* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: टॉर्कीमीडा व पवित्र ‘इन्क्विझिशन’ न्यायसंस्था Torquemada and the “Holy” Inquisition

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

8/26/26

टॉर्कीमीडा व पवित्र ‘इन्क्विझिशन’ न्यायसंस्था Torquemada and the “Holy” Inquisition

मूळ ग्रंथ : मानवजातीची कथा — हेन्री थॉमस

अनुवाद : साने गुरुजी
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन


भाग १ : इन्क्विझिशनच्या पार्श्वभूमीचा इतिहास

इन्क्विझिशन या संस्थेविषयी मी कदाचित पूर्वग्रहदूषित होऊन लिहीत आहे, असे कोणास वाटू नये म्हणून तिचे वर्णन मी तिच्या समर्थकांच्याच शब्दांत देणार आहे. या प्रकरणासाठी गोळा केलेली सारी माहिती रोमन कॅथॉलिक पुस्तकातून घेतली आहे. ज्यांनी ही संस्था सुरू केली, ज्यांनी तिचे भूतकाळात समर्थन केले व जे आजही एक ‘थिअरी’ किंवा ‘सिद्धांत’ म्हणून तिचे मंडन करू पाहत असतात, अशांच्याच दृष्टीतून मी या ‘इन्क्विझिशन’ संस्थेकडे पाहणार आहे.

ते पहिले आरंभीचे ख्रिश्चन लोक ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार हरएक अत्याचाराच्या विरुद्ध होते. टरटूलियन म्हणे, “ख्रिश्चनांना लष्करात नोकरी करण्याचा हक्क नाही. धर्माची सक्ती करणे हे कोणत्याही धर्माचे काम नाही. धर्माचा स्वीकार मोकळेपणाने केला जावा. तो कधीही लादला जाऊ नये.”

ओरिजेन व लॅक्टॅन्टियस यांचीही मते अशीच होती. लॅक्टॅन्टियस लिहितो, “धर्म बळजबरीने लादता येणार नाही. अत्याचाराचे समर्थन कधीही करता येणार नाही.”

पण चौथ्या शतकात ख्रिश्चनांचा हृदयपालट होऊ लागला. ऑगस्टाइन म्हणे की, काही बाबतीत धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यास ठार मारणे योग्य आहे. ऑप्टेटस तर “जे जे नास्तिक असतील, त्या साऱ्यांना ठार मारलेच पाहिजे,” असे उघड उघड म्हणे. ऑगस्टाइन व ऑप्टेटस आज संत मानले जातात.

चौथ्या शतकापासून पुढे ख्रिश्चनांची सदय व सहिष्णू हृदये अदय व दुष्ट होऊ लागली आणि परधर्मीयांचा, म्हणजे ख्रिश्चन धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांचा, छळ करायचा हे जणू ठरूनच गेले.

पण अकराव्या शतकापर्यंत खरा ख्रिश्चनपणा थोडा तरी शिल्लक होता; त्यानंतर मात्र ख्रिश्चन साधुता जणू पुरी लोप पावली! परधर्मीय किंवा अधिकृत रोमन कॅथॉलिक धर्मावर विश्वास न ठेवणारे यांची सर्रास होळी होऊ लागली. अशांचे प्रचंड प्रमाणावर भस्म होऊ लागले.

बाराव्या शतकात ही जिवंत जाळण्याची प्रथा अधिकच बळावली. लोकांना ही दुष्टता आवडू लागली. ११४० साली ग्रॅशियन याने असे आज्ञापत्र काढले की, नास्तिकता हा मरणार्ह गुन्हा आहे. क्रूसेडर्सना सांगण्यात आले की, जिथे जिथे परधर्मी दिसेल, तिथे तिथे त्याला ठार करा.

कॅथॉलिक इतिहासकार व्हॅकॅन्दार्ड लिहितो, “हे कत्तलीचे काम जे जे करीत त्यांना पोप क्षमापत्रे देत असे.”

