* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: दहशत नरभक्षक बिबट्याची भाग २

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२९/७/२३

दहशत नरभक्षक बिबट्याची भाग २

प्रत्येक वळण काळजीपूर्वक पार केलं.शेवटी मैलभर अंतरावर मात्र त्याने रस्ता सोडला होता व एका जंगलवाटेने दाट जंगलात निघून गेला होता.या ठिकाणाहून शंभर यार्डावर एक लागवड न केलेलं शेत होतं आणि त्याच्या मध्यावर काटेरी कुंपण दिसत होतं.

आपल्या शेतात शेळ्यामेंढ्या घेऊन येणाऱ्या फिरस्त्यांनी मुद्दाम यावं व त्यांच्या लेंड्यांनी आपलं शेत खतावलं जावं म्हणूनच शेतमालकांनंच हे कुंपण घालून ठेवलेलं होतं.आदल्या दिवशी त्या दिशेने आलेल्या शेळ्या -

मेंढ्यांच्या कळपाचा मुक्काम या कुंपणाच्या आतच होता.


त्या कळपाचा मालक अगदी रापलेला,टणक म्हातारा होता आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच कळत होतं की किमान चाळीस-पन्नास वर्षतरी तो विविध मालांची ने-आण ह्या मार्गावरून करत असावा.कुंपणाचं एक काटेरी झुडूप बाजूला काढून तो बाहेर पडतच होता तेवढ्यात मी तिथे आलो.मी त्याला बिबळ्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला की,"मी जनावर तर पाहिलं नाही पण झुंजूमुंजू होण्याच्या सुमारास त्याच्या दोन कुत्र्यांनी मात्र आवाज दिला होता आणि काही मिनिटानंतर रस्त्याच्या वरच्या अंगाला एक भेकर भुंकलं होतं.' "


त्याचा एक बोकड विकत देण्याबद्दल मी त्याला विचारल्यावर त्याने मला कारण विचारलं. बिबळ्याला आमिष म्हणून बांधण्यासाठी पाहिजे असं सांगितल्यावर तो कुंपणाच्या बाहेर आला, झुडूप जागच्या जागी ठेवून दिलं,मी दिलेली सिगारेट घेतली अन् रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसला.


बराच वेळ आमचं दोघांचंही धूम्रपान चालू होतं. तरी माझा प्रश्न अनुत्तरीतच राहिला होता.शेवटी त्याने बोलायला सुरूवात केली."माझं गाव ब्रदीनाथच्या जवळच आहे.

तिथून येत असताना वाटेतच मी एका साहेबाबद्दल ऐकलं होतं.तर तो साहेब तुम्हीच दिसताय.पण इतक्या दुरून तंगडतोड करत इथे एका वायफळ कामासाठी तुम्ही आलात म्हणून वाईट वाटतं.इथल्या इतक्या माणसांच्या मृत्यूला कारणीभूत असलेलं हे जे काही आहे ती एक 'सैतानी शक्ती' आहे.हे कुठलंही जनावर नाही की जे तुमच्या बंदुकीच्या गोळीने मरेल किंवा इतरांनी आधीच प्रयत्न केलेल्या कोणत्याही मार्गाने मरेल.माझं म्हणणं तुम्हाला पटावं म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि तोवर आपण ही दुसरी सिगरेट ओढू या! ही गोष्ट मला माझ्या बापाने सांगितली होती आणि सर्वांना माहीत आहे की तो कधीही खोटं बोलायचा नाही.


