* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: द वेल्थ ऑफ नेशन्स-ॲडम स्मिथ - (१७७६)

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५/७/२३

द वेल्थ ऑफ नेशन्स-ॲडम स्मिथ - (१७७६)

'जे सगळे आहे ते आमच्यासाठी,आमच्या हस्तकांसाठी.

नाही रे वर्गासाठी काहीच नाही.' अशी संकुचित विचारसरणी जगाच्या सर्वच सत्ताधारी वर्गात दिसून येते.

अशा वेळी त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम ॲडम स्मिथने आपल्या 'वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकातून केलं आहे.आज जगात फोफावलेला संधि-साधूपणा आणि चंगळवाद पाहता ॲडम स्मिथची आणि

त्याच्या या पुस्तकाची गरज प्रकर्षाने जाणवते.आधुनिक अर्थशास्त्राचा आद्य प्रवर्तक अशी ओळख असलेला ॲडम स्मिथ हा अठराव्या शतकातला एक स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ,

तत्त्वज्ञ होता.तो आधुनिक अर्थशास्त्राचा पितामह म्हणून ओळखला जातो.इतकंच नाही,तर भांडवल शाहीचा

जनक म्हणूनही लोक त्याला ओळखतात.'द थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स' (१७५९) आणि 'ॲन एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स' (१७७६) ही त्याची पुस्तकं म्हणजे अर्थशास्त्रातलं अमूल्य असं योगदान मानलं जातं.अर्थशास्त्राला नैतिकतेचं परिमाण जोडणारा हा अर्थतज्ज्ञ गेल्या दोन-अडीच शतकांपासून जगाच्या अर्थव्यवस्थेवर,राजकारणावर आपली छाप दाखवत आहे.ॲडम स्मिथने ग्लॅसगो विद्यापीठातून सोशल फिलॉसॉफी या विषयात प्रावीण्य मिळवल होत.द थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स' या पुस्तकात स्मिथने अदृश्य हाताची संकल्पना मांडली आणि ती खूपच लोकप्रिय ठरली.स्मिथनं अतिशय महत्त्वाचं काम प्रसिद्ध केलं ते पुस्तक म्हणजे 'ॲन एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द 'वेल्थ ऑफ नेशन्स' हे होतं,पण या पुस्तकाचं नाव लांबलचक असल्यामुळे ते 'द वेल्थ ऑफ 'नेशन्स' याच नावान रूढ झालं.ॲडम स्मिथनं 'वेल्थ ऑफ नेशन्स' हे पुस्तक लिहून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यांची सांगड घातली.ॲडम्स स्मिथच्या जन्मापूर्वी म्हणजे जवळजवळ २००० वर्ष आधी होऊन गेलेला कौटिल्य आणि १०० वर्षांनंतर झालेला कार्ल मार्क्स यांच्याव्यतिरिक्त राज्यशास्त्राचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध खऱ्या अर्थाने प्रभावीपणे कोणीच मांडला नव्हता.

'जे सगळे आहे ते आमच्यासाठी,आमच्या हस्तकांसाठी.

नाही रे वर्गासाठी काहीच नाही' अशी संकुचित विचारसरणी जगाच्या सर्वच सत्ताधारी वर्गात दिसून येते.अशा वेळी त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम ॲडम्स स्मिथने आपल्या 'वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकातून केलं आहे.आज जगात फोफावलेला संधिसाधूपणा आणि चंगळवाद पाहता ॲडम्स स्मिथची आणि त्याच्या या पुस्तकाची गरज प्रकर्षाने जाणवते.बटबटीत डोळे आणि लांबट नाक असलेला ॲडम्स स्मिथ म्हणतो,'मी सुंदर नसलो तरी माझी पुस्तकं सुंदर असतील'आज त्याच्या लौकिक दिसण्यापेक्षा,त्याच्या विचारांची ओळख जगाला अधिक आहे.ॲडम्स स्मिथचा जन्म नक्की कधी झाला याची कुठेही अधिकृत नोंद नाही.,मात्र त्याचा बाप्तिस्मा ५ जून १७२३ रोजी झाल्याची नोंद आढळते.काही ठिकाणी

ॲडम्स स्मिथ आणि मागरिट डग्लस या दांपत्याच्या पोटी १६ जून १७२३ या दिवशी स्कॉटलंडमधल्या किर्केकॅल्डी या छोट्याशा गावात ॲडम स्मिथचा जन्म झाल्याचं म्हटलं जातं.त्याच्या जन्मापूर्वीच दोन महिने अगोदर त्याचे वडील ॲडम स्मिथ यांचं निधन झालं होतं. ना भाऊ ना बहीण.

