* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: देव तेथेची जाणावा / May God be there

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२२/१२/२४

देव तेथेची जाणावा / May God be there

सकाळची आवराआवर करून पाटलांच्या श्रीपतीतात्यांनी शेताची वाट धरली.कारखान्याला ऊस जाऊन महिना झाला होता.औंदा खोडवं काढून भात पेरायचं ठरलेलं.आलटून-पालटून पीक घेतलं,तर मातीचा कस राहील,नाही तर पैशाच्या नादात नुसतंच ऊस पिकवत बसलं तर रानाला मीठ फुटायचं.शिवाय पोटापुरतं भात आणि ज्वारी पाहिजेच की! नुसती चिपाडं चघळून पोटं भरायची नाहीत,असा विचार करून श्रीपतीतात्यांनी ऊस तुटून गेल्यावर पाला पेटवून रान नांगरून ठेवलं होतं.त्यानंतर महिनाभर रान तसंच ठेवल्यामुळं ढेकळं चांगलीच तापलेली.

त्यातच दोन दिवसांपूर्वी पावसाचं सरवाट येऊन गेलं.तापलेल्या रानावर पावसाच्या सरी बरसल्यामुळं रानात कुळवायला चांगलीच घात आलेली.


बाहेरगावी शिकायला असलेला पोरगापण सुट्टी असल्यामुळं काल संध्याकाळी आला होता.आज तो हाताखाली आहे तोवर रान कुळवून पुरं करायचं. कारभारीन न्ह्यारी घेऊन आली की दुपारच्या म्होरं कस्पाटं येचून दिंडं फिरवलं की रान पेरायला तयार. रोजगारी माणसांकडून शेती करून घेणं गरीब शेतकऱ्याला कुठलं परवडतंय?घरातल्यांनी राबायचं म्हणजे हाताला काम झालं की खाल्लेल्या अन्नाचं रक्त होतंय,नाही तर पोटावर चरबी साठती,पाटील आपल्या विचारातच गुंग होतं.


तात्यांची शेती कमी असल्यामुळं ट्रॅक्टरनं मशागत करून परवडणारं नव्हतं.त्यांचं म्हणणं असायचं की,विकतचं बी-बियाणं आणि महागड्या खतांचा वापर करण्यापेक्षा गारीत कुजलेलं शेणखत टाकून मातीचा पोत जपायचा. ज्यांची शेती जास्त आणि घरात माणसं कमी,त्यांना ट्रॅक्टर परवडतोय.कमी खर्चात पारंपरिक शेती करताना भले उत्पादन कमी झालं,तरी कसदार धान्य पिकतं. ज्याच्या वाट्याला कमी शेती आहे,त्यांनी बांधावर बसून शेती पिकवू नये.दावणीची चार जनावरं ही शेतकऱ्याचा दागिनाच असतोय.घरात दुभतं जनावर असलं तर पोरं धष्टपुष्ट होणारच.


श्रीपतीतात्यांना एकच पोरगा.तसा तो शांत स्वभावाचा. वडील वारकरी असल्यानं मुलाचं नाव सोपान ठेवलं. त्याच्या आईची इच्छा होती की,सोपानला पाठीराखा भाऊ असावा आणि राखी बांधायला बहीण असावी. पोरगी कधीतरी स्वयंपाकात मदत करील आणि आपल्या माघारी हंबरडा फोडून गाव गोळा करील. पोरगी नांदायला गेली,तरी ती येईपर्यंत आई-वडिलांचं प्रेत दारात थांबवून ठेवतात.नाही तर पोरं लगेच लोटकं उचलून निघालं,

असा आईचा समज. वडील वारकरी संप्रदायातील.एकतर आपल्याला जमीन थोडी.रहायला दोनआखणी घर.त्यात वाटण्या करून भावाभावात भांडणं कशाला म्हणत एक मुलगा बास.अशा विचाराचे तात्या.त्यांनी मुलावरपण चांगलं संस्कार केलं. 


