दहशत नरभक्षक बिबट्याची २९.७.२०२३ या लेखामध्ये बिबट्या व बिबळ्या या दोन शब्दांचा उपयोग केला आहे.
आमच्या कंपनीतील नेहमीच मनापासून वाचणारे राकेश सावंत साहेब यांना बिबट्या का बिबळ्या हा प्रश्न पडला.
.( हाच प्रश्न हा ब्लॉग मला भेट म्हणून देणारे विष्णू गाडेकर पाटील तरुण शास्त्रज्ञ यांनाही पडला होता.)
हा प्रश्न अनेकांना पडू शकतो.
त्यासंदर्भात थोडस मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे) या पुस्तकात बिबळ्या हा शब्द आहे.ही कथा अजून भरपूर शिल्लक आहे.ती लिहिली जाईलच.
नरभक्षकाच्या मागावर केनथ अँडरसन,अनुवाद संजय बापट या पुस्तकात बिबट्या हा शब्द वापरला आहे.
कुमाऊंचे नरभक्षक जिम कॉर्बेट,अनुवाद वैशाली चिटणीस,डायमंड पब्लिकेशन्स या पुस्तकात बिबट्या हा शब्द वापरला आहे.म्हणजेच बिबट्या व बिबळ्या दोन्ही एकच आहेत.
( ह्या फक्त अजरामर शिकार कथा नाहीत,तर बरचं काही शिकवून जाणाऱ्या आहेत.याची कृपया नोंद घ्यावी.)
नवीन गोष्ट सुरू..।
मी एडी नॉवेल्स बरोबर मलानी इथं शिकारीला गेलो असताना त्या परिसरामधल्या एका वाघिणीबद्दल ऐकलं.
तिलाच नंतर 'चंपावतची नरभक्षक' या नावाने ओळखलं जायला लागलं.
संयुक्त प्रांतामधले सर्वोत्तम शिकारी म्हणून एडी नावाजले गेले होते.त्यांच्याकडे शिकारकथांचा कधीही न संपणारा खजिनाच होता!खरंतर ज्यांच्याकडे आयुष्यामधल्या सगळ्या सर्वोत्तम गोष्टी असतात,अशा मोजक्या आणि भाग्यवान लोकांपैकी ते एक होते. 'नेमकेपणा' आणि 'अचूकपणा' यांत त्यांच्या रायफलसारखी दुसरी रायफल नव्हती.! त्यांचा एक भाऊ भारतामधला उत्तम नेमबाज होता,तर दुसरा भारतीय लष्करात होता आणि उत्तम टेनिस खेळायचा.जगातला उत्तम शिकारी असलेल्या त्यांच्या मेहुण्याची चंपावतच्या या नरभक्षक वाघाला मारण्यासाठी सरकारने नेमणूक केली असल्याचं त्यांनी मला सांगितलं,तेव्हाच या वाघाचे फारच थोडे दिवस उरले असल्याचं निश्चित झालं होतं.
त्यानंतर चार वर्षांनी मी नैनितालला भेट दिली, तेव्हा काही अनाकलनीय कारणांमुळे चंपावतचा तो नरभक्षक वाघ मारला गेला नसल्याचं आणि त्याचं असणं ही सरकारसाठी एक मोठीच डोकेदुखी होऊन बसली असल्याचं समजलं. त्याला मारणाऱ्यासाठी इनाम जाहीर केलं गेलं होतं,काही खास शिकारी नेमले गेले होते आणि अलमोरा डेपोमधून काही गुरख्यांच्या पलटणीही पाठवल्या गेल्या होत्या.या सगळ्या उपाययोजना करून
सुद्धा त्या नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढतच चालली होती.
नंतर समजलं की,तो वाघ नव्हता;वाघीण होती.ती नेपाळहून कुमाऊँमध्ये आली,तेव्हा पूर्णतः नरभक्षक झाली होती.नेपाळमध्ये तिने २०० माणसांचा जीव घेतला होता.त्यानंतर सशस्त्र नेपाळ्यांच्या एका पथकाने तिला तिथून हुसकवून लावलं होतं.गेली चार वर्ष तिचं कुमाऊँमध्ये वास्तव्य होतं.इथं तिने आणखी २३४ माणसांचे बळी घेतले होते.
