* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१३/१/२६

राष्ट्रनिर्मात्या माँसाहेब जिजाऊ /Nation builder Maasaheb Jijau

महाराष्ट्र ही शूर वीरांची व संतांची भूमी आहे.अनेक शूरवीर या भूमीत होऊन गेले.यामध्ये छत्रपती शिवरायांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते.छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत एक आदर्श राज्य उभा केले.जे राज्य मध्ययुगीन कालखंडातील सरमंजामशाही संपुष्टात आणून रयतेचे लोककल्याणकारी राज्य निर्माण करणारे ठरले. 


जगामध्ये अनेक राजे होऊन गेले.परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आजही लोकांच्या काळजावर कोरले आहे.त्या पाठीमागे त्यांना प्राप्त झालेली शिकवण व संस्कार हे माँसाहेब जिजाऊंचे होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी शहाजीराजे व माँसाहेब जिजाऊ यांनी केली.म्हणून जिजामाता ह्या केवळ आदर्श पत्नीच नाही तर जगातील आदर्श माता ठरल्या.

आदर्श माता ते राष्ट्रनिर्मात्या हा त्यांचा प्रवास समस्त स्त्री जातीसाठी प्रेरक व आदर्शवत ठरतो. 


जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा येथे आई म्हाळसाराणी व वडील लखुजीराजे जाधव यांच्या पोटी झाला.लखुजीराजे सिंदखेड राजा येथील जांगीरदार होते.

महाराष्ट्रातील बलशाली व पराक्रमी सरदार म्हणून त्यांची ओळख होती.लखुजी जाधव यांना चार मुल व एक कन्या होती. जिजाऊ एकुलती एक असल्याने त्यांचे लाड लहानपणापासूनच झाले.एकुलती एक लाडाची लेक म्हणून जिजाऊ वाढू लागल्या.परंतु लखुजीराजे यांनी त्यांच्या शिक्षणाकडे बारकाईने लक्ष दिले.त्यांना युद्ध शिक्षण,राजनीति,तत्त्वज्ञान यासारख्या विषयाचे शिक्षण दिले.विविध भाषांमध्ये त्यांना पारंगत केले.आईने संस्कार दिले.हा सर्व माहेरचा वारसा घेऊन जिजाऊ सन १६१० मध्ये वेरूळ येथे आपल्या सासरी आल्या. वेरूळचे भोसले घराणे पराक्रमी व लोकप्रिय होते. मालोजी राजे यांचे सुपुत्र शहाजीराजे यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला.

 

विचार व आचाराने परिपूर्ण असलेल्या जिजाऊ यांना समंजस,

पराक्रमी,विलक्षण बुद्धिमत्ता असणाऱ्या शहाजीराजांची साथ लाभली.शहाजीराजे व जिजाऊ यांचे स्वभाव एकरूप झाले.

शहाजीराजांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा संकल्प  जिजाऊंनी केला.तो संकल्प होता स्वराज्य निर्मिती.....


 शहाजी राजांचा कारभार वाढत होता.त्यांना कधी आदिलशाही कधी निजामशाही स्वीकारावी लागत होती.परंतु जिजाऊंना शहाजीराजे यांनी पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते.दोघांच्या विचार मंथनातून स्वराज्य नावाचे अमृत या महाराष्ट्राच्या मातीत वर आले. शहाजीराजांनी जिजाऊंना त्यांच्या मनातील स्वराज्य उभारणीची प्रेरणा दिली.त्यांना युद्धनीतीतले बारकावे समजावले.महाराष्ट्राचा इतिहास व सह्याद्रीचा भूगोल शिकवला. 

 

जिजाऊ यांना महाराष्ट्रातील आदिलशाही निजामशाही यांचा होणारा अन्याय स्वस्त बसू देत नव्हता.रयतेची होणारी फरफट सहन होत नव्हती.स्त्रियांवर होणारा अत्याचार व शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक अस्वस्थ करत होती.मराठा सरदारांमध्ये वर्चस्वावरून स्पर्धा लागली होती.एकमेकांच्या विरोधात कटकारस्थान व लढण्यामध्ये धन्य मानत होते.जिजाऊंना या सर्वांना एकत्र आणायचे होते. 


जिजाऊंनी आपल्या आयुष्यात संकटावर संकट पाहिली.परंतु त्या संकटाला कधी घाबरल्या नाहीत. भोसले व जाधव घराण्याचे वैर त्यांनी पाहिले.स्वतःचा भाऊ दत्ताजी व चुलत दीर संभाजी यांना गमवावे लागले.सन १६२९ मध्ये वडील व तीन भाऊ यांची दौलताबाद किल्ल्यात निजामाने घडलेली हत्या मनाला भेदणारी होती.माहेरची सर्व कर्ते पुरुष गमावले.एवढा मोठा प्रचंड आघात त्यांनी संयमाने सहन करत त्यातून मार्ग काढला.आपला थोरला पुत्र संभाजी याला युद्धात गमवावे लागले.असे अनेक आघात सहन केले परंतु रयतेविषयीची तळमळ व प्रेम कधीच कमी होऊ दिले नाही.आपल्या मनातील स्वराज्याचा संकल्प याचा कधीच विसर पडू दिला नाही.या सर्वावर मात करण्यासाठी त्यांनी स्वतःला सावरले.खरंच प्रत्येक स्त्रीने जिजाऊ यांचा हा प्रेरणादायी इतिहास वाचला पाहिजे. 


१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर माँसाहेब जिजाऊ व शहाजीराजे यांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला.बाल वयातच माँसाहेब जिजाऊ यांनी शिवबावर संस्कार घातले.त्यांचे व्यक्तिमत्व सुसंस्कृत बनवले.पराक्रम, शौर्य, स्वाभिमान, आत्मविश्वास,निर्भीडपणा,न्यायवृत्ती हे गुण त्यांच्यात रुजवले.बाल वयातच त्यांच्या मनामध्ये समाजाप्रति कळवळ,रयते विषयी तळमळ,अठरापगड जातीतील मुलांसोबत जिव्हाळा,धर्म संविष्णुतेची भावना निर्माण केली. 

      

आई म्हणून भूमिका निभावत असताना माँसाहेब जिजाऊ यांनी आपलं मूल समाजाचं कसं होईल यावर भर दिला.मातेबरोबर मातीचे रक्षण करायला शिकवलं. श्रीमंतीचा अहंकार,सत्तेची मस्ती त्यांच्याजवळ फिरकू दिली नाही.मध्ययुगीन कालखंडात महिलांच्या बाबतीत सत्ताधीशांसाठी कोणतेच कायदे नसताना माँसाहेब जिजाऊंनी मात्र शिवरायांचे व्यक्तिमत्व चारित्र्यसंपन्न बनवले.म्हणूनच भविष्यात शिवरायांची ओळख स्त्रियांचा सन्मान करणारा राजा म्हणून निर्माण झाली. 


