आपण खेळण्यासाठी घडलो आहोत आणि खेळण्यातूनच घडलेलो आहोत.आपण ज्या वेळी खेळते असतो,त्या वेळी आपल्यातल्या मानवतेचं विशुद्ध दर्शन आपल्या खेळातून घडवण्यात आपण मग्न असतो. आपल्यातल्या वैयक्तिक सच्चेपणाचं दर्शन इतरांना घडत असतं.ज्या ज्या वेळी आपल्याला खूप प्रफुल्लित, तरतरीत वाटत असतं,त्या वेळी आपल्या खेळातून आपल्या स्मरणात राहिलेले सर्वोत्तम क्षणच आपल्याला आठवतात,यात नवल ते काय?"
खेळामुळे आपल्या मनाच्या कक्षा अधिक विस्तारतात, आणि त्यामुळेच सखोल शोध घेण्याची क्षमताही वाढते.नवीन कल्पना मनात रुजवून घेणं किंवा जुन्याच कल्पनांवर नव्याने प्रकाश टाकणं आपल्याला सहज जमतं.खेळ आपल्याला अधिक चौकस वृत्ती बहाल करतो, नावीन्यपूर्ण गोष्टींशी समरस होण्याचं भान देतो, अधिक कार्यरत राहण्यासाठी मदत करतो.
आवश्यकतावादी व्यक्तीच्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी खेळ ही एक पायाभूत गरज आहे, कारण त्याच्यामुळेच शोधक वृत्तीला तीन विशिष्ट अशा मार्गांनी चालना मिळते, एक प्रकारचं इंधनच खेळामुळे तिला मिळतं,असंही म्हणता येईल.
एक म्हणजे,खेळामुळे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची व्याप्ती वाढते.आपण एरव्ही ज्या पर्यायांचा विचार करणं तर दूरच,पण ज्यांच्याकडे वळूनही पाहिलं नसतं त्यांच्यातल्या शक्यता आपण पाहू शकतो.एरवी ज्यांचा संबंध जोडण्याचं आपल्याला सुचलं नसतं,त्या दोन पर्यायांमधला संबंध शोधण्याचा प्रयत्न आपण करतो.खेळामुळे आपल्या मनाची सर्व कवाडं खुली होतात.आपला दृष्टिकोन विशाल होतो. आपल्या काही चुकीच्या आणि जुन्या समजुतींना आव्हान देण्याची समर्थता आपल्यात येते आणि ज्या कल्पना आपण तपासूनही पाहिलेल्या नसतात,त्यांचं स्वागत करण्यासाठी आपलं मन तयार होतं.खेळामुळे आपल्यात होणारा आणखी एक बदल म्हणजे,आपण आपल्या जाणिवांना विस्तारण्याची परवानगी देतो आणि त्यामुळे नवनवीन गोष्टी,कल्पना आपल्याला सुचत जातात.
अल्बर्ट आईनस्टाईन यांनी एकदा म्हटलं होतं तसं : मी जेव्हा मला स्वतःला किंवा माझ्या विचार करण्याच्या पद्धतींना तपासून बघतो,त्या वेळी मी अशा निष्कर्षाप्रत येतो की,कल्पनाविलासाची जी देणगी असते,ती मला माझ्यातल्या गुणांपेक्षा,क्षमतेपेक्षाही अधिक मोलाची वाटते.कारण तिच्यातून मला सकारात्मक ज्ञान मिळवता येतं.
दुसऱ्या प्रकारे खेळाचा होणारा फायदा असा आहे की, तुम्ही जर कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली असाल, तर त्यावरचा रामबाण उपाय आहे तो म्हणजे खेळ.
कारण ताण हा निर्मितीक्षमतेचा शत्रू आहे.विश्वास बसणं जरा कठीण आहे,पण ताण आपल्यातली निर्मितीक्षमता,चौकसवृत्ती आणि शोधक स्वभाव,या गोष्टींसाठी उपयुक्त असणारे आपल्या मेंदूचे महत्त्वपूर्ण भागच दुबळे करून टाकतो,त्यांचं काम अक्षरशः बंद पाडतो.असं काही घडल्यानंतर तुम्हाला किती मानसिक त्रास होईल,याची कल्पना करणंसुद्धा तुम्हाला नकोसं वाटेल.कामाचा तुमच्या मनावर खूप ताण आहे,आणि त्याच वेळी सगळ्या गोष्टी चुकताहेत,विपरीत काहीतरी घडतंय.तुम्हाला तुमच्या किल्ल्या सापडत नाहीयेत, येता-जाता तुम्ही कशावर तरी आपटत आहात.एक अतिशय महत्त्वाचा रिपोर्ट तुम्ही घरीच स्वयंपाक
घरातल्या टेबलावर विसरून आला आहात.