तेरावे शतक तर ख्रिश्चन इतिहासकार, विशेषतः कॅथॉलिक इतिहासकार, फारच मोठे मानतात. अशा या महत्तम शतकातच पोप तिसरा इनोसन्ट झाला. त्याने बिशपांना आज्ञापत्र लिहिले, “जे जे रोमन कॅथॉलिक धर्म मानणार नाहीत, त्या सर्वांना बहिष्कृत करा. ‘या धर्मबहिष्कृततेच्या नरकात पडाल’ अशा शापाच्या आध्यात्मिक तलवारीने न भागले, तर खरी भौतिक तलवार उपसून तिचा उपयोग करा.”

१२०९ साली बेझेरिस येथे मोठी कत्तल झाली. कत्तल करणाऱ्यांनी अॅबट आर्नोल्ड याला विचारले, “हा रोमन कॅथॉलिक आहे की नाही हे आम्ही ओळखावे कसे?”

तो म्हणाला, “साऱ्यांचीच कत्तल करा. कोण कोणत्या धर्माचा हे देव पाहून घेईल.”

सहाव्या क्रूसेडचा नेता राजा दुसरा फ्रेडरिक होता. तो वरील अॅबटपेक्षा जरा सौम्य होता. त्याने आपल्या धार्मिक अनुयायांना सांगितले, “परधर्मीयांना जिवंत नका जाळू. फक्त त्यांच्या जिभा छाटा, उपटा.”


इन्क्विझिशनचा उदय

पण इन्क्विझिशन नामक जी प्रसिद्ध छळणारी न्यायसंस्था स्थापली गेली, तिचे सारे श्रेय पोप नववा ग्रेगरी याला आहे. १२३१ साली त्याने असा कायदा केला की, जे जे हट्टी विधर्मी असतील, त्यांना ठार मारलेच पाहिजे.

आपल्या नास्तिकपणाचा पश्चात्ताप होऊन जे कॅथॉलिक होतील त्यांना सोडून द्यावे, म्हणजे ठार मारू नये; पण जन्मभर तुरुंगात मात्र ठेवावे.

ग्रेगरीने आपल्या हाताखालच्या बिशप वगैरे सर्वांना पटवून दिले की, नास्तिकांना जिवंत जाळणे हे मुख्यतम कर्तव्य आहे. बिशपांनी या कर्तव्यात कला ओतली. या कर्तव्यात ते परम आनंद मानू लागले.

केवळ एका व्हेरोना शहरात एका महिन्यात त्यांनी साठ माणसे जिवंत जाळली!

बिशपांना असे कळविण्यात आले की, परधर्मी कोण, कॅथॉलिक मताचे कोण नाहीत, हे हुडकून काढण्यासाठी त्यांनी बातमीदार नेमावे. सामान्य कॅथॉलिकांपेक्षा ज्यांची-ज्यांची राहणी निराळी असे, त्यांच्या मरणयाद्या होऊ लागल्या.

याद्या आल्या म्हणजे बिशप त्यांची छाननी करून ज्यांना शिक्षा देणे योग्य त्यांना शिक्षा देत. जे बिशप भरपूर प्रमाणात नास्तिकांना जाळीत नसत, त्यांना पोप पदच्युत करी. कमीतकमी इतके तरी जाळले गेलेच पाहिजेत, असे ठरवून दिले जाई.

बिशपांनी या नास्तिकांना जरा दया दाखविली, तर त्यांच्यावरच नास्तिकपणाचा आरोप लादला जाऊन त्यांना तुरुंगात टाकण्यात येई.

अशा रीतीने पोप आपला नरमेध तेज राखी आणि ईश्वराचे वैभव वाढवी. ईश्वराचे वैभव वाढविता-वाढविता तो स्वतःही कुबेर बने. कारण जो जो जाळला जाई त्याची त्याची मालमत्ता चर्चच्या ताब्यात येई.

पण बिशप कितीही धर्मोत्कट असले, तरी ते पोपचे समाधान होण्याइतके रक्तपिपासू नव्हते. तद्वतच ते या वधकर्मात तितके वाकबगारही नव्हते.

ख्रिश्चनधर्मी युरोपातील सर्व पाप नाहीसे करण्यासाठी, सारे परधर्मीय निवडून त्यांचे निर्मूलन करण्यासाठी चांगले शिक्षण दिलेले गुप्त पोलिसांचे सैन्य उभारण्याची जरुरी होती. म्हणून पोपने डोमिनिक पंथीयांची मदत मागितली.

