१९३९ ची ऑगस्टची सहा तारीख.गांधीजींना डॉ. आंबेडकरांना भेटण्याची तीव्र इच्छा होती.त्याच दिवशी गांधीजींनी त्यांना निरोप पाठवला.
" तुम्ही तरी भेटायला या किंवा दुसरे दिवशी सकाळी आठला मीच येईन." आंबेडकरांना गांधीजींकडे येणे गैरसोईचे असेल किंवा त्यांना वेळच नसेल तर आपल्याला त्यांच्याकडे येण्यास आनंद वाटेल, असेही गांधीजींनी आवर्जून लिहिले होते.
आंबेडकर सांगलीहून नुकतेच आले होते.तशात त्यांना ताप भरला होता.तरी पण आपण गांधीजींना भेटायला येऊ असा आंबेडकरांनी प्रतिनिरोप पाठवला. दुर्दैवाने आंबेडकरांच्या तापाचा पारा १०६ वर गेल्याने ती भेट पुढे ढकलली गेली.
१४ ऑगस्टला दुपारी दोन वाजता मणिभुवन येथे गांधीना भेटण्याकरता बाबासाहेब गेले.देवरावनाईक,शिवतरकर,
प्रधान,बाबूराव गायकवाड, कद्रेकर वगैरे त्यांचे शिष्यलोक त्यांच्याबरोबर होते.
डॉ.आंबेडकर दृष्टिपथात आले तेव्हा तिसऱ्या मजल्यावर गांधीजी आपल्या पक्षातील लोकांशी काही बोलत होते.मधून मधून ते फळेही खात होते. डॉक्टर आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी गांधींना नमस्कार केला.व ते एका सतरंजीवर बसले. मुस्लिम व युरोपियन नेत्यांखेरीज इतरांशी ज्या नेहमीच्या पद्धतीने गांधी वागत त्याच पद्धतीने त्यांनी पहिल्यांदा डॉक्टरांच्याकडे दुर्लक्ष केले व ते मिस स्लेडशी बोलत राहिले.
आपल्या बाबतीत गांधींकडूनही थोडासा भेदभाव दाखवला गेला म्हणून डॉक्टरांच्या लोकांनाही क्षणभर वाईट वाटले. लगेच गांधी आंबेडकरांकडे वळले.आंबेडकरांना गांधी पहिल्यांदाच पहात होते.औपचारिक बोलणे झाल्यावर गांधींनी मुख्य गोष्टीकडे आपला मोहरा वळवला.
गांधी : मग काय डॉक्टर?तुम्हाला या बाबतीत काय म्हणायचे आहे?
आंबेडकर :आपण मला आपली मतं ऐकून घेण्यासाठी इथं बोलावले आहे.कृपया आपल्याला काय सांगायचे आहे ते सांगा किंवा आपण मला काही प्रश्न विचारा व मी त्यांची उत्तरे देईन.
गांधी : (आंबेडकरांच्या रोखाने पहात) मला याची पूर्ण कल्पना आहे की तुमच्या मनात माझ्यविषयी आणि काँग्रेसविषयी कटुता आहे.अस्पृश्यतेच्या समस्येवर मी हायस्कूलमध्ये आल्यापासून विचार करीत आहे.त्यावेळी तुमचा जन्मदेखील झाला नव्हता.तुम्हाला कदाचित कल्पना असेल,या प्रश्नाचा काँग्रेसमध्ये अंतर्भाव करण्याकरिता मी अतोनात प्रयत्न केले आहेत.हा निव्वळ सामाजिक आणि धार्मिक प्रश्न असल्याने राजकारणात त्याला थारा देऊ नये,असे अनेक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. म्हणून त्याला मी विरोध केला.अस्पृश्यांच्या उद्धाराकरिता आत्तापावेतो वीस लाख रुपये काँग्रेसने खर्च केले आहेत.आणि ही खरोखरीच खेदाची गोष्टी आहे की तुमच्यासारखेच लोक मला आणि काँग्रेसला विरोध करीत आहेत.तुम्हाला आपली बाजू मांडायची असेल तर तुम्ही ते खुशाल करू शकता.
