* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: रहस्य आणि गोष्टी / Mysteries and things

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२४/१२/२४

रहस्य आणि गोष्टी / Mysteries and things

गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाबद्दल तसा प्रश्न नाही.तो आपल्याला व्यवस्थित माहिती आहे तरी सुद्धा रोमन,ग्रीक यांच्या देवदेवतांवर इतर महाकाव्ये, दंतकथा,आख्यायिकांवर आपल्या प्राचीन भूतकाळाची छाया पडल्यासारखी वाटते.अगदी अलिकडच्या अशा संस्कृतींचा विचार केला तरी त्यांच्या आख्यायिका आपली नजर प्राचीन भूतकाळाकडेच वळवतात.


दक्षिण अमेरिकेतील ग्वाटेमाला आणि मेक्सिकोतील जंगलात दडलेल्या मायांच्या प्राचीन अवशेषांची तुलना फक्त इजिप्त

मधल्या प्रचंड बांधकामांशीच होऊ शकते.मेक्सिकोच्या राजधानीच्या दक्षिणेस ६० मैलांवरील चोलुला येथील पिरॅमिडचे क्षेत्रफळ खुफूच्या पिरॅमिडहून जास्त आहे.तर उत्तरेकडील ३० मैलांवर असलेल्या टिओटिहुआन्का येथील पिरॅमिड ८ चौरस मैल जागा व्यापतो.


मायांची आख्यायिका सांगते की १०,००० वर्षांपूर्वी एक अत्यंत पुढारलेली अशी संस्कृती नांदत होती.माया लोक

आले कुठून हे आपल्याला कळलेले नाही अणि कुठे गेले तेही माहीत नाही.म्हणूनच त्यांनी दिलेली माहिती महत्त्वाची आहे.


मेक्सिकोतील युकातान भागात उतरल्यावर बिशप डीयागो डी लांडा यानेसुद्धा मायांच्या कित्येक हस्तलिखितांची होळी केली आणि वर प्रौढी मारली की त्या भारुडात विशेष काही नसल्याने तेथील सर्व लोकांचा विरोध मोडून काढून आम्ही सर्व गोष्टींचा नाश केला म्हणून!या विध्वंसातून मायांची फक्त तीन हस्तलिखिते वाचली आहेत आणि आज ज्या ठिकाणी ती ठेवलेली आहेत त्याच नावाने ती ओळखली जातात.


माद्रिद कोडेक्समध्ये ११२ रंगविलेल्या चित्रांची पाने आहेत.त्या चित्रांवरून काय अर्थ काढायचा हे प्रत्येकाने ठरवावे अशी परिस्थिती आहे.


ड्रेस्डेन कोडेक्सची ७४ पाने शिल्लक आहेत. खगोलशास्त्राची गणिते आणि चंद्र,शुक्र यांच्या भ्रमणाबद्दलची माहिती त्यात आहे.


मूळच्या पॅरिस कोडेक्सची तर फक्त दोनच पाने शिल्लक आहेत.मिळाली तेव्हाही बावीसच होती पण उरलेल्यांच्या प्रती तरी गेल्या शतकाच्या शेवटी काढल्या गेल्या होत्या हे नशिबच.या कोडेक्समध्ये कॅलेन्डरवर आधारित भविष्ये वर्तविली आहेत.


मायांच्या लिखाणाचा अर्थ लागत नाही याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या खुणा आणि आकृत्या यांची त्यात असलेली रेलचेल.त्याच खुणा आणि तीच चिन्हे वेगवेगळ्या तऱ्हांनी वापरली की अर्थ वेगळा होतो.


मायांचे कॅलेन्डर आणि त्यांचा व्हेनुशियन फॉर्म्युला यांचा उल्लेख पूर्वीच केला आहे.मेक्सिकोतील पालेन्क, चिचेन इट्झा,ग्वाटेमालातील टिकल,होंडुरासमधील कोपान या सर्व ठिकाणची बांधकामे मायांच्या कॅलेन्डरला धरूनच झाली आहेत हे आज सिद्ध झाले आहे.त्यांना गरज होती म्हणून काही त्यांनी देवालये, पिरॅमिड बांधले नाहीत.त्यांनी पिरॅमिड आणि देवालये बांधली कारण त्यांच्या कॅलेन्डरची आज्ञा होती की इमारतीच्या इतक्या इतक्या पायऱ्या अमुक दिवसात बांधल्या पाहिजेत,

प्लॅटफॉर्म इतक्या महिन्यांनी आणि मंदिर इतक्या वर्षांत ! मायांच्या प्रत्येक इमारतीच्या दगड न् दगडाचा संबंध त्यांच्या कॅलेन्डरशी आहे.पूर्ण झालेली प्रत्येक वास्तू कॅलेन्डरप्रमाणे बांधलेली आहे.


