इल्से कोहलर-रोलेफसन या महिलेने जॉर्डनच्या वाळवंटात काम करत असताना प्रथम उंट हा प्राणी पाहिला.वाळवंटी जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या प्राण्याने ती भारावून गेली.त्यानंतर तिने उंटांवरच्या संशोधनाला वाहून घेतलं.राजस्थानातल्या वास्तव्यावर आधारित तिच्या पुस्तकातून तिचं मनस्वी झपाटलेपण समोर येतं.उंटांच्या प्रेमात पडलेली स्त्री इल्से कोहलर रोलेफसन
'संगीत रणदुदुंभी' या जुन्या काळातल्या नाटकात एक गाणं होतं-जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा त्या गाण्यात माणसाला लागू शकणाऱ्या अनेक वेडांची यादी होती.कनक,
कामिनी,राजसत्ता,देशभक्ती,असे कैक प्रकार.ही सर्व वेडं पुरुषांना लागतात,असं त्या गाण्यात ध्वनीत होतं;पण स्त्रियांनाही अशी वेडं लागू शकतात याचीही अनेक उदाहरणं आहेत.त्यातलंच एक उदाहरण म्हणजे इल्से कोहलर-रोलेफसन.
इल्सेला उंटांनी वेड लावलं.तिने उंटांवरच्या संशोधनाच्या कामी स्वतःला वाहून घेतलं.तिचं संशोधनकार्य विशेषतः भारतातल्या उंटांवर आधारलेलं आहे.त्या अनुभवांवर तिने नंतर एक पुस्तक लिहिलं- 'कॅमल कर्मा- वेंटी इयर्स अमंग इंडियाज कॅमल नोमॅड्स!' या पुस्तकाला जोधपुरचे महाराज दुसरे गणराजसिंह यांची प्रस्तावना आहे.२०१४ मध्ये प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध आहे.या पुस्तकाची सुरुवात एका पुराणकथेने होते.ही कथा अशी - पार्वतीने एकदा गंमत म्हणून मातीचा एक प्राणी तयार केला.तो ओबडधोबड होता;त्याला पाच पाय होते. हा प्राणी जिवंत कर असा हट्ट पार्वतीने शंकराकडे धरला.शंकराने आधी या गोष्टीला नकार दिला.असला विद्रूप प्राणी जगात टिकाव धरू शकणार नाही,असं शंकराला वाटत होतं.पण पार्वतीने तिचा हट्ट सोडला नाही.अखेर शंकराने नमतं घेतलं;मात्र त्या प्राण्यात प्राण फुंकण्यापूर्वी शंकराने त्याचा पाचवा पाय मुडपून त्याची पाठीवर वशिंड म्हणून स्थापना केली;त्यानंतर त्याने त्या प्राण्याला 'उठ' अशी आज्ञा दिली.त्या विचित्र प्राण्याची काळजी कोण घेणार,हा प्रश्नच होता.तेव्हा शंकराने स्वतःच्या त्वचेचा काही भाग सोलून त्यापासून माणूस बनवला.तो पहिला 'रायका' तेव्हापासून उंट आणि रायका हे एकमेकांच्या सहवासात राहू लागले.
भारतीय पुराणकथांमधले उंटांचे संदर्भ अभ्यासण्याइतकी इल्से उंटांच्या विश्वाशी एकरूप झालेली होती,हे यावरून ध्यानात येऊ शकतं. वास्तविक,इल्से ही मूळची जर्मन प्राणी उपचारतज्ज्ञ.ती एका खेड्यात 'गुरांची डॉक्टर' म्हणून काम करत होती. तिचा उंट या प्राण्याशी किंवा रायकाशी संबंध यायचं कुठलंही कारण नव्हतं.पण,आपल्याकडे 'पूर्वसंचित' नावाची एक कल्पना आहे.
