१६८० च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ ! जेव्हा एडमंड हॅली आणि त्याचे मित्र क्रिस्टोफर रेन आणि रॉबर्ट हुक लंडनच्या कॉफी हाउसमध्ये बसून एक सहजच पैज मारणार होते,ज्याचा परिपाक पुढे जाऊन आयलॅक न्यूटनच्या प्रिन्सीपिआ ग्रंथात होणार होता,जेव्हा हेन्री कॅव्हेंडिश पृथ्वीचं वजन करणार होता आणि अशीच इतरही खूपच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद कामं हाती घेतली जाणार होती,जी या पुस्तकाच्या गेल्या पाचशे-सहाशे पानांत बघितलीत. अशा वेळी आणखी असंच एक मैलाचा दगड गाठला जात होता मॉरिशस बेटावर किनाऱ्यापासून दूर हिंदी महासागरात, मादागास्कर बेटाच्या पूर्वेला साधारणपणे १३०० किलोमीटर्सवर ! त्या ठिकाणी कुणी विसरलेला खलाशी किंवा खलाश्याचा पाळीव प्राणी हा नामशेष होत आलेल्या 'डोडो' पक्ष्यांच्या उरल्यासुरल्या छोट्या गटावर वारंवार हल्ले करत,त्यांना पुरतं नामशेष करण्यात गढलेला होता.डोडो पक्षी बिचारे उडू न शकणारे, भोळेभाबडे आणि समोर आलेल्यावर विश्वास ठेवणारे आणि चपळपणे पळूही न शकणारे असल्याने ते सुट्टीवर जमिनीवर वेळ घालवण्यासाठी आलेल्या खलाश्यांचा कंटाळा घालवण्यासाठी अगदीच सोप्पं आणि सहज हाती लागणारं सावज बनत असत! लक्षावधी वर्षं मानव अगदीच दूर असल्यामुळे त्यांना मानवाच्या विचित्र,विक्षिप्त आणि भीतिदायक वागणुकीची सवयच नव्हती ! आता आपल्याला त्या वेळची ती नेमकी कारणं,ती नेमकी परिस्थिती माहीत नाही किंवा ते शेवटचे क्षण नक्की सांगता येणार नाहीत,जेव्हा शेवटचा डोडो नामशेष होत होता,त्यामुळे आपल्याला हे नक्की सांगता येणार नाही की, यापैकी आधी काय आलं ते जग,ज्यात प्रिन्सीपिआ होता की जे जग,ज्यात 'डोडो' नव्हता! पण आपण हे सांगू शकतो की,त्या दोन्ही गोष्टी साधारणपणे एकाच काळात घडल्यात! मला हे मान्य आहे की,मानवाचा चांगुलपणा आणि त्याचबरोबर दुष्टपणा एकाच काळात घडताना दाखवणारी अशी दुसरी जोडी तुम्हाला शोधणं कठीण जाईल! सजीवांची अशी एक प्रजाती असणं की,जी या ब्रह्मांडातली गुढातली गूढ रहस्यही समजू शकेल,शोधू शकेल आणि त्याच वेळी काहीही कारण नसताना एका अभागी,दुर्दैवी प्राण्यावर हल्ले करत त्याला 'आपण का संपवले जातोय' हे कळूही शकत नसताना पार नामशेष करून पृथ्वीवरून त्याचा एकही जीव शिल्लक ठेवत नसेल? खरंच,डोडो पक्षी हे इतके अजाण,भोळे आणि अडाणी होते की,तुम्हाला जर एखाद्या ठिकाणचे सर्व डोडो शोधायचे असतील,तर फक्त एक डोडो पकडायचा त्याला केकाटत ठेवायचं की,त्या भागात आसपास असणारे सगळेच्या सगळे डोडो 'काय झालं? काय झालं?' बघायला आपणहून येऊन उभे राहतील तुमच्यासमोर !!
आणि डोडोंना तशी अपमानास्पद आणि वाईट वागणूक देणं तिथेचं संपलं नाही बरं! १७५५ साली,'शेवटचा' डोडो नष्ट होऊन सत्तर वर्षं उलटल्यावरची गोष्ट!