" त्यावेळी माझा बाप एकदम जवान होता आणि माझा तर अजून जन्मच झाला नव्हता.सध्या इथल्या लोकांना त्रास देण्याऱ्या अशाच एका दुष्टात्म्याने आमच्या गावात वास्तव्य केलं होतं. सर्वजण त्याला बिबट्याच समजत होते.बाया, पोरं माणसं सतत मारली जात होती,आणि इथे सध्या जे होतंय तेच तेव्हाही होत होतं,त्याला मारण्यासाठी सर्व परीने प्रयत्न झाले,सापळे लावले गेले,मोठमोठ्या शिकाऱ्यांनी मचाणावर बसून बिबळ्या समजून बंदुका झाडल्या,पण जेव्हा एवढे प्रयत्नही फोल ठरले तेव्हा मात्र लोकांच्या मनात जबरदस्त भीती बसली. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत घराबाहेर पडण्याचीच कोणाची छाती होत नव्हती.'


" सर्व उपाय थकले तेव्हा माझ्या बापाच्या गावच्या मुखियाने आसपासच्या सर्व गावातल्या मुखियांची या संबंधात निर्णय घेण्यासाठी पंचायत बोलावली.सर्व जण जमल्यावर पंचांनी सांगितलं की या नरभक्षक बिबळ्यापासून संरक्षण म्हणून काही नवीन उपाययोजना करण्यासाठी पंचायत बोलावली आहे.आदल्या रात्री बिबळ्याने मारलेल्या आपल्या नातवाचा दहनविधी उरकून स्मशानघाटावरून नुकताच परतलेला एक म्हातारा उठला आणि म्हणाला, "अगदी शेजारी झोपलेल्या माझ्या नातवाला घरात शिरून उचलून घेऊन जाणारा हा बिबळ्या म्हणजे साधा बिबळ्या नाही,तर आपल्या

सारख्या हाडामासांचा एक माणूस आहे आणि तो रक्तामांसाची इच्छा झाल्यावर बिबळ्याचे रूप घेतोय.इतर कोणत्याही उपायाने तो खतम होणार नाही.फक्त आग हे शेवटचं अस्त्र उरलंय." त्याच्या म्हणण्यानुसार त्याला पडक्या देवळाजवळच्या झोपडीत राहणाऱ्या साधूचा संशय येत होता.


" हे ऐकल्यानंतर सर्व बाजूने कुजबूज व आरडाओरडा सुरू झाला.काहींचं म्हणणं पडलं की नातू दगावल्यामुळे म्हाताऱ्याचं डोकं बिघडलंय तर काहींना त्याचं पटतही होतं.ज्यांना त्याचं म्हणणं थोडं पटत होतं त्यांनी सर्वांना आठवण करून दिली की हे बळी जायला सुरुवात होण्याच्या सुमारासच हा साधू गावात राहायला आला होता.आणि जेव्हा एखादा बळी जात असे त्याच्या दुसऱ्या दिवशी हा साधू त्याची खाट भर उन्हात टाकून दिवसभर झोपलेला दिसायचा. "


"कुजबूज शांत झाल्यावर आणि बरीच उलटसुलट चर्चा झाल्यानंतर शेवटी पंचायत अशा निर्णयावर आली की लगेच कोणतीही कारवाई करू नये पण यापुढे त्या साधूच्या सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवावी.जमलेल्या लोकांमधून लगेचच टेहळणीसाठी तीन पथकं बनवली गेली.सर्व बळी विशिष्ट अंतरानेच पडत असल्याने पुढचा बळी जाण्याचा जो अपेक्षित दिवस होता त्या पूर्वीच पहिल्या गटाने टेहळणी करायला सुरुवात करायची होती.


"पहिला व दुसरा गट टेहळणी करत असताना साधूने झोपडी सोडली नाही.माझा बाप तिसऱ्या गटात होता.

अंधार पडण्याच्या सुमारास त्यांनी आपापल्या जागा घेतल्या.लवकरच झोपडीचा दरवाजा उघडला गेला,साधू बाहेर पडला आणि अंधारात गुडूप झाला.काही तासानंतर दूरवर डोंगरावरच्या कोळसेवाल्याच्या घराच्या दिशेकडून एक किंकाळी ऐकायला आली व नंतर सर्व काही शांत झालं.पार्टीतल्या एकानेही रात्रभर डोळे मिटले नाहीत आणि जेव्हा तांबडं फुटलं तेव्हा त्यांनी साधूला घाईघाईने झोपडीकडे येताना पाहिलं... त्याच्या हातातून व तोंडातून रक्त गळत होतं!"