व्यसनाधिनतेचा लवलेशही लागू दिला नाही.एक आदर्श पुत्र असे शिवरायांचे व्यक्तिमत्व घडवलं. 


शहाजीराजांनी सन १६४० च्या दरम्यान कर्नाटकातील बेंगलोर येथे माँसाहेब जिजाऊ व बाल शिवबांना बोलावून घेतले.तेथे शहाजीराजे व जिजाऊ यांनी शिवबांना युद्धनीती,धर्मशास्त्र,

राजनीति,न्यायशास्त्र, अर्थशास्त्र याचे ज्ञान दिले.विविध भाषांमध्ये पारंगत केले.उद्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा राजा पराक्रमी व सुसंस्कृत आई-वडिलांच्या छायेखाली घडत होता. 


कवी परमानंद म्हणतो की,जिजाऊ अमर्याद गुणांनी युक्त होत्या.त्या विजयवर्धिनी होत्या.म्हणजेच त्या स्वराज्याच्या प्रेरक होत्या.त्यांनी आपल्या ठायी असलेले शील,सत्यप्रियता,

वाक्चातुर्य,गांभीर्य,दक्षता,जागृती, मनोधैर्य,निर्भयता,शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा स्वराज्यस्वप्न इत्यादी प्रकारच्या सर्व गुणांची संपदा शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वात जाणीवपूर्वक संक्रान्त केली.

 

बेंगलोर येथे संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यावर शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांना पुणे सुपे जहागिरीसाठी पुण्याकडे पाठवले.

पाठवत असताना राजमुद्रा,विश्वासू माणसे,मोजके सैन्य देऊन पाठवले.आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याने बेचिराख केलेले पुणे पुन्हा वसवण्यासाठी व स्वराज्याची मुहूर्त मिळवण्यासाठी माँसाहेब जिजाऊ शिवरायांना घेऊन पुण्यात दाखल झाल्या. 


बाल शिवबांच्या हातात सोन्याचा नांगर देऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.अपशकुनाची पार फेकून महाराष्ट्राच्या मातीतून अंधश्रद्धेला मुठमाती दिली. वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून रयतेचे हित जपणारे राज्य शिवरायांच्या रूपाने उभा केले. 


 लोककल्याणकारी राजासाठी आवश्यक असणारे सर्व गुण शिवरायांमध्ये निर्माण केले.एका राष्ट्रासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी राजा,मंत्रिमंडळ, खजिना,भूप्रदेश,सैन्य,किल्ले,राजमुद्रा,न्यायिक कायदे व ध्वज शिवरायांच्या हाती देऊन जगाला आदर्शवत ठरेल असे लोक कल्याणकारी राज्य निर्माण केले.

सार्वभौम राष्ट्राची सर्व मूल्य रुजवली. ६ जून १६७४ रोजी रायगडाच्या माथ्यावर ३२ मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर रयतेचा राजा बसवला.जो न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष,

संवेवेदनशील मनाचा, स्त्रियांचा सन्मान करणारा व शेतकऱ्यांना उभा करणारा राजा होता. 


 सर्व जाती-धर्मांच्या लोकांसाठी एक विहीर खुली करून सामाजिक समतेचा विचार पेरला.शेतकऱ्यांना स्वतःच्या खाजगी खर्चातून मदत करून उभा करण्याचे काम केले.शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह लावून त्यांना आधार दिला.मध्ययुगातल पहिल सहकार जिजाऊंनी निर्माण केले.


 छत्रपती शिवरायांच स्वराज्य सुरळीत सुरू झाल्याचे पाहिल्यानंतर माँसाहेब जिजाऊ यांनी १७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे या जगाचा निरोप घेतला.एक आदर्शमाता ते राष्ट्रनिर्मात्या असा प्रवास करणाऱ्या माँसाहेब  जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.....!


आदर्शमाता ते राष्ट्रनिर्मात्या माँसाहेब जिजाऊ

हा लेख दैनिक गोदातीर मधून प्रसिद्ध झाला आहे. 


 लेखक - सुभाष बाबाराव ढगे चाटोरीकर सहशिक्षक,बाल विद्यामंदिर हायस्कूल,परभणी 


महत्वाची नोंद - ६ जून १६७४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.या दिवशी

सूर्य नगारखान्याच्या कमानीतून उगवला होता आणि त्याचे पहिले किरण सिंहासनावर पडले होते.मध्यान्हाच्या वेळी सूर्य सरळ सिंहासनाच्या चौथऱ्यावर सूर्य येणार होता.

असे भौगोलिक महत्व लक्षात घेऊनच ६ जून १६७४ ही तारीख ठरवण्यात आली असावी असे वाटते.त्या दिवशीचा सूर्याचा मार्ग समजून घेण्यासाठी  solar path app च्या मदतीने आजही शोधून काढता येते.


-मिलिंद पराडकर (दुर्ग अभ्यासक) 


माधव गव्हाणे यांनी दिलेली ही अधिकची माहिती…


लोकांचे निस्वार्थी वाचणावर व माझ्यावरील प्रेम..


मॅट्रिक फेल विजयीजी, आपणास जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

शुभेच्छा जरी उशिरा आल्या तरी चालतील,

कारण विजय हा वेळेवर नाही तो नेहमी मनात असतो..

मनातील त्या विजयाच्या निर्धारातूनच आम्ही अहमदपूर ते अयोध्या

१२९० किमी सायकल प्रवास सहज पूर्ण केला.

कारण आमच्या मनात होते 

विजयाचे विचार विजयीजींची प्रेरणा!

आपण मित्रांना केवळ साथ दिली नाही, तर विचारांनी जगण्याची नवी दिशा दिलीत.त्या विजयाच्या विचारांना सोबत घेऊन

आम्ही अयोध्या गाठली 

हेच आपल्या संस्कारांचे फळ आहे.वाचनाची आवड, चिंतनशील वृत्ती

आणि सकारात्मक विचारांची लाट

या जगात अधिकाधिक पसरावी, हीच प्रभूचरणी प्रार्थना!अशा महान विचारांच्या व्यक्तिमत्त्वास

पुन्हा एकदा मनःपूर्वक

जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!


आपला मित्र,

बरूरे सर

अहमदपूर, जि. लातूर


साहेब,प्रथमता वाढदिवसाच्या शुभेच्छा धकाधकीच्या आणि घाईगडबडीच्या जीवनात मेंढरा सारखं पळत सुटलो आहे.त्यामुळे आपल्यासारख्या एका महान माणसाचा जन्मदिवस विस्मरणात गेला चुकीला माफी असावी.