मी नैनितालला पोहोचतो न पोहोचतो तोच, बर्थोड हे नैनितालचे उपायुक्त मला भेटायला आले.तेव्हा मला ही सगळी परिस्थिती समजली.नंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू
झाला.आता ते हल्दवानीमध्ये कुठेतरी चिरनिद्रा घेत आहेत.बर्थोड यांचं व्यक्तिमत्त्वच असं होतं की,त्यांना ओळखणारे सगळेच जण त्यांच्यावर प्रेम करत आणि त्यांना मान देत.या नरभक्षक वाघिणीचा त्यांच्या अखत्यारीतल्या जिल्ह्यामधल्या लोकांना किती उपद्रव होत होता,तिच्यामुळे त्यांची चिंता कशी वाढली होती,हे त्यांनी मला सांगितलं होतं.त्यामुळे तिने घेतलेल्या पुढच्या नरबळीची बातमी यायच्या आत मी तातडीने चंपावतकडे कूच करणार असल्याचं वचन त्यांनी माझ्याकडून घेतलं,
तेव्हा त्याचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही.मी त्यांना दोन अटी घातल्या.पहिली,या वाघिणीला मारण्यासाठी सरकारने जाहीर केलेलं इनाम रद्द केलं जावं.दुसरी,तिला मारण्यासाठी नेमलेले खास शिकारी,अलमोराहून मागवलेले गुरखे यांना परत बोलवलं जावं.यामागच्या माझ्या कारणांच स्पष्टीकरण देण्याची खरं म्हणजे गरज नाही.असा इनाम घेणारा शिकारी म्हणून आपल्याला ओळखलं जावं,हे कुणाही अस्सल शिकाऱ्याला आवडणार नाही,याची मला खात्री आहे आणि एकाच वाघाच्या मागावर जास्त लोक असतील,तर त्यांना अपघाताने एकमेकांची गोळी लागण्याचा धोका नाकारता येत नाही.ते टाळणं आवश्यक होतं.माझ्या या अटी मान्य केल्या गेल्या आणि आठवड्याभरा नंतर एका भल्या सकाळी बर्थोड मला भेटायला आले.दाबिधुरा आणि धुनघाट यांच्या दरम्यान असलेल्या पाली या गावामधल्या एका स्त्रीचा त्या नरभक्षक वाघिणीने बळी घेतला असल्याची बातमी रात्री त्यांच्याकडे आली असल्याचं त्यांनी मला सांगितलं.
कधीतरी अशी बातमी येणार असल्याची आणि आपल्याला ताबडतोब निघावं लागणार असल्याची जाणीव असल्यामुळे मी सहा जणांना माझ्याबरोबर येण्यासाठी सांगून ठेवलं होतं. माझं सामान साहित्य वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पहिल्याच दिवशी नाश्ता करून निघाल्यानंतर आम्ही धारीच्या दिशेने १७ मैलांचं अंतर पार केलं.दुसऱ्या दिवशी आमचा नाश्ता मोर्नोला,तर रात्रीचा मुक्काम दाबिधुरा इथं पडला.तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही पाली इथं पोहोचलो,तेव्हा नरभक्षक वाघिणीने त्या स्त्रीचा बळी घेतल्याच्या घटनेला पाच दिवस होऊन गेले होते.त्या गावामधले स्त्री-पुरुष आणि मुलं असे मिळून पन्नासेक जण भयंकर दहशती
खाली होते.मी त्या गावात पोहोचलो,तेव्हा सूर्य वर असला,तरी सगळं गाव घरंदारं बंद करून बसलं होतं.माझ्या माणसांनी गावाच्याच आवारात चूल पेटवली आणि मी तिथेच चहा घेत बसलो.तेव्हा कुठे एका घराचं दार अगदी सावधपणे उघडलं गेलं आणि घाबरलेल्या लोकांनी बाहेर यायला सुरुवात केली.आदले पाच दिवस लोकांनी त्यांच्या घराचं दारदेखील उघडलं नसल्याचं त्यांनी मला सांगितलं.त्यांच्या अंगणाची,परिसराची अवस्था,म्हणजे अस्वच्छता बघून ते खरं बोलत असल्याचं लक्षात येत होतं.त्यांच्याकडचा अन्नसाठा संपत आला होता.नरभक्षक वाघिणीला मारलं नसतं किंवा तिथून पळवून लावलं नसतं,तर लोकांची उपासमार झाली असती.वाघीण अजूनही त्याच परिसरात होती,हे उघड होतं.सलग तीन रात्री लोकांना घरांपासून साधारण १०० यार्ड अंतरावरच्या परिसरातून तिची गुरगुर ऐकू येत होती,
डरकाळ्या ऐकू येत होत्या.विशेषतः आम्ही पोहोचलो,त्या दिवशी गावाच्या खालच्या अंगाला असलेल्या शेतात लोकांना ती दिसली होती.गावच्या प्रमुखाने आम्हाला राहण्यासाठी अगदी आनंदाने एक खोली देऊ केली.पण आम्ही आठ जण होतो आणि त्या खोलीचं दार ज्या दिशेला उघडत होतं,ती परसाकडची बाजू होती.त्यामुळे मी उघड्यावरच रात्र घालवायचा निर्णय घेतला.