ऑक्सफर्डच्या ॲशमोलियन म्युझियमच्या डायरेक्टरने त्यांच्या संग्रहात असणारा पेंढा भरलेला डोडो पार मळलेला आणि कुबट वास येणारा झाला असल्याने त्याला उचलून चक्क शेकोटीत टाकण्याचं फर्मान सोडलं! तो प्रचंड धक्कादायक निर्णय होता.कारण,पेंढा भरलेला अथवा कशाही अवस्थेतला तो अख्ख्या जगातला एकमेव डोडो पक्षी शिल्लक होता,त्यामुळे तिथून जाणाऱ्या दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने हैराण होऊन आणि दचकून आगीत हात घालत तो डोडो वाचवण्याचा प्रयत्न केला; पण त्याला फक्त त्या डोडोचं मुंडकं आणि पायाचा भाग काय तो वाचवता आला होता.!
साध्यासरळ व्यवहारज्ञानाच्या अशा गोष्टीसुद्धा पाळल्या न गेल्याने आणि अक्कलशून्य वागणुकीमुळे आता डोडो पक्षी होता तरी कसा नक्की हे ही आपल्याला कळायची संधीच शिल्लक राहिलेली नाही! 'बऱ्याच मंडळींना वाटत असतं,त्याहीपेक्षा खूपच कमी माहिती आता आपल्याजवळ शिल्लक आहे डोडो पक्ष्याची! काही सागरसफरीवर गेलेल्या अशास्त्रीय प्रवाशांकडून केलं गेलेलं धोपट वर्णन, तीन-चार ऑइल पेंटिंग्ज आणि काही किरकोळ हाडं किंवा कडक झालेले अवयव' - हे उद्विग्न शब्द आहेत.१९ व्या शतकातल्या निसर्गशास्त्रज्ञ एच. ई. स्ट्रीकलॅन्ड यांचे! स्ट्रीकलॅन्ड यांनी खेदानं असं नोंदवलंय की,आपल्याकडे काही प्राचीन समुद्रीसैतानांचे आणि महाकाय डुलत जाणाऱ्या डायनोसॉर्ससारख्या प्राण्यांचे अवशेष आहेत;पण दुर्दैवानं जो पक्षी आपल्याच वर्तमानकाळात अस्तित्वात होता,त्याचे मात्र काहीच शिल्लक नाही.असा पक्षी ज्याला आपल्याकडून फक्त आपली अनुपस्थिती हवी होती! तर आजमितीला 'डोडो' पक्ष्याविषयी आपल्याला काय माहिती आहे तर ते इतकंच तो मॉरिशस बेटावर राहत होता; तो जाडजूड लठ्ठ अंगाचा होता; पण त्याचं मांस चवदार नव्हतं, 'कबुतर' जातीतला तो सर्वांत आकाराने मोठा पक्षी होता;पण नक्की किती ते मात्र सांगता येणार नाही.कारण,त्यांच्या वजनाचे कुठे संदर्भ उपलब्ध नाहीत.स्ट्रीकलॅन्डच्या हाडं आणि अवशेषांच्या उपलब्ध माहितीवरून आणि ॲशमोलियनच्या शिल्लक राहिलेल्या अवशेषांवरून अंदाज बांधता येतो की,डोडो साधारणपणे अडीच फूट उंच आणि आधीच्या टोकापासून ते शेपटीपर्यंत तेवढाच अडीच फूट लांब असावा! उडू शकत नसल्याने तो जमिनीवरच अंडी घालत असे - ज्यामुळे त्यांची अंडी हे त्या बेटावर माणसांनी आणलेल्या कुत्रे, डुक्कर आणि माकडांसाठी आयतच खाद्य ठरत असतील.'डोडो' हा साधारणपणे १६८३ सालपर्यंत 'नामशेष झाला.(१६९३पर्यंत तर अगदीच,पार नाहीसाच झाला). त्यानंतर मात्र आजतागायत आपल्याला त्या पक्ष्याविषयी काहीही माहिती मिळालेली नाही, इतकंच की आता तो यापुढे पृथ्वीवर कधीच दिसणार नाही!