केवळ आईची माया त्याला लाभली.मासेमारी हा गावातला प्रमुख व्यवसाय होता.ॲडम स्मिथची आई मागरिट डग्लसचं माहेर श्रीमत असल्याने तो तीन वर्षांचा होईपर्यंत त्याला परिस्थितीचे चटके सोसावे लागले नाहीत.तीन वर्षांचा असताना ॲडम स्मिथच्या बाबतीत एक भयंकर घटना घडली.काही भटक्या टोळ्यांनी त्याचं अपहरण केलं.मात्र ॲडम स्मिथला ताब्यात घेतल्यानंतर हा मुलगा आपल्या काहीही कामाचा नाही.हे लक्षात येताच. त्यांनी त्याला परत घराजवळ आणून सोडलं.या घटनेचा मागरिट डग्लसच्या मनावर खूप परिणाम झाला.

त्यानंतर ॲडम स्मिथला तिने वयाच्या १४व्या वर्षापर्यंत नजरेआड होऊ दिलं नाही.कायम आईच्या पदराआड ठेवल्याने त्याला कोणीही जवळचे मित्र-मैत्रिणी मिळालेच नाहीत. घराजवळच्याच बर्ग स्कूल ऑफ किर्ककॅल्डी इथे त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं आणि १४ वर्षांचा ॲडम स्मिथ किर्ककॅल्डी सोडून ग्लासगो विद्यापीठात तत्त्वज्ञान शिकायला दाखल झाला.ॲडम स्मिथच्या व्यक्तिमत्त्वाला ग्लासगो विद्यापीठात पैलू पडले.त्याच्यात वक्तृत्व कौशल्य विकसित झालं.तसंच त्याची भाषा आणि व्याकरण अतिशय चांगलं तयार झालं.ग्रीक भाषा आणि तत्त्वज्ञान यात स्मिथनं चांगलीच हुकमत मिळवली.या काळात तो आपल्या आईला पत्रही लिहीत असे.

अभ्यासात स्मिथने कधीच आळस केला नाही.स्नेल एक्झिबिशन ही शिष्यवृत्ती मिळवून तो ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या बाटलीबॉय कॉलेजमध्ये दाखल झाला.

तिथे जाण्यापूर्वी ग्लासगो विद्यापीठातल्या आपल्या वह्या आणि पुस्तकं त्याने रद्दीच्या दुकानात विकून टाकले.मात्र पुढे त्याचं त्या काळातलं सगळं हस्त लिखित सापडलं आणि  ते जतन करण्यात आलं.ऑक्सफर्ड विद्यापीठाशी स्मिथचे सूर काही जुळले नाहीत.विद्यापीठाला अपेक्षित प्रगती ॲडम स्मिथ करू शकला नाही आणि विद्यापीठाच्या चौकटीत आपलं वाचन सीमित करणंही त्याला जमलं नाही.त्यातच त्याच्या अपस्माराच्या दुखण्यानं डोकं वर काढलं.खरं तर ग्लासगो विद्यापीठात असताना तिथले प्राध्यापक फ्रान्सिस हचसन यांनी ॲडम स्मिथला तयार करण्यात खूप परिश्रम घेतले होते.आणि तितकंच प्रेमही केलं होतं.त्या तुलनेत ऑक्सफर्डमधले प्राध्यापक त्याला कोरडे आणि रुक्ष असल्याचं वाटायचं.