रात्रीच्या जेवणानंतर काम करायचं असल्यामुळे उपलब्ध अन्नघटकांमधून पटकन तयार होतील, असे पदार्थ माझ्या माणसांनी तयार केले.त्यानंतर ती त्या सुरक्षित खोलीत जाऊन बसली.मी रस्त्याच्याच बाजूला असलेल्या एका झाडाला पाठ टेकून बसलो.गावकऱ्यांनी सांगितलं होतं की,या रस्त्यावरून रात्री फेरफटका मारायची तिला सवय होती.वाघिणीने मला पाहण्याआधी मी तिला पाहिलं
असतं,तर मला तिला मारण्याची संधी मिळण्याची शक्यता असल्याचं चंद्र पूर्ण वर आला,तेव्हा मला वाटत होतं.शिकारीची वाट बघत मी जंगलात कितीतरी रात्री घालवल्या होत्या,पण अशा पद्धतीनेनरभक्षकाची वाट
बघण्याची माझी पहिलीच वेळ होती. समोरचा रस्ता चंद्रप्रकाशात उजळून निघाला होता,पण रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला असलेल्या झाडांच्या सावल्या त्यावर पसरल्या होत्या.जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या आणि त्यांच्या सावल्या हलायला लागल्या,तसे डझनभर वाघ मला माझ्या दिशेने येताना दिसू लागले.त्या नरभक्षक वाघिणीच्या तावडीत स्वत:हून जाण्याचा मला भयंकर पश्चात्ताप व्हायला लागला.गावात परत जायचं धैर्यदेखील माझ्यात उरलं नव्हतं आणि स्वतःहून हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याचीही भीती वाटायला लागली होती.
थंडीबरोबरच भीतीने माझे दात एकमेकांवर आपटून वाजायला लागले होते,पण रात्रभर मी तिथे तसाच बसून राहिलो.समोर दिसणाऱ्या बर्फाच्छादित पहाटेचे राखाडी रंग दिसायला लागले,तसा मी शरीराजवळ घेतलेल्या माझ्या दोन गुडघ्यांमध्ये डोके खुपसून झोपून गेलो.
तासाभरानंतर माझी माणसे आली तेव्हा मी त्याच स्थितीत गाढ झोपलेलो होतो.मी वाघिणीचा आवाजही ऐकला नव्हता की दुसरं काहीही पाहिले नव्हतं.आम्ही गावात परतलो.वाघिणीने जिथं जिथं माणसांना मारलं होतं त्या त्या ठिकाणी गावकऱ्यांनी मला घेऊन जावं म्हणून मी प्रयत्न केले,पण त्यासाठी कुणीच तयार होईना.
रात्रभर बाहेर राहूनही मी वाघिणीपासून बचावलो असल्याने ते आश्चर्यचकित झालेले दिसत होते.वाघिणीने माणसं मारलेल्या जागांच्या दिशा त्यांनी मला त्यांच्या आवारातूनच दाखवल्या.मी तिथे जाण्यासाठी कारणीभूत ठरलेली शेवटची हत्या गावाच्या पश्चिमेला असलेल्या डोंगरावर झाली होती.साधारण २० महिला आणि मुली गायीगुरांसाठी ओक वृक्षाची पानं गोळा करत असताना त्यांच्यामधलीच एक दुर्दैवी महिला मारली गेली होती.त्या वेळी तिथे असलेल्या सगळ्याच जणी मला माहिती देण्यास उत्सुक होत्या. त्या सगळ्या जणी मध्यान्ह होण्याच्या दोन तास आधी घराबाहेर पडल्या होत्या, साधारण अर्धा मैल गेल्यानंतर झाडांवर चढून त्यांनी पाने तोडली होती.जिचा बळी गेला होता, तिच्यासह आणखी दोघींनी घळीच्या बाजूला असलेल एक झाड निवडलं होतं.नंतर मी पाहणी केली.तेव्हा ती घळ चार फूट खोल आणि दहा ते अकरा फूट रुंद असल्याचं मला आढळून आलं. आवश्यक तेवढी सगळी पानं तोडल्यानंतर ती महिला झाडावरून खाली उतरत असतानाच मागच्या पायांवर उभं राहून वाघिणीने तिचे दोन्ही पाय पकडले होते.तोपर्यंत तिला कुणीच पाहिलं नव्हतं.त्यानंतर त्या महिलेचा फांदीला धरलेला हात सुटला होता आणि ती दरीत घसरत गेली होती.वाघिणीने तिचे दोन्ही पाय सोडून दिले होते.ती उठण्याचा प्रयत्न करत असताना वाघिणीने तिचं नरडं पकडलं होतं.त्या महिलेला घेऊन तो दरीच्या पलीकडच्या दाट झाडाझुडपांमध्ये नाहीशी झाली होती.