इल्से आपल्या पुस्तकात म्हणते, 'या संकल्पनेत काही तथ्य असावं,असं मला आता वाटू लागलंय.' सलग दहा-बारा वर्षं प्राण्यांवरच्या उपचारांचं काम केल्यावर इल्सेला काहीतरी बदल हवा होता.म्हणून तिने उत्तर जॉर्डनमधल्या वाळवंटातल्या एका पुरातत्वीय उत्खननात प्राण्यांचे अवशेष ओळखण्याची नोकरी स्वीकारली.प्राण्यांच्या शरीरशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे तिला ही नोकरी मिळाली होती.त्या कामात ती लगेचच खुलली.कारण तिथे रोज नवीन आव्हानं समोर येत होती.पगार नगण्य होता कामाचे तास सूर्योदय ते रात्री उशिरापर्यंत केव्हाही, असे होते;पण कामाचा आनंद जास्त होता.त्यांचा तळ जॉर्डन नदीच्या खोऱ्याच्या सुरुवातीच्या भागात होता. त्या नदीच्या उगमाजवळ ७००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या मानवी वस्तीची शहानिशा करण्यासाठी ते उत्खनन चालू होतं.
उत्खननाच्या मुख्य तळाजवळ एका ओॲसिस होतं. तिथे भरपूर झाडी होती;पाण्याचा साठा होता.एक दिवस इल्से सकाळी उत्खननाच्या दिशेने चाललेली असताना वाडीच्या पलिकडे तिला कसलीतरी हालचाल जाणवली.वाडीच्या पलिकडे डोंगराचा कडा होता. त्यावरून एका मागोमाग एक असे अनेक उंट वाडीच्या दिशेने उतरत होते.त्यांच्या बरोबर काही माणसंही होती. इल्से थांबून तिकडे लक्षपूर्वक बघू लागली.उंटांची संख्या शंभराच्या आसपास तरी होती.ते सारे अत्यंत शिस्तीत एका मागोमाग एक उतरत होते.बहुतेक सर्व माद्याच होत्या.त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची केसाळ आणि गुबगुबीत पिल्लं चालत होती.ती पिल्लं अजिबात मस्ती करत नव्हती.त्या कळपातला नर उंट मात्र रुबाब करत होता;माद्यांभोवती चकरा मारत होता;मधूनच गुळण्या केल्यासारखे आवाज काढत होता.त्याच्या तोंडाच्या एका बाजूने त्याची जीभ बाहेर आली होती.या कळपाबरोबर पायघोळ तपकिरी अंगरखा आणि तांबड्या चौकटी असलेला कुफिया (अरबी पद्धतीचं डोक्यावरचं आवरण) घातलेला एक माणूस होता.
उंट पाण्याजवळ आले तेव्हा इल्सेला एक अद्भुत दृश्य पाहायला मिळालं.त्या उंटांनी पाण्याजवळ गर्दी न करता आणि अजिबात ढकलाढकली न करता एका वेळेस पाच अशा पद्धतीने पाणी प्यायला सुरुवात केली. आधीच्या गटाचं पाणी पिऊन होईपर्यंत मागचे सर्व उंट शांतपणे वाट बघत उभे होते.आधीचे उंट बाजूला झाले की तो बेदु उंटपाळ पुढच्या उंटांना पाणी प्यायला सांगायचा.
तोपर्यंत ते जागचे हलत नसत.
इल्से म्हणते, 'हा देखावा माझ्या दृष्टीनं हृदयस्पर्शी ठरला.'ती शिस्त, एवढ्या मोठ्या कळपाचं नियंत्रण करणारा तो एकमेव माणूस,ती हवीहवीशी वाटणारी उंटाची गुबगुबीत पिल्लं, उंटांचा समजूतदारपणा यामुळे हा सर्व पौर्वात्य जादूभऱ्या वातावरणाचा परिणाम असावा,असं इल्सेला वाटून गेलं.
