* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: झाडावरची रात्र / Night in the tree

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३/१०/२४

झाडावरची रात्र / Night in the tree

पाईनच्या वृक्षावरची रात्र…


दुसऱ्या दिवशी इबॉटसन पौरीला परतला. तिसऱ्या दिवशी सकाळी मी रुद्रप्रयागच्या पूर्वेकडच्या काही गावांना भेट देत असताना एका गावात जाणाऱ्या पायवाटेवर मला बिबळ्याचे पगमार्कस मिळाले.रात्री त्याच गावातल्या एका घरात घुसण्याचा त्याने प्रयत्न केला होता.त्या पगमार्कसचा माग काढत दोन मैल गेल्यावर मी काही दिवसांपूर्वी इबॉटसन बरोबर बोकड बांधून बसलो होतो त्या ठिकाणावर आलो.अगदी सकाळची वेळ असल्याने मला वेळ भरपूर होता व तिथल्या ओबडधोबड जमीनीवरच्या एखाद्या खडकावर तो बिबळ्या ऊन खात बसलेला असण्याची शक्यता होती.त्यामुळे मी एका थोड्या पुढे आलेल्या शिळेवर आजूबाजूला दिसणाऱ्या विस्तीर्ण टापूवर नजर ठेवून पालथा पडून राहिलो.

आदल्या दिवशी थोडा पाऊस पडून गेल्याने वातावरणातला सगळा धूसरपणा निघून गेला होता आणि खूप लांबवरचं स्वच्छ व स्पष्ट दिसत होतं.जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी तेवीस हजार फूट उंच पहाडावर अप्रतिम निसर्गाचं सौंदर्य जसं दिसू शकेल तसंच इथूनही दिसत होतं.माझ्या बरोबर समोर खालच्या बाजूला अलकनंदाचं निसर्गरम्य खोरं दिसत होतं.त्याच्यामधून ती नदी नागमोडी वळणं घेत एखाद्या चंदेरी रिबीनसारखी सळसळत जात होती.


अलकनंदाच्या पलीकडे इकडे तिकडे विखुरलेली छोटी छोटी गावं व त्यातली रस्त्याच्या दोन्ही अंगाला असलेली पाटीच्या छपरांची घरं दिसत होती.काही घरं फक्त गवती छपरांची होती.खरंतर ह्या इमारती म्हणजे त्यांची रांगेत बांधलेली घरंच आहेत.हा पहाडी इलाका असल्याने लागवडी योग्य जमीन एकतर कमी असते व त्याचा इंचन् इंच इथल्या गरीब जनतेला मूल्यवान असल्याने जागेची बचत करण्यासाठी अशी एकमेकांना खेटून घरं बांधली जातात.डोंगररांगांच्या वर मोठमोठे हिमकडे आहेत आणि त्यातून हिवाळ्यात किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीला अवाढव्य ॲव्हेलँचीस कोसळतात.त्याहीपलीकडे आकाशाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या पांढऱ्या शुभ्र पुठ्यातून कापून काढल्यासारख्या हिमालयाच्या रांगा दिसतात. यापेक्षा सुंदर दूश्याची कल्पनाही करता येणार नाही.पण सूर्य जसजसा पश्चिमेला पहाडा पलीकडे जाईल तसतशी वाढत जाणारी दहशत... प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कल्पनाच करता येणार नाही अशी जबरदस्त दहशत,या संपूर्ण इलाक्यावर आपली पक्कड घेणार होती.गेली आठ वर्षे अव्याहतपणे हेच चालू होतं.


मी खडकावर बसून तासभर झाला असेल तशी दोन माणसं डोंगरावरच्या त्यांच्या गावातून खाली बाजाराच्या दिशेने उतरताना मला दिसली.मी कालच यांच्या गावाला भेट दिली होती.मला पाहिल्यावर ती थांबली आणि सांगितलं की,सूर्य उगवण्याच्या जरासं अगोदर त्यांनी याच दिशेकडून बिबळ्याचे कॉल्स ऐकले होते.एखादा बोकड बांधून नशीब अजमावावं का नाही याबद्दल आम्ही जरा चर्चा केली.माझे सर्व बोकड वेळोवेळी बिबळ्याने उचलल्याने याक्षणी माझ्याकडे बोकड नव्हता तेव्हा ते म्हणाले की आम्ही बोकड पैदा करतो आणि सूर्यास्ताच्या अगोदर दोन तास याच ठिकाणी भेटतो.


(मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन)


माणसं गेल्यावर मी जवळपास बसायला एखादं योग्य झाड आहे का ते बघितलं.या सर्व भागात एक पाईनचं झाड एकटंच उभं होतं.ती माणसं ज्या वाटेने गावाकडून आली होती त्या वाटेवरच डोंगराच्या कडेला ते उभं होतं. त्याच्याबरोबर खालून आणखी एक वाट निघून डोंगराच्या अंगावरून त्या ओबडधोबड खणलेल्या भागाच्या कडेने जात,मी जिकडे होतो तिकडे येत होती. झाडावरून खूप विस्तीर्ण प्रदेश दिसणार होता. पण ते चढायला फारच अवघड होतं आणि त्याची पानंही दाट नव्हती.पण तेवढं एकच झाड असल्याने माझ्याकडे पर्याय काहीच नव्हता त्यामुळे मी त्याच झाडावर बसण्याचा निर्णय घेतला.मी बंगल्यावर जाऊन चार वाजता परत आलो तेव्हा ती माणसं एका बोकडाला घेऊन तिथे उभीच होती.मी कुठे बसणार आहे या त्यांच्या प्रश्नावर जेव्हा मी त्या झाडाकडे बोट दाखवलं तेव्हा ते हसायलाच लागले.त्यांचं म्हणणं होतं की दोराच्या शिडीशिवाय त्या झाडावर चढणं अशक्य आहे आणि जरी मी ते जमवलं तरी बिबळ्यालाही ते शक्य असल्यानं मला धोका होताच.गढवालमध्ये झाडावर चढता येणारे दोनच गोरे लोक होते (इबॉटसन त्यापैकी एक) व त्या दोघांनाही लहान असताना पक्ष्यांची अंडी जमवण्याचा शौक होता. 'waiting untill you come to a bridge before crossing it' या इंग्लिश म्हणीचं हिंदीत भाषांतर करता येणं शक्य नसल्याने मी त्यांचा पहिला प्रश्न अनुत्तरीतच ठेवला.दुसऱ्या शंकेला मात्र फक्त रायफलकडे बोट दाखवून उत्तर दिलं.


जवळजवळ वीस फुटापर्यंत त्या झाडाला फांद्याच नसल्याने त्या झाडावर चढणं खरोखरच अवघड होतं पण एकदा तिथे पोचलं की मग मात्र पुढे सर्वच सोपं होतं.

माझ्याकडे एक लांब दोर होता.त्याच्या एका टोकाला त्या माणसांनी माझी रायफल बांधल्यावर दुसऱ्या टोकाकडून मी वर ओढून घेतली आणि नंतर मी अगदी शेंड्याला जाऊन बसलो.या ठिकाणी मात्र पाईनच्या सुयांसारख्या पानांच्या झुपक्यांमुळे मला लपायला बऱ्यापैकी जागा मिळाली.हा बोकड चांगला 'आवाजी' आहे असं आश्वासन मला त्या माणसांनी दिलं आणि झाडाखालच्या जमीनीवर आलेल्या मुळांना त्याला बांधल्यावर ती माणसं निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती परत येणार होती. माणसं दृष्टिआड होईपर्यंत तो बोकड त्या दिशेला पाहत होता व त्यानंतर त्याने झाडाखालचं गवत खायला सुरुवात केली.या क्षणापर्यंत तो एकदाही ओरडला नव्हता याची मला तेव्हा तरी काळजी वाटली नाही कारण थोड्या वेळाने त्याला एकटेपणाची जाणीव होईल आणि तो त्याचं काम चोख बजावेल असं मला वाटलं.जर तसं झालं तर मात्र माझ्या उंचावरच्या जागेवरून मला चांगली संधी मिळणार होती.मी जेव्हा झाडावर जागा घेतली तेव्हा हिमाच्छादित शिखरांच्या सावल्या अलकनंदापर्यंत पोचल्या होत्या.