आपल्याला त्याच्या पुनरुत्पादनाच्या,खाण्याच्या सवयीविषयी कुठलीच माहिती नाही.तो कुठपर्यंत संचार करत होता,त्याचा आवाज तो शांत असताना कसा यायचा किंवा संकटात असताना सूचना देण्यासाठी कसा ओरडायचा याचीही माहिती नाही आणि पृथ्वीवर 'डोडो'चं एकसुद्धा अंड उपलब्ध नाही.माहितीनुसार, डोडोशी मानवाचा संपर्क हा जेमतेम सत्तर वर्षंच होता.हा म्हणजे अगदीच अल्पकाळ ! आणि तो बघता आपण असं म्हणूच शकतो की,मानवाची हजारो वर्षं अशी सवय असल्याने आपण कितीतरी प्राण्यांना अशा प्रकारे कायमचं नष्ट, नामशेष करून मोकळे झाले असू! कुणाला काय माहीत की मानव हा किती भयंकर संहार करणारा प्राणी आहे ते! पण हे निर्विवाद सत्य आहे की पृथ्वीच्या पाठीवर गेल्या ५० हजार वर्षांत मानव जिथे जिथे गेलाय तिथे तिथे त्याने प्राण्यांना संपवण्याचं काम केलंय कधी कधी तर प्रचंड संख्येने !
अमेरिकेपुरतं बोलायचं तर गेल्या १० ते २० हजार वर्षांमध्ये मानवाने इथे पाऊल ठेवल्यापासून ३० प्रकारचे मोठमोठ्या जातीचे काही तर फारच मोठ्या,महाकाय जातीचे प्राणी एकेका तडाख्यात नष्ट केलेत! निव्वळ उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतच आधुनिक मानवाचं आगमन झाल्यापासून,या शिकारी मानवाने आपल्या तीक्ष्ण भाल्यांच्या आणि संघटन कौशल्याच्या जोरावर मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या जातींपैकी तीन चतुर्थांश जाती संपवल्या आहेत! तर युरोप आणि आशियामध्ये, जिथे प्राण्यांना माणसांपासून सावध राहण्यासाठी जरा जास्त वेळ लागला,तिथे ही एक तृतीयांश ते निम्म्या इतक्या जाती नष्ट झाल्याच ! आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या बरोबर विरुद्ध कारणासाठी ९५ टक्के इतक्या प्राण्यांच्या जाती नष्ट झाल्या! केवळ सुरुवातीच्या काळात 'शिकारी' मंडळींची संख्या त्यामानाने कमी होती आणि प्राण्यांची संख्या भलतीच जास्त होती (उदाहरणार्थ उत्तर सैबेरियाच्या टंड्रा भागात एक कोटींवर 'मॅमथ' या हत्तीच्या जातीच्या प्राण्यांचे अवशेष बर्फात गाडले गेले असल्याचा अंदाज आहे) आणि कदाचित काही पंडितांच्या मते इतरही काही कारणं असावीत की वातावरणातले बदल किंवा जगभर थैमान घालणारे साथीचे रोग वगैरे…
अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरीच्या रॉस मॅकफीनं म्हटल्याप्रमाणे - तुम्हाला त्यांची शिकार करायला हवी असं वाटावं,अशा काही धोकादायक प्राण्यांना मारण्यात,माणसाला काय भौतिक फायदा असणार असतो? आपण असे किती 'मॅमथ-स्टिक्स' खाणार असतो? इतर काहींच्या मते प्राण्यांना पकडून त्यांच्या कत्तली करण्याचं दुष्कर्म करणं भलतंच सोपं!टीम फ्लॅनरीने म्हटलंय की,ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत तर प्राण्यांना कदाचित आपण पळून जायला हवं हेही कळलं नसावं !
