एक म्हणजे तिथे जवळपास कुठेही बसण्यासाठी योग्य जागा नव्हती आणि दुसरं म्हणजे कुठेही बसायला माझी तयारी नव्हती.त्या जागेपासून सर्वात जवळचं,एका निष्पर्ण आक्रोडाचं झाड तिथून तीनशे यार्ड लांब होतं त्यामुळे तिथे बसण्याचा प्रश्नच येत नव्हता आणि स्पष्टपणे कबूल करायचं झालं तर जमीनीवर कुठेतरी बसण्याचं धैर्य माझ्याकडे नव्हतं.मी त्या गावात संध्याकाळी आलो होतो.चहा पिणं,त्या मुलाच्या आईची कथा ऐकणं,बिबळ्याचा माग काढणं या सर्व गोष्टींमध्ये बराच वेळ खर्च झाला होता आणि आता मला किमान सुरक्षित वाटेल असा आडोसा किंवा लपणं तयार करणं यासाठी हाताशी वेळच उरला नव्हता.त्यामुळे मी जमीनीवर बसायचं ठरवलं तरी अक्षरशः कुठेही बसावं लागणार होतं;त्यात निवडीला वावच नव्हता.त्यात परत माझ्यावर हल्ला झाला असता तर मला ज्या हत्याराचा सराव होता त्याचा,म्हणजे रायफलचा, काहीही उपयोग नव्हता कारण वाघ किंवा बिबळ्या यांच्याशी आमनेसामने संपर्क झाला तर बंदुकांचा काहीही उपयोग नसतो.
ही सर्व मोहीम उरकून अंगणात परतल्यावर मी मुखियाला एक पहार,मजबूत लाकडी मेख,हातोडा व कुत्र्याची साखळी एवढ्या वस्तू आणायला सांगितल्या. पहारीने अंगणातली एक फरशी मी उचकटून काढली, त्या खड्ड्यात ती लाकडी मेख खोलवर ठोकली आणि साखळीची एक कडी त्यात अडकवली.त्यानंतर मुखियाच्या मदतीने मी त्या मुलाचा मृतदेह तिथे आणून ठेवला आणि साखळीचं दुसरं टोक त्याला बांधून टाकलं.आपल्या आयुष्याचा शेवट ठरवणारी अदृश्य शक्ती - तिला काही लोक नशीब तर काही लोक 'किस्मत' म्हणतात- कधीकधी फार क्रूर खेळ करते.
गेल्या काही दिवसात या अज्ञात शक्तीने एका कुटुंबाची रोटी कमावणाऱ्याचा बळी घेऊन त्यांना उघडं पाडलं होतं,
आयुष्यभर काबाडकष्ट करून शेवटची काही वर्ष त्यातल्या त्यात सुखासमाधानात घालवण्याची स्वप्न रंगवणाऱ्या म्हातारीच्या आयुष्याची दोरी अतिशय वेदनामयरित्या तोडली होती आणि आता...या छोट्या पोराच्याही आयुष्याचा दोर कापला होता.
त्याच्याकडे बघूनच समजत होतं की त्या विधवा स्त्रीने त्याचं पालनपोषण किती काळजीपूर्वक केलं होतं.त्यामुळेच रडता रडता ती मध्येच थांबून म्हणत होती,"देवा, माझ्या पोराने असा काय गुन्हा केला होता की इतक्या उमेदीच्या वयात त्याच्या वाट्याला इतका भयानक मृत्यू यावा ?
अंगणातली फरशी काढतानाच मी सांगितलं होतं की त्या मुलाच्या आईला आणि बहिणीला त्या इमारतीच्या अगदी शेवटच्या खोलीत नेलं जावं.माझी सर्व तयारी झाल्यावर मी झऱ्यावर जाऊन हातपाय धुतले, ताजातवाना झालो व गवताच्या थोड्या पेंढ्या आणायला एकाला पाठवून दिलं.ते कुटुंब राहत होतं त्या घरासमोरच्या व्हरांड्यावर मी त्यातल थोडं गवत पसरवून ठेवलं.आता अंधार पडला होता व आसपास जमलेल्या सर्वांना रात्रभर शक्य तेवढी शांतता ठेवा अशी शेवटची सूचना देऊन मी घरी पाठवून दिलं.
गवताच्या गादीवर आडवा पडून व पुढे गवताचा थोडा ढीग रचून मी समोर पाह्यलं तर मला मृतदेह अगदी स्पष्ट दिसत होता.
