* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: नारायणमामा / Narayan Mama

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२२/२/२६

नारायणमामा / Narayan Mama

दुपारची जेवणं आटोपली होती.माई अजूनही स्वैपाकघरातच आवरत होत्या.बापू एकटेच ओसरीवरच्या बैठकीत तक्क्याला टेकून बसले होते. माई बाहेर येण्याची थोड्या वेळ वाट पाहून त्यांनी पानाचं तबक जवळ ओढलं.त्यातली दोन पानं काढून नखाने ते त्यांच्या शिरा काढू लागले.पानं नखलून त्यांनी पानांना चुना लावला.काथ-सुपारी अडकित्त्याने बारीक कापून त्यांनी माईंचं अन् स्वतःचं पान बनवलं.तरी माईचं काम आटोपलं नव्हतं म्हणून बापूंनी हाक मारली,"काय देवा,अजून किती वेळ ? पान बनवून तयार ठेवलं आहे."


बापू चांगल्या मूडमध्ये असले की,माईंना 'सरकार' किंवा 'देवा'अशी हाक मारत.बापू बालगंधर्वांचे निस्सीम चाहते होते.नासिकला कंपनीचा मुक्काम होता.त्यावेळी बापूंची पोस्टिंग नासिकलाच होती.त्यांनी चक्क एक महिन्याची रजा टाकली होती.कंपनीच्या मुक्कामी ते नेहमी जात. रेव्हेन्यू ऑफिसमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करत असल्याने त्यांना कंपनीत जायला मुक्तद्वार होतं.त्या महिन्यात झालेले सगळे खेळ त्यांनी पाहिले. बालगंधर्वांमुळेच 'देवा' हा शब्द त्यांच्या तोंडी रुजला असावा.बापूंची हाक ऐकून ओच्याला हात पुसत माई बाहेर आल्या.सतरंजीवर बसून त्यांनी बापूंनी तयार केलेलं पान घेतलं अन् म्हणाल्या,


"बाकीचं राहिलेलं आता चहाच्या वेळेला आवरीन. कारण मला माहीत आहे,जेवण झाल्या झाल्या तुम्हाला पान लागतं आणि मी आल्याशिवाय तुम्ही पान खाणार नाही!"


पान खाता खाता दोघांच्या गप्पा सुरू झाल्या."यशाचा 'पुला पुला'चा खेळ सुरू झालेला दिसतो.काही तरी नवीन नवीन खेळ शोधून काढतो.आज मंदाबरोबर मुक्तापण दिसती आहे पुलाच्या खेळात.'


माई कौतुकाने म्हणाल्या,"मंदी गरीब आहे.बिचारी मधली आहे.सगळ्यांशी चांगली,यशा म्हणेल ती पूर्वदिशा करते.

त्यामुळे तिचं यशाशी चांगलं जमतं.मुक्ती म्हणजे धाकटी आणि छाकटी आहे.लवंगी मिरचीच जणू.ती काही यशाची दादागिरी ऐकून घेत नाही आणि मग यशा तिला वाळीत टाकल्यासारखं करतो.तिच्याशी बोलत नाही,तिला खेळायला घेत नाही,तिच्यासमोर मंदाचे जास्त लाड करतो.पण हीदेखील कट्टर.तीपण जमवून घेत नाही.पण आज तिघंही पुलाचा खेळ खेळताहेत.तात्पुरती भांडणं असतात,झालं.

पाण्यात काठी मारून त्याचे दोन भाग होत नाहीत.तसंच आहे हे. गुणी आहेत माझी तिन्ही मुलं.कधी हट्ट नाही की त्रास देणंही नाही! वयाच्या मानाने त्यांना परिस्थितीची जाणीव खूप आहे.गरिबांची मुलं गुणी असणं हेच त्यांचं धन."


ते दोघे बोलत असतानाच विनायक पोस्टमन वाड्याच्या दरवाजातून चौकापर्यंत आला होता."बापू इनलैंड लेटर आलंय,

पुण्याचंच आहे,माईंच्या माहेरचं दिसतंय..." असं म्हणत त्यांनी पत्र बापूंच्या हाती दिलं.छोट्या गावात सगळेच सगळ्यांना ओळखत.

एवढंच काय,कुटुंबाच्या नातेवाईकांचीदेखील माहिती इतरांना असे.


बापूंना पत्र देऊन विनायक पोस्टमन निघून गेला.बापूंनी सावकाश पत्र उघडलं वाचून झाल्यावर माईंकडे बघत ते म्हणाले,


"देवा,तुमचा लाडका भाऊ येतोय परवा बायकोबरोबर. मुलंपण येताहेत."


माईंच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.नारायण त्यांचा सगळ्यात धाकटा भाऊ.पुण्यात खूप मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या नारायणला माईंची फार ओढ होती. दरवर्षी भाऊबीजेला तो न चुकता येत असे.यंदा मात्र महत्त्वाचं काम निघाल्याने नारायणची भाऊबीजेची खेप चुकली होती.म्हणून मुलांना नाताळाची सुट्टी लागताच बायकोमुलांसह तो येणार होता.उद्याचाच दिवस मध्ये आहे.काय तयारी करायची,घरात काय हवं-नको ते बघायचं,ह्याची माई-बापूंची चचर्चा सुरू झाली.


ओसरीला लागून असलेल्या खोलीत यशा आणि मंदा-मुक्ताचा खेळ रंगात आला होता.यशा गोधडी पांघरून आडवा पडला होता.तो झाला होता पूल.मंदा आणि मुक्ता पुलाला काही तरी प्रश्न विचारायच्या आणि यशा पांघरुणाखालून अशी काही तरी वात्रटासारखं उत्तरं द्यायचा की,त्या दोघी खुदुखुदु हसायच्या.प्रश्न जितके असंबद्ध तितकीच पुलाची उत्तरं विचित्र आणि असंबद्ध.

त्यामुळे त्या दोघींचं हसू थांबतच नसे.उत्तरं देणारा पूल मात्र कधीच हसत नसे.मंदा नाही पण मुक्ता अधूनमधून पूल होण्याचा हट्ट करायची पण यशा त्या गोष्टीला ठाम नकार देत असे.तो म्हणे, "तर मग खेळा तुम्ही दोघीच!" त्याने असं म्हटल्यावर मंदा म्हणायची, "भावड्या नसेल तर खेळात काय मज्जा ! मग मीपण नाही खेळणार."


मुक्ता हिरमुसली होऊन थोडा वेळ प्रश्न न विचारता तशीच बसून राही.पण थोड्या वेळाने नकळत पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात करायची.पूलपण तिच्या प्रश्नांना जास्त खेळकरपणे उत्तरं देऊन तिला खूश करी. तासन्तास रंगात आलेला हा खेळ माई आल्यावर थांबला.पुलानेपण अंगावरची गोधडी बाजूला केली. माईंनी मुलांना बातमी सांगितली -


"यशा, मंदा, मुक्ता... अरे,परवा सकाळच्या गाडीने पुण्याहून तुमचा नारायणमामा,शकुंतला मामी अन् त्यांची मुलंपण येणार आहेत.

आत्ताच नारायणाचं पत्र आलंय.अचानक समजल्याने आपली थोडी धावपळ होणार आहे.तुम्हालापण आता खूप कामं आहेत.

खरं तर,नारायणाने पंधरा दिवसांपूर्वीच पत्र टाकलं होतं.पण म्हणतात ना,पोष्टाचं काम अन् महिनाभर थांब, तशातली गत झाली ! यशा,तू बाबूला परवाची तांग्याची वर्दी देऊन ये.न विसरता जा म्हणावं आणि त्यानंतर आप्पांच्या घरी जाऊन त्यांना परवापासून 'सकाळ' अन् एक इंग्रजी पेपर टाकायला सांग."


"आप्पा म्हणजे नरकेसरी ना?" यशाने खट्याळपणे विचारलं.


अर्ध्या बाह्यांचा शर्ट अन् हाफ पँट घातलेले आप्पा पेपर विकताना गल्लीत शिरले की,'केसरी ऽऽऽ' अशी आरोळी मारत.पन्नाशीतल्या आप्पांचा एक डोळा अनियंत्रितरीत्या फिरत राह्यचाआप्पांच्या 'केसरी ऽऽऽ' ह्या आरोळीमुळे सगळं गाव त्यांना त्यांच्या परोक्ष 'नरकेसरी' म्हणायचं.


माई कृतककोपाने म्हणाल्या,"यशा,चावटपणा करू नकोस.आप्पा म्हटल्यावर कोण ते तुला बरोबर समजल होतं.आणि हो,इंग्रजी पेपराचं विसरू नकोस सांगायला. नारायणाला त्याशिवाय चहा गाड लागत नाही.मोठा साहेब आहे ना तो !"


नारायणमामा मोठे साहेब आहेत हे मुलांना पक्कं माहीत होतं.

त्यांच्या घरीच काय,पण अख्ख्या गावात सूटबूट घालून येणारे ते एकमेव पाव्हणे होते.


"मंदे,तू शेजारी वत्सलाबाई आहेत का,बघ.अन् त्यांना म्हणावं,

माईंनी घर सारवायला बोलावलंय.चारपाच चादरी अन् गोधड्याही भिजवून ठेवल्यात,त्या धुवायच्यात म्हणावं !"


एकंदरीत माईंची भाऊ-वहिनी येणार म्हटल्यावर चांगलीच धावपळ सुरू झाली होती."तरी बरं, नारायणाचे खायचे चोचले नाहीत.लहानपणापासून पोळी कुस्करून त्यावर वरण घालून दिलं की,स्वारी खुश.त्यातल्या त्यात डाळ-मेथ्यांचं वरण मिळालं की काय ब्रह्मानंदच! शकू मागे एकदा भेटली तेव्हा सांगत होती, 'कुठे लग्नात जेवायला जायला असलं तरी हा आपला वरण-पोळीचा डबा घेऊन जातो.' मोठ्या लोकांचं सारंच वेगळं!" माईंच्या स्वरात कौतुक ओथंबत होतं.


माई नारायणमामा कुटुंबासह येणार हे सांगून गेल्या आणि बच्चे कंपनीच्या गप्पांना एक वेगळाच उत्साह आला. पुलाचा खेळ केव्हाच गुंडाळून ठेवला गेला होता. मुक्ता म्हणाली, "भावड्या, मंदा,आपण आता 'मनोराज्यम्' करू!" ते तिघेजण मामा आल्यावर काय काय करायचं,ह्याचं मनोराज्यम् करू लागले.मामांच्या अजित,माधुरी आणि मोन्याला ते खूप वर्षांनी भेटणार होते. यशा म्हणाला,


"मी अजित आणि मोन्याला माझ्या साठवलेल्या गोट्यांचा डबा दाखवीन.अन् माझा टम्मण जर त्यांनी मागितला तर तोही देऊन टाकीन.अजित एकदम भारी क्रिकेट खेळतो.मी त्याला शाळेच्या ग्राऊंडवर सगळे क्रिकेट खेळतात,तिथे घेऊन जाईन खेळायला.

नेहमी जोरात बॉल टाकून तो नवीन मला घाबरवतो अन् पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट करतो ना! आता आला आहे पुण्याहून आमचा पठ्ठ्या ! त्याला टाका कितीही फास्ट बोलिंग.मारेल बघ तुला सणासण सिक्सर अन् बाऊंड्र्या!"


यशाचं मनोराज्य तर सुरू झालंदेखील.मंदा आणि मुक्ता त्यांना गॅदरिंगच्या वेळेला केलेले डान्स करून दाखवण्याचं ठरवू लागल्या.घरी कुणी पाव्हणे आले की, यशा प्रतिष्ठितासारखा त्यांच्या गप्पा ऐकत एका कोपऱ्यात बसायचा आणि मध्ये मध्ये काही न बोलता माईंच्या भाषेत सांगायचं तर 'श्रवणभक्ती करायचा'. अशा वेळी तो नजरेनेच मंदा-मुक्ताला तिथे न थांबता बाहेर जाण्याचे इशारे करायचा.यशाच्या नजरेकडे लक्ष ठेवून असलेली मंदा मुकाट्याने बाहेर निघून जायची पण डांबरट मुक्ता यशाकडे जाणीवपूर्वक बघायचीच नाही.तिथेच चिकटून राह्यची.

यशाचा जळफळाट व्हायचा.पण पाव्हण्यांसमोर त्याला काही बोलता यायचं नाही.मग पुढचे दोन दिवस यशाची अन् मुक्ताची कट्टी असायची.अशावेळी मुक्तासमोर मंदाला तो हळू आवाजात काही तरी गमती सांगायचा.खरं तर,मंदाचा मुक्कामासाठी जीव तुटायचा पण यशासमोर काही बोलण्याची तिची हिंमतही नसायची.आता मात्र मनोराज्यम् करताना मंदाने मुद्दाम हा विषय काढला. कारण नारायणमामाचा गप्पिष्ट स्वभाव अन् मैफल रंगवण्याची हातोटी सगळ्यांनाच ठाऊक होती.


गावगोत,माधव सावरगांकर,अष्टगंध प्रकाशन


"भावड्या,ह्या वेळेला आम्हाला पण मोठ्या लोकांच्या गप्पा चालतात तिथे बसू देशील ना ?"


यशाने मंदाच्या ह्या विनवणीला मोठ्या मनाने मान्यता दिली आणि पुढच्या गप्पा मग मंदा-मुक्ताकडून आणखी उत्साहाने चालू राहिल्या.थोड्या वेळाने माईंनी परत आठवण करून दिल्यावर यशा त्याची लोखंडी चकारी घेऊन रस्त्यात खेळत खेळतच पहिल्यांदा बाबू टांगेवाल्याकडे वर्दी द्यायला गेला,


"बापूंनी सांगितलंय,'महाराष्ट्र एक्सप्रेसने पुण्याहून आमचे मामा, मामी आणि मुलं येणार आहेत. दुसरी सवारी घेऊ नका.' बाबूकाका,ओळखता ना तुम्ही मामांना ? दरवर्षी येतात बघा दिवाळीला."


यशाच्या बोलण्यावर बाबू हसून उत्तरला, "यशवंता, मामासाहेबांना मी कसा विसरेन ? सूटबूट घालून माझ्या तांग्यात बसणारी ती एकच तर सवारी आहे.स्वभावपण अगदी माईसारखाच आहे.गरीब असो,श्रीमंत असो, अगदी मोकळेपणाने गप्पा मारतात.एवढे मोठे साहेब आहेत पण अजिबात गर्व नाही.माईंना सांग,काही काळजी करू नका.टायमात जाईन अन् बैजवार घरी आणून सोडीन त्यांना."


यशाची चकारी खडखड आवाज करत आप्पांच्या घराकडे झिंगाट निघाली.


आप्पा लांब तीन देवळांच्याही पुढे मोमीन गल्लीत राहत. 'सकाळ' आणि इंग्रजी वर्तमानपत्रांचा निरोप दिल्याबरोबर आपल्या न फिरणाऱ्या उजव्या डोळ्याने यशाकडे रोखून बघत आप्पा म्हणाले, "पुण्याचे पाव्हणे येणार असं दिसतंय. माईसाहेबांच्या माहेरचे का ?"


आप्पांच्या चुणचुणीत तर्काचं यशाला खूपच आश्चर्य वाटलं. "तुम्ही कसं ओळखलंत?" यशाने न राहवून विचारलं, "अहो यशवंतराव, 'सकाळ' वाचणारा माणूस म्हणजे पुण्याचाच असणार आणि माईंचं माहेर पुण्याचं आहे, हे काय आम्हाला माहीत नाही होय ?"


आप्पांच्या उत्तराने यशाला त्यांच्या हुशारीचं कौतुकच वाटलं. चकारी चालवत घरी येताना यशा आप्पांच्या हुशारीचा विचार करत होता. उगाच नाही सगळं गाव आप्पांना 'नरकेसरी' म्हणत.


'हुशारी सिंहासारखी आहे खरी. डोळा सारखा फिरत असतो पण बुद्धी मात्र स्थिर असते,'


कधी तरी मोठ्यांच्या गप्पांत बाजूला बसून ऐकलेलं हे वाक्य यशाला आठवलं.नकळत त्याने मान हलवून त्या वाक्याला मान्यता दिली.तो स्वतःशीच हसला.


ठरल्याप्रमाणे बाबूचा तांगा पाव्हण्यांना घेऊन घरी आला आणि घराचं वातावरण एकदम बदलून गेलं. नारायणमामा म्हणजे उत्साहाचा धबधबाच. बहुश्रुतपणाला विनोदाची फोडणी.आणि कुठल्याही वयाच्या श्रोत्यांशी मैफल रंगवून टाकण्याची हातोटी.स्वैपाकघरात गप्पांचा अड्डा जमला.।

अपर्ण शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…