या जन्मदिनी मयान ला खूप सारे आशीर्वाद व त्याच्या बाबाला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक अनेक अनेक शुभेच्छा.Sorry for late


गणेश खंदारे,परभणी 


आदरणीय विजय दादा गायकवाड कोल्हापूर यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..


   काही माणंस काळजात घर करून जातात परंतु काही माणंस काळीजच होतात. असच व्यक्तीमत्व म्हणजे आमचे मित्र विजय दादा होय. 

   एक दहावी फेल विधार्थी ते कंपनीतील मजूर व्हाया पुस्तकाचे झाड अशी ओळख निर्माण करणारे आमचे दादा....

  आज ज्ञानाचे विद्यापीठ बनले आहेत. वाचक, लेखक, वक्ता व विचारवंत असा प्रवास हा प्रेरणादायी व आदर्शवत ठरला आहे. 

     पुस्तकांनी त्यांच व परभणीकरांच अतुट नातं निर्माण केल आहे. मनाला भावलेल अस व्यक्तीमत्व आपल्यात एकजीव कधी झाले हे कळालेच नाही.

 दादा आज आपला वाढदिवस आमच्या साठी प्रेरणादायी आहे. दादा आपले लेखन, वाचन, ज्ञान हे समाजाची प्रेरणा व्हावी ते अधिक अधिक वृद्धींगत व्हावे व आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना - सुभाष बाबाराव ढगे चाटोरीकर सहशिक्षक,बाल विद्यामंदिर हायस्कूल,परभणी 



आदरणीय विजयजी,


तुमच्या आयुष्याची प्रत्येक नवीन गोष्ट एका नवीन पुस्तकासारखी रोमांचक असो', 'तुमच्या स्वप्नांची पुस्तके लवकर पूर्ण होवोत', 'वाचनाच्या या जगात तुम्हाला नेहमी आनंद मिळो'


तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला  शुभेच्छा देताना, मला आठवतं की तुम्ही नेहमीच पुस्तकांच्या दुनियेत हरवलेला असता. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नवीन दिवस एका नव्या पुस्तकासारखा रोमांचक असो, अशी माझी इच्छा आहे.


तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप आनंद, यश आणि समाधान मिळो. तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरू दे आणि तुमच्या आयुष्यात नेहमीच एक सकारात्मक 'कथा' घडत राहो. तुमच्या चेहऱ्यावरील हास्य असेच कायम राहो आणि तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक नवीन पुस्तकासोबत तुमचा आनंद वाढत राहो.पुस्तकांच्या या जगात तुम्हाला नेहमीच नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळो,हीच सदिच्छा!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुमचा स्नेहांकित, 

सुनील घायाळ (होशिंग) आणि परिवार 


शब्दांशी प्रामाणिक राहिलेला माणूस

— विजय गायकवाड साहेब 


जगात खूप लोक शिकवतात,

पण फार थोडे लोक जगणं शिकवतात…

विजय गायकवाड साहेब हे त्यातलेच एक.


त्यांनी कधी मोठेपणाचा दिखावा केला नाही,

कधी अपयशाची लाज बाळगली नाही,

आणि कधीही शब्दांशी अप्रामाणिकपणा केला नाही.

म्हणूनच त्यांच्या लेखनात दिखावा नसतो,

असतो तो फक्त अनुभवांचा प्रामाणिक ठेवा.


विजय साहेब म्हणजे पद, प्रतिष्ठा किंवा शिक्षणाची मिरवणूक नव्हे,

तर संघर्षातून घडलेलं खरं व्यक्तिमत्त्व.

"मॅट्रिक फेल" हा समाजाने लावलेला शिक्का

त्यांनी आपल्या लेखणीने कधीच स्वीकारला नाही,

उलट त्याच शिक्क्याला

शब्दांच्या ताकदीने अर्थपूर्ण करून दाखवलं.


www.vijaygaikwad.com

ही केवळ एक वेबसाईट नाही,

ती कधीही न संपणारी एक वही आहे…

ज्यात वेदना आहेत,

अनुभव आहेत,

सामान्य माणसाचं जगणं आहे

आणि आयुष्यावरचा नितांत विश्वास आहे.


रात्री न झोपता लिहिलेल्या ओळी,

मनात साठवलेली सत्य कथा,

आणि "एक जरी वाचक मिळाला तरी मी लिहित राहीन"

हा ठाम निर्धार —

यातूनच आज

६० हजारांहून अधिक वाचक,

२३९ भाषा

आणि २० पेक्षा अधिक देशांपर्यंत

त्यांचं लेखन सन्मानाने पोहोचलं आहे.


विजय साहेबांचं लिखाण

कुणाला शहाणपण शिकवत नाही,

कुणावर बोट दाखवत नाही…

ते फक्त एवढंच सांगतं —

"मी तुझ्यासारखाच आहे."


म्हणूनच त्यांच्या लेखनात

वाचक स्वतःला पाहतो,

स्वतःचं दुःख ओळखतो

आणि हळूहळू सावरायला शिकतो.


आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त

फक्त शुभेच्छा देणं पुरेसं नाही,

तर त्यांच्या लिहित्या प्रवासाला सलाम करणं

हीच खरी भावना आहे.


 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा विजय गायकवाड साहेब!

तुमचं लिखाण असंच अखंड सुरू राहो,

तुमच्या शब्दांना नेहमी वाचक मिळत राहोत,

आणि तुमचं आयुष्य

तुमच्या लेखनासारखंच

साधं, खरं आणि माणूसपणानं भरलेलं राहो.


🔍 जरूर भेट द्या .. www.vijaygaikwad.com

जिथे शब्द थांबत नाहीत… आणि माणूसपण जिवंत राहतं. 


— आपला

विष्णू गाडेकर



    

१२/१/२६

तुमच्यासोबत जग आहे.The world is with you.

उन्हाळ्यात मी बरेचदा मेन नदीवर मासे पकडायला जात असे.व्यक्तिशः मला स्ट्रॉबेरी आणि क्रीम फार आवडते.पण मला असे आढळून आले आहे की कुठल्यातरी अजब कारणासाठी माशांना किडे आवडतात.म्हणून मी जेव्हा मासे पकडायला जातो तेव्हा तेव्हा मला काय आवडते यावर मी विचार करत नाही.मी गळाला स्ट्रॉबेरी आणि क्रीमचे आमिष लावत नाही.त्याऐवजी मी माशासमोर आळी लटकावून विचारतो,"तुला हे खायला आवडेल ना?"