आदल्या रात्री कितीही गोंगाट केला गेला असला तरी मला खात्री होती की आज रात्री बिबळ्या भक्ष्यावर येणार आणि भक्ष्य त्याच्या जागी न सापडल्याने तो दुसरा बळी मिळवण्यासाठी गावात येणार.ज्या सहजपणे त्याला या नव्या गावात शिकार मिळाली होती त्यामुळे त्याची उमेद वाढली असणार. म्हणूनच आज रात्री मी बराच आशावादी होतो.
संध्याकाळभर आभाळात ढग जमत होते पण एकदा त्या बाईच्या रडण्याचा आवाज सोडला तर रात्री ८ वाजल्यापासनं सर्व काही चिडीचिप होतं.चमकणाऱ्या वीजा आणि दूरवरून येणारा ढगांचा गडगडाट मोठ्या वादळाची ग्वाही देत होते.जवळजवळ पुढचा एक तास हे वादळ घोंगावत होतं आणि चमचमणाऱ्या वीजांचा प्रकाश इतका प्रखर होता की अंगणात एखादा उंदीर जरी आला असता तरी मला दिसला असता.अगदी मी त्याला अचूक उडवूही शकलो असतो.पाऊस थांबला पण आभाळ अजूनही भरलेलंच असल्याने अगदी काही इंचापर्यंतही दिसत नव्हतं.आता मात्र जिथे कुठे पडून राहायला असेल त्या ठिकाणाहून तो बिबळ्या निघण्याची वेळ आली होती व तो येण्याची वेळ ही तो आडोशाला जिथे कुठे बसला होता त्या ठिकाणावर अवलंबून होती.
त्या बाईच्या रडण्याचा आवाजही बंद झाला होता आणि चहूकडे संपूर्ण शांतता पसरली होती.मला याच क्षणाची अपेक्षा होती कारण मला बिबळ्याच्या हालचाली कळण्यासाठी श्रवणशक्तीवर अवलंबून राहावं लागत होतं आणि याचसाठी मी कुत्र्याची साखळी वापरली होती.माझ्या अंगाखालचं गवत पूर्ण वाळलेलं होतं व अंधारात कानात तेल घालून मी ऐकत असताना कोणतं तरी जनावर माझ्या पायाजवळ आल्याचं मला ऐकायला आलं.
गवतातून काहीतरी सरपटत,अगदी दबकत येत होतं.मी यावेळी शॉर्टस घातली होती आणि माझा गुडघ्यापर्यंतचा पाय उघडा होता.याच भागाला त्या केसाळ जनावराचा मला स्पर्श झाला.
हा नरभक्षकच असणार आणि तो दबकत माझ्या गळ्यावर पकड घेण्यासाठी पुढे येत असणार.आता पाय रोवण्यासाठी डाव्या खांद्यावर थोडा दाब देणार आणि त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी मी ट्रीगर दाबणार एवढ्यात एका छोट्या प्राण्याने माझे हात व छाती यांच्यामधल्या पोकळीत उडी मारली.ते एक छोटं मांजराचं पिल्लू होतं.वादळात सापडल्यानंतर प्रत्येक घराचा दरवाजा बंद आहे हे कळल्यावर ते माझ्याकडे उब आणि संरक्षणासाठी आलं होतं.
त्या पिल्लाने माझ्या कोटाच्या आत उब मिळवली आणि त्याने मला दिलेल्या क्षणिक भीतीच्या धक्क्यातून मी सावरतोय तेवढ्यात मला खालच्या शेतांमधून,खालच्या पट्टीतील गुरगुर ऐकू आली आणि तिचा आवाज हळूहळू वाढत जाऊन तिचं रुपांतर एका मोठ्या हिंस्त्र लढाईत झालं.असं युद्ध याआधी मी कधीही अनुभवलं नव्हतं. झालं होतं असं की बिबळ्याने काल जिथे भक्ष्य टाकून दिलं होतं तिथे तो आता आला होता,पण ते तिथे न मिळाल्याने फारशा चांगल्या मूडमध्ये नसतानाच त्या इलाक्याच्या मालकी हक्कावर दावा सांगणारा दुसरा बिबळ्या योगायोगाने नेमका तिथेच उपटला होता.अशा लढाया निसर्गात शक्यतो होत नाहीत.कारण शिकारी जनावरं स्वतःचा इलाका सोडून दुसऱ्याच्या राज्यात अतिक्रमण करत नाहीत. जर एकाच लिंगाची दोन जनावरं क्वचित कधी समोरासमोर आलीच तर ती एकमेकांची ताकद आजमावतात आणि जो कमी ताकदीचा आहे तो माघार घेतो.