इल्से ती उभ्या असलेल्या टेकडीवरून उतरून त्या बेदुला भेटायला पुढे गेली.ती म्हणते,'कुठल्या तरी अनामिक आकर्षणानं मी तिकडे खेचली गेले.'तिला अरबी भाषेतले दहा-बारा शब्दच माहीत होते.तरीही तिने त्या बेदुशी संवाद साधायचा प्रयत्न केला.त्या प्राण्यांबद्दल तिला कुतूहल वाटतंय,असा आश्चर्यकारक प्राणी अजूनपर्यंत तिने बघितलेला नाही,वगैरे सांगायचा ती प्रयत्न करत होती.त्या माणसाने कुठलीही विस्मयाची भावना चेहऱ्यावर न आणता तिला आपल्या तंबूत येण्याचं निमंत्रण दिलं.त्याच्या पत्नीचे आणि इल्सेचे सूर जुळले.तिचं नाव उम्म जुमा असं होतं.त्यांची अस्वच्छ पण गुटगुटीत मुलं तिथेच खेळत होती.तो तंबू,काही गालीचे,फोमची गादी,स्वयंपाकाची काही भांडी ही त्यांची ऐहिक संपत्ती; हो,तो उंटांचा कळप हा त्यांच्या संपत्तीचा ठेवा होता.कुटुंब आनंदी होतं.हसत- खेळत दैनंदिन उद्योग सुरू ठेवून त्यांनी तिला चहाचे अनेक कप प्यायला दिले.त्यानंतर वेळ मिळेल तेव्हा इल्से त्या उंटाचं निरीक्षण करण्याकरता त्या कळपाभोवती फिरू लागली.वसंत ऋतूची सुरुवात होती.अनेक प्रकारच्या खुरट्या वनस्पती फुलल्या होत्या.गवत वाढलेलं होतं. त्या उंटमाद्या वाकून त्यांना हवं तेवढं गवत खाण्यात मग्न असायच्या.त्यांची वशिंडं पुन्हा जोमाने वाढू लागली होती.ते दृश्य इल्सेला भारून टाकत होतं.उंटाची पिल्लं त्यांच्या आयांभोवती खेळत असायची.
त्यांच्या लुटुपुटूच्या मारामाऱ्या,पळापळ आणि मधूनच दूध प्यायला आईजवळ धाव घेणं,या गोष्टींचं निरीक्षण करण्यात वेळ कसा निघून जातो,हे तिला कळत नव्हतं. ते करताना तिला एक आत्मिक सौख्य लाभत होतं.
एक दिवस अचानक ते कुटुंब त्यांच्या उंटांसकट नाहीसं झालं.
त्यानंतर जॉर्डनच्या वास्तव्यात इल्सेला पुन्हा उंटाचं दर्शन झालं नाही.त्या उत्खननाचं काम संपल्यानंतर ती घरी परतली;तिचा व्यवसाय परत सुरू झाला;तरीही तिचं उंटाबद्दलचं कुतुहल शमलं नव्हतं. तिने उंटाबद्दल मिळेल तिथून माहिती मिळवायला सुरुवात केली.अरबस्तानात पूर्वीच्या काळी भटकंती केलेल्या युरोपी प्रवाशांच्या हकीकती आणि प्रवासवर्णनं तिने अधाशासारखी वाचून काढली. बेदूईंच्या जीवनातलं उंटाचं महत्त्व हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं.बेदूईंचं सामाजिक आणि आर्थिक जीवन उंटाभोवती उभं होतं;त्यांचं खाणं-पिणं उंटावर अवलंबून होतं.परमेश्वराने उंट त्यांच्यासाठीच निर्माण केले आहेत,हा समज त्यांच्यात दृढ होता;कारण त्यांचं अस्तित्वच उंटावर अवलंबून होतं.
उंटाला अरबी भाषेत 'जमाल' म्हणतात. (या शब्दाचा दुसरा अर्थ 'अत्यंत सुंदर' असाही आहे.)