आंबेडकर : महात्माजी,माझ्या जन्मापूर्वी अस्पृश्यांविषयी विचार करायला आपण सुरुवात केलीत हे सत्य आहे.बहुतेक वृद्ध आणि वयस्क माणसे वयावर भर देण्याचाच प्रयत्न करतात.हेही खरे आहे की आपल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नाला मान्यता मिळाली.पण मला आपल्याला असे स्पष्टपणे सांगायचे आहे की निव्वळ औपचारिक मान्यतेखेरीज काँग्रेसने या प्रश्नाविषयी काहीही केलेले नाही.आपण म्हणता काँग्रेसने अस्पृश्योद्धाराकरिता वीस लाख रुपये खर्च केले.मी म्हणतो,तो सगळा पैसा पाण्यात गेला. असे आर्थिक साहाय्य मिळाले असते तर माझ्या लोकांचा दृष्टिकोन आणि त्यांची आर्थिक परिस्थिती यांत मी कमालीचा बदल घडवून आणला असता आणि त्याकरिता आपली माझी भेट यापूर्वीच होणे आवश्यक होते.पण मी तुम्हाला सांगतो की, अस्पृश्यता निवारण्याचे काँग्रेसचे हेतू प्रामाणिक नाहीत.जर खरोखरीच काँग्रेसने यात प्रामाणिकपणे लक्ष घातले असते तर अस्पृश्यतानिवारण हा तिचा एक मुख्य कार्यक्रम राहिला असता.खादीचा वापर हे जसे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे अविभाज्य कर्तव्य होते,
तसेच अस्पृश्यतानिवारणाचे ठरले असते.ज्याच्या घरात कामासाठी हरिजन स्त्री अगर पुरुष नाही,एखादा हरिजन विद्यार्थी नाही, आठवड्यातून एकदा तरी जो अस्पृश्यासमवेत जेवण घेत नाही,अशाला काँग्रेसचे सदस्यत्व नाकारणे हा उत्तम उपाय होता.अशी तुमची एखादी तरी अट आहे काय? फार कशाला?याच प्रश्नाची दुसरी हास्यास्पद बाजू बघायची तर जिल्हा काँग्रेस समितीच अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशाला विरोध करीत होती व तिकडे तुम्हा लोकांचे जाणून बुजून दुर्लक्ष होत होते....आपण असेही म्हणू शकाल की, काँग्रेसला संख्याबल पाहिजे आहे,तेव्हा अशी अट लादणे शहाणपणाचे होणार नाही. त्यावर माझे म्हणणे असे की,काँग्रेसला तत्त्वापेक्षाही लोकांची फिकीर अधिक आहे.हा माझा तुमच्यावर आणि काँग्रेसवर आरोप आहे.आपण म्हणता की, ब्रिटिश सरकार आपले मत बदलीत नाही. मलादेखील असेच म्हणावयाचे आहे की,हिंदू आमच्या प्रश्नाबाबत आपले मत बदलावयास तयार नाहीत.आणि जोवर असे आहे तोवर आमचा काँग्रेसवरही विश्वास बसणार नाही आणि हिंदूंवरही. आमचा आमच्या स्वतःच्या हिंमतीवर विश्वास आहे. आम्हाला आदर वाटतो तो देखील आमच्याबद्दलच.मोठे नेते आणि महात्मे यांच्यावर विश्वास ठेवायला आम्ही तयार नाही.मला थोडे स्पष्ट बोलू द्या.इतिहास असे स्पष्ट सांगतो की,तुताऱ्या वाजविणारे महात्मे नुसती धूळच वर उठवतात, जमिनीची पातळी उंचावत नाहीत.काँग्रेसच्या लोकांनी आमच्या चळवळीला का विरोध करावा किंवा मला तरी देशद्रोही का समजावे?"
आंबेडकर थोडेसे अस्वस्थ झाले.त्यांचा चेहरा रागाने लालेलाल झाला.डोळे आग ओकू लागले.क्षणभर ते थांबले.आणि धारदार आवाजात त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
आंबेडकर : गांधीजी,मला मातृभूमीच नाही.
गांधी : (किंचित भारलेल्या स्वरात त्यांना मध्येच थांबवून) तुम्हाला तुमची मातृभूमी आहे.आणि माझ्याकडे राउंड टेबल कॉन्फरन्सचे जे काही रिपोर्ट्स आले आहेत त्यांवरून हेच सिद्ध झाले आहे की,तुम्ही देशाविषयी कळकळ बाळगणारे एक थोर देशभक्त आहात.
आंबेडकर : आपण म्हणता मला मायभूमी आहे. तरीही मी निक्षून सांगतो की मी खरोखरीच पोरका आहे.मी या देशाला माझा देश म्हणून कुठल्या तोंडाने म्हणू? हा धर्म तरी माझा कसा? कारण इथे आम्हाला कुत्र्यामांजराच्या पलीकडली वागणूक दिली जाते.इथे आम्हाला पाणीदेखील प्यायला बंदी आहे.कोणत्याही स्वतःविषयी अभिमान बाळगणाऱ्या या अस्पृश्याला हा देश आपला आहे असे वाटणार नाही.या देशाविषयी अभिमानही वाटणार नाही.आम्हा लोकांवर इतका अन्याय झालेला आहे आणि इतकी घोर दुःखे आम्ही सहन करीत आहोत की,यातून एखादेवेळी देशद्रोह घडला तर त्याला आम्ही जबाबदार नाही,ही जबाबदारी संपूर्णपणे देशाची आहे.मला कुणी देशद्रोही ठरवले तर त्याची मला खंत वाटत नाही.कारण या देशद्रोहाची मुळेच मुळी या देशात रुजलेली आहेत. आपण म्हणता त्याप्रमाणे खरोखरीच माझ्या हातून काही देशसेवा घडली असेल,देशाला फायद्याचे आणि उपकारक कृत्य घडले असेल तर त्याला कारण माझ्यातले देशभक्तिपर विचार हे नसून माझी सद् सद् विवेकबुद्धी हीच आहे.माझ्या लोकांचे हक्क प्रस्थापित करण्याकरिता कोणतेही देशद्रोही कृत्य करायची माझी तयारी आहे.ते पाप आहे असे मला वाटत नाही.कारण आज युगानयुगे हा अन्याय माझ्या लोकांवर लादलेला आहे.जर माझ्या देशाला माझ्या या कृत्यामधून काही इजा पोहोचली नाही तर त्याचे कारणही माझी सदसद्विवेकबुद्धी हेच म्हणावे लागेल.माझी सदसद्विवेकबुद्धी मला सांगते की,माझ्या देशाला कसलाच धक्का न पोहोचवता आजवर मानवी हक्कांपासून वंचित झालेल्या माझ्या लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले पाहिजेत." वातावरण कमालीचे तापले होते. चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.गांधी थोडे अस्वस्थ झाले.