याच कारणाने शिष्यवृत्तीचा कालावधी शिल्लक असतानाही स्मिथने ऑक्सफर्डला रामराम केला.आणि मामाच्या ओळखीने त्याने एडिनबर्ग विद्यापीठात व्याख्यानं द्यायला सुरुवात केली.यातूनच त्याला पुढल्याच वर्षी नैतिक तत्त्वज्ञान विभागाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली.याच दरम्यान ॲडम स्मिथची ओळख डेव्हिड ह्यूम यांच्याशी झाली.ॲडम स्मिथच्या आयुष्यात फ्रेंड,

फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून आलेली ही एकमेव व्यक्ती.डेव्हिड ह्यूम हा स्मिथपेक्षा वयाने दहा वर्षांनी मोठा होता.या दोघांची तत्त्वज्ञान,तर्क,नैतिकता अशा अनेक विषयांवर तासन्तास चर्चा रंगत असे.यातूनच ॲडम स्मिथची व्याख्यानं अधिक धारदार आणि लोकप्रिय होऊ लागली.या निवडक व्याख्यानांचं संकलित रूप म्हणून १७५९ मध्ये ॲडम स्मिथचं पहिलं पुस्तक 'द थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेट' जन्माला आलं.हे पुस्तक अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झालं आणि अनेक श्रीमंत मुलं आपलं शिक्षण सोडून स्मिथकडे शिकण्यासाठी येऊ लागली.

स्मिथ खूप लोकप्रिय व्यक्ती बनला होता.वर्गामध्ये शिकवताना त्याचं मुलांकडे बारकाईने लक्ष असायचं.

शिकवताना एखाद्या विद्यार्थ्याने जांभई जरी दिली.किंवा तो मागे सरकून आरामात टेकून बसला असं स्मिथच्या लक्षात आलं तरी तो आपलंच काही तरी चुकलं असं समजून विषय सोपा करायचा किंवा विषय बदलायचा किंवा विषयाची मांडणी वेगळ्या प्रकाराने करायचा.याच त्याच्या दृष्टिकोनामुळे आणि अभ्यासामुळे तो आपल्या व्याख्यानात श्रोत्यांची नस बरोबर पकडत असे.पुढली १३ वर्षं प्राध्यापक म्हणून तत्त्वज्ञान, नैतिकशास्त्र हे विषय शिकवण्याचं काम करत असताना हळूहळू जाणीवपूर्वक स्मिथने आपला रोख अर्थशास्त्र या विषयाकडे वळवला.

खरं तर त्याचा हा प्रवासच 'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकाची तयारी घडवत होता.ॲडम स्मिथच्या अर्थशास्त्रावरच्या व्याख्यानांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली.ग्लासगो विद्यापीठाने त्याला 'डॉक्टर ऑफ लॉज' ही पदवी प्रदान केली.याच दरम्यान डेव्हिड ह्यूमने स्मिथची ओळख चार्ल्स टाऊनसेंड या उमरावाशी करून दिली. त्याच्या राजकुमार हेन्री स्कॉट नावाच्या सावत्र मुलाला शिकवण्याचं काम स्मिथने करावं,असा प्रस्ताव त्याला देण्यात आला.यासाठी स्मिथला ३०० पौंड + प्रवास भत्ता असं घसघशीत मानधन दरवर्षी मिळणार होतं.याशिवाय शिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर ३०० पौंड निवृत्तिवेतनही दिलं जाणार होतं.आपल्या प्राध्यापकीच्या संपूर्ण कालावधीमध्ये एवढी रक्कम ॲडम स्मिथ कधीच मिळवू शकला नसता.त्यातच स्मिथ अविवाहित असल्यामुळे त्याच्यावर कुठल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही नव्हत्या अणि तो कुठेही जायला मुक्त होता. साहजिकच स्मिथने प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि चार्ल्स टाऊनसेंडचा प्रस्ताव स्वीकारला.इतर विद्यार्थ्यांशी केलेल्या करारानुसार स्मिथने त्यांची घेतलेली फी परत करण्याचं जाहीर केलं,पण त्याच्या एकाही विद्यार्थ्याने आपली फी परत घेतली नाही. स्मिथने त्यांना भरभरून शिकवलं होतं,अशीच त्यांची भावना होती.टाऊनसेंड कुटुंबासोबत स्मिथ फ्रान्समध्ये फिरण्यासाठी गेला असताना त्याच्याकडे भरपूर मोकळा वेळ होता.या प्रवासात त्याची भेट तत्त्वज्ञ व्हॉल्टेअर,जोसेफ ब्लॅक,जेम्स वॉट, बेंजामिन फ्रैंकलिन यांसारख्या हरहुन्नरी व्यक्तींशी झाली.त्यांच्या भेटीने त्याच्या ज्ञानात भर पडली. मात्र शिकवण्याची,विचार मांडण्याची त्याची बौद्धिक भूक शमली जात नव्हती.या भुकेतून 'द वेल्थ ऑफ नेशन्स' हे पुस्तक जन्माला आलं.जगातलं सर्व तत्त्वज्ञान अर्थशास्त्रावर आधारित असतं.प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात सुखसोयीच्या वस्तू,नैतिक मूल्य आणि बौद्धिक आनंद या तीन गोष्टी हव्या असतात.त्यांचा प्राधान्य -