पण मग काही तरी अघटित प्रकार घडला आणि तसे काहीच कारण दिसत नसताना त्यांची हजारो वर्षे टिकतील अशी बांधकामे,भव्य शहरे,सधन मंदिरे,पिरॅमिड यांचा मायांनी संपूर्ण त्याग केला आणि माया लोक निघून गेले.परत कधीही न येण्याकरता!त्यांची अप्रतिम शहरे बघता बघता फोफावणाऱ्या जंगलांनी व्यापून टाकली.


माया लोक का निघून गेले? याबाबत अनेक मते व्यक्त झाली आहेत.त्यांच्यावर परचक्र आले असेल असे म्हणावे तर माया त्यावेळी त्यांच्या प्रगत आणि संपन्न अशा संस्कृतीच्या अगदी अत्युच्च शिखरावर होते. त्यांच्यावर चढाई करण्याची आणि त्यांचा पराभव करण्याची ताकद त्यावेळी कुणातच नव्हती.


की हवामानात जबरदस्त फरक झाल्यामुळे मायांना देशत्याग करणे भाग पडले? पण या विचारालाही अर्थ दिसत नाही.मायांचे जुने राज्य आणि नवे राज्य यात २२५ मैलांचेसुद्धा अंतर नाही.हवामानातल्या फरकामुळे देशांतर करावे लागले असते तर माया लोकांना हजारो मैलांवर कुठल्या कुठे जावे लागले असते.


की भयानक अशा कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व पळापळ झाली?यालाही दुजोरा मिळण्यासारखे काही दिसत नाही.


की मायांमध्ये यादवी युद्ध माजले?नवीन विचारांचे तरूण आणि कर्मठ मतांची जुनी पिढी यांच्यात संघर्ष निर्माण झाला का? पण ही शक्यता विचारात घेतली तर सर्वच मायांना देशत्याग करण्याची आवश्यकता नव्हती. पराभूत मायाच देशोधडीला लागले असते.विजयी माया आपले पाय रोवूनच त्या साम्राज्यात राहिले असते.पण पुराणवस्तू संशोधकांना माया जमातीतील एक माणूस सुद्धा मागे शिल्लक राहिला होता याचा पुरावा सापडत नाही.बुद्धिमान,गणितज्ञ,

खगोलशास्त्रात पारंगत सर्वच्या सर्व माया जमात आपली शहरे,आपली पवित्र स्थाने,आपली देवळे,पिरॅमिड यांचा त्याग करून नाहीशी झाली.


आजपर्यंत अनेक बाजूंनी विचार करून ज्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही त्याबाबत आणखी एक शक्यता विचारात घेण्यासारखी आहे.तिलाही तसा पुरावा नाहीच.इतर स्पष्टीकरणाची शक्यता गृहीत धरूनसुद्धा एक नवीन विचार मांडायला हरकत नाही.


मायांच्या पूर्वजांना देवांनी (म्हणजे अंतराळवीरांनी) भेट दिली असावी.खगोलशास्त्र,गणित,कॅलेन्डर या सर्वांबाबात माया धर्मगुरू अत्यंत गुप्तता बाळगून होते.हे सर्व ज्ञान परिश्रमाने गुप्त ठेवून जतन करण्यात येत होते;कारण देवांनी मायांना वचन दिले होते की अमूक अमूक वर्षांनी ते परत येतील म्हणून!