हळूहळू त्या डोंगरावरून सरकत सरकत माझं झाड ओलांडून गेल्या व शेवटी सर्व पहाडांची शिखरं लाल रंगात न्हाऊन निघाली.ही लाल रंगाची चमक कमी होऊ लागली आणि जिकडे जिकडे सूर्याच्या क्षितिज समांतर येणाऱ्या किरणांनी पहाडांना स्पर्श केला होता,तिथून ते प्रभा फाकू लागले आणि रंगीबेरंगी ढगांमध्ये त्यांच्या सुंदर रंगांनी बंदिस्त झाले.ज्यांना ज्यांना सूर्यास्ताची मजा घेण्याची नजर आहे (सांगताना वाईट वाटतं पण असे लोक फार थोडे आहेत) त्यांना त्यांच्या त्यांच्या भागातला सूर्यास्त हा सर्वोत्कृष्ट वाटतो.मीही त्याला अपवाद नाही कारण मलाही असंच वाटतं की आमच्या गढवाल-कुमाऊंमधल्या सूर्यास्ताला जगात तोड नाही.त्यानंतर विचाराल तर उत्तर टांगानिका मधल्या सूर्यास्ताला मी दुसरा नंबर देईन.तिथे वातावरणातल्या काहीतरी वैशिष्ट्यांमुळे किलीमांजारोची हिमाच्छादित शिखरं आणि त्यावर नेहमीच तरंगणारे ढग सूर्यास्तात अक्षरशः वितळलेल्या सोन्यासारखे दिसतात.

आमच्या हिमालयामधले सूर्यास्त बहतेक करून लालसर गुलाबी किंवा सोनेरी असतात.आज पाईनच्या झाडावरून मी जो सूर्यास्त पाहत होतो वा गुलाबी रंगाचा होता. कापलेल्या पुठ्यांसारख्या दिसणाऱ्या पहाडांच्या खोलगट दऱ्यातून निघालेले पांढरे किरण गुलाबी ढगांमधून आरपार जाऊन पुढे मोठे मोठे होत आकाशात विलीन होत होते.बऱ्याच माणसांप्रमाणे त्या बोकडाला देखील सूर्यास्तामध्ये वगैरे स्वारस्य नसावं ! तोंड पोचेल तिथपर्यंत गवत खाल्ल्यानंतर त्याने खुराने उकरून स्वतःसाठी थोडा खळगा तयार केला, खाली बसला,अंग दुमडलं व गाढ झोपी गेला!आता मात्र गंभीरपणे विचार करायची वेळ आली होती.माझ्या झाडाखाली निवांत झोपलेल्या बोकडाकडून मी अपेक्षा केली होती की तो ओरडून बिबळ्याला आकर्षित करेल,पण मी त्याला पाहिल्यापासनं त्याने गवत खाताना सोडलं तर एकदाही तोंड उघडलं नव्हतं आणि आता इतका सुंदर उबदार बिछाना मिळाल्यावर तो कदाचित रात्रभर झोपून राहण्याची शक्यता होती. आता रात्री झाडावरून उतरून चालत बंगल्यावर जाणे म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये जाणूनबुजून अजून एकाची भर टाकण्यासारखं होतं; आणि तसं पाहिलं तर समोर भक्ष्य नसताना सगळ्याच जागा सारख्या होत्या म्हणून मी ठरवलं की आहे तिथंच थांबायचं आणि बिबळ्यालाच स्वतःकडे बोलवायचं !

मला जर कोणी विचारलं की इतकी वर्ष जंगलात घालवल्यानंतर मला सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट कोणती तर मी सांगेन की जंगलवासींच्या भाषा व त्यांच्या सवयी शिकताना मला सर्वात जास्त आनंद मिळाला आहे.