आंबेडकरांच्या भाषणाला थोडे निराळे वळण लावायचा त्यांचा विचार होता.त्याच वेळी आंबेडकरांनी अत्यंत शांततेने त्यांना एक प्रश्न विचारला.हाच प्रश्न या मुलाखतीचे खरे उद्दिष्ट होता.
आंबेडकर : प्रत्येकाला हे माहीत आहे की,मुस्लिम आणि शीख - सामााजिक,राजकीय व आर्थिकदृष्ट्या अस्पृश्यांहून अधिक पुढारलेले आहेत.राउंड टेबल कॉन्फरन्सच्या पहिल्या बैठकीत मुस्लिमांच्या मागण्यांना राजकीय मान्यता मिळाली व त्यांना राजकीय संरक्षणही मिळाले.याच वेळी दलित समाजाच्या राजकीय हक्कांनाही त्यांनी मान्यता दिली.
दलितांना राजकीय संरक्षण व त्यांचे प्रतिनिधित्वही त्यांनी मान्य केले होते.आम्हाला असे वाटते की दलितांच्या दृष्टीने हे फायद्याचे आहे. आपले या बाबतीत काय मत आहे?
गांधी : हिंदूंपासून दलितांच्या राजकीय वेगळेपणाला माझा तीव्र विरोध आहे.तो एक फार मोठा आत्मघात ठरेल.
आंबेडकर : (उठत) आपल्या स्पष्ट मतप्रदर्शनाबद्दल मी आपला फार आभारी आहे.या प्रश्नाबाबत आम्ही निश्चित कुठे आहोत याची पूर्ण कल्पना आता आम्हाला आली.मी आपली रजा घेतो.आंबेडकरांनी सभागृह सोडले.आपल्या हक्कांविषयीची तीव्र जाणीव त्यांच्या मनामध्ये उफाळून आली होती.ते हक्क मिळवण्याकरिता ते अविरत धडपडणार होते.(गांधी नावाचे महात्मा,संपादन : रॉय किणीकर,साहाय्यक,
अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन,पुणे...)
ही मुलाखत अशाप्रकारे खिन्न - गंभीर वातावरणात पार पडली.गांधी म्हणजे भारतीय राजकारणाचे अध्वर्यू,
हुकूमशाहा,भारतीय लोकांचे अनभिषिक्त सम्राट.असा माणूस आज एकदम बिथरला गेला होता.त्यांच्यातून विजेची एक लहर झपाटून गेली.पुन्हा गांधींशी संवाद करणे म्हणजे कायमची कटुता व न संपणारे दुःख निर्माण करण्यासारखे होते.एका हिंदू पुढाऱ्याची ही हिंमत गांधीजींना आश्चर्यात टाकणारी होती.परंतु विरोधाची धार तीव्र होती. हीच मुलाखत गांधी - आंबेडकरवादाची नांदी ठरली.
आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे गांधींना वाटत होते की आंबेडकर हे हरिजन नसून ब्राह्मण आहेत. ते इंग्लंडला जाईपर्यंत त्यांची ही समजूत कायम होती. - अनुवाद- रॉय किणीकर
सत्याचे प्रयोग...
जरी देव्हाऱ्यातून,उठून गेले देव
मोडला जरी,देव्हारा जपुनी ठेव ।
कापूर जळू दे,जळणे त्याचे काम
कोसळली पृथ्वी,म्हणताना 'हे राम'।।
का कुणी पाहिले,सत्याचे ते रूप
कुणी सांगितले रे,असत्य म्हणजे पाप।
सत्यार्थ जन्मते,असत्य व्यभिचाराचे
फुलतात अग्निकण,त्यातून संघर्षाचे ।।
महान जीवन गांधीजींचे
अवतरले दुसरे सिद्धार्थ ।
सत्य,अहिंसा अन् शांतीचे
राजघाट हे प्रयागतीर्थ ।।
चरखा,चष्मा,चपला,चटई
का बापूजींची हीच कमाई।
चमत्कार तो मिठाचा मोठा
तीन गोळ्या... मृत्यु झाला खोटा ॥
इतिहास घडविला,त्यांची झाली कीर्ति
इतिहास तुडविला,त्यांचीदेखील कीर्ति ।
गहिरवला अश्रू,कीर्तिस्तंभावरला
पिंडास कावळा,अजून नाही शिवला ॥
रॉय किणीकर..