आपला हा नरभक्षक जरी वयाने जास्त असला तरी ताकदवान होता आणि तो वावरत असलेल्या पाचशे चौ.मैल टापूत त्याला आजपर्यंत आव्हान मिळालं नसणार.पण इथे भैसवाड्यात मात्र तो आगंतुक - Tresspasser होता आणि आता हे स्वतः होऊन ओढवून घेतलेले युद्ध त्याला लढावंच लागणार होतं.तेच आता तो करत होता !
माझी ही संधी तर आता हुकल्यातच जमा होती.कारण जरी तो या लढाईत जिंकला तरी झालेल्या जखमांमुळे त्याला त्याच्या भक्ष्यामध्ये स्वारस्य उरणार नव्हतं. असंही होण्याची शक्यता होती की तो या लढाईत मारला जाईल... हा मात्र त्याच्या कारकीर्दीचा अनपेक्षित अंत ठरला असता,जेव्हा शासन आणि समस्त जनता यांचे एकत्रित प्रयत्नसुद्धा त्याला मारण्यात गेली आठ वर्षे अयशस्वी ठरले होते ! मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट, अनुवाद - विश्वास भावे
पाचसहा मिनिटं चाललेली ही पहिली 'राऊंड' संपली पण ती अनिर्णित राह्यली असावी.कारण मला अजूनही दोन्ही जनावरांचे आवाज ऐकायला येत होते.दहा-पंधरा मिनिटांच्या मध्यंतरानंतर शंभर ते चारशे यार्ड दूरवर ही लढाई परत एकदा सुरू झाली.ही फेरी छोटी होती पण तेवढीच हिंस्त्र आणि भयानक होती.बहुतेक स्थानिक इलाक्याचा मालक वरचढ ठरत असावा व तो हळूहळू आगंतुकाला 'रिंग'च्या बाहेर हाकलत नेत असावा. त्यानंतर बराच काळ शांततेत गेला.नंतर ते युद्ध डोंगराच्या कडेवर सुरू झालं आणि हळूहळू माझ्या कानांच्या टप्प्याच्याही बाहेर गेलं.अंधाराचे अजूनही पाच तास बाकी होते.पण माझी भैंसवाड्याची मोहीम फसली होती.त्याचप्रमाणे या लढाईत नरभक्षक बिबळ्याचा अंत होईल ही अपेक्षाही फोल ठरली होती.या लढाईत त्याला खूप जखमा झाल्या असणार,पण त्यामुळे त्याची नरमांसाबद्दलची हवस कमी होण्याचं काही कारण नव्हतं.मांजराचं ते पिल्लू रात्रभर शांतपणे झोपलं. जेव्हा पहाटेचा पहिला प्रकाश पूर्वेकडे दिसू लागला तसा मी अंगणात उतरलो,तो मृतदेह तिथून उचलला व जरा लांब एका छपराखाली सावलीत नेऊन ठेवला आणि त्यावर कांबळं पांघरून ठेवलं.मी दरवाजा ठोठावला तेव्हा मुखिया अजून झोपेतच होता.त्याने चहा करतो असं सांगितलं पण त्याला थोडातरी वेळ लागणार हे कळल्यामुळे मी नकार दिला आणि यापुढे नरभक्षक या गावी कधीही येणार नाही असं आश्वासन देऊन मृतदेहाची विल्हेवाट व्यवस्थित लावण्याचं वचन घेऊन मी रुद्रप्रयागच्या वाटेला लागलो.
आपण एखाद्या कामात कितीही वेळा अपयशी ठरलो तरी प्रत्येक अपयशानंतर आपल्याला नव्याने नैराश्य येतंच! मागच्या काही महिन्यात मी कित्येक वेळेला इन्स्पेक्शन बंगल्यातून,'या वेळेला तरी मला यश मिळेल' अशी आशा घेऊन बाहेर पडलो होतो आणि प्रत्येक वेळेला निराश होऊनच परतलो होतो.आणि आजही नव्याने मला निराशेने घेरलंच! माझं अपयश फक्त माझ्याशीच संबंधित असतं तर फारसं काही वाटलं नसतं,पण हा तर इतरांच्या जीवाशी खेळ चालला होता. केवळ दुर्भाग्य... मी माझ्या या सर्व अपयशाला खरोखर दुसरं काही कारणच देऊ शकत नव्हतो... हे दुर्भाग्य सातत्याने माझा पाठपुरावा करत होतं आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आता मला वाटायला लागलं होतं की जे काम मी अंगावर घेतलंय ते माझ्याकडून व्हावं ही नियतीची इच्छा नसावी.आसपास कुठेही झाड नसलेल्या ठिकाणीच बिबळ्याने त्या मुलाला टाकावं, त्या स्थानिक बिबळ्याला फिरायला तीस चौ.मैल इतका प्रदेश उपलब्ध असताना बरोबर नरभक्षक ज्या ठिकाणी भक्ष्य शोधायला आला होता त्याच ठिकाणी तो तडमडावा ? याला दुर्दैवाशिवाय दुसरं काय म्हणणार ?
