०३.१०.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग..।
या ठिकाणी कातळ फारच निसरडा होता आणि अजून वर जाण्यात काही अर्थ नव्हता.त्यामुळे मी उंची कायम ठेवत डोंगराच्या कडेकडेने डावीकडे जायला सुरूवात केली.जवळजवळ अर्धा मैल प्रचंड फर वृक्षांच्या जंगलातून चालल्यावर मी एका गवताळ उतारावर येऊन पोचलो.हा गवताळ पट्टा पहाडाच्या अगदी माथ्यावरून चालू होऊन खाली जंगलात घुसला होता.जंगलातून बाहेर पडून गवताळ पट्ट्याकडे येत असतानाच मला एक जनावर एका छोट्याशा उंचवट्यावर उभं असलेलं पलीकडच्या बाजूला दिसलं.पुस्तकातल्या चित्रांवरून मला कळलं की हेच ते काश्मिरी हरीण आहे व जेव्हा त्याने डोकं वर केलं तेव्हा कळलं ती मादी आहे! गवताळ पट्ट्याच्या माझ्या बाजूला जंगलाच्या कडेपासून तीस यार्डावर एक मोठा चार फूट उंचीचा खडक वर आला होता.चरताना तिने डोकं खाली घातल्यावर एक दोन ढांगा टाकायच्या आणि डोकं वर केल्यावर स्तब्ध मुरून बसायचं असं करत करत मी ते तीस यार्ड ओलांडले आणि खडकाच्या आडोशाला लपलो.
त्या मादीकडे बहुतेक पहारा देण्याचं काम
असणार आणि ज्या पद्धतीने ती डोकं उंचावल्यावर सारखी सारखी उजवीकडे बघत होती त्यावरून मला कळलं की तिचे जोडीदारही तिथेच आहेत.तिला न कळता गवतातून तिच्या फार जवळ जाणं शक्य नव्हतं. परत जंगलात शिरून वरच्या बाजूने वळसा घालून पलीकडे जाता आलं असतं पण वारा वरून खाली वाहत असल्याने तिला ताबडतोब गंध लागला असता.तिसरा पर्याय असा होता की जंगलात शिरून खाली उतरायचं व लांब वळसा घालून तिच्या जवळच्या जंगलातल्या कडेला जायचं पण याला फारच वेळ लागला असता आणि मला खूप उभा चढ चढायला लागला असता.मग शेवटी मी ठरवलं की आहे तिथेच थांबायचं आणि बिबळ्याच्या कॉलला ही हरणं चितळ व सांबरांप्रमाणेच प्रतिक्रिया देतात का ते बघायचं.
त्या दिवसभरात मला एक दोन ठिकाणी बिबळ्याचे स्क्रेपमाक्स (जमीन खरवडल्याच्या खुणा) दिसले होते त्यामुळे त्या भागात बिबळ्यांचा वावर होता हे निश्चित होतं.फक्त एक डोळा खडकाच्या बाहेर काढून मी ती मादी चरत असेपर्यंत थांबलो व नंतर बिबळ्याचा कॉल दिला ! माझ्या कॉलच्या पहिल्या आवाजासरशी ती मादी सर्रकन वळली व माझ्या दिशेला तोंड करून पुढच्या पायाचे खूर जमीनीवर आपटू लागली.कळपातल्या इतर सभासदां -
साठी हा सावधानतेचा इशारा होता.पण ती मादी जोपर्यंत कॉल देत नाही तोपर्यंत ते हालचाल करणार नव्हते व मला तर त्यांना पाहायचं होतं.त्या मादीलाही जोपर्यंत बिबळ्या दिसणार नाही तोपर्यंत ती कॉल देणार नव्हती.मी तपकीरी रंगाच्या ट्वीड कोट घातला होता.माझा डावा खांदा खडकाच्या थोड्या बाहेर काढून मी तो खालीवर हलवायला सुरुवात केली.ही छोटीशी हालचालही त्या मादीच्या नजरेतून सुटली नाही. एक दोन पावलं पुढे येत तिने कॉल द्यायला सुरुवात केली.ज्या धोक्याच्या जाणिवेमुळे तिने तिच्या सहकाऱ्यांना इशारा दिला होता तो धोका आता तिच्या नजरेसमोर होता आणि आता त्यांना त्यांची जागा सोडून तिच्याजवळ जायला हरकत नव्हती.सर्वात प्रथम एक पिल्लू त्या हिमाच्छादित जमीनीवरून उड्या मारत तिच्याजवळ येऊन उभं राहिलं.त्यानंतर तीन नर आणि शेवटी एक वयस्क मादी असा सहा जणांचा संपूर्ण कळप तीस यार्डावर माझ्यासमोर उभा होता.मादी अजूनही कॉल देतच होती आणि इतर सर्वजण कान ताठ करून आवाज व वाऱ्याची दिशा अजमावण्यासाठी मागे पुढे करत स्तब्ध उभं राहून माझ्या मागच्या जंगलात एकटक पहात होते.वितळणाऱ्या बर्फावर उभा असल्याने माझी बैठक सुखावह नव्हती आणि फार वेळ तिथे तसाच राहिलो असतो तर थंडी भरण्याची शक्यता होती.मी सुप्रसिद्ध काश्मिरी हरणांचा प्रातिनिधीक कळप पाह्यला होता आणि त्यातल्या मादीचा अलार्म कॉलही ऐकला होता पण मला अजून एक गोष्ट ऐकायची होती, ती म्हणजे नराचा कॉल!
