* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: रहस्य आणि गोष्टी / Mysteries and things

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२६/१२/२४

रहस्य आणि गोष्टी / Mysteries and things

त्यातून दोन ट्यूबस् मागच्या बाजूला जातात.दोन्ही हातांनी तो कोणत्या तरी वाहनावर नियंत्रण ठेवत आहे असा भास होतो.

डाव्या हाताचा पंजा क्लच,ॲक्सिलेटर, पेडल वगैरे सारख्या कुठल्या तरी भागावर ठेवलेला आहे;वर असणाऱ्या हाताची बोटे पाहिली की वाटते की तो रेडिओच्या बटणासारखे काही तरी फिरवत आहे. मोटारसायकल वापरताना पेट्रोलचा कमी-जास्त पुरवठा करण्यासाठी हाताने थ्रॉटल ओढावे,अशाच प्रकारे त्याची दुसऱ्या हाताची बोटे वळलेली आहेत.त्याचा पोषाख तसा अगदी आधुनिक पद्धतीचा आहे. अंगालगत घट्ट बसणारा फुलस्लीव्हज्चा पुलओव्हर, पुलओव्हरच्या ओव्हरच्या लांब हातांची मनगटावर घडी, अर्धी पॅन्ट,तिला रूंद कमरपट्टा,पायात मोजे,सर्वच अगदी घट्ट,अंगाला बसेल असे;अगदी आजच्या विसाव्या शतकातील अंतराळवीरच जसा काही! त्याची बसण्याची ढब सुद्धा आजच्या अंतराळवीरांसारखी आहे.आपण पाहत आहोत तो प्राचीन काळातील अंतराळावीरच असणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका येऊ नये.तो दुसरा कोणी असूच शकणार नाही.(हा फोटो मुळ पुसतकात पहायला मिळेल.)


तांत्रिक भाषेतच बोलायचे तर त्याच्या चेहऱ्यासमोर ऑक्सिजनचे उपकरण आहे.कम्युनिकेशन सिस्टिम्स् आणि ऊर्जा मर्यादित करणारी यंत्रेही समोरच आहेत. सर्व यंत्रांवर हाता-पायांनी नियंत्रण ठेवण्यात येत आहे. अंतराळयानातून बाहेरच्या बाजूला बघण्याचीही सोय आहे.या सर्व यंत्रांच्या पुढे दोन लोहचुंबक असावेत. अंतराळयानाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करून अंतराळात अफाट वेगाने प्रवास करताना काही आदळू नये म्हणून!अंतराळवीरांच्या मागे ऊर्जा निर्माण करणारी अणुभट्टी असावी आणि चित्राच्या बाहेर रॉकेटचा एक्झॉस्ट दाखवला आहे.


हे शिलाचित्र खरेच आपल्याला काहीच दर्शवत नाही? निश्चितपणे माया लोकांना त्यांच्या अंतराळ पाहुण्यांची माहिती इतरांना द्यायची होती आणि त्यांना माहीत असलेल्या एकाच पद्धतीने त्यांनी ती दिली.शिलाचित्र कोरून! पण त्या कारागिरांना त्या चित्रातील ज्ञानाची माहिती असणे अशक्य आहे.मग या तांत्रिक बाबी त्यांनी कशा कोरल्या असतील? नुसते बघून हे अंतराळयान लक्षात राहणे कठीणच!मग त्यांनी अंतराळवीरांचाच सल्ला घेतला असेल का?आणि सोप्या पद्धतीने काढता येईल असे चित्र त्यांनी माया लोकांना दिले असेल का? यात काही अशक्य नाही.या सर्व देवांनी त्यांच्या पृथ्वीला दिलेल्या भेटी गुप्त राहाव्यात असा प्रयत्न कधीच केलेला नाही.त्यांनी त्यांचे ज्ञान पुढील पिढ्यांना देण्यासाठी जतन करून ठेवा असे सांगून नेहमीच उघड केले आहे.त्यांनी दिलेल्या पृथ्वी भेटीचा वृत्तांत आपल्यापर्यंत पोहोचावा या हेतूनेच त्यांनी ते केले असेल यात अशक्य काय आहे? की पुन्हा प्रत्येक गोष्टीचा संबंध अंतराळ प्रवासाशी लावण्यात येतो असे म्हणणार? प्राचीन काळातील अंतराळ प्रवासाच्या सिद्धान्ताला देत असलेल्या पुराव्यातून हे शिलाचित्र जर वगळले जाणार असेल तर अशा अलौकिक पौराणिक वस्तूंवर संशोधन करणाऱ्या विद्वानांच्या दानतीबद्दलच शंका घ्यावी लागेल.