"साधू झोपडीत शिरला आणि त्याने दरवाजा लावून घेतला.हे सर्वजण झोपडीजवळ गेले साखळी कोयंड्यात अडकवून तो बाहेरून बंद करून घेतला व त्यानंतर प्रत्येक जण त्याच्या त्याच्या गंजीकडे गेला.येताना प्रत्येकाने गवताच्या काही पेंढ्या आणल्या.त्यादिवशी सूर्य उगवण्याच्या सुमारास त्या झोपडीच्या जागी राखेशिवाय काहीही उरलं नव्हतं.त्या दिवसा पासून नरबळी घडण्याचे प्रकार बंद झाले."


"अजून तरी इकडे असलेल्या कोणत्याही साधूवर कोणाचा संशय निर्माण झालेला नाही पण जेव्हा तसं होईल तेव्हा माझ्या बापाच्या काळात जी उपाययोजना केली गेली ती माझ्याही काळात केली जाईल.पण तो दिवस येईपर्यंत गढवाली जनतेला त्यांच्या वाटेचे भोग भोगलेच पाहिजेत."


"आता तुम्ही मला बोकड विकत देण्याबद्दल विचारलंत.

तर साहेब माझ्याकडे जास्तीचा एकही बोकड नाही.पण माझी गोष्ट ऐकल्यानंतरही तुम्ही म्हणत असाल तर बांधण्यासाठी म्हणून मी माझा एक मेंढा उसना देतो.जर तो मारला गेला तर तुम्ही मला पैसे द्यायचे पण जिता राह्यला आपल्यात कोणताही व्यवहार होणार नाही. आजचा दिवस व रात्र मी इकडे आहे.उद्या 'भूतियां'ची चांदणी उगवण्याच्या वेळेला मला निघालंच पाहिजे."


त्या दिवशी संध्याकाळी मी परतलो तेव्हा त्या ओझीवाल्या मित्राने आनंदाने मला पाहिजे तो मेंढा दिला.बिबळ्याला दोन रात्री पुरेल एवढा मोठा! त्याला मी सकाळी बिबळ्याने जिथे यात्रामार्ग सोडून जंगलाची वाट पकडली होती तिथे बांधला.


दुसऱ्या दिवशी मी लवकरच उठलो.बंगल्याबाहेर पडताना परत एकदा व्हरांड्याखालीच मला त्याचे पगमार्कस दिसले.फाटकापाशी त्या पगमार्कसचं निरीक्षण केल्यावर कळलं की तो बिबळ्या काल रात्री गुलाबराईच्या दिशेनेच

आला होता आणि रुद्रप्रयाग बाजाराच्या दिशेने निघून गेला होता.याचा अर्थ त्याला माणूसच पाहिजे होता.मला नंतर कळलं की त्याने तो मेंढा मारला होता पण त्याला थोडं सुद्धा खाल्ल नव्हतं.


"परत घरी जा साहेब आणि तुमचा वेळ व पैसा वाचवा" हा त्या म्हाताऱ्याचा निरोपाचा सल्ला होता.लगेच त्याने त्याच्या कळपासाठी खुणेची शिट्टी वाजवली आणि तो हरिद्वारच्या दिशेने निघून गेला.


अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी रुद्रप्रयागजवळ घडली होती.पण सुदैवाने तिचा शेवट इतका वाईट झाला नाही.