तर मग लोकांना आकर्षित करायला आम्हीसुद्धा हाच कॉमनसेन्स वापरून,प्रयोग का नाही करून पाहत ?


ग्रेट ब्रिटनचे प्रधानमंत्री लॉईड जॉर्ज यांनी पहिल्या महायुध्दात हेच केले.जेव्हा कुणीतरी विचारले की युध्दकाळातील अन्य नेते - विल्सन,ऑरलैंडो आणि क्लीमेंचू या सर्वांचे लोकांना विस्मरण झाले,पण जॉर्ज कसे काय सत्तेत टिकून राहिले? तेव्हा त्यांनी छान उत्तर दिले.त्यांचे उत्तर होते,माशाला कुठल्या प्रकारचं आमिष दाखवून गळाला लावायचे हे त्यांनी शिकून घेतले होते.


आम्हाला काय आवडते या बाबतीत बोलून काय फायदा? हा तर बालिशपणा आहे.मूर्खपणा आहे. तुम्हाला जे आवडते त्यात तुम्हाला रस आहे,हे तर उघडच आहे.अगदी गहरी आणि जबरदस्त रूची आहे. परंतु इतरांना त्यात रूची नाहीए.आम्ही सर्वच स्वतःमध्येच रस घेतो.म्हणून या जगात लोकांना प्रभावित करण्याचा एकमेव उपाय म्हणजे तुम्ही समोरच्या माणसाच्या आवडीप्रमाणे बोला आणि हे सांगा की तो आपल्या इच्छा कशा त-हेने पूर्ण करू शकतो. ( जो हे करू शकतो त्याच्याबरोबर जग आहे जो हे करू शकणार नाही तो एकटा पडेल." मित्र जोडा आणि प्रभावशाली बना डेल कार्नेगी,मंजुल प्रकाशन )


जर तुम्ही उद्या कुणाकडून काम करवून घेऊ पाहाल,तर ही गोष्ट ध्यानात ठेवा.उदाहरणार्थ,जर तुम्हाला तुमच्या मुलांनी सिगरेट पिणे सोडावे असे वाटत असेल तर तुम्ही त्यांना रागावू नका,त्यांना भाषण देऊ नका आणि तुम्हाला काय हवे आहे हेसुद्धा सांगू नका.याऐवजी त्यांना हे समजवा,की जर ते सिगरेट ओढतील तर ते कधी बास्केटबॉल टीममध्ये सामील होऊ शकणार नाहीत किंवा अ‍ॅथलेटिक्समध्ये कप जिंकू शकणार नाहीत.


तुम्ही तुमच्या मुलांबरोबर व्यवहार करीत असाल किंवा गुरांशी किंवा अगदी चिंपांझीशी,तरी तुम्हाला ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे.उदाहरणार्थ,एक दिवस राल्फ वॉल्डो इमर्सन आणि त्यांचा मुलगा एका पिल्लाला तबेल्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते.परंतु त्यांनी स्वतःच्याच मनाप्रमाणे विचार करण्याची नेहमीची चूक केली.इमर्सन पिलाला धक्का मारत होते आणि मुलगा खेचत होता.पण पिल्लू तेच करीत होते जे ते लोक करीत होते.तोसुद्धा केवळ आपल्या मनाप्रमाणेच वागत होता.म्हणून त्याने आपले पाय ठामपणे जमिनीवर रोवले होते आणि मैदान सोडून तबेल्याकडे जायला तो राजी झाला नाही.त्यांच्या आयरिश सेविकेने हे दृश्य बघितले.तिला निबंध आणि पुस्तके तर लिहिता येत नव्हती,परंतु निदान या प्रसंगात तरी तिच्याकडे इमर्सनपेक्षा जास्त कॉमन सेन्स होता. तिने असा विचार केला की पिल्लाला काय हवे आहे, म्हणून तिने आपले बोट पिल्लाच्या तोंडात ठेवले.पिल्लू ते बोट मजेत चोखू लागलं व तिच्या मागोमाग तबेल्यात चालू लागलं.जेव्हापासून तुमचा जन्म झाला आहे तेव्हापासून तुम्ही जे काही केले आहे ते यासाठी केलेय,की तुम्हाला काही ना काही तरी प्राप्त करायचे आहे.तुम्ही रेडक्रॉसला जी वर्गणी दिली होती तीसुद्धा या नियमाला अपवाद नाही आहे. तुम्ही वर्गणी यासाठी दिलीत,कारण तुम्हाला लोकांना मदत करायची होती,तुम्ही एक सुंदर, निःस्वार्थ,दैवी कार्य करू इच्छित होतात.


इतरांना मदत करण्याची तुमच्या मनातली इच्छा तुमच्या पैशाच्या लालसेपेक्षा जास्त नसती तर तुम्ही हे केले नसते.असेही होऊ शकते की तुम्ही ही वर्गणी यासाठी दिली असेल कारण तुम्हाला लाज वाटत असेल किंवा एखाद्या ग्राहकाने तुम्हाला असे करायला म्हटले असेल. पण एक गोष्ट तर नक्की आहे.तुम्ही रेडक्रॉसला दान दिले कारण तुम्हाला काहीतरी हवे आहे.


इन्फ्लुएन्सिंग ह्युमन बिहेवियर या सुप्रसिद्ध पुस्तकात हेन्री ए.ओव्हरस्ट्रीटने लिहिले आहे :'कर्म जन्माला येते ते माणसाच्या मूलभूत इच्छेमुळे.व्यवसाय,घर,शाळा आणि राजनीतीमध्ये दुसऱ्यांना कार्य करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या लोकांना सर्वोत्तम सल्ला हाच दिला जाऊ शकतो:सर्वांत आधी समोरच्या व्यक्तीमध्ये काम करण्याची प्रबळ इच्छा जागृत करा.जो हे करू शकतो त्याच्याबरोबर पूर्ण दुनिया आहे.जो हे नाही करू शकत, तो एकटा पडणार.'अँड्रयु कार्नेगी गरिबीत वाढलेले स्कॉटलँडचे एक किशोर होते,ज्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात दोन सेंट प्रति तासाच्या कामाने केली होती आणि नंतर त्यांनी ३६५ लक्ष डॉलर्स दान दिले.त्यांनी जीवनाच्या आरंभालाच शिकून घेतले होते,की लोकांना प्रभावित करण्याचा एकमेव उपाय समोरच्याच्या इच्छेनुसार गोष्टी करणे हाच होय.ते केवळ चार वर्षेच शाळेत गेले होते,परंतु त्यांनी हे शिकून घेतले होते की लोकांशी कसा व्यवहार करायचा.


