* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: दहशत नरभक्षक बिबट्याची

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२७/७/२३

दहशत नरभक्षक बिबट्याची

दहशत,भीती हे शब्द आपण दररोज साध्या - साध्या बाबतीत इतके सर्रास वापरतो की कधी कधी जेव्हा खरंच त्याचा आवाका मोठा असेल तेव्हा तेवढ्याच शब्दांत सांगून त्याचा खराखुरा अर्थबोध होत नाही.त्यामुळेच जवळपास पाचशे चौ.मैल पहाडी मुलखात राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने,आणि दरवर्षी चारधाम यात्रेला येणाऱ्या साठ हजार यात्रेकरूंच्या दृष्टीने,नरभक्षकाने घातलेली ही दहशत नक्की कशी होती याची मला तुम्हाला कल्पना द्यायची आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला अशाही काही घटना सांगणार आहे की ह्या दहशतीचं कारणंही तुम्हाला समजेल.


रुद्रप्रयागच्या नरभक्षकाने लादलेल्या 'कर्फ्यू' एवढं इतर कोणत्याही कर्फ्यूचं काटेकोरपणे पालन आजवर झालं नसेल! दिवसभर त्या भागातलं सर्व जनजीवन नेहमी प्रमाणेच चालू राहायचं;पुरुषमाणसं लांबवरच्या बाजाराला,शेजारच्या गावी मित्रांकडे,पाहुण्यांकडे जायची, बायकामाणसं डोंगरावर वैरणीसाठी तसेच शाकारणीसाठी गवत कापायला जायची;पोरं शाळेत किंवा गुरं-बकऱ्या वळायला आणि सरपण आणायला रानात जायची व उन्हाळा असेल तेव्हा छोटे मोठे घोळके करून बद्रीनाथ-केदारनाथकडे जाताना दिसायची.


पश्चिम क्षितिजाकडे सूर्य जरा कलायला लागला आणि सावल्या मोठमोठ्या व्हायला लागल्या की मात्र या सर्वांच्या वागणुकीत अचानकपणे लक्षणीय असा बदल दिसायला लागायचा.बाजाराकडे,गावाकडे गेलेली पुरुषमाणसं लगबगीने परतताना दिसायची.डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका धडपडत डोंगर उतरायला लागायच्या.शाळेतून येताना रेंगाळणाऱ्या,गुरं घेऊन रानातून परतायला उशीर झालेल्या पोरांना त्यांच्या आया हाका मारमारून बोलवायला लागायच्या आणि यात्रेकरूंना वाटेत भेटणारी माणसं 'लवकर मुक्कामावर जा' असं सांगायला लागायची.


अंधार पडला रे पडला की एकप्रकारची अमंगळ शांतता,

स्तब्धता आख्ख्या इलाख्यात पसरायची, अक्षरशः एकही हालचाल नाही की शब्द नाही.! सर्वच्या सर्वजण दरवाजे बंद करून अंधाऱ्या घरात स्वतःला कोंडून घ्यायचे.

काहीवेळेला तर एखादा जास्तीचा दरवाजा काढून संरक्षणात दुप्पट वाढ करण्यात यायची.कोणाच्या घरात किंवा दुकानात आसरा न मिळालेले यात्रेकरू,यात्रेकरूं-

साठी बांधलेल्या गवती छपरांच्या पिलग्रिम शेल्टर्समध्ये दाटीवाटीने झोपायचे.


सगळेच्या सगळे,घरातले किंवा झोपड्यांतले, नरभक्षकाच्या भीतीने चिडीचीप बसायचे.सतत आठ वर्ष गढवालच्या पहाडी जनतेसाठी व यात्रेकरूंसाठी 'दहशत' ह्या शब्दाचा अर्थ हा असा होता! आता ही एवढी दहशत बसायची कारणं व स्पष्टीकरण देण्यासाठी मी तुम्हाला काही घटना सांगतो.


एका गावात चाळीस शेळ्यांची राखण करण्यासाठी एका माणसाने एक चौदा वर्षांचा अनाथ मुलगा कामाला ठेवला होता.हा अस्पृश्य जातीचा होता.दररोज संध्याकाळी शेळ्या घेऊन गावात परत आल्यावर त्याला जेवण दिलं जाई व त्यानंतर एका छोट्या खोलीत चाळीस शेळ्यांसह बंद केलं जाई.एका एकमजली इमारतीच्या तळ -

मजल्यावर मालकाच्या घराच्या बरोबर खाली ही खोली होती.झोपल्यावर शेळ्या अंगावर येऊ नयेत म्हणून त्या मुलाने खोलीचा एक कोपरा पाहून मध्ये लाकूड आडवं टाकून स्वतःला झोपण्यासाठी जागा केली होती.


