१५.१०.२४ या लेखातील शेवटचा भाग…!
साने गुरुजींनी ह्यांच्या १९३९ पर्यंतच्या जीवनाची कहाणी लिहिली आहे : केसरी कचेरीत सेनापती १९१५ साली काम करू लागले. १९१७ साल आले.
रशियातील क्रांतीची पहिली बातमी आली होती.केसरी कचेरीतील काही म्हणाले,"कसली क्रांती नि काय, संस्कृतीची सारी होळी केली त्यांनी.शिमगा सुरू केला आहे बेट्यांनी." सेनापती म्हणाले, कोट्यवधी श्रमजीवींच्या संसारांची होळी होत होती तेथे आता दिवाळी येत आहे.प्रत्येकाचा विकास होईल.सर्वांच्या जीवनात आनंद व प्रकाश होईल. मी हा दिवस साजरा करतो." असे म्हणून त्यांनी डाळे मुरमुरे आणले. लोक हसले. ते म्हणाले, "हे लेनिनमिक्श्चर आहे. श्रमजीवी जनतेच्या क्रांतीच्या दिवशी असलाच खाना शोभतो."
केसरी ऑफिस सोडून पुढे ते ज्ञानकोशात काम करू लागले. त्या वेळी पत्नी वारली.सेनापतींची पत्नी वारली तेव्हा तेथील मित्र म्हणाले,"आज ज्ञानकोश कचेरीला सुटी देऊ." ते म्हणाले,तुम्ही वाटले तर घ्या सुट्टी.मी येऊन काम करीन!"
घरचा संसार क्षणभर थाटलेला मिटला.श्रीहरि दुसरा महान संसार त्यांच्यासाठी मांडीत होता.साबरमतीच्या महात्म्याने सत्याग्रहाचा मंत्र राष्ट्राला दिला.हिंदुस्थानभर चैतन्याची प्रचंड लाट उसळली.
ब्रिटिश सत्ता क्षणभर जरा हादरली.इकडे महाराष्ट्रात कोट्यधीश टाटा मुळशी पेट्यात धरण बांधू लागले.बारा हजार मावळे भिकेस लागणार होते.ज्या मावळ्यांनी महाराष्ट्रास महान इतिहास दिला,ते हाकलले जाणार होते.सत्याग्रह करावा असे शब्द उच्चारले जाऊ लागले.सेनापती या वेळेस मुंबईला होते.भंग्यांचा संप लढवण्यासाठी ते गेले होते. राजबंदी सुटावे म्हणून राजबंदी सोडा अशा अक्षरांची फळी गळ्यात अडकवून सेनापती त्यासाठी हजारो सह्या गोळा करीत त्या वेळेस हिंडत असत.अशा वेळेस सत्याग्रहाची हाक आली.त्यांनी जाणलेले होते, जगावरची दुष्ट प्रवृत्तींची पकड बळकट आहे.त्याविरुद्ध लढत यश मिळाले तरी ते अशाश्वत ठरणार.पण आपण टक्कर दिलीच पाहिजे.
ह्या जगण्यांतुन,ह्या मरण्यांतुन
हसण्यांतुन अन् रडण्यांतुन ह्या
अशाश्वताच्या मुठी वळूनी
अपाप वरती चढतिल बाह्या;
अंतरंगातील श्रीहरींशी त्यांनी चर्चा केली,आणि बाह्या वर चढवल्या.त्यांची मते निश्चितच होती.स्वातंत्र्य रणाशिवाय मिळत नसते.मरणाशिवाय मोक्ष नाही. तरीही सामसत्याग्रहाचा प्रयोग करावयास ते उभे राहिले. सामसत्याग्रह व शुद्धसत्याग्रह असे दोन भेद त्यांनी केले आहेत.या दोहोंचे पुन्हा आणखी दोन प्रकार त्यांनी कल्पिले आहेत.प्राथमिक व प्रागतिक.प्राथमिक सामसत्याग्रह म्हणजे शत्रूच्या पायावर डोके ठेवून विनवणे,त्याला नम्रपणे सांगणे व तो देईल ती शिक्षा सोसणे.प्रागतिक सामसत्याग्रह म्हणजे शत्रूला न दुखवता त्याची मालमत्ता नष्ट करणे.शुद्ध सत्याग्रहांतील प्राथमिक प्रकार म्हणजे शत्रूला नुसते जखमी करणे आणि प्रागतिक म्हणजे शत्रूला ठार करणे.सामसत्याग्रहाचा प्रयोग करून पाहू या.नाहीतर असा शुद्ध सत्याग्रह मग अवलंबू, असे सेनापतींनी ठरविले. ते सांगतात.
