* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: फेब्रुवारी 2026

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

४/२/२६

अशी पाखरे येती /That's what happens

धुक्याचा पुंजका


पावसाळा हा बगळ्यांच्या विणीचा हंगाम.या वेळी श्यामल वर्णाच्या आकाशपटलावरील त्यांचं श्रेणीबद्ध उड्डाण खरोखरीच सृष्टीतील एक अनुपम व मनोहर दृश्य वाटते.या वेळी त्यांच्या पाठी स्फटिकासारख्या पिसाच्या कलाबतूनं सुशोभित होतात.मेघ घुणघुणताहेत,वारा रुणझुणतो आहे आणि पाऊस रिमझिमतो आहे.अशा या भावोद्दीपक संगीताच्या पार्श्वभूमीवर बगळ्याच्या समूहाचं अंतरिक्षात चाललेल्या अनुनयाचं दृश्य तर स्वर्गीय असतं.वाटतं,जणू प्रभामंडल असलेला धुक्याचा विशाल पुंजकाच अंतराळात तरंगतोय.


निळी रेषा


तेजस्वी,निळी विद्युतगतीनं पाचूच्या पानापानांतून जाणारी ती रेषा आता माझ्या पूर्ण परिचयाची झाली होती.

चिमणीएवढं लांब चोचीचं ते पाखरू सांज सकाळ त्या ओढ्या खाडीची परिक्रमा करताना दिसून येई.हे त्याचं अठरा लक्ष योजनेचं उड्डाण पुनर्निर्मितीकरिता होतं.मृदु-मदिर स्वरात आतुरतेनं शीळ घालीत ते घरट्याकडे धाव घेतं.रत्नाचं सौंदर्य त्याला लाभलं होतं. शिलाजित,वैडुर्य,इंद्रनील व नाजूक नेचे या सर्वांच्या रंगांची पखरण विधात्यानं त्याच्या सानुल्या देहावर केली होती.


श्यामल शंख


समोर गवताळ सपाट टापू नजरेत मावत नाही.त्या कुरणातून मध्ये थोडा ओलसर चिखल असलेली व बाजूला वाळलेली अशी पाऊलवाट भांगासारखी शोभते.सात कोकणी लावा हळूहळू त्या पाऊलवाटेनं डौलात हारीनं चालत आहेत.किती देखण्या. गोजिरवाण्या.आकाशात उडत असलेल्या श्येनानं अवचितपणे खाली झेप टाकली.पाचूच्या गवतात त्या थिजल्या.जणू सात चित्रित श्यामल शंखांप्रमाणं त्या सुंदर दिसल्या.


वाक् वाक्


मला जाग आली.समोरील खिडकीच्या नितळ काचा कृष्ण पक्षातील मावळतीकडील चंद्रकलेच्या प्रकाशानं उजळल्या होत्या.अजून उजाडलं नव्हतं.ढोकरीच्या काळ्या सावल्या एकामागून एक खिडकीच्या तावदानावरून तरंगत जाताना दिसत.त्यांच्या वाक्-वाक् ह्या मन विचलित करणाऱ्या चिरपरिचित आवाजानं वातावरणात गूढ रम्यता येते.


इतक्यात आकाशातून एक खपुष्प धरित्रीवर झेपावलं. मला माझ्या आजीची आठवण झाली.हातात कवड्यांची माळ घेऊन निळावंतीची पोथी वाचणारी ! माझ्यावर तिचा फार लोभ.

निळावंतीच्या पोथीतील अनेक रहस्यं ती मला सांगे.मी एकदा तिला विचारलं,


"आजी,हे तुटलेले तारे कोठे ग पडतात?" कितीतरी वेळ ती गप्प बसली.बोलेनाच.


"सांग ना ग!" मी लाडिकपणे तिला विचारलं.


ती बोलली नाहीच. तिनं अंगुलीनं समोरचा जलाशय दाखविला.


जलाशयाचं मला मोठं आकर्षण वाटतं.त्या गूढ रम्य जलाशयाकाठी मी तासन् तास् बसून राही.मोठा झालो. एकदा माझ्या सृष्टिज्ञानी मित्राबरोबर जलाशयाच्या काठावरून फिरताना अद्भुत प्रकारचे पदार्थ पाण्यात तरंगताना दिसले. त्याकडे लक्ष वेधून तो म्हणाला, "ही आकाशातून पडलेली खपुष्पं आहेत. ढोकरी ही खपुष्पं खातात."