अलिकडच्या काळात झालेल्या संशोधनातून असं दिसून येत आहे की,आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूच्या भागातल्या हालचाली ताणामुळे अधिक क्रियाशील होतात (The Amygdala) आणि त्याच वेळी मेंदूचा जो भाग ज्ञान मिळवण्याच्या कामासाठी (The Hippocampus) जबाबदार असतो त्याची क्रियाशीलता हा ताण कमी करत असते.या सर्व प्रक्रियेचा परिणाम म्हणजे आपण स्वच्छपणे विचार करण्याची आपली क्षमताच हरवून बसतो.
माझ्या स्वतःच्या मुलांमध्ये हे असे विचित्र परिणाम झाले त्या वेळी खेळाने सर्व परिस्थिती कशी आटोक्यात आणली,ते मी अनुभवलं आहे.ज्या वेळी एखाद्या गोष्टीचा त्यांच्या मनावर ताण असतो,
सगळ्या गोष्टी हाताबाहेर जाताहेत असं लक्षात येतं,त्या वेळी मी त्यांना चित्रकलेत मन रमवायला सांगतो आणि याचा सुपरिणाम लगेचच दिसून येतो.त्यांच्या मनावरचा ताण कुठल्याकुठे पळून जातो आणि त्यांची शोधक वृत्ती परत येते.आता तिसरा फायदा ! एडवर्ड एम. हॅलोवेल हे एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत,आणि मेंदूच्या कार्यासंबंधात त्यांचा खास अभ्यास आहे.ते म्हणतात
की,खेळामुळे मेंदूच्या अंमलबजावणी करण्याच्या कार्यावर सकारात्मक परिणाम होतो.त्यांनी एके ठिकाणी लिहिलंय,मेंदूच्या अंमलबजावणी कार्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या गोष्टी आहेत,त्या म्हणजे योजना आखणं,त्यांचे अग्रक्रम ठरवणं,कोणतं कार्य कधी करायचं ते ठरवणं,कामासंदर्भातल्या अपेक्षा ठेवणं, प्रतिनिधिक गोष्टी ठरवणं,निर्णय घेणं,विश्लेषण करणं थोडक्यात सांगायचं तर व्यवसाय उत्तम तऱ्हेने चालवण्यासाठी एका कार्यकारी अधिकाऱ्याला प्रभुत्व मिळवण्यासाठी गरजेची असलेली जवळ जवळ सगळीच कौशल्यं मेंदूजवळ असतात आणि खेळामुळे ही कौशल्यं अधिक उजळून निघतात.
खेळ मेंदूच्या त्या भागांना चालना देतो,जे दोन प्रकारे त्यांचं कार्य करतात.काळजीपूर्वक,तर्कशुद्ध कारणमीमांसा करून आणि मुक्तपणे,कोणतीही बंधनं न मानता ते शोधक वृत्तीचा वापर करण्याचे संदेश देतात. म्हणूनच खेळत असतानाच्याच काळात अत्यंत महत्त्वपूर्ण विचार कुणालाही सुचले,तर त्यात नवल वाटायला नको.
हॅलोविल लिहितात : पृथ्वी गोल आहे हा शोध कोलंबसला लागला तेव्हा तो खेळातच रमलेला होता. सफरचंदाच्या झाडावरून एक सफरचंद खाली पडताना न्यूटनने पाहिलं आणि गुरुत्वाकर्षणाच्या ताकदीचा शोध त्यांना लागला,त्या वेळी तेही काहीतरी खेळतच होते. वॅटसन आणि क्रिक डी.एन.ए.मॉलिक्यूलच्या संभाव्य आकाराबद्दल खेळकरपणे चर्चा करत होते,त्याच वेळी त्यांना डबल हेलिकसच्या संरचनेची कल्पना आली. Iambic meter या संकल्पनेशी शेक्सपिअर आयुष्यभर खेळले.मोझार्ट यांनी त्यांच्या हयातीतला जागेपणीचा एक क्षणही खेळाशिवाय वाया घालवला नाही.आईनस्टाईन यांचे 'थॉट एक्सपरिमेंटस्' हे स्वतःच्या मनाशी खेळण्याचं उत्तम उदाहरण आहे.
काम आणि खेळ
काही कल्पक कंपन्यांनी अखेर खेळाचं मूल्य काय आणि किती आहे, हे जाणून घेतलं आहे.ट्विटरचे सीईओ डिक कॉस्टोलो यांनी विनोदाच्या माध्यमातून खेळाला पुढे आणलं आहे,ते त्यांच्या कंपनीतच ! त्यांनी त्यासाठी आयत्या वेळी सुचेल त्याप्रमाणे विनोदाचं सादरीकरण करण्यासाठी एक जागा ठेवली आहे. सुरुवातीच्या काळात स्वतःएक स्टँडअप कॉमेडियन असल्यामुळे त्यांना याची कल्पना आहे की असं आयत्या वेळी सादरीकरण करण्याच्या क्रियेत लोकांना स्वतःच्या मेंदूला जरा ताण द्यावा लागतो.त्यामुळे त्यांच्या विचारात एक प्रकारचा लवचीकपणा येतो,त्यातून चाकोरीबाहेरचं काही तरी त्यांना सापडतं,त्यांच्या निर्मितीक्षमतेचाही त्यात कस लागतो.