एकदा असे झाले की त्यांची एक नातलग स्त्री आपल्या दोन मुलांबाबत खूपच त्रस्त होती.ते येलमध्ये होते आणि इतके व्यग्र होते,की त्यांना घरी पत्र लिहिण्याची फुरसतच मिळत नसे.इतकेच नव्हे तर ते आपल्या चिंतित आईच्या पत्रांना उत्तरसुद्धा लिहीत नसत. हे ऐकल्यावर कार्नेगीने शंभर डॉलर्सची शर्यत लावली की ते उलट टपालाने आपल्या पत्राचे उत्तर मागवूनच दाखवतील आणि गंमतीची गोष्ट ही आहे,की ते उत्तर द्यायचा आग्रहसुद्धा करणार नाही.जेव्हा शर्यत लागली तेव्हा कार्नेगीने आपल्या भाच्यांना एक हलकेफुलके पत्र लिहिले आणि मागून लिहिले की ते प्रत्येकाला पाच डॉलर्सची नोट पत्राबरोबर पाठवताहेत.


परंतु कार्नेगीने पत्राबरोबर नोटा पाठवण्याचे कष्ट घेतले नाहीत.

परतीच्या टपालाने त्यांच्या पत्राचे खरेच उत्तर आले,ज्यात 'प्रिय काका अँड्रयु'ला धन्यवाद दिले होते आणि तुम्हाला हे कळलेच असेल की त्यानंतर त्यांनी काय लिहिले असेल.


आपले म्हणणे खरे करण्याचे अजून एक उदाहरण क्लीव्हलँड,

ओहियोच्या स्टॅन नोव्हॅकचे आहे,ज्याने आमच्या वर्गात भाग घेतला.स्टॅन एक दिवस संध्याकाळी घरी परतले.तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा सर्वांत धाकटा मुलगा टिम दिवाणखान्यात फरशीवर बसून,हातपाय आपटत जोराने किंचाळत होता.त्याला दुसऱ्या दिवशी बालवाडीत जाणे सुरू करायचे होते आणि त्याला शाळेत मुळीच जायचे नव्हते.स्टॅनची सामान्य प्रतिक्रिया ही झाली असती की मुलाला त्याच्या खोलीत पाठवून देणे आणि त्याला कडक शब्दात सांगणे की त्याला उद्या शाळेत जायचेच आहे.त्याला शाळेत जायची तयारी करायलाच हवी.त्याच्यापाशी दुसरा उपाय नव्हता.परंतु त्या संध्याकाळी त्याला हे जाणवले,की जर असे केले तर टिम योग्य मानसिकतेसह शाळेत जाणार नाही. म्हणून स्टॅन बसून विचार करू लागला,'जर मी टिम असतो,तर मी शाळेत जायला का बरे उत्साहित असतो?' त्याने व त्याच्या पत्नीने काही अशी मजेदार वस्तुंची यादी बनवली ज्यात मुलाला रस होता; उदा.फिंगर पेटिंग,सिंगिंग,नवीन मित्र जोडणे.या विचारानुसार त्यांनी काम केलं.सगळ्यात आधी त्यांनी जेवणाच्या टेबलावर फिंगर पेटिंग करायला सुरुवात केली.यात माझी पत्नी लिल,माझा मोठा मुलगा बॉब आणि स्वतः मला,खूपच मजा येत होती.थोड्याच वेळात टिमने दारातून डोकावलं आणि काही वेळानंतर त्यांनी आम्हाला आग्रहाने म्हटलं,की आम्ही त्याला या खेळात सामील करून घ्यावं."बेटा,तुला फिंगरपेंट करणं शिकण्यासाठी आधी किंडर गार्टनला जावं लागेल." माझ्या आवाजात पूर्ण उत्साह भरून मी त्या विषयाला धरून त्याच्या भाषेत त्याला समजेल असं सांगत राहिलो,की किंडर गार्टनमध्ये जाण्यामुळे त्याला किती मजेदार गोष्टी शिकता येतील.दुसऱ्या दिवशी पहाटे मी लवकरच जागा झालो.मला वाटलं की मीच सगळ्यांत आधी उठलो आहे.पण खाली जाऊन बघितलं तर टिम लिविंग रूममधल्या खुर्चीत बसल्या बसल्याच झोपला होता. "तू इथे काय करतोएस?" मी विचारलं."मी किंडर गार्टनमध्ये जायची वाट बघतोय.उगीचच उशीर व्हायला नको." हे त्याचं उत्तर होतं.आमच्या पूर्ण कुटुंबाच्या सहकार्यामुळे टिममध्ये जी प्रबळ इच्छा निर्माण होऊ शकली,ती त्याला धमकी किंवा उगाचच समजवण्याने मुळीच होऊ शकली नसती.तुम्हाला उद्या कोणाच्या मनात प्रबळ इच्छा निर्माण करायची असेल,तर एखादी गोष्ट स्वतःला विचारा,'मी त्याच्या किंवा तिच्या मनात या गोष्टीबद्दल रूची कशी निर्माण करू शकतो ?'


या प्रश्नामुळे एक फायदा होईल.कोणत्याही परिस्थितीत एकदम उडी मारण्यापासून आणि आपल्या इच्छेला अवास्तव महत्त्व देण्यापासून आपला बचाव आपण करू शकू.खूप आधी मी न्यू यॉर्कमध्ये एका हॉटेलमध्ये बॉलरूम वीस रात्रींकरिता भाड्याने घेत होतो. जेणेकरून मी माझी व्याख्यानमाला तिथे आयोजित करू शकेन.एकदा असं झालं,की एका सीझनची सुरुवात व्हायच्या आधीच मला तीन पट जास्त भाडं द्यावं लागेल अशी सूचना मिळाली.ही बातमी माझ्यापर्यंत पोहचायच्या अगोदरच तिकीटं छापून ती वितरीतही केली होती.व्याख्यानमालेचा प्रचारही झाला होता.सरळच होतं,की मला नक्कीच भाडेवाढ नको होती.पण हॉटेलवाल्यांशी याबाबतीत बोलून काय फायदा? माझ्या हिशोबाने वा इच्छेने तो हॉटेलमालक काम करत नव्हता,तो त्याच्या मर्जीप्रमाणे काम करत होता.दोन दिवसांनंतर मी हॉटेलच्या मॅनेजरला भेटायला गेलो.मी मॅनेजरला म्हणालो,"

तुमचे असे पत्र वाचून मला धक्काच बसला,पण त्याबद्दल मी तुम्हाला दोष देणार नाही.तुमच्या जागी असतो,तर मीसुद्धा कदाचित असाच वागलो असतो,हॉटेलचा अधिकाधिक फायदा कसा होईल हे पाहणे तुमचे मॅनेजर या नात्याने कर्तव्यच आहे. तुम्ही असे केले नाही,तर तुमचे वरिष्ठ तुम्हाला रागावतील आणि त्यांनी रागवलेच पाहिजे;पण तरीही मला असे वाटतेय की,कागद-पेन्सिल घेऊन भाडेवाढ केल्यामुळे होणारे फायदे व तोटे आपण लिहून काढू या."