त्या खोलीला एकही खिडकी नव्हती आणि फक्त एकच दरवाजा होता.सर्व शेळ्या व तो मुलगा खोलीत गेल्यावर त्यांचा मालक दरवाजा बंद करायचा.दरवाजाला बसवलेल्या साखळीची शेवटची कडी दरवाजाच्या चौकटीतल्या कोयंड्यात घातल्यावर,निघू नये म्हणून त्यात लाकडाचा अडसर सरकवून खोली सुरक्षित केली जात असे.खबरदारीचा जास्तीचा उपाय म्हणून तो पोरगाही दरवाजाला आतून एक जड धोंडा लावत असे.


ज्या रात्री त्या पोराचा बळी गेला त्या रात्रीही त्याच पद्धतीने खोली बंद केली गेली होती असं त्या मालकाचं म्हणणं आहे आणि एकूणच भीतीचं,दहशतीचं वातावरण बघता त्यात तथ्य असावं.दरवाजावर उमटलेल्या नख्यांच्या ओरखड्यांवरून सुद्धा हे ध्यानात येत होतं. दरवाजा नख्यांनी ओरबाडून तोडण्याच्या प्रयत्नात केव्हातरी तो लाकडाचा अडसर कडीतून निघाला असावा आणि त्यानंतर फक्त दरवाजा ढकलायचंच बाकी राह्यलं.


चाळीस बकऱ्या आणि त्यात लाकूड आडवं टाकून झोपायला केलेली जागा यातून खरंतर बाहेरून येणाऱ्या कोणत्याही जनावराला हालचाल करायला जागा उरण्याची शक्यता नव्हती.त्यामुळे हा बिबळ्या बकऱ्यांच्या पाठीवरून झेप घेऊन पोरापर्यंत पोचला की बकऱ्यांच्या पायाखालून सरपटत गेला याचा फक्त अंदाजच करणं आपल्या हातात उरतं. (कारण या क्षणापर्यंत साहजिकच सर्व बकऱ्या घाबरून उभ्या राह्यल्या असणार)


दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतानाचा बिबळ्याचा आवाज,तो खोलीत शिरल्यावर बकऱ्यांच बेंबाटणं पोराला ऐकू आलं नाही, त्याची झोप मोडली नाही आणि तो मदतीसाठी ओरडला नाही असं गृहीत धरण्याशिवाय गत्यंतर नाही.


मुलाला त्या कोपऱ्यात मारून,उचलल्यानंतर बिबळ्या खोलीबाहेर पडला ( तोपर्यंत सर्व बकऱ्या खोलीबाहेर पळाल्या होत्या.) आणि डोंगर उतरून काही अंतर गेला.

त्यानंतर उतारावरची एक दोन सोपानशेतं ओलांडून दगडगोट्यांनी भरलेल्या एका घळीत घेऊन गेला.काही तासांनी उजेड पडल्यावर इथेच त्याच्या मालकाला त्या पोराचे अवशेष सापडले.


यात अविश्वसनीय वाटणारी गोष्ट म्हणजे एकाही बकरीला साधा ओरखडासुद्धा उमटला नव्हता!


एक माणूस त्याच्या शेजाऱ्याकडे जरा निवांतपणे हुक्का प्यायला आला होता.ही खोली इंग्रजी 'एल' आकाराची होती.तिचा बाहेरचा दरवाजा त्यांच्या बसल्या जागेवरून दिसत नव्हता.ते दोघं हुक्का पेटवून भिंतीला टेकून आरामात धूर काढत बसले होते.त्या दिवसापर्यंत त्या गावात एकही बळी गेला नसल्याने त्यांनी दरवाजा घट्ट लावण्याची काळजी घेतली नव्हती.हळूहळू अंधार पडला.

एक दोन दम मारून मालकाने तो हुक्का आपल्या मित्राच्या हातात दिला पण नेमका तो त्याच्या हातातून निसटून खाली पडला आणि तंबाखू व जळते निखारे इकडे तिकडे पसरले.


"जरा सांभाळून... नाहीतर कांबळ्याला आग लावशील" असं काहीबाही बडबडत तो माणूस निखारे गोळा करण्यासाठी खाली वाकला आणि त्याचं तोंड दरवाजासमोर आलं.चंद्र नुकताच मावळत होता आणि त्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर त्याला त्याच्या शेजाऱ्याला तोंडात घेऊन जाणारा बिबळ्या दिसला.


काही दिवसानंतर ही घटना मला परत सांगताना तो माणूस म्हणतो, "मी खरं सांगतोय साहेब, हा माझा शेजारी माझ्यापासून हाताच्या अंतरावर होता तरीही साधा श्वास घेण्याचासुद्धा आवाज मला आला नाही... त्याला मारताना,ओढून नेताना बिबळ्याचासुद्धा काहीही आवाज नाही! मी त्याक्षणी काहीही करू शकत नव्हतो, बिबळ्या दरवाजाबाहेर जाईपर्यंत मी थांबलो नंतर सरपटत जाऊन पटकन दरवाजा लावून घट्ट बंद करून टाकला.' 