क्रमदेखील चढत्या क्रमाने असतो.गरीब असो वा श्रीमंत, गुलाम असो वा गुन्हेगार,प्रत्येकालाच आत्मसन्मान हवा असतो.प्रत्येकजण स्वतःसाठी वकील आणि इतरांसाठी न्यायाधीश बनत असतो.हे प्रत्येकाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत चालू असते.ॲडम स्मिथचं याविषयी सखोल चिंतन,मनन सुरू होतं.नैतिकता,न्याय, राजकारण,धर्म या सर्वांचा डोलारा अर्थशास्त्रावर उभारलेला असतो.आपल्या पूर्वजांची समाजव्यवस्था निर्माण करण्यामध्ये अन्न संचय आणि त्याचा पुरवठा ही आदिम कल्पना होती. संस्कृती तग धरून राहण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी व्यवस्थेची गरज असते,अशी ॲडम स्मिथची मतं होती. आदिम समाजात खासगी मालमत्तेचा उदय झाला आणि त्याबरोबर वितरण करताना न्यायाच्या जाणिवेच्या कल्पना विकसित झाल्या. मालमत्तेच्या वितरणाच्या तीन पद्धती इतिहासात ढोबळमानाने आढळतात.धर्म-सत्तेच्या काळात, सरंजामशाहीच्या काळात आणि आजच्या कालखंडात आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो.या तिन्ही टप्प्यांत न्याय-अन्यायाच्या कल्पना वेगवेगळ्या असल्या,तरी त्यात एक सामाईक धागा होता.तेव्हाही वस्तूला मूल्य होतं आणि आताही वस्तूला मूल्य आहे.

फ्रान्समध्ये पॅरिसला असताना हेन्री स्कॉट बऱ्यापैकी ॲडम स्मिथच्या हाताखाली तयार झाला होता.तसंच याच दरम्यान त्याच्या भावाचा कुठल्याशा आजाराने पॅरिसमध्येच मृत्यू झाला. ही संधी साधून स्मिथने मायदेशी जाण्याचा विचार बोलून दाखवताच चार्ल्स टाउनसेंड याने परवानगी दिली.परत येताच स्मिथने दिवसाचा पूर्ण वेळ 'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकाच्या लिखाणासाठी घालवायला सुरुवात केली. जवळजवळ १० वर्ष राबून हा अनमोल ग्रंथ तयार झाला.पाच पुस्तकांची ही एक मालिका होती. यातल्या लिखाणावर डेव्हिड ह्यूम आणि फ्रान्सिस हवसन या त्याच्या मार्गदर्शकांची छाप दिसून येते,'सुशासन म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित' हा विचार हसन याच्याकडूनच स्मिथ शिकला. ''वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकात नैतिकता आणि तात्त्विकता यावर डेव्हिड हाम याचा प्रभाव जाणवतो.