आपल्या नातलगांच्या आणि मित्रांच्या मृत्यूमुळे माथी भडकलेल्या एका जमावाने दासजल पट्टी जवळच्या 'कोठगी' गावात एका साधूला पकडलं.त्यांनाही असा संशय होता की या सर्व नरबळींमागे माणसांपैकीच कोणाचा तरी हात आहे.सुदैवाने त्या जमावाचा राग त्या साधूवर निघण्याच्या आत गढ़वालचा तेव्हाचा डेप्युटी कमिशनर फिलीप मेसन तिथे आला.त्याचा कॅम्प जवळच होता.त्याला एकूण वातावरणाचा अंदाज आला आणि चांगला अनुभवी प्रशासक असल्याने त्याने एक शक्कल लढवली.तो म्हणाला की खरा गुन्हेगार सापडलाय याबद्दल त्याची खात्री आहे पण एखाद्या माणसाला देहदंड देण्याअगोदर त्याचा गुन्हा सिद्ध व्हायला पाह्यजे.तेव्हा त्या साधूला नजरकैदेत ठेवावं.हे सर्व जमावाला मान्य होतं.पुढचे सात दिवस व रात्र त्याला पोलिसांच्या आणि जमावांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं.आठव्या दिवशी पहारेकरी व इतर टेहळे यांची अदलाबदल होत असतानाच बातमी मिळाली की तिथून काही मैल दूर एका गावात घरात घुसून बिबळ्याने एक माणूस उचलून नेलाय.


मग मात्र जमावाने साधूला सोडून द्यायला विरोध केला नाही.'या वेळेला चुकीचा माणूस पकडला गेला असेल,पण पुढच्या वेळी ही चूक होणार नाही.' असं समाधान करून घेऊन साधूला जिवानिशी सोडण्यात आलं.


गढ़वाल भागात अशा नरबळींसाठी जसं 'साधू' ना जबाबदार धरलं जातं तसे नैनिताल - अल्मोडा भागात 'बोख्सर ना धरलं जातं.हे बोख्सर फूटहिल्सच्या पायथ्याच्या 'तराई' या गवताळ पट्ट्यात वास्तव्य करून असतात आणि प्रामुख्याने शिकारी करून पोटं भरतात.


साधू रक्तमांसाला चटावल्यामुळे असं करतात तर बोख्सर हे बळीच्या अंगावरच्या दागिन्यांसाठी व मूल्यवान वस्तूंसाठी नरबळी घेतात असा समज आहे.


नरभक्षकांकडून जास्त प्रमाणात नेहमी स्त्रियांचे बळी जातात हे खरंय पण त्याची निश्चित अशी काही कारणं आहेत.!


हे सर्व समज भीतीतून किंवा अगतिकेतून येतात. मीही अतिशय कल्पनातीत अशा एकांतात नरभक्षकांसाठी पुलांवर,पायवाटांवर,आमिष म्हणून बांधलेल्या गाऱ्यांवर किंवा नरबळीशेजारी रात्री रात्री जागून काढल्या आहेत.

एकदा तर सलग वीस रात्री- तेव्हा भीतीमुळे मलाही भास व्हायचे की धड जनावराचं पण तोंड सैतानाचं असलेला,

नरभक्षक मला जवळून कुठूनतरी लपून पहातोय,माझ्या मूर्ख खटपटींकडे पहात आतल्या आत सैतानी हास्य करतोय आणि मला एकदा तरी बेसावध अवस्थेत गाठून माझ्या गळ्यात त्याचे दात रुतवण्याचं स्वप्न रंगवत जिभल्या चाटतोय!