म्हणून मी परत एकदा खांद्याचा थोडा भाग बाहेर काढून वरखाली हलवला.आता मात्र मला नर, माद्या व पाडस या सर्वांचे वेगवेगळ्या पट्टीतले कॉल्स ऐकण्याचं समाधान मिळालं! माझ्याकडच्या परमीटप्रमाणे मला एका नराची शिकार करायला परवानगी होती आणि त्यातल्या एका नराची शिंग तर विक्रमी आकाराची होती पण मला आज असं वाटलं की सध्यातरी मला 'टॉफी'ची काही गरज नाहीये आणि तसंही नराचे मास जरा चिवटच असतं त्यामुळे मी रायफल वापरण्याऐवजी एकदम उठून उभा राह्यलो व आश्चर्यचकीत झालेली ती हरणं क्षणार्धात नाहीशी झाली.लगेचच मला त्या गवताळ उताराच्या पलीकडच्या अंगलातल्या झुडुपांतून ती जातानाची खसपस ऐकायला मिळाली.
आता बंगल्यावर परतण्याची वेळ झाली होती. गवताळ उतारावरून सरळ खाली उतरायचं व तिथून जरासा विरळ जंगलातून वाट काढत पायथा गाठायचं असं मी ठरवलं.उतार फार जोराचा नव्हता त्यामुळे पावलं जरा काळजीपूर्वक टाकली तर एका धावेत बरंच खाली जाता आलं असतं.शंभर यार्ड रूंदीच्या त्या गवताळ पट्ट्यावरून धावत धावत जवळजवळ सहाशे यार्ड गेल्यावर मला समोर पांढुरकं काहीतरी दिसलं.ते गवताळ उताराच्या डाव्या बाजूला जंगलाच्या कडेलाच एका छोट्या खडकावर उभं होतं आणि माझ्यापासून तीनशे यार्ड खाली होतं.पहिल्याप्रथम मला वाटलं की तो जंगलात हरवलेला एखादा बोकड असावा. मागच्या पंधरा दिवसांत आम्हाला मांसाहारी जेवण मिळालं नव्हतं आणि मी तर फॉर्टस्कला सांगितलं होतं की येताना मी काहीतरी शिकार आणीन.बोकडाने मला पाहिलं होतं आणि जर मी त्याच्या मनातला संशय दूर करू शकलो तर कदाचित तो मला अगदी जवळून जाऊ देण्याची शक्यता होती आणि हे करताना त्याचा पाय पकडता आला असता.त्यामुळे उतरताना मी थोड़ी डावी दिशा पकडली व नजरेच्या कडेलाच त्या प्राण्याला ठेवलं.जर तो त्याच जागेवर उभा राहिला तर या आख्ख्या पहाडावर त्याला पकडण्यासाठी दुसरी योग्य जागा मिळाली नसती.कारण त्या पाच फूट उंच खडकाखाली एकदम तीव्र उतार होता व त्याला हालचाल करायला जागाच नव्हती.त्याच्याकडे सरळ न बघता वेग कायम ठेवत मी खडक ओलांडला आणि ओलांडत असतानाच त्याचे पुढचे पाय पकडण्यासाठी हात आडवा फिरवला. शिंकेसारख्या आवाज काढत तो थोडा मागे सरकला आणि माझ्या पकडीतून सुटका करून घेण्यात यशस्वी झाला.खडक ओलांडल्यावर मी थोडा थांबलो आणि वळून बघितलं तर मला
आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.मी ज्याला बोकड समजत होतो तो चक्क 'अल्बिनो' कस्तुरी मृग होता.माझ्यापासून फक्त दहा फूटांवर त्याच्या जागी ठाम पाय रोवून शिंकल्यासारख्या आवाजात माझा निषेध करत होता!मला चकवल्याबद्दल तो स्वतःची पाठ थोपटून घेत असावा.काही दिवसानंतर ही घटना मी काश्मिरच्या गेम वॉर्डनला सांगितली.