मात्र,केवळ अरबस्तानच्या वाळवंटातच उंटाचा आणि संस्कृतीचा परस्पर संबंध आहे,असं नाही;तर उत्तर आफ्रिकेतील तुआरेगांच्या संस्कृतीचा आधारही उंट हाच आहे.त्यांच्या संस्कृतीत उंट म्हणजे जिव्हाळा,उंट म्हणजे प्रेम,उंट म्हणजे सुबत्ता.इथिओपियाच्या आफार जमातीत 'मूल मेलं तर चालेल,पण उंट मरता कामा नये,'अशा अर्थाची म्हण आहे.केन्यामधल्या रेंडिल आणि गाब्रा जमातीच्या सर्व परंपरा आणि धार्मिक कर्मकांडं उंटकेंद्रित असतात.या सर्वांपेक्षाही उंटाला अधिक जवळचा मानणारी संस्कृती म्हणजे सोमाली.त्यांचं महाकाव्य म्हणजे उष्ट्रपालनाचा माहितीकोष असून त्यात उंटाची जन्मापासून मृत्यूपर्यंत कशी देखभाल केली तर ऐहिक सुखात कशी भर पडते,याची माहिती मिळते.वाळवंटाशी संबंध नसणाऱ्या प्रदेशातील लोकांना उंटाचं महत्त्व कळत नाही;मग ते उंटांबद्दल तुच्छतेने बोलतात.
संस्कृत साहित्यातही उंटाची कुरूप म्हणून अवहेलना करण्यात आली आहे. युरोपी मंडळीसुद्धा उंटाला तुच्छ लेखण्यात मागे नव्हती,असं इल्सेला अनुभवायला मिळालं.सुदैवाने सर्वच युरोपी या मताचे नव्हते.ज्यांचा वाळवंटी भूप्रदेशाशी प्रत्यक्ष संबंध आला होता त्यांना उंटाचं महत्त्व पटलं होतं.अशा लोकांनी वाळवंटी प्रदेशातील लोकांचे आणि उंटांचे परस्पर संबंध आणि या वाळवंटी जहाजाचे गुण यांच्याबद्दल खूप लिहिलं होतं.विल्फ्रेड ब्लंट,विल्फ्रेड थेसिजर यांनी त्यांच्या वाळवंटी प्रवासाच्या यशाचं सर्व श्रेय उंटांना दिलं होतं.त्यांच्या मते ज्या माणसांना वाळवंटात आयुष्य कंठायचं असतं त्यांच्यावर उंट निर्माण करून देवाने अनंत उपकार करून ठेवले आहेत. जर उंट हा प्राणी नसता तर वाळवंटात माणूस जगूच शकला नसता. वाळवंटी लोकही त्यामुळे उंटाला देवाची देणगीच मानतात.उंट वाळवंटातील काटेरी झुडुपं काट्यांसकट खाऊन जगतो.या क्षारयुक्त आणि निरुपयोगी वाटणाऱ्या वनस्पतींचं तो सकस अन्नात रूपांतर करतो आणि त्यांच्यापासून उर्जा मिळवतो. या वनस्पतींवर जगणाऱ्या उंटमाद्या वर्षभर अतिशय दर्जेदार आणि शक्तिवर्धक दूध देतात;वाळवंटातल्या माणसांचं ते वर्षातील बराच काळ प्रमुख अन्न असतं. काही वेळा या माणसांना तेवढंच अन्न उपलब्ध असतं. या शिवाय उंटाचं मांस,उंटाची लोकर आणि उंटाचं शेण हे वाळवंटात जगणाऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आणि उपयुक्त पदार्थ असतात.