देवांनी धर्मगुरुंना दिलेल्या आज्ञांप्रमाणे कॅलेन्डरमध्ये दिलेल्या स्पष्ट सूचनांप्रमाणे मायांनी त्यांची भव्य बांधकामे करायला सुरुवात केली.ठराविक वर्षांत ही सर्व भव्य मंदिरे,पिरॅमिड बांधल्यावर देव परत येणार होते.देव परत येण्याचे वर्ष माया लोकांच्या दृष्टीने आनंदोत्सवाचे वर्षच होते.त्यावर्षी देव परत येणार होते, त्यांनी बांधलेल्या अप्रतिम आणि भव्य मंदिरांचा, पिरॅमिडस्चा स्वीकार करणार होते आणि नंतर कायमचे त्यांच्यात राहणार होते.


दक्षिण अमेरिकेतील रहस्ये आणि इतर काही गोष्टी,देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर ! बाळ भागवत,मेहता पब्लिशिंग हाऊस


मायांनी ते वर्ष जवळ येत असताना उत्साहाने सर्व भव्य इमारती पुऱ्या करीत आणल्या.देव परत येण्याच्या वर्षी त्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी झाली होती.मंदिरे बांधून झाली होती,पिरॅमिडस् तयार झाले होते,इतर भव्य वास्तू पूर्णपणे बांधून तयार होत्या.माया लोक उत्साहाने प्रार्थना करीत होते.देवांच्या स्वागताची स्वागतगीते पाठ करीत होते.आकाशातून देवांचा दैदिप्यमान रथ कधी उतरतो याकडे नजर लावून होते.वर्षाचे दिवस सरायला लागले.मायांच्या मनात चलबिचल निर्माण व्हायला लागली.देवांना धूप,दागदागिने,

धान्य यांचे नजराणे, गुलामांचे बळी द्यायला सुरुवात झाली.पण अंतराळात संपूर्ण शांतता होती.गंभीर,मेघगर्जनेसारखा आवाज करीत येणारा देवांचा दैदिप्यमान रथ नजरेस पडत नव्हता.वर्ष संपले तरी देव आलेच नाहीत.


धर्मगुरू आणि सर्वच माया लोकांना निराशेचा किती जबरदस्त धक्का पोहोचला असेल याची कल्पना करवत नाही ! शतकानुशतके देव परत येणाऱ्या दिवसाची वाट पाहत उत्साहाने केलेली भव्य बांधकामे मातीमोल ठरत होती.माया लोकांच्या मनात किती तरी संशय निर्माण झाले असतील.कॅलेन्डर बनवण्यात काही चूक झाली का? की देव चुकून भलतीकडेच उतरले होते?की आणखी काही भयानक घोटाळा झाला होता?त्यांनी पुनःपुन्हा सर्व गणिते करून बघितली असतील.काहीच चूक नव्हती.सर्वांचा अर्थ एकच होता.देवांनी वचन देऊन ते मोडले होते.त्यांनी माया लोकांची घोर फसवणूक केली होती.सर्व गोष्टींवरचा विश्वास उडून दारूण निराशेच्या धक्क्यानेच मायांनी सर्व गोष्टींचा त्याग केला होता असेच म्हणावे लागते.


१९३५ मध्ये मेक्सिकोतील पालेन्क येथील मायांच्या पिरॅमिडमध्ये अगदी वरच्या बाजूने खाली खाली जाणाऱ्या पायऱ्या सापडल्या.

जमिनीखाली सहा फुटापर्यंत पोहोचलेल्या.अगदी सापडू नयेत. अशा उद्देशानेच बांधल्यासारख्या वाटत होत्या.खालची खोली १४ फूट लांब आणि ७ फूट रूंद अशा दगडी शिळेने बंद केली आहे.चारही कडांना मायांची चित्रलिपी,की जिचा अर्थ आपण आजपर्यंत लावू शकलेलो नाही.या शिलेवरील अप्रतिम अशा कोरीव कामाकडे समोरून,बाजूने कशीही नजर टाकली तरी अंतराळयानात बसलेला अंतराळवीरच आपण पाहात आहोत ही भावना काही मनातून जात नाही.मोटारसायकलची रेस असली तर मोटारसायकलवरचा स्पर्धक पुढे वाकून बसेल त्याच थाटात त्या चित्रातील माणूस वाकून बसला आहे.त्याच्या डोक्यावर शिरस्त्राण आहे.


या भागातील शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..!