व्हॉल्टेअरबरोबर केलेल्या चर्चामधून फ्रान्सचा राजा चौदावा लुई आणि पंधरावा लुई यांनी देशाचं नुकसान कसं केलं,देशाची संपत्ती आणि त्यांचा अधिकार याबद्दल त्यान विचारमंथन केलं होतं.राजाचा जनतेच्या पैशावर किती अधिकार असावा याबाबत त्याने यानिमित्ताने चिंतन केलं. याच वेळी फ्रान्सिस क्युंसी या मुक्त व्यापारवाद्याशी त्याची ओळख झाली,तो काळ वसाहतीचा आणि व्यापारी चढाओढीचा होता. जास्तीत जास्त निर्यात करून आणि किमान आयात करून आपला देश श्रीमंत कसा करायचा याबद्दल सर्व युरोपीय देश दक्ष होते. मात्र याच्या उलट मांडणी क्युसी करत होता. कारण यामुळे अल्पकालीन फायदा दिसत असला तरी दीर्घकालीन नुकसान होतं.असं त्याचं मत होते.कोणत्याही सरकारने आयात आणि निर्यात यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये, तर आयात-निर्यातीचा प्रवाह हा निसर्गत:वाहता असला पाहिजे,असं तत्त्व क्युंसीनं मांडलं होतं. 'कोणत्याही देशाच्या अधिकाधिक विकासासाठी मुक्त व्यापार 'आवश्यक आहे' हेच क्युंसीचं तत्त्व स्मिथने 'द वेल्थ ऑफ नेशन्स'मध्ये मांडले.मँडेव्हिल या लेखकाने लिहिलेल्या मधमाश्यांच्या कथेची संकल्पना वापरून ॲडम स्मिथने श्रमविभागणीचं तत्त्व 'द वेल्थ ऑफ नेशन्स' मध्ये सांगितलं.कोणत्याही माणसाला एक काम दिले,तर तो त्या कामामध्ये निपुण बनतो. त्यामुळे प्रत्येकाला कामं वाटून किंवा विभागून दिली,तर उत्पादनाचे प्रमाण अनेक पटीने वाढू शकतं. मधमाश्यांच्या पोळ्यामध्ये दर दिवशी कामाची विभागणी झालेली असते.अशी विभागणी उद्योगामध्ये व्हायला हवी.अशा सोप्या कथांचा आणि रूपकांचा आधार घेत केलेली 'द वेल्थ ऑफ नेशन्स' या संपूर्ण पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत स्मिथने मांडणी केली आहे. श्रमाचा वापर देशात किती कौशल्याने आणि योजकतेने केला जातो,यावर देशाच्या संपत्तीची वाढ अवलंबून असते.संपत्तीचं गमस्थान म्हणून श्रमाचं आणि पर्यायाने श्रमविभागणीचं महत्त्व स्मिथने यात विशद केलंय.आज सोनं आणि चांदी यांना जरी चलन म्हणून खरी मान्यता असली,तरी जेव्हा आपत्काळ येतो तेव्हा आपण सोनं किंवा चांदी अन्न म्हणून खाऊ शकत नाही.त्या वेळी खाण्यासाठी धान्य लागतं. म्हणून राष्ट्राची खरी संपत्ती म्हणजे त्याचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन हेच असतं.आज कोणत्याही देशाची आर्थिक अर्थव्यवस्था किती भक्कम आहे.हे ठरवण्यासाठी आपण त्या राष्ट्राचा जीडीपी म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजत असतो.पूर्वी कोणत्या देशाकडे सोन्याचा किती साठा आहे यावरच तो देश किती श्रीमंत हे ठरवलं जात असे. याचं श्रेय केवळ ॲडम स्थिथकडे जाते.कर आकारणीविषयी 'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकामध्ये स्मिथने सविस्तर चर्चा केली आहे. प्रत्येक राज्याने कल्याणकारी भूमिका स्वीकारली पाहिजे.त्याचबरोबर तिथल्या नागरिकांनीदेखील त्यांची कर्तव्यं बजावली पाहिजेत.राज्याची अर्थ- व्यवस्था भक्कम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या कुवतीप्रमाणे कर भरून शासनाला साहाय्य केलं पाहिजे.