काही नामशेष झालेले प्राणी इतके विलक्षण देखणे आणि भव्य होते आणि ते असते तर थोडंफार त्यांना हाताळणं शिकावं लागलं असतं इतकंच ! कल्पना करा की,जमिनीवर राहणारे 'स्लॉथ' जे थेट तुमच्या वरच्या मजल्यावरच्या खिडकीला डोकावतायेत,अशी कासवं जी फियाट कारच्या आकाराएवढी आहेत.पश्चिम ऑस्ट्रेलियात वाळवंटातल्या रस्त्याच्या बाजूला ऊन खात पहुडलेले तब्बल ६ मीटर (१८ ते २० फुट) लांबीचे मॉनिटर जातीचे सरडे काश!! पण गेले ते सगळे !! आणि आपण आता एका संपत चाललेल्या ग्रहावर उरलेले आहोत! आजमितीला अख्ख्या जगात मिळून केवळ चारच खरोखर अजस्र (१००० किलो किंवा जास्त वजन असणारे) भूचर प्राणी शिल्लक आहेत हत्ती, गेंडे, हिप्पोपोटॅमस आणि जिराफ! कित्येक लाखो वर्षं पृथ्वीवरच जीवन इतकं नीरस आणि विझत जाणार नव्हतं ! मग असाही प्रश्न उभा राहतो की,अश्मयुग आणि अलीकडच्या काही वर्षांमधलं 'लुप्त होत जाणं' हे एकाच नामशेष होण्याच्या प्रक्रियेचा भाग तर नाहीत? थोडक्यात म्हणजे 'मानव' हा इतर प्राण्यांच्या दृष्टीने 'अशुभ वार्ता' बनून तर अवतरलेला नाही?
खेदाची सत्यता अशी की, तेच खरं असू शकेल! शिकॅगो युनिव्हर्सिटी पुराजीवशास्त्रज्ञ डेव्हिड राऊपच्या मते,
'आपण जर का जीवशास्त्रीय इतिहास बघितला,तर पृथ्वीच्या पाठीवर दर चार वर्षांनी एक प्रजाती नष्ट होण्याची सरासरी राहिलेली आहे!' द सिक्स्थ एकटींकशन या पुस्तकात रिचर्ड लिकी आणि रॉजर लेविननी म्हटलंय की,ती जी सरासरी आहे त्याच्या कदाचित १,२०,००० पट इतकी प्रचंड प्रजाती नामशेष करण्याची कामगिरी मानव जन्माला आल्यापासून त्याच्यामुळे घडली असावी ! १९९०च्या दशकाच्या मध्यात,आता ॲडलेडमधल्या साउथ ऑस्ट्रेलियन म्युझियमच्या प्रमुख असणाऱ्या निसर्गशास्त्रज्ञ टीम फ्लॅनरीला आपण या प्राण्यांच्या 'नामशेष' होण्याच्या प्रक्रियेबद्दल किती अनभिज्ञ आहोत,याचा धक्काच बसलाय. अगदी अलीकडच्या गोष्टी गृहीत धरूनही त्याने मला २००२च्या आमच्या भेटीदरम्यान सांगितलं, 'तुम्ही जिथे म्हणून बघाल तिथे काही ना काही कच्चे दुवे किंवा मोठमोठ्या रिक्त जागा दिसतील - डोडोसारख्या म्हणजे काहीच थांगपत्ता नसणाऱ्या किंवा कसलंच रेकॉर्ड शिल्लक नसणाऱ्या !' फ्लॅनरीने त्याच्या एका ऑस्ट्रेलियन चित्रकार मित्राला,पीटर शाउटनला बरोबर घेऊन एका महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात केली. ती म्हणजे जगभर फिरून जे काही हरवलंय,जे काही गेलंय किंवा जे आजतागायत माहीतच नाही अशा गोष्टी धुंडाळायच्या हेच काम ! हे दोघांच्याही आवडीचं आणि त्यांनी त्याचा जणू ध्यासच घेतलेला! त्यांनी चार वर्षं अनेक जुने नमुने धुंडाळले,बुरशी आलेले जुने कुबट वास येणारे नमुने तपासले,जुने अवशेष बघितले,जुनी ड्रॉइंग्ज,
जुनी हस्तलिखित नजरेखाली घातली - जे जे म्हणून उपलब्ध होतं ते ते बघितलं! त्यांनी पाहिलेल्या तशा बहुतेक सर्व प्राण्यांची मग अंदाजे मांडणी करत शाउटननं पुरुषभर उंचीची चित्रं काढली आणि फ्लॅनरीने त्यासंबधी माहितीपर चार शब्द लिहिले! आणि त्यातूनच मग अ गॅप इन नेचर हे अद्भुत पुस्तक जन्माला आलं! त्यामध्ये गेल्या तीनशे वर्षांत नामशेष झालेल्या बहुसंख्य प्राण्यांची माहिती आपल्याला कॅटॅलॉग स्वरूपात पाहायला मिळते.