वाळवंटी परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या परिस्थितिकी तज्ज्ञांनी उंटावर स्तुतीसुमनांचा वर्षावच केलाय.त्यांच्या मते उंट ही निसर्गाची कमाल आहे.वाळवंटात जगणारं ते एक आश्चर्यजनक यंत्र आहे.उंट परिसराच्या तापमानानुसार आपलं शारीरिक तापमान बदलू शकतो. त्यामुळे त्याला कमीत कमी घाम गाळावा लागतो आणि तो पाण्याची बचत करू शकतो.मुख्य म्हणजे उंटाच्या तांबड्या पेशींची पाणी साठवण्याची क्षमता अफाट असते.उंट जेव्हा पाणी पितो तेव्हा या पेशी त्यांच्या मूळ आकाराच्या २४० पट फुगू शकतात.बाकी कुठल्याही प्राण्याला ही किमया साध्य नाही.अशी माहिती गोळा करता करता इल्से उंटांमुळे अधिकाधिक प्रभावित होत गेली.तिने उंट आणि पुरातत्व हे दोन्ही विषय एकत्रित करून अभ्यास करण्याचं ठरवलं.आपल्या डॉक्टरेटसाठी तिने 'उंट कसा आणि केव्हा माणसाळला?' हा विषय निश्चित केला.आजच्या पाळीव प्राण्यांचे पूर्वज एकेकाळी वन्यप्राणी होते.तसं बघायला गेलो तर माणूसही एके काळी वन्यजीवच होता.तो वस्ती करून राहायला लागल्यावर हळूहळू त्याला कळत गेलं,की काही प्राणी आपल्याला उपयुक्त ठरू शकतात.मानवी वस्तीजवळ राहून अन्न आणि संरक्षण या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध होतात,हे काही प्राण्यांनाही हळूहळू लक्षात येऊ लागलं. वन्यप्राण्यांचे पाळीव प्राणी होताना हळूहळू त्यांच्यात काही सूक्ष्म असे बदल घडत गेले.माणसाने त्या प्राण्यांचं नियंत्रित प्रजनन केलं.त्यामुळे त्यांच्या दुधाची लोकरीची प्रतवारी,आक्रमकपणा आणि असेच इतरही गुणधर्म कालांतराने बदलत गेले.ज्या लोकांनी आणि जनसमूहांनी त्यांच्या परिसरातल्या प्राण्यांना माणसाळवलं,त्या समाजाच्या सामूहिक चालीरीती आणि परंपरांमध्ये ते प्राणी सामावून घेतले गेले. आपल्याकडे गायीच्या बाबतीत हे घडून आलं,तर वाळवंटात उंटाच्या बाबतीत ते घडलं.उंट,घोडा आणि शिडाची जहाजं यांच्यामुळे माणूस पृथ्वीवर सर्वदूर पसरला. उंट नसते तर चीनपासून निघणारा रेशीम मार्ग (सिल्क रूट), दक्षिण अरबस्तान आणि भूमध्यसागराभोवतालचे प्रदेश यांच्यातील सुगंधी मार्ग (इन्सेन्स रूट), आणि भारतातून युरोपात मसाले नेणारे मार्ग, तसंच सहाराचा भूप्रदेश अशा ठिकाणी माणूस कधीच पोचला नसता. वाळवंटी युद्ध आणि वाळवंटातून होणारा व्यापार तसंच अरबांमार्फत पूर्वेचं ज्ञान पश्चिमेत पोचण्यामागे उंटांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.उंट माणसाळल्यामुळे उंटाचं प्रजनन करणाऱ्या जनसमूहाची एक नवी संस्कृती उदयास आली.जगाच्या वेगवेगळ्या भागांतल्या उंटकेंद्रित जमातींमध्ये एक मूलभूत साम्य आहे.एक म्हणजे बहुतेक सर्व जमाती भटक्या आहेत.दुसरी एक महत्त्वाची गोष्ट,म्हणजे उंटांचा जननदर इतर बऱ्याच पाळीव प्राण्यांच्या मानाने खूप मंदगती असल्याने या जमातींनीही त्यांचा जननदर कमी करण्याचे काही मार्ग शोधलेले आहेत.या जमातींनी कुटुंब नियोजनाचे मार्ग शोधले नसते तर त्यांच्या संख्येला आवश्यक तेवढे उंट उपलब्ध झाले नसते आणि त्यांना वाळवंटात जगणं अवघड झालं असतं.