मी लेटरहेड घेतले.बरोबर मधे एक उभी रेष काढली आणि दोन कॉलम्स करून फायदे व तोटे अशी शीर्षकं लिहिली.


फायदे या शीर्षकाखाली मी लिहिले'बॉलरूम फुकट!' "बॉलरूम तुम्ही डान्ससाठी केव्हाही भाड्याने देऊ शकता.व्याख्यानांसाठी हॉलमुळे जेवढे पैसे कमवू त्यापेक्षा अधिक पैसे हॉल डान्ससाठी भाड्याने दिला,तर मिळतील ! जर मी बॉलरुमबाबत वीस रात्रींसाठी टायअप कले,तर मात्र तुम्ही तोट्यात जाल." -

अपुर्ण राहिलेला भाग पुढील भागात



१०/१/२६

हारजीत। / defeat

दुसऱ्या पहाटे सूर्य उजाडला,गवतावरच्या दवबिंदूंची वाफ झाली.नोकोबी परिसरातली सर्व वारुळं जागी होऊन आपापल्या कामाला लागली.ओढा-मुंग्यांनी पायवाट वारुळावरचा हल्ला नव्यानं सुरू केला. वारुळाच्या द्वाराभोवती पायवाट-सैनिक मुंग्या वर्तुळात उभ्या होत्या.

आता त्यांना मदत करायला कामकरी मुंग्या नव्हत्या.

सैनिकांना मिळणारा तो आधार आता नाहीसा झाला होता.उलट ओढा-हल्ला जोरदार होता.तासाभरातच त्यांचं पूर्ण सैन्य पायवाट-दाराभोवती एकत्रित झालं.एकेक पायवाट सैनिक मुंगी मरत होती,आणि तिची जागा घ्यायला वारुळातून कोणी येत नव्हतं.लवकरच सर्व पायवाट-सैनिक संपले,आणि ओढा-सैन्य पायवाट वारुळात घुसलं.


('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,

मनोविकास प्रकाशन)


मुख्य बोगद्यानं खाली उतरत ओढा सैनिक, ओढा-कामकरी आजूबाजूंच्या बोगद्यांमध्ये आणि दालनांमध्ये पसरले.सगळं वारूळ त्यांच्या 'हल्ला बोल' फेरोमोन्सनं भरून गेलं.आता पायवाट मुंग्यांच्या मनात वारुळाचा विचार नव्हता.प्रत्येक मुंगी सुटीसुटी स्वतःला वाचवू पाहात होती. एकमेकींना कोणतेही संदेश दिले जात नव्हते.राणी नाही,वारूळ शत्रूनं व्यापलेलं,अशा स्थितीत सामाजिकता मुळीच शिल्लक नव्हती.


काही मुंग्या पळून बाहेर पडल्या.पानांआड, खड्यांमागे लपायचा प्रयत्न करत होत्या,त्या.पण एकेक एकेक मुंगी मरत होती.कोणाला कोळ्यांनी खाल्लं,काही पाण्यात पडून मेल्या.एकीला लष्करी-मुंग्यांच्या जथ्यानं खाल्लं.बहुतेक सगळ्या एकदोन दिवसांत मारल्या गेल्या.आठवड्याभरात एकही पायवाट-मुंगी कुठेही जिवंत उरली नव्हती.


ओढा-मुंग्यांनी पायवाट वारुळाचा कोपरा-न्-कोपरा तपासला.एका संगोपन दालनात त्यांना नुकत्याच कोषाबाहेर पडलेल्या काही कामकरी मुंग्या आढळल्या.त्यांना सांभाळून ओढा वारुळात नेलं गेलं.काही थोड्यांना मारून खाल्लं गेलं.पण बहुतेक सगळ्यांना गुलाम म्हणून राखलं गेलं.अगदी लहान वयाच्या मुंग्या असल्यानं त्यांना पायवाट वारुळाचा वास नीटसा समजला नव्हता.त्या सहज ओढा वारुळाचा वास आपला मानू लागल्या.यानंतर कोणतीही इतर वासाची मुंगी भेटली,तर या पायवाट-गुलाम मुंग्या अगदी मूळ ओढा-

मुंग्यांइतक्याच वारुळप्रेमानं त्यांच्याशी लढायच्या!


या परक्या मुंग्यांना आपल्या करून घेतल्यानं ओढा-वारुळाची कामगारसंख्या वाढली.पायवाट वारुळाशी लढाईत झालेलं नुकसान भरून निघालं.


जर लढाईच्या वेळी पायवाट राणी जिवंत असती आणि ओढा-मुंग्यांनी तिला पकडलं असतं,तर मात्र तिच्या ताबडतोब खांडोळ्या उडवल्या गेल्या असत्या.हरलेल्या वारुळांच्या राण्यांना क्षणभरही जिवंत ठेवलं जात नाही.एक म्हणजे एकच राणी चालू शकते.त्या बाबतीत मुंग्यांची मनं कठोर असतात.माणसांमध्ये याला एकचालकानुवर्तित्व म्हणतात;एकाच चालकाच्या सांगण्यानुसार वागायचं असतं! म्हणूनच दोन वारुळांमध्ये कधीच तह होत नाही की मैत्री होत नाही. वारुळाची जागा एकेरी मालकीखाली राखणं,हे वारुळ-महाप्राण्याच्या दृष्टीनं अटळ,अपरिहार्य असतं. आणि वारुळाचं क्षेत्र काहीही करून,प्रसंगी जीव देऊनही राखावं लागतं.पण मुंग्यांच्या विश्वाबाहेरच्या घडामोडींचेही मुंग्यांवर परिणाम होत असतात.पायवाट वारुळाला हरवल्यानंतर तीनच आठवड्यांनी ओढा-वारुळाजवळ हलती झाडं येऊन गेली.मागे पायवाट वारुळाला जसे अनुभव आले होते,तसेच आता ओढा-वारुळाला आले.काही मुंग्या मेल्या,आणि विचित्र अन्नाचे ढिगारे हाती आले.ओढा-मुंग्यांना ही आपल्यावर देवांनी केलेली कृपाच वाटली.त्यांनाही वाटलं,की देव आपले सहकारी आहेत.देवही आपल्यासारखाच विचार करत असणार,अशी ओढा-मुंग्यांची खात्री पटली.त्यांना विचार करायची इतर कोणती पद्धत माहीतच नव्हती.तशी पद्धत त्यांना सुचूच शकत नव्हती.त्यांची खात्री पटली,की देवही आपल्या ताकदीचा भागच आहेत.