जंगलांमध्ये एकच अशी भाषा नसते,प्रत्येक प्रजातीला स्वतःची भाषा आहे आणि जरी काही प्रजातींची शब्दसामग्री मर्यादित असली तरी (साळींदर किंवा गिधाडं) एकाची भाषा दुसऱ्याला समजू शकते.माणसाचं स्वरयंत्र इतर जनावरांपेक्षा लवचिक असतं (रॅकेट टेल्ड ड्रोंगोसारखे काही पक्षी यालाही अपवाद आहेतच) त्यामुळे तो बऱ्याच पशुपक्ष्यांशी संवाद साधू शकतो. जंगलवासींची भाषा बोलता येणे ही गोष्ट तुमच्या आनंदात शंभरपटींनी भर टाकतेच पण जर ठरवलं तर त्याचा चांगला उपयोगही करून घेता येतो.एक उदाहरण पुरेसं होईल...अगदी आता आता पर्यंत ईटन येथे हाऊसमास्टर असलेला लिओनेल फोर्टेस्क व मी एकदा फोटोग्राफी आणि शिकारसहलीसाठी १९१८ च्या सुमारास हिमालयाच्या सफरीवर गेलो होतो.संध्याकाळी आम्ही एका उंच पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या फॉरेस्ट बंगल्यामध्ये पोचलो.आम्हाला "Vale of Kashmeer" या ठिकाणी पोचायचं होतं. 


ते ठिकाण या उंच पहाडाच्या पलीकडे होतं. आम्ही खूप दिवस अवघड वाट तुडवली होती आणि आमचं सामान वाहणाऱ्या माणसांना आता विश्रांतीची गरज होती त्यामुळे आम्ही ती रात्र बंगल्यावरच काढायचं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी फॉर्टस्क त्याच्या नोंदी करण्याच्या कामात व्यग्र असल्याने मी जरा पहाडावर फेरफटका मारून "रेड काश्मिर डियर" मिळतंय का ते पहायचं ठरवलं.मला कित्येक लोकांनी सांगितलं होतं की स्थानिक अनुभवी शिकाऱ्यांच्या मदतीशिवाय काश्मिरी हरणं मिळणं शक्य नाही. फॉरेस्ट बंगल्याच्या चौकीदारानेही या मताला दुजोरा दिला होता.मला तर ही काश्मिरी डिअर्स नक्की कोणत्या उंचीवर मिळतात याचीही कल्पना नव्हती,पण तरीही मला संपूर्ण दिवस मोकळा मिळाला असल्याने माझा मीच प्रयत्न करायचं ठरवलं.हा पहाड बारा हजार फूट उंच होता आणि त्याच्यावरूनच काश्मिरला जाणारा 'पास' होता.साधारण आठ हजार फूट चढून वर आल्यानंतर वादळ सुरू झालं.ढगांच्या रंगावरूनच मी ओळखलं की बहुतेक आज आपल्याला गारपीटीचा सामना करावा लागणार. मी आतापर्यंत गारपीटीमुळे आणि त्यावेळेला हमखास पडणाऱ्या वीजांमुळे कित्येक जनावरं आणि माणसं दगावलेली पाहिली आहेत. 


त्यामुळे झाडाची निवड मी अतिशय काळजीपूर्वक केली.

उतरत्या डेऱ्याची,मोठी व फर सारखी झाडं सोडली आणि दाट पानोळा व गोल माथा असलेलं एक छोटंसं झाड निवडलं. त्यानंतर जवळपास फिरून वाळकी लाकडं व फरचे कोन जमा करून झाडाखाली मस्तपैकी शेकोटी पेटवली.जवळजवळ तासभर वीजा चमकत होत्या,

गडगडाट होत होता आणि गारपीट होत होती पण मी झाडाखाली सुरक्षित व उबदार राहिलो.गारपीट थांबल्याबरोबर सूर्य ढगाबाहेर आला आणि झाडाखालून उठून बाहेर आल्यावर मला साक्षात पऱ्यांच्या राज्यात पाऊल टाकल्याचा भास झाला.जमीनीवर पडलेल्या असंख्य गारांमुळे लाखो बिंदूवरून सूर्यकिरणं परावर्तीत होत होते आणि त्यात गवताची ओली पाती आणि चमचमणारी पानं भर टाकत होती.तसाच पुढे दोन ते तीन हजार फुटाचा चढ़ चढून मी डोंगरातून पुढे आलेल्या एका मोठ्या शिळेपर्यंत येऊन पोचलो. या शिळेच्या खाली निळ्या पहाडी अफूचा ताटवा होता.हिमालयातील ही सर्वांत सुदंर रानफुलं आहेत.गारपीटमुळे त्यांचे देठ जरी मोडलेले असले तरी शुभ्र बर्फाने आच्छादलेल्या जमीनीवर विखुरलेली ती आकाशी रंगाची फुलं म्हणजे अविस्मरणीय दृश्य होतं.


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!