मोर शिंगारत राहिला


गौंडी बोलीत कोतवाल पक्ष्याविषयी एक अर्थपूर्ण म्हण आहे. 'मोर शिंगारत राहिला अन् गोचा राजा झाला.' गोचा स्वभावानं खरोखरंच राजा आहे. 'किंग क्रो' हे त्याचं इंग्रजीतील नाव यथोचित आहे. एवढासा जीव पण कित्येकदा मोरघारी, कावळे, घारी, बहिरी ससाणे व श्येन पक्ष्यांना हुसकावून देण्यासाठी त्यांचा पाठलाग करताना मी पाहिले आहे.कसा त्यांच्यावर तुटून पडावयाचा. ते दूर निघून गेल्यावर पुन्हा तो त्या वृक्षावर यायचा. त्या वृक्षावर अनेक भीरू पाखरांनी आश्रय घेऊन घरटी केलेली असायची.


एक-दोन तर कधी चार-पाचाच्या समूहातून ते तळ्याकाठच्या झुडपातून हवेत सूर मारायचे. बाणासारखी त्यांची शेपटी.जणू हवेत काळे बाण सुटत आहेत असे वाटायचे.जलाशयातील लव्हाळ्यावरील कृमि कीटकांचा अलगद वेध घ्यायचे.एकदा तर सोनपाठी सुताराचा पाठलाग करीत त्याच्या चोचीतील चारा त्यानं हिसकावून घेतला.सुतार पक्षी 'किलीलीली' करीत असहायपणे ओरडत राहिला.


झिलाणीवरच्या हिरव्यागार देवधानावर संध्याछाया पडायच्या. बुलबुलाची गोड किलबिल झुडपाझुडपांतून निमून जायची. एखाददुसरी पाणकोंबडी जंगलातून निःस्तब्धपणे उडत झिलाणीवर यायची. तळ्याच्या मुखातून मासे उड्या मारताच चांदीसारख्या त्यांच्या पाठी चमकत असताना डुबकन आवाज होई. धीवरांच्या डोंगी किनाऱ्याकडे झपाट्यानं येताना दिसायच्या. त्यांच्या हातातील लांब काठीनं ते वल्हवीत किनाऱ्याला पोहोचायचे.अशा कातर वेळी गोचा मात्र लव्हाळ्यावर बसून तर कधी उंच आकाशात सूर मारून कृमि-अळीचा वेध घेई. अंधार वाढत राही. त्याच्या काळ्या सावल्या त्यात विरघळून जायच्या.


जलाशयावरील रत्ने


बांधाखालच्या अंगाला असलेल्या पुरातन वृक्षांच्या प्रचंड फांद्या बांधावरून ओणावतात.जलाशयातील पाण्यात पाहतात.त्यांचे वेडेवाकडे अजगरासदृश प्रतिबिंब त्यात तरळताना दिसते.उडत असलेल्या,बसलेल्या स्थितीतील विविध आकारांचे लहान-मोठे किती तरी किलकिले पाहून आश्चर्ययुक्त आनंद वाटे.तेजस्वी काळ्या-पांढऱ्या वर्णाच्या कवडी किलकिल्यांना कृष्ण व श्वेत रत्नांच्या वर्णाची पिसे पांघरून उडताना पाहून ते आकाशगामी जलदेवतेसारखे वाटत.त्यांची काळ्यापोवळ्यासारखी लांब चोच देदीप्यमान वाटे.तेथे काही मोठे किलकिले जोडीने बसले होते.त्यांच्या डोक्यावरील काटेरी काही पिसे शेंडीसारखी उभी होती.पाठीवरची पिसे पांढरी-करडी होती.छातीची पिसे सुंदर तांबडी दिसायची.रान कबुतराएवढ्या आकाराच्या किलकिल्यांच्या चोची चाकूच्या पातीएवढ्या रुंद दिसत. अगदी चिमणीएवढे किलकिले लवचिक नाजूक अशा जलवनस्पतींच्या फांद्या आपल्या प्रवाळ रंगाच्या पायांनी घट्ट धरून बसलेले होते.जलाशयाच्या पृष्ठाला अलगदपणे स्पर्श करीत,देवनळाच्या सळसळीशी स्पर्धा करीत अवर्णनीय अशा त्यांच्या सुंदर निळ्या पाठी चकाकत.वाटे जलाशयावर जणू रत्नेच उधळली आहेत. त्यांच्या रूपाने जणू कुणी देदीप्यमान अशा निळ्या रेघाच जलाशयावर ओढीत असल्याचा भास होई आणि त्या रेषांतून पाण्यातील मासे चांदीसारखे चकाकत.