इल्सेचा अभ्यास सुरू झाला.उंटाच्या रानटी अवस्थेतून पाळीव अवस्थेत येण्याचे पहिले टप्पे अज्ञातच होते, असं तिच्या लक्षात आलं.याचं कारण वाळवंटात म्हणावं तितकं पुरातत्त्वीय संशोधन झालेलं नाही,त्यामुळे याबद्दलचे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत.मग इल्सेने वाळवंटी उत्खननांचे यापूर्वीचे सर्व अहवाल शोधून त्यात काही पुरावे दडले आहेत का,हे शोधणं सुरू केलं.
उंटाची हाडं,उंटांच्या मूर्ती,उंटांसंबंधी भित्तीचित्रं, गुहांमधली चित्रं,मुलांच्या खेळण्यांच्या अवशेषांमधली उंटकेंद्री खेळणी,
मडक्यांच्या खापरांवरील चित्रं आणि अशाच आणखी काही गोष्टींचा शोध तिने घेतला.यामुळे अगदी प्रागैतिहासिक काळापासून उंट आणि माणूस यांचा परस्पर संबंध कसा होता,हे स्पष्ट होण्यास मदत झाली.त्यावरून इल्सेने जे अंदाज बांधले त्यानुसार इ.स.पूर्व तीन हजारच्या आसपास म्हणजे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी कधी तरी उंट (म्हणजे ड्रोमडेरी,अर्थात एका वशिंडाचा उंट) मानवाचा साथी बनला.
साधारणपणे त्याच सुमारास बॅक्ट्रियन कॅमल म्हणजे दोन वशिंडांचा उंट उत्तर इराण आणि तुर्कमेनिस्तानमध्ये माणसाचा साथी बनला.
यथावकाश इल्सेला पीएचडी मिळाली.त्यानंतर पुढे काय हा प्रश्न तिच्यासमोर होताच.त्याचवेळी तिला जॉर्डनमधल्या बेदूंच्या आणि उंटांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली.पण तिला जॉर्डन सरकारने संशोधनासाठी आवश्यक ती परवानगी नाकारली.त्यासाठी दिलं गेलेलं कारण तसं विचित्रच होतं.अधिकृत माहितीनुसार जॉर्डनमध्ये कुठेही तंबूत राहणारे बेदू अस्तित्वात नव्हते;कुठलेही बेदू किंवा अरब उंटांवर अवलंबून नव्हते किंवा उंट वापरतसुद्धा नव्हते. हे खरंतर धादांत असत्य होतं;पण ते मान्य करणं इल्सेला भाग होतं.मग तिने पुन्हा पुरातत्त्वीय संशोधनात भाग घ्यायला सुरुवात केली.याच सुमारास गॅरी रोलेफ्सन हा मानवशास्त्रज्ञ तिच्या जीवनात आला. त्यांचा प्रेमविवाह झाला.नंतर वर्षभरातच तिला जुळं झालं.त्यावेळी ती अम्मानमध्ये होती.तिच्या आयुष्यातून उंट हद्दपार झाल्यातच जमा होते.हे जोडपं मग कॅलिफोर्नियामध्ये सॅन डिएगोला वास्तव्यास गेलं तिथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये गॅरी मानवशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला;तर इल्से पुरातत्व शिकवू लागली.
महत्वाची नोंद - हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन पुणे,जगातल्या सर्व भटक्यांना… १८३ पानांचे व १७ अज्ञात भटक्यांची प्रेरणादायी,जीवनगाथा या पुस्तकात आहे,पुढील लेख हा लेखाचा शेवटचा भाग.त्याचसोबत पुस्तकाचाही शेवट…आपण बघता बघता थोडं थोडं करून संपूर्ण पुस्तक वाचले.
प्रत्येक प्रवासाची सुरुवात एका पावलाने होते. आपल्या सर्वांचे आभार व धन्यवाद