सोपानला सुपारीच्या खांडाचंपण व्यसन नव्हतं. कोणाशी लांडीलबाडी नाही की,चोरीचपाटीत कधी नाव नाही.दरवर्षी पारायणात ग्रंथ वाचायला बसायचा.कोणी हाक मारली तर कामाला नाही म्हणत नव्हता. गोठ्यातल्या जनावरांचं शेण काढण्यापासून वैरण आणणं,औत धरणं किंवा पिकाला पाणी पाजणं अशी शेतातील सगळी कामं तो करायचा.घरात आईला मदत करायला लाजत नव्हता.गिरणीतनं दळणकांडप आणणं,

दुकानातनं किराणा सामान आणणं हे तर नित्याचंच;पण आई आजारी असली किंवा रानात काम करून दमली असली,तर घरातील भुई शेणानं सावरायचा,तांदूळ निवडून शिजत घालून भाकरीला पीठ मळायचा.खरकटी भांडी घासून धुवायचा.इतका गुणी मुलगा कधी आई-वडिलांना उलट उत्तर देताना शेजाऱ्यांनी ऐकलं नाही.असा हा कष्टाळू सोपान अभ्यासात एक नंबर नसला तरी शिक्षकांची कधी तक्रार येईल इतका कमी नव्हता.चांगले शिक्षण घेऊन शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होता.


तात्यांनी आज उजाडल्यापासून रानात औताला सुरुवात केली होती.सूर्य डोक्यावर यायच्या आधी कुळवून संपवायचं ठरवलेलं.

बांधाकडंला झाडाच्या मुळ्यात कुळवाची फास आडकू नये म्हणून तात्यांनी स्वतःदावी हातात घेतली.अर्ध्यापेक्षा ज्यास्त काम उरकल्यावर पोराच्या हातात कासरा देऊन तात्या पलीकडच्या उसात घुसलं.त्यांनी कोंबाच्या आणि कवळ्या बांड्याच्या चार- पाच पेंड्या काढून आणल्या.तोवर सोपान औत पुरं करून बैलांना शेजारच्या पाटात पाणी पाजून छपरात घेऊन आला.बैलं दावणीला बांधून आंब्याच्या झाडाखाली घोंगडं टाकून बसला.आई जेवण घेऊन आली.तात्यांनी बैलाच्या पुढ्यात वैरणीच्या पेंढ्या टाकल्या आणि हाता-पायावर पाणी घेतलं.तिघांनी मिळून भाकरी उचलल्या.सोपानला गेले तीन महिने खानावळीतलं खाऊन कंटाळा आला होता.त्यात आज सकाळपासून कुळवावर हादरून कडकडीत भूक लागलेली.आईच्या हातची चुलीवर खरपूस भाजलेली भाकरी,भरलं वांगं,झुणका बघितल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं.दोन भाकरी खाऊन भात खाल्ला,वर ताकाचा पेला रिता केला आणि ढेकर दिला,तसा आईचा चेहरा समाधानानं खुलला.


 उन्हाची किरणं तिरकी होईपर्यंत सोपाननं झाडाखाली ताणून दिली.तोवर कारभारणीच्या संगतीनं तात्यांनी अर्धअधिक रान वेचून कचऱ्याचं ढीग केलं.थोड्या वेळानं सोपान उठला आणि त्यानं सगळं ढीग पाटीत भरून ओढ्याच्या काठावर टाकलं.

दिंडाला बैलं जुपली. दिवस मावळतीकडं कलला तसं त्याच्या आईची आवराआवर सुरू झाली.जेवणाची रिकामी भांडी आणि त्यात थोडं जळण घालून बुट्टी डोक्यावर घेतली आणि तिनं घराची वाट धरली.तिला संध्याकाळच्या स्वयंपाकाचं वेध लागलं होतं.

आज पुरणपोळीचा बेत होता.तसं बघितलं तर रविवारी कुरवाड्यांच्या घरात वशाटाचा वास घमघमतो;पण श्रीपतीतात्या वारकरी. घरात रोज पोथी वाचली जायची.त्यामुळं हे कुटुंब शाकाहारी होतं.सोपानला पुरणपोळी आणि कटाची आमटी जास्तच आवडायची.शेवटी आईच्या हातच्या आमटीची चव कुठंच नसते,हे तो पक्कं जाणून होता.