बेहड्यावरचा खोपा


जलाशयाला लागून झिलाणी व गूढ शांतता नांदत असलेल्या बोडी आहेत.ती बोडी तर देवधानानं झाकून गेली होती.कुठं एखादा निळ्या-हिरव्या पाण्याचा भाग सकाळच्या सूर्यकिरणात आरशासारखा लख्ख दिसायचा.आमच्या चाहुलीनं त्या बोडीतील देवभातात चरत असलेले अडईचे जोडपे भुर्रकन् झप् झप् पंख फडफडवीत सीसिक् सीसिक् आवाज करीत त्या जलाशयातून उंच निळ्या आकाशात उडू लागले. लांब मानेची-भुऱ्या रंगाची ती वन्य बदके या अद्भुत जलाशयावर घिरट्या घालीत उडत होती. बांधावर बेहडा, पिंपळ व मोहा यांचे पुरातन वृक्ष उभे होते. थोड्या वेळानं ती बेहड्याच्या पोखरीत दिसेनाशी झाली. अशा पुरातन वृक्षांच्या पोकळीत त्यांची गूढ घरटी असतात.


सावरीवरल्या वंडकी


समोर स्वयंभू जलाशय आणि त्याला लागून असलेले विशाल झिलाण.काळ्या रंगाची-पंखाला पांढरी किनार असलेल्या वंडकी दूरच्या बोडीवरून शीळ घालीत झिलाणीवर घिरट्या घालू लागल्या.त्या झिलाणीत एक सावरीचा महावृक्ष उभा आहे. तीन-चार वंडकीच्या जोडप्यांनी त्या वृक्षाच्या पोखरीत खोपी केली आहेत.त्या उंच विशाल वृक्षाभोवती काळ्या पांढऱ्या रंगाच्या वंडकी उडताना मोठ्या अद्भुत वाटायच्या. सकाळ-सायंकाळी ती गूढ घरट्याकडे झेप घेताना दिसायची.त्यांची पिलं आता जाणती झाली होती. चोचीत धरून त्या पिलांना घरट्यातून बोडीकडे नेतानाचं दृश्य निसर्गात दुर्मीळ आहे. एक एक पिलू ते त्या देवधानाच्या बोडीत आणून सोडत. नंतर ती नाजूक पिले तिथेच देवधानाचा चारा खाऊन लहानाची मोठी होत.


उत्तुम उत्तुम


सूर्य अस्ताला जाताना तर त्या स्वयंभू जलाशयाचं सौंदर्य अवर्णनीय असे.त्याच्या काठच्या गूढ हिरव्या झिलाणीतील देवभातावर नजर ठरत नसे.अशा वेळी उत्तुम-उत्तुम-उत्तुम असा केम कुकडी-वॉटर कॉकचा आवाज सायंतन शांततेत नादमाधुर्य ओतीत असे. वाटे तो आवाज अगदी जवळून येतोय.परंतु पाण्याच्या माध्यमातून तो आवाज फार दुरून येत असे. एखाद दुसऱ्या वेळी तो आपल्या लांब, लोंबत असलेल्या जड पायांनी थोडा फार गडप होई. त्यांच्या डोक्यावरचा तुरा संधिप्रकाशात उंच उडत लगेच देवभातात गडप सुंदर दिसे.जांभळ्या रंगाची केम आता देवभातात घरटी बांधीत होती.पाण्यावर काड्याकाटकीचे उंच- तरंगणारे ते घरटे असे.यात चार-पाच पांढरी अंडी असायची.केम दिसावयाचे क्वचितच.देवभातातून चालताना देवभाताची हालचाल व्हायची. तीच यांची चाहूल.


बगळे


तळी, झिलाणी,बोडी व तिथे आश्रयाला राहणाऱ्या ढोकरी,बगळे व त्यांची गूढ निवासस्थाने यांचा उल्लेख आपल्या प्राचीन साहित्यात आढळून येतो.हाल सातवाहनाच्या गाथासप्तशतीत रोजच्या दृश्यात आढळणाऱ्या बगळ्यांचे वर्णन केले आहे, ते अक्षर वाङ्मयात समावेश करण्यासारखे आहे.बगळी म्हणजे हिरवा शालू ल्यालेली गौरकाय लाडकी प्रिया. जलाशयाच्या किनारी एकान्तात प्रियकराची प्रतीक्षा करीत असलेल्या तिला पाहून कवीने त्या नाजूक भावप्रवण प्रसंगाचे वर्णन तितक्याच सहजतेने केले आहे.'पहा,कमळाच्या पानांमध्ये बगळी कशी एकाकी बसली आहे. जणू निर्मल पाचूच्या पूजापात्रात मोत्यांची शिंपली ठेवावी तशी ती शोभत आहे.' पण त्या प्रियेचे लक्ष कुठे आहे? अशा कातर वेळी सारंगागाराकडे उडत जाणाऱ्या बगळ्यांच्या पंक्तीकडे सारे ध्यान लागले आहे. तिच्या द्विधा, कातर मनःस्थितीचे वर्णन अलौकिक आहे."रविबिंब कोठे गेले ? चंद्र व तारे कोठे गेले ? ग्रहमान पाहण्यासाठी होराशास्त्रज्ञ रेघा काढतो, त्याप्रमाणे आकाशात बगळ्यांच्या रांगांनी काळ रेघा ओढीत आहे." बगळ्यांची रांग कुण्डलीमधल्या कोनासारखी असते हे सर्वांना ठाऊक आहेच.


मनोली


नवेगाव बांध जलाशयाकाठची पडार फुलली की त्या गुलाबी तांबूस मोहक फुलोऱ्यातून आसपासच्या तलाव, बोडी,

झिलाणीतील हिरव्यागार कोंगशीतून,पाणकणीस - नदीकाठच्या उसाच्या वाड्यांतून रंगीबेरंगी पाखरांचे थवेच्या थवे आहार-विहार करताना दिसले आणि स्मृतीचा ठेवा जागा झाला.पाणथळीतील लव्हाळी खसाच्या लवचिक काड्यांवर बसून ते हिंदोळे घ्यायचे,

कुठं सपाट जमिनीवरील गवताचे बी वेचताना पन्नास शंभरचा थवा भुर्रकन चिवचिव करीत उडायचा.किती प्रकारच्या ? तांबड्या रेड-मुनिया,तिलीया,स्पॉटेड मुनिया,काळ्या डोक्याच्या ब्लॅक हेडेड मुनिया,पांढऱ्या मानेच्या-व्हाइट थोटेड मुनिया,श्वेत पाठीच्या व्हाईट बॅक्ड मुनिया,हिरव्या रंगाच्या-ग्रीन मुनिया.त्यांच्या अपार्थिव सौंदर्याचा हेवा वाटायचा आणि रूपाला लाजेसे नाव 'मनोली'. सोनाली-रूपालीच्या परंपरेतलं नाव वाटतं हे.हिरवी मनोली फारच सुंदर दिसते. परंतु ही मनोली आता नामशेष होत आहे.


सात बहिणींच्या पाराखालच्या झिलाणीतील कोंगशीत त्यांची वीण ऑगस्ट-सप्टेंबरात होते. तिथल्या ढोपराएवढ्या खोल पाणथळीत हिरव्यागार पाचूची पवन बहरलेली असे.ह्या पक्ष्यांची इवलीशी घरटी अद्भुत व आनंददायी सौंदर्याचा जणू निधीच असे. घरट्याकडे झेप घेणाऱ्या ह्या गोजिरवाण्या, सुंदर पाखरांकडे पाहात मी सात बहिणींच्या पारावर तासन् तास बसत असे. समृद्धीबरोबर तिथे एक अनामिक गूढता नांदायची.


…..समाप्त…!!

२/२/२६

स्वप्नं- एक देणगी / Dreams - a gift

स्वप्नं बघणाऱ्यांना,भविष्यात डोकवायला मिळायचं असेल तर,त्यांच्या पोटात फक्त श्रद्धा पाहिजे,दुसरं काही नको.


दिवस कधीकधी असा उगवतो की अगदी आतून असं वाटतं की,आज खूप वेगळं असं काहीतरी घडणार आहे.दिवस कधीकधी असाही उगवतो की,अशा खूप वेगळ्या गोष्टी घडून,आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात.


ठरलेल्या वेळेस जेसन स्टीव्हन्स यायचा म्हणून मी वाट बघत होतो.या भेटींपासून पुढच्या शोधयात्रेचा महिना सुरू व्हायचा असतो,आम्हा दोघांसाठी.बोस्टनच्या क्षितिजरेषेकडे पहात मी खिडकीशी उभा होतो.मनात रेड स्टीव्हन्सचे विचार होते.


ज्याच्यावर प्रेम असतं, त्याचा मृत्यू पचवणं कठीण असतं;

विशेषतः त्याच्या आठवणी जेव्हा सदासर्वकाळ तुमच्या मनात असतात. कांही लोकांचा आपल्यावर असा खोल परिणाम झालेला असतो,की ती माणसे आपला एक हिस्साच होऊन बसतात.रेड स्टीव्हन्सचा माझ्यावर तसाच परिणाम होता आणि मला माहीत आहे की त्याचा बऱ्याचजणांवर असा परिणाम झालेला होता.


खूपदा वाटून जायचं,फोन उचलावा,पलिकडून पश्चिम टेक्ससच्या बोलितला खरखरीत आवाज ऐकू यावा, मला प्रतिसाद मिळावा.

पण रेड स्टीव्हन्सनं माझ्या आयुष्यात आणलेल्या चांगल्या गोष्टी कायम माझ्याजवळ रहाणार आहेत,हे मला माहीत होते.


कॉन्फरन्स रूमच्या टोकाशी असलेल्या मोठ्या व्हिडिओ पडद्यावर रेड स्टीव्हन्स आमच्यासामोर आला.तो खरोखर अवलिया माणूस होता.आयुष्यात तो जे जे करीत गेला त्यातून त्याचा भन्नाटपणा उघड होत गेला.


"जेसन,तू तिथं बसला आहेस तेवढ्यात मी एक मिनीट वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांची जबाबदारी घेतल्याबद्दल मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्ज यांचे आभार मानण्यासाठी घेणार आहे.मला वाटतं की तू लक्षात ठेवशीलकी माझ्या मृत्यूपत्रातील शेवटच्या मसुद्याप्रमाणे मी तुझ्यासाठी योजलेली सर्वोत्तम देणगीत तुला जेव्हा मिळेल,ती माझे प्रिय मित्र थिओडोर हॉमिल्टन आणि मार्गारेट हेस्टिंग्ज यांचा खूपच हातभार लागल्यामुळे मिळेल.मोठ्या पडद्यावर रेड इतका सजीव वाटत होता. मला त्याला सांगावसं वाटलं,मला हे त्याचं काम करतांना खूप आनंद वाटत होता.पण हे पण मला ठाऊक होतं की हे शब्द बोलण्याचा काही उपयोग नव्हता.मला मात्र वाटलं माझ्या पद्धतीनं जेसनच्या या प्रवासात त्याची साथ करण्यासाठी त्यानं मला निवडलं तेव्हा मला आनंद वाटला,हे त्याला ठाऊक असणार,


"जेसन या महिन्यात तू जो धडा शिकायचा आहेस,तो धडा आहे स्वप्न,एक देणगी.ही देणगी थोर स्त्री पुरूषांना मिळालेली असते.

स्वप्नं म्हणजे आपल्या जीवनाचा गाभा असतात.जीवन जसं आहे तसं नाही,तर ते जसं असायला हवं,म्हणजे स्वप्नं,खास लोकांच्या मनात, हृदयात,स्वप्नं जन्मतात.पण ती स्वप्नं फळाला आली म्हणजे सगळ्या जगाला त्यांचा लाभ घेता येतो.


"तुला माहीत नसणार,पण थिओडोर हॅमिल्टन देशभर उत्तम विधिज्ञ म्हणून ओळखला जातो.मला तो जेव्हा भेटला,तेव्हा तसं होण्याचं त्याचं स्वप्न मी ओळखलं होतं आणि गेली पन्नास वर्षे हे स्वप्न तो जगतो आहे.हे स्वप्न वास्तवात येण्याआधी त्याच्या मनात,त्याच्या हृदयात आकाराला आलं होतं.


"लुइझियानाच्या दलदलीतून भटकता भटकता टेक्ससमध्ये तेल आणि गुरंढोरं यांची सगळ्यात मोठी उलाढाल करणारा सम्राट होण्याची स्वप्नं मी पहात असायचा.ती स्वप्नं माझा इतका भाग बनून गेली की, जेव्हा माझं पण उद्दिष्ट मी गाठलं तेव्हा मी पूर्वी कधीच न राहिलेल्या आपल्या घरातच मुक्कामाला जणू पोचलो होतो.


 (सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर EMBASSY BOOK DISTRIBUTORS ) "या सर्वोत्तम देणगीला निश्चित रूप देत असतांना, त्यातल्या त्यात सर्वश्रेष्ठ देणगी कोणती बरं,असं ठरवायचा मी प्रयत्न करत होतो.एकाच देणगीचं नाव घ्यायचं झालं तर मी स्वप्न ह्या देणगीचं नाव घेईन. 


जीवन कसं आहे त्यापेक्षा ते कसं असावं ही दृष्टी आपल्याला स्वप्नांमुळेच येते.या स्वप्नांमधूनच,या जीवनातून जी जी इतर देणगी मिळवायची असेल तिच्यासाठी मार्ग सापडतो."


रेड थोडा वेळ थांबला आणि तो विचारात गढून गेल्यासारखा वाटला.तो पुढे बोलायला लागला,"जेसन स्वप्नांची तुझी ओळख करून द्यायची तर आधी काही स्वप्नं कशी असतात,

याची तुला माहिती करून द्यायला हवी.आयुष्यभर अशा खूप स्वप्नांची मला जाण होती.


स्वप्नांबरोबरची माझी सलगी हा माझा ठेवा होता.


"मला आयुष्यात भेटलेला स्वप्न बघणारा सर्वात मोठा माणूस,लोकांच्या कल्पनाशक्तीला स्पर्श करील अशी ठिकाणं,अशा वस्तू तयार करण्याची त्याला प्रचंड आस होती.ही आस त्यानं आयुष्यभर जपली.त्याच्या वाट्याला माघार,मानहानी,अपयश नाहीतर हेटाळणीही आली.जेव्हा भेटायचा,तेव्हा तो त्याच्या नवीन योजनांविषयी,नवीन बेता विषयी माझ्यापाशी बोलायचा.भितीवर टांगायला नव्या नव्या स्वप्नांच्या पाट्या तयार करण्याची त्याला सवय लागली होती. आणि त्या योजनेच्या पुर्ततेसाठी आराखडे तो तयार करायचा.


"मला आठवतंय,तो मृत्यूशय्येवर होता.त्याच्या खोलीत छताला त्यानं त्याच्या नवीन योजनेचा आराखडा टाचून घेतला होता.

त्याच्या डोक्यात जसजसा त्या योजनेला आकार येत होता,

तसतसा तो त्या छतावरील आराखड्यामुळे जास्त स्पष्ट होत होता.


"रूग्णालयात त्याला भेटायला एक वार्ताहर आला. माझा मित्र इतका अशक्त झाला होता की त्याला जेमतेम बोलायला येत होते.तो पलंगावर जरा सरकला आणि वार्ताहाराला त्याने शेजारी आडवं व्हायला सांगितलं.असं केल्यानं छतावरच्या त्या आराखड्याकडे त्यांना नीट बघता येऊन त्याविषयी मित्राला चर्चा करता येणार होती.


"एका गंभीर दुखण्याशी झगडत असतांनाही एखादा माणूस एवढी आपली आस जपतोय हे पाहून तो वार्ताहर गहिवरला.वार्ताहाराने त्याची मुलाखात आटोपली.माझ्या मित्राचा त्यानं निरोप घेतला आणि तो रूग्णालय सोडून निघून गेला.


"नंतर त्याच दिवशी माझा मित्र गेला.


"तू मुद्दा निसटू देऊ नकोस बरं.मृत्यूशय्येपर्यंत आपली ज्वलंत स्वप्नं जोपासत,आयुष्यभर ती अगदी उत्कटपणे सांभाळणारा माणूस केवढा नशीबवान असला पाहिजे. आयुष्यभर माझा मित्र त्याच्या स्वप्नांमध्ये जगला.ती स्वप्नं सतत संख्येनं वाढायची आणि आकारानं मोठी व्हायची.त्यानं स्वप्नापैकी एखादा मैलाचा दगड गाठला की लगेच आणखी एखादं मोठं आणि एखादं जास्त दिव्य स्वप्नं त्याला खुणावत असायचं.


"अतिशय थेट पद्धतीनं खूप लोकांना स्वप्न बघायला आणि जास्त चांगल्या जगाची कल्पना करायला त्यानं शिकवलंय त्याचं नाव होतं वॉल्ट डिस्ने.


"पण तुला एक काळजी घ्यावी लागेल.आयुष्यभर जपायची स्वप्नं : ती केवळ तुझीच असायला हवीत. दुसऱ्या कोणाची ती असूच शकत नाहीत. आणि ती स्वप्नं संख्येनं आणि आकारानं वाढती रहायला हवीत.


"माझा दुसरा एक मित्र होता.त्याच नावं तुला माहीत नाहीये.तो म्हणायचा,खूप कष्ट करायचे आणि आयुष्याची पन्नाशी आल्यावर निवृत्त व्हायचं,असं त्याचं स्वप्न होतं.त्यानं खरोखर खूप कष्ट केले आणि धंद्यात अफाट यश मिळवलं.तो निवृत्त होण्याचं स्वप्न बाळगून होता.पण त्यापलिकडे कसलीच ओढ त्याला नव्हती.


"त्याच्या पन्नासाव्या वाढदिवशी आम्ही बरीचजणं जमलो.

त्याचा पन्नासावा वाढदिवस आणि त्याची निवृत्ती साजरी केली.त्यानं त्याचं स्वप्न नीट कशालातरी जोडून घेतलं असतं तर त्याच्या जीवनातला तो सर्वात आनंदाचा दिवस झाला असता.दुर्दैवानं त्याची सारी कर्तबगारीची वर्ष त्याच्या धंद्यासाठी खर्ची पडली. त्यात मात्र त्याला खूप अभिमान आणि आत्मसन्मान मिळाला.सुकाणूप्रमाणे वाट दाखवणारा उद्योगधंदा थांबवला तेव्हा अंगात जोम,ताकद असलेला तो माणूस निवृत्तीनंतर ढेपाळायला लागला.लवकरची निवृत्ती मिळावी असं त्याचं नेहमी म्हणणं होतं.पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की त्याच्या जगण्याला आधार मिळावा अशी काही आस राहिलीच नाही."नंतर एकाच महिन्यानं माझ्या या दुसऱ्या मित्रानं आत्महत्त्या केली.


"एक स्वप्न पाहणारा माणूस,तो मृत्यूशय्येवर असतानाही जीवनभर जपलेल्या ओढीमुळे उत्साहित होत होता आणि दुसरा,ज्याचं स्वप्न त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी अशोभनीय होतं,त्यानी आत्महत्त्या केली.यांच्यातला फरक तुला स्पष्ट झालाच असेल.


"जेसन स्वप्न हे फक्त तुझं असणं फार महत्त्वाचं आहे.ते सब घोडे बारा टक्के नसतं.तुझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसेल असं तुझं स्वप्न असावं.तुझ्याबरोबर ते स्वप्न ही वर्धिष्णू वाढत रहावं.त्या स्वप्नांची ओढ असणारा फक्त तूच असशील.


रेड स्टीव्हन्स थांबला,त्यानं घसा साफ केला,आणि असं वाटलं की त्याच्या मनाचं तारू दिशा बदलत आहे. शेवटी तो बोलू लागला. "जेसन,या महिन्यात स्वप्नांच्या देणगीच्या अनुभवाला तू सुरूवात करायची आहेस. सगळं शक्य आहे असं समजायचं.आयुष्यात काय काय करायचं,काय काय व्हायचं,काय काय मिळवायचं याची यादी कर.तुझ्या अंतःकरणाचा सर्वात जास्त कशाकडे ओढा आहे हे विचारात घेऊन अग्रक्रम कशाला द्यायचा ती यादी तयार करायची.


"महिन्याच्या अखेरीस तू त्यातल्या काही स्वप्नांबद्दल मिस्टर हॅमिल्टन बरोबर बोलायचे.


उत्तर बरोबर किंवा चूक असं नसणार.आणि लक्षात ठेव जशी वर्ष लोटतील तशी तुझी स्वप्नं वाढतील आणि विकसित होतील,

स्वप्नांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे,स्वप्न बघणारा होण्याची प्रक्रिया.


"तुला सुंदर स्वप्नं बघण्याचं जीवन मिळो."


रेड स्टीव्हन्सची प्रतिमा लोप पावलीआणि कॉन्फरन्स रूममधल्या टेबलवर घडी घालून ठेवलेल्या हातांकडे जेसन क्षणभर बघत राहिला.शेवटी तो म्हणाला, "आयुष्यात आपण काय करायचं याविषयी मी कधीच विचार केला नाहीये.आपण जिवंत असतो आणि जीवनाचा प्रवाह दिवसामागून दिवस गेले की आपोआप चालू राहतो,असंच मला वाटतं."


मी उभा राहून दाराच्या दिशेनं चालता चालता म्हटलं, "जेसन स्वप्नं बघायला सुरुवात करायला ही छान वेळ आहे.आणि हे शिकायचं असलं तर रेड स्टीव्हन्सकडूनच शिकायचं.त्याच्याहून दुसरा कोणी चांगला शिक्षक नाही. महिन्याच्या शेवटी तुझ्या अहवालाची मी वाट बघतो."


कॉन्फरन्सरूममधून मी बाहेर पडलो,तेव्हा जेसन विचारांमध्ये गढलेला होता आणि मला वाटतं त्याच्या स्वप्नांमध्ये ही.तीन आठवड्यांनी मी माझ्या लिहिण्याच्या टेबलाशी जेसन स्टीव्हन्ससमोर बसलो होतो आणि तो त्याच्या जीवनभराच्या स्वप्नांबद्दल बोलत होता.तो दिवस मी कधीच विसरणार नाही.त्यानं सुरूवात हळूहळू केली होती,पण तो मग बोलण्याच्या रंगात आला.


"सुरूवातीला मला काय करायचंय,कोण व्हायचंय, काय हवंय याची एक लांबचलांब यादी तयार केली.मग लक्षात आलं की ती काही वास्तविक पाहता स्वप्न नव्हती मला हवं तर त्या गोष्टी करणं,तसं बनणं,त्या मिळवणं मला सहज शक्य होतं.आजवर त्या करायला मी वेळ किंवा उत्साह दाखविला नव्हता इतकंच.पण मी जेव्हा वॉल्ट डिस्नीचा विचार केला,तेव्हा माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टी आल्या." जेसन जरासा थांबला.त्यानं मिस् हेस्टिंग्जकडे बघून परत माझ्याकडे बघितलं.मला वाटतं त्याला प्रोत्साहन हवं होतं.मिस् हेस्टिंग्ज हसली आणि तिनं त्याच्याकडे बघत मान डोलावली.जेसननं बोलणं पुढे चालू ठेवलं.त्याचा विश्वास वाढायला लागला होता.


"कुठल्या तरी मार्गानं,वंचित तरूण माणसांचं आयुष्य सुधारावं म्हणून मला काही करता यायला हवं.म्हणजे माझ्या डोळ्यासमोर गरीब तरूण माणसं नाही येत.ज्या लोकांच्या कल्पनेतही स्वतःची ताकद,उत्कट इच्छा, मूल्ये या गोष्टी नाहीत की ज्यामुळे त्यांचे आयुष्य अर्थपूर्ण नाही,अश्या लोकांसाठी मला काम करायचंय. माझे आजोबा रेड माझ्यासाठी जे करताहेत ते मी एका प्रकारे दुसऱ्या तरूणांसाठी करणार आहे."


मिस् हेस्टिंग्जने टाळ्या वाजवल्या.आणि ती आनंदानं म्हणाली, "जेसन मला हे ऐकून फार उत्तेजित वाटतंय. तू किंवा दूसरा कोणी याहून चांगलं आपल्या आयुष्यात करील असं मला वाटत नाही. "जेसन माझ्याकडे बघून म्हणाला, "तुम्हाला हे ठीक वाटतंय ना ?"


हसत मी उत्तर दिलं, "जेसन,चाळीस वर्षांच्या सहवासानंतर मी एक तत्त्व शिकलो आणि ते असं की आयुष्याच्या लढाईत टिकाव धरायचा तर नेहमी मिस् हेस्टिंग्जशी सहमत व्हावं.आणि खरंच माझंपण तिच्यासारखंच मत आहे.तुझ्या जगण्यासाठी एक अगदी छान स्वप्न,एक योग्य ध्येय तुला मिळालं.तुझ्या आजोबांच्या मित्रांच्या गोष्टींची सतत आठवण ठेव. आजोबांनी तुला त्या गोष्टी ऐकवल्या आहेतच. तू जिवंत असेपर्यंत तुझ्या स्वप्नांना जिवंत ठेव."


मिस् हेस्टिंग्ज जेसनबरोबर लिफ्टपर्यंत गेली.मी आपल्या लिहिण्याच्या टेबलाशी एकटाच राहिलो. मी आपल्या स्वप्नांचा विचार करायला लागलो.ती आजही, माझ्या ऐशीव्या वर्षीही,माझी सोबत करत आहेत.पण तरी मी तेव्हाच शपथ घेतली की माझी सर्व स्वप्न टिकून असतील आणि वर ती वर्धिष्णूही असतील.


समाप्त...