अशा हाका मारून झाल्या.आम्हाला त्या अम्मा अम्मा अशाच ऐकू येत होत्या.तेजसच्या अम्मीने त्याला कुशीत घेतलं आणि 'झोप रे झुमरू' असं म्हणत दामटून थोपटलं. जादू झाल्यासारखा झुमरू शांतपणे झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी झुमरू आमच्याही आधी उठून थेट बाथरूममध्ये गेला,भळकन मुतला आणि शेणाचे गोळे टाकून स्वतःचंच घर असल्याच्या आविर्भावात घरभर फिरू लागला.
बाथरूममध्ये जाऊन हे प्रातर्विधी करावेत ही अक्कल त्याला कशी आली कुणास ठाऊक! पण आता गडी पुन्हा एकदा भुकावला होता.आदल्या दिवशीप्रमाणेच त्याला दूध-पाणी मिसळून बाटलीने पाजलं.गडी खूष! झुमरू आला तेव्हा आमच्याकडे पाशा आणि पिंटू नावाचे दोन कुत्रे होते.पाशा होता ग्रेट डेन जातीचा,पिंटू साधा गावठी.दांडगा असूनही पाशा खूप आज्ञाधारक होता आणि हुशारही.आम्ही म्हटलं,झुमरूला रुळवण्यासाठी त्याचा उपयोग होतो का बघावं.पाशाला चुचकारत घरामध्ये बोलावलं आणि प्रेमाने समजावत झुमरूजवळ नेलं.
पाशानेही समजुतीने झुमरूला प्रेमानं चाटलं आणि झुमरू अलगद आमच्या कुटुंबात सामील झाला. संध्याकाळी घराच्या आवारात पाशा-पिंटू वगैरेंसोबत आमचा खेळ रंगत असे.दूरवर फेकलेला चेंडू पळत जाऊन आमच्याकडे आणून द्यायचा,हा त्या दोघांचा आवडता उद्योग.आता झुमरूही आमच्या या खेळामध्ये सामील होऊ लागला. आपले छोटे कान हलवत खुरांवर उड्या मारत तो सर्वांबरोबर हुंदडायचा.
आपल्या लहानग्या शेपटीचा गोंडा उडवत मस्ती करणाऱ्या झुमरूला बघायला आम्हाला भारी मजा वाटायची.
संध्याकाळी खेळ संपला की पिंटू आणि पाशा त्यांचं जेवण मिळेपर्यंत बाहेरच्या ओट्यावर शांतपणे बसून असत.
तेजसचा अभ्यास चालू असे. मी आणि प्रतिभा टेलिव्हिजनवरची एखादी मालिका पाहत असताना आम्हा दोघांच्या अगदी मध्येच हक्काने पाय दुमडून बसून टी.व्ही.वरचे लोकप्रिय कार्यक्रम आमच्याबरोबरच पाहायला लागला होता.एक-दोन आठवडे असेच गेले.झुमरू रुळला.छान वाढू लागला.सकाळच्या दूधानंतर दुपारी लंचटाइममध्ये संपत,राऊत किंवा गणपत या माझ्या सहकाऱ्यांपैकी कोणी तरी आमच्या घरी येऊन त्याला दूध पाजून जात असे.हळूहळू त्याचा आहार चांगलाच वाढला.
दोन-अडीच लिटर दूधही त्याला कमी पडू लागलं.
आम्ही त्याला हिरवा चारा,आजूबाजूचं कोवळं गवत द्यायला सुरुवात केली. त्याची पहिली भुकेची वेळ साधून चाऱ्यामध्ये फळभाज्या,धान्य मिसळून ठेवू लागलो.सुरुवातीला तो या जेवणाकडे ढुंकूनही पाहत नसे. खूप भूक लागली तरच तो भाजीचे तुकडे खात असे.नंतर मात्र कोवळा हिरवा चारा तो अगदी आवडीने खाऊ लागला.पुढे त्याची भूक इतकी वाढली की त्याला जे खाण्यायोग्य दिसेल ते तो गट्टम करून टाकायचा.एकदा गंमतच झाली.दुपारी जेवणाच्या वेळी मी घरी आलो,तेव्हा प्रतिभा डोक्याला हात लावून एकटीच हसत बसली होती.म्हणाली,आज आपल्याला हॉटेलमधनं पार्सल आणावं लागणार.घरात कुठलीच भाजी करता येणार नाही.
कारण सगळं गोडतेल संपलंय.मला कळेना,परवाच महिन्याभराचं किराणा सामान भरलं असताना सगळं तेल कसं संपलं? मग उलगडा झाला.झुमरूला सकाळी सकाळी तेलाच्या बरणीचा शोध लागला होता आणि त्याने सगळं तेल पिऊन सफाचट केलं होतं. मी डोक्याला हात मारून घेतला.आम्ही बाहेर जाऊन मिसळ-पाव खाऊन आलो.