काही प्राण्यांचा अभ्यास करताना त्यांना सुस्थितीतले रेकॉर्ड्स मिळाले;त्यासंदर्भात अभ्यास करून कुणीही विशेष काही केल्याचं दिसत नव्हतं,अगदी वर्षानुवर्षं किंवा आयुष्यभर! 'स्टेलर्स काऊ' हा वॉलरससदृश प्राणी (काहीसा ड्युगॉन्गशी संबंधित) म्हणजे नामशेष झालेला अलीकडचा सर्वांत मोठा प्राणी! हा खरंच महाकाय होता - जवळपास ९ मीटर (३० फुट) लांबी आणि १० टन (१०,००० किलो) वजन!आपल्या आधुनिक जगाला याची माहिती केवळ एका अपघाताने झाली,जेव्हा १७४१ साली एका रशियन मोहिमेचं जहाज फुटून ती मंडळी एका किनाऱ्याला लागली? जिथे हे प्राणी बऱ्याच संख्येने शिल्लक होते - बेरिंगच्या सामुद्रधुनीत असणाऱ्या कमांडर बेटावर !
एक समाधानाची बाब म्हणजे त्या मोहिमेत जॉर्ज स्टेलर हा निसर्गशास्त्रज्ञ सहभागी होता,ज्याने त्या प्राण्यात विशेष रस घेऊन अभ्यास केला.फ्लॅनरीने म्हटलंय,त्याने त्या प्राण्यासंबंधी भरपूर,विपुल टिपणं काढली होती! इतकंच नव्हे,तर त्या प्राण्याची मापं घेताना त्याच्या लांबलचक मिश्यांचीसुद्धा मापं घेतली होती.फक्त एकाच गोष्टीविषयी त्याने लिहिलेलं आढळत नाही त्यातल्या नर - प्राण्याच्या लिंगाविषयी परंतु मादीच्या जननेंद्रियाविषयी मात्र त्याने टिपणं काढलेली आढळतात! त्याने त्या प्राण्याच्या कातडीचा एक तुकडाही जपून आणला होता,ज्यामुळे आपल्याला आज त्या प्राण्याच्या कातडीचा पोत कळतो;पण आपण नेहमी इतके सुदैवी नसायचो !