पायवाट वारुळाला हरवून,तिथल्या सर्व मुंग्यांना मारून किंवा गुलाम बनवून ओढा-मुंग्यांनी युद्ध थांबवलं.शत्रू पुन्हा उभा राहू शकत नाही अशी खात्री झाल्यावर त्यांनी पायवाट क्षेत्र पादाक्रांत केलं.त्या क्षेत्रभर कुठेकुठे विष्ठा टाकून फेरोमोन-

संदेश पसरवले,"हे क्षेत्र ओढा-मुंग्यांचं आहे." क्षेत्रातल्या वाटा-रस्त्यांवर आता ओढा वारुळाच्या फेरोमोन्सचा दरवळ होता.

पण त्यांनी नवीन क्षेत्र व्यापलं नाही.गरजेनुसार त्या अन्न शोधत तिकडे जायच्या.मावा कीटकांची विष्ठा,मेलेले कीटक, भरपूर नवं अन्न मिळायचं.आणि वाढीव अन्नामुळे ओढा-वारुळाची प्रजाही झपाट्यानं वाढत गेली.


ज्या मुंग्यांना लढायला बोलावलं गेलं,त्या आपण लढाईत जगणार की मरणार याचा विचार न करता आदेश पाळत लढायला गेल्या.आपल्या वारुळाला, आपल्या महाप्राण्याला त्यांनी जिंकवून दिलं.क्षेत्र मिळवून दिलं.अन्न मिळवून दिलं.गुलाम मिळवून दिले.आपली जीवजात जगायला आवश्यक ती सर्व चक्रं पुरी करत होत्या त्या.आणि त्यांना हे करायचा आदेश देणाऱ्या होत्या त्यांच्या मूलप्रवृत्ती.समाप्त …


सगळ्यांना शिकवणारा 'शहाणा,माणूस…


🔍 स्कॅन करा आणि भेट द्या 


www.vijaygaikwad.com


 ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करा,डिजिटल युगात विजय गायकवाड यांच्यासोबत !


आज आमचे प्रेम मार्गदर्शक मित्र तरुण शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांचा जन्मदिवस असं म्हणतात…एक अनोळखी माणूस,पुस्तक वाचत असताना उघडलं जाणार पान व त्या पानावरील एक वाक्य,तसंच येणारा अनोळखी फोन तुमचं आयुष्य झपाट्याने प्रकाशमय करू शकतो.असंच माझं आयुष्य बदलून टाकायला सुरुवात केली ती म्हणजे विष्णू गाडेकर यांनी आणि दररोज काही ना काही मला शिकवून शिकवतच असतात. माधव गव्हाणे चांगली माणसं जोडून देण्यामध्ये यांचा हातखंडा आहे.

त्यानेच सोडून दिलेला हा माणूस अजूनही माझ्या आयुष्याशी जोडला गेलेला आहे.फोन आला आणि व्हाट्सअप वरती काहीतरी लिहितो त्याला मर्यादा आहेत म्हणून एका रात्रीत न झोपता मला विजय गायकवाड हा ब्लॉग तयार करून दिला. हे लिहून कधीच न संपणारी अशी वही…


www.vijaygaikwad.com हे माझं नाव अमेरिकेतल्या फ्रॉक्झी या कंपनीने घेतलेलं होतं ते आम्ही पंधराशे रुपयेला विकत घेतलं हे विष्णू गाडेकर यांनीच केलं.दरवर्षी पंधराशे रुपये भरून हा ब्लॉग रिन्यूव करावा लागतो. पण माझ्याकडे पैसे नव्हते,तसेच साहेबांच्याकडेही नव्हते त्यांनी एक मार्ग काढला आपली चालू असणारी स्वतः ची एक वेबसाईट बंद केली.आणि www.vijaygaikwad.com हे वेबसाईट सुरू केली. अशा या मित्राला जन्मदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा.आम्ही ब्लॉग सुरू केला त्या वेळेला आम्हाला प्रश्न पडला होता. वाचक मिळतील का ? पण वाचकांना मला भरभरून प्रेम दिलं त्या सर्वांचेही आभार त्यावेळेला त्यांनी मला सांगितले शंभर वाचक ही मिळवायला फार वेळ लागेल आपल्याला पण आज ६४३८१ वाचक तर लेख ६१४ लेख,२३९ भाषा व किमान २० देशांमध्ये तो सन्मानाने वाचला जातो.


त्यांनी ज्या वेळेला मला विचारलं,वाचक मिळतील का ? मी ठामपणे सांगितलं एक जरी वाचक मला मिळाला तरी मी आयुष्यभर त्या एका वाचकांसाठी लेखन करीन. आज ठामपणे मी त्यांना हे सांगू इच्छितो की त्यांच्या सोबत केलेला हा प्रवास माझ्यासाठी खरोखर अविस्मरणीय असा आहे,आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी लिहित राहिन….धन्यवाद


मॅट्रिक फेल विजय गायकवाड,टोप,कोल्हापूर


संक्षिप्त वाढदिवस शुभेच्छा


आयुष्याला दिशा देणारा,

लेखनावर विश्वास ठेवायला शिकवणारा

आणि न शिकवता शहाणं करणारा माणूस—

विष्णू गाडेकर सर.

मित्रत्व,समर्पण आणि विश्वास यांचा

खरा अर्थ तुमच्याकडून शिकायला मिळाला.

तुमच्यासोबतचा प्रवास माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

— डॉ. दिपक शेटे (गणितायन)


विजय गायकवाड : न थांबणाऱ्या लेखणीचा उत्सव


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

विजय गायकवाड

शब्दांना अर्थ देणारा,

विचारांना दिशा देणारा,

आणि माणसांना माणूसपणाशी जोडणारा

विजय गायकवाड —

जगण्याच्या कठीण वाटांवरून चालताना

लेखणीला कधी थांबू न दिलेला,

अपयशालाही अनुभव मानून

यशाला माणुसकीची किनार देणारा

तुमचा हा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे.

एक जरी वाचक मिळाला

तरी आयुष्यभर लिहिण्याचा दिलेला शब्द

आज हजारो वाचकांच्या विश्वासात

परावर्तित होताना दिसतो आहे.

शब्दांची ही न संपणारी वही

समाजाला प्रकाश देत राहो,

हीच सदिच्छा.

तुमच्या लेखणीतून

सत्य,संवेदना आणि सामाजिक भान

असंच अखंड वाहत राहो.