संत डॉमिनिक तलवारीने बाप्तिस्मा देण्याच्या मताचा अध्वर्यू; याचे अनुयायी कसे असतील हे सांगण्याची जरुरीच नाही. या डोमिनिक पंथीयांस धार्मिक दुष्टतेचे नीट शिक्षण देण्यात येत असे.

पोपने या शिक्षणाचा उपयोग करून घेण्याचे ठरविले आणि ‘इन्क्विझिशन’ नावाची अत्यंत प्रभावी व फायदेशीर संस्था उभी केली.

ग्रेगरीने डोमिनिकांना लिहिलेल्या पत्रांत त्यांच्या कर्तव्यांविषयी असा उल्लेख आहे—

“एखाद्या शहरात तुम्ही गेला म्हणजे तेथील बिशप, व क्लर्जी व लोक यांस एकत्र बोलवा; व त्यांना धर्मश्रद्धेवर एक गंभीर प्रवचन ऐकवा. नंतर तुमच्या न्यायासनासमोर आणल्या जाणाऱ्या संशयास्पद नास्तिकांची चौकशी करण्याच्या कामी शहरातील प्रतिष्ठितांचे साह्य घ्या.

चौकशीअंती अपराधी ठरतील त्यांना सांगा, ‘अतःपर चर्चची आज्ञा संपूर्णपणे बिनतक्रार मानली पाहिजे.’ जर ते नाकारतील, तर त्यांना योग्य ती शिक्षा द्या.”


इन्क्विझिशनच्या विरोधात उभे राहिलेले लोक

जे कॅथॉलिक धर्माचे नव्हते, जे पोपला नास्तिक वाटत, त्यांच्याविरुद्ध पोप इतका का उठला होता?

एक गोष्ट म्हणजे नास्तिकांना, कॅथॉलिक धर्म न मानणाऱ्यांना, पोपचे ते वैभव व त्याचा तो डामडौल पसंत नसे.

मध्ययुगातील ते ख्रिश्चन जणू समाजवादी होते! ते जणू तात्त्विक अराजकवादी होते! टॉलस्टॉय व इमर्सन यांचे जणू ते पूर्वदूत वा आध्यात्मिक पूर्वजच होते!

मध्ययुगात अशा लोकांचे नाना संघ होते व त्या सर्वांना एक गोष्ट समान होती; ख्रिस्ताच्या अहिंसक वृत्तीवर श्रद्धा.

धर्मोपदेशक व भटभिक्षुक यांची मयूरी त्यांना खपत नसे. ते म्हणत—

“ख्रिस्ताला जगात डोके टेकायला घरही नव्हते; पण हे पोप तर राजवाड्यात राहतात! ख्रिस्त ऐहिक सत्ता व संपत्ती तुच्छ मानी, तर हे पोप सत्तालोलुप आहेत! मानसन्मान व धनदौलत यांच्यासाठी हपापलेल्या या रोमन कॅथॉलिक धर्मगुरूत व ख्रिस्तात थोडे तरी साम्य आहे का?”

पुढच्या काळातील केकरांप्रमाणे हे कॅथॉलिक नसलेले लोक जोरजुलूमाच्या, तद्वतच द्वेष, देहान्त शासन, युद्धे यांच्याही विरुद्ध प्रचार करीत.

इतिहासकार व्हॅकॅन्दार्ड लिहितो—

“या लोकांच्या अशा क्रांतिकारक विचारसरणीमुळे ते केवळ कॅथॉलिक पंथाविरुद्ध होते; इतकेच नव्हे, तर देशद्रोही व समाजद्रोहीही होते. आणि या अशा शांतिदूतांना, या धोकेबाज लोकांना ठार मारण्यात चर्चची केवळ आत्मरक्षणाचीच दृष्टी होती. अशा लोकांच्या विचारांना वाटेल ती किंमत देऊन पायबंद घालणे जरूर होते.”

पण काय, हजारोंच्या प्राणांची किंमत?

‘होय’, हे इतिहासकार म्हणतात; व हे मत एखाद्या मध्ययुगीन धर्मोपदेशकाचे नसून अर्वाचीन काळातील कॅथॉलिक इतिहासकाराचे आहे, हे पाहून जरा गंमत वाटते.

इन्क्विझिशनची वृत्ती काही ठिकाणी अद्यापि जिवंत आहे तर एकूण!