मायांनी आपली शहरेसुद्धा नद्यांच्या काठी,समुद्राच्या काठी न बांधता जंगलात का बांधली ? त्यांना समुद्र माहीत नव्हता असा भाग नाही.समुद्रात किंवा समुद्रकिनाऱ्यावर मिळणाऱ्या गोष्टींपासून त्यांनी बनवलेल्या शेकडो गोष्टी सापडल्या आहेत.पण जंगलात राहून मग तिथे पाणी पुरवठ्यासाठी प्रचंड टाक्या बांधण्याचा खटाटोप त्यांनी कशासाठी केला? ग्वाटेमालातील टिकल येथे अशा तेरा टाक्या आहेत की ज्यात एक लाख चौरस मीटर एवढे पाणी मावेल.


त्यांनी चिचेन येथे बांधलेली वेधशाळा त्यांची अगदी पहिली आणि सर्वात जुनी गोलाकार इमारत आहे.या तीन मजली इमारतीला आतून गोल गोल जिना आहे. बाहरेच्या भिंतीवर पर्जन्य देवाची आणि उडणाऱ्या मानवांची चित्रे आहेत.


मायांना युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांचीसुद्धा कशी माहिती होती? पालेन्क येथील पिरॅमिडमधला, अग्निबाणात बसलेला अंतराळवीर आपल्याला काय सुचवतो?मायांच्या कॅलेन्डरमध्ये चार कोटी वर्षांची गणिते का करून ठेवली आहेत?व्हेनुशियन सिद्धान्त शोधून काढण्याइतके ज्ञान त्यांनी कसे मिळवले? खगोलशास्त्राच्या इतक्या अफाट ज्ञानाची प्राप्ती त्यांना झाली तरी कुणाकडून ?


मायांच्या सर्व इमारतींवर सर्पाचे चिन्ह का? जंगलात शहरे वसवणाऱ्या मायांनी एखादे फूल आपले चिन्ह म्हणून का निवडले नाही?किंवा एखादा जंगलातला प्राणीच ? तिरस्करणीय सर्पाचे चिन्हच आपल्याला मायांच्या साम्राज्यात पावलोपावली का आढळते? आणि अशा या सर्पाला पुन्हा उडण्याची शक्ती त्यांनी का सूचित करावी? त्याचा देव म्हणून का स्वीकार करावा?


आधीच होत असलेला बौद्धिक गोंधळ पूर्ण करण्यासाठी प्राचीन काळातल्या आणखी काही चमत्कारिक गोष्टींकडे नजर टाकायला हरकत नाही.