नवे विचार, नवी माणसं

आणि नवे क्षितिजे

तुमच्या लेखनातून जन्माला यावीत.

 वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

आरोग्य,आनंद,समाधान

आणि लेखणीला अखंड बळ लाभो.


— शुभेच्छुक

डॉ. दिपक शेटे (गणितायन) 


काही वर्षापूर्वी एका *विद्यापीठाची*ओळख एका सन्मित्रा मुळे झाली.त्या विद्यापीठात जगातील सर्वच ज्ञानाचं भांडार आहे.हे विद्यापीठ म्हणजे आदरणीय *विजयजी गायकवाड साहेब*.ज्यांच्या शब्दाचा मी चाहता.माझ्यासारख्या अनेकांचे आदर्श असणाऱ्या साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा - दादासाहेब ताजणे,(लाडके शिक्षक)


आदरणीय **विजय गायकवाड सर


आपले व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानाचा असा एक 'कल्पवृक्ष'आहे,ज्याच्या आश्रयाला येणाऱ्या प्रत्येकाला प्रगतीची नवी दिशा आणि समृद्धी मिळते.आपल्या अफाट बुद्धिमत्तेचा आणि अनुभवाचा हा 'ज्ञानवृक्ष आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी ठरला आहे.आपल्या ज्ञानाच्या भांडारातून आपण दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही स्वतःला नेहमीच समृद्ध समजतो.


आज आपल्या *वाढदिवसानिमित्त*आपल्याला उदंड आयुष्य,उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आपल्या मार्गदर्शनाचा हा वटवृक्ष असाच उत्तरोत्तर बहरत राहो.आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


पार्थ राजे गाडेकर युवा तंत्रज्ञ,सेलू 



८/१/२६

कुठलीच गोष्ट शिल्लक नसते.There is nothing left.

सुमारे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट.तेंव्हा संपर्काची साधने अगदीच मर्यादित होती. 


अनेक गावं मुख्य प्रवाहापासून दूर,अडगळीला राहायची. रस्ते नव्हते, वाहतुकीची सोय मर्यादित, आणि नैसर्गिक आपत्ती आली की दोन-दोन, तीन-तीन महिने गाव बाहेरच्या जगापासून तुटून जायचे.


अशाच एका डोंगरपायथ्याच्या गावात,महिन्यातून एकदा मीठ विकायला एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन यायचा.

गावकऱ्यांना त्याचा येण्याचा दिवस वर्षानुवर्षे ठरलेला होता. 


त्या दिवशी गावाच्या पारावर त्याची गाडी उभी राहायची आणि महिला मंडळ,घरांतील लोक आपापल्या गरजेपुरते मीठ त्याच्याकडून घेत गेले की त्याचे काम संपायचे.बदल्यात कधी धान्याचा घाणा,कधी मातीची भांडी,तर कधी काहीच नाही असा अल्प मोबदला त्याला मिळायचा.त्याचं नाव काय? कुठल्या गावचा तो? घरात किती मंडळी? हे विचारण्याचीही तसदी कोणालाच नव्हती.


" मीठाला काय दाम द्यायचं ? "


हीच गावकऱ्यांची वृत्ती.तो मात्र निःशब्द, निःस्वार्थपणे मिठाचे वाटप करून आनंदाने निघून जायचा.त्याने कधी तक्रार केली नाही,अपेक्षा धरली नाही.


अशाच एका दिवशी,गावात एक लग्न होतं.सर्वांनी त्याच्याकडून मीठ घेतलं पण साधं निमंत्रणही कोणी दिलं नाही.गावात मोठी मेजवानी,आनंद, गडबड… आणि तो मात्र पारावर एकटाच बसलेला. ते पाहून त्याच्या सोबत आलेल्या मुलांनी विचारलं


"बाबा,तुम्ही इतकी वर्षे या गावासाठी येता… मग तुम्हाला कोणी का नाही बोलावलं?"


या निरागस प्रश्नाने त्याच्या मनात दडवून ठेवलेली नाराजी चटका देऊन उठली.त्याने मुलांना समजावलं,पण आतून प्रश्न स्वतःलाच पडला 


" मी करतोय कोणासाठी? 


ज्यांना माझ्या येण्या-जाण्याचा,माझ्या श्रमाचा, माझ्या अस्तित्वाचाच पत्ता नाही… त्यांच्यासाठी मी का करावे?"


त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला,

आता या गावात मी येणार नाही.


तो गेला.

गावकऱ्यांना काहीही फरक पडला नाही.

साठवणुकीचे मीठ घरात होतं;म्हणून कोणाला त्याची आठवणही नव्हती.


पण दिवस गेले…

हळूहळू घरातील मिठाचा साठा संपत गेला. 

जेवण आळणी होऊ लागलं.स्त्रियांचे गट नकळत वेशीपाशी येऊन त्याची वाट पाहू लागले.


आणि जेव्हा ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेला त्याची गाडी आलीच नाही.तेव्हा गावातील प्रत्येकाला त्याची किंमत कळली.


आता गावाला समजलं…

ज्याला आपण "शिल्लक", "साधं", "काहीतरी स्वाभाविक" समजतो,

ज्याचं योगदान इतकं नियमित असतं की आपण त्याची दखलच घेत नाही,

तोच मनुष्य खरे तर आपल्या जगण्यालाच अर्थ ऊर्जा देत असतो.

जो निःशब्द, विनातक्रार, विनाअपेक्षा सेवा करत असतो,

तो थांबला की, त्याच्या अस्तित्वाचं मोल कळतं.


बोध: –

जगात कुठलीच गोष्ट शिल्लक नसते.

कधी कोणाची कृपा,कोणाचं योगदान,

कोणाची साथ "स्वाभाविक" समजू नका.

जोपर्यंत एखादं काम निःशब्द चालू असतं,तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही.जेव्हा ते थांबतं तेव्हा उशिरा का होईना,पण सत्य समोर उभं राहतं.


ही कथा सांगते की,


कृतज्ञता व्यक्त केली नाही,मोफत मिळणाऱ्या कार्याची दखल घेतली नाही, दिला नाही,तर सर्वात शुल्लक वाटणारे पण जीवन समृद्ध करणारे मिठासारखे पण अत्यावश्यक साधन आपल्या आयुष्यातून कायमचे निघून जाते*.


लेखन :- अजित देशपांडे यांची ही बोधकथा आयुष्यात काय महत्वाचे आहे ही सांगून जाते.आमचे मार्गदर्शक सुनिव घायाळ यांचे मित्र 'आपरे' यांच्याकडून व्हाट्सअपद्वारे आलेली वरील कथा जशी आहे तशी आपल्यापुढे सादर केली आहे. - विजय गायकवाड..।।