बाकीच्या दोघी जणी तिथूनच अवघ्या काही फुटांवर,
झाडावर होत्या.त्यांच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला होता.बळी पडलेल्या त्या महिलेला घेऊन वाघीण दिसेनाशी झाल्यावर भयंकर घाबरलेल्या त्या महिला कशाबशा धावत-पळत गावात आल्या होत्या.दुपारच्या जेवणासाठी पुरुषमंडळी नुकतीच घरी आली होती,मग सगळे जण एकत्र जमले.कुणी ड्रम घेऊन आला,तर कुणी धातूची भांडी घेऊन आला.थोडक्यात,ज्यापासून आवाज निर्माण होईल,अशा वस्तू घेऊन प्रत्येक जण आला. सगळी तयारी करून,पुरुष पुढे आणि महिला मागे अशा पद्धतीने ते त्या महिलेला शोधण्यासाठी निघाले.वाघिणीने ज्या घळीपाशी त्या महिलेला मारलं होतं,तिथे ते पोहोचले. 'आता पुढे काय करायचं?' या महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेमध्ये साधारण ३० यार्डावरच्या झाडाझुडपांतून आलेल्या डरकाळीने व्यत्यय आणला.ती डरकाळी ऐकून त्यांच्यातला एक जण मागे वळला आणि गावाच्या दिशेने सैरावैरा धावत सुटला.
त्याच्यामागून सगळेच धावत सुटले.दमून थांबल्यावर थोडा श्वास घेत त्यांच्यातल्या प्रत्येकाने 'माझ्याआधी तूच धावायला सुरुवात केलीस आणि सगळा गोंधळ झाला' असे एकमेकांवर आरोप केले.
प्रत्येक जण धैर्यवान असल्याचा प्रत्येकाचा दावा असल्याचा आणि कुणीच घाबरलेलं नव्हतं,तर वेळ न घालवता परत जाण्याचा आणि त्या महिलेची सुटका करण्याचा मुद्दा उपस्थित होईपर्यंत सगळ्यांची मोठमोठ्याने भांडणं होत राहिली.मग तिथे परत जायची सूचना स्वीकारली गेली.सगळ्यांनी घळीपर्यंत जाण्याचा आणि घाबरून धावत परत येण्याचा प्रकार तीन वेळा झाला.तिसऱ्या वेळी ते गेले,तेव्हा त्यांच्यापैकी एकाने बंदूक चालवली आणि वाघीण डरकाळी फोडत बाहेर आली.त्यानंतर मात्र शहाणपणाचा विचार करत त्या महिलेची सुटका करण्याचा प्रयत्न सोडून देण्यात आला. "त्या बंदूक चालवणाऱ्या माणसाने हवेत बार काढण्याऐवजी झाडाझुडपांत का काढला नाही?" या मी विचारलेल्या प्रश्नावर तो म्हणाला की,"वाघीण आधीच खूप चिडलेली होती.तिला चुकून गोळी लागली असती,तर तिने मला नक्कीच ठार मारलं असतं"
वाघिणीचे काही ठसेबिसे दिसण्याच्या अपेक्षेने त्या दिवशी सकाळी मी जवळजवळ तीन तास गावाभोवती फेऱ्या मारत घालवले.असं फिरत असताना 'आत्ताच तिची गाठ पडते की काय' अशी भीतीही मला वाटत होती.दरीमध्ये खूप झाडं होती.अंधार असलेल्या एका ठिकाणी झुडपांभोवती फिरत असताना वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांचा एक थवा अचानक आवाज करत उडाला आणि 'आपलं हृदय बंद पडतंय की काय!' असं मला वाटलं.अर्थात,तसं काही घडलं नाही.