आता तुम्ही असा प्रश्न विचाराल की इतके सर्व नरबळी जात असताना सरकार काय करत होतं? पण एकूण दहा आठवडे रुद्रप्रयाग परिसरात घालवल्यानंतर आणि त्या भागातल्या प्रत्येक गावाला भेट दिल्यानंतर मी एवढं नक्की सांगू शकतो की शासनाने त्यांच्या यंत्रणेला जेवढं शक्य होतं ते सर्व केलं होतं.बक्षिसं जाहीर केली गेली (स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार रु. १०,००० व दोन गावांचं इनाम' अशी बक्षीसं होती) निवडक शिकारी घसघशीत मानधन देऊन बोलावले गेले,(आणि परत यश मिळालं तर बक्षीसं होतीच !) आधीच असलेल्या चार हजार लायसेन्सेसशिवाय तीनशे लायसेन्सेस फक्त नरभक्षकाच्या शिकारीसाठी दिली गेली. लॅन्सडाऊनच्या गढवाल रेजिमेंटच्या सैनिकांना रजेवर गावी जाताना रायफली घेऊन जाण्याची परवानगी दिली गेली किंवा त्यांच्या ऑफिसर्सनी त्यांना बंदूका देऊ केल्या,देशभराच्या शिकाऱ्यांना प्रेसमधून आवाहन केलं गेलं,आमिष म्हणून बोकड बांधून 'ड्रॉप डोअर' पद्धतीचे सापळे लावले गेले,

सर्व गावांच्या पटवाऱ्यांना नरबळीमध्ये टाकण्यासाठी विषाच्या कॅपसूल्स दिल्या गेल्या आणि बऱ्याच सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या सांभाळून उरणारा वेळ नरभक्षकाच्या शिकारीसाठी घालवला.


ह्या सर्व उपाययोजनांचा एकत्रित परिणाम काय? तर बंदुकीच्या गोळीमुळे बिबळ्याच्या मागच्या डाव्या पायाच्या गादीला झालेली छोटी जखम आणि सरकारी दफ्तरात केली गेलेली विषाबाबतची खालीलप्रमाणे नोंद...


'विषाचा योग्य तो परिणाम होण्याऐवजी या बिबळ्याच्या शरीरात भिनलेल्या विषामुळे बिबळ्या उत्तेजित झाल्याचे व विष पचवल्याचे आढळले आहे.'


नरभक्षकाला मारण्यासाठी जे काही प्रयत्न झाले त्या संबंधीच्या तीन महत्त्वाच्या नोंदी मी मुद्दाम इथे देतोय....


पहिली नोंद :प्रेसमधील आवाहनामुळे दोन तरुण ब्रिटिश अधिकारी १९३२ साली रुद्रप्रयागला आले.अलकनंदा नदी ओलांडण्यासाठी नरभक्षक रुद्रप्रयागमधील झुलत्या पुलाचा वापर करतो असा अंदाज त्यांनी कोणत्या आधारावर काढला ते माहीत नाही पण त्यांनी त्यांचे सर्व प्रयत्न त्या पुलावरच केंद्रित करायचं ठरवलं.पुलाच्या दोन्ही बाजूच्या तीरावर टॉवर्स बांधले होते.त्यातूनच पुलाला आधार देणाऱ्या केबल्स जात असत. एक शिकारी उजव्या तर एक शिकारी डाव्या टॉवरवर बसला.जवळजवळ दोन महिने टॉवरवर अशाप्रकारे पहारा दिल्यानंतर एका रात्री डाव्या तीरावरच्या टॉवरवर बसलेल्या शिकाऱ्याने बिबळ्याला कमानीतून पुलावर येताना पाह्यलं. त्याला पुलाच्या मध्यावर येऊ दिल्यावर त्याने फायर केलं.त्यासरशी तो बिबळ्या वेगाने पूल ओलांडत असताना उजव्या टॉवरवर बसलेल्याने त्याच्या रिव्हॉल्व्हरचे सहाच्या सहा चेंबर्स रिकामे केले.दुसऱ्या दिवशी सकाळी पुलावर आणि पुलापलीकडच्या डोंगरावरच्या पायवाटेवर रक्ताचे माग मिळाले.त्यामुळे हा शोध जारी ठेवला गेला त्यानंतर जवळजवळ ६ महिने नरभक्षकाकडून एकही माणूस मारला गेला नाही.ते सातही शॉट ऐकलेल्या आणि नंतरच्या शोध मोहिमेमध्ये भाग घेतलेल्या माणसांनी ही घटना मला नंतर सविस्तर सांगितली.सर्वांना असं वाटलं होतं की पहिली गोळी त्याच्या पाठीत घुसली असावी आणि नंतरच्या सहा गोळ्यांपैकी एक डोक्यात लागली असावी.म्हणूनच इतका सातत्याने शोध घेतला गेला होता रक्ताच्या मागाबद्दल मला जी माहिती दिली गेली त्यावरून माझं मत असं पडलं की त्या बिबळ्याच्या धडावर किंवा डोक्यावर गोळी लागलीच नसणार.कारण फक्त पायाला झालेल्या जखमांमुळेच त्या प्रकारचा रक्ताचा माग मिळू शकतो. नंतर... म्हणजे खूप नंतर समाधानाची बाब अशी की माझा कयास खरा ठरला... डाव्या तीरावरून मारलेल्या गोळीने फक्त मागच्या डाव्या पावलाच्या गादीचा टवका उडाला होता तर उजव्या टॉवरवरून मारलेले सर्वच्या सर्व शॉट्स चुकले होते.


