* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: रॅफची तडजोड / Raph's Compromise

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१८/१२/२४

रॅफची तडजोड / Raph's Compromise

युरोपातील साम्राज्यवादी देशांनी अमेरिका ऑस्ट्रेलियात मूलवासीयांना खच्ची करून नवयुरोप वसवले.त्यांत आफ्रिकेतील गुलाम राबवले,आणि दुसऱ्या महायुद्धापर्यंत आशिया आफ्रिका खंड पारतंत्र्यात खितपत ठेवले.

नवयुरोपाच्या मुबलक साधन-संपत्तीचा, आशिया आफ्रिका खंडांतून शोषून घेतलेल्या संसाधनांचा,आणि भराभर विकसित होणाऱ्या विज्ञान - तंत्रज्ञानाचा आधार घेऊन युरोप नवयुरोप आर्थिक भरभराटीत राहिले.आशियाई आफ्रिकी देशांची हळूहळू अधोगतीच होत होती.दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी भारताचे दरडोई अन्न उत्पादन रसातळाला पोचले होते. दुष्काळात मोठ्या प्रमाणावर भूकबळी पडत होते. एवढ्यात युरोपीय राष्ट्र,जपान यांच्या स्पर्धेतून दोन महायुद्धे झाली.

रशिया दुसऱ्या महायुद्धातील विजेत्या गटांत होता.पण समतेचे तात्त्विक प्रतिपादन करणाऱ्या रशियानेसुद्धा पूर्व युरोप - मध्य आशियात स्वतःचे एक साम्राज्यच प्रस्थापित केले होते. सर्वच तत्त्वप्रणालींचा विपर्यास करण्यात मनुष्यप्राणी तरबेज आहे.समाजात मूठभर भांडवलशहा श्रमिकांचे शोषण करतात,ते थांबवले पाहिजे.ह्यासाठी सर्व उत्पादन साधने समाजाच्या मालकीची केली गेली पाहिजेत असे प्रतिपादन करत रशियात एकोणीसशे अठरा सालची राज्यक्रांती झाली


त्यातून सत्तेवर आलेल्या कम्युनिस्ट पक्षाने काही वर्षांतच एक पक्षकार्यकर्त्यांची जुलमी यंत्रणा विकसित केली.प्रथम त्यांनी जवळजवळ गुलामांचे आयुष्य कंठणाऱ्याच शेतमजुरांना जमीनदारांच्या जुलमातून सोडवले,पण नंतर हळूहळू पक्षयंत्रणेच्या जुलमाखाली भरडले.अखेर ह्या सगळ्या विपर्यस्त व्यवस्थेच्या दुःखस्थितीतून चीन-क्युबासारखे अपवाद वगळता इतर कम्युनिस्ट राजवटी कोलमडल्या.


हा साम्यवादाचा विपर्यास खूप ठळकपणे लोकांच्या मनावर बिंबवणे हा अमेरिकी सत्ताधीशांचा आवडता उद्योग होता.कारण ह्या विपर्यासाबद्दल प्रचार करत आपण दुसऱ्याच बाजूने जो अत्याचार चालवला होता त्याचे समर्थन करता येत होते.हार्वर्डच्या विद्वानांत, विद्यार्थ्यांत हे वाद चालूच होते.वारूळ पुराणाचा नायक रॅफ स्वतःह्या वादात कसा सामील झाला आणि अखेर प्रस्थापित भांडवलशाही व्यवस्थेतच सहभागी होऊन मार्ग काढला पाहिजे ह्या निर्णयाप्रत कसा आला,हे अँटहिलच्या कथेचे महत्त्वाचे सूत्र आहे. विल्सननी स्वतःमान्य केलेली,त्यांचा कथानायक रॅफ जिला अनुसरून एका बांधकाम व्यावसायिकांच्या कंपनीसाठी काम करू लागतो,ती विचारसरणी सांगते की,खुल्या बाजारपेठेत जे व्यवहार चालतात,तीच जगातील सर्वोत्कृष्ट अर्थरचना आहे,त्यातूनच सर्वांचे भले होईल.पण अगदी उघड आहे की ह्या अर्थव्यवहारांतूनच निसर्गाचा मोठा विध्वंस चालला आहे.विल्सनना तर निसर्ग वाचवायचा आहे.तेव्हा रॅफच्या माध्यमातून ते तोड सुचवतात - श्रीमंतांच्या निसर्गप्रमाचा फायदा घेत-घेत हा निसर्ग वाचवावा.ह्याचे चित्रण रॅफच्या त्याच्या मामाबरोबरच्या संवादात केलेले आहे:


बघ, रॅफ, तुला जेप्सन-नोकोबी परगणे नेहमीच गांवंढळ राहून हवेत का? एक पाहा,सगळ्या भागात विकास होणारच.आपला भाग भरपूर सूर्यप्रकाशाचा, सौम्य हिवाळ्याचा आहे.त्याला सूर्यपट्टयां म्हणायला लागले आहेत! आणि मोबील,पेन्साकोला हे तर सूर्यपट्ट्यातही विकासाच्या वेगासाठी प्रसिद्ध होताहेत.राईट?


रॅफ दबला.हळूच उत्तरला, 'येस्सर!' त्याला सायरसमामाचं म्हणणं पटत नव्हतं,पण सभ्य,सौम्य असं उत्तरही नव्हतं त्याच्यापाशी,


"काय होतं पूर्वी,आणि आज काय आहे?" मामानं हल्ला सुरू ठेवला."तुझे आजोबा लहान असताना मोबीलच्या दक्षिणेला काहीच विकास झाला नव्हता.डॉग नदीपासनं सीडार पॉइंटला गेलात,तर दोनपाच घरं फक्त दिसायची. रस्त्याच्या शेवटच्या भागात तर डांबरीकरणही केलं नव्हतं,हो ना?"


रॅफनं नुसतीच होकारार्थी मान हलवली.


"आणि सीडार पॉइंटला धडपडत पोचलं,की डॉफिन बेट दिसायचं. शसुंदर होतं ते! छान वाळवंटी किनारपट्टी. एका टोकाला यादवीच्या काळातला किल्ला.पण बोट भाड्यानं घेऊन जावं लागायचं.बहुतेक बेट रिकामं होतं. आणि आज पाहा,सगळा इथून तिथला भाग विकसित झाला आहे.उद्योगधंदे बहरताहेत.डॉफिन बेटावर जायला पूल झाला आहे.ॲलाबामा राज्याच्या अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा भाग आहे तो.याला विकास म्हणतात,रॅफ ! प्रगती आहे ही!"


रॅफ हरला होता.


"अमेरिका बुडावर बसून थोर नाही झाली,रॅफ ! कठोर होऊन, युद्ध खेळून आपण मोठे झालो.इतिहास वाच तू -- शाळांमध्ये शिकवतात तो बायल्यांचा, डाव्यांचा इतिहास नाही.खरा इतिहास ! देवानं जे आपल्याला दिलं,ते घ्यायला रेड इंडियनांना हाकलावं लागलं.मेक्सिकोशी लढून पॅसिफिक किनारा गाठता आला.देश दुप्पट झाला त्या लढाईनं.चांगलं- वाईट ठरवत नाही मी. मी जग कसं चालतं ते सांगतो आहे तुला.वाढत जा,नाहीतर नष्ट व्हा! "


रॅफचा योजनेचा गाभा होता,नोकोबीच्या तीरावर मूठभर छोट्या इस्टेटी घडवणं,हा.प्रत्येक घराला तलावापर्यंत जाता येत होतं.सर्व घरांना एक रस्ता जोडत होता, आणि तो चौक्या बसवून पूर्णपणे खाजगी राखला होता. सगळ्या घरांना बोटींसाठी एकच सामायिक धक्का दिला होता.प्रत्येक घराला एकीकडे तलाव आणि दुसरीकडे राखीव जंगल होतं.मध्यमवर्गाला इथे जागा नव्हती,पण श्रीमंतांना श्रीमंती दरानं घरं देऊन कमी खर्चात मूळ अपेक्षित फायदा कमावता येत होता.