तेव्हा त्याने त्या कस्तुरीमृगाची शिकार न केल्याबद्दल हळहळ व्यक्त केली व मला त्या जागेचा अचूक ठावठिकाणा विचारायला लागला.पण माझी एखाद्या जागेबद्दलची स्मरणशक्ती व वर्णन फारसं चांगलं नसल्यामुळे मला नाही वाटत की तो कस्तुरीमृग कुठल्यातरी संग्रहालयाची शोभा वाढवत असेल.
नर बिबळ्याला त्याच्या इलाक्यात दुसऱ्या बिबळ्याचं अतिक्रमण झालेलं अजिबात खपत नाही. हा... आपला नरभक्षक बिबळ्या पाचशे चौ.मैल इतक्या मोठ्या प्रदेशात वावरत होता आणि त्यात कित्येक इतरही बिबळे असतील हे कबूल, पण या विशिष्ट भागात तो गेले कित्येक दिवस होता व कदाचित तो त्या भागाला स्वतःचा इलाका समजत असण्याची शक्यता होतीच.त्यात परत बिबळ्यांच्या समागमाचा हंगाम नुकताच संपला होता.त्यामुळे माझ्या कॉलला तो जोडीदाराच्या शोधात असलेल्या मादीचा कॉल समजण्याचीही शक्यता होती म्हणूनच चांगला अंधार पडेपर्यंत मी थांबलो व नंतर मी बिबळ्याचा कॉल दिला... आणि काय आश्चर्य... जवळजवळ चारशे यार्डावर जरासं खालून पण उजव्या बाजूने माझ्या कॉलला प्रतिसाद दिला गेला.आमच्या दोघांच्यामध्ये विखुरलेले दगड, खडक व काटेरी रान होतं त्यामुळे तो माझ्याकडे सरळ रेषेत येणार नाही तर वरून वळसा घालून येणार असा माझा अंदाज होता.त्याने परत कॉल दिला तेव्हा माझा अंदाज खरा असल्याचं मला लक्षात आलं.पाच मिनिटानंतर माझ्या झाडाखालून डोंगराच्या कडेने जाणाऱ्या पायवाटेवर साधारण दोनशे यार्डावर मी त्या कॉलचं स्थान निश्चित केलं.त्याला दिशा देण्यासाठी मी परत एकदा कॉल दिला.त्यानंतर तीन चार मिनिटांनी त्याच दिशेकडून पण शंभर यार्ड जवळून त्याचा प्रतिसाद आला.
पायवाटेवरच्या वळणाच्या थोडं पलीकडे व माझ्यापासून फक्त साठ यार्डावर आल्यावर त्याने परत एक कॉल दिला.पण यावेळी मात्र डोंगराच्या वरच्या दिशेने त्याला प्रतिसाद दिला गेला! ही गुंतागुंत जेवढी अनपेक्षित होती तेवढीच दुर्दैवी होती.कारण आता तो बिबळ्या माझ्या खूपच जवळ आला होता आणि प्रथम माझा कॉल व आता थोडं वर त्या मादीचा कॉल ऐकून त्याला असं वाटलं असणार की लाजरी मादी थोडी दूर डोंगरावर जाऊन त्याला तिथे बोलावते आहे.तरीही तो ज्या वाटेवरून येत होता तसाच येत राहण्याचीही थोडीशी शक्यता होतीच.
किमान वरून येणाऱ्या वाटेला ती जिथे मिळत होती तिथपर्यंत तरी! तसं झालं तर त्याला बोकड दिसणार होता आणि त्याला त्याचा काही उपयोग नसतानाही तो त्याला मारण्याची शक्यता होती.पण आज बोकडाचं नशीब जोरावर होतं आणि माझं नव्हतं.कारण तो त्या दोन वाटांमधला कर्ण पकडून वरच्या वाटेला लागला.त्याला मी पुढचं ऐकलं तेव्हा तो माझ्यापासून शंभर यार्ड दूर गेला होता,म्हणजेच त्याच्या प्रेयसीच्या जवळ शंभर यार्ड! त्या दोघांचे सादप्रतिसाद एकमेकांच्या जवळ येत गेले आणि शेवटी थांबले.बराच वेळ शांततेत गेल्यानंतर जिथे गवत संपत होतं व दाट जंगल सुरू होत होतं त्या कडेवरून त्या दोघांची गुरगुर मला ऐकायला आली.आज हा बिबळ्या बऱ्याच बाबतीत सुदैवी ठरत होता कारण आता अंधार गडद झाला होता.खरंतर बिबळे हे समागमाच्या वेळी शिकार करायला सोपे असतात.