इतर काही कंपन्या खेळकर वातावरण जपण्यासाठी सभोवतालच्या वातावरणात बदल घडवून आणतात.आई.
डी.ई.ओ.मध्ये त्यांच्या मीटिंग्ज त्यांनी छोट्याशा बसमध्ये घ्यायला सुरुवात केली आहे.गुगल कंपनीच्या हॉल्समध्ये एखाद्या ठिकाणी अचानकच तुम्ही गुलाबी फ्लेमिंगोजच्या आवरणाखाली असलेल्या भल्यामोठ्या डायनॉसॉरवर आदळू शकता.(अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत.) पिक्सर स्टुडिओजमध्ये कलाकारांच्या ऑफिसेसची वेगवेगळ्या प्रकारे सजावट केलेली आहे. काहींचं स्वरूप जुन्या काळातल्या पाश्चिमात्य सलॉनसारखं आहे,काही लाकडापासून बनवलेल्या झोपड्यांसारखी ! अशाच एका ऑफिसला मी भेट दिली होती,तिथे जमिनीपासून छतापर्यंत सर्वत्र 'स्टारवॉर्स' मधल्या पात्रांच्या छोट्याछोट्या मूर्ती ठेवलेल्या होत्या.
माझ्या माहितीतल्या एका यशस्वी महिलेने एका प्रकाशन संस्थेमधल्या तिच्या ऑफिसच्या एका टेबलावर एक स्टेपल्सपासून तयार केलेलं 'इझी बटण' ठेवलं होतं.ज्या ज्या वेळी तिच्या ऑफिसमध्ये आलेली माणसं जायला निघत,त्या वेळी या मोठ्याशा बटणावर हात दाबून बघण्याचा बालीश आनंद घेण्याचा मोह त्यांना होत असे.तसं ते दाबलं की,त्यातून आधीच ध्वनिमुद्रित करून ठेवलेलं 'हे तर अगदीच सोपं होतं' हे वाक्य मोठ्या आवाजात संपूर्ण ऑफिसला ऐकू जात असे. त्याच संस्थेतल्या खालच्या हॉलमधल्या स्वतःच्या ऑफिसमध्ये दुसऱ्या एका बाईंनी लहान मुलांच्या पुस्तकातली चित्रं फ्रेम करून लावली होती.लहान वयात घेतलेल्या आनंदाची आठवण ही चित्रं तिला करून देत असत.टेबलवरची खेळणी,फ्लेमिंगोच्या आवरणाखाली असलेले डायनॉसॉर्स आणि काहीतरी करण्याच्या तयारीत असलेली खेळण्यातली पात्रं, या सर्व चित्त विचलित करणाऱ्या गोष्टी कुणाकुणाला क्षुल्लक वाटू शकतात.पण कदाचित याच्या विरुद्धही असू शकतं,हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा.
खेळ ही एक बिनमहत्त्वाची आणि क्षुल्लक बाब आहे, अशी ठाम समजूत असणाऱ्या अनावश्यकतावाद्यांना या त-हेचे वेगवेगळे प्रयत्न हे एक प्रकारचं आव्हान आहे. या आव्हानांशी सामना करत बसण्याऐवजी खेळ ही निर्मितीक्षमता आणि शोधकवृत्तीकडे आपल्याला नेणारी एक सुंदर गोष्ट आहे,ही भावना अनावश्यकतावाद्यांनी समजून घ्यायला हवी.
काय महत्त्वाचं आहे,हे ठरवण्यासाठीच फक्त खेळाची गरज नाहीये तर खेळ ही एक स्वयंपूर्ण गोष्ट आहे.
म्हणूनच आता एका गोष्टीवर आपल्याला विचार करायला हवा की,खेळाला आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आणि आपल्या आयुष्यातही कशा प्रकारे सामावून घेऊ शकतो? ब्राऊन यांनी त्यांच्या पुस्तकात एक छोटीशी पुस्तिकाही अंतर्भूत केलेली आहे आणि यामागे त्यांचा मूळ हेतू वाचकांना स्वतःला खेळाशी कसं जोडून घेता येईल,हे समजावून सांगण्याचाच आहे.ते असं सुचवतात की,वाचकांनी त्यांच्या भूतकाळात डोकावून बघत खेळांच्या आठवणी काढाव्यात.लहान असताना तुम्ही अशा कोणत्या गोष्टी करत होतात,ज्या तुम्हाला उत्तेजित करत असत ? आज त्या गोष्टी कश प्रकारे तुम्हाला पुन्हा एकदा करता येतील ?
२८.१२.२४ या लेखातील शेवटचा भाग…