"आणि आणखीन एक बाब पाहा.आपण धोक्यातले कोणते परिसर वाचवले,कोणत्या जीवजाती वाचवल्या, याची भरपूर जाहिरात करू शकतो.नोकोबीला प्रसिद्ध करू शकतो.या राज्यात किती विकास कार्यक्रम असल्या कामाचा दावा करू शकतात?आणि किती जागी घरांमधून पायी जाऊन अशा जाती पाहता येतात ? आपण गव्हर्नरला बोलावू शकतो,उद्घाटनाला ! भरपूर फोटोज् काढल्यानं तोही खूष.आपण जर या योजनेला वनस्पती उद्यान म्हटलं,तर सांभाळेल सरकार,आणि आपल्याला कर कमी करा असं म्हणता येईल !


आणि मागे त्या मुंग्या मारण्यानं मिळालेली अपप्रसिद्धीही मिटवून टाकता येईल!"


अखेर कमी कटकटीत मूळ अपेक्षित नफा,या 'अल्टिमेट सेलिंग पॉइंट'वर रॅफचं म्हणणं त्याच्या मामाने व त्यांच्या भागीदारांनी मान्य केलं.


फुटताहेत हे बुडबुडे


अँटहिलच्या केन्द्रस्थानी आहे अमेरिकेतला बांधकाम व्यवसाय.हे पुस्तक प्रकाशित झाले २०१० साली. २००६ ते ११ ह्या कालावधीत स्थावर मालमत्तेच्या, घरांच्या किमती सतत चढत्या कमानीवर राहिल्या. १९९० नंतरच्या कालात संगणक,

आंतरजाल ह्यांतील क्रांतिकारी प्रगतीमुळे पैसा भराभर हलवणे,अगदी एक सहस्रांश सेकंदातसुद्धा शक्य झाले.ह्याचा फायदा उठवत बँका व इतर आर्थिक उलाढाली करणाऱ्या कंपन्यांनी नवनव्या क्लृप्त्या काढल्या, नवनवी हत्यारे पाजळली. ह्यातून सामान्य लोकांना काय चालले आहे,

आपण कोणत्या अटींवर कर्ज काढतो आहोत,किती व्याज भरतो आहोत हे समजणे अशक्यप्राय होऊन बसले. 


पण मालमत्तेच्या भडकत्या किमतींचा मोह पडून अनेकांनी ऐपतीपलीकडची घरकर्जे काढली.अशा कर्जाच्या फासात लोकांना अडकवत बँकांनी अतोनात पैसे कमावले.हा बुडबुडा काही टिकाऊ नव्हता,तो फुटल्यावर कर्जबाजारी लोकांनी घरे गमावली.

पण अशा बेघर झालेल्या लोकांना वाचवायला सरकारने काहीही पावले उचलली नाहीत.अर्थात ह्याच्या जोडीला लोकांना निष्कारण मोहात पाडणाऱ्या बँकांचेही पैसे बुडाले.जर बाजारपेठ खरीच मुक्त असती तर लोकांना दारिद्र्याच्या खाईत लोटणाऱ्या बँकांनाही बुडू द्यायला हवे होते.


( 'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,संक्षिप्त अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


पण लोकांना काहीही मदत न देणाऱ्या ओबामांच्या सरकारने बँकांना मात्र बुडू दिले नाही.त्यांच्या घशात अब्जावधी डॉलर ओतले,बँकांना तगवले.मग बँक व्यवस्थापकांनी काय केले?


आधी बँकांचे उच्चाधिकारी कार्यक्षमतेसाठी प्रोत्साहन या गोंडस नावाखाली प्रचंड पगार,बोनस खात होते.