दुसरी नोंद : ' ड्रॉप डोअर' प्रकारच्या सापळ्यामध्ये जवळजवळ २० बिबळे सापडून ठार झाल्यानंतर शेवटी एक असा बिबळ्या अडकला की तो नरभक्षकच असणार याबद्दल सर्वांची खात्री होती.नरभक्षकाने मारलेल्या माणसांचे अतृप्त आत्मे आपल्याला भुतं बनून त्रास देतील या भीतीने एकही हिंदू माणूस बिबळ्याला मारायला तयार होत नव्हता.शेवटी एका भारतीय ख्रिश्चनाला बोलावणं पाठवलं गेलं.हा माणूस ३० मैलावरच्या एका गावात राहायचा आणि तो इकडे पोचायच्या आत त्या सापळ्यातून तो बिबळ्या निसटला आणि पसार झाला.


तिसरी नोंद : एका माणसाला मारल्यानंतर हा बिबळ्या जंगलाच्या एका विशिष्ट पट्ट्यात भक्ष्य ठेऊन जवळच लपून बसला होता.बळीचे अवशेष शोधण्यासाठी निघालेल्या शोधपथकाला दुसऱ्या दिवशी तो बिबळ्या जंगलातून बाहेर पडताना दिसला.थोड्याशा पाठलगानंतर तो एका गुहेत शिरताना आढळला.त्या सर्वांनी गुहेचं तोंड मोठमोठ्या दगडांनी व काटेरी झुडूपांनी बंद करून टाकलं.दरदिवशी वाढत्या संख्येने लोक त्या गुहेला भेट देऊ लागले.पाचव्या दिवशी जवळजवळ पाचशे माणसं तिथे जमलेली असताना एक माणूस तिथं आला.त्या माणसाचं नाव मला सांगितलं गेलं नाही.पण ही त्या भागातली 'वजनदार' असामी होती असं सांगितलं गेलं..


पुढची हकीकत गावकऱ्यांच्याच शब्दात ऐका "हा माणूस बोलला की त्या गुहेत बिबळ्या वगैरे काही नाहीच,असं म्हणून त्याने काटेरी झुडपं हलवली आणि त्याचक्षणी बिबळ्या अचानक गुहेतून बाहेर पडला आणि त्या पाचशे माणसांमधून वाट काढत सटकून निघून गेला. "


खरंतर या तिन्ही घटना हा बिबळ्या नरभक्षक बनल्यानंतर लगेचच घडल्या होत्या.जर पुलावरचा नेम अचूक ठरला असता सापळ्यात अडकलेला असताना त्याला गोळी घातली गेली असती किंवा तो गुहेतच कायमचा जेरबंद केला असता तर गढवालच्या जनतेला इतकी किंमत चुकवायला लागली नसती.


२७ जुलै २०२३ या लेखातील पुढील भाग..