हठ माझी दृढमति ।
जनकार्य अनल्प जे ।
तें न साधे साम वादें ।
विपक्षमत जैं खुजें ।
येतों मी बोललों मित्रां ।
तुम्ही व्यर्थ मरा जरी ।
मरणें तुमच्या संगें ।
योग्य वाटे मला तरी ।।
लहानसहान कामे कदाचित सामसत्याग्रहाने सिद्धीस जातील.परंतु जी महान स्वराज्य संपादनासारखी कामे आहेत ती याने साधणार नाहीत.कारण शत्रूचे मन मोठे दिलदार नसते.
क्षुद्र मनाच्या शत्रूजवळ आपल्या या बलिदानाचा काय उपयोग? परंतु जगात फुकट काही जात नाही.राष्ट्रात या बलिदानाने शुद्धी येईल.त्यागाचे वातावरण निर्मिले जाईल.शत्रूचीही खरी परीक्षा होईल.शत्रू परीक्षेत नापास झाला तर मग शुद्ध सत्याग्रह आहेच.
अशी सेनापतींची विचारसरणी होती.देशात कोठून तरी तेज प्रकट व्हावे यासाठी त्यांचा जीव तडतडत होता.महाराष्ट्रातील पक्षोपपक्ष मुळशीचा विचार करायला जमले हे पाहून सेनापती आनंदले.ते म्हणू लागले-
महाराष्ट्र मुळशीपरिषदीं तिन्ही पक्ष जमले ।
दक्षत्वाच्या वीरत्वाच्या सुविचारी रमले ।
विश्वसलें मन जिवंत आहे थोर महाराष्ट्र ।
महाराष्ट्र निजतेजें उठविल अखिल हिंदराष्ट्र ।।
सेनापती शांत राहतील की नाही,सामसत्याग्रहाची शिस्त पाळतील की नाही,अशी काहींना शंका वाटली. सेनापतींसारखे पुरुष जे हाती घेतील ते नीट पार पाडतील एवढीही त्यांना खात्री वाटेना!परंतु पुढे या शंका गेल्या.सेनापतींजवळ लपंडाव नाही.घाव घालायचा झाला तर तसे जाहीर करून घाव घालतील. घाव शांतपणे शिरावर झेलावयाचा ठरले तर त्याप्रमाणे अक्षरशः
वागतील.सेनापती शिस्तमूर्ती आहेत.व्रतमूर्ति आहेत.मुळशीचा सत्याग्रह म्हणजे महाराष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासातील एक तेजोमय प्रकरण आहे. स्त्रीपुरुषांनी त्या प्रसंगी जे तेज प्रकट केले ते अवर्णनीय आहे.आधणाचे पाणी वीरांनी व वीरललनांनी अंगावर घेतले.मावळे व मावळणी यांनी अद्भुत धैर्य व शौर्य प्रकट केले.या सत्याग्रहातच 'सेनापती' ही पदवी सेनापतींस मिळाली.
सेनापती पुनःपुन्हा तुरुंगात जात होते.तुरुंगात ते सर्वांना धीर देत.सर्वांची चौकशी करीत. सर्वांच्या भाकऱ्या एकत्र कुस्करून काला करीत. गोकुळातील गोपाळकृष्णाचा प्रेमधर्म ते तुरुंगात शिकवू लागले.प्रेमधर्माचे सेनापती आचार्य आहेत.भेदभाव जावेत म्हणून ते तडफडतात.तुरुंगातून बाहेरच्या सैनिकांस ते तेजस्वी संदेश पाठवीत.
सत्याग्रहींना तुरुंगात ते कविता पाठ करायला सांगत. अशा रीतीने हे काव्य बाहेर येई.पुष्कळसे काव्य या वेळेस त्यांनी दिले.अरे,हा शिवबाचा महाराष्ट्र.त्या मावळ्यांनी पूर्वी रक्ताचे सडे घालून येथे स्वराज्य स्थापिले.आनंदवनभुवन निर्मिले.महाराष्ट्राला दिव्य इतिहास दिला.त्या मावळ्यांचे ते अनंत उपकार स्मरून आजच्या सर्व सुशिक्षितांनी उठून काही ऋण फेडावे. "तीन हजार सत्याग्रही नाही का महाराष्ट्र देणार? महाराष्ट्र का मेला?" अशा गर्जनांनी सेनापती महाराष्ट्राची सुप्त तेजस्विता जागवू बघत होते.कोणी म्हणू लागले,सेनापती वेडे आहेत.आज यंत्रयुग आहे. वीज निर्माण केली पाहिजे.धरणे बांधली पाहिजेत.
सेनापती यंत्रविरोधी नाहीत त्यांनाही बिजली पाहिजे आहे.