आता स्वतःला कार्यक्षम म्हणवून घेणे शक्य नव्हते. तेव्हा सरकारने बँकांत पैसे ओतल्यावर त्यांनी निर्लज्जपणे मोठमोठे बोनस स्वतःला देऊन घेतले, एवढेच की ह्या बोनसचे नाव बदलले.आता कार्यक्षमता प्रोत्साहन नाही - त्यांनी नोकरी सोडून जाऊ नये म्हणून खास प्रोत्साहन असे नाव दिले.तेव्हा अर्थव्यवस्था बुडबुडा फुगताना सुदृढ असल्याचा आभास होता, तेव्हाही बोनस,आणि या बँकर्सच्याच करामतीने ती डबघाईला आल्यावरही शिक्षा सोडाच,

उलट तेवढाच बोनस.हे काही सगळ्यांनीच खपवून घेतले असे नाही. ह्या साऱ्या गैरव्यवहारावर अतोनात जे संतापले त्यांचे एक म्होरके आहेत.जोसेफ स्टिग्लिट्झ हे दिग्गज अर्थतज्ज्ञ.२००१ सालचे नोबेल पारितोषिक विजेते; जोडीला आर्थिक धोरणे घडवण्यात,राबवण्यातही सक्रिय.अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिन्टनच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष,विश्व बँकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ,फ्रान्सचे अध्यक्ष सार्कोझी यांनी स्थापलेल्या आर्थिक विकास आणि सामाजिक प्रगती म्हणजे काय ह्याचा मागोवा घेणाऱ्या आंतराराष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, असा त्यांचा प्रचंड अनुभव आहे.एक सर्वसमावेशक, विशाल दृष्टिकोन ही त्यांची खासियत आहे.ते केवळ अर्थकारणाचा ऊहापोह करत नाहीत,तर अर्थव्यवस्था, राजकारण,समाजकारण,पर्यावरण ह्या साऱ्यांचा साकल्याने विचार करतात.ह्या मुरलेल्या,अनुभवी विद्वानाने अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत.त्यातील सगळ्यात अलीकडच्या पुस्तकाचा विषय आहे विषमतेचे मूलस्रोत व दुष्परिणाम.गेल्या दोन वर्षांत आर्थिक अन्यायाचा,भ्रष्ट राज्यकर्त्यांचा निषेध करत अनेक देशांत अगणित लोक रस्त्यांवर उतरले.स्टिग्लिट्झनी मुद्दाम अरब देशांत जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.नंतर अमेरिकेत वॉल स्ट्रीटवर उतरलेले लोक तर स्टिग्लिट्झनीच पुरवलेली घोषणा देत होते : हा आहे नव्याण्णव टक्के लोकांचा आक्रोश ! एक टक्का धनदांडग्यांनी अमेरिकेत जो हाहाकार मांडला आहे तो आवरलाच पाहिजे.स्टिग्लिट्झच्या The Price of Inequality पुस्तकाचा भर आहे अमेरिकेवर,

पण त्यांनी जागतिकीकरणाचेही मार्मिक विश्लेषण केले आहे.भौतिकशास्त्रात,जीवशास्त्रात ज्या वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या जातात त्या पडताळणे तसे सोपे आहे.म्हणूनच डार्विनच्या प्रतिपादनानंतर लवकरच शास्त्रीय जगतात त्याचा सिद्धान्त सर्वमान्य झाला.पण अमेरिकेतल्या लोकमानसात अनेक पूर्वग्रहांमुळे तो अजून मोठ्या प्रमाणात नाकारला जातो.


समाजशास्त्रात,अर्थशास्त्रात भौतिकशास्त्राहून,जीवशास्त्राहून खूप वेगळी परिस्थिती आहे.ह्या शास्त्रांतले सिद्धान्त पडताळणे जास्त अवघड आहे.जोडीलाच ह्या शास्त्रांबद्दल केवळ सामान्य जनतेच्याच नाही,तर शास्त्रज्ञांच्या मनांतही अतोनात पूर्वग्रहांची पाळेमुळे अगदी घट्ट रुजलेली आहेत. अर्थशास्त्रातली अशीच पूर्वग्रहांनी व्यवस्थित पोसलेली विचारसरणी सांगते की मुक्त बाजारहाट अतिशय कार्यक्षम असते.(अपूर्ण उर्वरित भाग पुढील लेखामध्ये)