कर आकारणीमध्ये सुलभता आणि सुसूत्रता असेल तर करवसुली अधिक होते;म्हणून प्रत्येक नागरिकाला आपण कोणते कर भरावयाचे आहेत; कधी,कसे आणि कुठे भरायचे आहेत हे आधीच माहीत असणं गरजेचं असतं.

तसंच कर भरण्याची वेळ,पद्धत आणि कराची रक्कम या गोष्टी कर भरणाऱ्या नागरिकाला निश्चितपणे माहीत असल्या पाहिजेत.करवसुली करताना किमान सक्ती असावी.तसंच करवसुलीची यंत्रणादेखील किमान खर्चीक असावी,असं स्मिथने म्हटलं.'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकामध्ये ॲडम स्मिथ गुलामगिरीविरुद्ध दंड थोपटताना दिसतो.मात्र,त्यामागे गुलामगिरीविरुद्ध बंड करणं ही जाणीव नसून अधिकाधिक मजूर उत्पादनासाठी उपलब्ध व्हावेत,मुद्दादेखील तो मांडतो.जिथे मजूर कमी उपलब्ध आहेत,तिथे वेतनाचं प्रमाण वाढतं.त्यामुळे अधिकाधिक श्रमिक तिथे आकर्षिले जातात.कालांतराने श्रमाची मागणी कमी होऊन वेतन कमी होतं.स्मिथ असंही म्हणतो,की या जगात कोणी कोणावर उपकार करत नाही,तर प्रत्येकाला त्याचा स्वार्थ आणि हित जपायचं असतं.तो म्हणतो की, 'दोन व्यापारी जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा ते कला-क्रीडा,संगीत यांचा आनंद घेण्यापेक्षा व्यापारावर चर्चा करतील.आहे त्या परिस्थितीमध्ये माझा काय फायदा आहे हेच पाहतील.माणसाची ही नैसर्गिक वृत्ती आहे.'तो म्हणतो की,'प्रत्येकाच्या स्वहित जोपासण्याच्या प्रक्रिये-मध्येच व्यापार आणि अर्थव्यवस्था यांना चालना मिळत असते. स्मिथच्या मते मुक्त व्यापार असेल तर प्रत्येकाला किमान किमतीमध्ये आपली गुणवत्ता टिकून ठेवावी लागते.म्हणजेच स्पर्धेचा फायदा हा अंतिमतः ग्राहकालाच होत असतो.स्पर्धेमुळे आपोआपच प्रगती होते अणि मालाचा दर्जा सुधारतो. एकाधिकारशाही असेल तर उत्पादकाला आपल्या उत्पादनाच्या किमती हव्या तशा वाढवता येतात;पण स्पर्धेमध्ये ते शक्य नसतं. किमती ठरवताना तो सीमांत उपयोगिता सिद्धान्तदेखील मांडतो.तुम्ही जर वाळवंटात असाल आणि तुम्हाला प्रचंड तहान लागली असेल,त्या वेळी तुम्ही पाण्याच्या एका घोटासाठी जेवढी रक्कम द्याल,तिच्या अर्धी रक्कम तुम्ही पोटभर पाणी पिऊन झाल्यानंतर पुढच्या घोटासाठी देणार नाही,असं स्मिथचं म्हणणं होतं. 'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकाने क्रांती केली असली तरी या पुस्तकाला काळाच्या मर्यादा आहेत,

कारण हे पुस्तक ज्या वेळी प्रसिद्ध झालं, त्या वेळी औद्योगिक क्रांती व्हायची होती. माणसाला यंत्र समजून घेणारे कारखाने उभे राहिले नव्हते.कारखाने नसल्यामुळे त्या काळात कोणत्याही कामगार संघटना निर्माण झाल्या नव्हत्या.त्यामुळे रोजगाराची मागणी आणि वेतनाचं नैसर्गिक संतुलन राहील,हा स्मिथचा मुद्दा काळाच्या ओघात खोटा ठरला.सरकारी हस्तक्षेप अजिबात नको,