बिजलीयुग हैं व्हावी । बिजली परि भाकरी ।
बारा हजार दीनांची । काढणें न परी बरी ।।
एवढेच त्यांचे म्हणणे होते.सेनापतींच्या हाकेस ओ देऊन सत्याग्रही येत होते.त्यांना सेनापती शिस्तीचे धडे देऊन तयार करीत.शिस्तीची महती सुंदर कवितांतून त्यांनी गायिली आहे.राष्ट्रे चढतात व पडतात.का?
हें पडणें हें चढणें याला मूळ एक शिस्त ।
शिस्तयुक्त ते चढले पडलों आम्ही बेशिस्त ।
असे त्यांनी बजावले आहे.बावळट व बेशिस्त लोक कुचकामाचे.
संयमानीच स्वराज्य वा स्वाराज्य लाभते. संसार वा परमार्थ, उभयत्र शिस्तीला महत्त्व आहे.
जी शिस्त तीच शाही । शिस्तीत राज्य राही ।।
शिस्त शिकलेत म्हणजे राज्य आलेच हा मंत्र त्यांनी पटविला.
सामसत्याग्रह जोपर्यंत आहे,तोपर्यंत शत्रूने कितीही जाच केला तरी सहन करा.ते म्हणत :-
अम्ही पांडवांसारखी शिस्त पाळू । मनींच्या मनीं आमुचा क्रोध जाळू ।
पुढें धर्मयुद्धी करूं दोन हात । परी तोंवरी राहणें शान्त शान्त ।।
जेव्हा प्रकटपणे मारणमरण सुरू करू,तेव्हा दे घाव घे घाव अशी टिप्परघाई खेळू.त्या सत्याग्रहात कधीकधी जुलूम इतका असह्य होई की सेनापती बेभान होत. एकदा तर ते टाटांच्या लोकांच्या अंगावर धावून जाणार होते.परंतु मित्रांनी त्यांना आवरिले.
एकदां कोपलों भारी । भारी दुष्टत्व पाहुनी ।
मित्रं धरूनिया मातें । शान्त केलें तया क्षणीं ।।
सेनापती अत्यन्त शान्तपणे टाटांच्या लोकांजवळ जाऊन मुळशीच्या शेतकऱ्यांची दुःखे सांगत.त्या वेळेस सेनापती रडत असत.
आंसवें गळती माझ्या । नयनांतून याचितां ।
मुळशीकर दुःखाचा । पाढा दुःसह वाचितां ।।
परंतु त्या आसवांची दानवी सरकारला कदर वाटली नाही.द्रव्यान्ध भांडवलवाल्यांनी त्या अश्रूची टर केली. तीन वर्षे सामसत्याग्रह करून मग गीताप्रणीत शुद्ध सत्याग्रहाची सेनापतींनी वीरघोषणा केली.या शुद्ध सत्याग्रहातील शत्रूला नुसते जखमी करणे हा प्राथमिक भाग त्यांनी उचलला.त्यांना व त्यांच्या साथीदारांस शिक्षा झाल्या.सेनापती आपल्या कैफियतींत म्हणाले,
मला ठार मारावयाचे नव्हते.तसा आरोप मजवर करता येणार नाही.माझ्या मनात तसे असते तर मी त्या वेळेस त्यांना जखमी करण्याऐवजी ठार केले असते.परंतु शुद्ध सत्याग्रहाचा प्राथमिक मार्ग आम्ही आखला होता.
सेनापतींच्या स्पष्ट वाणीचा न्यायाधीशावरही परिणाम झाला.शेवटी सात वर्षे ते तुरुंगात गेले.
ह्या वेळीच मला वाटते,महात्मा गांधींच्या तत्त्वनिष्ठेची अग्निपरीक्षा झाली.ज्या हिंसक अर्थव्यवस्थेविरुद्ध ते लिहीत होते,जी पारंपरिक,
ग्रामीण,कृषिप्रधान अर्थव्यवस्था टिकवलीच पाहिजे असे म्हणत होते त्यांच्यातला हा संघर्ष होता.पण महात्मा गांधींनी मुळशीच्या शेतकऱ्यांना नव्हे,तर टाटांना पाठिंबा दिला आणि हा सत्याग्रह कोलमडला.महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याला प्रभावी नेतृत्व निश्चितच पुरवले.पण स्वतंत्र भारतात एक नव्या प्रकारची अहिंसक अर्थव्यवस्था उभी करण्याच्या दिशेने प्रत्यक्षात आणता येईल असे काहीही ते सांगू शकले नाहीत.ते काम त्यांचे अनुयायी,अर्थतज्ज्ञ जे सी कुमारप्पा ह्यांनी करण्याचा प्रयत्न केला.