स्टेलरला इतकं करताना एक मात्र करता आलं नव्हतं,ते म्हणजे त्या 'समुद्रगायीला' वाचवणं! स्टेलरने तिचा शोध लावल्यापासून पुढच्या सत्तावीस वर्षांत त्या प्राण्याची प्रचंड शिकार होत गेलीपण इतर बरेच प्राणी त्या कॅटलॉगमध्ये समाविष्ट करता नाही येऊ शकले.कारण, त्यांच्याविषयी फार काही माहितीच उपलब्ध होऊ शकली नाही. 'द डार्लिंग डाऊन्स हॉप्पिंग माउस,' 'चॅथम आयलंड स्वॅन्स',असेन्शन आयलंड फ्लाईटलेस क्रेकं,जवळपास पाच प्रकारची समुद्री कासवं आणि इतरही काही प्राणी हे काळाच्या पडद्याआड गेलेत आणि आपण त्यांना कायमचे हरवून बसलोय ! त्यांची नावच काय ती शिल्लक आहेत! फ्लॅनरी आणि शाउटनला असंही आढळलं की,बऱ्याच बाबतीत नामशेष झालेले प्राणी हे त्यांच्या क्रूर आणि बेलगाम कत्तलींमुळे नव्हे तर अत्युच्च मूर्खपणामुळेही झालेत.!१८९४ साली न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिणेकडच्या बेटांजवळच्या सागरी वादळांच्या पट्ट्यात असणाऱ्या एका एकाकी खडकावर, स्टीफन्स आयलंडवर जेव्हा एक दीपगृह बांधण्यात आले,तेव्हा तिथे राहणाऱ्या दीपस्तंभाच्या कर्मचाऱ्यांची मांजर रोज त्याच्याकडे काही विचित्र छोटे पक्षी तोंडात धरून आणत असे,त्या कर्मचाऱ्याने इमानदारीत त्यातले काही मृत पक्षी वेलिंग्टनच्या म्युझियमकडे पाठवले.तिथला म्युझियमचा प्रमुख ते बघून उत्तेजित झाला.कारण,ते उडता न येणाऱ्या 'रेन' प्रकारचे छोटे पक्षी होते.कदाचित, उडता न येणाऱ्या अशा बसून राहणाऱ्या पक्ष्याची अत्यंत दुर्मीळ अशी ती जात! तो लगोलग त्या स्टीफन्स आयलंडच्या दिशेने निघाला; पण तो तिथे पोहोचेपर्यंत तिथल्या मांजरीने तिथल्या झाडून सर्व पक्ष्यांना ठार मारलं होतं. आता आजमितीला आपल्यासमोर शिल्लक आहेत केवळ १२ पेंढा भरलेले स्टीफन आयलंडवरचे पक्षी !
अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ निअरली एव्हरीथिंग - बिज ब्रायसन-अनुवाद-प्रसन्न पेठे (आपलं अस्तित्वच नव्हतं तिथपासून ते आज आपण इथे असेपर्यंतचा सारा प्रवास)- मंजुल पब्लिशिंग हाऊस..
पण निदान आपल्याजवळ तेवढे तरी आहेत म्हणायचे! बऱ्याचदा असं होत आलंय की, एखादी प्रजाती हयात असताना मानवाचं त्याकडे लक्षच गेलेलं नाही आणि ती प्रजाती पूर्ण नामशेष झाल्यावर मात्र आपल्याला जाग आल्याचं दिसतं ! आता कॅरोलिना पॅराकीटचंच बघा ना! लखलखत सोनेरी डोकं आणि पाचूसारखा हिरवागार रंग असणारा हा अतिशय मनोहारी,देखणा पक्षी एकेकाळी उत्तर अमेरिकेत असायचा आणि खरं तर पोपट इतक्या उत्तरेकडे फार आढळत नाहीत हेही आपल्याला माहितीये! एक काळ असा होता,जेव्हा ते अक्षरशः मुबलक संख्येने त्या भागात वस्ती करून होते. त्यांच्यापेक्षा जास्त संख्या केवळ भटक्या कबुतरांचीच असावी! पण हे कॅरोलिना पॅराकीटसुद्धा शेतकऱ्यांच्या मते त्यांचे शत्रू ठरले आणि मग त्यांच्या अतिशय सहज शिकारी होऊ लागल्या - एकतर त्यांना घट्ट कळप करून एकत्रच उडायची सवय आणि दुसरं म्हणजे बंदुकीचा एक बार जरी झाला तरी ते झटकन कळपात वर उसळायचे आणि नंतर आपल्या मेलेल्या जातभाईंना बघायला पुन्हा तिथेच जायचे, मग काय? १९व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या - अमेरिकन ऑर्नीथॉलॉजी या आपल्या उत्कृष्ट पुस्तकात चार्ल्स विल्सन पीअल याने एका प्रसंगाचं वर्णन केलंय... जेव्हा त्याने एका झाडावर वस्ती करून असणाऱ्या त्या पक्ष्याच्या कळपावर आपली शॉटगन पूर्ण रिकामी केली होती -
उर्वरित भाग २३.०२.२४ या लेखामध्ये..।