गावच्या मुखियाची बायको जरा आजारी होती आणि तिची शुश्रूषा करण्यासाठी तिने त्या रात्री गावातल्या दोन बायकांना घरी बोलावलं होतं. त्या घराला दोन खोल्या होत्या व बाहेरच्या खोलीला दोन दरवाजे होते.एक बाहेर अंगणात उघडणारा तर एक आतल्या खोलीत उघडणारा. बाहेरच्या खोलीला एक खिडकी होती,ती जमिनीपासून चार फूट उंचीवर होती.या खिडकीत त्या बाईसाठी पिण्याच्या पाण्याचं मोठं पितळी भांडं ठेवलं होतं.

बाहेरच्या खोलीत उघडणारा दरवाजा सोडला तर आतल्या खोलीला एकही,खिडकी नव्हती.बाहेरचा दरवाजा घट्ट लावला होता,पण दोन खोल्यांमधला दरवाजा साहजिकच उघडा ठेवलेला होता.


आतल्या खोलीत त्या आजारी बाईला मध्ये ठेवून दोन्ही बायका जमीनीवरच झोपल्या होत्या. बाहेरच्या खोलीत त्या खिडकीजवळच पलंगावर तिचा नवरा झोपला होता.

शेजारीच जमीनीवर त्याने कंदील ठेवला होता.आणि तेलाची बचत व्हावी म्हणून,शेजारच्या खोलीत त्याचा जेमतेम उजेड पडेल इतपत त्याची वात छोटी करून ठेवली होती.


मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण झोपलेले असतानाच हा बिबळ्या बाहेरच्या खोलीच्या खिडकीतून घरात शिरला.(पण हे करताना त्याने पाण्याचं मोठं भांडं कसं टाळलं हे आश्चर्यच आहे.) आत आल्यावर तो पलंगाच्या शेजारून पुढे आतल्या खोलीत शिरला.बाईला उचलून परत जाताना मात्र या जास्तीच्या ओझ्यामुळे ते पाण्याचं भांडं खाली पडलं व त्याच्या आवाजामुळे सर्वांना जाग आली.


जेव्हा कंदिलाची वात मोठी केली गेली तेव्हा कंदिलाच्या प्रकाशात त्यांना ती बाई खिडकीखाली मुटकुळं होऊन पडलेली दिसली, तिच्या गळ्यावर सुळ्यांचे चार मोठे व्रण होते. शुश्रूषेसाठी तिथे आलेल्या बायकांपैकी एकीचा नवरा मला ही हकीगत सांगताना म्हणतो, "मुखियाची बायको खूपच आजारी होती साहेब आणि फार दिवसांची सोबत नव्हती.बिबळ्याने तिलाच निवडलं हे नशीब.


दोन गुजर लोक त्यांचा तीस म्हशींचा कळप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन चालले होते.ते एकमेकांचे भाऊच होते व त्यांच्यातल्या मोठ्या भावाची बारा वर्षांची मुलगी त्यांच्या बरोबर होती.हे दोघे या भागात पहिल्यांदाच आले होते आणि एकतर त्यांच्या कानावर नरभक्षकाबद्दल काही आलं नसावं किंवा जास्त शक्यता ही आहे की सुरक्षिततेसाठी म्हशींवर त्यांचा भरवसा असावा.जवळजवळ आठ हजार फूट उंचीवर पायवाटेला लागूनच एक छोटी सपाट जागा होती आणि त्याच्याखाली कोयत्याच्या आकाराचं डोंगर उतरणीवरचं छोटंसं शेत होतं.हे शेत साधारण पाव एकराचं असावं व बराच काळ त्यावर काही लागवड झाली नसावी. त्या दोघांनी रात्रीच्या मुक्कामासाठी ही जागा निवडली.

जवळच्या जंगलातून त्यांनी काही लाकडं तोडून आणली आणि त्याचे खुंट शेतात खोलवर ठोकून त्यांनी म्हशींना रांगेत बांधून टाकलं.त्यानंतर त्या मुलीने बनवलेलं जेवण उरकून तिघांनी शेत आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या त्या सपाट जमीनीवर कांबळं अंथरलं आणि सर्वजण झोपी गेले.ती रात्र अंधारी होती. पहाटेपहाटे म्हशींच्या घंटामुळे आणि हंबरण्यामुळे त्या दोघांना जाग आली.इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर त्यांना लगेच लक्षात आलं की आसपास वाघ-बिबळ्या आहे.त्यांनी कंदील पेटवला आणि म्हशींना शांत करण्यासाठी, त्याप्रमाणे एखादीने हिसके देऊन दावे तोडलेत का हे बघण्यासाठी शेतातून त्या म्हशींमधून एक चक्कर मारली.फक्त काही मिनिटांसाठीच ते त्यांच्या झोपण्याच्या जागेवरून गैरहजर होते पण परत आल्यानंतर त्यांना दिसलं की जाताना झोपलेली ती मुलगी आता गायब आहे आणि ज्या कांबळ्यावर ते झोपले होते त्यावर रक्ताचे मोठे मोठे शिंतोडे आहेत.