वाघांचंही तसंच आहे.पण शिकाऱ्याची मानसिक तयारी मात्र पाहिजे.नर वाघ त्यावेळेला फार धसमुसळे असतात व त्यांना त्यांचे दात व नख्या किती धारदार आहेत याचं भान त्यांना राहत नाही आणि त्यामुळे वाघीणी या काळात फारच संवेदनाशील व चिडचिड्या झालेल्या असतात.
आज तर हा बिबळ्या जिवानिशी निसटला होता पण आज ना उद्या तो माझ्या बंदुकीच्या टप्प्यात गवसणारंच होता कारण त्याचे दिवस भरत आले होते... पण क्षणभर मला असं वाटलं की माझेच दिवस भरलेत की काय ? कारण कोणतीही पूर्वसूचना न देता वाऱ्याचा एक झंझावात एकाएकी माझ्या झाडावर आदळला.मला तर वाटलं की ते झाड परत पूर्वीसारखं उभं राहूच शकणार नाही,पण वाऱ्याचा रेटा कमी झाला व आमची स्थिती पहिल्यासारखी झाली.पुढचा धोका ओळखून मी चटकन रायफल एका फांदीला बांधली आणि दोन्ही हात मोकळे ठेवले. त्या झाडाने आजपर्यंत कित्येक वादळं पचवली असणार,पण एकट्याने... स्वतःच्या वजनात एका माणसाची भर पडून वाऱ्याचा दाब वाढलेला असताना नव्हे!रायफल नीट बांधल्यावर मी एकापाठोपाठ एकेका फांदीच्या टोकावर चढून गेलो व हाताला लागतील ते पाईन कोन्स व डहाळ्या तोडून टाकल्या.कदाचित माझा कल्पनाविलास असेल,पण मी झाडाला असं 'हलकं' केल्यानंतर परिस्थिती सुधारली आणि ते झाड कमी हेलकावे खायला लागलं.सुदैवाने झाड जरा तरुण व चिवट असावं आणि त्याची मुळंही खोलवर गेलेली असणार.त्या वादळात एखाद्या गवताच्या पात्याप्रमाणे इकडून तिकडे हालल्यानंतरही त्याने टिकाव धरला आणि शेवटी तासाभरानंतर वादळ शमलं.आता बिबळ्या येण्याची संधी हुकली होती.त्यामुळे मी झकासपैकी एक सिगरेट ओढली व त्या बोकडाला सोबत करण्यासाठी स्वप्नांच्या राज्यात प्रवेश केला.सकाळी झाडाखालून आलेल्या हाकेसरशी मला त्या राज्यातून जमीनीपासून पन्नास फूटपर्यंत आणलं.खाली पाह्यलं तर कालची दोन माणसं जोडीला दोन जवान पोरांना घेऊन आली होती.
मी जागा झाल्याचं पाहून त्यांनी खालूनच मला विचारलं की रात्री मला बिबळ्याचे कॉल्स ऐकायला आले का? आणि झाडाची ही अवस्था कशी झाली? माझ्या उत्तराने त्यांची करमणूक झाली असणार... मी त्यांना म्हणालो की रात्री माझ्या त्या बिबळ्याशी बराच वेळ गप्पागोष्टी झाल्या व नंतर काहीच काम न उरल्याने मी झाडाच्या बऱ्याच फांद्या तोडून टाईमपास केला.
मग मी त्यांना विचारलं की काल रात्री जोराचा वारा आल्याचं त्यांना जाणवलं का ? तेव्हा एक पोरगा म्हणाला,
"जोराचा वारा? साहेब असलं वादळ आम्ही कधी पाह्यलं नव्हतं,माझ्या तर घरांची छपरंच उडाली! त्यावर त्याचा जोडीदार म्हणतो,"त्यात काय एवढं साहेब ? शेरसिंगला त्याची झोपडी पाडून नवी बांधायचीच होती. उलट या वादळामुळे त्याचा झोपडी पाडण्याचा खर्च वाचलाय.