१९०० साली ग्रीक पाणबुड्यांनी एक बुडालेले जहाज शोधून काढले.त्यातून संगमरवरी आणि ब्रॉन्झच्या अनेक कलाकृती त्यांनी वर काढल्या.नंतरच्या संशोधनात हे जहाज जवळ जवळ २००० वर्षांपूर्वी बुडाले होते असे कळले.जहाजातून वर काढलेल्या अनेक गोष्टींमध्ये एक कसला तरी गोळाही दिसत होता;धड कुठला आकार नसलेला,रूप नसलेला हा गोळाच आपल्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा ठरला.संशोधकांनी हळुहळू काळजीपूर्वक त्याच्यावरची घाण काढून टाकली व साफ केला तेव्हा तो ब्रॉन्झचा एक पत्रा होता असे लक्षात आले.त्याच्यावर निरनिराळ्या वर्तुळाकृती चकत्याही दिसत होत्या.एकेक भाग साफ केल्यावर त्या पत्र्यावर अनेक गोष्टीही लिहिलेल्या आढळल्या.सर्वांचा संबंध खगोलशास्त्राशी होता.शेवटी लक्षात आले की ते एक यंत्र होते. त्याच्यावर एकमेकात अडकणाऱ्या अनेक वर्तुळाकृती चकत्या,

डायल्स,पट्ट्या वगैरे काय काय होते.एका बाजूचे चाक फिरवले की या सर्व चकत्या वेगवेगळ्या वेगाने फिरायला लागत. काट्यांना ब्रॉन्झची संरक्षक आवरणे होती.त्यांच्यावरही अनेक गोष्टी लिहिलेल्या होत्या.आज हे यंत्र कोणत्या तरी कुशल यंत्रज्ञ कामगारांनी बनवले आहे याबद्दल कुणालाच शंका नाही.अमेरिकन प्रोफेसर सोला प्राईस यांनी ते एक गणकयंत्र आहे आणि त्याच्या मदतीने सूर्य,चन्द्र, तारे यांच्या भ्रमणकक्षा शोधून काढता येतील असे सिद्ध केले आहे.नक्षत्रदर्शन घडवणारे छोटे तारांगणच !


हे यंत्र २१०० वर्षांपूर्वी बनवलेले आहे हे महत्त्वाचे नाही. अशा तन्हेने बनविलेले हे पहिले यंत्र नसणारच.कुतूहल एकाच गोष्टीचे असे पहिले यंत्र कोणी,कधी व कसे बनवले असेल?


१३ व्या शतकाच्या सुरुवातीला धर्मयुद्धावरून परत येताना सम्राट फ्रेड्रिक याने एक आगळाच तंबू परत आणला होता.तंबू उघडला की त्याचे छत घुमटासारखे दिसत असे.तंबूत एक छोटे यंत्रही होते.हे सुरू केले की या घुमटात नक्षत्रे त्यांच्या जागांवरून भ्रमण करायला लागत.हा सुद्धा एक छोटा प्लॅनेटोरियमच ! पण त्या काळात तो बनविण्याइतके तंत्रज्ञान तरी उपलब्ध होते; पण दोन हजार वर्षांहूनही जुने जे यंत्र ग्रीक पाणबुड्यांनी शोधून काढले आहे त्याचे काय? त्या काळात स्थिर तारे,नक्षत्रे,पृथ्वीचे भ्रमण या सर्व गोष्टी लक्षात घेणारे कोण होते? चिनी आणि अरबी खगोलशास्त्रज्ञसुद्धा याबाबतीत विशेष काही सांगू शकत नाहीत.

गॅलिलिओ गॅलिली जन्माला यायला अजून १५०० वर्षे हाती.फेड्रिकच्या तंबूबद्दल अनेक ठिकाणी वाचायला मिळते पण ग्रीक पाणबुड्यांनी शोधून काढलेले यंत्र अथेन्सच्या म्युझियममध्ये जाऊन कोणीही पाहू शकतो.


प्राचीन काळाने आपल्यासाठी सोडलेली ही आणखी काही कोडी !


दहा हजार वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेत ज्यांचे अस्तित्वच नव्हते अशा सिंह आणि उंट या प्राण्यांची चित्रे दक्षिण अमेरिकेतच समुद्रसपाटीपासून १२५०० फूट उंचीवर असलेल्या पठारांवरील खडकांवर कोरलेली आढळतात.


तुर्कस्तानमध्ये काचेच्या किंवा मातीच्या अर्धवर्तुळाकृती वस्तू सापडतात.त्या काय आहेत ते अजून कळत नाही.