संध्याकाळी जेवणखाण आटोपून आजूबाजूच्या आयाबाया गोळा झाल्या की,वडील पंढरीतून आणलेली पोथीपुराणं वाचून दाखवत.

आज मात्र सोपानवर वाचनाची जबाबदारी आली होती.गावातील काही घरांत टी.व्ही.आला,तसा कीर्तनाला येणाऱ्यांचा ओघ कमी झाला;पण श्रीपतीतात्यांच्या घरात टी.व्ही.नव्हता. पोरगा शिकून मोठा झाला तसा वडील त्याला पोथी वाचायला लावायचे आणि आपण ऐकायचे. 


दिवसभराचा थकवा निघून जायचा.शिवाय उगीच पारावर बसून गावाच्या कागाळ्या ऐकण्यापेक्षा घरात बसून ओव्या ऐकलेल्या बऱ्या,हा सरळ आणि साधा विचार श्रीपतीतात्यांनी रूजविला होता.याचा फायदा असा झाला की,घरात कोणी एकमेकांना खेकसत नाही. कोणी कोणाशी भांडत नाही.एखादा विचार पटला नाही तर 'रामकृष्ण हरी' म्हणत पुढे निघून जावं.शब्दानं शब्द वाढवून वाद घालत बसायचं नाही.जे योग्य आहे ते काळ ठरवेल.

मुखी पांडुरंगाचं नाव घ्यावं.मनात वाईट विचारांना थारा नाही.

वडील स्वतः निर्व्यसनी.त्यामुळं पोराच्या तोंडाला कधी वास आला नाही.कधी चोरी-लबाडी नाही.पोराला शिकवून मास्तर करावं,ही त्यांची माफक अपेक्षा.सोपन आता जिल्ह्याच्या ठिकाणी विज्ञान शाखेत पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. पदवीनंतर बी.एड्.करायचं ठरवलं होतं.


वाघीण-प्रतिक पाटील-स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर


दोन दिवस सुट्टीला घरी आलेला सोपान सोमवारी सकाळची पहिली गाडी पकडायचा;तरच त्याला महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत होतं.महिनाभर पुरंल इतका शिधा सोबत घेऊन तो घरातून बाहेर पडला.गावातल्या बायका नळावर पाणी भरायच्या लगबगीत होत्या.रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला होता.त्यामुळं सकाळी हवेत गारठा पसरलेला.प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला.कोणी दारात उभा राहून दात घासत होतं,तर कोणी टमरेल घेऊन पांदीची वाट धरलेली. कोणी दुधाची भांडी घेऊन वस्तीवर निघालेलं.सकाळी शाळेत जाणाऱ्या पोरांचीदेखील घाई सुरू होती.


काही क्षणापूर्वी एस.टी.साठी गेलेला सोपान घराकडं परत येताना दिसला.सोबत कोणीतरी पोरगी होती. गावातल्या बायका आश्चर्यानं डोळं फाडून त्या दोघांकडं एकटक बघू लागल्या.'आगं ही तर ती ओढ्याकाठची संगी.हिच्या खांद्यावर हात ठेवून हा सोपान तिला घराकडं घेऊन का निघालाय?' बायकांच्या चर्चेला नवाच विषय मिळाला.त्या एकमेकींच्या कानाजवळ पुटपुटू लागल्या.

प्रत्येकजण आपापल्या परीनं तर्क लावायला लागलं.सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्यांची संख्या आपल्याकडं खूपच आहे.


संगी लहानपणी सोपानच्याच वर्गात शिकत होती. वडील दारूडा.

आई मोलमजुरी करून घर चालवायची. बाहेरच्या गावातून पोट भरायला या गावात आलेलं हे कुटुंब.त्यांना जमीन नाही की शेती नाही.गावाबाहेर ओढ्याच्या काठावर झोपडी बांधून राहिलेलं.बाप दारूच्या आहारी जाऊन त्याच्या कर्मानं मरून गेला, त्यावेळी संगी अवघ्या दोनच वर्षांची होती.उमलत्या कळीच्या वाट्याला आलेलं तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख.मग घराची सगळी जबाबदारी आईवर पडणं साहजिकच.आई गावातल्या प्रत्येकाच्या शेतात कामाला जायची.पोरीनं शिकावं म्हणून तिनं संगीला शाळेत पाठवलं.संगी सातवीत असताना आईनं आजारपणात अंथरुण धरलं,तसं संगीनं शाळा सोडून मोलमजुरी करून आईला सांभाळलं.दोन वर्षांपूर्वी आईपण गेली.आई-बापाचं छत्र हरवल्यामुळं पोरसवदा संगी पोरकी झालेली.तरीही तिनं जिद्द हरली नाही.ती एकटीच झोपडीत राहून उदरनिर्वाह करू लागली. ओढ्याच्या घाण वासानं झोपडीत कोणी जात नव्हतं.


काल रात्रीच्या अवकाळी पावसानं तिची झोपडी वाहून गेली.तिच्यासोबत संगीचा सगळा भूतकाळ धुवून गेला.रात्रभर ती पावसात देवळाच्या ओसरीवर कुडकुडत बसली होती.

अंगावरच्या भिजलेल्या कपड्याशिवाय तिच्याकडे काहीच नव्हतं.

सोपान घाईघाईनं एस.टी. स्टँडकडं चालला असता,त्याचं लक्ष संगीकडं गेलं.तो तिच्याकडं विचारपूस करायला गेला. 


त्यावेळी सारा प्रकार तिनं त्याला सांगितला. मागचा-पुढचा विचार न करता सोपाननं तिला सोबत घेऊन आपल्या घरचा रस्ता धरला.अंग चोरून घेऊन संगी सोपानसोबत घरी जाताना वाटेत बघणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या.दारात उभा राहूनच सोपाननं आईला हाक मारली आणि जोरात म्हणाला, "आई,तुला मुलगी पाहिजे होती ना.बघ मी तुझ्यासाठी तिला घेऊन आलोय." सोपान असा अचानक परत का आला म्हणून त्याचे आई-वडील धावतच दारात आलं आणि समोरचं दृश्य बघताना दोघांच्या तोंडातनं एकदम शब्द बाहेर पडलं... "आरं, ही तर ओढ्याकाठची संगी हाय.इकडं का घेऊन आलाईस तिला?"


'हिची आई मरून गेल्यापासून ती एकटीच झोपडीत रहात होती.कालच्या पावसानं झोपडी वाहून गेली.हिची आई शाळेच्या बाहेर पेरू,चिंचा,लेमनच्या गोळ्या विकायची.त्यावेळी मी तिला मावशी म्हणून हाक मारत होतो.माझ्याकडं पैसं कमी असलं तरी ती मला कधी माघारी पाठवत नव्हती.संगी आमच्या वर्गात होती.आई आजारी पडली त्यामुळं ती शाळा सोडून मोलमजुरी करायची.आईपण देवाघरी गेल्यामुळं आता तिला कुणाचाच आधार नाही.तिच्या पाठीशी मी भाऊ - म्हणून उभा राहणार हाय.आपण तिला शाळा शिकवून तिचं कन्यादान आपण करूया.'


सोपानचं विचार कानावर पडताच वडिलांनी आकाशाकडं बघत देवाचं मनोमन आभार मानलं आणि त्यांनी अक्षरशः लेकाच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणालं, 'पोरा आज तुझ्या मुखातून माझा भगवंत बोलला. जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा.पोरा पोथी पुराण वाचणं चांगलं हाय;ते आचरणात आणणं आवश्यक हाय.ते तू केलंस. इतक्या दिवसांत कधी जाणवलं नाही;पण आज हिच्या रूपात आमच्या दारात मुक्ताई आली...'