माझ्या माणसांनी जेवायला बसण्यासाठी अक्रोडाच्या झाडाखालची जागा साफसूफ करून घेतली होती.
नाश्त्यानंतर गावाच्या प्रमुखाने मला गव्हाच्या पिकाच्या कापणीचं काम करणाऱ्या लोकांना संरक्षण पुरवण्याची विनंती केली.लोक अतिशय घाबरलेले असल्याचं त्याने मला सांगितलं.ते घरातून बाहेरच पडायला तयार नव्हते.
त्यामुळे मी थांबलो असतो,तरच कापणी होणार होती;
अन्यथा होणार नव्हती.अर्ध्या तासानंतर माझ्या माणसांच्या मागे सगळं गाव गव्हाच्या कापणीसाठी बाहेर पडलं आणि मी रायफल घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिलो.संध्याकाळपर्यंत पाच मोठमोठ्या शेतांमधून गहू कापून जमा करण्यात आला. घरांजवळ असलेले दोन पट्टे बाकी ठेवण्यात आले होते.तिथलं काम करून घेण्यात काही अडचण येणार नसल्याचं गावच्या प्रमुखाने मला सांगितलं.त्याबरोबरच गावाची बरीच स्वच्छताही झाली आणि खास मला वापरण्यासाठी दुसरी एक खोलीदेखील देण्यात आली.तिला एक दार होत,पण हवा खेळती राहण्याची काहीच सोय नव्हती.मग दार उघडं ठेवून मी तिथे काही काटेरी झुडप टाकली.त्यामुळे वाघीण माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नव्हती.तसंच दार उघडं ठेवून मी झोपलो असतो,तर मला चांगला वाराही मिळणार होता.आदल्या दिवशी न मिळालेल्या झोपेचा कोटा मी अशा पद्धतीने पूर्ण करून घेतला.
माझ्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये जणू प्राण फुंकला जायला सुरुवात झाली.त्यामुळे त्यांनी जरा जास्तच मोकळेपणाने वावरायला सुरुवात केली.असं असलं,तरी मला ज्या गोष्टीचं जास्त महत्त्व वाटत होतं,त्या माझ्या 'मला सगळं जंगल दाखवा' या विनंतीचा त्यांनी पुनर्विचार करण्याइतपत त्यांचा विश्वास मी अजूनही जिंकू शकलो नव्हतो.आसपासच्या मैलोगणिक परिसराचा अगदी प्रत्येक फूट या लोकांना परिचित होता आणि त्यांची इच्छा असती,त्यांना वाटलं असतं,तर वाघिणीला शोधण्याचा नेमका परिसर किंवा तिच्या पावलांचे ठसे बघायला मिळण्यची शक्यता असणाऱ्या नेमक्या जागा ते मला सांगू शकले असते.पण ती नरभक्षक वाघीण तरुण होती की वयस्कर ही माहिती अजूनपर्यंत मिळालेली नव्हती.
तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या माहितीचा उपयोग झाला असता,असं वाटत होतं.तिचे ठसे अभ्यासून ही माहिती मिळवता आली असती.
त्या दिवशी सकाळचा चहा झाल्यानंतर मी गावकऱ्यांना विचारलं, "माझ्या माणसांसाठी मांसाहारी जेवण हवं आहे,तर मला घोरूलची (पहाडी बोकड ) शिकार कुठे करता येईल ?" ते गाव पूर्व-पश्चिम पसरलेल्या एका डोगररांगेच्या कडेवर वसलेलं होतं.मी खालच्या बाजूला ज्या रस्त्यावर रात्र घालवली होती,तिथे उत्तरेकडे असलेल्या उतारावर,गवताळ भागात भरपूर घोरूल सापडले असते,असं मला सांगण्यात आलं.मला ती जागा दाखवण्यासाठी अनेक जण स्वेच्छेने यायला तयार झाले.त्यांचा प्रतिसाद पाहून झालेला आनंद व्यक्त न करता मी त्यांच्यामधून तीन जणांची निवड केली. "तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथे खरोखरच घोरूल सापडले,तर माझ्या माणसांसाठी एक आणि गावासाठी दोन घोरूलांची शिकार करून आणेन" असंही मी गावच्या प्रमुखाला सांगितलं.तो रस्ता ओलांडून आम्ही पुढे गेलो आणि त्या डोंगरांमधून खाली उतरलो.अर्थात,आमच्या डावी-उजवीकडे आमचं एकदम बारीक लक्ष होतं,पण आम्हाला वाघसदृश काहीच दिसलं नाही.दरीमध्ये अर्धा मैल खाली उतरल्यानंतर दोन उतार जिथे एकत्र येतात,
अशा ठिकाणी उजवीकडे,उतारावर भरपूर खडकाळ आणि गवताळ जागा दिसत होती.मी तिथे थोडा वेळ बसून उताराचं निरीक्षण करायला सुरुवात केली. माझ्यामागे एक पाईन वृक्ष होता.त्याला मी टेकून बसलो.