येताना तेलाच्या पिशव्या आणून त्या सरळ फ्रिजमध्ये लपवून ठेवल्या.पण एवढं गोडंतेल पचवूनही झुमरू मजेत होता.त्याचं असं मिळेल त्या पदार्थावर डल्ला मारणं पुढेही सुरू राहिलं.
मळून ठेवलेल्या कणकेचे गोळे तो गायब करायचा.बनपाव गायब व्हायचे.दूध तर वर राहिलं की संपलं म्हणूनच समजा.
झुमरूला खायला कमी पडतं होतं म्हणावं,तर तसंही नव्हतं. पण छोट्या मुलाप्रमाणे जे दिसेल ते चाखून बघण्यात आणि आवडलं की त्याचा फडशा पाडण्यात त्याला मजा येत होती.(सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन )
एके दिवशी दुपारी घरी आलो,तर घराभोवतीची जास्वंद आणि तुळशीची रोपं फुलांसकट गायब झालेली.आमचा निरागस चोर आता चांगलाच सोकावला होता.त्याला आवर घालणं गरजेचं होतं. काय करावं याचा विचार करत असतानात एकदा आमचा इन्स्पेक्टर मित्र दारा इराणी चहासाठी घरी आला.तेव्हा झुमरू आमच्या दोघांच्या मध्ये बसून आरामात टीव्ही बघत होता.झुमरूचे इतर उद्योगही त्याच्या कानावर होतेच. तो म्हणाला,अरे, एवढ्या लाडाने हा बैलोबा ऐदी होईल ! त्यापेक्षा मी त्याला शेतावर घेऊन जातो.थोडंफार काम तरी शिकेल." आम्हालाही ते पटलं.झुमरू अंगानेही वाढायला लागला होता.त्याला घरात ठेवणं आम्हाला अवघड झालं असतं,आणि प्राणिसंग्रहालयात तरी बैलासाठी कशी जागा करणार? त्यामुळे त्याच संध्याकाळी झुमरू इन्स्पेक्टर साहेबांच्या गाडीतून त्यांच्या शेतावर राहायला गेला तो कायमचाच !
पण संध्याकाळी मी आणि प्रतिभा टीव्ही बघायचो, तेव्हा पायाशी झुमरू बसलाय असं उगाचच वाटायचं…!
मोठ्यांचे मोठेपण..!!
तो बायकोसोबत खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेला… सतत संशोधनात गुंतलेला आणि व्याख्यानाच्या निमित्तानं जगभर हिंडणारा नवरा आज शाॅपिंगला सोबत आलाय म्हटल्यावर बायकोनं जरा ढिल्या हातानंच खरेदी करायला
सुरुवात केली…!
बिल द्यायची वेळ आली तेव्हा ह्या नवऱ्यानं दुकानदाराला चेक दिला.
बायकोच्या मनात शंकेची पाल चुकचुकली... त्याच्या दंडाला धरून बाजूला घेत ती कानात कुजबुजली,
"अहो! मोठ्या ऐटीत चेक दिलात... पण तुमच्या अकाऊंटमध्ये तेवढे पैसे आहेत का?"
अगोदरच पिंजारलेल्या केसांत हात फिरवत,डोळे विस्फारत तिच्याकडे बघत तो गोड हसला पण 'पैसे आहेत की नाहीत' याचं उत्तर काही दिलं नाही !
घरी येत असताना बायकोच्या डोक्यात शंकांचं जाळं विणलं जात होतं...
'आपला नवरा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असला तरी कधीकधी हा घरचा रस्ताही विसरतो... असल्या विसरभोळ्या नवऱ्याच्या अकाउंटला खरंच पैसे असतील का?' नसतील,तर दुकानदार याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करेल का? बरं... पैसे असतील,तर यानं आजपर्यंत माझ्यापासून का बरं लपवले असतील?'
एक ना अनेक विचार करत ती बाई आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारून भंडावून सोडत होती.
शेवटी तो म्हणाला,...
"अगं! माझ्या अकाउंटला पैसे असले काय अन् नसले काय,काही फरक नाही पडणार...कारण तो दुकानदार तो चेक बॅंकेत टाकणारच नाही !"
आता मात्र तिला चक्कर यायची तेवढी बाकी राहीली होती. ती _'आ'_ वासून नवऱ्याकडे बघत राहिली.
तेव्हा तो म्हणाला,
_"अगं वेडे,त्या चेकवर 'माझी' सही आहे...आणि माझी सही असलेला चेक दुकानदार बॅंकेत तर टाकणार नाहीच,पण फ्रेम करून दुकानात मात्र नक्की लावेल!"_
आणि खरोखर तस्संच घडलं!
अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला हा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होता...अल्बर्ट आईन्स्टाईन!
Let's salute this genius