दिवस उजाडल्यावर त्या भावाभावांनी रक्ताचा माग काढला.हा माग म्हशी बांधलेल्या ठिकाणा शेजारून शेत ओलांडून काही पावलं डोंगर उतारावर गेला होता.इथेच बिबळ्याने त्याचं भक्ष्य खाल्लेलं त्यांना आढळलं.


"माझा भाऊ अगदी अशुभ नक्षत्रावर जन्माला आला असणार साहेब.त्याला मुलगा नाही.ह्या त्याच्या मुलीचं लवकरच लग्न होणार होतं आणि तिच्याकडून

आपल्याला वारस मिळेल हे त्याचं स्वप्न होतं.बिबळ्याने नेमक तिलाच नेलं." तो दुर्दैवी गुजर सांगत होता.


मी अशा कित्येक घटना एकामागोमाग एक सांगू शकतो. प्रत्येक घटनेचा शेवट दुःखदच आहे पण मला वाटतं या गढ़वाली लोकांना इतकी दहशत का होती हे कळावं इतपत मी तुमच्याशी बोललो आहे.त्याचबरोबर हेही लक्षात घ्यावं लागेल की हे पहाड़ी लोक शूर असले तरी श्रद्धाळू असतात. त्यामुळे प्रत्यक्ष नरभक्षकाच्या भीतीपेक्षा त्यांच्यावर अमानवी शक्तींच्या भीतीचाही पगडा असणंही नैसर्गिक आहे.याबद्दलचं छोटंसं उदाहरण.


एक दिवस पहाटे पहाटेच मी रुद्रप्रयाग इन्स्पेक्शन बंगल्याच्या बाहेर पडलो आणि जसं व्हरांड्याबाहेर पाऊल टाकलं तसं खाली, माणसांच्या पावलांनी मऊ झालेल्या मातीवर मला नरभक्षकाच्या पावलांचे ठसे दिसले.ठसे एकदम ताजे होते आणि त्यावरून हे दिसत होतं की बिबळ्यानेही माझ्या काही मिनिटंच अगोदर व्हरांड्याबाहेर पाऊल टाकलं होतं ! बंगल्यावरची भेट अयशस्वी ठरल्यानंतर तो पन्नास पावलां वरच्या यात्रामार्गाकडे गेला होता.बंगला व रस्त्यामधला पन्नास पावलांचा रस्ता खडकाळ असल्याने तिथे कोणतेही माग दिसत नव्हते पण फाटकाशी पोचल्यानंतर मला गुलाबराईच्या दिशेने जाणारे ताजे पगमार्कस दिसले.

आदल्या दिवशी संध्याकाळी शेळ्यामेंढ्यांचा खूप मोठा कळप त्या दिशेने गेला होता आणि त्यांच्या खुरांनी मऊ वस्त्रगाळ झालेल्या मातीवर बिबळ्याचे पगमार्कस नुकत्याच पडलेल्या हिमावर दिसावेत इतके स्पष्ट दिसत होते..


त्या क्षणापर्यंत मला या पगमार्कसची चांगलीच ओळख झाली होती व इतर शंभर बिंबळ्यांमधूनही मी त्याला वेगळं काढू शकलो असतो.


शिकार करणाऱ्या जनावरांच्या पायांच्या ठशांवरून (पगमार्कस्वरून) खूप काही शिकता येतं.उदाहरणार्थ त्याचं लिंग,वय,आकार वगैरे! सर्वप्रथम जेव्हा मी ह्या बिबळ्याचे पगमार्क्स पाह्यले तेव्हाच मला कळलं होतं की हा एक आकाराने बराच मोठा,प्रौढ वयाचा नर बिबळ्या आहे.आता या ठशांवरून समजत होतं की तो माझ्यापासून काही मिनिटंच पुढे आहे आणि सावकाश पण नेहमीच्या स्थिर गतीनं चालतोय.


इतक्या सकाळी ह्या रस्त्यावर अजिबात वर्दळ नव्हती.हा रस्ता पुढे छोट्या मोठ्या असंख्य घळी ओलांडून वाकडा तिकडा गेला होता.स्वतःची संपूर्ण निशाचर सवय हा बिबळ्या या वेळी कदाचित मोडेल या आशेने मी..


९.जुलै.२०२३ या लेखमालेतील पुढील भाग

उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..