अठरा मैलांचं ते अंतर काल फार वाटलं होतं.पण आज ते जास्तच लांब वाटत होतं आणि डोंगरही जरा जास्तच उंच वाटत होते.वाटेत लागणाऱ्या प्रत्येक गावात लोक माझी वाट पाहत होते पण त्यांना सांगण्यासाठी माझ्याकडे काय होतं तर वाईट बातमी ! पण त्यांची अढळ श्रद्धा होती की या जगात कोणीही 'ठरवून दिलेल्या' वेळच्या आधी मरू शकत नाही. अशा श्रद्धा एखाद्या महाकाय पर्वतालाही हलवू शकतात !
सकाळचा संपूर्ण वेळ अशा नैराश्याला माझी सोबत करू दिल्याबद्दल मला स्वतःची लाज वाटत असतानाच मी शेवटचं गाव सोडलं.या गावात मला घटकाभर बसायला सांगून चहाही दिला गेला व आता परत एकदा ताजातवाना होऊन रुद्रप्रयागचे शेवटचे चार मैल चालायला सुरुवात केली.
तसं अचानक माझ्या लक्षात आलं की आपण नरभक्षकाच्या ठशांवरूनच चालतो आहोत.
आपल्या मानसिक अवस्थेमुळे आपल्या निरीक्षणशक्तीवर कसा परिणाम होतो बघा!
नरभक्षकाने हीच वाट कित्येक मैल मागेच पकडली असणार,पण साध्याभोळ्या गावकऱ्यांशी जरा गप्पा मारल्यावर आणि त्यांनी दिलेला चहा घेतल्यानंतर जेव्हा मी नैराश्याच्या गर्तेतून बाहेर आलो तेव्हा आता प्रथमच मी हे ठसे बघत होतो.आदल्या रात्रीच्या पावसामुळे इथली लाल माती मऊ झाली होती आणि त्यावर ते माग स्पष्ट दिसत होते.त्यावरून समजत होतं की तो बिबळ्या त्याच्या सामान्य चालीने इथून गेला होता.अर्धा मैल पुढे गेल्यावर त्याने वेग वाढवला होता आणि याच वेगात तो गुलाबराईच्या जवळच्या घळीच्या तोंडाशी गेला होता. नंतर मात्र तो त्या घळीतून निघून गेला होता.
वाघ किंवा बिबळ्या जेव्हा त्यांच्या नेहमीच्या वेगाने चालत असतात तेव्हा मागचं पाऊल पुढच्या पावलावर पडतं आणि अशावेळी फक्त मागच्याच पायाच्या पंजाचे ठसे तुम्हाला पूर्ण दिसू शकतात.पण जर काही कारणामुळे त्यांनी वेग थोडा वाढवला तर मागचं पाऊल पुढच्याच्या थोडं पुढे पडतं व त्यामुळे त्याच्या चारही पावलांचे ठसे दिसू शकतात. मागच्या व पुढच्या पावलाच्या ठशांतील अंतरावरून मार्जारकुळातील जनावरांच्या चालण्याच्या वेगाचा अंदाज आपल्याला बांधता येतो.या वेळेला सकाळचा वाढत जाणारा प्रकाश हे त्याच्या वेग वाढवण्याचं कारण असणार.
मागच्या अनुभवावरून मला या नरभक्षक बिबळ्याच्या चालण्याच्या क्षमतेची कल्पना आलीच होती,पण ती फक्त सावजाच्या शोधात भटकताना ! त्या ठिकाणी मात्र इतकी मजल मारण्यामागे याहीपेक्षा सबळ कारण होतं. त्याला 'ट्रेसपासिंग' चा कायदा तोडल्याबद्दल अद्दल घडवणाऱ्या त्या बिबळ्यांपासून जास्तीत जास्त अंतर दूर जायचं होतं.ही शिक्षा किती भयंकर होती ते पुढे मला प्रत्यक्ष दिसणारच होतं….!! -