अमेरिकेत नेवाडा वाळवंटात 'डेथ व्हॅली'मध्ये कोणत्या तरी प्रचंड उत्पाताने नष्ट झालेल्या शहरांचे अवशेष सापडतात.आजही वितळलेले खडक आणि वितळलेली वाळू तिथे दिसते.अगदी ज्वालामुखीचा उद्रेक झाला तरी,खडक वितळण्याइतकी उष्णता निर्माण होऊ शकत नाही.अशी उष्णता कोणत्याही कारणाने निर्माण झाली असती तर त्या शहरातल्या इमारतींवर परिणाम झालेला दिसला असता.तसा तो आढळत नाही.आज खडक वितळवण्याइतकी उष्णता निर्माण करणारी एकच गोष्ट आपल्याला माहिती आहे.ती म्हणजे लेसर किरण !


लेबॅनॉनमध्ये दोन लक्ष पौंड वजनाचा,ठराविक आकारात कापून गुळगुळीत केलेला दगड आहे.हा तरी कोणत्या मानवी हातांनी हलविलेला असणे शक्य नाही.


ऑस्ट्रेलिया,फ्रान्स,लेबॅनॉन,चिली,दक्षिण आफ्रिका, भारत इत्यादी देशात ॲल्युमिनियम,बेरिलियम असणारे विचित्र काळे दगड सापडले आहेत.अगदी अलीकडे केलेल्या संशोधनात आढळून आले आहे की,प्राचीन काळात भयंकर उष्णता आणि किरणोत्सर्गाचा वर्षाव या दगडांवर झाला असला पाहिजे.प्राचीन काळात किरणोत्सर्ग ?


ब्रिटिश म्युझियममध्ये भूतकाळातील आणि भविष्यकाळातील चन्द्रग्रहणांची माहिती वाचायला मिळते.पण ती लिहिली आहे बाबिलोनियन मृत्तिकापत्रांवर !


चीनमध्ये युनान प्रांतात झालेल्या एका भीषण धरणीकंपात कुनमिंग या सरोवरातून एक प्राचीन पिरॅमिडच वर आला.या पिरॅमिडवर अंतराळात झेप घेणाऱ्या अग्निबाणांची चित्रे कोरून काढलेली आहेत. पृथ्वीच्या पोटात आणखी किती रहस्ये,कुठे कुठे दडून राहिली आहेत हे कोण सांगणार?


 या सर्व गूढ गोष्टींचा उलगडा कोण करील आपल्यासाठी? प्रत्येक जुनी आख्यायिका,दंतकथा, पुराणकथा खोटी आहे,चुकीची आहे अशी त्यांची वासलात लावणे म्हणजे मूळ मुद्दे डावलण्यासारखे आहे.कसली भीती वाटते या लोकांना की नवीन सत्य समोर दिसले की हे डोळे झाकून घेतात आणि दुसरा कोणी नवीन सिद्धान्त मांडायचा प्रयत्न केला तर यांच्या कानांना जसे काही दडेच बसतात आणि त्यांना ऐकू येत नाही?


आज तर जगात अशी परिस्थिती आहे की दर दिवशी काही तरी नवीन घडत आहे,नवीन गोष्टी उघडकीला येत आहेत,नव्या गोष्टींचा शोध लागत आहे.आजच्या दळणवळणाच्या,वाहतुकीच्या,संदेश पाठवण्याच्या सोयींमुळे या गोष्टी तात्काळ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत.ज्या उत्साहाने नवीन गोष्टींच्या शोधांकडे आपण बघतो,त्याच उत्साहाने भूतकाळातील गोष्टींकडेही आपण बघायला पाहिजे.आपल्या भूतकाळाच्या शोधाचा पहिला टप्पा संपत आला आहे. आता मानवी इतिहासाच्या नवीन साहसी पर्वाला सुरुवात होत आहे.


अंतराळ प्रवासाच्या !


२४.१२.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग...