* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: काजवे : अंधारातील प्रकाश / Kajave: Light in the Darkness

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

5/23/26

काजवे : अंधारातील प्रकाश / Kajave: Light in the Darkness

नवेगावबांध सरोवराकाठी मी राहात असताना तिथल्या पावसाळी अंधाऱ्या रात्री काजव्यांनी सुशोभित झालेल्या असत.आभाळ सरोवरावर टेकल्यासारखं वाटे. कित्येकदा मी काळोख्या रात्री सरोवरावर काजवे बघायला जाई.नवेगावबांध परिसरात लोक काजव्यांना 'मिलमिले' म्हणतात. काजवा हा शब्द त्यांना माहीत नाही. 'मिलमिले' या शब्दातच काजव्यांचा अर्थ आहे.जिकडं तिकडं किर्र अंधार असे.तो अंधार आकाशातील ढगांमुळं शतपटीनं वाढे.सरोवराकाठच्या झिलाणीतून अनेक कृमि-कीटकांचे आवाज येत.एका सुरात थांबून थांबून बेडकांच्या समूहाचा आवाज येई. बेडकांच्या या सुराला नादमधुर म्हणता येणार नाही; परंतु काळोखाची भीती कमी करणाऱ्या या आवाजाचं मला मोठं आकर्षण वाटे.क्षणभर जरी त्यांचा हा नाद बंद झाला तरी मन अस्वस्थ होई.त्या वेळी माझ्या ध्यानी आलं,की संगीताच्या सप्तसुरांत बेडकांच्या आवाजाला 'धैवत' का म्हटलं आहे. अशा या वातावरणातच बेडकांचा आवाज ( काजवे : अंधारातील सुंदर प्रकाश, पाखरमाया,मारुती चितमपल्ली,प्रकाशक - साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर )ऐकायला हवा.तो अद्भुत नाद असतो.तो अशा अंधारातील मोकळया अवकाशासाठीच असतो.तिथून त्याचा अंतरिक्षात लय होतो.दाटीवाटीनं इमारती असलेल्या शहरात हा अनुभव कधीच येणार नाही.

मधूनच झिंग्यांच्या कळपाचा आवाज येई.एखादा मासा पाण्यातून उंच उडी घेताना त्याची रुपेरी पाठ चमकताना दिसे.नंतर डुबकन आवाज होऊन ती झलक अंधारात गडप होई.सरोवराच्या बांधावर मोहा,बेल,हिरडा,बेहडा आणि आवळ्याची जुनी मोठी झाडं उभी होती.तशीच सरोवराकाठी चिंचेची राई होती.आकाशात सुरुवातीला काही चमकणारे तारे दिसावे,नंतर ते वाढत वाढत साऱ्या नभी दिसू लागावे,तसेच चिंचेच्या घुमटाकार झाडावर किंवा इतर काही वृक्षांवर पहिल्यांदा चार-पाच हिरव्या-पिवळ्या रंगांच्या प्रकाशाचे ठिपके दिसायचे. एखाद्या चांदणीसारखे ते चमकत.

हळूहळू त्या झाडांच्या हिरव्या-काळ्या छतावर प्रकाशाचे अधिक अधिक बिंदू दिसू लागत.थोड्या वेळात ती राई त्या हिरव्या असंख्य बिंदूंनी जणू गोंदवली जायची.

इतके अगणित काजवे एकत्र चमकताना मी यापूर्वी कधी कुठं पाहिले नव्हते.अशा अंधारातदेखील झाडांच्या छताचा मूळ आकार दृगोचर होऊ लागे.सरोवराकाठचं हे गूढ सुंदर रूप मोठं अभूतपूर्व वाटे.दूरवरून पाण्याच्या लहरी किनाऱ्यांवर आंदुळताना कर्णमधुर आवाज करीत,तोही ऐकू येई.

काजव्यांचा एखादा थवा लुकलुकत झिलाणीत स्थिर होई.काही काजवे पाण्यातील पृष्ठावर डोकावणाऱ्या वनस्पतीवर स्वार होत.अशा वेळी प्रकाशाच्या ठिपक्यांचं सुंदर प्रतिबिंब साऱ्या सरोवराकाठच्या जलाशयात दिसू लागे.पुणे-मुंबई शहरांतील विजेच्या दिव्यांची रोशणाई पाहणाऱ्यांना निसर्गसुंदर अशा काजव्यांच्या प्रकाशाच्या शोभेची कल्पना प्रत्यक्षात ती अनुभवल्याशिवाय येणार नाही.

अशा काळोखातील काजव्यांच्या प्रकाशात पाहायला माझे डोळे सरावलेले होते.पाच-सात हुदाळ्यांचं कुटुंब पाण्यात अवतीर्ण झालं,की ते गोल गोल पोहू लागत. मध्येच वळणदार उड्या घेत.त्यांच्या अंगावरही काही काजवे चमकत.झिलाणीत डोकावणाऱ्या पाण्यात काजव्यांच्या प्रकाशाचं प्रतिबिंब पडलेलं दिसे.वर काजवे खाली काजवे असे एक अलौकिक सुंदर दृश्य तिथं जन्माला येई.हुदाळे पाण्यात उड्या घेत,तसे पाण्याच्या तुषारांचा प्रकाश दिसे.मोत्यांसारख्या तुषारांत हिरव्या प्रकाशाचे बिंदू दिसत.मी हे सारं देहभान हरपून तासन् तास अंधारात बसून पाहात शांततेचा एक अवर्णनीय अनुभव घेतला आहे.

आम्ही भारतीय लोक तसे कीटकांच्या जगाविषयी खूप उदासीन वृत्तीचे आहोत.जपानी लोक मात्र या बाबतीत मोठे रसिक आहेत.त्यांची मुलं फुलपाखरं आणि चतुर यांच्याबरोबर खेळतात.रानात टोळ पकडायला एकमेकांना साहाय्य करतात.हिरव्या-जांभळ्या रंगाच्या सोनेरी कीटकांच्या शोधात भटकतात.कीटकांचं संगीत ऐकण्यासाठी जपानी लोक विविध प्रकारचे गाणारे कीटक आपल्या बागेत पाळतात.घरासमोरच्या हौदातील पाणनिवळ्या आणि पाणकीटक न्याहाळण्यासाठी त्यांना वेळ असतो.बागेतील गोगलगाईकडं ते कौतुकानं बघतात,फुलपाखरं,चतुर, रातकिडे,

गाणारे कीटक आणि गोगलगाई यांच्यावर जपानी कवींनी अतिशय आशयघन 'हायकू' रचल्या आहेत.अशा या जपानी देशात एक सुंदर परंपरा आहे. नोबेल पुरस्कार-विजेते याशुनारी कावाबाता यांच्या 'दि लेक' या लघुकांदबरीत काजव्यांच्या उत्सवाविषयी आख्खं एक प्रकरण आहे.ते इतकं भावस्पर्शी आहे,की तुम्ही ते मुळातून वाचल्याशिवाय त्यातील सौंदर्याचा अनुभव घेता येणार नाही.कादंबरीत कीटकांविषयी एक प्रकरण असू शकतं,याचंच मला आश्चर्य वाटतं. कावाबाताच्या सर्वच कथा-कादंबऱ्यांतून जुन्या परंपरेचं जतन करताना जसा त्याआधारे आनंद व्यक्त केला आहे,तशीच त्या आनंदाला दुःखाची भरजरी किनार जोडली आहे.असा हा जीवनाचा सारीपाट कावाबातासारखा समर्थ लेखकच विणू जाणे.इतरत्र मला ते कुठं आढळून आलं नाही.

कादंबरीत तळ्याकाठच्या उंच मनोऱ्यावरून रात्रीच्या अंधारात काजवे हवेत सोडण्याचा आनंद उत्सव आहे. नाना प्रकारचे काजवे छोट्याशा पिंजऱ्यातून विकण्यासाठी तळ्याभोवती दुकानं लागली आहेत. शोभेच्या दारूगोळ्यांची आतशबाजी पाहण्यासाठी जसे जत्रेत आबालवृद्ध जमा होतात,तसेच काजवे हवेत सोडणार,या वार्तेनं पुष्कळ जपानी रसिकांनी त्या तळ्याभोवती जमून गर्दी केली आहे.ते पाहण्यासाठी ते नावेत बसून जलविहार करीत प्रतीक्षा करीत आहेत. बऱ्याच लोकांच्या हातात काजवे धरण्यासाठी जाळी लावलेल्या लांब काठ्या आहेत.

मनोऱ्यावरून काजवे सोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होताच प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. कादंबरीचा नायक गिमपी ते सुंदर दृश्य पाहात आपली प्रेयसी माची हिला शोधीत असतो. ती सुंदर पोशाख करून,तळ्याकाठच्या पुलावर उभी राहून,तो सारा देखावा पाहात त्याची प्रतीक्षा करीत असते.

एकमेकांना हा आनंदानुभव सांगण्यासाठी दोघंही आतुर असतात.हे दृश्य पाहता-पाहता तो हलकेच बालपणीच्या आठवणींच्या जगात पदार्पण करतो.त्याच्या गावतळ्याची त्याला आठवण होते.तिथं अनेक वेळा आईबरोबर काजवे उडताना त्यानं पाहिले होते.इतक्यात प्रेयसी समोर दिसते.तिच्या हातात एक पिंजरा असतो.त्यात काजवे चमकत असतात.युद्धात जखमी झालेल्या आपल्या मित्राला भेट देण्याकरिता तिनं तो घेतलेला असतो.या साऱ्या प्रसंगाची आठवण मनात घोळवीत असताना काजव्यांवर जपानी कवींनी रचलेल्या 'हायकू' मनश्चक्षूपुढं साकार होऊ लागतात.जपानी मुलं काजव्यांविषयीचं प्रेम जन्मतःच घेऊन येत असावीत. वाट चुकलेलं बालक रडत अडखळत अंधाऱ्या रानातून जातं आहे,पण त्याला वाट चुकल्याचं भानदेखील राहिलेलं नाही.त्याही अवस्थेत ते चालताना काजवे पकडू लागतं :

A lost child crying Stumbling over The dark fields.... Catching fireflies

Ryusi

पावसाच्या सुरुवातीला दिसू लागणाऱ्या काजव्यांना पकडण्याचा मोह कोणाला आवरेल? त्यानं बोटाच्या चिमटीत पहिलाच काजवा धरताच तो निसटून गेला. अरे दैवा ! त्याच्या चिमटीत हवा तेवढी राहिली :

The first firefly... But he got away And I... Air in my fingers

Issa

मी त्याला पिंजऱ्यात ठेवण्यासाठी सहज पकडलं,तर त्या काजव्यानं माझी चिमूटच प्रकाशित केली.

As I picked it up To cage it The firefly Lit my finger-tips

निसर्गातील ते अभूतपूर्व दृश्य । खोल नदीच्या अंधाऱ्या प्रवाहात काजवेदेखील मंद गतीनं जात आहेत.पाणी वाहतंय की प्रकाश ?...

Over the deepest Darkest river The fireflies Are flowing slowly

Shiyo

मी त्यांना बोलावतोय. परंतु ते काजवे क्षणभर चमकून अंधारात नाहीसे होतात.

Come come! I Call But the fireflies Flash away Into the darkness

Onitsura

गवताच्या पात्यावर अडखळलेला काजवा पुन्हा उंच उडू लागतो,तेव्हा-

Having tumbled off His grass-blade.. The firefly Buzzes up again

-Basho

काळोखात चमकत असलेला काजवा क्षणभर निघून गेला.तेव्हा जाणवलं,की अंधारातले एकटेपण कसं असतं :

For that brief moment When the firefly Went out... 0 The lonely darkness

-Hokushi

अशीच ही एक अप्रतिम काव्यरचना आहे.तिन्हीसांजा ती तांदूळ धूत होती.तिचं सुहास्य वदन काजव्याच्या प्रकाशात क्षणभर उजळलं (तिला प्रियकराची आठवण झाली होती,की ती तिची सवयच होती?)

As she washes rice, Her smiling face Is briefly Lit by firefly

सोनेरी काजवा,लहान विव्याची ज्योत आणि माणसाचा थंड स्पर्श यांविषयी पहा :

Yellow firefly... Little lamp flame That to the Human touch is chill

-Shiki

शिकाऱ्यापासून दूर उडत जाणाऱ्या काजव्यानं सायंकाळच्या चंद्रप्रकाशात आसरा घेतला :

Fleeing the hunter The firefly Took cover... The evening moon

-Ryota

खाली दिलेली दोन मृत्युगीतं पहा.जीवन किती क्षणभंगुर आहे,आता ते प्रकाशत होतं आणि क्षणातच विझून गेलं काजव्यासारखं :

Suddenly you light And as suddenly Go dark... Fellow-firefly

-Chine-jo

बहिणीच्या हातावर लहान भावाचं तिन्हीसांजा प्राणोत्क्रमण झालं एखाद्या काजव्याप्रमाणं :

Pitiful... on my Outstreched palm At dust dies The tittle firefly

-Kyorai

काजव्यांचं काव्यमय वर्णन करण्यात जपानी कवींनी जी गरुडभरारी मारली आहे,तिथपर्यंत जगातील इतर साहित्यिकांना झेप घेता आलेली नाही.

अगोदर मी काजव्यांच्या काव्यप्रकाशाचा आनंदानुभव घेतला.नंतर त्यांच्या वास्तविक जीवनाकडं जिज्ञासेमुळं वळलो.परंतु असं करताना त्यांच्या जीवनक्रमाबद्दल कौतुकमिश्रित आश्चर्यच वाटलं,काजव्यांना स्वतःचा प्रकाश आहे.मादीच्याशरीररचनेत प्रकाशाच्या ग्रंथी असतात.त्या ग्रंथींचा प्रकाश त्यांच्या विविध जातींप्रमाणं वेगवेगळा असतो.या चमकीमुळं मादीला आपल्या नराची ओळख पटते.वर्षभर क्वचितच दिसणारे काजवे पहिला पाऊस पडताच गवतातून बाहेर पडून लुकलुकू लागतात,तेव्हा नर-मादीचा समागम होतो.काजव्याच्या प्रकाश देणाऱ्या अवयवांच्या पेशींत ल्युसिफेरिन नावाचं द्रव्य असतं. दिव्याच्या ज्योतीचा जसा चटका लागतो,तसं काजव्याच्या प्रकाशाचं होत नाही.कारण त्यात उष्णता नसते.त्याचा प्रकाश थंड असतो.

★★★ समाप्त ★★★