समोर असलेल्या डोंगरात उंचावरची हालचाल माझ्या डोळ्यांनी टिपली.पुन्हा तीच हालचाल जाणवली,तेव्हा मी नीट बघितलं,तर एक घोरूल आपले कान हलवत उभं होतं.ते गवतामध्ये उभं होतं आणि त्याचं फक्त डोकंच तेवढं मला दिसत होतं.माझ्याबरोबरच्या माणसांना ही हालचाल दिसली नव्हती.त्यांनी नीट लक्ष देऊन बघायला सुरुवात केल्यावर त्याचं डोकं हलणं थांबलं.आसपासच्या वातावरणात त्याचा रंग असा मिसळून गेला होता की,
आता त्याला त्या सगळ्यांमधून शोधणं शक्य नव्हतं.ते नेमकं कुठे होतं,याची कल्पना देऊन मी त्यांना खाली बसायला सांगितलं आणि माझ्या हालचालींचं निरक्षण करायला सांगितलं. माझ्याकडे मार्टिनी हेन्री ही जुनी रायफल होती.(कुमाऊंचे नरभक्षक जिम कॉर्बेट,अनुवाद - वैशाली चिटणीस,डायमंड पब्लिकेशन्स)अतिशय अचूक नेम लागण्यासाठी ती प्रसिद्ध होती.आमच्यामधलं अंतर साधारणपणे २०० यार्डाचं होतं.खाली झोपून,जमिनीवर आलेल्या पाईन वृक्षाच्या मुळांवर मी माझी रायफल ठेवली,काळजीपूर्वक नेम धरला आणि गोळी झाडली.
काडतुसांमधल्या काळ्या पावडरीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे मला काही दिसत नव्हतं.माझा नेम बहुधा एखाद्या खडकावर किंवा पालापाचोळ्यावर लागला असल्याचं माझ्या माणसांनी मला सांगितलं.त्याच जागेवर बसून मी रायफलमध्ये पुन्हा बार भरला.मी आधी ज्या जागेवर नेम धरला होता,त्याच्या खाली,गवतात मला हालचाल दिसत होती.तिथेच मला घोरूलचा पार्श्वभाग दिसला.ते गवतातून पूर्ण बाहेर आलं आणि त्याने डोंगरउतारावरून खाली गडगडत यायला सुरुवात केली.
अर्ध्यावर खाली आल्यावर ते घनदाट गवतात दिसेनासं झालं. त्याच्या या धडपडीमुळे गवतात पडलेल्या दोन घोरूलांना सावधगिरीचा इशारा मिळाला आणि त्या गवतातून बाहेर येऊन ती वर,डोंगराच्या दिशेने धावायला लागली.आता ती अधिक जवळच्या टप्प्यात होती.
माझ्यासमोरच्या पानांमधून मी नीट लक्ष केंद्रित केलं.त्या दोघांपैकी आकाराने मोठ्या असलेल्या घोरूलाचा वेग कमी व्हायची वाट बघायला लागलो.तो कमी होताच,मी त्याच्या पाठीत गोळी झाडली.त्याबरोबर दुसऱ्या घोरूलाने त्याने तिरपं वळून डोंगराच्या दिशेने धावायला सुरुवात केली, तेव्हा मी त्याच्यावर गोळी झाडली.
कथा अजून संपलेली नाही. ( जिम कॉर्बेट याच्यांकडे कोणत्याही जंगलात जाण्याचा विशिष्ट असा अपवादात्मक परवाना होता.) संवादातून मला समजलेली माहिती.