असं म्हणताना त्याच्याकडून अनेक गोष्टी सुटून गेल्या.या सुटलेल्या गोष्टींचा फायदा घेतच भांडवलदार 'सरकारने हस्तक्षेप करू नये, आम्हाला 'स्वातंत्र्य द्यावं' अशी मागणी करताना ॲडम स्मिथचा दाखला देत असतात.ॲडम स्मिथनं लिहिलेलं 'द वेल्थ ऑफ नेशन्स' हे पुस्तक अजिबात बोजड नाही.किंबहुना आपण एखादा कधी न संपावा असं वाटणारा ललित लेख वाचत आहोत असंच वाटतं.त्यात कथा आहेत,कविता आहेत आणि अगदी सहज सोपी मांडणी आहे.कोणतेही मोठे आकडे किंवा न कळणारी क्लिष्ट समीकरणं या पुस्तकात टाकलेली नाहीत.अर्थव्यवस्थेचं संतुलन नैसर्गिकरीत्या व्हावं याचा आग्रह ॲडम स्मिथ करताना दिसतो.'मागणी किमती यांचा सहसंबंध असो,बचत - गुंतवणूक किंवा मागणी-पुरवठा यांचा सहसंबंध असो,बाजारपेठेतल्या अदृश्य हाताने म्हणजेच बाजारपेठेच्या नियमांमुळे आपोआप संतुलन घडत असतं.हाच नियम रोजगार आणि वेतन यांनादेखील लागू होतो आणि आयात-

निर्यातीच्या चक्रालादेखील लागू होतो.'असं मांडताना ॲडम स्मिथने लोकांना समजतील आणि कळतील अशी उदाहरणं दिली. थोडक्यात,एखाद्या प्रेमळ आजोबांनी आपल्या नातवाला मांडीवर बसवून गोष्टींतून काही तरी शिकवावं असा या पुस्तकाचा बाज आहे. म्हणूनच ॲडम स्मिथला 'अर्थशास्त्राचा पितामह' म्हटलं जातं ते सर्वार्थाने किती खरं आहे हे लक्षात येतं. स्मिथच्या मांडणीचा प्रभाव एकोणिसाव्या शतकातल्या डेव्हिड रिकार्डो आणि कार्ल मार्क्स,तसंच विसाव्या शतकातल्या जॉन मेनार्ड केन्स आणि मिल्टन फ्रीडमन या अर्थशास्त्रज्ञांवरदेखील पडला.

'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकाचा खप इतका प्रचंड वाढला,की युरोपातल्या सगळ्याच भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं.अठराव्या शतकानंतर हे पुस्तक युरोप आणि अमेरिका खंडात सर्वत्र पोहोचलं होतं.

भांडवलदारांना तर 'द वेल्थ ऑफ नेशन्स' हे पुस्तक ॲडम स्मिथने जणू काही आपल्या साठीच लिहिलंय असं वाटायचं.या पुस्तकानं जगभर इतकी खळबळ माजवली,की हे पुस्तक युगप्रवर्तक पुस्तकांच्या यादीत आपला ठसा कायमचा उमटवून बसलं.१९ जून १७९० या दिवशी वयाच्या ६७ व्या वर्षी  स्मिथचा मृत्यू झाला.

स्वतःच्या दिसण्याबद्दल न्यूनगंड असलेला ॲडम स्मिथ,ज्याने स्वतःचं चित्र काढण्यासाठी क्वचितच वेळ दिला,आज तो इंग्लंडच्या घराघरांत पोचला आहे.आज २० पौंडच्या ब्रिटिश नोटेवर आपण त्याची छबी पाहू शकतो.याशिवाय त्याच्या नावाने सुरू असलेल्या अनेक संस्था आज ज्ञानदानाचे काम करून खऱ्या अर्थाने या त्याच्या कार्याला सलामी देत आहेत.स्मिथ आणि त्यानं लिहिलेलं 'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकानं अर्थशास्त्राच्या विश्वात आपलं अढळ स्थान कोरून ठेवलं यात काही शंकाच नाही !


" ज्या समाजातले बहुतांश लोक गरीब आणि दुःखी असतात,तो समाज सुखी आणि समृद्ध असू शकत नाही." - ॲडम स्मिथ


१७ जून २०२३ या लेखमालेतील पुढील लेख.